गोलागमध्ये गोडबोले : तीन । नाख्त द लांगेन मेसं

ललित

गोलागमध्ये गोडबोले : तीन । नाख्त द लांगेन मेसं

- आदूबाळ

एक । जनमताचे दूध काढणे

दोन । हळदीचा चंद्र

(पडदा उघडतो. गोडबोले हातात डोकं गच्च पकडून बसले आहेत. खाली सोंगट्यांची धावपळ सुरू आहे. बऱ्याच सोंगट्या गंधधारी आहेत.)

लेखक : (गंभीरपणे) उठा आता, गोडबोले. जे आहे ते आहे. आता पॅव्हेलियनमध्ये बसण्याची वेळ झाली. ग्लोव्ह्ज काढा, पॅड्स सोडा. तुम्ही इथे आल्या क्षणापासून ते स्पष्ट होतं. तुम्हीच समजून घेत नव्हतात. याला ‘अमाथिया’ म्हणतात ग्रीकमध्ये. इंटेलिजंट स्टुपिडिटी. नॉट ॲन इनॅबिलिटी टू अंडरस्टँड, बट अ रिफ्युजल टू अंडरस्टँड.

(गोडबोले अगतिक, चिडलेले हातवारे करतात.)

लेखक : कम ऑन, गोडबोले! मघांपासून तुम्ही कोणती कविता म्हणताय ती आठवा.

जीत की हवस नहीं । किसी पे कोई वश नहीं ।

क्या ज़िन्दगी है, ठोकरों पे वार दो ॥

मौत अंत है नहीं । तो मौत से भी क्यों डरें ।

ये जाके आसमान में दहाड़ दो ॥

(सोंगट्या ठाक ठाक ताल देतात.)

कधीतरी यायचं, कसंतरी जायचं. मधल्या काळात काहीतरी करायचं. तुम्ही किती काय-काय केलं ते आठवून पहा. स्वतःचाच अभिमान वाटेल तुम्हांला.

गोडबोले : (खचलेल्या आवाजात) मीच का?

लेखक : (उत्तर द्यायला सुरुवात करतो तोच … टर्रर्रर्रर्रर्र. लाल झोत. )  

आवाज : (जरबेने) लेखक, फालतू तपशील द्यायची गरज नाही.

लेखक : (वर बघत, थोडं घुटमळत) नाही… म्हणजे… तसा प्रश्न बरोबर आहे त्यांचा. शिवाय गोडबोले म्हणजे, तसा ज्येष्ठ कार्यकर्ता. त्यामुळे थोडं… म्हणजे वाटलं… तुमची परवानगी असेल तर, अर्थात. आणि अजून वेळही झाली नाहीये.

आवाज : हं. पण जपून. माझं लक्ष आहेच. आणि वेळ होईपर्यंत तुमचं मुख्य काम विसरू नका.

लेखक : हो, ते काय लिहूनच ठेवलंय ना!

(ठोकळ्यावरच्या स्क्रीनवर एक वृत्तनिवेदिका दिसायला लागते.)

वृत्तनिवेदिका : He was last seen aboard the Pathankot - Sealdah express. The train attendent described him as an affable man, and did not realise he was a senior leader … till his disappearance caused a great uproar. A suspicion of kidnapping has been expressed...

गंधवाली सोंगटी : यामागे कोण आहे हे उघड आहे. (टोपीवाल्या सोंगटीकडे निर्देश करतो. बऱ्याच गंधवाल्या सोंगट्या टोपीवाल्या सोंगटीपासून बाजूला सरकतात. स्क्रीनवर टिंग टिंगचे आवाज आणि नाचते अंगठे.)

पुस्तकवाली सोंगटी : याला काहीच पुरावा नाही. निष्पक्ष चौकशी...  (गंधवाल्या सोंगट्या पुस्तकवाल्या सोंगटीला घेरतात. हातातलं पुस्तक खाली फेकून ते तुडवतात, आणि बळजबरी गंध लावतात.)

गंधवाली सोंगटी : ...पावन कर देंगे आज पूरे देश को!

