लोकलट्रेन प्रवाशाच्या रोजनिशीतील एक पान.

लोकलट्रेनमध्ये बसलो आहे. ऑफिसला चाललोय. काल झोपायला अंमळ जरा उशीरच झाला होता. झोप कमी झाली त्यामुळे अंग जरा आळसावल्यासारखे वाटतेय. गाडीने नुकतेच कल्याण सोडलेय. लोकलमधली अनाउन्सर बाई जीव खाऊन कोकलतेय. "पुढील स्टेशन ठाकुर्ली, अगला स्टेशन ठाकुर्ली, नेक्स्ट स्टेशन ठाकुर्ली". गाडीके 'पायदान पायदान' ऐकून ऐकून डोकं भिरभिरायला लागतं. शेजारील लेडीस फर्स्टक्लासच्या डब्यात एक गरीब म्हातारी हातात आपलं बोचकं घेऊन सीटवर बसली आहे. अजून पुष्कळ सीट रिकाम्या आहेत, पण इतर बायका तिला हळूच खुनन्सने बघतायत. थोड्यावेळाने त्यांचा उद्रेक होणारसं दिसतंय. पूर्वी कल्याण आणि ठाकुर्लीच्यामध्ये फक्त रान होतं. आता नवीन नवीन कॉम्प्लेक्स उभे रहाताना दिसताहेत. डोंबिवली गेलं. आज गाडी धावताना जरा जास्तच झोल मारतेय. असंच एकदा एक मुलगी मोबाईलवर काहीतरी करत गाडीच्या दरवाजात उभी होती. आणि अचानक गाडीने जोरात झोल मारल्याबरोबर तिच्या हातातील मोबाईल निसटून गाडीच्या बाहेर फेकला गेला होता. नशीब ती नाही फेकल्या गेली. डोंबिवली सोडल्यावर पुढे मुंब्र्यापर्यंत ट्रॅकच्या दोन्ही बाजूला आसमंतात खाडीचा एक घाण उग्र वास भरून राहिलेला असतो. बाजूच्या ट्रॅकवरून जाणाऱ्या एक्सप्रेसचा खडखडाट घुमतोय. नीट निरखून पाहिले असता डब्याचे एक चाक जरा जास्तच खड्खड् करतेय. मुंब्रा कळवा लाईनच्या बाजूने समांतर हायवे जातो. त्याच्यावर कायम ट्राफिक जाम असते. कळवा स्टेशन आलेय. बाजूच्या खिडकीतून कोवळं ऊन आत यायला लागलंय. संध्याकाळी परत येताना मी उन्हाच्या बाजूच्या रांगेत बसत नाही. तिथून कडक ऊन आत येतं. आणि ती बाजू दिवसभर उन्हात तापून निघालेली असते. फार गरम होते त्याबाजूला. कितीतरी स्टेशनवर पंखे बिनकामाचे फिरत असतात. त्यांच्याखाली ते बंद करायला बटनं हवी होती. सकाळी सकाळी ट्रेनने प्रवास करणाऱ्या तृतीयपंथीयांचा बऱ्याच स्टेशनवर घोळका दिसतो. कुठून कुठे आणि कसल्या कामावर जातात, कोण जाणे! ठाणे स्टेशनवर एक माणूस कामावर बॅग घेऊन जाताना पाहिला. रिटायर व्हायला आला असेल, पण जरा जास्तच म्हातारा झालेला वाटतोय. अंध आणि अपंगांचा डबा प्लॅटफॉर्मवर जिथे येतो, तिथे वर छताला अंधांना कळण्यासाठी एक सतत 'पीक पीक' आवाज करणारे छोटे स्पीकर लावलेत. त्याचा चोवीस तास येणारा आवाज इतरांची छळवणूक करणारा आहे. त्या स्पीकरजवळच जे कॅन्टीनवाले आहेत, त्यांना त्याचा किती त्रास होत असेल. मुलुंड स्टेशनवर बूट पॉलिशवाला पॉलिशचे सामान काढून जमिनीवर व्यवस्थित रचून ठेवतोय. काही स्टेशनच्या भोवतालच्या जागेत छान बगीचे केलेत. तिथे सुंदर फुले उमलेली दिसताहेत. बऱ्याच स्टेशनवरच्या भिंती शाळा कॉलेजच्या मुलांनी छान छान चित्रे काढून सुशोभित केल्या आहेत. मी बऱ्याचदा ही चित्रे निरखून पहात असतो. पुष्कळशा चित्रांमध्ये सामाजिक संदेश दिलेला दिसतो. काही चित्रांमध्ये त्या त्या स्टेशनच्या परिसरात असलेल्या प्रसिद्ध स्थळांची माहिती दिलेली आढळते. फारच छान उपक्रम आहे हा! भांडुप गेले. माझ्या समोरच्या बाकावरील तिघाजणांची मस्तपैकी ब्रह्मानंदी टाळी लागलीय. त्यापैकी एकाचा घोरल्याचा आवाज येतोय. माझ्या बाजूला बसलेला एकजण जोरजोऱ्यात मद्रासीत कसले तरी मंत्र पुटपुटतोय. एक कॉलेजचा विद्यार्थी पुस्तकावर पिवळ्या मार्करने रेघोट्या ओढतोय. अरे! अरे!  रेघोट्या ओढून ओढून सर्वच पुस्तक रंगवतोय की काय? बाकीचे जे जागे आहेत, ते आपल्या मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसलेत. काही वर्षांपूर्वी हीच लोकं पुस्तक नाहीतर पेपरमध्ये डोकं खुपसलेली दिसायची. चला! थोड्यावेळाने माझे उतरायचे स्टेशन येईल. उतरायच्या तयारीत रहायला पाहिजे. नाहीतर लिहिताना मी एवढा गुंग होऊन जातो, की बऱ्याच वेळा दोन तीन स्टेशन पुढे जाऊन पोहोचतो. अहो, एकदा तर अशावेळी रिटर्न येताना पुन्हा दोन स्टेशन पुढे (की मागे?) गेलो होतो. हा! हा! हा! बाय! उद्या भेटा! नवीन वाचायला!

माझा ब्लॉग :
http://sachinkale763.blogspot.in

field_vote: 
0
No votes yet