उर्मिलाच खुनी आहे!
- आदूबाळ
एक
पाचवा तास संपायला आला होता. सहावा इतिहास. इतिहासाच्या गिजरेबाई - पोरांच्या भाषेत - 'टेमका लागल्या'मुळे सुट्टीवर होत्या. दर दोन-तीन वर्षांनी गिजरे बाईंना टेमका बसत असे. बदली मास्तर येणार येणार अशी हवा दोनतीन आठवडे होती, पण तो काही उगवला नव्हता अजून. पोरांना अर्थात त्याचं काही शाट पडलेलं नव्हतं. इतिहासाला कोण विचारतो? गझनीबिझनीच्या स्वाऱ्याबिऱ्यांची रटाई नवनीतावरून मारणाऱ्यांत पहिला येणारा पटवर्धनही होता.
ऑफ तास समजून सगळे उधळले होते. मॉनिटर गरूड बाजीप्रभूच्या आवेशात बंद दाराचं रक्षण करत होता. कोणाला ग्रौंडात जाऊ देत नव्हता. बाकी आतला राडा थांबवणं त्याच्या बस की बात कधीच नव्हती. मागच्या बाकावरची नायगावकर आणि मंडळी रद्दीच्या दुकानातून मिळवलेल्या स्टारडस्टमधली चित्रं बघण्यात मग्न होती. काशीकर, जोशी वगैरे क्रिकेटपटू मंडळी किट सावरून तयार बसली होती. बाहेर सोडल्यावर एकही क्षण दवडायचा नव्हता. मास्तर येत नाही तोवर फळ्यासमोरच्या मोकळ्या जागेत जोश्या सगळ्यांना स्लिप कॅचिंगची प्रॅक्टिस देत होता. स्कालर लोक डिस्कव्हरी चॅनलवरच्या मगरीच्या डॉक्युमेंट्रीवर जोरजोरात चर्चा करत होते. पुस्तकपांडू कुकडे दारा बुलंदचं कोणतंसं पुस्तक काढून त्यात गुंग झाला होता. देशपांड्याला बालभारतीतली कविता "संदेसे आते है"च्या चालीवर म्हणता येते असा शोध लागला होता, आणि वर्गाचे तबलजी कुबेर आणि पाध्ये जोरजोरात बेंच बडवून त्याच्या भसाड्या आवाजाला ताल देत होते.
बग्गा मात्र अस्वस्थ होता. बापाने त्याला अजून घड्याळ दिलं नव्हतं, पण तो सारखा शेजारच्या चोरडियाच्या हातातलं घड्याळ पहात होता. कोपऱ्यातल्या बाकावर एकदा जाऊन पाहूनही आला.
बग्गाचं खरं नाव प्रशांत भागवत. शाळेत पोरांच्या नावाचा अविस्मरणीय कचरा होई. भागवतचं बगावत झालं, बगावतचं बग्गा. हे वर्गातलं एक स्वयंभू स्थान होतं. स्कॉलर पोरांमध्ये रमण्याइतकी हुशारी त्याच्यात नव्हती, आणि मागच्या बाकावरच्या पोरांबरोबर राहण्याइतका टारगटपणाही नव्हता. बग्गाच्या बापाची वर्तमानपत्रं-मासिकांची एजन्सी होती. स्टेशनजवळ एक स्टॉलही होता. त्यातली वर्तमानपत्रं-मासिकं वाचवाचून बग्गाचं जगाचं ज्ञान मात्र फुगलं होतं.
"बग्गा, स्टारडस हे का नवा?"
शेजुळच्या प्रश्नाला बग्गाने झटकून टाकलं आणि परत रस्त्याकडे नजर वळवली.
"वैज्या नाय दिसत आज?" शेजुळ आशेने म्हणाला.
"त्याचीच वाट बघतोय ना भोकनीच्या..."
वर्गात हा हलकल्लोळ चालू असतानाच दार जोरात खडाडलं. शांततेची लाट वर्गावर पसरत गेली. चिडीचुप्प. क्रिकेटवाले वीर किट सावरत जागेवर जाऊन बसले. स्टारडस्ट दृष्टीआड कोंबला गेला. गरूड मॉनिटर बारकंसं हसला, वर्गाकडे पहात उजवी मूठ वरखाली करत सूचक अभिनय केला आणि दार उघडलं.
भक्कन आलेल्या प्रकाशाने डोळे दिपले. त्या प्रकाशातून एक किडकिडी आकृती वर्गात शिरली.
"वैज्या हऽऽऽ…!" बग्गा हात पसरत ओरडला. बग्गाला टपलीत घालून ती आकृती कोपऱ्यातल्या बाकावर जाऊन बसली.
वैजनाथ अब्राम मुकिंदा. काळा केसाळ दरिंदा. कोपऱ्यातल्या बाकावर बसून सिनेमाची स्वप्नं बघणारा. पाचपांडे मास्तरच्या सेट स्क्वेअरचा भौमितिक मार खाणारा. दर शुक्रवारी हमखास आणि इतर वेळी आठवड्यात कधीही अर्धी शाळा बंक टाकून चौकातल्या लक्ष्मीनारायण टॉकीजमध्ये मॅटिनी पाहणारा. नंतर वर्गाला 'सिन्माची स्टोरी' सांगणारा. वैजनाथ अब्राम मुकिंदा. वैज्या.
वैज्याची जात तर सोडाच, धर्मही कोणाला माहीत नव्हता. काही महिन्यांपूर्वी घुम्या वैज्या शाळेत कोणालाही माहीत नव्हता. किंबहुना बग्गा वगळता त्याला कोणी मित्रही नव्हते. चेहेरा तेलकट काळा. बघणाऱ्याच्या मनात सूक्ष्मशी अढी पैदा करणारा. मिसरूड फुटल्यामुळे आणखीच भकास दिसणारा. शाळेचा बोराटे कॅंटीनवालाही वैज्या समोर आला की सुट्ट्या पैशांची ताटली आपसूक जवळ ओढून घेत असे. पण शाळेबाहेरच्या काही वर्तुळांत वैज्याचा चेहरा मशहूर होता.