निळी सोंगटी : मला तुमच्याबरोबर यायचं नाही. याचसाठी आम्ही सगळे साठ वर्षांपूर्वी -

गंधवाली सोंगटी : अहो तुम्ही आपलेच आहात. इथलेच आहात. हे लोक काही सीधे नाहीत, भाऊ. आपलं आपलं काय असेल ते नंतर बघू. आधी यांना संपवू -

(निळ्या सोंगटीला गंध लावलं जातं.  हळूहळू गंधधारी सोंगट्या जास्त संख्येने दिसायला लागतात.)

गोडबोले : माझं अपहरण झालंय असं उठवताय तुम्ही! हे … हे पचणार नाही तुम्हाला! माझे कार्यकर्ते माझ्याशी निष्ठावंत आहेत. ते शांत बसणार नाहीत, मला शोधण्यासाठी जंग जंग पछाडतील. देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातून मला शोधून काढतील.

लेखक : आश्चर्य आहे! तुमची तर केडरबेस पार्टी ना? विथ अ टूंऽऽ? पक्षापेक्षा नेत्याला मोठं होऊ न देणारा तुमचा पक्ष ना?

गोडबोले : एके काळी होता ... आता…  

लेखक : (गंभीर होत) गोडबोले, आज तुम्ही इथे आहात याचं कारण तुमचे कार्यकर्तेच आहेत. तुमच्याइतका व्यापक जनाधार असलेला नेता आज कुठेच नाही. आणि त्याचीच भीती वाटते आहे त्यांना.

गोडबोले : अहो पण त्यांचे आणि माझे रस्ते वेगळे आहेत. ते सत्तेत आहेत! निवडणुकीत जिंकले आहेत. पदावर आहेत.

मला राजकीय आकांक्षा नाही. मी कधीही कोणत्याही निवडणुकीला उभा राहिलेलो नाही. माझे कार्यकर्ते, माझा जनाधार - शेवटी त्यांच्याच कामाला येणार आहे.

लेखक : हे खरं आहे. एकदम खरं आहे. पण मोठे झालात तुम्ही गोडबोले. या (खाली बोट दाखवत) खुज्या माणसांच्या जगात एकाच मोठा माणूस असणार आहे. आणि तो माणूस तुम्ही नाही. म्हणून तुम्हांला जायला हवं, गोडबोले.

(गोडबोले काहीच बोलत नाहीत. नुसत्या येरझाऱ्या घालत राहतात. सोंगट्या जलदीने हालचाली करताहेत. लेखक लॅपटॉपवर खुडबुड करतो आहे. मध्येच तो काही पाठवतो, खालच्या स्क्रीनवर ते दिसतं, अंगठे नाचतात, सोंगट्या इतस्ततः हलतात.)

गोडबोले : लेखक. (लेखकाचं लक्ष नाही.) लेखक!

लेखक : हां, गोडबोले. बोला.

गोडबोले : लेखक, तुम्ही वरचे दिसता. खूप. गोलागमध्येच राहता. गोलाग चालवता. ते डावंबिवं असल्याचा अभिनय करता, फसलो मी, मान्य करतो. तुमची पहुंच वरपर्यंत आहे. पार (वर बोट दाखवत) तिथपर्यंत बोलू शकता.

लेखक : अं .. तसं म्हणा पाहिजे तर.

गोडबोले : नाही, नाव ऐकलं नव्हतं तुमचं कधी.

लेखक : तुम्हांला अजूनही माझं नाव माहीत नाही, गोडबोले.

(गोडबोले वरमून गप्प बसतात.)

लेखक : सॉरी, गोडबोले. तुम्हांला दुखवायचं नव्हतं. विचारा तुम्हांला काय विचारायचंय ते.

गोडबोले : या … (सभोवताली हात दाखवून) सगळ्यातून बाहेर पडायचा काहीतरी मार्ग असेल ना?

लेखक : (खट्याळपणे हसत) पळूनबिळून जाणार आहात की काय?

