तृष्णा

रूपही आरशातले हळुवारसे शाहारले
मीच का तो हरवलेला भास होऊन राहिलो?

हृदयांतरीचे आर्जव! उद्गारता झाले थिटे
मत्त तालातील जणू लयमात्र हरपुन राहिलो!

देव देव्हाऱ्यातले साकारता ये क्लांतता
मीही माझे देवपण झाकून अवघे राहिलो!

जाळता देहातली या वासनांची वेदना
मन्मथावाचून रतिसम रिक्तसा मी राहिलो!

राहु दे साधी मला तृष्णा तरी रे!
व्यर्थता पूर्तीतली पुरतीच जाणुन राहिलो!

field_vote: 
0
No votes yet