गढवालचा राजा फतेशाह (१६६५ – १७१५) आणि शिवाजी : एक दृष्टिक्षेप

संकीर्ण

गढवालचा राजा फतेशाह (१६६५ – १७१५) आणि शिवाजी : एक दृष्टिक्षेप

- शैलेन

मुघल साम्राज्याच्या सुदूर सीमांवरचे काही प्रदेश त्यांच्या अधिपत्याखाली पूर्णपणे कधीच आले नाहीत. तिथल्या स्थानिक राजांनी मुघलांचे तात्पुरते आणि कामचलाऊ मांडलिकत्व पत्करले, पण त्यांची पाठ फिरताच पुन्हा आपले स्वतंत्र उद्योग आरंभले. काही वेळा तर मुघलांचे लक्ष नाही असे पाहून, किंवा त्यांच्या क्षणिक दुर्बलतेचा फायदा घेऊन, या राजांनी मुघलांना केवळ कारणमात्र सतावले असेच नाही, तर वेळप्रसंगी त्यांच्यापुढे मोठे आव्हानही उभे केले. हिमालयाची तळशिखरे आणि त्यांच्या लगतच्या सपाटीच्या प्रदेशातली पहाडी राज्ये, आसाममधले ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यातले आहोम राज्य, वायव्य दिशेचे अफगाण आणि तत्सम टोळीवाले, तसेच मध्यप्रांतातल्या घनदाट 'झाडीमंडळा'त राज्य करणारे गोंड इत्यादी संस्थानिकांचा यांत समावेश होतो.

गंगा-यमुनेच्या दुआबाच्या उत्तरेला, हिमालयाच्या कुशीत वसलेले गढवाल हे असेच एक राज्य. या राज्याचे मूळ संस्थापक राजपूत होते. १६व्या शतकात झालेल्या बलभद्र सिंह या गढवाली राजाने स्वतःला 'शाह' किताब घेतला, आणि तेव्हापासून तोच त्यानंतरच्या राजांच्या नावांचा प्रत्यय झाला. या राजांची राजधानी श्रीनगर येथे होती (हे काश्मीरमधले श्रीनगर अर्थातच नव्हे; सदर श्रीनगर गढवालमध्ये अलकनंदा नदीच्या काठी वसलेले आहे, आणि आता त्याचा समावेश उत्तराखंड राज्याच्या पौडी गढवाल जिल्ह्यात होतो). गढवालचे राज्य १७व्या शतकाच्या मध्यापर्यंत स्वतंत्र होते. मुघलांपैकी शाहजहानचे लक्ष या भागाकडे सर्वात आधी गेले, कारण त्याला समकालीन असलेला गढवालचा राजा पृथ्विपत शाह हा अल्पवयीन होता आणि कर्णावती नावाच्या त्याच्या आईच्या हातात सर्व सत्ता होती. गढवालचे राज्य हिमालयाच्या पलीकडे असलेल्या तिबेटशी भारताला जोडणाऱ्या महत्त्वाच्या व्यापारी मार्गावर वसले होते. बालराजा सत्तेवर असल्याचा फायदा घेऊन शाहजहानने गढवालवर हल्ला केला, पण कर्णावतीने अद्भुत शौर्य दाखवून मुघलांचा पराभव केला. ही घटना सुमारे १६४० साली घडली. १६५८ साली शाहजहानला पदच्युत करून आणि दारा शिकोहला कंठस्नान घालून औरंगझेब बादशाह झाला, तेव्हा दाराचा मुलगा सुलिमान शिकोह हा पळून गढवालच्या आश्रयाला आला. औरंगझेबाने पृथ्विपत शाहकडे अर्थातच त्याला आपल्या स्वाधीन करण्याची मागणी केली, पण पृथ्विपतने ती नाकारली. धमकावण्यांना गढवाली बधत नाहीत असे पाहून औरंगझेबाने त्यांच्याविरुद्ध सैन्य पाठवले. या सैन्याचा अधिकारी महाराष्ट्रीयांना सुपरिचित मिर्झा राजा जयसिंग होता. पण गढवाली सैन्याने पुन्हा एकदा शौर्य दाखवून मुघल हल्ला परतवला, आणि औरंगझेबाला हात चोळत बसावे लागले.

