. . . आणि अडगळीत गेले गाडगीळ

संकल्पना

. . . आणि अडगळीत गेले गाडगीळ

- अवधूत परळकर

गाडगीळ नावाचे कुणी एक मुलाखतकार होते. तुम्ही ऐकले आणि पाहिले असेल त्यांना. तर हे गाडगीळ मुलाखतीच्या क्षेत्रात चांगले नाव आणि पैसा कमावून होते. मी मुलाखतीच्या क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर; काहीजणांच्या भाषेत, मुलाखतकलेच्या क्षितिजावर माझा उदय झाल्यानंतर… पण असली गुळचट अलंकारी भाषा मला आवडत नाही. साधे आणि सोपे बोलावे माणसाने. तेव्हा सोप्या शब्दात सांगायचं तर मी मुलाखत नावाच्या कलाप्रांतात प्रवेश केल्यानंतर हे गाडगीळ कुठेतरी अडगळीत जाऊन पडले. आणि हे स्वाभाविक होते. 'सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट' या उत्क्रांतीच्या नियमाप्रमाणे हे अपरिहार्यच होते. गाडगीळ भलतेच सुसंस्कारित आणि समंजस. त्रागा न करता त्यांनी पुण्यातला आपला गाशा गुंडाळला आणि ते सोलापूरला लहानसे टुमदार घर घेऊन राहू लागले.

मी इथे पुण्या-मुंबईत मुलाखतकार म्हणून मुलाखतीच्या प्रत्येक कार्यक्रमागणिक फेमस होत गेलो. आज मुलाखतक्षेत्रातील सचिन तेंडुलकर, विराट कोहली म्हणून अवघा महाराष्ट्र मला ओळखतो. लोक वेडपटच असतात. कोणाची कोणाशी तुलना! सचिन, विराट हे शून्यावर बाद झालेत अनेकदा. माझ्यावर अशा प्रकारे बाद होण्याची पाळी अजून तरी आलेली नाही, हे तुलना करताना या मंडळींनी लक्षात घ्यायला नको का?

असो. आता आपलीच थोरवी आपणच सांगायची, हे काही बरे नाही. आजकाल स्वतःचे ढोल बडवण्याचे प्रकार सर्रास चालू असतात. मला याचा तिटकारा आहे. अर्थात सर्वच स्वतःचे ढोल स्वतः वाजवत नाहीत. ज्यांची आर्थिक स्थिती बरी असते, असे काहीजण त्यांचे ढोल वाजवायला पैसे देऊन दुसरी माणसे नेमतात. माझ्यावर अशी पाळी आली नाही आणि येणारही नाही. याला तुम्ही गर्व म्हणा किंवा अहंकार. मी याला आत्मविश्वास म्हणतो. एकवेळ खिशात पैसे नसतील तरी चालेल; पण खिसे आत्मविश्वासानं भरलेले असावेत. नसतील तर तुमच्यासारखे अभागी तुम्हीच.

तर मुलाखतक्षेत्रात माझी सुरवातच दणक्यात झाली. कसोटी क्रिकेटच्या पदार्पणातच शतक ठोकणारे खेळाडू असतात, तसंच मुलाखतीच्या प्रोफेशनमध्ये माझं झालं म्हणा ना. त्याचं असं झालं, कोकणातल्या एका प्रसिद्ध साहित्यिकाची मुलाखत घ्यायची होती. ती घ्यायला कोणी तयार नव्हतं, कारण या सद्गृहस्थाचा लौकिक असा की मुलाखतीत ते मुलाखतकाराला फारसं बोलू देत नाहीत. मला विचारणा होताच, मी लागलीच हो म्हणून टाकलं. कठिणात कठीण आव्हानं स्वीकारायची मला तशी शालेय वयापासून हौस. पण हा प्रकार थोडा वेगळा होता.

व्यासपीठावर मी साहित्यिक महर्षीच्या शेजारच्या खुर्चीत बसलो, तेव्हा हा कोण नवशिका आपली मुलाखत घ्यायला आलाय, अशा अर्थाचा तुच्छतापूर्ण कटाक्ष त्या कोकणभूषण साहित्यिकानं टाकला. मी खरोखरच नवशिका होतो, पण साहित्याबाबत अगदीच अनभिज्ञ नव्हतो. मुलाखत घ्यायची म्हणून त्या थोर साहित्यिकाचे साहित्य मी नजरेखालून घातलं होतं. तशीच पद्धत आहे; म्हणजे पुस्तकातलं पान न् पान न वाचता एकूण लेखन नजरेखालून घालायची पद्धत आहे, असं मला एका बुजुर्ग मुलाखत्यानं सांगितलं होतं. काही परंपरा पाळायलाच हव्यात.