उद्धारनगर नंबर दोनच्या चौकात 'टायलर शॉपी' नावाचं व्हिडियो पार्लर होतं. ते वैज्याचा भाऊ टायलरचं दुकान. उद्धारनगरला जुन्या नव्या हिंदी-मराठी-इंग्रजी सिनेमांच्या व्हिडियो कॅसेट, आणि व्हीसीआर पुरवायचं काम टायलर दुकान करायचं. तीन वर्षापूर्वी बदलत्या तंत्रज्ञानाची पावलं ओळखून टायलरने टेम्पो ठरवून मुंबई गाठली. व्हीसीआर आणि कॅसेटींचं खटलं लोहार चाळीजवळ विकून टाकलं आणि आलेल्या पैशांत जवळजवळ तेवढेच पैसे आणखी टाकून लॅमिंग्टन रोडवरून सीडीप्लेयर आणि सीड्या खरीदल्या. टायलर दुकान अद्ययावत झालं. पण टायलरची स्वत:ची स्पूल अजूनही व्हीसीआरच्या युगातच अडकली होती. अडकत्या हेड्सच्या दणकट व्हीसीआरची सवय असलेल्या टायलरच्या बोटांना नव्या सीडीप्लेयरची नाजुक गणितं झेपेनात. याच सुमारास सहावीसातवीतला वैज्या दुकानात बसायला लागला. नवी पिढी असल्यामुळे की काय, पण वैज्याने ते सगळं प्रकरण चट्कन आत्मसात केलं. कारच्या बॅटरीसारखा दिसणारा तो अवाढव्य प्लेयर त्याला अंतर्बाह्य माहीत होता. लाल भोकात लाल वायर आणि पिवळ्या भोकात पिवळी वायर खोचून कोणत्याही टीव्हीला सीडीप्लेयर जोडू शके. अडकत्या खरखरीत सीड्यांना नाजुकपणे हाताळून त्या सोडवायचं काम बालवैज्या सहज करत असे. टायलरने हळुहळू दुकानाचा भार वैज्यावर टाकायला सुरुवात केली.
बारा ते सहाची शाळा संपवून वैज्या थेट टायलर दुकानात दाखल होई. दुकान रात्री अकरापर्यंत जोमदार धंदा करत असे. सीड्या आणि सीडीप्लेयर भाड्याने देणे, सीडी अडकली तर सोडवून देणे, ज्या थोड्या लोकांकडे स्वत:चा सीडीप्लेयर होता त्याच्या जुजबी दुरुस्त्या करणे वगैरेंमुळे वैज्या उद्धारनगर नंबर दोनमधला लोकप्रिय नागरिक होता.
टायलर दुकानात कोणता ना कोणता सिनेमा कायम चालू असे. आसपासचे दुकानदार, काही निरुद्योगी फुकटे टायलर दुकानात येऊनजाऊन असत. समोर गळणारा सिनेमा अर्धउघड्या तोंडाने आणि पूर्णउघड्या डोळ्यांनी बघत बसत. दुकानात लोकांचा पायरव जाणवावा म्हणून टायलरने केलेली ही युक्ती होती. कोणता सिनेमा लावावा याला नियम काहीच नव्हता. हाताला येईल ती सीडी. गेल्याच वर्षी आलेल्या 'बंधन' पासून ते जॅकीचैनच्या 'आयर्न मंकी' पर्यंत वाट्टेल ते लागत असे. (आयर्न मंकीमध्ये जॅकी चॅन नाही, पण कुंगफू हानाहानी असलेल्या सगळ्या चिनी चित्रपटांत जॅकी चॅन असतोच अशी टायलरची एक श्रद्धा होती.)
या सगळ्या गडबडीत वैज्याला सिनेमाची आवड लागावी, व्यसन लागावं यात नवल करण्यासारखं काहीच नाही. दुकानातली प्रत्येक सीडी त्याने किमान दोनदा तरी पाहिली होती. सिनेमे बघायची खाज आणि टायलर दुकानाच्या गल्ल्यातले पैसे वैज्याला लवकरच आसपासच्या थेटरपर्यंत ओढून घेऊन गेले. सकाळी दुकान सोडून निघता येत नसे. त्यामुळे पहायचा तो मॅटिनी. सिनेमा संपला की बाहेरच कुठेतरी खाऊन मग शाळेत जायचा.
शाळा अवाढव्य जागेत पसरली होती. एकूण क्षेत्रफळाच्या फारतर पंधरा टक्के जागेवर शाळेच्या इमारती असतील. बाकीच्या जागेला प्रेमाने 'ग्राऊंड' म्हणत असले तरी प्रत्यक्षात तो मोकाट पसरलेला माळ होता. शाळेच्या इमारती होत्या त्या बाजूला वाहता रस्ता, दगडी कुंपण, लाकडी गेट, मिशाळ रखवालदार वगैरे शिस्तशीर कारभार होता. डावीकडच्या बाजूला वास मारणारा ओढा होता, आणि त्यापलिकडे बंद पडलेल्या कागदाच्या कारखान्याची जागा होती. घाणेरड्या ओढ्यात पाय भरवायची तयारी असेल तर तिथून शाळेत प्रवेश मिळवता येई. कोपऱ्यातल्या शेवटच्या बाकावर बसून वैज्या उरलेले तास कंठत असे. तो कोणाशी, कोणी त्याच्याशी फारसं बोलत नसे.
बग्गाचं मात्र त्याच्याकडे बारीक लक्ष होतं. कोपऱ्यातल्या काळ्या आकृतीचं नाव वैजनाथ आहे, आठवड्यातले दोन-तीन दिवस तो दुपारी तिनानंतर शाळेत उगवतो ही माहिती वगळता कोणाला फारसं काही माहीत नव्हतं. उद्धारनगरातल्या काही पोरांना टायलर कनेक्शन माहीत होतं. पण बग्गाने वैज्या या व्यक्तीत रस घेतला नसता, तर वर्गाच्या सामूहिक स्मृतीत वैजनाथ अब्राम मुकिंदा ही काळसर दुधी अस्पष्ट आकृती राहिली असती. पण बग्गाने टायलर दुकान, वैजनाथाची अर्धी गैरहजेरी, आणि गैरहजेरीचे वार ही तीन समीकरणं शेजारी शेजारी मांडून पाहिली तेव्हा एक्सची किंमत "शाळा बंक टाकून सिनेमा बघणे" ही अचूक निघाली.