सैन्याचा दबाव चालत नाही असे पाहिल्यावर जयसिंगाने कारस्थाने आरंभली. स्वतःच्या पदरच्या एका ब्राह्मणाद्वारे त्याने गढवाली दरबारात दुहीचे विष पेरले. पृथ्विपतचा मुलगा मेदिनी शाह याला त्याने बापाविरुद्ध उठाव करायची फूस दिली. गढवाली राज्यात बंडाळी माजल्याचे पाहून त्यांचे पिढीजात शत्रू जे कुमाऊँ आणि सिरमूरचे राजे, त्यांनीही उचल खाल्ली. विघ्नांनी चौफेर घेरलेल्या पृथ्वीपत शाहने अखेरीस मुघल सार्वभौमत्व पत्करायला होकार दिला. सुलिमान शुकोह हासुद्धा औरंगझेबाला शरण गेला. मेदिनी शाहला मात्र पृथ्वीपतने राज्याबाहेर हाकलून लावले. तो मुघलांच्या आश्रयाला गेला, पण दिल्लीच्या वाटेवर असतानाच अचानक मरण पावला (१६६२). या सगळ्या घटनांनी विदीर्ण झालेला पृथ्विपत शाह नंतर फार जगला नाही. १६६७ साली त्याच्यावरही मरण ओढवले.

फते (फतह) शाह हा पृथ्विपत शाहचा नातू आणि मेदिनी शाहचा मुलगा. मेदिनी शाह आधीच मरण पावल्याने पृथ्विपतच्या मृत्यूनंतर गढवाल राज्याचा वारसा फतेशाहकडे गेला. राज्यप्राप्ती झाल्याबद्दल औरंगझेबाने खास फर्मान धाडून त्याचे अभिनंदन केले. या फर्मानावरून असे दिसते की, पृथ्विपतने १६६५ सालीच राज्याची धुरा फतेशाहकडे सोपवली होती. फतेशाहने पुढची पन्नास वर्षे राज्य केले. हा काल गढवालच्या राज्याचा सुवर्णकाळ मानला जातो.

नाममात्र का होईना, पण औरंगझेबाचे मांडलिकत्व स्वीकारण्याची आपल्या बापावर ओढवलेली नामुश्की फतेशाहने धुऊन काढली. १७व्या शतकाच्या अखेरच्या दशकांत मुघल राजकारणाचा आणि लष्करी स्वाऱ्यांचा केंद्रबिंदू दख्खनकडे ढळला. त्याचा फायदा घेऊन फतेशाहने मुघलांपुढे हिमालयीन टेकड्या आणि लगतच्या पठारी प्रदेशांत मोठे आव्हान उभे केले. मुघलांनी दिलेल्या मांडलिकीचा फायदा घेत त्याने पहाडी भागांतल्या इतर राजे-रजवाड्यांवर वचक निर्माण केला (कारण मांडलिकत्वाच्या करारातले एक कलम असेही होते की, मुघलांचा प्रतिनिधी म्हणून गढवालचा राजा इतर राजांवर 'लक्ष' ठेवेल) आणि त्यांच्याकडून मोठा प्रदेश जिंकून त्याने गढवालचे राज्य वाढवले. या राज्यवर्धनाच्या प्रयत्नांतून त्याचा शीख गुरू गोविंद सिंग यांच्याशी संघर्ष झाला. वास्तविक शिखांशी त्याचे संबंध चांगले होते, पण लहानसहान कुरबुरींमुळे त्यांच्यात खटके उडाले, आणि भांगनी नामक ठिकाणी १६८८ साली फतेशाहने खुद्द गुरू गोविंद सिंगांनाही आपल्या तलवारीचे पाणी पाजले. १६९२ साली सहारनपूरच्या मुघल ठाण्यावर त्याने बिनदिक्कत हल्ला चढवला. सय्यद अली या सहारनपूरच्या ठाणेदाराने अतीव कष्टाने हा हल्ला परतवला, पण या स्वारीत गढवाली फौजांना मिळालेल्या विजयाचे स्मारक म्हणून फतेशाहने 'फतेपूर' नावाचे शहर वसवले. फतेशाह आणि त्याचे मुख्य शत्रू कुमाऊँचे राजे यांचा संघर्ष या काळात सतत चालू राहिला. फतेशाहची बाजू अनेकदा वरचढ ठरली, पण काही वेळा कुमाऊँनी सैन्यानेही त्यांचे पाणी दाखवले. १७१० च्या सुमारास कुमाऊँनी राजा जगत चंद याने श्रीनगरपर्यंत धडक मारली.

