नॉनव्हेज् जोक

ललित

नॉनव्हेज् जोक

- संतोष गुजर

पृथ्वी दिवसेंदिवस माल होत चाल्लीय - तिचा रेप करायला पाहिजे; पण ती लौकरच बकाल होईल; आता दुसरी एखादी हवी. 'नवीन पृथ्वीचा शोध सुरुय'... खरंच माणसाला मानायला पाहिजे; माणूस म्हणजे ब्रह्म! माणूस आहे म्हणून पृथ्वीला तिचं नाव कळलं… तिचा आकार कळला… ती किती अंशात फिरते ते कळलं… कुणाभोवती फिरते, कशासाठी फिरते, कशामुळे फिरते हे सर्व कळलं… चंद्र ग्रासला जातो; सूर्य ग्रासला जातो… खाल्लं जातं आणि खाल्लं जातही नाही… भास आहे सगळा, सुंदर खेळ आहे सगळा निसर्गाचा, हेही… एकूण जमिनीपैकी खंड-पर्वत-डोंगर-खड्डे किती आणि एकूण पाण्यापैकी समुद्र-नद्या-उपनद्या-नाले-गटारं किती हेसुद्धा. कोणत्या नदीवर किती धरणं बांधायची; कोणत्या पर्वतावर चढायचं, हेही. सिंहाला, वाघाला, त्यांच्यासारख्या कितीतरी प्राण्यांना कळलं की ते किती रानटी आणि क्रूर आहेत. त्यांनी जंगलातच(?) राहून स्वतःची मर्यादा न ओलांडणं समाजासाठी (त्यांच्या) कसं बरंय हेही. माणूस आहे म्हणून जग सुरळीत सुरुय आणि सर्वत्र शांतता नांदतेय… टेक्नॉलॉजी वाढतेय… सहिष्णुता वाढतेय… जरा हात वर केले ह्याने तर पंख्याला लागतील… गरम रक्ताची धार उडेल… पण गरम होतंयच तेवढं, पंखा बंद करूनही नाही चालणार… तुटलेल्या स्विचबोर्डात उघड्या वायरी घुसवल्यात… भीतीही मेलीय वाटतं ह्याची सवयीनं!

"पीस कैसा करू?" मटणवाल्याने मध्येच हत्यार खुपसलं आणि त्याच्या विचारांचे तुकडे पडले, "बारीक".
मग तो मटणाचे बारीक तुकडे होताना बघत बसला. हुकला उलट्या लटकवलेल्या, सोलून ठेवलेल्या दोन बोकडांकडे बघितलं - फक्त पायांपासून टांगलेलं धड. धडांच्या पोकळीत बसलेल्या स्थानिक परोपजीवी माश्या… बोकडांची लटकणारी दोन पुरुषचिन्हं पटकन डोळ्यांत भरली… खाली लाकडी टेबलावर काळ्या आणि चॉकलेटी रंगांच्या केसाळ कातड्यांसह वजडी; खाणारे चवीने खातात… बाजूला कोपऱ्यात सुकलेल्या रक्तात दोन मुंडकी, निष्प्राण उघडे डोळे… कुणीतरी भेजाफ्राय खाईल… काहीही वाया जात नाही… माणसानं प्रत्येक गोष्टीचं मूल्य ठरवलंय… वस्तून्‌वस्तू 'कल्पतरू' झालीय… प्रगती!
"थोडी चरबी, थोडा कलेजा भी", त्यानं चवीचे काही तुकडे अॅड केले.