अशाच एका दिवशी बग्गाने वैज्याला गाठून 'आजच्या सिनेमा'बद्दल विचारलं. शाळेच्या आठ वर्षांत वैज्याशी स्वत:हून बोलायला कोणी आलं नव्हतं. वैज्याला आश्चर्य वाटलं. त्याने उत्साहाने बग्गाला 'कोयला'चे तपशील सांगितले. "घुंगटे में चंदा हय फिर भी हय फयला चारों ओर उजाला" वगैरे साभिनय करून दाखवलं. बग्गा उडालाच. वैज्याच्या सखोल सिनेमाज्ञानाची पहिली चुणूक इथे मिळाली. बग्गाने ती चुणूक सगळीकडे फिरवली. नवा सिनेमा बघून आला, की वर्गातल्या पोरांना वैज्याने 'सिन्माची स्टोरी' सांगणे ही नियमित गोष्ट होऊन गेली. भरपूर सिनेमे पाहून वैज्याच्या कथाकथनाला सिनेमॅटिक धार चढली होती. अल्पावधीतच वैज्याच्या चित्रपटकथनाचा कार्यक्रम श्रोते खेचू लागला.
"वैज्या भेंडो… कोन्चा पाह्यला आज?" कोपऱ्यातल्या बाकाकडे जात बग्गा किंचित चढ्या आवाजात म्हणाला. पोरांचं कोंडाळं कोपऱ्यात साचू लागलं. पुरेसा ऑड्यन्स जमा झाल्याची खात्री होताच वैज्या सांगू लागला, "विनोद खन्नाच्या पोराचा सिन्माए. पण बापाचा रोलमधी विनोद खन्ना नाईए. राजेशखन्नाए. बरबर ऐश्वर्या. बाकी मंग कादर्खान, आलोकनाथ पल्लिक…"
उरलेसुरले लोकही कोपऱ्याकडे जायला लागले. कुकड्याने पुस्तक मिटून ठेवलं. देशपांड्या आपली संगीतसाधना थांबवून कोपऱ्याकडे आधीच रवाना झाला होता. लीड सिंगर फरार झाल्याने एकटेच पडलेले ड्रमर कुबेर-पाध्येही नाईलाजाने तिकडे वळले. दरवाजाच्या रक्षणाची गरज संपल्याने गरूड मॉनिटरही कोंडाळ्यात सामील झाला.
कथाकथन रंगात आलं होतं. राजेश खन्नाला लॉकेट सापडतं. त्याला समजतं की ज्या पोराला भारतातच सोडून तो अमेरिकेत आला तो पोरगा मोठा होऊन आता अक्षय खन्ना झाला आहे. तो ठरवतो की…
तेवढ्यात वर्गाचं दार उघडलं. पोरगेलासा दिसणारा एक माणूस आत आला. तो गिजरेबाईजागी आलेला बदली मास्तर असणार ही ट्यूब गरूड मॉनिटरच्या डोक्यात लागलीच पेटली. "एकसाथ सावधान!" तो ओरडला.
पोळ्याला दगड मारल्यागत पोरं आपापल्या बाकाकडे पांगली. पण कथा सांगण्यात देहभान हरपलेला वैज्या मात्र एक डान्स स्टेप दाखवता दाखवताच उघडा पडला. नवा मास्तर आपल्याकडेच बघतो आहे हे जाणवून वरमला आणि आपल्या बाकावर मिटून बसला.
"काय चाललं होतं रे मागं?" बदली मास्तराने विचारलं.
दोन
"माझं नाव विनय रघुनाथ कोरडे. बीएड, एम फिल. कोरडेसर म्हणायचं मला." फळ्यावर आपलं नाव लिहीत तो म्हणाला. "गिजरेमॅडम सुट्टीवर आहेत. मी बदली शिक्षक म्हणून आलो आहे. आठवी ते दहावी सामाजिक शास्त्रं. तुम्हांला इतिहास शिकवेन."
लुकलुकते डोळे नव्या मास्तराचं आपादमस्तक निरीक्षण करत होते.
"तुमच्या वर्गाबद्दल मी गिजरेमॅडमशी बोललो. त्यांनी जाण्यापूर्वी जवळजवळ सगळा सिलॅबस संपवलाय. एकच धडा उरलाय, फ्रेंच राज्यक्रांती. पण आपल्याकडे दीड महिना आहे, त्यामुळे घाईगडबडीचं कारण नाही."
"सर, मग आज ऑफ द्या ना…" कोणा आशावादी जिवाने विनवलं.
"ऑफ हं? नको. पण पहिल्याच दिवशी अभ्यास नको." कोरडेमास्तराने कोपऱ्यातल्या वैज्याकडे पाहिलं. "तुम्ही सगळे मघाशी सिनेमाची गोष्ट ऐकत होता ना? बाहेरून ऐकत होतो मी."
वर्गात शांतता. एक-दोघांनी न राहवून मागे वैज्याकडे पाहिलं. वैज्या बाकावर खाली सरकून बसला. वैज्याचा बाक मागच्या कोपऱ्यात असला, तरी बाकाशेजारची खिडकी व्हरांड्यात उघडत असे. वैज्या 'जल्लाद' सिनेमातला मिथुनचा अॅक्शन सीक्वेन्स करून दाखवत असताना नेमका पाचपांडेमास्तर तिथे तडफडला होता, आणि त्याने वर्गात शिरून वैज्याला आणि बग्गाला लाकडी गुण्याने ठोकला होता. पण हा कोरडेमास्तर…
"मीच एका सिनेमाची गोष्ट सांगतो तुम्हाला. आधी कादंबरी होती, आणि नंतर त्यावर सिनेमाही निघाला. नाव आहे…" त्याने फळ्यावर इंग्रजीत नाव लिहिलं.
"अ टेल ऑफ टू सिटीज." कुकडेने हात वर केला. "चार्ल्स डिकन्स."
"बरोब्बर! त्यावर दोन सिनेमेही निघाले आहेत. मी एकच पाहिला आहे." मास्तर फळ्याकडे गेला. "साल होतं…" सतराशे पंच्याहत्तर हा आकडा खडूने गिरवत तो सांगू लागला.