फतेशाहचा मृत्यू १७१६-१७१७ साली झाला असे दर्शवणारे पुरावे उपलब्ध आहेत. सैनिकी शौर्याबरोबरच फतेशाह हा साहित्य आणि कलांचाही भोक्ता होता. सुलिमान शुकोहबरोबर गढवालला आलेल्या शामदास आणि हरदास या दोन चित्रकारांना त्याने पदरी ठेवून गढवाली चित्रशैलीची निर्मिती केली. चंद्र गुप्त वा अकबर यांच्यासारख्या सम्राटांप्रमाणे फतेशाहच्या दरबारीही कवी, टीकाकार, धार्मिक पंडित अशी विविध 'नवरत्ने' होती. रतन कवी रचित 'फते प्रकाश' हे चरित्रात्मक काव्य, तसेच कविराज सुखदेव मिश्र यांनी लिहिलेले 'वृत-विचार' आणि मतिराम लिखित 'वृतकौमुदी' अथवा 'छंदसार पिंगल' हे रीतिकाव्यावरचे ग्रंथ, अशा साहित्यात्मक कृतींची निर्मिती त्याच्या आश्रयाने झाली.

फतेशाहचा १६९३ सालातला फारसी रुपया

फतेशाहसंबंधी उपलब्ध असलेल्या ऐतिहासिक पुराव्यांत त्याने पाडलेल्या नाण्यांचाही समावेश होतो. ही नाणी अतिशय दुर्मीळ आहेत, आणि त्यामुळे ती प्रसंगोपात्त आणि संस्मरणीय म्हणून काढली असावीत असे दिसते. फतेशाहने सहारनपूरवर हल्ला चढवल्यानंतर तो विजय साजरा करण्यासाठी त्याने मुघल पद्धतीचे, फारसी लेख असलेले नाणे काढले. त्यावर त्याने 'श्री बद्रीनाथ सहाय' अशी आळवणी फारसी अक्षरांत अंकित केली आहे! पण या नाण्यापेक्षाही विशेष उल्लेखनीय आहे ते त्याचे संस्कृत भाषेत पाडलेले नाणे. हे नाणे एकमेवाद्वितीय असून पूर्वी नेदरलँड्समधले भारतीय नाण्यांचे संग्राहक यान लिंगन यांच्या संग्रहात होते, पण अलीकडेच एका भारतीय खाजगी संग्रहात त्याचा समावेश झाला आहे. लिंगन यांच्या संग्रहात असतानाच १९८३ साली प्रसिद्ध नाणकशास्त्रीय अभ्यासक जॉन डेयेल यांनी 'Numismatic Digest' या वार्षिकात या नाण्यावर एक लेख लिहिला होता. हे नाणे अष्टकोनी आकाराचे असून त्यावर पृष्ठभागी –

मेदिनीशाह सूनो श्री फतेशाहावनीपते: ३५
असा लेख असून, पार्श्वभागावर –
बदरीनाथ कृपया मुद्रा जगति राजते १७५७
असे शब्द आहेत.

