प्रधानांचं घर

ललित

प्रधानांचं घर

- भ्रमर

जेनिफर जुलैपासून प्रधानांकडं हाऊसक्लिनिंगसाठी जायला लागली. हाऊसक्लिनिंग म्हणजे पूर्ण घराची स्वच्छता. व्हॅक्युमिंग; किचन, बाथरूम, फरशा पुसणं; पसारा आवरणं; अधूनमधून छत, गराज, पॅटिओ वगैरे साफ करणं. तिच्याकडं जी घरं होती, तिथं ती दोनतीन आठवड्यांतून एकदा तीनचार तासांसाठी जायची. याशिवाय तिच्या सावत्र वडिलांनी चालवायला घेतलेल्या गॅस स्टेशनवरही ती काम करायची.

जूनमध्ये तिला केटीचा, तिच्या कॉन्ट्रॅक्टरचा फोन आला होता, एक नवीन घर आहे म्हणून. “नवराबायको दोघंच आहेत, घरही खूप मोठं नाहीये. एकदा भेटून ये. बहुतेक दोन आठवड्यांतून दोन तासांसाठी गेलीस तरी पुरेल”, आणि थोडं थांबून ती म्हणाली होती, “आय थिंक दे आर इंडियन्स.” तोपर्यंत जेनिफरचा भारतीय लोकांशी, किंवा खरं तर कोणत्याच इमिग्रंट्सशी काही संबंध आला नव्हता. ती रहायची तो भाग काहीसा डोंगराळ, लहान-लहान खेड्यांचा बनलेला होता. जवळचं शहर तीस मैलांवर होतं आणि तेही खूप मोठं, कॉस्मोपॉलिटन शहर नव्हतं. आजूबाजूला भरपूर कोळशाच्या खाणी होत्या, ‘कोल कंट्री’ असं अमेरिकेतल्या ज्या प्रदेशाला म्हटलं जातं, त्याचा हा हिस्सा. बहुतांश लोकवस्ती गोऱ्या अमेरिकन्सची होती. जेनिफरचं विश्व अगदी मर्यादित होतं. तिचे वडील ती लहान असतानाच गेले होते, आईनं दुसरं लग्न केलं होतं आणि जेनिफर आईबरोबर तिच्या सावत्र वडिलांच्या जुन्या, मोठ्या पण मोडकळीला आलेल्या घरात रहायला आली होती. तीन वर्षांपूर्वी तिची आई अचानक हार्ट अटॅकनं गेली होती आणि आता ती एकटीच सावत्र वडील आणि भावाबरोबर राहात होती. जेनिफरचं हायस्कूल पूर्ण झालं होतं, पण तिला पुढच्या शिक्षणात रस नव्हता. मुळातच अबोल असलेली ती आई गेल्यानंतर अजूनच कोशात गेली होती. तिला फारसे जवळचे मित्र नव्हते, काही छंद वगैरे नव्हते. सध्या तिच्या आयुष्याला खरं तर निश्चित अशी कुठलीच दिशा नव्हती. तसेही तिला कॉलेजला घालण्यासाठी तिच्या सावत्र वडिलांकडं पैसे नव्हते. त्यांची घरची परिस्थिती फार चांगली नव्हती. मागच्या काही वर्षांत कोळशाच्या उद्योगात चांगलीच मंदी आली होती, बऱ्याच खाणी बंद झाल्या होत्या, लोकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या, त्यातच त्यांची आणि जेनिफरच्या सावत्र भावाचीही नोकरी गेली होती. त्यांनी एक गॅस स्टेशन चालवायला घेतलं होतं आणि शिवाय भाऊ वॉलमार्टमध्ये काम करत होता. घरी थोडी आर्थिक मदत व्हावी म्हणून तिनं क्लिनिंगची कामं करायला सुरुवात केली होती.

केटीनं आधी फोन करून तिची प्रधानांशी भेटायची वेळ ठरवली होती, त्याप्रमाणं ती एका रखरखीत दुपारी प्रधानांच्या पत्त्यावर पोचली. पत्ता एका दुमजली टाऊनहोमचा होता. घर अलीकडेच बांधल्यासारखं वाटत होतं. दाराच्या चौकटीवर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत एक नक्षीदार दोरी बांधली होती आणि त्याला प्लास्टिकची रंगीबेरंगी पानंफुलं लावली होती. डोअरमॅटवर जोडलेल्या हातांचं चित्र होतं. दार एका तिशीच्या आसपास असलेल्या बाईनं उघडलं.

“हाय, मी दीपा” हसून तिनं हात पुढं केला. तिचा चेहरा तजेलदार होता आणि हसणं प्रसन्न होतं.
“मी जेनिफर, आत येऊ का?” जेनिफरनं विचारलं.
“ये ना, फक्त प्लीज तुझे शूज काढशील?”

आत भिंतीला लागून शू रॅकवर चपला-बुटांचे जोड ठेवले होते. दीपानं पायात काही घातलं नव्हतं. जेनिफरला हे विचित्र वाटलं, कारण तिला घरात शूज घालून वावरायची सवय होती. पण तिनं शूज काढून ठेवले. दोघी आत आल्या.

“बैस. काही घेणार?”
“नको, थँक्स! मला हाऊसक्लिनिंग बद्दल केटीनं पाठवलंय. ती तुमच्याशी बोलली आहे ना?”
“हो, पण ते नंतर बोलू. आज खूप गरम होतंय. तू उन्हातून आलीयेस. हे घे, तुला बरं वाटेल”, तिच्या घामेजलेल्या चेहऱ्याकडं बघत दीपानं एक ग्लास जेनिफरला दिला.

जेनिफरनं घ्यायचा म्हणून एक घोट घेतला, पण तिला खरंच खूप बरं वाटलं. “छान आहे, लेमोनेड आहे का?”
“त्यासारखंच. आम्ही याला सरबत म्हणतो. बस ना.”

दोघी समोरासमोर बसल्या. गरम होत असूनही दीपानं घरात गुडघ्यापर्यंत येणारा कुर्ता आणि स्लॅक्स घातल्या होत्या. जेनिफरला गुडघ्याच्या बऱ्याच वरपर्यंत संपणाऱ्या शॉर्ट्स आणि स्लिव्हलेस टॉप हा आपला पोशाख खूप तोकडा आहे असं तिच्यासमोर बसल्यावर उगाचच वाटू लागलं. तिनं पटपट सरबत संपवलं.

दीपानं तिला घर दाखवलं. ती साफ करायची त्या अवाढव्य घरांच्या तुलनेनं हे घर तसं लहानच होतं. फर्निचरचीही खूप दाटी नव्हती, एक बेडरूम तर रिकामीच होती. किचन मात्र गजबजलेलं होतं. कुकिंग रेंजवर चार आकारांची चार भांडी होती, त्यांतला एकही पदार्थ जेनिफरच्या ओळखीचा नव्हता. एका ओट्यावर पिझ्झा डोसारखा दिसणारा पिठाचा गोळा ठेवला होता आणि शेजारी लाकडी रोलर. सगळी रॅक्स, कॅबिनेट्स आणि फ्रीज खचाखच भरले होते. जेनिफरला तिच्या घरातलं किचन आठवलं. फ्रीज आणि कॅबिनेट्स याच्या अर्ध्यानंही भरलेले नसायचे. जेवायला बहुधा तीच काहीतरी करायची आणि तेही बहुतेक फ्रोझन किंवा कॅन्ड फूडपासूनच बनायचं.