ल्युसी मॅनेट, चार्ल्स डार्ने, आणि सिडनी कार्टनची गोष्ट पुढचा आठवडाभर चालू होती. गोष्टीच्या कडेकडेने गिलोटीनचा, बास्तीयच्या बंडाचा इतिहास येत राहिला. पोरांच्या डोक्यात तो कायमचा ठसणार होता. आठ दिवसांनंतर कोरडेमास्तरने पाठ्यपुस्तकातला धडा उघडला. 'फ्रेंच राज्यक्रांतीची कारणं' विचारताच पोरं रपारप बोलू लागली. धडा निराळा शिकवायची गरज उरली नव्हती. गोष्टीगोष्टींतून इतिहास शिकवणारा कोरडेमास्तर पोरांना आवडायला लागायची ही सुरुवात होती.
तीन
"रुळला म्हणायचा सर तुम्ही." डबा खाताखाता पाचपांडेमास्तर म्हणाले.
मधली सुट्टी संपून गेली होती. हे दोघं सोडले तर स्टाफरूम मोकळीच होती. कोरडेमास्तरला सगळ्यांच्या समोर डबा खायला आवडायचं नाही. मधल्या सुट्टीतला वेळ तो शाळेच्या विस्तीर्ण आवारात फिरण्यात घालवायचा. सुदैवाने आठवड्यातले चार दिवस मधल्या सुट्टीनंतरचा तास त्याला डबा खायला मोकळा असायचा.
पाचपांडेमास्तरच्या प्रश्नावर कोरडे काही बोलला नाही. जेवत राहिला.
"पहिलीच नोकरी ना तुमची? चांगली मिळवलीत. आत्ता बदली असलात तरी सहज याल स्टाफवर."
पाचपांडेमास्तर पन्नाशीला आला होता. शाळेतलं जुनं खोड होतं. सध्याचा मुख्याध्यापक अण्णा दामोदरे रिटायर झाला की जी चढती भांजणी लागेल त्यात पाचपांडे पर्यवेक्षक होणार होता. त्याला तीनचार वर्षं होती, पण आत्तापासूनच पाचपांडे त्या पदी पोचल्याच्या तारेत वागे.
"पोरांकडून चांगलं ऐकतोय तुमच्याबद्दल. नाहीतर या शाळेतली पोरं बारागंड्याची त्याज्यायला. दोन वर्षांपूर्वी भिरूड नावाच्या एकाला बदली म्हणून आणला होता. दोन महिन्यांत काशीत!"
"अच्छा." पाचपांडेचा मान राखायला हवा म्हणून कोरडे बोलला.
"काय येता तुम्ही कोरडेसर?"
प्रश्न कळूनही कोरडेमास्तरने वेड पांघरलं.
"मूळ गाव सासवडजवळ आहे. पण गेल्या दोन पिढ्या पुण्यातच आहे."
"बरं, नका सांगू. चेहरा सांगतो म्हणा. भाषाही." जवळ सरकत पाचपांडे म्हणाले. "संस्थाचालकांच्या पावण्यांतले आहात. जमेल इथे. पण एक लक्षात ठेवायचं."
अशा वाक्यानंतर धमकी किंवा कमीतकमी चेतावणी येते एवढं कळण्याइतकं जग कोरडेने पाहिलं होतं. जेवण थांबवून तो पाचपांडेकडे वळला.
"काय लक्षात ठेवू सर?" नाही म्हटलं तरी कोरडेच्या आवाजाला धार आली होती.
"मित्र म्हणून सांगतोय हो कोरडे. कावायला काय झालं?" पाचपांडे मिशीत हसत म्हणाले. "काये, इथे… इथे म्हणजे स्टाफमध्ये… सगळे तुमच्या-माझ्यासारखे ... लोक नाहीत. आता संस्थाचालक आणि आपण एक आहोत हा काय आपला दोष आहे का? तर सांगायचं काय होतं - इथे लफड्यात पडू नका कोणत्याही. बाटली, बांगडी, बिल्ले…" पैशे मोजल्याची खूण करत पाचपांडे म्हणाले.
कोरडे वैतागला. असला फुकटचा संस्कारवर्ग त्याला नको झाला. पण नोकरी नवी. तीही पहिली. तीही बदली शिक्षकाची, टेंपररी. त्याने शिष्य आरूणीची भूमिका पत्करायचं ठरवलं.
"लक्षात ठेवीन, सर…"
दिलेला एवढा मोठेपणा पाचपांड्यांना पुरेसा होता. पुढची पंधरा मिनिटं पाचपांडेमास्तर आपल्या नव्या शिष्याला या जगात जगायचे नियम सांगत पीळ मारून बसला.
"…तर सर, असा सगळा पंक्तिप्रपंच आहे. बरं, आता मी निघतो तासाला. पाच मिनिटं राहिलीयत."
पाचपांडे गेल्याची खात्री पटल्यावर कोरडेने नि:श्वास टाकला. त्याने खुर्चीवर रेलून क्षणभरासाठी डोळे मिटले.
समोरच्या टेबलावर टकटक झाली. पाचपांडेच्या मोकळ्या झालेल्या खुर्चीवर आता एक लहानखुरी हसरी आकृती बसली होती. कोरडेला तिचं नाव आठवायला थोडे श्रम पडले. काथवटेमॅडम. पंधराएक दिवसांच्या त्याच्या कारकिर्दीत या सहकारिणीशी बोलण्याचे प्रसंग आलेच नव्हते.
"काय, मिळाला गुरूमंत्र?" मिश्कील हसत ती म्हणाली.
कोरडेने केलेला चेहेरा पाहून ती खळखळून हसली.
"पाचपांडेसरांचं नेहेमीचंच आहे हे. नव्या शिक्षकाचा मसीहा समजतात स्वत:ला. आपल्या जनरेशनला जसं काही समजतच नाही!"
"मूलबाळ काय आहे हो त्यांना?" कोरडेने विचारलं. पंतोजी पाचपांडेच्या गिरमिटापेक्षा हा सहवास त्याला सुखद वाटायला लागला.
"एक मुलगा आहे - इंजिनियरिंगच्या दुसऱ्या वर्षाला. एक मुलगी आहे ती शाळेत आहे अजून."
"बिचारे! काय काय सहन करावं लागत असेल त्यांना!" कोरडे म्हणाला, आणि काथवटेमॅडम परत मुक्त हसली.
"तरी बरं, तुम्हाला 'बाईच्या जातीला..' वगैरे नाही ऐकावं लागलं! आम्हांला तेही." ती म्हणाली. तेवढ्यात घंटेचा टोल पडला. "निघते तासाला. बरं - पाचपांड्यांचं एवढं मनावर घेऊ नका. त्यांचं ऐकाल तर त्यांच्याइतकेच बोर व्हाल. कळलं?"
