मराठेशाहीची सातासमुद्रापार मुत्सद्देगिरी

संकीर्ण

मराठेशाहीची सातासमुद्रापार मुत्सद्देगिरी

- बॅटमॅन

[ या लेखातील बहुतांश माहिती प्रो. मायकेल फिशर यांच्या Counterflows to Colonialism: Indian Travellers and Settlers in Britain, 1600-1857 या पुस्तकावर आधारित आहे. हा लेख लिहिण्याची परवानगी दिल्याबद्दल त्यांचे अनेक आभार. त्यांची परवानगी नमूद करणे आवश्यक आहे.]

रघुनाथराव ऊर्फ राघोबादादा हे पेशवाईतले एक बहुचर्चित आणि तितकेच वादग्रस्त व्यक्तिमत्त्व! अटकेपार स्वारी, नारायणराव पेशव्यांचा खून आणि बारभाईंचे कारस्थान या गोष्टींइतकीच राघोबांशी संबंधितअजून एक रोचक गोष्ट आहे. इंग्रजांच्या मदतीने पेशवेपदी स्वत:ची नियुक्ती करण्यासाठी त्यांनी तिघाजणांचे एक शिष्टमंडळ इ.स. १७८० साली इंग्लंडला पाठवले होते. रंगो बापूजींच्याही साठसत्तर वर्षांअगोदर मराठेशाहीच्या वतीने इंग्लंडला गेलेले हे सर्वांत पहिले शिष्टमंडळ होय.

आता सातासमुद्रापार इंग्लंडपर्यंत आपला प्रतिनिधी पाठवण्याची गरज राघोबादादांना का भासली असावी? नारायणराव पेशव्यांचा खून करून इ.स. १७७३-७४ मध्ये पेशवेपद उपभोगल्यानंतर नाना फडणविसांच्या अध्यक्षतेखालील बारभाईंनी त्यांना पदच्युत केले. तेव्हापासून गेलेले पेशवेपद पुन्हा मिळवण्यासाठी राघोबादादा प्रयत्नशील होते. त्याकरिता इ.स. १७७५ सालीच मुंबईकर इंग्रजांसोबत त्यांचा करार झाला. या करारान्वये काही पैसे व प्रदेशाच्या बदल्यात ब्रिटिश त्यांना मदत करणार होते. परंतु कलकत्त्याहून गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्सने नापसंती दर्शवून हा करार मोडीत काढला. तरीही मुंबईकर इंग्रजांनी अगोदरच्या रद्द झालेल्या करारान्वये मुंबईजवळील साष्टी बेट आणि आसपासच्या प्रदेशाचा महसूल हडपला आणि राघोबांना आश्रयही दिला. त्यातूनच पुढे पहिले इंग्रज-मराठे युद्ध उद्भवले. अशातच इ. स. १७७६ साली राघोबादादांनी इंग्लंडच्या राजाला मदतीकरिता एक पत्रही पाठवले. पोर्तुगाल व फ्रान्स येथील राजांशीही पत्राद्वारे संपर्क साधला. पण पोकळ आश्वासनांपलीकडे हाती काही न लागल्याने राघोबांच्या लक्षात आले की भारतातले इंग्रज काही आपले ऐकत नाहीत तेव्हा त्यांचे मूळ स्थान इंग्लंडहून सूत्रे हलल्याखेरीज आपल्या मनासारखे होणार नाही.

शिष्टमंडळातील मुख्य राजदूत म्हणून मूळ राजापूरच्या हणमंतराव याची निवड करण्यात आली. त्याच्या दिमतीला मणियार रतनजी आणि त्याचा मुलगा कर्सेटजी मणियार हे दोघे पारशी पितापुत्र देण्यात आले. याआधी सुमारे पन्नासेक वर्षांपूर्वी इ.स. १७२४ मध्ये नवरोजी नामक पारशी व्यापाऱ्याने इंग्लंडला जाऊन ईस्ट इंडिया कंपनीकडून झालेल्या अन्यायाविरुद्ध यशस्वीरीत्या दाद मागितली होती, शिवाय ब्रिटिशांशी व्यापाराच्या निमित्ताने पारशी समाजाचा जवळचा संबंध होता. त्यामुळे दोघा पारशी पितापुत्रांची निवड स्वाभाविक होती. पण हणमंतरावाला ब्रिटिशांचा विशेष अनुभव नव्हता, इंग्लिशही येत नव्हते. परंतु इतर राजवटींचे अयशस्वी अनुभव पाहता अशा मोहिमेचे नेतृत्व कुणा ब्रिटिशाकडे देण्यापेक्षा स्वकीय माणसाकडे देणे श्रेयस्कर, अशा विचाराने हणमंतरावाची निवड झाली असावी.