“आम्ही दोघंच घरी असतो,” दीपा सांगत होती, “म्हणजे सध्या आम्ही दोघे… वी आर एक्स्पेक्टिंग” थोडीशी लाजत ती म्हणाली, ”नोव्हेंबरमध्ये ड्यू डेट आहे. नवऱ्याला इथं जॉब मिळाला म्हणून आम्ही अलीकडेच या भागात राहायला आलो. मलासुद्धा एक नोकरी मिळाली आणि मग हे प्रेग्नन्सीचं कळलं. खरं तर घराची सफाई वगैरे सगळं नेहमी मीच करते, पण प्रेग्नन्सीमध्ये काही हेल्थ कॉम्प्लिकेशन्स झालीयेत आणि डॉक्टरांनी शरीरकष्टांना थोडी बंधनं घातलीयत. पण नोकरी जमेल तितके दिवस चालू ठेवायचीय, म्हणून ठरवलं की रोजची सफाई मी करत जाईन पण अधूनमधून डीप क्लिनिंगसाठी काही महिने कुणालातरी बोलवायचं,” जेनिफरला उगाचच वाटलं की क्लिनिंगसाठी दुसऱ्याला बोलवायची गरज का आहे, हे दीपा तिला सांगण्याच्याऐवजी स्वतःलाच समजावत होती.

मग दर दोन आठवड्यांनी बुधवारी दुपारी जेनिफर त्यांच्याकडं क्लिनिंगला जायला लागली. घरी कोणी नसायचं. किल्ली दाराबाहेर एका झाडाच्या मागे छोट्याशा पेटीत ठेवलेली असायची. आदल्या रात्री कन्फर्म करायला आणि काही विशेष सूचना असतील तर त्या द्यायला दीपाचा टेक्स्ट यायचा. नेहमीच ‘हाय जेनिफर’ अशी सुरुवात आणि ‘थँक्स, दीपा’ असा शेवट असलेला. जेनिफर पूर्वी एका घरात दोन वर्षं क्लिनिंग करायची तिथल्या मालकिणीला तिच्यासाठी फ्रीजवर नोट्स ठेवायची सवय होती. पण त्या नेहमी ‘फॉर क्लिनर’ असं लिहिलेल्या असत. दोन वर्षांत एकदाही तिनं जेनिफरचा नावानं उल्लेख केला नव्हता.

प्रधानांचं घर व्यवस्थित असायचं. तिला वाटायचं की ती यायच्या दिवशी ते दोघे आधीच थोडीशी साफसफाई करून ठेवत असावेत. काम झालं की ती कुतूहलानं थोडा वेळ घरातल्या गोष्टी बघायची. लिव्हिंग रूममध्ये बरेच कौटुंबिक फोटो होते. त्यात भरजरी पोषाखातल्या दीपाचे आणि तिच्या नवऱ्याचे काही वयस्कर लोकांबरोबरचे फ्रेम केलेले फोटो होते. ते त्यांचे आईवडील असावेत. ते तिकडं भारतात, हे दोघे इथं...जेनिफरचा जो परिवार होता, तो याच गावात होता. ती आत्तापर्यंत देशच काय, पण रहायची त्या राज्याबाहेरही गेली नव्हती. तिला भारताला जाणारी फ्लाईट कुठून निघते, किती वेळाची असते, हे माहीत नव्हतं. जगाच्या नकाशात भारत कुठं आहे हेही तिला दाखवता आलं नसतं. प्रधानांकडं एका भिंतीवर व्हायोलिन लावलेलं होतं. ‘संदीप, माझा नवरा हे वाजवतो’, दीपानं घर दाखवताना तिला सांगितलं होतं. घरात पुस्तकांनी भरलेलं मोठं शेल्फ होतं, पण त्यातही इंग्रजीमधली पुस्तकं कमी आणि कुठल्यातरी वेगळ्याच भाषेतली जास्त होती. त्यातलं एक पुस्तक तिनं एकदा चाळूनही पाहिलं होतं. मागच्या कव्हरभर एका चष्मावाल्या माणसाचा फोटो होता. बाकी त्यातलं तिला काहीच कळलं नव्हतं. किचनमध्ये कुठल्या कुठल्या मसाल्यांच्या, पिठाच्या आणि खाद्यपदार्थांच्या पिशव्या होत्या. त्यातल्या काहींवर पेनानं लिहिलेली लेबलं लावलेली होती. यातल्या एकदोन मसाल्यांचा तिनं वास घेऊन पाहिला होता, तिला जोरात ठसका लागला होता. लिव्हिंग रूममध्ये एका कोपऱ्यात छोटंसं मंदिर होतं. ‘दीज आर अवर गॉड्स’ दीपानं सांगितलं होतं. त्यातल्या हत्तीसारखी सोंड असलेल्या एका देवाची मूर्ती जेनिफरला खूप आवडायची.

हळूहळू प्रधानांकडं जाणं तिच्या सवयीचं होत गेलं. दर दोन आठवड्यांनी तिला नवीन काहीतरी बघायला मिळायचं. त्यांच्या घरातल्या भिंतींवर बाळांची छान-छान चित्रं आली होती. मास्टर बेडरूममध्ये दीपाच्या सोनोग्राफीच्या वेळचा पोटात दिसणाऱ्या बाळाचा फोटो फ्रेम करून लावला गेला होता. सुरुवातीला रिकाम्या असलेल्या बेडरूममध्ये हळूहळू बाळाची नर्सरी आकार घेत होती. भिंती ताज्यातवान्या, सुखद रंगांत रंगल्या होत्या. बाळासाठी बॉक्समधून क्रिब आला होता आणि जोडला गेला होता. त्यावर एक वेगवेगळ्या प्रकारचं म्युझिक वाजवणारं आणि लाईट्स सोडणारं खेळणं आलं होतं. नर्सरीच्या भिंतीवर प्राण्यांची, पक्ष्यांची चित्रं आली होती. चेंजिंग टेबल आलं होतं. प्रधानांचं घर बाळाच्या आगमनासाठी सज्ज होत होतं.