फतेशाहचा १७०० सालातला रुपया

या शब्दांचा अर्थ सरळ आहे – 'मेदिनीशाहचा मुलगा फतेशाह, जो 'अवनिपती' म्हणजे राजा आहे, त्याने बद्रिनाथाच्या कृपेने (निर्माण केलेली ही) मुद्रा जगावर राज्य करते (आहे)' असे हा लेख सांगतो. ह्यात आलेले १७५७ आणि ३५ हे आकडे अनुक्रमे विक्रम संवत आणि फतेशाहचा राजशक दर्शवतात. विक्रम संवताच्या उल्लेखावरून हे नाणे इ.स. १७०० साली पाडले गेले हे स्पष्ट होते. मागे उल्लेखिल्याप्रमाणे फतेशाहला नाणी पाडण्यासाठी कुठलेतरी कारण असणे आवश्यक असावे, आणि असे एकमेवाद्वितीय नाणे पाडण्यामागे तर महत्त्वाचे कारण असले पाहिजे. ते नक्की कुठले याचा उलगडा होत नाही, पण या काळात फतेशाह आणि कुमाऊँच्या राजांमधल्या संघर्षाला धार चढली होती आणि त्यांच्या विरुद्ध मिळालेल्या एखाद्या विजयाचे स्मारक म्हणून त्याने हे नाणे पाडले असावे असे वाटते. त्याच्या राज्यातल्या देवलगढ मंडलातल्या राजराजेश्वरी मंदिराला त्याने याच वर्षात एक देणगी दिल्याचे नमूद करणारा लेख ज्ञात आहे, म्हणजे या वर्षात काहीतरी महत्त्वाची घटना झाली होती हे नक्की.

या नाण्याचा आकार आणि त्याचे एकंदरीत स्वरूप पाहून कुठल्याही महाराष्ट्रीय इतिहास-अभ्यासकाला शिवाजीच्या सुप्रसिद्ध 'प्रतिपच्चन्द्र…' मुद्रेची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही! जेव्हा डेयेल यांनी या नाण्यावर लेख लिहिला तेव्हा त्यावरील काही अक्षरे त्यांना नीट लागली नव्हती. त्याबद्दल त्यांच्या लेखाला जोडलेल्या संपादकीय टिपणात चर्चा करताना वार्षिकाच्या संपादकांनी या वस्तुस्थितीकडे लक्ष वेधले आहे. 'अनुष्टुभ' छंदात रचलेल्या या लेखात 'शाह सूनो श्री' तसेच 'मुद्रा… राजते' हे प्रयोग, तसेच नाण्याचा अष्टकोनी आकार हे शिवाजीच्या मुद्रेला साजेसे घटक आहेत असे संपादकांचे मत आहे. या वेळी वार्षिकाचे संपादन परमेश्वरी लाल गुप्त आणि अजय मित्र शास्त्री हे दिग्गज नाणकशास्त्रज्ञ करत आणि गुप्त यांनी मराठा मुद्रांविषयीचा एक लेख याच वार्षिकात आधी प्रसिद्ध केला होता, हे ध्यानात घेता ही सूचना बहुतेक त्यांचीच असावी, यात संशय उरत नाही.

पृथ्विपत शाह मरून फतेशाहला राज्यप्राप्ती झाली तो काल आणि शिवाजी-पिता शहाजी याच्या मृत्यूचा काल फार वेगळे नाहीत. मुघल तवारीखकारांच्या मते शिवाजी स्वतःला राजा म्हणवू लागला तो हाच काल (राज्याभिषेक करवून घेणे ही दहा वर्षांनंतर झालेली घटना). शिवाजीला दुर्दैवाने १६८० सालीच मृत्यू आला, पण फतेशाहच्या राजवटीचा कळसाध्याय म्हणजेच १६८०–१७०० ही वर्षे. दोघांच्या चरित्रांत काही मनोरंजक साम्ये आहेत. मुघलांचे नाममात्र मांडलिकत्व पत्करून त्यातून स्वतःच्या राज्याचा अभ्युदय साधून घ्यायचा, त्या मांडलिकत्वाचा इतर महत्त्वाकांक्षी राजांवर वचक ठेवण्यासाठी हुशारीने वापर करायचा, असे असूनही स्वतंत्र राजपद भोगायचे आणि गुणीजनांना आणि साधु-संत-ब्राह्मणादि लोकांना आश्रय देण्यासारखी 'राजा'ची पारंपरिक कर्तव्येही चालू ठेवायची इत्यादी साम्ये राजा म्हणून या दोघांत आढळतात. शिवाजीच्या मृत्यूनंतर त्याच्यापासून प्रेरणा घेण्याचे उदाहरण आपल्याला बुंदेलखंडाच्या छत्रसाल राजामध्येही दिसतेच. तेव्हा शिवाजीच्या उद्योगाची कीर्ती उत्तर हिंदुस्तानात गाजू लागली होती हे निर्विवाद आहे. पण गढवालसारख्या महाराष्ट्रापासून हजाराहून अधिक मैल दूर असलेल्या डोंगरी मुलखात ती कशी पोचली, हे कुतूहल उरतेच. किंबहुना, शिवाजीसारखी लोकोत्तर व्यक्तिमत्वे इतरेजनांना ज्ञात कशी झाली, त्यामागे कोणाची 'योजना' होती, अशा व्यक्तींची कीर्ती पसरे ती नक्की कुठल्या प्रकारे, या प्रेक्ष्यांचा शोध आणि अभ्यास यांसाठीही हे नाणे आपल्याला उपयोगी पडते.