"थॅंक्यू, काथवटेमॅडम!" कोरडे म्हणाला.
ती वळली. "माझं नाव रत्ना."
"माझं विनय."
"ठाऊक आहे मला."
ती गेली तरी तिच्या पर्फ्यूमचा मंद सुगंध कोरडे कितीतरी वेळ टिपत राहिला.
चार
नवी 'अल्फागो' सायकल मिळाली तेव्हा बग्गाला आश्चर्याचा मोठा धक्का बसला. बग्गाच्या बापाने विचार केला - मध्ये तीन वर्षाचं अंतर असणारी दोन पोरं आहेत. काय खर्च करायचाय तो एकदाच करू. दोन्ही पोरं वापरतील. परिणाम : नवीकोरी सायकल. टिचकीत फिरणारे गियर बदलत बग्गा गावभर भटकायला लागला.
पेठेत राहणाऱ्या बग्गाला आता उद्धारनगर दूर नव्हतं. एका शुक्रवारी शाळेआधी बग्गा उद्धारनगरच्या चौकात दाखल झाला. आज शुक्रवार असल्याने वैज्या शाळेत उशीरा येणार याची त्याला खात्री होती. टायलर दुकानात थोडा वेळ घालवून वैज्याला लक्ष्मीनारायणपर्यंत सोबत करावी असा त्याचा इरादा होता. शाळा बुडवून सिनेमाला वगैरे जायची बग्गाची हिंमत नव्हती. बापाला कळलं असतं तर टेरी लाल होईपर्यंत बापाने फोडला असता. पण वैज्यासोबत लक्ष्मीनारायणला जायचा फायदा म्हणजे शाळेआधी एक वडापाव तरी सुटला असता.
उन्हातून आलेला बग्गा टायलर शॉपीच्या दाराशीच थबकला. आत एक ओळखीची आकृती होती.
"गुडमॉर्निंग सर!" बग्गा म्हणाला.
"अरे, तू काय करतोयस इथं? वैजनाथला भेटायला का? छान छान." कोरडेमास्तर म्हणाला. "वैजनाथ, या दोन सीडीज घेऊन जातो मी. उद्या आणेन. पैसे लिहून ठेव."
"पैशाचं काय नाय सर. आपलंच दुकानहे." वैज्या म्हणाला.
"तसं नाही चालणार. लिहून ठेव." सीड्या पिशवीत टाकत कोरडेमास्तर म्हणाला. "चल येतो मी. भेटू शाळेत. वेळेवर या रे दोघं."
कोरडेमास्तर गेला तरी वैज्या तिकडेच डोळे लावून बसला होता.
"अय वैज्या…" बग्गाने हाक मारल्यावर भानावर आला.
"लय भारी माणूसे यड्या हा कोरडेमास्तर." वैज्याच्या आवाजातली आदरभावना जाणवून बग्गा चकित झाला. शाळेत जेमतेमच लक्ष असलेल्या वैज्याकडून आधी कधीच असलं काही ऐकलं नव्हतं. "पैल्या दिवशी बऽ मला नाचतांना पकडलावता, मला वाटलं मेलो आता. अण्णाकडं न्हेतोय. पण नंतर मला बोलावला. मला कोयला पिच्चरची सगळी स्टोरी सांगाय लावली."
"बाबौ! सांगितलीस का मग?" बग्गाला हा टर्न अपेक्षित नव्हता.
"हा मंग! पैल्यांदा जरा घाबरलो. मग म्हनलं हा काय कुत्र्यागत मारणाऱ्यातला वाटत नाय. दिली बसवून सगळी स्टोरी…"
"त्या घुमटे मे चंदाची ॲक्टिंग?"
"हां तीबी केली. सोडतो व्हंय!" वैज्या आवेशात म्हणाला. "मास्तर लय भारीय राव. एकदोन ठिकानी जरा विसरलो तर त्यानेच सांगितलं. आपल्यागतच सिन्मावाला मानूसय. घरी जुना वीसीआर, लय कॅसेटी. नवा सिडीप्लेयर पाठवलाय त्याज्या भावान. आपलं सीडीचं शॉप आहे म्हनताना उद्या येतो म्हनला."
"मग रोज येतो व्हंय?"
"हां! रोज येतो, कधी एक, कधी दोन अशा सिड्या घेऊन जातो."
"भारी आहे ल्यका!" बगा म्हणाला. "दीडपट पैशे लाव त्याला."
"नाय रे, चांगला मानूसय. लय सिन्मे पाह्यलेत त्यानी. हिंदी-इंग्लिश सोड. कुठले वेगळ्याच देशांतले पण. परवा एका जपानी सिन्माची गोष्ट सांगत होता. लय भारीहे तो सिन्मा…"
"तू पाह्यला होय?" बग्गा थोड्या खवचटपणे म्हणाला.
"नाय रे. पण मास्तर म्हनला आता सुटी पडंल तेव्हा मला घेऊन जाईल सिन्मा दाखवायला. हितं पुन्यातच एक बारकं थेटरए. तिथं असले वेगळेच भारी सिन्मा दाखवतात."
"कुठंशीक आलं हे थेटर?"
"प्रभात रोडलाए म्हनला. म्हणजे पार डेक्कनच्या तिकडं." दप्तर आवरत वैज्या म्हणाला. "मास्तर काय बोल्ला म्हैतेय? मला म्हनला वैज्या, लहान आहेस, पन तुला सिन्मातलं लय कळतं. बारावीनंतर कोर्स कर, सिन्मात जा?"
"शारूक होणार व्हंय वैज्या?" बग्गाला गंमत वाटली.
"हाड भोसड्या. हिरोबिरो लय पुचाट असत्यात. डायेक्टर सांगतो ते सगळं डिक्टो करतंय हिरो. आपल्याला डायरेक्टर व्हायचंय."
"मऽ कोर्स करून डायरेक्टर होता येतंय होयरे?"
"मास्तर म्हनला वैज्या, तुला लका डोक्यात सिन्मा फुल दिसतो. स्टोरी बेस्ट सांगतोस. शॉट कसा घेतला सांगतोस. आसंच सगळं ऍक्टर लोकान्ला सांगायचं. डायरेक्टर. लय भारी काम."
"असं मास्तर म्हणाला? तुला? लय प्रेमात दिसतोय तुझ्या." बग्गाला अकारण असूयेचा एक बारीकसा चिमटा बसला.