तिला तिच्या कामाची गंमत वाटायची. ती ज्यांची घरं साफ करायची, ते लोक तिला महिनोंमहिने भेटायचे नाहीत; पण त्यांच्या आयुष्यात काय चाललंय, हे सगळं तिला कळत रहायचं. घरांचे कानेकोपरे साफ करताना ती नि:शब्द घरं, त्यांच्यातल्या नि:स्तब्ध गोष्टी तिच्याशी बरंच काही बोलून जायच्या, आणि तिलाही ते आवडायचं. नेहमी शांत असणारी जेनिफर या घरांशी मात्र भरपूर मूक संभाषण करायची, त्यांनी लपवलेले संदेश शोधायचा मनापासून प्रयत्न करायची. प्रधानांशिवाय ती तेव्हा अजून ज्या दोन ठिकाणी जायची, त्यापैकी एक घर खूप आलिशान होतं. मोठाच्या मोठा पॅटिओ, व्यवस्थित कापलेलं लॉन, गराजमध्ये चार गाड्या, आतमध्ये भल्यामोठ्या खोल्या, उंची फर्निचर, अत्याधुनिक गॅजेट्स, बेसमेंटमध्ये मोठा बार आणि होम थिएटर, जेनिफरच्या बेडरूमपेक्षासुद्धा मोठी नुसती कपड्यांची क्लोजेट्स… नवराबायको दोघंच रहायचे. घरात सगळीकडं त्यांचे प्रेमात आकंठ बुडालेले फोटो होते. आधी या श्रीमंतीनं जेनिफर दिपून गेली होती, पण नंतर नंतर हे सगळं तिच्या अंगावर यायला लागलं. आणि मग तिला हळूहळू बाथरूममधल्या मेडिसिन कॅबिनेटमध्ये दडलेल्या डिप्रेशन आणि अँझायटीच्या गोळ्या दिसायला लागल्या, नवरा सध्या गेस्ट बेडरूममध्ये एकटाच झोपतोय हे दिसायला लागलं, तिथे प्रत्येकवेळी बेडशेजारी व्होडकाच्या बाटल्या दिसायला लागल्या. याच्या उलट दुसरं घर होतं. त्या घरातली बायको मागच्या वर्षी गेली होती, नवरा एकटाच होता आणि तोही वयस्क होता, कशानं तरी आजारी होता. त्यानं पत्नीच्या सगळ्या आठवणी घरात जशाच्या तशा जपून ठेवल्या होत्या. तिचे कपडे, फ्रीजवर तिनं लावलेली ग्रोसरीची यादी, बेडरूममधली तिची सर्व प्रसाधनं. जसं ती गेल्याच्या क्षणाला त्याचं जीवनही गोठून गेलं होतं. घरात त्यांच्या मुलांचे, नातवंडांचे फोटो होते, पण एकाही फोटोत आजीआजोबा बरोबर नव्हते. ते घर खरं तर फार घाण व्हायचंच नाही, फक्त किचनमध्ये आणि फर्निचरवर वापराअभावी धुळीचे थर साचलेले असायचे. प्रत्येक घराचं एक व्यक्तिमत्त्व असतं, असं तिला वाटायचं. त्या श्रीमंत पतीपत्नीचं घर म्हणजे एक भरधाव पळताना ताबा सुटल्यामुळं कड्यावरून कोसळायच्या बेतात असलेली गाडी आहे, त्या म्हाताऱ्या माणसाचं घर एखाद्या कोमात गेलेल्या पेशंटसारखं आहे अशी काहीबाही चित्रं तिच्या डोळ्यासमोर यायची. याउलट प्रधानांचं घर तिला फार गाजावाजा न करता, मजल दरमजल करत, हळूहळू पण निश्चितपणे समोर दिसणाऱ्या उज्ज्वल भविष्याकडं चाललेल्या प्रवाशासारखं वाटायचं.

घरी एकदा बोलताना तिच्याकडून प्रधानांचा उल्लेख झाला, तेव्हा तिचा भाऊ तिथं होता. ते नाव ऐकून तो म्हणाला,” मला वाटतं, मला माहीत आहे तो माणूस! इंडियन आहे ना? शहरातल्या एका बेकार लोकांसाठीच्या रिट्रेनिंग सेंटरमध्ये कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग शिकवतो. मला सल्ला देत होता एकदा प्रोग्रॅमिंग शिकायचा. म्हणे आता कोल जॉब्ज परत यायचे नाहीत, नवीन तांत्रिक ज्ञान घ्यायचा प्रयत्न करा.”

तिला संदीप काय करतो, ते माहीत नव्हतं. पण अचानक तिचा भाऊ उसळून म्हणाला, “आपलं सरकार मूर्ख आहे, कुठून कुठून या इमिग्रंट्सना बोलवून घेतं! हे लोक इथं येऊन आमचे जॉब्ज घेतात आणि वर आम्हालाच ट्रेनिंग देतात! मी साफ सांगितलं त्याला की मला नाही शिकायचं प्रोग्रॅमिंग! मी सांगतो जेन, नोव्हेंबरच्या निवडणुकांचा निकाल जर मनासारखा लागला ना, तर बंद पडलेल्या कोळशाच्या खाणी पुन्हा चालू होतील. आमचे जॉब्ज परत येतील आणि हे सगळे साले इमिग्रंट्स इथून शेपूट चालून परत जातील. माझी खात्री आहे! पण तसा निकाल लागला पाहिजे, नाहीतर पुन्हा येरे माझ्या मागल्या!”

नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार होत्या, त्याच्या प्रचाराची रणधुमाळी चालू होती. सध्याच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांच्या कारकीर्दीत कोळशामुळं पर्यावरणावर आणि आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता कोल मायनिंगवर बरीच बंधनं आणली होती आणि ऊर्जेचे नवीन स्रोत विकसित करण्याकडं लक्ष केंद्रित केलं होतं. पण त्यामुळंच निवडणुकीला उभ्या असलेल्या विरोधी पक्षाच्या उमेदवारानं ‘कोल कंट्रीची अधोगती झाली आहे’ असा प्रचार सुरू केला होता. तिथल्या लोकांमध्ये असलेल्या रागाला आणि असंतोषाला त्यानं पद्धतशीरपणे खतपाणी घातलं होतं. इमिग्रंट्स आणि एका विशिष्ट धर्माच्या लोकांविरुद्ध अतिशय भडक विधानं केली होती आणि ‘मला निवडून द्या, मी अमेरिकेचं गतवैभव परत आणेन’ अशी आश्वासनं दिली होती. गोरा, काहीसा कमी शिकलेला ‘वर्किंग क्लास’ यामुळं प्रभावित झाला होता. याचे पडसाद घरी उमटतानाही जेनिफर बघत होती. तिचा भाऊ मागच्या आठवड्यात त्या उमेदवाराच्या रॅलीला गेला होता आणि एकदम भारावून जाऊन घरी आला होता. जेनिफरनं मागच्या काही वर्षांत त्यांच्या भागात`वाढलेली बेकारी, दारिद्र्य, गुन्हेगारी पाहिली होती. पण हे कशामुळं झालं होतं याची तिला जाण नव्हती आणि याचा तिनं आत्तापर्यंत विचारही केला नव्हता. प्रधानांसारखे लोक बाहेरून इथं आल्यामुळं इथल्या लोकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या? असं या बाहेरून येणाऱ्या लोकांमध्ये काय विशेष होतं? ते इथल्या लोकांपेक्षा जास्त क्वालिफाईड होते का? पण त्यांनी त्यांचा देश सोडून इतक्या लांब यायचं कारणच काय होतं?

पुढच्या मंगळवारी दीपाचा टेक्स्ट आला. त्यात तिनं लिहिलं होतं की भारतातून डिलिव्हरीसाठी तिचे आईबाबा आलेत आणि उद्या ते घरी असतील. तिनं बघितलेल्या फोटोतल्यापेक्षा प्रत्यक्षात ते दोघे वयस्कर वाटत होते. साडी नेसलेली दीपाची आई आणि विजार शर्टातले बाबा. तिनं स्वतःची ओळख करून देत शेकहॅण्डसाठी हात पुढं केला. बाबांनी काहीसं अडखळत हात मिळवला, तर आईनं दोन्ही हात छातीपाशी जोडून नमस्कार केला. ती नेहमीप्रमाणं कामाला लागली. ती किचन साफ करायला लागली, तेव्हा दीपाची आई कट्ट्यापाशी येऊन ती काय करते आहे, ते बघत उभी राहिली. जेनिफर गोंधळली. तिला असं कोणी बघत असताना काम करायची सवय नव्हती. ती जायची तेव्हा तिचे बाकीचे क्लाएंट्स बहुदा घरी नसायचे. असले तर शांतपणे आपापलं काम करत बसलेले असायचे. तिनं ‘काही हवंय का?’ असं विचारलं तर दीपाची आई हातवारे करत तोडक्यामोडक्या इंग्रजीत तिला काहीतरी सूचना द्यायचा प्रयत्न करू लागली. जेनिफर अजूनच गोंधळली. शेवटी दीपाचे बाबा तिथं आले, ते आणि आई कुठल्याशा वेगळ्याच भाषेत काहीतरी बोलले आणि आई काहीशी नाराज होऊन सोफ्यावर जाऊन बसली. बाबांनी हसून हातांनीच तिला ‘तुझं सुरू राहू दे’ असा इशारा केला. जेनिफरला वैतागल्यासारखं झालं.

