चैत्रोत्सव!

सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा!
वसंत आल्याची वर्दी कोकिळकुहुने दिली आहेच.घरोघरी आता चैत्रगौर मांडली जाईल. कैरीचे पन्हे ,आणि द्रोणामध्ये आंब्याची डाळ हळदीकुंकवाचा 'मेन्यु' असेल.ओल्या हरबर्‍यांनी ओटी भरली जाईल आणि घरोघरी चटपटे चणे, हरबर्‍याची उसळही केली जाईल.असा चैत्रोत्सव साजरा होत असताना आंबे पिकल्याची चाहूल लागेल आणि मग आमरसपुरीच्या मेजवान्या झडतील.
ह्या स्मरणरंजनात मग्न असतानाच लक्षात आले , इथे सातासमुद्रापार मी आणि माझ्यासारखेच अनेक सुह्रद ह्यातल्या अनेक गोष्टी 'मिस' करत आहेत,असे असायचेच..त्याबद्दल तक्रार नाही पण मग वाटले निदान डाळ पन्हे करावे..
आंब्याची डाळ
साहित्य- २वाट्या चण्याची डाळ, पाव ते अर्धी वाटीच्या मध्ये कैरीचा कीस (कैरीच्या आंबटपणानुसार प्रमाण कमी जास्त करणे), ६/७हिरव्या मिरच्या,ओले खोबरे,कोथिंबिर,फोडणीचे साहित्य,तेल,मीठ,साखर
कृती- चण्याची डाळ ४/५ तास भिजत घालावी.रोळीत उपसून घावी आणि पाणी पूर्ण निथळू द्यावे.डाळ मिक्सरवर थोडी भरडच वाटावी, वाटताना त्यात मिरच्याही घालाव्यात.
ही वाटलेली डाळ+मिरच्या,कैरीचा कीस एकत्र करून त्यात ओले खोबरे,कोथिंबिर,चवीनुसार मीठ आणि थोडी साखर घालावी.तेलाची खमंग फोडणी करावी व ही फोडणी त्या मिश्रणावर ओतावी.चांगले कालवावे.
सर्व्ह करताना खोबरे व कोथिंबिर वरुन घालून सजवावी.
कैरी न मिळाल्यास लिंबू किवा आमचूर वापरू शकतो पण अर्थात ते आपले दुधाची तहान ताकावर..
वासंतिक पेय (पन्हे)
प्रकार-१
५,६ कैर्‍या,साधारण ३ वाट्या साखर/गूळ(कैरीच्या आंबटपणानुसार साखर जास्त घालणे),मीठ,केशर,वेलदोडे
कैर्‍या उकडून घ्याव्यात. गर काढावा.मीठ,केशराच्या काड्या,वेलचीपूड घालावी त्याऐवजी केशरवेलची सिरपही वापरू शकता. साखर घालावी,चव पाहून हवी असल्यास अजून साखर घालावी. हा बलक बरणीत भरून फ्रिजमध्ये ठेवला तर ४,५ दिवस राहू शकतो. उन्हातान्हातून घरी आल्यावर त्यातील २ चमचे बलक एका पेल्यात घेऊन थंड पाणी घालावे व चांगले ढवळावे आणि आस्वाद घेत प्यावे.
साखरेऐवजी गूळही घालता येईल.गूळाच्या पन्ह्याला एक वेगळाच स्वाद असतो तो बरेच जणांना आवडतो. (मला स्वतःला आवडत नाही.)
प्रकार-२
साहित्य वरील प्रमाणेच.
कैर्‍या किसाव्यात व थोड्या पाण्यात कोळाव्यात. हे पाणी गाळून घ्यावे.त्यात वेलदोडेपूड,केशर, चवीप्रमाणे मीठ व साखर घालावी.हे पाणी बाटलीत भरून ४,५ दिवस ठेवता येते व पन्हे प्यायचे असेल तेव्हा बाटली चांगली हलवून त्यातील पाव ते अर्धा पेला अर्क घालावा. उरलेला पेला पाणी घालावे, ढवळले की पन्हे तयार!
पाण्याऐवजी सोडा घातला तरी मस्त पन्हे तयार होते.
कैरी उकडली की एक विशिष्ठ वास येतो तो काही जणांना आवडत नाही त्यांना हे पन्हे जास्त आवडते.

(फोटो आत्ता माझ्याकडे उपलब्ध नाहीत, Sad )

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)