हवेतल्या गोष्टी - ४ - उरले ते मोती

संदर्भासाठी आधिच्या भागांचे इतर संस्थळावरचे दुवे दिले आहेत.

हवेतल्या गोष्टी - १
हवेतल्या गोष्टी - २ : ती
हवेतल्या गोष्टी - ३ - पिंज-याचे दार उघडावे...

पावसाळ्यातील अशीच एक फ्लाईट, अगदी पहाटे पहाटे निघालो होतो. वास्तविक पहाटेची फ्लाईट म्हणजे माझी अगदी आवडती. आजूबाजूची रात्रीबेरात्री उठून विमानतळावर आलेली मंडळी, पुन्हा झोपेच्या आधीन होत असताना, मी टक्क जागा असतो.

ढगांच्या पांढऱ्या समुद्रावर जाऊन शांतपणे उगवता सूर्य पाहणं मोठं लोभसवाण असतं. अजून दिवसाच्या ट्राफिकनं रविराज कावलेले नसतात, नुकतेच क्षितिजावरुन बाहेर येत ढगांच्या मऊशार पाठीवर आपली किरणं आजमावून पहात असतात. तो सगळा सोनेरी सोहळा माझ्याही कोत्या मनात भव्यतेची, मंगलाची छाप दिवसभराकरता ठेऊन जातो.

पण आज मात्र सुर्यादेवांना सुट्टी, करड्या काळ्या ढगांचीच सत्ता आकाशात. आज दिवसभरात काही चांगलं घडूच शकणार नाही असा माहौल..
खराब हवामानाची नेहेमीची सूचना देऊन झाली आहे. मंडळींच्या चेहेऱ्यावर चिंतेच्या छटा चढू लागल्यात. विमान ढगात शिरतं. हादरु लागतं. लोकांच्या नेहेमीच्याच प्रतिक्रिया मी जरा वैतागूनच पहात राहतो.

माझ्या शेजारच्या जागेवर एक आजोबा, ते एकट्यानं प्रवास कसे करतायत ह्याचं मला आश्चर्य वाटलं होतंच. मी त्यांच्याकडे त्यांच्या नकळत निरखून पाहू लागतो. सुरकुतलेला चेहेरा. अंगात स्वेटर, हाफशर्ट. वय साधारण पासष्ठ ते सत्तरच्या आसपास. पण चेहऱ्यावर, डोळ्यात काहीतरी विलक्षण गोड भाव..
काही लोकांच्या चेहेर्यावरच एक तृप्त, समाधानी भाव कोरलेला असतो, म्हणजे बघा.. चंद्रकांत गोखले यांचा चेहेरा आठवतोय, तसा काहीसा भाव... माझ्याकडे बघून एक छानसं कुणालाही जिंकून घेणारं स्मितहास्य..

ते शांत आहेत. विमान हादरु लागल्यावर ते डोळे मिटून घेतात, पण चेहेऱ्यावर एकही जास्तीची सुरकुती उमटत नाही.. तसाच प्रसन्न, शांत चेहेरा.. माझी विचाराश्रुन्खाला नेहेमीप्रमाणे चालूच.. आत्ता या आजोबांच्या मनात काय चालू असेल...

मृत्यूची प्रकर्षानं जाणीव होत असेल का इतरांसारखी.. जर तशी जाणीव होत असेल तर नक्की काय विचार उमटत असतील.. खेद असेल कि तृप्तता... काही करायचं राहिलं याची रुखरुख असेल... की एवढं करू शकलो, एवढ्या लांब आलो याचं समाधान असेल.. आप्तांची आठवण येत असेल का... का पैलतीरावर आप्तांचीच भेट होणार म्हणून उत्सुकता असेल.. आत्तापर्यंतच्या वाटचालीचा कोलाज येत असेल का विचारांच्या पटलावर.. की कोरी पाटी असेल नवा अनुभव घ्यायला..

मी असा सामोरा जाऊ शकेन का... नाही जाणार कदाचित... का म्हणून? अजून खूप जगायचंय म्हणून..जगायचय म्हणजे नक्की काय करायचय.. जास्ती दिवस श्वास घेणं म्हणजे आयुष्य का? म्हणजे मृत्यूला सामोरं जाताना वय महत्वाचं कि वृत्ती..

आयुष्य आयुष्य म्हणजे तरी काय, जन्मल्यापासून मरेपर्यंत एखाद्या मांजराच्या पिलासाराखं पायात तडमडत रहातं ते, अडखळायला होतंच पण असतं ही लोभसवाणं..
अजून खूप जगायचंय, खूप पहायचय.. पण तरीही असंच म्हणावसं वाटतं...

आता उरले ना दिस; रूसण्याचे-भांडण्याचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे

किती काळ रहायचे; मान-अपमानी दंग,
पहा लकाके नभात; कसा शेवटला रंग.
कोण जाणे कोण्या क्षणी; सारे सोडून जायचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे

जरी भांडलो-तंडलो; तरी तुझीया सोबती,
दिली दुर्दैवाला पाठ; अन्‌ संकटाला छाती.
सारे कठीण; तुझीया सवे मृदूल व्हायचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे

काही उणे माझ्यातले; काही दुणे तुझ्यातले,
बघ शेवटास सारे; कसे सुखमय झाले.
जन्मी पुढल्याही होऊ; अजूनही ओळखीचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे

कष्ट, ध्यास, त्रागा, प्रेम, जिद्द, तडजोड, भीती,
जे जे झरले ते पाणी; आणि उरले ते मोती.
येत्या उद्याने जपावा; असा शिंपला व्हायचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे

-संदीप खरे

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

लेखाचा पहिला भाग आवडला. वातावरण निर्मिती सुंदर झालेली आहे.

ढगांच्या पांढऱ्या समुद्रावर जाऊन शांतपणे उगवता सूर्य पाहणं मोठं लोभसवाण असतं. अजून दिवसाच्या ट्राफिकनं रविराज कावलेले नसतात...
आज दिवसभरात काही चांगलं घडूच शकणार नाही असा माहौल..

ही वाक्यं छान.

शेजारी बसलेल्या आजोबांच्या वर्णनानंतर मात्र थोडा भरकटला असं वाटलं. अचानक मृत्यू, जीवनाच्या विचारांच्या आकाशात शिरला, पण परत त्या विमानात लॅंड झाला नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख आवडला; साधारण या धाग्यात वर्णन केलेल्या चित्रपटासारखा, गोष्ट अशी नाही, पात्रांच्या माध्यमातून फक्त विचारच आहेत. त्यामुळे खरंतर असं विचार करणं आवडलं असं म्हणते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेखात आधिच्या भागांचे दुवे दिले आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आयुष्य आयुष्य म्हणजे तरी काय, जन्मल्यापासून मरेपर्यंत एखाद्या मांजराच्या पिलासाराखं पायात तडमडत रहातं ते, अडखळायला होतंच पण असतं ही लोभसवाणं..

आवडलचं. ईशालभौ मनाची स्पंदन अगदी भावली. काही भुभु लोक पण अस्सच करतात.
किती काळ रहायचे; मान-अपमानी दंग,
पहा लकाके नभात; कसा शेवटला रंग.

या संदीप खरेच्या ओळी विशेष आवडल्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/