येथे मृत्यूचाही बाजार होतो

येथे मृत्यूचाही बाजार होतो
सोबत उथळ विचारांचा बागुलबुवा
मेलेल्यांचा जात, धर्म पाहून होतो निषेध
विचारसरणीच्या सरणावरती असतो इव्हेंट
मानवतेच्या उदरात उजवे डावे वेगळे होतात
उथळ विचारांच्या कोशात विचारजंत एक होतात
आमचा मेला तर असहिष्णुता तुमचा मेला तर पूर्वाश्रमीचे पाप
अशाच कमकुवत बौद्धिक चर्चा जोरजोरात
उकरुन काढतात जूने संदर्भ आपल्याच विचारसरणीचे राखून अबाधित हक्क
काढले जातात जात-पात अन् धर्माचे वाभाडे
विखुरलेले वैचारिक नागडेपणाचे आखाडे
आहेत नंतर मोर्चे, शोकसभा अन् आणाभाका
शिणलेल्या क्रांतीचा निपचित फौजफाटा
आरोप प्रत्यारोप संकुचित बुद्धिमत्तेचा उरुस
सळसळतात लेखण्या, कुंचले वृत्तपत्रातून
सोयीनुसार संदर्भ, नोंदी पानापानांतून
कोणाची मुस्कटदाबी, कोणाचा बुलंद आवाज
जो तो आपआपल्या विचारांचा घेऊन झेंडा
थोटक्या बुद्धिमत्तेचा विस्कटलेला गावगाडा
गंजलेली निषेधाची हत्यारे, बुरसटलेली भाषणे,
रुतलेली दांभिकता, विद्वत्तेचा गजकर्ण,
ढोंगी विचारस्वातंत्र्याची दिवाळखोरी,
विस्कटलेल्या मानवतेची मक्तेदारी
दुभंगलेली देशाची दुनियादारी

---------------------------
भूषण वर्धेकर
७ सप्टेंबर २०१७
९:५० AM

field_vote: 
0
No votes yet