त्या कोकणभूषणाला मी पहिला प्रश्न विचारला, तोही पारंपरिक होता.
"तुमचं गाव कुठलं?", मी विचारलं.
"मी मूळचा आडवणे गावचा. पण नंतर वडिलांची..."
मी त्यांना तिथं अडवलं. म्हणालो, "आपण त्याकडे नंतर येऊ. पण आडवणे हे नाव तुमच्या त्या गावाला कसं पडलं, हे तुम्हाला माहीत आहे का?"
"नाही बुवा."
"मलाही माहीत नाही, आणि माहीत नाही ते बरंच झालं. काय असतं, की प्रत्येक गावाच्या नावामागे एक स्टोरी असते. आणि ती स्टोरी सांगण्यात आपला बराच वेळ गेला असता. मुलाखत कायच्या काय भरकटली असती. मुख्य मुद्दे तसेच राहिले असते. असो. मुख्य मुद्द्यांकडे वळण्यापूर्वी मी तुम्हाला याबद्दलचा एक किस्सा सांगतो. कॉलेजात असताना मी एका क्रिकेट खेळाडूची मुलाखत घेतली होती. रवी शास्त्री की असंच काहीतरी नाव होतं. त्यात मी त्याला एक टिपिकल प्रश्न विचारला. म्हटलं, "तुमचा हा जो फिटनेस आहे, तो टिकवण्यासाठी तुम्ही काय करता? म्हणजे काय प्रकारचे व्यायाम करता?"

"व्यायाम वगैरे फार करत नाही, पण मी रस्त्याने धावतो सकाळी दहाच्या सुमारास. रस्त्यानं का?, तर तिथं रहदारी बरीच असते. त्यातून वाट काढत चालायचं. हाही एक व्यायाम असतो. आणि मी बसच्या मागे धावतो. लोक बस पकडायला धावतात तसे. मला बस पकडायची नसते. ती बस पुढे निघून गेली की मी दुसरी बस हेरतो आणि तिच्या मागे धावतो.
"का बरं असं?", मी विचारलं.
शास्त्री म्हणाला, "अहो, धावण्यामागे काहीतरी उद्दिष्ट असलं पाहिजे. उगाचच वेड्यासारखं धावायला मला आवडत नाही."

तर असे एकेक अनुभव.

जे मनात बोलायचं ते मी चुकून त्यांच्या तोंडावरच बोललो, "काय चमत्कारिक माणसे असतात तुम्हाला सांगू; पण नाही सांगत. नाहीतर आपली मुलाखत राहील बाजूला. पहिल्यापासून मला विषयांतर करणाऱ्या मुलाखतकारांचा तिटकारा आहे. आता विषयांतराचा मुद्दा निघाला म्हणून सांगतो. अशाच एका नवशिक्या साहित्यिकाच्या मुलाखतीत..."
"अहो, मी नवशिका साहित्यिक नाही.'
"तुम्ही नवशिके नाहीत हो. मला नवशिक्या काळातल्या मुलाखतीत म्हणायचे होतं. म्हणजे सुरवातीच्या काळात मी घेतलेल्या सटरफटर मुलाखतीबद्दल म्हणायचं होतं मला. तर ऐका. थोडक्यात सांगतो. तर सांगत काय होतो... हां, ते विषयांतराबद्दल. हो, सांगतो तो किस्सा. तुम्ही प्लीज मला मध्ये-मध्ये अडवू नका. लिंक तुटते.
तर मी त्या प्लेअरला विचारलं, "तुमचं शिक्षण काय झालंय?"
तर तो रागावला. म्हणाला, "मी भरपूर शिकलोय. पण शिक्षणाचा आणि माझ्या साहित्यलेखनाचा संबंध काय? तुम्हाला नारायण सुर्वे माहीत आहेत ना? ते सातवीपर्यंत शिकले होते, आणि शाळेत शिपाई म्हणून काम करत होते. आपले विजय तेंडुलकर, मॅट्रिकही झाले नाहीत म्हणतात."