गोडबोले : अगदी तसं नाही, पण जिवानिशी बचावलो तर …

लेखक : (ठासून) गोलागमधून कोणीही पळून जाऊ शकत नाही.

(टर्रर्र. लाल प्रकाश.)

आवाज : शाब्बास, गोडबोले. आता आवरा.

(लाल प्रकाश जातो.)

गोडबोले : पळून कोण जातंय? काहीतरी तोडगा काढा. तडजोड करा.

लेखक : ते माझ्या हातात नाही. सॉरी. तुम्हांला सांगितलं मी - तुम्ही खूप मोठे झालात. जर कोणीतरी छोटे असतात, तर सामावून घेतलं असतं तुम्हांला.

आता त्या संस्कृतीवाल्या बाई बघा - एके काळी चळवळीत होत्या. खादीच्या साड्या आणि कळकट्ट झोळणे घेऊन आदिवासीबिदिवासी करत हिंडायच्या. आल्या त्या, घेतलं त्यांना. विज्ञान टीममध्ये ते एक डॉक्टर आहेत रसायनशास्त्रवाले. चमत्कारांमागे विज्ञान आहे हे समजावून सांगणारे प्रयोग दाखवायचे. आता शेणातल्या विज्ञानावर लिहितात, ग्रॅण्टवारी. गोलागला तज्ज्ञ हवे असतात. आपल्या क्षेत्रात मोठे, पण बाकी छोटे-छोटे. ‘त्यांना’ ऊब देणारे.

तुम्ही जास्त प्रखर आहात. त्यांना भाजून, जाळून टाकाल कधीतरी. तुमच्या मनात नसेल आत्ता, पण ती शक्यता आहेच. म्हणून…

गोडबोले : म्हणजे ‘ते’ सर्वशक्तिमान झाले म्हणायचे.

लेखक : तुम्ही ज्या जनाधाराबद्दल - जनतेच्या आधाराबद्दल - एवढे हळवे होताय ना मघांपासून, त्या जनतेलाच ‘ते’ हवे होते. मग आता रडण्यात काय पॉईंट आहे?

गोडबोले : पण जनतेला कधीतरी ‘ते’ नकोसे झाले तर?

लेखक : हिंडून-फिरून भोपळे चौकात येता बरं का तुम्ही! अहो, म्हणून तर हे गोलाग आहे ना!

गोडबोले : मी आशावादी आहे! (भाषण दिल्याच्या आवेशात) कधीतरी जनताच बंद करून उठेल, आणि हे जोखड…  

लेखक : खुळे आहात लेखक. प्लस भाबडे. कोणता आधुनिक हुकूमशहा जनतेच्या बंडामुळे पदच्युत झालाय हो?

गोडबोले : (हळुहळू मान डोलावतो.) माझं काय आता?

(टर्रर्र. लाल प्रकाश. आता हा लाल प्रकाश कायम राहतो. जात नाही.)

आवाज : लेखक, आता फार होतंय. वेळ झाली आहे.

लेखक : प्लीज, यांची काही वेगळी सोय लावता येणार नाही का? कोणत्यातरी आश्रमात पाठवून वानप्रस्थ घेतला, किंवा तसलंच काहीतरी?

आवाज : (खवचटपणे) काय प्रेमाबिमात पडलाय की काय त्यांच्या?

लेखक : नाही, तसं नाही, पण … ते शेजारी होते, बरं वाटत होतं. आणि तसं बघायला गेलं तर त्यांचा अपराधही, म्हणजे फारसा मोठा -

आवाज : ते आम्ही ठरवू. ठरवलं आहे. स्पर्धा नकोय. जनता ज्याच्या मागे असेल, तो जनतेची बुद्धी भ्रष्ट करेल. अशा माणसाला जगण्याचा अधिकार नाही. मग तो माणूस आमचा असो, नाहीतर त्यांचा असो.

लेखक : (स्वगत, हळू आवाजात) असं एनिटस आणि मेलेटस यांनी ठरवलं.