संध्याकाळी तिला दीपानं कॉल केला.

“आज माझ्या आईनं फार लुडबुड केली का?” हसत हसत तिनं विचारलं. जेनिफर काही बोलली नाही तेव्हा ती म्हणाली, “आय ऍम सॉरी. काय आहे ना, भारतात आमच्याकडं स्वयंपाकाला, घर साफ करायला, आठवड्यातून एकदा बागेची काळजी घ्यायला अशा तीन बायका येतात. आईचा निम्मा वेळ त्यांच्या मागं मागं करण्यात जातो. तिला वाटतं की तिनं लक्ष दिलं नाही, तर त्या नीट काम करणार नाहीत. तिची सवय ती अमेरिकेत आली तरी काही जाणार नाही. मी तिला सांगितलंय की तू सगळं नीट करतेस आणि तुला ते तुझ्या पद्धतीनं करू दे. ती पुन्हा असं नाही करणार.”

तिला आश्चर्य वाटलं. भारतात घरी कामाला तीन-तीन लोक? म्हणजे यांची परिस्थिती खूपच चांगली असली पाहिजे. मग हे इथं कशाला येतात? तिचा भाऊ तर म्हणत होता यांचा देश गरीब आहे? पण दीपा जणू तिच्या मनातलं ओळखून म्हणाली, “भारतात डोमेस्टिक हेल्प मिळणं फार सोपं आहे. दुर्दैवानं आमची लोकसंख्या खूप जास्त आहे आणि अजूनही खूप गरिबी आहे, त्यामुळं तिथं माणसाच्या वेळेला आणि श्रमाला फारशी किंमत नाही. तोच तर फरक आहे ना गं, म्हणून तर सगळे इथं येतात!”

दोन आठवड्यांनंतर जेनिफर पुन्हा प्रधानांकडं गेली तेव्हा हॅलोवीन जवळ आला होता. सगळ्या घरांच्या बाहेर भोपळे, बुजगावणी ठेवली होती. सांगाडे, कवट्या, कोळ्यांची जाळी असं हॅलोवीनचं भीतिदायक डेकोरेशन केलं होतं. प्रधानांच्या दारातही हसऱ्या चेहऱ्यामध्ये कार्व्ह केलेले दोन भोपळे ठेवले होते. जेनिफरनं सहज पाहिलं तर भोपळ्याच्या आत छोटे मातीचे दिवे ठेवले होते. दाराबाहेर जमिनीवर पांढऱ्या खडूसारख्या पावडरमध्ये फुलांची छान नक्षी काढली होती आणि आत रंग भरले होते. त्या दिवशी काम करताना दीपाची आई तिच्या मध्ये-मध्ये आली नाही. दोघं टीव्हीवर काहीतरी कार्यक्रम बघत बसले होते. भाषा तिच्या ओळखीची नव्हती.

तिचं काम झालं आणि ती निघाली, तशी दीपाच्या वडिलांनी तिला थांबायला सांगितलं. तिच्या हातात त्यांनी एक छोटासा बॉक्स दिला, सोबत एक गिफ्ट कार्डही होतं.

“हे काय आहे? आणि कशाला?” ती गोंधळली.
“ही आमची इंडियन मिठाई आहे. घरी घेऊन जा. या आठवड्यात आम्हा भारतीयांचा मोठा सण होता, दिवाळी - फेस्टिवल ऑफ लाईट्स.”
“दि वा ली!” नाव रिपीट करत जेनिफर म्हणाली,” काय करता तेव्हा तुम्ही?”
त्यांनी तिला सांगितलं - दिव्यांची रोषणाई, फराळ, फटाके, नातेवाईकांना, मित्रपरिवाराला भेटणं.
“मग तुम्ही इथं काय केलं?”
“इथं काय करणार?” एक छोटासा सुस्कारा टाकून वडील म्हणाले,” संदीप आणि दीपाला सुट्टी नाही. या भागात तर फारसे इंडियन्सपण नाहीत. दिवसभर घरी आम्ही दोघेच! दीपा आणि तिच्या आईनं थोडा फराळ केला, घरीच छोटीशी पूजा केली. तुमचा हॅलोवीनपण आहे ना आता, मग आम्ही हॅलोवीनच्या भोपळ्यांत दिवाळीच्या पणत्या लावल्या. इंडियन अँड अमेरिकन फ्यूजन!” ती हसली.

दीपाची आई वडिलांना काहीतरी म्हणाली. ते जेनिफरला म्हणाले, “दीपाची आई विचारते की हॅलोवीनला असं भुताखेतांचं डेकोरेशन का करतात?”

ते बायकोचा नावानं उल्लेख करत नव्हते याची जेनिफरला गंमत वाटली. ती तिच्या सावत्र वडिलांनासुद्धा नावानं हाक मारायची.

“मला माहीत नाही! पण थँक्स फॉर द कार्ड! मी मिठाईसुद्धा नक्की खाईन”, ती हसून म्हणाली. गोलाकार माना डोलावून ते दोघं अगदी समाधानानं हसले. जेनिफरला का कोण जाणे, बरं वाटलं आणि थोडंसं वाईटही वाटलं - भारतातल्या सगळ्या गजबजाटाला सोडून या वयात एकटेच इतक्या लांब आलेले हे दोघे!

“तुम्ही दिवसभर काय करता इथं?” तिनं विचारलं.
“सध्या फक्त बाळाची वाट बघतोय,” वडील हसत म्हणाले,” हे दोघे दिवसभर बाहेरच असतात. संदीप फुलटाईम जॉबबरोबर पार्टटाइम एमबीए करतोय. त्याचे ऑफिसनंतर संध्याकाळी क्लासेस असतात. दीपाला नोकरी जमेल तितके दिवस चालू ठेवायची आहे. तिच्याकडं वर्क व्हिसा नाही; पण डिपेंडंट व्हिसावर तुमच्या सरकारच्या कृपेनं काम करता येतंय, तर जमेल तितका अनुभव घ्यायचाय म्हणते. दोघे इतके कष्ट करतात की आम्हांलाच कसंतरी होतं. एकतर आम्ही सगळे तिकडं सातासमुद्रापलीकडं भारतात. इथं दोघांनाच सगळं नव्यानं उभं करावं लागतं! पण ते म्हणतात हेच तर वय आहे, जास्त शिक्षण आणि अनुभव घ्यायचं. बघू या, एकदा बाळ झालं की सगळं बदलून जाईल.”

ती निघाली तेव्हा वडिलांनी फ्रीजवर लावलेल्या कॅलेंडरकडं बघत तिला विचारलं, “आता पुन्हा कधी येणार?”
“नेहमीसारखं दोन आठवड्यांनी”, ती म्हणाली.
ते अजूनही कॅलेंडरकडं बघत होते, “म्हणजे २६ तारखेला का?”
“मला बघावं लागेल, कारण मला ते कॅलेंडर कळत नाही”, ती हलकेच हसत म्हणाली.