शिवाजी आणि फतेशाह यांची एकमेकांना 'ओळख' करून द्यायची कामगिरी कोणी बजावली असेल याचा शोध घेताना आपल्यासमोर नाव येते ते फतेशाहच्या पदरी असलेल्या मतिराम नावाच्या कवीचे. 'छंदसार' उर्फ 'पिंगल' काव्यग्रंथाच्या सुरुवातीला मतिरामने आपला धनी फतेशाह याची त्याच्या औदार्याच्या बाबतीत शिवाजीशी तुलना केली आहे. मतिराम कवीला शिवाजीची माहिती असायचे कारण म्हणजे तो प्रसिद्ध रीतिकालीन कवी भूषण याचा भाऊ होता, आणि भूषण याचा सर्वांत प्रसिद्ध ग्रंथ म्हणजे 'शिवराजभूषण'! १६७३ साली, म्हणजे राज्याभिषेकाच्या सुमारे वर्षभर आधी लिहिलेल्या या ग्रंथाचे नाव महाराष्ट्रीयांना त्यातल्या 'इंद्र जिमि जृम्भपर…' या लता मंगेशकरांनी सुश्राव्य आवाजात गायलेल्या कवित्तामुळे चांगलेच परिचयाचे आहे. भूषणाचा उल्लेख रतन कवी या फतेशाहच्या पदरी असलेल्या आणखी एका कवीने लिहिलेल्या 'फते प्रकाश' या स्तुतीपर काव्यग्रंथाच्या प्रास्ताविकातही येतो. भूषणाचे खरे नाव काय होते त्याची माहिती नाही, परंतु चित्रकूटच्या राजाने त्याला 'कविभूषण' पदवी दिली असे त्याने स्वतःच म्हटले आहे. मतिरामप्रमाणेच जटाशंकर आणि चिंतामणी हे कवीही भूषणाचे भाऊ होते. त्यांपैकी जटाशंकर याने भूषणाला औरंगझेबाच्या पदरी आश्रय मिळवून द्यायचा प्रयत्न केला, परंतु मुघल दरबाराची प्रवृत्ती भूषणच्या प्रकृतीला मानवली नाही आणि त्याने आश्रयाच्या शोधात दक्षिणेकडे प्रस्थान केले. बुंदीचा राजा भावसिंह हाडा याच्याकडे काही वर्षे काढल्यानंतर भूषण शिवाजीच्या पदरी आला, आणि शिवाजीच्या मृत्यूपर्यंत तो महाराष्ट्रातच होता. दरम्यान मतिराम हा कुमाऊँच्या राजाच्या पदरी राहिला, आणि पुढे तिथूनच त्याने फतेशाहच्या दरबारात प्रवेश केला. शिवाजीच्या मृत्यूनंतर भूषण आश्रयदात्यांच्या शोधात नक्की कुठे फिरला त्याचे स्पष्ट पुरावे आपल्याला उपलब्ध नाहीत, पण भावाला भेटायला म्हणून तो कुमाऊँला येऊन राहिल्याचे काही साहित्यिक इतिहासकारांनी नोंदवले आहे. त्याच्या आयुष्याच्या अखेरीस राजा छत्रसाल याच्या पदरी तो होता, आणि तिथेच छत्रसाल आणि शिवाजी यांच्या भेटीचा आणि परिचयाचा फायदा त्याला झाला असावा, अशी रास्त शंका घ्यायला जागा आहे. 'शिवराजभूषण' काव्याची निर्मिती १६७३ सालची आहे आणि छत्रसाल-शिवाजी भेट ही १६७१च्या सुमारास झाली होती, हे ध्यानात घेता हा शंका अधिकच दृढ होते.