आवाज : गोडबोलेंना पुढचं सांगा. त्यांच्यापुढे दोन पर्याय आहेत - ते सगळं.

लेखक : (स्वगत, हळू आवाजात) म्हणजे त्यांचा साधू करायचा की सैतान हे ठरवता येईल!

आवाज : आता करताय, का …

लेखक : (गोडबोल्यांकडे वळून, जड आवाजात) मी प्रयत्न केला, गोडबोले. माझ्याकडून पूर्ण प्रयत्न केला. गोलागमध्ये या स्थितीपर्यंत खूप लोक आले. खूप लोकांना मी हे शेवटचं भाषण दिलं. लोकांनी मला शिव्याशाप घातले, मला जबाबदार ठरवलं. तुम्ही वेगळे होतात. पण मी फक्त निरोप्या आहे, खरे ठरवणारे ‘ते’ आहेत हे समजण्यासठी बुद्धी आणि अनुभव असलेले आजवर फक्त तुम्हीच भेटलाय मला.

गोडबोले : (शून्यवत आवाजात) तुम्हांला आदेश आहेत. मी समजू शकतो. मी तरी आजवर काय केलं - आदेशांचं पालनच केलं ना. हा शेवटचा आदेशही मला पाळायलाच पाहिजे. शहीद होण्यात लाज नाही.

लेखक : पण तुम्ही शहीद होणार नाही आहात. शहीद झालात तर तुमचं प्रतीक होईल. तुमचा व्हॉट्सॲप मेसेज होईल. तुमच्यावर फेसबुक पोस्ट लिहिल्या जातील. काही वर्षांनी लेख, कादंबऱ्या, पोवाडे लिहिले जातील. तुमचा मृत्यू खून होता, की हत्या होती, की वध होता यावर चर्चांचे फड रंगतील. नाही. ते चालणार नाही.

गोडबोले : (चिडून) मग मारा मला. मारा. गायब करा. देह सापडू देऊ नका. गोडबोले नावाचा माणूस होता याचा पुरावाच नष्ट करा जगातून.

लेखक : तसलं फक्त ऑरवेलच्या कादंबरीत जमतं. तिथपर्यंत पोचायला वेळ आहे अजून. आणि तुमचा गूढ मृत्यू वगैरे होऊनही चालणार नाही. उगाच चौकशी कमिशन वगैरे बसवायला लागेल. त्यांचा अहवाल नीट मॅनेज करून घ्यावा लागेल. चौकशी कमिशन कागदपत्रं बनवेल. मग ती गोपनीय ठेवावी लागतील - कटकटी बऱ्याच आहेत. सरकारी दप्तरांत तरी तुमचं अस्तित्व कायमचं राहील.

गोडबोले : मग काय करता?

लेखक : संपलेल्या रेकॉर्डसारखे तुम्ही फेड आऊट झाला पाहिजे. त्यासाठी तुम्हांला दोन पर्याय देतो.

गोडबोले : कोणते?

लेखक : त्या टेबलाच्या ड्रॉवरमध्ये एक गोळी आहे. ती घ्या. थोड्या येरझाऱ्या घाला. पाय जड झाले की बिछान्यावर पडा. वेदना होणार नाहीत. आईच्या मांडीवर झोप लागते तशी झोप लागेल.

गोडबोले : आणि दुसरा पर्याय?

लेखक : ते दार उघडा आणि बाहेर जा.

गोडबोले : (सगळं समजून) पहिली ती आत्महत्या आणि दुसरा तो खून?

लेखक : अपघात. चालत्या रेल्वेत, डब्याच्या दारात उभे असताना, पाय निसटून … मोगलसराई स्टेशनच्या बी केबिनजवळ … सगळं लिहून ठेवलंय इथे.

गोडबोले : तिसरा पर्याय नाही?

लेखक : नाही.

गोडबोले : (दीर्घ श्वास घेऊन, काही निर्णयाप्रत आले आहेत.)

