"पांढरे केस"

बारा वर्षांनी जेंव्हा तुम्ही परत एकदा शहराच्या त्या भागात
पोचाल तेंव्हा तिथला प्रसिद्ध कुत्रा म्हातारा झालेला दिसेल,
सेकंडहँड पुस्तकांच्या दुकानाच्या जागी आता अस्सल स्कॉच
विकणारे दुकान असेल, ज्यात अस्सल स्कॉचपेक्षाही भारी
भारतीय "आर्य चाणक्य " व्हिस्की दिमाखात चमकत असेल,
जुन्या कळकट तेल्याचा "तो " लठ्ठ आणि मठ्ठ मुलगा अमेरिकन
जीन्स मध्ये विदेशी साबण, सेंटस , मोबाईल फोन्स विकत असेल,
जिने तुमच्या हजेरीचे फर्मान काढले ती सरकारी कचेरीही
स्वच्छ , ब्राम्हणी झालेली असेल, तिथल्या कामगारांची
गालफडे वर आलेली असतील, साहेबांच्या लाचेचा आकडा
ऐकून चक्कर येईल, काम संपवून जेंव्हा तुम्ही रस्त्यावर
याल तेंव्हा केस पांढरे झालेली, जुनाट साडी नेसलेली
तुमची एक जुनी शिक्षिका रस्त्याने पाय ओढत जाताना दिसेल ,
बाईंच्या चेहऱ्यावरच्या खिन्नतेने विलक्षण सुन्न होऊन तुम्ही
आपल्या छोट्या गाडीतून शहराच्या परिचित भागाकडे
पळत सुटाल .

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)