"आता काय, सिन्मावाले पडलो ना आम्ही दोघं. थोडं आस्तंय तसं." वैज्या दात विचकत म्हणाला.
"बर ते सोड. आज कोन्ता पाह्णार सिन्मा? तो हुतुतु पाह्यला का? फिल्मफेरमध्ये भारी लिहून आलंय त्यावर." बग्गाने मुद्द्याला हात घातला.
"शाळेत येतो आज. सिन्मा नाय." वैज्या दप्तर उचलत म्हणाला.
"का रे?" बग्गाला आश्चर्याचा धक्का बसला.
"आसंच. आज नाय बघूशी वाटत."
"कोरड्यान घोळात घेतला लका तुला." बग्गा म्हणाला.
"तसं म्हण. चला आता."
अल्फागो सायकलची पायडलं हापसता हापसता बग्गा विचार करत राहिला. वैज्याकडे नीटच लक्ष ठेवायचं त्याने ठरवून टाकलं.
पाच
दिवस येत-जात राहिले. शाळा भरत-सुटत राहिली. वैज्यामध्ये पडलेला आश्चर्यकारक फरक बग्गा टिपत राहिला.
आधीचा वैज्या स्वत:च्या कोषात असे. कोणाच्या खिजगणतीत नसे. बग्गाने स्वभावानुसार भोचकपणा करून त्याच्यातला सिनेमावेडा पोरांसमोर आणला होता. क्रिकेटफील्ड मारणारे जोशी-काशीकर, नंबर कढणारा स्कॉलर पटवर्धन, ढीगभर पुस्तकं वाचणारा कुकडे यांच्याइतका नसला तरी दर आठवड्याला 'सिन्माची गोष्ट' सांगणारा वैज्या आता पोरांमध्ये वट कमवून होता. वैज्याच्या या सामाजिक उत्थानाला कारण होता बग्गा, आणि कचऱ्यातून हा हिरा आपण शोधून काढला याचा सूक्ष्मसा गर्वही बग्गाला होता.
आता या नव्या आलेल्या कोरडेमास्तराच्या नादी लागून वैज्या परत दुरावला होता. गुमान वर्गात बसून राही. आपल्या वहीत काही ना काहीतरी खरडत बसलेला दिसे. मधल्या सुट्टीत किंवा ऑफ़ तासालाही. कोणाशी बोलणं शक्यतोवर टाळी. शाळा बुडवून सिनेमाला जाणं थांबलं होतं. 'सिन्माची गोष्ट' जवळजवळ बंदच पडली होती. कोरडेमास्तराच्या तासाची वाट पाहात राही. त्या तासाला मात्र पूर्ण लक्ष देऊन ऐके. कोरडेमास्तरही अधूनमधून वैज्याच्या बाकापर्यंत चक्कर टाकून येई. शक्य होईल तेव्हा वर्गाबाहेरही वैज्या कोरडेमास्तरला गाठायचा, त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करी.
बग्गा वैतागत होता. स्वत:शीच चिडत होता.
बग्गाएवढं सूक्ष्म अवलोकन इतर पोरांचं नसलं, तरी 'सिन्माची गोष्ट' बंद झाल्याचं पोरांना जाणवलं होतंच. काहींनी थेट वैज्याला विचारलं होतं. पण त्यांना वैज्याने परस्पर टोलवलं होतं. पोरं बग्गाकडे आली.
"अय बग्गा," शेजुळ कुरकुरला, "तुझ्या दोस्ताला सांग की. सालं उगी सोन्याचं आंड असल्यागत वागाय लागलंय."
"त्याला सांग की. मला काय सांगतो? मी काय दलाल आहे का त्याचा?" बग्गा तिरसटून म्हणाला.
"भाड्या तूच सांगितलं म्हणून सुर्वात केली ना त्यानी? मग आता काये?" रायसोनी म्हणाला.
"आता काये म्हणजे? आजकाल वैज्या त्या कोरडेमास्तराचा लंड बोच्यात घालून फिरतोय त्याला मी काय करू?"
बग्गा बोलून गेला. पोरांना तेवढं पुरेसं होतं. असलं गॉसिप आग की तरह फैलावायचं ट्रेनिंग कोणी द्यायला नको होतं. दोनतीन दिवसांतच गुदामैथुन करणाऱ्या दोघांचं खडूने काढलेलं चित्र मुतारीत उमटलं. शंकेला वाव नको म्हणून कोणा परोपकारी आत्म्याने वाकलेल्या आकृतीखाली 'सिन्मावाला वैजनाथ' आणि उभ्या आकृतीखाली 'कोरडा होमो' असं लिहून खुलासा केला.
सहा
उन्हं उतरणीला लागली होती. फ़ेब्रुवारीचा महिना. रात्री पडणाऱ्या धंडीची चाहूल शाळेच्या माळरानावर पसरत होती. शाळा सुटायच्या आधीचा, सातवा तास. कोरडेमास्तरला मोकळाच होता, आणि सवयीप्रमाणे तो आवारात भटकायला बाहेर पडला. दूरवर त्याला शाल पांघरलेली शिडशिडीत आकृती दिसली. पारावर बसलेली. कोरडेमास्तर तिकडे वळला. परवानगी न घेता शेजारी जाऊन बसला.
"विनय! तुला पण ऑफ तासाला पिटाळलं का?"
"नाही. मला मोकळाच होता, म्हटलं जरा फिरावं. मस्त परिसर आहे शाळेचा."
"रोमॅंटिक म्हणायचंय का?" काथवटेमॅडम खट्याळ हसली.
"हॅ हॅ, तसं नव्हतं म्हणायचं…" कोरडेमास्तर गडबडीने म्हणाला.
"अरे हो, हो! किती ऑकवर्ड होशील! मी विनयचा विनयभंग केला का?"
कोरडेमास्तरला हसू लोटलं.
"तुला पाहिलं आणि फिरण्याच्या ऐवजी म्हटलं बसू या जरा." तो म्हणाला.
"यन्न विशेष?"
"विशेष म्हणजे, तसं काही नाही." कोरडेमास्तर घुटमळला. "पण तसं विशेषच. तुला थ्रिलर्स आवडतात का?"
"हो, आवडतात की. का रे?"