कृष्ण की पुकार है । ये भागवत का सार है । कि युद्ध ही तो वीर का प्रमाण है ।।

कौरवों की भीड़ हो । या पांडवों का नीड़ हो । जो लड़ सका है वो ही तो महान है ।।

लेखक : का … काय? म्हणजे?

(अचानक अनेक घटना घडतात. गंभीर पार्श्वसंगीत थांबतं. लेखकावर लाल प्रकाशाचा स्पॉटलाईट पडतो. बाकी संपूर्ण रंगमंच अंधारात बुडतो.)

लेखक : ग.. गोडबोले! गोडबोले!! (चाचरत) काय झालं? काय ठरवलं त्यांनी? गेले का ते?

आवाज : आता तुम्ही यात पडायचं कारण नाही. इतका वेळ मदत केल्याबद्दल धन्यवाद. आता आम्ही बघतो पुढचं.

लेखक : (वेडसरपणे हसत) फाट्यावर कोललं ना तुम्हांला? च्यायझो… तुम्हांला वाटलं काय, आमच्यासारख्या इतर चार शाटउपट्यांप्रमाणे हाही असेल? लाचार होईल, तळवे चाटेल? अरे वाघ होता वाघ! लढत गेला. (वर बघून मधलं बोट दाखवतो आणि अजून वेडसर हसतो.)

आवाज : (निर्विकारपणे) तुम्ही कुठे पाहिलंत काय झालं ते? कदाचित लाचार होऊन भीक मागितली असेल. गोळी न घालायची.

लेखक : अरे हाड्! दीपस्तंभ होता तो. तुम्ही कितीही दाबलंत तरी कवन रचलं जाईलच.  

आवाज : लेखक, तुम्ही हे सगळं लिहिताय खरं, पण याचा प्रयोग होऊ शकत नाही हे तुमच्या लक्षात येतंय ना?

लेखक : होऊ शकत नाही म्हणजे तुम्ही लोक होऊ देणार नाही असंच ना?

आवाज : तसं समजा हवं तर...

लेखक : माहीत होतं मला. पहिल्यापासून. म्हणून माझं नाव ‘लेखक’ आहे. ‘नाटककार’ नाही. इथे दिग्दर्शक नाही, नेपथ्यकार नाही. आहे तो फक्त लेखक, आणि आपल्याच डोक्यात हे बघणारा प्रेक्...

(ठाप् असा फूटलाईट बंद केल्याचा आवाज होऊन रंगमंचावर संपूर्ण काळोख पसरतो. पार्श्वसंगीत आता पूर्णपणे थांबलेलं आहे. इथे कधी नाटक झालं होतं की नाही याचीच शंका यावी इतकं सगळं स्तब्ध आहे. त्या काळोखात पडदा पडतो हेही कोणाला दिसत नाही.)

-समाप्त-

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

तीनही भाग नीट वाचल्यावर पहिली प्रतिक्रिया हीच, हतबुद्ध! म्हणजे तुम्हाला जे म्हणायचं होतं ते माझ्या डोक्यांत किती शिरलं, हा वादाचाच मुद्दा आहे. पण तरीही हतबुद्ध!
आता समजल्याचं नाटक केल्यावर मूलभूत प्रश्न विचारतो, 'गोलाग' म्हनजे ओ काय ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गुलग = फोर्स्ड लेबर कॅम्प. ही साम्यवादाने जगास दिलेली देणगी.

अलेक्झांडर सोल्झनित्सिन यांनी गुलग आर्चिपेलागो हि कादंबरी लिहिलेली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गुलाग ही (एक) प्रेरणा आहे गोलागसाठी.

नाटकातल्या गोलागची नक्की व्याख्या करण्याऐवजी हे बघा:

पूर्वी घरभेद्यांना, शत्रूंना किल्ल्यांच्या तळघरात नेऊन टाकत. रयतेसाठी ते तळघर एक कल्पनाच होती. तिथे काय घडतं याचा अंदाजच फक्त ते बांधू शकत असत. प्रत्यक्ष पाहिलेले फार थोडे. त्यातूनच दंतकथा बनत. लोकांच्या मनात भीती बसत असे. त्या काल्पनिक तळघराच्या भीतीने भलेभले सरळ येत असत.