आणि मग त्या नवशिक्यानं अर्धशिक्षित भारतीय साहित्यिकांची नावं सांगून माझं बरंच प्रबोधन केलं. नंतर कमी शिकलेल्या इंग्रजी, जर्मन, पोलिश, रशियन साहित्यिकांची नावं सांगायला सुरवात केली. शिक्षण आणि साहित्यिक गुणवत्ता यावर तो पंधरा मिनिटं बोलत राहिला.

"बरं, पॉइंट लक्षात आला", त्याला थांबवून मी बोलायला सुरवात केली, "आपल्याला इथे वेळ कमी आहे. या आयोजकांचं मी एक पाहिलंय - हे लोक सिनेनटी किंवा सेलिब्रेटी असला की दोन-दोन तास मुलाखती ठेवतात. साहित्यिक वगैरे असला की कमी वेळ देतात. असो. आपण पुन्हा प्रश्नावर येऊ. एक सांगा मला. असं तर होत नाही ना, की मी जास्त बोलतोय आणि तुम्हाला फार कमी वेळ मिळतोय? तसं असेल तर सांगा स्पष्टपणे. मला प्रांजळपणा आवडतो. काय सांगायचं ते तोंडावर बोलावं माणसानं. हो की नाही? तुम्हाला काय वाटतं?"
"मला वाटतं, तुम्ही मला उद्देशून प्रश्न विचारावेत."
"गंमत करता काय? अहो, ते तर विचारणारच आहे. त्यासाठीच तर मी तुमच्यासमोर बसलोय. मात्र मी अधिक बोलतोय, असं वाटलं तर मला अडवा. संकोच करू नका."

मी त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांपैकी त्यांचं आवडतं पुस्तक कोणतं विचारलं.
"मला तीन मुले आहेत, त्यापैकी आवडता कोण?, असं विचारल्यासारखं वाटतं मला हा प्रश्न ऐकून", असं म्हणून त्यांनी मला त्यांच्या आवडत्या पुस्तकाचं नाव सांगितलं. ते आपल्याला का आवडलं, हे ते सांगू लागले; तेव्हा मला त्यांना पुन्हा थांबवावं लागलं. कारण मला माझ्या आवडत्या पुस्तकांची नावं सांगायची होते आणि ती लिस्ट मोठी होती. कोकणभूषण सुरवातीला अस्वस्थ झाले. त्यांची नाराज मुद्रा बघून माझ्या आवडत्या साहित्यकृतीत मी त्यांच्या साहित्यकृतीचं नाव घुसडलं.
मुलाखत याच धमाल शैलीत पुढे जात राहिली. आमचा संवाद उत्तरोत्तर रंगत गेला हे सांगायला नको. मुलाखत त्यांची आहे, आपण मुलाखतकार आहोत हे भान मी अखेरपर्यंत बाळगलं. अधूनमधून त्यांनाही काही शब्द बोलण्याची संधी देत राहिलो. फार थोड्या मुलाखतकारांपाशी हे तारतम्य असतं, बरं का! सारांश काय तर माझी पहिलीच मुलाखत हिट झाली.

कार्यक्रम संपल्यावर लेखकाऐवजी माझ्याभोवती स्वाक्षरी घेण्याची गर्दी जमलेली पाहून, त्या कोकणभूषण साहित्यिकाचा चेहरा फोटो काढण्यालायक झाला. पण आमचा फोटोग्राफर दरिद्री. चेहरा फोटो काढण्यालायक होऊनही आमच्या फोटोग्राफरनं त्यांचा फोटो काढला नाही. हे फार वाईट झालं. त्याचा कॅमेरा हॅंग झाला म्हणे.

तर अशी धमाल. माझ्यात एक मुलाखतकार दडला आहे याची मला तोवर कल्पना नव्हती. या धडाकेबाज मुलाखतीनंतर इये मराठीचिये नगरी, मी घेतलेल्या दर्जेदार मुलाखतींचं धमाल युगच अवतरलं, असं लोक म्हणतात. मुलाखतीचा असा धडाकेबाज प्रवास सुरू झाल्यावर मी मागे वळून पाहिलं नाही. पाहिलं असतं तर कदाचित दिसला असता या क्षेत्रांत प्रवेश मिळवायला धडपडणारा शेकडो तरुण उमेदवारांचा जमाव. सामाजिक बांधिलकीच्या अशा जाणिवा तूर्तास बाजूला ठेवू.

