शरीराची किंमत

शरीराची किंमत

मरून जावंसं वाटतंय.
शून्यात पाहत मी म्हणाले.
आयुष्याचा कंटाळा आलाय;
शरीराचाही वैताग आलाय.
"हं", थोड्या वेळाने ते हुंकारले.
या शरीराची किंमत तुम्हाला माहित आहे?
नाही, आणि पर्वाही नाही; माझं उद्दाम उत्तर.
हे पायच घ्या:
त्याच्या जोरावर तुम्ही चालता पाळता.
कुणाला पाय विकत घ्यायचे असतील,
तर किती किंमत मोजावी लागेल?
वेडा कि खुळा हा डॉक्टर!
मला जगायची पर्वा नाही,
आणि याला माझ्या पायाची चिंता?
हृदय बिघडलं तर?
बरं होईल. सुटेन मी. माझा निश्वास.
नवीन तर मिळणारच नाही,
पण जुनंच कितीला पडेल?
कितीतरी कोटींना? माझा प्रश्न.
शक्य आहे. ते ही उपलब्ध असेल तर!
आंधळ्याना डोळे मिळाले तर जग कसं दिसेल?
जसं आपले डोळे गेल्यावर आपल्याला दिसेल! विलक्षण!
उपहास.
म्हणून तुम्ही डोळे फोडाल का?
काहीतरीच काय? दुखेल ना!
दुखायची एवढी भीती;
आत्ता तर मरायला निघाला होतात.
दुखणं सहन होत नाही म्हणून तर मरायचं.
कसलं दुखणं?
मनाचं, हृदयाचं.
शस्त्रक्रियेनं बरं न होणारं.
त्या दुखण्याची किमत शरीरापेक्षा मोठी?
कदाचित असेलही...
मन कुठं वसतं?
हृदयात...? कि मेंदूत...? माझा स्वतःलाच प्रश्न.
हृदय तर मांसाचा गोळा;
मेंदूतच असावं: माझा तर्क.
मग आपण हृदय दुखतं असं का म्हणतो?
कुणास ठाऊक.
तर तुमचा मेंदू दुखतोय: त्यांचा निष्कर्ष.
छे! छे! ते बरोबर वाटत नाही.
माझं मनच दुखतंय, मग ते कुठे का असेना.
ठीक आहे.
आता मला हे सांगा:
हे हृदय नसेल तर तुम्ही जगाल का?
नाही.
मेंदू काढून टाकला तर?
काहीतरीच काय...
आणि हे मन मुरगळून टाकलं तर?
हो...कदाचित...
मग या मनाच्या दुखण्याची किमत शरीरापेक्षा मोठी?
कसं शक्य आहे ते!

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

थोडक्यात काय? तर मन मारून जगायला शिका. अहो जगात करोडो लोक तेच करत आलेयत आणि तेच करत राहतील. हे शरीर अनमोल आहे. पुन्हा थोडंच मिळणार आहे?

बाय द वे. माझ्या संगणकावर सतत इतके विविध प्रयोग चालु असतात की त्यामुळे कार्यप्रणाली (ऑपरेटींग सिस्टीम) भ्रष्ट (करप्ट) होऊन हार्ड डिस्क फॉर्मॅट करावी लागते आणि पुन्हा नव्याने सॉफ्टवेअर्स टाकावे लागतात. अर्थात सॉफ्टवेअर्सना काहीही झालं तरी मला चालतं (कारण बॅकअप घेउन ठेवलेला असतो) पण हार्डवेअर बिघडता कामा नये. त्याचा बॅकअप घेता येत नाही, बिघडलं तर पुन्हा नव्यानेच घ्यावं लागतं.

आपलं शरीर हे हार्डवेअरसारखं आहे आणि मन हे सॉफ्टवेअरसारखं. मनाचा बॅकअप घेऊन ठेवा आणि बिनधास्त त्याला कसंही मोडा, शरीराला जपा म्हणजे झालं. त्याची किंमत तुम्हाला कळलीच आहे, नाही का?

माननीय दया पाटील (मोहन जोशी) यांनी भूकंप आला तेव्हा आत्मा व शरीराची तूलना करून शरीराचं महत्त्व विशद करताना मोठ्या अधिकारवाणीनं सांगितलं होतंच ना - जब यह शरीर हीच नही रहेगा तो आत्मा क्या झक मारेगा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

शरीर हार्डवेअर आणि मन सॉफ्टवेअर ही तुलना आवडली. असं नाही कि आपल्याला शरीराची किंमत माहित नसते पण ती जाणवते तेव्हाच जेव्हा तुम्ही आजारी पडता/वेदनेत असता. पण कधी कधी वेदनाच एवढी भयंकर असते कि त्यापुढे मृत्युचीही कल्पना एवढी वाईट वाटत नाही.
ही कविता म्हणजे माझ्याच डोक्यातील विचारांचा गुंता मी कागदावर मांडला होता. थोडक्यात मला स्वतःलाच हे सुचवायचे होते कि मनातल्या वेदनेला मात करून जे चांगलं आहे त्याच्याकडे लक्ष केंद्रित कर. Be Positive!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0