बाबा क्षणभर थांबले आणि मग लक्षात आल्यावर मोठ्यानं हसायला लागले. फ्रीजवर लावलेलं कॅलेंडर इंग्रजी नव्हतं, तर त्यांच्या भाषेतलं होतं. तिच्याशी बोलताना त्यांना ते लक्षातच आलं नव्हतं. त्यांनी आईला बोलावून हा किस्सा सांगितला. ते दोघे पुन्हा जोरजोरात हसले.

दोघे तिला दारापर्यंत सोडायला आले. ती थांबली असती तर त्यांना तिच्याशी अजूनही बोलत बसायला आवडलं असतं, असं तिला वाटलं.

आणि मग पुढच्या आठवड्यात तिला दीपाचा मेसेज आला, मुलगा झाला म्हणून. सोबत काही फोटोही पाठवले होते. हॉस्पिटलच्या कपड्यां मध्ये मुलाला जवळ घेतलेली दीपा, मुलाला मांडीवर घेतलेले तिचे आईबाबा आणि मागं उभे असलेले दीपा आणि संदीप. मुलगा म्हणजे नुसता गोड गुबगुबीत मांसाचा गोळाच होता. दीपानंं लिहिलं होतं - आता रुटीन स्थिरस्थावर व्हायला पुढचे चारपाच आठवडे जातील. त्यानंतरच ये.

याच सुमारास राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका झाल्या. खरं तर जेनिफरची मतदानाची पहिलीच वेळ, पण तिला त्यात काहीच रस नव्हता. तिला ते सगळं प्रचाराचं आक्रमक वातावरण नकोसं व्हायचं. ती मतदानाला गेलीही नाही. सगळ्यांचा अंदाज असाच होता की सत्ताधारी पक्षाची उमेदवार जिंकणार. मतमोजणी सुरू झाली आणि रात्र चढत गेली तसा विरोधी पक्षाचा उमेदवार आगेकूच करत गेला आणि मध्यरात्री चक्क त्यानं निवडणूक जिंकली, असं घोषित झालं. तिचे वडील आणि भाऊ जाम खूश होते. एकंदरच त्या भागातल्या लोकांमध्ये आशेचं वातावरण पसरलं होतं. भाऊ एकदा तिच्याशी बोलताना म्हणाला, “आता कशाला जातेस त्या इंडियन लोकांकडं? त्यांना सांग आता इथं रहायचं असेल, तर काही आवाज न करता नीट रहा म्हणून. नाहीतर जिथून आलात तिथं परत जावं लागेल! आता बघ सगळं कसं बदलतं ते. हे नवीन सरकार लाळघोटू नाहीये!”

महिन्याभरानं दीपाचा मेसेज आला- क्लिनिंगला यायला सुरुवात कर म्हणून. त्याप्रमाणं ती गेली. दीपाची आई किचनमध्ये काम करत होती आणि बाबा आवराआवरी करत होते. तिला आईनं खालचं क्लिनिंग सुरू करायला सांगितलं आणि आवाज कमी ठेवायला सांगितलं, कारण वर बाळाचं फीडींग चालू होतं. यावेळी आई तिच्याशी मोडक्या-तोडक्या इंग्लिशमध्ये बोलत होती. बाबाही गडबडीत दिसत होते. काही आठवड्यांपूर्वी काहीशा हरवल्यासारखा वाटणाऱ्या दोघांच्या हालचालींमध्ये आता एकदम आत्मविश्वास आणि जबाबदारी डोकावत होती. थोड्या वेळात दीपा वरून खाली आली. जेनिफरनं तिचं अभिनंदन केलं. बाळ वर झोपलं होतं. दीपा आणि तिची आई काहीतरी हलकेच बोलल्या आणि आईनं डायनिंग टेबलकडं बोट दाखवून दीपाला बसायला सांगितलं. ती बसल्यावर तिच्या समोर एक भरलेली डिश आणि पाण्याचा ग्लास ठेवला.

दीपा जेनिफरकडं बघून हसून म्हणाली, “ माय मदर वाँट्स मी टू इट लाईक अ पिग!”

तिचे बाबा आणि जेनिफर हसले. आईला ते आवडलं नसावं. ती दीपाशी पुन्हा काहीतरी बोलू लागली. आपला ज्याच्यावर जीव आहे, अशा व्यक्तीला प्रेमानं दटावताना जसं बोलावं तसं काहीतरी ती दीपाशी बोलत होती. जेनिफरला अचानक तिची आई आठवली. शाळेतून घरी आल्यावर तिला काहीतरी खाऊन घ्यायचा आग्रह करणारी, होमवर्क कर म्हणून मागं लागणारी, छोट्याछोट्या गोष्टींना घाबरणारी तिची आई… अचानक एका दिवशी उभ्या-उभ्या कोसळून गेली होती. बऱ्याच दिवसांनी आज तिला आईची आठवण आली होती.

दीपाच्या आईच्या बोलण्यात एक शब्द सारखा येत होता. न राहवून जेनिफरनं विचारलं, “एक्स्क्यूज मी, पण ‘माहेर’ म्हणजे काय?”

“मुली जिथं जन्मतात, वाढतात त्याला आम्ही त्यांचं माहेर म्हणतो आमच्या भाषेत. आई मला ऐकवते आहे, की भारतात असते तर मी डिलिव्हरीसाठी माहेरीच गेले असते आणि तिनं माझी याहीपेक्षा जास्त काळजी घेतली असती. इथं तिला सगळ्याच गोष्टी हव्या तशा करता येत नाहीत. तर ती जे सांगते आहे, ते मी निमूटपणे ऐकावं.” दीपा म्हणाली.

“म्हणजे तुम्ही तिचं माहेर बरोबर घेऊन इथं आलात”, जेनिफर आईला म्हणाली. आई एकदम खूश झाली आणि तिनं जोरजोरात मान डोलावली.
“टू गुड जेन, तू आईला इम्प्रेस केलेलं आहेस!” दीपा हसत म्हणाली.
“तुझ्या आईला समजतील माझ्या भावना”, दीपाची आई मोडक्या इंग्लिशमध्ये तिला म्हणाली.
“माझी आई मी शाळेत असतानाच गेली”, ती म्हणाली.

क्षणभर दीपाची आई गोंधळली, पण तिनं एकदम पुढं येऊन जेनिफरच्या पाठीवरून हात फिरवला. जेनिफरच्या डोळ्यात का कोण जाणे, पण पाण्याचा एक थेंब उभा राहिला. ती हसली आणि तिनं उरलेलं काम करायला सुरुवात केली.

इतक्यात वरून बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू यायला लागला. दीपा अजूनही जेवत होती. तिचे बाबा पटपट जिना चढून वर गेले.

“किती दिवस सुटी आहे तुला?” जेनिफरनं दीपाला विचारलं.
“आठ आठवडे तरी आहे. पुढं बघू. संदीपला तर जेमतेम आठवडा मिळाला पॅटर्निटी लीव्ह म्हणून. आईबाबा आहेत म्हणून खूप मदत होतेय. मी अजून डिपेंडंट व्हिसावर आहे. सध्यातरी त्यावर जॉब करायला परवानगी आहे, नवीन सरकारनं ते नियम बदलले तर घरीच बसावं लागेल.”