"उद्या रामगोपाल वर्माचा नवा थ्रिलर येतोय. रामगोपाल वर्मा म्हणजे…"
"मला माहितीय. रंगीलावाला ना?"
"हो. त्याचा सत्या पाहिलास का तू? त्यापेक्षा त्याचे जुने तमिळ, तेलगू सिनेमे जास्त छान आहेत. थिरुडा थिरुडा…"
"कळलं रे. त्याचं काय?" काथवटेमॅडम त्याला अडवत म्हणाली.
"त्याचा नवीन थ्रिलर येतोय या शुक्रवारी. कौन."
"बरं मग?" काथवटेमॅडम गालातल्या गालात हसत म्हणाली. पण कोरडेमास्तर आता जरा गांगरला.
"म्हणजे रत्ना, मला काय म्हणायचं होतं, की म्हणजे येत्या शनिवारी … तुला जमत असेल तर हां …"
"कोरडेसर, तुम्हाला हेडसर बलावत्यात." कोंडिबा शिपाई सांगावा घेऊन आला.
"शनिवारी मॅटिनी. लक्ष्मीनारायण. शाळा सुटल्यावर. जमेल?" कोरडेमास्तर घाईघाईत म्हणाला.
काथवटेमॅडम काहीच बोलली नाही. कोंडिबा दोघांकडे आळीपाळीने पाहात होता. दोन सेकंद वाट पाहून कोरडेमास्तर वळला.
"कोरडेसर!" मागून हाक आली. "येतेय मी."
किंचितसं हसून कोरडेसर ग्राऊंडच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या हेडमास्तरांच्या केबिनकडे चालायला लागला.
हेडमास्तरांच्या केबिनमध्ये कोरडेमास्तरांना पाठवून कोंडिबाने गायछाप चुनापुडी काढली. केबिनमधून येणारे आवाज ऐकायला लागला.
"कोरडेसर? हे काय चाललंय तुमचं? काय ऐकतोय मी?" हेडमास्तरांचा कडक आवाज.
"तरी बरंका, अण्णा, मी सरांना आधीच वॉर्न केलं होतं…" पाचपांडेंचा लुब्रा आवाज.
नवं मास्तर मरतंय आज. कोंडिबाच्या मनात विचार आला. नुकताच तो मुतारीतल्या त्या भिंतीवर चुना मारून आला होता. ते हात त्याने शर्टाला पुसले, आणि गायछाप मळायला घेतली.
सात
वैज्याला जोरात रडावंसं वाटत होतं. आतून कुठूनतरी कढ दाटून येत होते. मुतारीतलं चित्र नाहीसं झालं होतं, पण पोरांच्या नजरा, त्यांचं फिदीफिदी हसणं, सूचक हावभाव त्याला असह्य होत होते. दोन दिवस हे सहन करून तो आतून पिचला होता.
शाळेकडे जाणारे त्याचे पाय लक्ष्मीनारायण थेटरकडे वळले. शुक्रवार. नवा सिनेमा लागला होता. नावही न बघता बाल्कनीचं तिकीट काढून तो मऊमऊ अंधारात शिरला. पडद्यावर हिरवी अक्षरं झळकली - "अल्लू अरविंद प्रेझेंट्स… क्षितिज प्रॉडक्शन कम्बाईन्स… रामगोपाल वर्माज… कौन".
हलत्या चित्रांत त्याने स्वत:ला हरवून टाकलं.
आठ
शुक्रवारचा पूर्ण दिवस कोरडेमास्तर बेचैन होता. हेडमास्तर आणि पाचपांड्यांनी काल त्याची बरीच हजामत केली होती. मूळ आरोपच इतका आचरट होता की कोरडेमास्तरला त्याला काय उत्तर द्यावं सुचेना. शिवाय पुरावा काय, तर मुतारीत काढलेलं एक चित्र!
"कोरडेसर, हा पुरावा नाही मी जाणतो." अण्णा म्हणाला होता. "पण हे कोर्टही नाही. वयात यायला लागलेली हजारभर पोरं सांभाळायची असतात इथे. त्यात असलं गलिच्छ काही पसरायला लागलं तर वर्गातून शाळेत, शाळेतून गावात जायला वेळ लागणार नाही."
"तरी मी सरांना आधीच सां…" कोरडेमास्तरने कान मिटून घेतले होते. पाचपांडेची फुशारकी ऐकून घ्यायचा त्याला कंटाळा आला होता.
"कोरडेसर, तुमचा असल्या कशात सहभाग नसेल. नसेल म्हणजे नाहीच. एक सिनियर सहकारी म्हणून सांगतो - करियरच्या सुरुवातीला असलं काही किटाळ पडावं हे योग्य नाही. असो. सध्यापुरतं हे मिटलं आहे. याबाबत तुम्ही काही लेखी द्यावं अशी गरजही नाही आणि इच्छाही. एक मात्र करा. त्या पोराशी तुमचं काय बोलणंचालणं असेल ते बंद करून टाका. तुमची काय ती व्हिडियो लायब्ररी : हवी असेल तर दुसरी लावा. काय?"
हे सगळं घडून गेलं तेव्हा गुरुवारची शाळा सुटली होती. खोलीवर जाऊन विषण्ण मनाने कोरडे आढ्याकडे बघत पडला. खूप वेळाने त्याला झोप लागली.
शुक्रवारी सकाळी लौकर आवरून त्याने टायलर दुकानात जाऊन यायचं ठरवलं. आपल्यासारख्या प्रौढ माणसाची ही गत तर वैजनाथासारख्या कोवळ्या पोराची अवस्था काय झाली असेल? त्याचा जीव वैजनाथासाठी तुटत होता. पण हेडमास्तरांचे कालचे शब्द आठवले आणि घातलेल्या चपला त्याने परत काढून ठेवल्या. प्रकरण जरा थंड झालं की जाऊ, आज लगेच नको.
दिवसभर शाळेतही वैजनाथ दिसला नाही.
नऊ
सिनेमानंतर वैज्या बाहेर पडला तेव्हा आतून येणारं रडं थांबलं होतं. थेंबाथेंबाने मनात राग साठत होता. उर्मिलासारखा मोठ्ठा सुरा घ्यावा आणि असल्या घाणेरड्या अफवा पसरवणाऱ्यांचा भोसडा उदास करून टाकावा असलं काहीतरी त्याच्या मनात येत होतं.