केस पुरेसे सफेद नसल्याने मला जीवनगौरव पुरस्कार मिळाला नाही. पण या प्रोफेशनमुळे गौरवपूर्ण जीवन मात्र माझ्या वाट्याला आलं. तसे गौरव बरेच झाले; त्यातले काही अगदी गल्लीबोळातले होते. पण गल्लीबोळातले असले, तरी ते स्वीकारण्यात मला कधी कमीपणा वाटला नाही; उलट आपली कला तळागाळापर्यंत पोचली याचं समाधान वाटलं. फार थोड्या कलाकारांपाशी तुम्हाला ही जाणीव आढळेल. वरकरणी किरकोळ वाटाणाऱ्या मुलाखत या उपक्रमाला आज सर्जनशील कलेचा दर्जा प्राप्त झाला आहे, तो माझ्या मुलाखतकौशल्यामुळे. काही तपशील विनय बाजूला सारून मला सांगायला हवेत, त्यापैकी हा एक.

तर सांगत काय होतो? हां, ते माझ्या मुलाखतीच्या धडाक्याबद्दल. या प्रवासातली माझी थोडी निरीक्षणं सांगतो. मुलाखत घेण्यासाठी मुलाखतकार सर्वज्ञ असावा लागतो; निदान ज्याची मुलाखत घ्यायची आहे, त्याच्या क्षेत्राविषयी त्याचा थोडाफार अभ्यास असावा लागतो या सगळ्या मिथ आहेत. एकेकाळी तशा पूर्वअटी असतीलही; पण आता अभ्यास असणं वगैरे सगळे आऊट ऑफ फॅशन झाले आहे. आजच्या मुलाखतदुनियेत पूर्वीचे अभ्यासू विचारवंत रद्दबातल झाले आहेत. माझ्यासारखा अपवाद सोडा.

परवाचंच सांगतो. दुय्यम दर्जाचे, पण एकेकाळी गाजलेले एक ज्येष्ठ नाट्यअभिनेते स्टुडिओत आले होते. अभिनेते जुन्या पिढीतले असतील तर मुलाखतकारानं मुलाखतीपूर्वी अभिनेत्याच्या कारकीर्दीवर किमान धावता दृष्टिक्षेप टाकावा, अशी पूर्वीच्या जमान्यातली पद्धत. मी या परंपरेला फाटा दिला. मी कधीच असले वेळखाऊ उद्योग करत नाही. माझ्या थिअरीप्रमाणे मुलाखतकाराला समोरच्या व्यक्तीविषयी जेवढी कमी माहिती असेल तेवढं बरं. उत्सुकतेपोटी तो अभिनेत्याला प्रश्न विचारत जातो, आणि त्या ओघात अभिनेत्याविषयी सर्व काही त्याच्या उत्तरातूनच मुलाखतकाराला कळत जातं.
हे ज्येष्ठ अभिनेते आपल्या बरोबर बरंच काही घेऊन आले होते. त्यांना मिळालेली अभिनयाची प्रशस्तीपत्रं, लहानमोठे करंडक, नामवंत कलावंतासमवेतच्या त्यांच्या फोटोचा अल्बम, त्यांच्या अभिनयाबद्दलचे समीक्षकांचे गौरवोद्गार असलेली कात्रणं असं सारं साहित्य त्यांनी सोबत आणलं होतं. त्याचं काय करावं मला कळेना. इतक्यात आमच्या निर्मात्यांनीच ते बाड माझ्या हातातून काढून घेतलं. त्या नटाला ते म्हणाले, "अहो, याची काही गरज नाही. आमच्या मुलाखतकारानं हे सर्व अभ्यासलं आहे." नंतर माझ्या कानाजवळ येऊन प्रोड्युसर म्हणाले, "एक सामान्य पण रसिक असा प्रेक्षक म्हणून मराठी नाटकाविषयी बोलायला आपण त्यांना बोलावलं आहे. अभिनेता म्हणून नाही." त्या वयोवृद्ध अभिनेत्यांना ऐकायला कमी येत होतं म्हणून बरं झालं. मुलाखत नेहमीप्रमाणे हिट झाली, हे तुम्हाला सांगायला नको.