जेनिफर काहीच बोलली नाही. बाबा बाळाला घेऊन खाली आले. टुकूटुकू डोळे उघडून ते आजूबाजूला बघत होतं.

“हा बघा नील, आमच्या घरातला पहिला यूएस सिटिझन!” बाबा तिला म्हणाले. व्हिसा, सिटिझनशिप या गोष्टींचा विचार करायची तिच्यावर कधी वेळच आली नव्हती. पण या गोष्टी या लोकांसाठी किती महत्त्वाच्या होत्या, ते तिला जाणवत होतं.

नील आजोबांच्या कडेवर थोडा चुळबुळायला लागला. दीपाने जेनिफरला विचारलं, “तुला घ्यायचंय का त्याला? फक्त हात धुवून घे.”

जेनिफरनं त्याला दोन्ही हातांमध्ये घेतलं. जेमतेम काही आठवड्यांचा तो छोटासा जीव तिच्याकडं डोळे बारीक करून पाहू लागला. तीही त्याच्याकडं बघत राहिली. त्याचा इवलुसा चेहरा, छोटेसे हात, नाजुकसे पाय, त्याच्या अंगाला येणारा गोड वास. तिच्या सर्वांगातून एक सुखद शिरशिरी दौडत गेली. तोही तिच्या हातांमध्ये मस्त विसावला आणि तोंडानं आवाज करू लागला.

“अरे वा! तू आवडलीस त्याला! आता माझी बेबीसिटिंगची काळजी मिटली,” दीपा हसत म्हणाली. जेनिफर तिच्याकडं बघून हसली. नकळत तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. तिच्या सावत्र वडिलांबरोबर आणि भावाबरोबर राहताना तिला त्रास असा काहीच होत नव्हता, पण कुटुंबातल्या मृदू, निर्व्याज प्रेमाच्या आणि मायेच्या सौम्य, सुखद जाणिवेला ती बरीच वर्षं पारखी झाली होती.

प्रधानांच्या त्या उबदार आणि प्रकाशानं भरलेल्या घरातून ती बाहेर आली, तेव्हा बाहेर अंधार पडला होता. गार वारं सुटलं होतं. तिनं जॅकेटची झिप लावली आणि ती गाडीकडं चालू लागणार इतक्यात सायरन वाजवत पोलिसांची एक गाडी आली आणि प्रधानांच्या घरासमोरच थांबली.

---

कॉन्फरन्स सेंटरचा पार्किंग लॉट चांगलाच भरला होता. जेनिफरला मागच्या बाजूला कशीबशी एक जागा मिळाली. तिथं गाडी पार्क करून ती दारातून आत शिरली. एका खोलीच्या बाहेर संदीपचं नाव असलेला बोर्ड होता. काहीशा अनिश्चित मनानं दार उघडून ती आत शिरली.

ती खोली म्हणजे एक मोठा हॉल होता. सुमारे दोन-अडीचशे लोक बसायची क्षमता असलेला. एका टोकाला छोटंसं स्टेज आणि पोडियम होतं. मागं संदीपचा मोठा फोटो लावला होता. एक अमेरिकन माणूस बोलत होता. हॉल खचाखच भरला होता. काही लोक उभे होते. जेनिफर हळूच एका कोपऱ्यात जाऊन उभी राहिली. संदीपच्या फोटोवर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं: कॅण्डललाईट व्हिजिल इन मेमरी ऑफ संदीप प्रधान. हेट कान्ट विन!

बोलणारा माणूस गंभीर आवाजात सांगत होता, “मी संदीपचा मॅनेजर असलो, तरी आमचं नातं मैत्रीचं होतं. बरेच लोक पैशासाठी नोकरी करतात, संदीपही करायचा. पण त्याला या भागातल्या लोकांनी नवनवीन स्किल्स शिकावीत याबद्दल मनापासून तळमळ होती. ज्ञानानं माणसाच्या जीवनात फरक पडू शकतो, यावर त्याचा विश्वास होता. भारतात अगदी सामान्य परिस्थितीत जन्माला येऊन तो इथवर पोचला होता, ते निव्वळ त्याच्या अधिकाधिक ज्ञान मिळवायच्या तळमळीमुळंच…”

हॉलमधले सगळे लोक शांतपणे ऐकत होते. काही लोक डोळे पुसत होते. जेनिफरनं डोळे मिटले आणि परवाची संध्याकाळ तिच्या मिटल्या डोळ्यांसमोर उभी राहिली.

प्रधानांच्या दारासमोर थांबलेल्या पोलिसांच्या गाडीतून उतरलेल्या पोलिसानं जेनिफरला बघून काहीशा आश्चर्यानं विचारलं होतं, “तू राहतेस इथं?”
“नाही, मी इथं क्लिनिंगला येते. घरातले लोक आत आहेत”, असं म्हणून ती गाडीत बसून निघाली होती. प्रधानांकडं पोलिस का आले असावेत, याचं तिला आश्चर्य वाटलं होतं; पण घरी येईपर्यंत ती ते विसरून गेली होती. ती घरात आली तेव्हा भाऊ बिअर पीत टीव्ही बघत बसला होता.

“ही न्यूज बघितलीस का? तुझ्या त्या इंडियन माणसाला डाउनटाऊनमध्ये कुणीतरी गोळ्या घालून मारलं”, तो सहजपणे एक सिप घेत म्हणाला.

तिनं पाहिलं तर टीव्हीवर चक्क संदीपचा फोटो होता आणि न्यूज झळकत होती: “इंडियन इमिग्रंट शॉट डेड ऍट अ डाउनटाऊन ग्रोसरी स्टोअर.”
ती मटकन खालीच बसली “संदीपला? पण का?”
“काय माहीत? कुणीतरी गोळ्या घातल्या आणि तो पळून गेला. पोलीस त्याच्या मागावर आहेत…”
“अरे पण? संदीपनं काही गुन्हा केला होता का? त्या माणसाचं काही नुकसान केलं होतं का?” तिला काही कळतच नव्हतं.
“ते पोलिसांनी त्याला पकडल्यावरच कळेल. बट ऍज फार ऍज आय नो, ही जस्ट हेटेड इमिग्रंट्स! मी तुला सांगितलं होतं, या बाहेरच्या लोकांनी आता जपून राहिलं पाहिजे!” तिचा भाऊ बिअर रिकामी करत म्हणाला आणि उठून आत निघून गेला.

जेनिफर टीव्हीसमोर सुन्न बसून राहिली. टीव्हीवर याचंच कव्हरेज दाखवत होते. कुणीतरी सेलफोनवर शूटिंगचा व्हिडिओ घेतला होता, तो लूपमध्ये सुरू होता. संदीप ग्रोसरी स्टोअरमधून काहीतरी घेत असताना त्या माणसानं त्याला धमकावायच्या सुरात विचारायला सुरुवात केली होती, “तू या देशात कायदेशीरपणे राहतोयस का? का तुला इमिग्रेशन ऑथॉरिटीजकडे रिपोर्ट करू?” संदीपनं दुर्लक्ष केलं होतं. तो माणूस भडकला होता आणि सरळ बंदूक काढून त्यानं, “यू इमिग्रंट, यू फ*ग आयसिस, गो बॅक टू युवर कंट्री!” असं म्हणत संदीपला गोळ्या घातल्या होत्या. मग स्टोअरमध्ये हलकल्लोळ माजला होता आणि तो माणूस पसार झाला होता. पोलीस आले होते. ऍम्ब्युलन्स आली होती. तेव्हा संदीपकडं नेमका फोन नव्हता, पण त्याच्या ड्रायविंग लायसन्सवरचा पत्ता बघून पोलिसांची एक गाडी त्याच्या घरी गेली होती. हॉस्पिटलच्या वाटेवरच संदीप मरण पावला होता.