आजच्या दिवसात शाळेत परत जायचा तर प्रश्नच नव्हता. बस पकडून तो डेक्कनला आला. प्रभात रोडच्या गल्ल्यांमध्ये पायपीट करूनही त्याला ते बारकंसं थेटर किंवा सिन्माची शाळा काही सापडली नाही.
भडकलेल्या डोक्याने वैज्या घरी परतला. रोज दुकान सोडून न जाणारा आपला भाऊ आज दिवसभर दुकानावर फिरकलाही नाही याचं टायलरला आश्चर्य वाटलं. पण जाऊन विचारपूस करण्याइतकी संवेदनशीलता त्याच्यापाशी नव्हती. मुठी वळूनच वैज्या झोपी गेला.
दहा
शनिवारी सकाळची शाळा 'असेम्ब्ली'ने सुरू होई. शाळेच्या मोठ्ठ्या पटांगणात रांगेने उभी पोरं. मग प्रार्थना-प्रतिज्ञा-राष्ट्रगीत. मग पीटीच्या केंगडेमास्तरच्या नजरेखाली कवायती. पोरांच्या अंगात थोडी ऊब आली की अण्णा लांबरुंद भाषण झोडे. कधीकधी बाहेरचे लोकही भाषण द्यायला, आणि मग बक्षिसं वाटायला वगैरे येत. मग शेवटी रेकॉर्डेड भजनाच्या तालात दोन मिनिटांचं 'ध्यान', आणि मग वर्गात परत. शनिवार तसा सुखाचा दिवस.
दोन मिनिटं ध्यानात स्वस्थ बसणं पोरांच्या जिवावर येई. त्यातून ध्यानाचं गाणंही ठाय लयीचं, प्रत्येक सूर ताणताणून ऐकवणारं होतं. पोरं चुळबुळत. केंगडेमास्तर पोरांच्या रांगांतून फिरून कायदा आणि सुव्यवस्था राखायचं काम करी. केंगडेमास्तर फिरतोय तिकडून 'फडाड्फड्' वगैरे आवाज येणं पोरांच्या सवयीचं झालं होतं.
पण आज घडलं ते नवल!
'फडाड्फड्' हा आवाज पटांगणातून न येता शाळेच्या इमारतीतून आला. इमारत मोकळीच असल्याने तो चांगलाच घुमला. बेसावध जिवांनी दचकून डोळे उघडले. केंगडेच्या पट्ट्यात सापडलेल्या डोळे-उघड्या पोरांनी एकेक टोला खाल्ला. बाकीच्यांनी आवाजाच्या दिशेला पाहिलं.
वैजनाथ अब्राम मुकिंदाला कानाला धरून कोंडिबा जिन्यावरून ओढत आणत होता. दुसऱ्या हाताने कानफाडणंही चालू होतं.
स्पीकरवरून येणारं भजन संपलं. 'ध्यान' बरखास्त झालं, असेम्ब्लीही. पोरं वर्गाच्या दिशेने परतू लागली.
"आता काय केलं भोकण्यानं?" कुकडे बग्गाच्या कानात कुजबुजला.
बग्गाने खांदे उडवले. "जाव दे मरू दे भोकात गेला."
पण 'काय केलं'चं उत्तर वर्गात वाट पाहात होतं. तेलात बुडवलेल्या खडूने फळ्यावर मोठ्ठ्या वाकड्यातिकड्या अक्षरात लिहिलं होतं, "उर्मिलाच खुनी आहे!"
बग्गा हसला. शेजारच्या वर्गात गेला. तिथेही तेच. शाळेतल्या बहुतांश फळ्यांवर आज उर्मिला नाचली असणार हे त्याने ताडलं. एकदा त्याला वाटलं, स्टाफरूमपर्यंत जावं आणि नाटक पाहून यावं. पण तो मोह त्याने दाबला.
अकरा
अण्णाचं ऑफिस आणि स्टाफरूम यांच्यामध्ये एक खोली होती. तिथे फायली वगैरे ठेवत असत. गुन्हेगार पोरांनाही तिथेच ठेवत असत. पालक येईपर्यंत. वैज्या तिथे असणार याची बग्गाला खात्रीच होती.
काही झालं तरी आपला मित्र आहे. भेटावं, करता आली तर काही मदत करावी. बग्गाने ठरवलं. या सगळ्या भानगडीची सुरुवात बेसावध क्षणी उच्चारलेल्या त्याच्या एका वाक्याने झाली होती. कोणी त्याच्यापर्यंत ते आणू शकलं नसतं, तरी मनोमन बग्गाला ती जबाबदारी मान्य होती.
शाळा सुटली. पोरं पांगली. बग्गा दबकत दबकत खोलीच्या दिशेने सरकला. अण्णा केबिनमध्ये होता. स्टाफरूम शांत दिसत होती. बग्गाने हळूच खोलीचं दार उघडलं.
खोलीच्या मधोमध वैज्या उभा होता. त्याला छातीशी कवटाळून कोरडेमास्तर. दोघांच्याही डोळ्यांतून अश्रूंचे लोट वाहात होते. दारात उभ्या असलेल्या बग्गाकडे दोघांचंही लक्ष नव्हतं.
आवाज न करता बग्गाने दार लावून घेतलं. सायकल काढली आणि घराच्या दिशेने फिरवली.
बारा वाजत आले होते. थंडीच्या दिवसांतलं उबदार उन्ह अंगावर घेत बग्गा निवांत सायकत मारत होता. दुरून त्याला लक्ष्मीनारायण टॉकीजची पाटी दिसली. काही क्षणांत 'कौन'चं पोस्टरही डोळ्यांसमोर आलं. शोला बऱ्यापैकी गर्दी दिसत होती.
"उर्मिलाच…" त्याला ओरडून सांगावंसं वाटलं. पण ओठ आवळून तो तसाच पुढे निघाला.
कोपऱ्यावरच्या रसाच्या गुऱ्हाळाच्या सावलीत उभ्या आकृतीने मात्र त्याचं लक्ष वेधून घेतलं. त्याने सायकल तिकडे वळवली.
"औ म्याडम! उर्मिलाच खुनी आहे! नाय येत तो आता. चला जा घरला."
काथवटेमॅडमच्या चेहऱ्यावरचा गोंधळ आणि संताप क्षणभर टिपत बग्गा तिथेच रेंगाळला, आणि मग सायकल रेमटवत नाहीसा झाला.