आपला भाऊ मतिराम याच्याकडे भूषणाचे जाणे-येणे असेलच याविषयी संशय घ्यायचे कारण नाही. छत्रसाल हा बुंदेलखंडातला राजा आणि या कवी-बंधूंचे मूळ गाव तिकवांपूर उर्फ त्रिविक्रमपूर हेही बुंदेलखंडाच्या उत्तर सीमेवरचे. संयोगवशात् हे गाव छत्रसालचा मुलूख आणि गढवाल यांच्या काहीसे मध्यभागी येते. त्यामुळे छत्रसालच्या पदरी राहिलेला भूषण आणि फतेशाहच्या पदरी असलेला मतिराम यांची भेट त्यांच्या मूळ गावीही होत असावी. भूषणाकडून शिवाजीची स्तुती ऐकूनच मतिरामने त्याचा धनी फतेशाह याच्या औदार्याची तुलना शिवाजीशी केली असली पाहिजे, कारण भूषणने स्वतः त्याच्या शिवगौरवात्मक काव्यात पराकोटीचा उदारपणा हा शिवाजीचा गुण असल्याचे सांगून त्याबद्दल पुष्कळ स्तुतिसुमने उधळली आहेत. मतिराम आणि भूषण यांचे परस्परसंबंध आणि त्यांच्यापैकी एकाच्या धन्याला (छत्रसालला) शिवाजीबद्दल असलेला प्रेरणात्मक आदर पाहता मतिरामचा धनी फतेशाह यालाही शिवाजीपासून प्रेरणा घेण्यासाठी भूषणाने मतिराममार्फत उद्युक्त केले असावे याबद्दल शंका राहत नाही. फतेशाहने पाडलेले अष्टकोनी आकाराचे नाणे आणि त्यावर असलेले संस्कृत काव्य यांची मूळ प्रेरणा शिवाजीची मुद्रा असावी हा संशय यामुळे बळावतो.

या अनुमानास बाधा आणणारी एक बाब विचारात घेणे भाग आहे. भूषण याचा भाऊ मतिराम आणि फतेशाहच्या पदरी असलेला मतिराम या दोन वेगळ्या व्यक्ती होत्या असे हिंदी साहित्याच्या बच्चन सिंह या इतिहासकारांनी म्हटले आहे. भूषणबंधू मतिराम याची 'रसराज' आणि 'ललित ललाम' ही काव्ये उच्च दर्जाची आहेत, पण फतेशाहच्या पदरी असलेल्या मतिरामच्या नावावर असलेली 'वृत्तकौमुदी' आणि 'छंदसार' काव्ये त्याच्या तुलनेने इतकी 'घटिया' आहेत, की या कृती एकाच कवीच्या असणे शक्य नाही, असे त्यांचे म्हणणे आहे! पण ही तुलना आणि त्यातून काढलेला निष्कर्ष हे निव्वळ साहित्यिक निकषांवर आधारित आहेत. कोणाचे काव्य टीकाकारांना 'घटिया' वाटावे, हे टीकाकारांच्या अभ्यासक दृष्टी आणि वृत्तीवरही अवलंबून असते. याचा अर्थ एकच कवी वेगवेगळ्या काळात सुरस आणि 'घटिया' अशा दोन्ही प्रकारची काव्ये प्रसवू शकणार नाही, असा अजिबातच होत नाही. आणि असे जर असेल, तर फतेशाहच्या पदरच्या मतिरामने शिवाजी आणि फतेशाह यांची तुलना का आणि कशी केली असेल, तसेच फतेशाहच्या पदरी असलेल्या रतन कवी नावाच्या दुसऱ्या कवीच्या 'फते प्रकाश' ग्रंथात भूषणाचा उल्लेख का यावा, हे ऐतिहासिक प्रश्न अनुत्तरित राहतात. सबब भूषणबंधू मतिराम हाच फतेशाहच्या पदरी होता, असे मानणे सयुक्तिक ठरते.