थोड्या वेळानं तो माणूस शहरापासून तासभर अंतरावर एका बारमध्ये पकडला गेला. त्याच्या प्राथमिक चौकशीतून काही गोष्टी बाहेर आल्या: सुमारे पन्नाशीचा हा माणूस संदीपला ओळखत नव्हता, संदीपनं त्याचं प्रत्यक्षात काहीही वाकडं केलं नव्हतं, संदीप कुठल्या देशाचा नागरिक आहे हे त्याला माहीत नव्हतं. ज्या बारमध्ये तो पकडला गेला, तिथल्या एका माणसाला त्यानं ‘मी एका इराणियन माणसाला मारून आलोय’ असं सांगितलं होतं. तो एकटाच रहायचा. अलीकडेच त्याचा घटस्फोट झाला होता आणि तेव्हापासून त्याची मनःस्थिती ठीक नसायची. तो खूप दारू प्यायला लागला होता, सारख्या नोकऱ्या बदलायचा वगैरे.

पण हे सगळं त्याला संदीपला मारायचा अधिकार कसा देतं? जेनिफरला समजत नव्हतं. ज्याचं नावगाव माहीत नाही, ज्यानं आपल्याला काही त्रास दिलेला नाही, त्याला सरळ ठारच करायचं? युद्धात सैनिक शत्रूच्या अनोळखी सैनिकांना मारतात, पण तेव्हा त्यांना काहीतरी कारण असतं. इथं तर तेही नव्हतं. आपण ज्याला मारतोय त्याच्या स्वप्नांचा, महत्त्वाकांक्षांचा एका क्षणात चुराडा होतो, त्याच्या परिवारातले लोक त्याला कायमचे हरवून बसतात, हे लक्षात येत नाही? राहून राहून तिनं प्रधानांच्या घरी घालवलेली प्रसन्न संध्याकाळ तिच्या डोळ्यांसमोर येत होती आणि तिला पोटात ढवळून आल्यासारखं होत होतं. एक असह्य अस्वस्थता आणि तगमग तिच्या मनाला व्यापत होती. तिनं कधी नव्हे ते तिच्या वडिलांशी, जवळच्या काही मैत्रिणींशी याबद्दल बोलायचा प्रयत्न केला. शूटिंगची बातमी सगळ्यांना कळली होती. त्यात मारला गेलेला माणूस ती कामाला जायची त्या घरातला होता, हे कळल्यावर त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं, त्याच्या परिवाराची तिच्याकडं किरकोळ चौकशी केली होती…पण तेवढंच! त्यापलीकडं त्यांना या घटनेनं अस्वस्थ केलं नव्हतं. अर्थात तिचा प्रधानांशी जसा संबंध आला होता, तसा त्यांचा आला नव्हता हे खरं होतं. जर प्रधानांची आणि जेनिफरची ओळख व्हायच्या आधी ही घटना घडली असती, तर तिनं याकडं किती लक्ष दिलं असतं? राहून राहून हाही प्रश्न तिला खात होता. मधूनच त्या खुन्याच्या जागी तिला तिचा चेहरा दिसत होता. एक मात्र खरं होतं, या घटनेनं तिला तिच्या कोशातून बाहेर खेचून काढलं होतं आणि ती आता त्यात परत जाऊ शकली नसती. दुसऱ्या दिवशी तिनं स्थानिक बातम्यांत बघितलं की संदीपच्या स्मरणार्थ उद्या संध्याकाळी लोक जमणार आहेत, आणि तिनं तिथं जायचं ठरवलं.

हॉलमध्ये बसल्याबसल्या हा सगळा घटनाक्रम तिच्या मन:पटलासमोरून सरकत होता. समोर लोक येऊन बोलत होते. संदीपचे कलिग्ज आणि मित्र संदीप कसा चांगला एम्प्लॉयी होता, मित्र होता, माणूस होता हे सांगून गेले. शहराचा मेयर येऊन सांगून गेला; की ही घटना कशी लांच्छनास्पद होती, पण या शहरानं इमिग्रंट्सचं नेहमीच कसं स्वागत केलं आहे आणि संदीपसारख्या इमिग्रंट्सनी या शहराच्या विकासाला कसा हातभारच लावलेला आहे. कुणीतरी सांगून गेलं की संदीपच्या कुटुंबासाठी ‘गो फंड मी’ कॅम्पेन सुरू झालेला आहे आणि त्यात काही हजार डॉलर्स जमलेले आहेत. एक वकील सांगत होता की नवीन सरकार आल्यापासून इमिग्रंट्सविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये कशी वाढ झालेली आहे, त्यांच्यासाठी गोष्टी अवघड झालेल्या आहेत, पण त्यांना मदत करायला आम्ही सज्ज आहोत. एका वयस्कर भारतीय बाईनं सांगितलं की शेवटी द्वेष प्रेमावर कधीही विजय मिळवू शकत नाही. आणि काही झालं तरी अमेरिका हे जगभरातल्या लोकांसाठी नेहमीच आशेचं आणि प्रेमाचं प्रतीक राहील…

जेनिफरला पुन्हा प्रश्न पडला. नक्की काय खरं? परवाच्या खुनी माणसाचा आंधळा द्वेष आणि तिच्या आजूबाजूच्या लोकांची त्याबद्दलची उदासीनता खरी, की या हॉलमध्ये दिसणारा इमिग्रंट्सबद्दलचा आपलेपणा, तळमळ आणि आदर खरा? दोन दृष्टिकोणांत इतका फरक कशामुळे असू शकतो? की ही दोन जगं वेगळीच आहेत? मग ती इतकी वेगळी का आहेत?

पुढच्या रांगेतून दीपा उठली आणि सगळ्यांना म्हणाली, ”तुम्ही सगळे इथं आलात त्याबद्दल आभार. सगळ्यांच्या मदतीबद्दल, सांत्वनाबद्दल आभार. संदीप व्हायोलिन खूप सुंदर वाजवायचा. प्रत्येकानं एखादं तरी वाद्य शिकावं, असं तो नेहमी म्हणायचा. या कार्यक्रमाची सांगता त्याच्या व्हायोलिनवादनाच्या क्लिपनं व्हावी अशी माझी इच्छा आहे.” तिच्या डोळ्यांतली, बोलण्यातली हसरी चमक पूर्ण विझून गेली होती. ती शांतपणे बोलायचा प्रयत्न करत होती, पण तिच्या आवाजातला कंप लपू शकत नव्हता.

