निबद्ध : माही मालकीन

निबद्ध : माही मालकीन

मी चाळीसेक वर्षाची आसनं. थोड फुडमाग बी व्हौ शकतय पण तरीबी आसचं समजा. मी प्रॉढसाक्षेरता मदी जाते. म्हंजी मला ल्हेता येतं पन वाचता जास्त येत न्हाई तवा आमाल्या सगळ्याईला वाचायला मीलावा म्हन्युन वस्तीत एका दिवशी चार बाया येउन वाचायला शिकवितेत. म्हणुन शब्द आता लिहता येतो मघाचल्या वाक्यात लिव्हता आला नाही निट. जास्त खाडाखोड हुतीया, मला खाडाखोड करायला नय आवडत. माह्या बापाची जिमीन इकत घेतांना खडाखोड झाली होती त्यामुळ पुढ लय कुटाने झाले व्हते. मी याक्रणाची किंवा तशीच काही शुद्धलेखनाची सुक झाली तरी ती सुदरत नाही, आज्जुक पुढचं लेहेत रहाते. अक्षर चांगला आहे. मालकीनीपेक्षाबी चांगल आह्ये. मालकिन स्त्रीलेखीका आहे. तिला नवरा गिवरा काय नाय. म्हणजी आगुदर पण नव्हता आता पण नय. तिनी कवाच लग्न केलेलं न्हाई. आता माह्यापेक्षा दोनेक वर्शानीच मोटी आसल पण माह्यापेक्षा धा वर्श लहान वाटती. पंदरा पन वाटती पन लै येळा न्हाई वाटत. 'पण' हा शब्द लिहतांना मी मागच्या येळेच्या वाक्यात दोनदा चुक केली. अशानी लिहुन होईल असे दिसत नाही पन तरी बी प्रेयत्न करीत र्‍हायला पायचेलाय. पायजेलाय. पायजे. ह्याच्यातलं कुठलं खोडायच व माय आता? तर माह्या मालकिनीच बी काय येळेत लिहुन होत नाही. मग तीला पुस्तकवाल्यांचा नैतर पेपरवाल्यांचा फोन येतो, ती म्हनती लै कामात असल्यामुळे देता आले नाही म्हणुन सॉरी. ही बया कायीच काम करीत न्हाई आणि फोनवरच्या लोकांना सांगती लै कामं व्हती.

नुस्ताच कॅम्पिटर चालु ठेवला.

कॅम्पुटर असं लेहायला पायजे.

तर नुसतचं कॅम्पुरट कॅम्पुटर चालु ठेवती आणि कायत्री टायीपीत र्‍हाती. मला कामाचं कायी वाटत नाई. काम केल्यानी कोणी कधी मेले व्होते का? नई ना? म्या पार आंग मोडूस्तवर काम करते. काम जास्तीचं आसलं तरी का कु करीत नाही. सयंपाक एक माणसाचा असुदे की चारचा नायतर आठाचा का असु दे. मटन एक किलोचं असु दे का दोन किलो तरी मी शिजवते. कपडे एका माणसाचे असले, चार माणसाचे आसले तरी धुते. कोपर्‍यात दोन कांडोम आसले पाच आसले, पार धा बारा आसले तरी उचलुन कचर्‍यात टाकते. तरीबी माही मालकीन माह्या पगार काय वाडवना झाली. पगार वाढवा म्हुन दोन महिन्यापासन इचारुन झालं तर ती म्हणती तुमच्या बायांच्या आयुष्यावर पण लिहायचं आणि तुमचा पगार पण वाढवुन द्यायचा हे माझ्याच्याने शक्य नाही. आता मी तिला कवा म्हन्ले का बाई माह्या आयुष्यावर लेव? आन माह्याच काय पण समद्या मोलकरनीवर तर काह्यला लिवते. आमची युनैन हाय आमी आमचं पाहुन घेउ ना. पन मी आसं डायरेक बोलली नई. उगा मालकीनीला वाईट वाटल.

मालकीन चांगली हाय तशी. आमला वस्तीत वाचायची गोडी तिच्यामुळं आन तिच्या चार मैत्रिनीमुळं लागली. आमाला दोन मोट्या प्रकाशनसंथांची म्हाग म्हाग पुस्तकं वाचायला मिळतेत.