या अनुपमेय नाण्याद्वारे उलगडा होणाऱ्या आणखी एका ऐतिहासिक तथ्याचा उल्लेख करून या लेखाचा समारोप करतो. स्वतंत्र राजांची कारकीर्द ते राजे स्वतःच्या 'राजशक' कालगणनेचा वापर करून मोजत. मुघल राज्यकर्त्यांच्या अशा कालगणनेला 'जुलूस' नाव होते. शिवाजीनेही राज्याभिषेकोत्तर काळात 'राज्याभिषेक शक' सुरू करून त्या कालगणनेचा वापर राज्यकारभारात केल्याचे आपल्याला ज्ञात आहेच. फतेशाहच्या या नाण्यावर त्याने स्वतःच्या कारकीर्दीच्या ३५व्या वर्षी हे नाणे पाडले असा उल्लेख केला आहे. नाण्यावर विक्रम संवतातले १७५७ हे दुसरे वर्षही उल्लेखलेले आहे, म्हणजेच या वर्षी फतेशाहच्या राजवटीला ३५ वर्षे झाली होती, हा ताळा या नाण्यावरच्या कालोल्लेखामुळे सिद्ध होतो. फतेशाहच्या राजवटीला नक्की कधी सुरुवात झाली, याबद्दल मतमतांतरे आहेत. काही इतिहासकारांनी तो १६८२पर्यंत राज्यावर आलाच नव्हता असे प्रतिपादन केले आहे. पण या दोन कालोल्लेखांवरून असे निर्विवादपणे सिद्ध होते की, इ. स. १७००-०१ वर्षी जर त्याच्या राजवटीला ३५ वर्षे पूर्ण होत असतील, तर तो १६६५च्या सुमारास राज्यावर आला असला पाहिजे. म्हणजेच, औरंगझेबाने त्याला मांडलिक 'राजा' म्हणून मान्यता द्यायला जे फर्मान पाठवले, त्या फर्मानाच्या तारखेशी या ताळ्याचा मेळ अचूक बसतो. सबब, फतेशाहच्या राज्यारोहणासंबंधीचा वाद निकालात निघतो.

इतिहाससंशोधनाच्या विस्तारित प्रेक्ष्यात 'परिसंचार' म्हणजेच 'सर्क्युलेशन' या संकल्पनेवर आधारित असे संशोधन बऱ्याच इतिहास-अभ्यासकांनी सादर केलेले आहे. "सृष्टीमध्ये बहु लोक, परिभ्रमणें कळे कौतुक" असे समर्थ रामदास म्हणालेच आहेत. मध्ययुगात लोक स्थितिप्रिय होते, त्यांचे चलनवलन मर्यादित असे, त्यांच्या आकलनाचा आवाका त्यामुळे उल्लेखनीय नव्हता वगैरे जुन्या कल्पनांना छेद देणारे हे संशोधन आहे. या संशोधनातून असे दिसते की, परिसंचार हा काही लोकांच्या जीवनशैलीचा आणि स्वतःचे सामाजिक उन्नयन घडवून आणायच्या वैयक्तिक धोरणाचा भाग होता. चित्रकार, कवी यांसारखे कलाकार, शास्त्री-पंडितादि ब्राह्मवृंद, लेखक किंवा बहुभाषिक असलेले आणि त्यामुळे राजनैतिक, शासकीय किंवा महसुली कामात उपयुक्त ठरणारे इसम, सैनिकी पेशा पत्करून पडेल त्याची पगारी चाकरी करणारे एकांडे शिलेदार, या सगळ्या लोकांचा अशा परिसंचारशील लोकांत समावेश होई. भूषण आणि त्याची मतिरामादि भावंडे हे अशा परिसंचारप्रवण वर्गाचे प्रतिनिधित्व करतात. भूषण स्वतः चित्रकूटचा राजा रुद्रप्रताप, औरंगझेब, भावसिंग हाडा, शिवाजी, गढवाल-कुमाऊँमधले स्थानिक राजे, छत्रसाल अशा अनेक राजांच्या आश्रयाखाली राहिला, आणि त्यामुळे त्याचे बुंदेलखंड, यमुनेचे खोरे, राजपुताना, दख्खन, हिमालयाची तराई, वगैरे विस्तीर्ण क्षेत्रात परिसंचारण होत राहिले. या संचारातूनच त्याने त्याच्या आश्रयदात्या राजांना एकमेकांच्या काव्यमय संपर्कात आणले आणि विशिष्ट राजकीय हेतूंची प्रेरणा पुरवली. फतेशाहच्या अष्टकोनी नाण्याच्या पुराव्याद्वारे आपल्याला एका दृष्टीने या परिसंचारणाच्या महत्त्वपूर्ण परिणामांची कल्पना येते, कारण भूषण अथवा मतिरामासारखे लोक जर स्थितिप्रिय राहिले असते तर कदाचित शिवाजी आणि फतेशाह यांची 'ओळख' झाली नसती.

