Skip to main content

आयुष्य

अंधारातल्या अंधारात सतत पळत राहतं आयुष्य
वास्तवाची झोप घेत स्वप्ने गिळत राहतं आयुष्य

सागराच्या लाटांवर हिंदकळत बुडत राहतं आयुष्य
झोंबणार्‍या गार वार्‍यात कुडकुडत बसतं आयुष्य

घोंगावणार्‍या वादळात भरकटत जातं आयुष्य
बांधलेल्या पाळीव प्राण्यासारखं गुरगुरतं आयुष्य

थेंबभर पाण्यासाठी रोज व्याकुळ होतं आयुष्य
भेगाळलेल्या भुईखाली दडून जातं आयुष्य

मुंगी होऊन साखरदाणा टिपत राहतं आयुष्य
कणभर प्रेमासाठी तेच झुरत राहतं आयुष्य

तोतया माझाच बनून फसवित राहतं आयुष्य
माझेच ते तरीही मला वापरीत राहतं आयुष्य

अंधारातल्या अंधारात सतत पळत राहतं आयुष्य
वास्तवाची झोप घेत स्वप्ने गिळत राहतं आयुष्य

- शूरशिपाई

आतिवास Thu, 29/03/2012 - 10:56

आयुष्याच आणखी एक वास्तव वर्णन ... पण या वास्तवाला आणखीही काही पदर असता आशेचे, आनंदाचे, स्वप्नांचे. फक्त दु:खच असत तर त्या ओझ्याखाली आपण मेलोच असतो कधीचेच!!

ऋषिकेश Fri, 30/03/2012 - 10:24

"आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे!" आठवल! ;)
कविता आवडली

नगरीनिरंजन Fri, 30/03/2012 - 13:23

माझेच ते तरीही मला वापरीत राहतं आयुष्य

ही ओळ आवडली.

पळत राहतं आयुष्य वगैरे पेक्षा पळतं आयुष्य वगैरे शब्दप्रयोग केला असता तर?
शिवाय वास्तवाची झोप सारखंच लाटा, वारं वगैरे रुपक म्हणून वापरलं असतं तर?