प्रश्न: गोलाग खरंच अस्तित्वात आहे का?
उत्तर: तुम्हाला वाटत असेल तर आहे. तुम्हाला वाटत नसेल तर नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

पहिला आणि तिसरा भाग कमाल रंगलाय! तिसरा तर मुकुटमणी!
आबा तुस्सी ग्रेट हो!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

असेच म्हणतो. कहर लेखन.... अंकातील इतर काही अगम्य ललित लिखाणापेक्षा हे लिखाण लाखपटींनी जास्त छान आणि मुख्य म्हणजे मर्मभेदी वाटलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हॅट्स ऑफ आबा!!
जबरदस्त लेखन. अतिशय आवडले. शब्दांवर काय जबरा प्रभुत्व आहे राव!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

अतिशय सुंदर . कंसातलं डीटेलिंग अगदी तेंडुलकरांची आठवण करून देणारं.
यंदाच्या दिवाळी अंकांतली ' अनुभव' मधली जयंत पवार यांची ' मोरी नींद न सानी होय' ही कथा सगळ्यांत जास्त आवडली होती. जबरदस्त आवडली होती.
हे लेखनही तितकंच, कांकणभर अधिकच आवडलं आहे. दोहोंचा विषय, आशय, शैली , पोत अर्थातच पूर्ण वेगळा . पण इंपॅक्ट सारखाच झाला.
एव्हढ्या सुंदर लेखनाची मेजवानी दिल्याबद्दल धन्यवाद आणि अभिनंदन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दिवाळीच्या पूर्ण फराळात मला करंज्या अतिशय आवडतात. पण त्या तळून निघाल्यापासून मी चरायला बसतो. गोलागमध्ये गोडबोले ह्या अगदी शेवटी भक्षायच्या मी ठरवल्या होत्या. पण आज वाचल्याच.
तिन्ही भाग प्रतिभा, निरीक्षण आणि अनुमान ह्यांचा जबरदस्त मिलाफ आहेत. अगदी बारीक बारीक तपशिलांतून समाजातल्या प्रत्येक गोष्टींवर सूचक भाष्य आहे. सूचकता (साटल्य?) हे कोणाला शिकायचं असेल तर त्याने किंवा तिने हे पहिले वाचावं असं मी म्हणेन. मुख्य म्हणजे, आबांनी नेहमीच्याच पोस्ट टृथ म्हटल्यावर येणाऱ्या सरधोपट मार्गावर न जाता, भाग २ मध्ये

कळपातून! लेखक, लक्षात घ्या - माणूस कळपात राहणारा प्राणी आहे. कळप वागेल तसं वागतो. अन्याने फिटबिट लावलं म्हणून गन्या फिटबिट लावतो. सपना ग्रीन टी पिते म्हणून स्विटी ग्रीन टी पिते. कळप सोडून भलतंच वागायला सहसा तयार नसतो. एकटेपणाची भीती असते. समाजाने वाळीत टाकणं ही क्रूर शिक्षा आहे, लेखक.

हे फार महत्त्वाचं लिहीलेलं आहे. (ह्यात 'गेम ऑफ थ्रोन्स किंवा फ्रेंड्ज बघणे' ही ॲडवायला हवं होतं. Biggrin ) तरीही, आदूबाळांच्या प्रतिभेचा आवेग दुसऱ्या भागात जऽरा क्षीण झाल्यासारखा वाटतो. बरंच थेट लिहीतात ते. तरीही, हे तिन्ही भाग संग्राह्य आहेत.

अवांतर: कळपावरून आठवलं, जाहिराती, सतत 'इन', 'ट्रेंडींग', नवीन गोष्टी घ्यायला भाग पाडतात आणि आपण त्या उगीच घेत जातो हे दाखवणारा एक युट्यूब व्हिडीओ मी पाहिला होता. मी त्याचं नाव अगदीच विसरलो. कोणाला माहित असेल तर कृपया सांगावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is for sissies.