पण मुलाखतीत सामान्य प्रेक्षक म्हणून बोलावलेले अभिनेते माझ्या अपेक्षेपेक्षा खमके निघाले. साधेसुधे प्रश्नही त्यांनी त्यांच्या अभिनयक्षेत्रातल्या पराक्रमाकडे वळवले. किती मोठमोठ्या नटश्रेष्ठांनी आपल्या अभिनयाचे कौतुक केलं, वगैरे रंगवून सांगायची एकही संधी त्यांनी सोडली नाही. तुम्ही विख्यात नट असल्याचं इथल्या सर्वांना माहीत आहे, आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळू; असं सांगून मी गाडी त्यांच्या सामान्यपणाकडे वळवायचा प्रयत्न केला. पण माझ्या प्रश्नांची दखल घ्यायची नाही; आपल्याला पाहिजे ते बोलायचं असं ते ठरवून आले असावेत. अधूनमधून माझा प्रश्न अर्धवट तोडून ते म्हणायचे, "माफ करा, तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्यापूर्वी मी आधी माझं जे सांगायचं राहून गेलंय, ते पूर्ण करतो."

हे धाडस याआधी कोणी केलं नव्हतं. लोक मुलाखत ऐकायला नाही तर मुलाखतकार म्हणून माझा परफॉर्मन्स पाहायला लांबून लांबून येतात, याची मला कल्पना होती. थोडा आवाज चढवून मी त्यांचं 'मी चोवीस तास'चं प्रसारण म्हणजे स्वप्रशंसापुराण थांबवलं, आणि माझं सुरू केलं. माँटेसरीमधल्या नाटकात मी झाड झालो होतो; तेव्हापासून सुरवात केली आणि नंतर बालनाट्य, एकांकिका आणि मग व्यावसायिक नाटकात कसा माड झालो, म्हणजे कसा माडाएवढा उंच झालो ते त्या अभिनेत्याला ऐकवलं. तर तो खमक्या म्हणतो कसा, 'अहो, तुम्हाला स्टेजवर कधी पाहिल्याचे आठवत नाही.' मग तितक्याच खमकेपणाने त्याला उत्तर दिलं, "काका, माझ्या नाटकाचे पहिले दोन प्रयोग पुण्या-मुंबईत व्हायचे. आणि ते निमंत्रितांसाठी, म्हणजे मराठी रंगभूमीवरल्या प्रथितयश कलावंतांसाठी असायचे. बाकीचे सगळे आम्ही डेट्रॉईट, शिकागो, न्यू यॉर्क अशा कुठल्या कुठल्या दूरच्या गावात जाऊन करायचो."

तर असेही प्रसंग येतात. पण प्रसंग कसाही ओढवला तरी मी सचिनप्रमाणे शून्यावर कधी बाद नाही झालो. शतक झळकवायला थोडा वेळ लागला असेल तेवढेच.

एकदा एका मुलाखतीपूर्वी मी गंमत म्हणून थोडा अभ्यास करून गेलो होतो. मुलाखत देशीवादी साहित्यिकाची होती. त्यासाठी मी खानदेशात जाऊन पहिल्यांदा देशीवाद समजून घेतला. मुलाखतीच्या आधी एका खवट समीक्षक मित्राला तो ऐकवला तर तो म्हणाला, "हा कसला देशीवाद? हा तर खानदेशीवाद!"
"हरकत नाही", मी मनात म्हटलं, "तो देशीवाद बडबडायला लागला की आपण खानदेशीवाद ऐकवायचा."

मग काय? स्वभावानुसार बिनधास्तपणे मुलाखतीला सामोरा गेलो. सरप्राइज म्हणजे माझ्यासमोर बसलेले आमचे पाहुणे, देशीवादी साहित्यिक बरेच बदलले होते. म्हणजे तसे अंगावरचे कपडे आणि मिशा वगैरे तेच होते; पण मधल्या काळात त्यांनी भरपूर परदेशप्रवास केला होता आणि आता ते विदेशीवादी झाले होते. विदेशीवाद तर विदेशीवाद, आपल्याला काय फरक पडतो? मीही तसा थोडाबहुत परदेशप्रवास केला होता. साहजिकच आमच्या गप्पा रंगल्या. मग काय; तिथल्या लायब्ररीज, तिथल्या वाचकांच्या अभिरुची, तिथले वाङ्मयीन पुरस्कार, ते मिळवण्यासाठी करावं लागणारं लॉबीइंग असं पश्चिमेतल्या सूर्याखालचं सगळं काही चर्चेत आलं.