पिशवी टेबलावर ठेवून, शर्ट काढून तो वॉशबेसिनजवळ गेला तर आरसा गायब? "अगं आरसा कुठे गेला?"
"फुटला, ते काय बाहेर ठेवलेत तुकडे"
"असा कसा?"
"आण दुसरा, दाखवते!"
"तू भांडू नकोस सकाळी सकाळी, मी चेहरा कशात बघू आता?"
"... एखादा म्हणाला असता - तुझ्या डोळ्यांत पाहीन… "
"उगाच का रोमँटिक होऊ?"
"का पैसे पडतात रोमँटिक व्हायला?"
त्याच्या निरुत्तराचा तिला राग येतो, "गेल्या रविवारी काय ठरलेलं आपलं?"
"काय?"
"तू आठव!"
"काय झालंय तुला,पाळीचा त्रास होतोय का?"
"दुसराही त्रास होतो मला!"
"मग सांग की!"
"नाही सांगणार!" ती पिशवी उचलून किचनमध्ये गेली.
तो टॉवेलवर काखेत हात घालून उभाच राहिला, "तुला नसेल बनवायचं मटण तर नको बनवू… मी कधी तुझ्यावर कसली जबरदस्ती केलेली नाहीय."
"का नाही केली? मी अडवलं होतं?"
"अगं, काय बोलतेयस तुझं तुला तरी कळतंय का?"
"आरश्यावरून इतकं बोलण्याची गरजंय?"
"कधी बोल्लो मी? फुटला तर फुटू दे!"
"हो, पैसे वर आलेत ना! हेही घाल कुत्र्यांना… हाडं कशाला, ताजं खातील की!" तो चिडून मटणाची पिशवी हिसकावून घेतो तिच्या हातून आणि खिडकीतनं बाहेर टाकतो… खाली कुत्र्यांना आयडिया आलेलीच, ते रेडी होते, त्यांनी जमायला सुरुवात केली. तो बाथरूममध्ये शिरतो आंघोळीसाठी, बादलीत पडलेला कोळी अलगद बाहेर काढून ठेवतो. लंगडत चालणाऱ्या भिजक्या कोळ्याला बघून त्याचा ऊर भूतदयेने भरून येतो. इतक्यात तिचं किंचाळणं ऐकून धावत बाहेर येतो. कापलं गेलेलं रक्ताळलेलं तिचं बोट चोखत तिला दम देतो, "जपून बंद करायची विळी ती, कितीदा सांगितलं तुला?" ती फुत्कारत म्हणाली, "मला तुझा खूप राग आलाय." तिच्या बोटाला हळद लावत, फुंकत तो म्हणाला, "मलाही."

वेळ जातो.
वाऱ्याने किचनच्या ओट्यावरचे कांदे गोल फिरतात. टॉवेल सटकतो. सैल होऊन दोघे मिठी मारतात.
वेळ जातो.

"आता आपण भांडत होतो, आता आपण प्रेम करतोय. हे कसं होतं?"
"कसंही होऊ दे, पण प्रेम आणि प्रगती, मिळून साधायचीय आपल्याला..."
"हो. पण कधीकधी अचानक महाकाय मशिनी डोळ्यांसमोर येतात… डायनोसॉंरप्रमाणे चरतात… आर्क्टिक हिमालय वितळतो… पृथ्वीला चक्कर येते… तिचा अॅक्सिस बदलतो… मेंदू गरागरा फिरतो… दातखिळी बसते… घश्याला कोरड पडते गं!"
"पाणी प्यायचं अशावेळेला"
"... परवा त्या आंदोलनावरून आपल्याकडे छोटीशी दंगल झाली… जाळपोळ नासधूस झाली, सिग्नल तोडला, एकजण मेला… 'ओला कचरा सुका कचरा'चे डस्टबिन्स, स्वच्छतेच्या सूचना देणारे बोर्ड… सगळं सगळं तोडलंय. मला येताना ते सगळं दिसलं आणि… चीड आली… लोकांचा स्वतःवर ताबा नाही. मग वाटलं, सकाळीसकाळी मटणासोबत इतका रक्तरंजित विचार विकत घेऊन मी घरी का जातोय? माणसं अशी का वागतात?"
"संतपती होऊ नकोस, आपल्याला काय मिळणारंय माणसं समजून??"
"संतपती?", तो स्मित करतो. "गेल्या रविवारी काय ठरलेलं आपलं?"
"मटण आणायचं नाही, महागलंय, खर्च टाळायचेत!"
दोघांनी खिडकीतनं खाली बघितलं. कुत्रे सामंजस्याने मटण खात पार्टी करत होते.

"आपली प्रगती कधी होणारे?"
"मीही तोच विचार करत होतो… होईल होईल… चित्र बदलतंय."

आरसा नसलेल्या भिंतीकडे दोघे बघत बसले कितीतरी वेळ.
वाटलं खिडकीच बंद झालीय कायमची… वाटलं दारच उघडणार नाही आता कधी… वाटलं भिंतीत गाडलो गेलोय आपण… गुदमरतोय… आता पाहूच नाही शकणार का स्वत:ला कधी?

दचकून दोघांनी आरसा नसलेल्या भिंतीसमोर उभे राहून पटकन सेल्फी काढला तोंडाचा चंबू करून, मग हॉटेलात गेले.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (2 votes)

प्रतिक्रिया

काये हे?
हे अस्लं कायत्री दिवाळी अंकात असलंच पाहिजे काय? नानकटाई नामक फराळात घुसलेल्या आगंतुकासारखं?
ते मागच्या वेळी 'तुझा गळा मी चिरू काय' होतं ते पण तसलंच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is for sissies.

का बुवा? दिवाळी अंकात नक्की काय असलं पाहिजे किंवा काय नसलं पाहिजे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पण काहीतरीच नसावं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is for sissies.

ही अट लावायची झाली तर दिवाळी अंकात दोन धागे प्रकाशित करता येतील. दोन लेखांचा अंक निघतो होय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जोक कुठेय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

हे ललित संकल्पनाविषयक नाहीये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.