कुणीतरी प्रोजेक्टर सुरू केला आणि हॉलच्या एका भिंतीवर व्हिडिओ दिसू लागला. प्रधानांच्या घरातला एखाद्या गेटटुगेदरचा व्हिडिओ असावा. संदीप अतिशय तन्मयतेनं व्हायोलिन वाजवत होता. आजूबाजूला बसलेले दहाएक लोक ऐकत होते. शेजारी बसलेली दीपा कौतुकानं त्याच्याकडं बघत होती. अलीकडचाच व्हिडिओ असणार, कारण तिचं पोट चांगलंच दिसत होतं. व्हिडिओ शूट करणारा माणूस कॅमेरा जसजसा फिरवत होता, तशा जेनिफरला प्रधानांच्या घरातल्या ओळखीच्या गोष्टी दिसत होत्या. सोफा, काचेची शोकेस, डायनिंग टेबल, दीपाचं जास्तीच्या मसाल्यांचं कपाट, देवघर…. हॉलमध्ये शांतता होती, संदीपच्या व्हायोलिनचे करुणगंभीर सूर वातावरणात भरून राहिले होते. त्याचा परिणाम म्हणून की काय, पण जेनिफरच्या मनात दोन दिवस साठलेल्या उद्वेगाला जणू वाचा फुटली आणि ती स्फुंदून स्फुंदून रडायला लागली. पण हॉलमध्ये रडणारी ती एकटीच नव्हती. संदीप व्हायोलिन वाजवत राहिला आणि तिच्या मिटलेल्या डोळ्यांतून गालांवर अश्रू ओघळत राहिले.

कार्यक्रम संपल्यावर ती पुढं गेली. दीपा कुणाशीतरी बोलत होती. जेनिफरला बघून क्षणभर तिच्या डोळ्यांत आश्चर्याचे भाव उमटले. ती तिच्याकडं चालत आली आणि तिनं जेनिफरचे हात हातात घेतले.
“जेन, तू आलीस? थँक यू सो मच!”
“आई बाबा कुठं आहेत?” जेनिफरला पटकन काय बोलावं कळलं नाही.
“घरी नीलला सांभाळतायत.”
तिला अजूनही पुढं काय बोलावं कळेना. “आय ऍम सॉरी, दीपा”, ती कसंबसं इतकंच बोलू शकली.

दीपानं मान हलवली आणि ती शांतपणे म्हणाली, “मी परत चाललेय, जेन. संदीपचे अंत्यविधी भारतात करायचे आहेत आणि नील खूप लहान आहे. आता थोडे दिवस तरी घरी आपल्या माणसांत रहावं असं वाटतंय. पुन्हा परत येईन की नाही, आले तर कधी आणि कुठं येईन...आत्ता काहीच सांगू शकत नाही. याच भागात आले, तर तुझ्याशी संपर्क साधेन.”

म्हणजे प्रधानांच्या घराशी असलेला तिचा संबंध आता संपला होता. तिला पुन्हा एक हुंदका आला आणि तिनं दीपाला मिठी मारली.

“तुला एक सल्ला देऊ, जेन?” दीपा तिच्या डोळ्यांत बघत म्हणाली, “तू कॉलेजमध्ये ऍडमिशन घे. तू तरुण आहेस, हुशार आहेस, संवेदनाशील आहेस. तुझ्यासारख्या लोकांची आज जगाला गरज आहे. पण या सगळ्याला डोळस ज्ञानाची जोड मिळू दे. त्यामुळं आपला दृष्टिकोण बदलून जातो आणि हातून जे बरंवाईट काम व्हायचंय, ते निदान आंधळेपणानं होत नाही. मी तुला असं सांगतेय हे संदीपला आवडलं असतं!”

जेनिफरनं दीपाकडं पाहिलं आणि हळूच मान डोलावली. त्या दोघींनी पुन्हा मिठी मारली आणि जेनिफर दीपाकडं पाठ फिरवून हॉलच्या दाराच्या दिशेनं चालू लागली.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (4 votes)

प्रतिक्रिया

कथा खूप आवडली. या विषयावर मराठीतील बहुधा पहिलीच कथा असावी असे वाटते. समजा तशी नसली तरीही लिखाण बाकी उत्तम. सर्व कंगोरे नीट हाताळले आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जबरदस्त आहे कथा.

सर्व कंगोरे नीट हाताळले आहेत. >> +१

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वेगळ्या दृष्टिकोनातून लिहिली आहे, आणि तरीही योग्य संतुलन ठेवून.
खूप original वाटली कथा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कथा आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

लेखन उत्तम जमलंय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अलिकडच्या काळात, अशा बऱ्याच बातम्या वाचल्या होत्या. त्या सगळ्या दु:खद बातम्यांची आठवण झाली. कथा उत्तम तऱ्हेने हाताळली आहे. अत्यंत संतुलित!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उत्कृष्ट, संतुलित लिखाण. दोन्ही बाजूंच्या भावनिक कल्लोळाची मांडणी अत्यंत उच्च. मन:पूर्वक धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अपेक्षित वळणाची असली; तरी संयत आणि बारकावे टिपणारी कथा.
सध्या 'हिलबिली एलेजी' हे रस्ट बेल्टातच घडणारे आत्मचरित्रात्मक पुस्तक वाचतो आहे - त्या पार्श्वभूमीवर कथा अधिकच आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कथेतल्या जेनिफरच्या दृष्टिकोनातून टिपलेले बारकावे आणि त्यांची मांडणी आवडली. इतर संस्कृतींचे डोळे वापरून आपल्या संस्कृतीकडे पाहाणं कठीण असतं. मात्र आपल्या संस्कृतीच्या गोष्टी माहीत असल्यामुळे त्यात एक प्रकारची प्रेडिक्टिबिलिटी येते. दुसरं म्हणजे मला तरी स्वतःला जेनिफरच्या जागी ठेवता आलं नाही. ही कथा इंग्लिशमध्ये, अमेरिकन वाचकावर अधिक परिणाम करू शकेल असं वाटतं. यातून कथेच्या शक्तीबद्दल काही म्हणायचं नसून वाचकांच्या सांस्कृतिक पार्श्वभूमीबद्दल टिप्पण आहे.

अजून लिहीत जा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कथा बरी आहे. बरीच सरधोपट मांडणी वाटली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

मस्त कथा. हे अब्रोडसाहित्यही मराठी साहित्यात स्थिरावू (सगळे सारस्वत परदेशी गेल्याने?) लागलं असल्याकारणाने 'नवीन' म्हणता येणार नाही. पण बारीक बारीक बारकावे, लोकांच्या भावना उत्तमरीत्या अधोरेखित केलेल्या आहेत. सध्याच्या ज्वलंत विषयाला हात घालून तो कसबाने हाताळला गेलेला आहे, ह्याबद्दल लेखका/लेखिकेला अनेक धन्यवाद. त्यांनी ह्याच प्रकारात अजून लिखाण करावं, ह्यात खूप नावाजलं जाण्याची, गाजण्याची क्षमता आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is for sissies.

कथेबद्दलच्या मौलिक अभिप्रायाबद्दल ऐसी च्या दिग्गज लोकांचे आभार! कथा लिहिताना जेवढा त्रास झाला तेवढाच आनंदही मिळाला. इंग्रजीमध्ये रूपांतर करण्याची सूचना अजून एका व्यक्तिनंही केली होती- नक्कीच विचार केला पाहिजे. अंकांच्या भाऊगर्दीत ऐसी चा अंक नेहमीच उठून दिसणारा असतो. २०१६ मध्ये अंतर नावाची अशीच 'अब्रोडकथा' ऐसी साठी लिहिली होती. त्यानंतर पुन्हा ही संधी मिळाल्याचा आनंद आहे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कथा आवडली

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुरेख आहे कथा! मन हेलावून गेली !!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कथा सरळसोट, थेट, अपेक्षानुसारी आहे.
अनेकदा कसलीही लेखकगिरी न केल्याने कथेतून निव्वळ सांगायच्या सूत्रावर वाचक सतत चालत राहतो, तसे माझे झाले; जे मला आवडले.
लिहीत राहावे, ही विनंती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0