"विलायतेतून बोट महिन्याभरात मुंबई बंदरात आली नाही, की पूर्वी इथल्या लेखकांची उपासमार व्हायची", लेखकराव म्हणाले. आजही चित्र फार बदललेलं नाही. मधल्या काळात बोटीची जागा विमानानं घेतली, आणि आता ऑनलाईन वाहतुकीनं. जोपर्यंत परदेशी साहित्य निर्माण होतंय, तोवर मराठी वाङ्मयाला मरण नाही."

'मराठी साहित्याचं परावलंबितपण' यावर संयुक्त निवेदन जाहीर करायचं, आम्ही ठरवलं.

प्रायोगिक रंगभूमीवरच्या नामवंत कलाकाराच्या मुलाखतीला आणखी मजा आली. संयोजकांनी कल्पकता दाखवून स्टेजवर आम्हाला बसायला दोन ठोकळे दिले होते. दिवाणखान्याच्या सेट काढून टाकून त्या जागी काळा पडदा लावला. प्रेक्षकसंख्या जास्त असली की प्रायोगिक रंगभूमीवरले कलावंत अस्वस्थ होतात, म्हणून संयोजकांनी डोकं लढवून या प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमाला मोजके निमंत्रक बोलावले होते. माझ्या प्रत्येक प्रश्नानंतर त्या नटाने अर्थपूर्ण पॉझ घेतले; मग त्याचं सांगून संपलं की दुसरा प्रश्न विचारण्याआधी मी निरर्थपूर्ण पॉझ घेतले. प्रायोगिक रंगभूमीला अलीकडे मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक मिळू लागलेत, याबद्दल डोळ्यात पाणी आणून त्या कलाकारानं मुलाखतीच्या अखेरीस खंत व्यक्त केली. प्रायोगिक निर्माते-दिग्दर्शकांनी आपलं काही चुकतंय का, याचा अंतर्मुख होऊन विचार करायची ही वेळ आहे असं तो कलावंत भावविवश होऊन म्हणाला. मुलाखतकारानं अलिप्त राहायचं असतं हे विसरून मीदेखील काही काळ गलबलून गेलो.

तर अशा गमतीजमतीत मुलाखतीच्या मुलखात माझा प्रवास सुरू राहिला. क्रिकेट आणि फुटबॉल संघाच्या कर्णधारांच्या मुलाखती मी घेतल्या. दोन्ही खेळांविषयी माझं ज्ञान तिसरी-चौथीच्या मुलांइतकंच; पण मुलाखतकाराचा ज्ञान या गोष्टीशी संबंध काय? मुलाखतकार असतो एक ज्ञानवाहक. त्यानं इथलं ज्ञान तिथं न्यायचं, इलेक्ट्रिक वायरसारखं. वीज निर्माण कशी होते, वीजप्रवाह किती व्होल्टेजचा आहे वगैरे ज्ञानाशी इलेक्ट्रिक वायरला मतलब काय?

समोरच्या खुर्चीत बसलेल्या व्यक्तीला बोलायला लावायचं; तिच्याकडून माहिती कशी काढून घ्यायची; व्यक्ती खूप बडबड करू लागली, तर तिला न दुखावता शब्दचातुर्याने कसं रोखायचं यासंबंधीचं थोडं कौशल्य असलं की झालं. मुलाखत देणाऱ्याच्या निवेदनात रुक्षता आलीच तर शाब्दिक, प्रासंगिक विनोद करून ती सिच्युएशन कौशल्यानं हाताळता आली म्हणजे खूप. थोरांच्या मुलाखती असतील तर समोर बसलेला सामान्य मुलाखतकारही थोर मानला जातो. संगीतकार, गायक, गायिका यांच्या मुलाखती त्यांच्या व्यवसायाशीच निगडित असल्या पाहिजेत; असा काही नियम मुलाखतविश्वात नाही.

उदाहरणार्थ, सचिन तेंडुलकरच्या मुलाखतीत मी त्याला क्रिकेट सोडून सर्व विषयांवर बोलायला लावलं. त्याच्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी, त्याचे क्रिकेटेतर छंद, त्याला आलेले विविध व्यक्तिरेखांचे अनुभव अशा सर्व गोष्टींबाबत सचिननं बरंच काही सांगितलं. त्याच्याकडून क्रिकेट खेळातल्या खाचाखोचा ऐकायला आलेल्या क्रिकेटप्रेमींनाही मुलाखतीचा हा अप्रोच अभिनव वाटला आणि आवडला.