संदर्भ ग्रंथ –

 • Garhwal Himalaya: A Study in Historical Perspective - Ajay S Rawat, New Delhi, 2002
 • "Commemorative Rupee of Fateh Shah of Garhwal" - John Deyell, Numismatic Digest, vol. VII, 1983
 • हिंदी साहित्य का दूसरा इतिहास – बच्चन सिंह, राधाकृष्ण प्रकाशन, दिल्ली/इलाहाबाद/पटना, २००८
विशेषांक प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (3 votes)

प्रतिक्रिया

लेख आवडला. परिसंचाराविषयी शेवटच्या परिच्छेदात जे लिहले आहे तेच लेख वाचताना वाटत होते! याच प्रकारे किती 'महापुरुषांची'तत्कालिन किर्ती अशी पसरलेली होती असा एक अभ्यास व्हायला हरकत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

लेख आवडला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख लय भारी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लेख आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

परंतु, यात विनोदी (अथवा विनोदाशी संबंधित) असे नक्की काय आहे?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ2

मा. न. बा. , मला मिळालेल्या माहितीनुसार हा विनोद विशेषांक असला ,तरी त्यात काही लेख हे विनोदाशी संबंधित नसणारे असणार होते.. (अर्थात आपण विनोद शोधायचा म्हणालात तर तो ... असो)
बाकी जास्त माहीती /खुलासा आपले(म्हणजे तुमचे) जुने स्नेही सर्वश्री जंतू, आदिती, घासकडवी व तुमच्याकडचे बापट वगैरे करू शकतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"जेवायला काय होतं" या प्रश्नाचं उत्तर "श्रीखंड" असं दिल्यास जेवणात इतर पदार्थ नव्हते असा अर्थ नाही होत.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट2
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

लेख आवडला!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

लेख अतिशय आवडला. यापूर्वी गढवाली घराण्याबद्दल इतक्या विस्ताराने वाचले नव्हते. सर्व इतिहासप्रेमींना आवडेल असा लेख!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही जंतुंची इतकी गर्दी जगात आहे का रास्त |
भरती विषाणुंचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त ||

अतिशय आवडलेला लेख!!
धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

लेख आवडला फक्त शीर्षकातला शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख टोचला!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आकाशानंद!

आणि गढवालच्या राजा "फतेशाह"चा एकेरी उल्लेख नाही खटकला?
शिवाय शिवाजीला शिवाजी नाही तर काय औरंगजेब म्हणायचं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख लय आवडला. जबरदस्त!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

छानच. उत्तरेकडील मुघल आणि राजपूत सोडून अन्य प्रांतांच्या इतिहासाबद्दल माहिती मराठीत फार अशी वाचनात नव्हती. त्यामुळे या लेखातले माहितीचे नावीन्य आवडले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हेच म्हणतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख खूपच आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुंदर लेख. आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वेगळीच आणि रोचक माहिती आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0