महाग. असे लिहायला पायजे होते. आज लैच चुका होताये.

मालकीन चांगली हाये. बास. संपला निंधंब.

आजुक येक ल्ह्यायला पायजे. परवा मालकिनीचं फोनवर भांडन झालं. पलिकडच्या बाईचा आरडण्याचा आवाज फोनमधुन भाईर येत व्हता. मी सगळं आईकल. इकडुन भांडता भांडता मालकीन बाई फोनवरच्या बाईला 'छप्पन टिकली' म्हणली तर तिकडची बाई म्हटली मी तरी छप्पनचीचये गं पण तु तर पाच हजार टिकल्या लाउन घेतल्यात फेसबुकवर. हे तिकडुन ऐकल्यावर मालकीन बाईच्या डोळ्यात खळकन पानी आल होतं. तिनी फोन बंद केला आणि कॅम्पुटरची वायर रागारागानी तोडुन टाकली.

हे पन लिहायला पायचे पक्क करतांना. पाह्यजे पायीजे. कस लिवतात हो हे?

म्या आत्मचरीतर लिवणार है. माह्या सोत्ताच्या भाशेत.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

येथील लेखन वाचुन तुमच्या लेखनाविषयी उत्सुकता निर्माण झाली. म्हणून तुमचे फेसबुक पेज उघडुन पाहीले त्यावरही एक फार जबरदस्त लेख वाचायला मिळाला. त्यातील तुमचे संस्कृत्यांच काय घेऊन बसलात वगैरे फार भारी वाटलं. आणि त्यातच तुमचा फेसबुक वरील रीसर्च संदर्भातील प्रयोग तर भन्नाटच आहे. त्यानंतर या लेखात पुन्हा फेबु.
एकुण तुम्ही फेबु संदर्भातील प्रयोगातुन काय निष्कर्श समोर आणतात याची अपार उत्सुकता लागुन राहीलेय.
तुमचे लेखन फार वेगळे आहे फार आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जास्त खाडाखोड हुतीया, मला खाडाखोड करायला नय आवडत.

मी याक्रणाची किंवा तशीच काही शुद्धलेखनाची सुक झाली तरी ती सुदरत नाही, आज्जुक पुढचं लेहेत रहाते.

'पण' हा शब्द लिहतांना मी मागच्या येळेच्या वाक्यात दोनदा चुक केली.

कॅम्पुटर असं लेहायला पायजे.

पायीजे. कस लिवतात हो हे?

तुमचा सेल्फ-अवेअरनेस पाहता आणि 'आजकाल आपली सत्ता आहे' ह्याच्या जोरावर बहुजनांच्या भाषेच्या 'चुकां'ना हसणाऱ्या सोशल मीडियावरच्या अतिशहाण्या अभिजनांविषयी तुम्ही किती जागरुक आहात हे पाहता तुम्ही निरागस नाहीत आणि तुमची वाटचाल दक्षिण- नाही तर उत्तर-आधुनिक आहे असा दाट संशय येतोय! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

निबद्धात मालकिणीचं कॅरॅक्टर चांगलं उलगडून दाखवलंय! आसंच, एखाद्या नवसाक्षर बाईच्या माध्यमातून सो कॉल्ड सुशिक्षित, स्वघोषित बंडखोरांचे वाभाडे काढा. अगदी मराठी 'एलायझा डुलिटिल' साकारा. त्यासाठी 'कमॉन डोव्हर, मुव योर ब्लोमिन्स' सारखं लिहावं लागलं तरी बेहत्तर!!
लिहित रहा इथे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आत्मचरित्र लिहाच. पण तोवर मालकिणीनं तुमची भाषा डहुळली तर?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मोलकरनी,गाववाले अभिजनांची मागे कशी टिंगल करतात ते ऐकायला फारच मजेदार असते. पण हिरव्या गुलाबी नोटांसाठी कायकाय करावे लागते - प्रत्येकालाच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुफान हसलो! केवळ थोर! "व्हॉइस" उत्तम जमला आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"छप्पन टिकली" ला काही लाक्षणिक अर्थ आहे काय? उदा. अनेकांचे "कुंकू" लावणारी ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0