शास्त्रीय संगीतातल्या आघाडीच्या गायिकेला मी किचनमधल्या तिच्या आवडीच्या रेसिपी वर्णन करून सांगायला लावल्या; एका मुरब्बी राजकारण्याला मी 'हिंदी सिनेमा आणि हिंदी सिनेसंगीत' यावर बोलायला लावलं; एका अध्यात्मवाल्याला टीव्ही पाहता का, विचारलं तर 'ओ येस!' म्हणून त्यानं 'कॉमेडी एक्स्प्रेस' ही माझी सर्वात आवडती मालिका आहे असं सांगितलं. पाहुण्या कलाकाराच्या कलेबद्दल किंवा क्षेत्राबद्दल जुजबी ज्ञान असलं तर मुलाखतकाराला अशा युक्त्या कराव्याच लागतात. प्राचीन काळातले मुलाखतकार डोळे मिचकावत, अधूनमधून जोक मारत अशा ट्रिक्स करत होते. एकेकाळचे मुलाखतसम्राट तर त्यातच तरबेज होते. मी हा सवंगपणा आजतागायत टाळला आहे. मुलाखत - मग ती विनोदी कलावंताची असो वा हास्यकवीची - तिचं 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमात रूपांतर होऊ द्यायचं नाही, हे मी अगदी पहिल्या मुलाखतीपासून मनाशी ठरवलं होतं.

महाराष्ट्रातील क्रीडा, संगीत, नाटक, सिनेमा, नृत्य आणि इतर सांस्कृतिक विश्वातल्या दिग्गजांच्या मुलाखतींबरोबरच मी फूटपाथवर व्यवसाय करणारे विक्रेते, बॅकस्टेज आर्टिस्ट्स, चहाच्या दुकानावरील पोरं अशा समाजाच्या तळागाळातल्या नागरिकांच्या मुलाखती घेतल्या. अवघं मराठी सांस्कृतिक आणि असांस्कृतिक विश्व ढवळून काढलं. त्यांच्याबद्दल काय आणि किती सांगावं?

प्रत्येक मुलाखतीच्या वेगवेगळ्या रंजक आणि उद्बोधक स्टोऱ्या आहेत. त्या सर्व इथं मांडणं शक्य नाही. या सर्व मुलाखतींना रसिक श्रोत्यांनी दिलेल्या प्रतिसादाची वर्णनं करणं, हे माझ्या संकोची वृत्तीला मानवणारं नाही. स्वतःचे ढोल स्वत: बडवणं किंवा कंत्राट देऊन दुसऱ्यांकडून बडवून घेणं, या प्रकाराची मला ऍलर्जी असल्याचं सुरवातीलाच मी स्पष्ट केलंय. नाहीतर सांगण्यासारखे पराक्रम बरेच आहेत. सेनाप्रमुखांनादेखील मी अडचणीचे प्रश्न विचारून निरुत्तर केलं आहे. बारामतीच्या जाणत्या राजांना मी विश्वासात घेऊन, त्यांनी अजाणतेपणी केलेल्या चुकांची कबुली द्यायला भाग पाडलं आहे. आता हे सगळं तपशिलानं सांगायचं, म्हणजे पुन्हा आपणच आपली थोरवी गाण्यासारखं होणार नाही का? तेव्हा ते टाळतो.

या सगळ्या गोंधळात, तुलनेनं किरकोळ पण तरीही महत्त्वाची अशी एक घटना सांगायची राहिली. दहा-पंधरा दिवसांपूर्वी पंतप्रधान कार्यालयातून मला एक मेल आली. पंतप्रधानांची मुलाखत आपण घ्यावी, अशी विनंती करणारी मेल. मी नम्रपणे विनंती नाकारली. तुम्हाला याचं नवल वाटणं स्वाभाविक आहे, पण मी ही विनंती नाकारायला तसंच गंभीर कारण होतं. पंतप्रधानांच्या कार्यालयानं पंतप्रधानांना विचारायच्या प्रश्नांची एक यादी मेलसोबत जोडली होती.

मला सांगा, कोणता तत्त्वनिष्ठ आणि स्वाभिमानी मुलाखतकार अशा प्रकारे दुसऱ्यांनी लिहून दिलेले प्रश्न समोरच्या व्यक्तीला विचारेल? समोर बसलेली व्यक्ती आपले माननीय पंतप्रधान असले म्हणून काय झालं; मुलाखतकारापाशी स्वत:ची बुद्धी, स्वत:चे विचार काही आहेत की नाहीत?

पंतप्रधानांच्या भक्तांना पंतप्रधानांची विनंती मी धुडकावून लावल्याचं अजिबात आवडलं नाही. नाराज झालेल्या या पंतप्रधानप्रेमींनी प्रसिद्धीची हवा माझ्या डोक्यात गेल्याची ओरड सुरू केली. हेही ठीक होतं. पण त्यांची मजल त्याही पुढे गेली. माझ्याबद्दल त्यांनी अफवा उठवायला सुरवात केली. काय तर म्हणे, मला ट्रीटमेंटसाठी मेंटल हॉस्पिटलात ऍडमिट केलंय. न्यूरॉलॉजिकल डिपार्टमेंटमध्ये माझ्यावर उपचार चालू आहेत. दिवसेंदिवस माझं वेड विकोपाला जात चाललंय. मी म्हणे, अधूनमधून व्हायोलंट होतो आणि मी असा व्हायोलंट झालो की तिथल्या नर्सेस माझ्या हातात कॉर्डलेस माईक देतात. हातात एकदा माईक दिला की मी म्हणे शांत होतो. मेंटल हॉस्पिटल काय, माझं व्हायोलंट होणं काय नि कॉर्डलेस माईक काय - सगळंच कायच्या काय!

विश्वास बसतो का तुमचा या अशा गोष्टींवर? या प्रकाराने विचलित न होता शांतपणे मी थोडा विचार केला. पंतप्रधानांच्या विनंतीला नकार एवढे एकच कारण यामागे असेल का? आणि माझ्या हळूहळू लक्षात येऊ लागलं, हे गाडगीळ ग्रुपचे कारस्थान आहे. अडगळीत गेलेल्या गाडगिळांना, त्या अडगळीतून बाहेर काढून मुलाखतीच्या सिंहासनावर त्यांची पुनर्स्थापना करण्याचं मोठं षडयंत्र यामागे आहे.

वाईट वाटलं. अरेरे! एवढं सगळं कारस्थान करण्यापेक्षा या मंडळींपैकी कुणीतरी मला भेटून सांगितलं असतं की, मुलाखत घेता घेता तुम्हाला भान राहिलं नाही की तुम्ही एक अडगळ बनून गेला आहात कुणा गाडगिळांच्या यशस्वी जीवनप्रवासातली! सांगायचं होतं असं स्पष्ट. मीच नसतो का स्वतः होऊन बाजूला झालो त्यांच्या मार्गातून? तसा मी दिलदार आणि खिलाडूवृत्तीचा. आणखी पुढे जाऊन मी त्यांना सन्मानानं मुलाखतीच्या सिंहासनावरही बसवलं असतं आणि चाहत्यांनी माझ्या डोक्यावर चढवलेला मुकुट उतरवून त्यांच्या डोक्यावर चढवला असता.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (1 vote)

प्रतिक्रिया

नेमकं थोडक्यात मांडलय. गाडगीळ सोलापूरला गेले ते बरं झालं. बंगल्यात सिताफळाच्या झाडाखाली बसून संध्याकाळ घालवतील, त्यांच्याच जुन्या मुलाखती वाचून स्वत:शीच हसतील. किर्लोस्करांची मुलाखत त्यापैकीच एक.
क्रिकेटची जज होणाऱ्या मंदिरा बेदी, झालंच तर शशि थरूर यांच्या मुलाखती घेणं गाडगीळांना जमणार नाही,ते तुम्हाला जमेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुधीर गाडगीळ का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

होय. एक स्पर्धक आलाय आणखी. ऐसिवरही आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जरा टाइट एडिटिंग हवं होतं, गड्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला लेख कळला नाही - कुणा नवीन मुलाखतकाराची खेचलीये का ह्यात? (अर्णव??)
==
रेफरन्सेस हुकल्याने मजा आली नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुधीर गाडगीळ (असावेत).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बापटांचे प्रमोशन ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

थोडा लांबला असं वाटतंय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.