राघोबा
राघोबादादांनी हणमंतरावाकडे इंग्लंडचा तत्कालीन राजा जॉर्ज तिसरा याला उद्देशून लिहिलेले एक पत्र दिले. त्यात त्यांनी ब्रिटिश प्रतिनिधी आपले ऐकत नसल्यामुळे आपले गाऱ्हाणे खाशांच्या कानावर घालण्याकरिता तिघांना पाठवत असल्याचे नमूद केले होते. हे पत्र घेऊन इ.स. १७८०मध्ये हणमंतराव, मणियार आणि कर्सेटजी काही नोकरांसोबत मुंबईहून एका जहाजातून इंग्लंडला जाण्यासाठी निघाले. पुढे सत्तावीस दिवसांनी येमेन देशातील मोखा येथे ते थांबले. तिथून मार्गक्रमणा करीत ते सौदी अरेबिया येथील जेद्दा येथे थांबले. तिथल्या सुभेदाराने जहाजावरील सामानाच्या झडतीकरिता तिघांनाही एका खोलीत दोनतीन दिवस ठेवले. त्या कालावधीत त्यांना दिलेल्या जेवणाचा पारशांनी समाचार घेतला, परंतु हणमंतरावाने मात्र कशालाही तोंडसुद्धा लावले नाही. जेद्दाच्या सुभेदाराला खूप आश्चर्य वाटले. अखेरीस मराठी बोलता येणाऱ्या तेथील एका मुलाकरवी हणमंतरावाने त्याला सांगितले की धर्माज्ञेमुळे त्याला परधर्मीयांनी रांधलेले अन्न खाता येणार नाही. अखेरीस त्याच्यासाठी एक वेगळा तंबू उभारण्यात आला आणि तिथे हणमंतरावाने स्वहस्ते रांधून अन्न खाल्ले. याअगोदर त्याने जहाजावरचे अन्न न खाता भारतातून आणलेले भोपळे इत्यादींवरच गुजराण केली. मजल दरमजल करीत शिष्टमंडळ तिथून जहाज इत्यादी बदलून इटली येथील लिव्होर्नो इथे पोचले. लिव्होर्नोतील ब्रिटिश अधिकारी जॉन उडनी हा तिथून त्यांच्या सोबतीस आला ते इंग्लंडपर्यंत. त्यानेच इंग्लंडमध्ये त्यांची देखभाल केली. लिव्होर्नोहून फ्रँकफर्ट व ब्रसेल्सहून लंडनला इ. स. १७८१च्या जानेवारी महिन्यात ते पोचले असावेत.

इंग्लंडला पोचणे ही पहिली पायरी होती. त्यांची खरी कसोटी पुढेच लागणार होती. लंडनमध्ये गेल्याबरोबर शिष्टमंडळाने सर्वप्रथम ब्रिटिश परराष्ट्रखात्याशी संपर्क साधून आपल्या मोहिमेची कल्पना दिली. इंग्रज-मराठे युद्धातील बदलत्या समीकरणांशी परिचय नसल्याने पूर्वानुभवाच्या आधारावर याचा निर्णय करण्यासाठी त्यांनी शिष्टमंडळाला ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालक मंडळाकडे जाण्यास सांगितले. कंपनीच्या संचालक मंडळाने सिटी ऑफ लंडनजवळच इसलिंग्टनला त्यांची रवानगी केली आणि आपसात खलबते सुरू केली. आता इ. स. १७८० साली इंग्लंडमध्ये, त्यातही विशेषत: लंडनमध्ये भारतीय खलाशी व नोकरचाकर दिसणे ही अपूर्वाई नसली, तरी भारतीय राजेमहाराजांचे उच्चपदस्थ प्रतिनिधी तिथे येण्याचे क्षण विरळाच. याआधी भारतातून असे प्रतिनिधी फक्त एकदा आले होते, तेही चौदा वर्षांपूर्वी इ. स. १७६६ साली. त्यामुळे या शिष्टमंडळाने लंडनमधील अनेक उच्चभ्रू ब्रिटिशांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्याशी वाटाघाटी करण्यात ईस्ट इंडिया कंपनीने अशी टाळाटाळ करावी हे अनेकांना आवडले नाही. त्यांत प्रमुख एडमंड बर्क नामक संसदपटू, प्रसिद्ध लेखक आणि अतिशय प्रभावी असा राजकीय विचारवंत होता. बर्कने शिष्टमंडळाची आस्थेने विचारपूस केली. हणमंतरावाच्या अन्न, स्नानशौचादि नियमांबद्दल समजल्यानंतर त्याने लंडनहून पंचेचाळीस किलोमीटर अंतरावरील बीकन्सफील्ड या छोट्याशा गावी आपल्या हवेलीत त्याची रहायची सोय केली. तिथे हणमंतराव हिंदू रूढीनियमांचे पालन करून राहू लागला. मणियार व कर्सेटजी हे दोघे लंडनमध्येच राहिले.

बर्कमुळे एका अतिशय अनपेक्षित प्रकरणात या शिष्टमंडळाची वर्णी लागली. ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील - विशेषत: बंगालमधील - मनमानी कारभारावर अंकुश ठेवण्याकरिता ब्रिटिश पार्लमेंटच्या हाऊस ऑफ कॉमन्सची एक कमिटी स्थापन करण्यात आली होती. बर्क तिचा चेअरमन होता. कंपनीच्या कारभाराबद्दल आलेल्या तक्रारींचा परामर्श घेऊन त्यांचे निराकरण करणे, जरूर पडल्यास कंपनीच्या कायद्यांमध्ये बदल करणे असे त्या कमिटीच्या कामाचे स्वरूप होते. इ.स. १७७५ मध्ये बंगालमधील नंदकुमार नामक एका जमीनदाराला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली वॉरन हेस्टिंग्सच्या प्रेरणेने फाशी दिल्याचे प्रकरण तेव्हा खूप गाजत होते. नंदकुमार लोकप्रिय असल्याने या फाशीमुळे बंगालमध्ये खळबळ उडाली. त्याचे पडसाद लंडनपर्यंतही पोहोचले. हेस्टिंग्सवर खूप टीका झाली. त्यामुळे यापुढे भारतीयांच्या धार्मिक व सामाजिक नियमांचाही परामर्श अशा गोष्टींमध्ये घेतला पाहिजे असे या कमिटीचे मत पडले. अनायासे हणमंतराव तेव्हा लंडनमध्ये होताच. असा दुर्मिळ योगायोग जुळून आल्यामुळे हणमंतरावाला ब्रिटिश पार्लमेंटमध्ये या कमिटीपुढे हिंदू धर्माचे प्राथमिक यमनियम, धर्मशास्त्रे, इत्यादींबद्दल साधारण कल्पना देण्याकरिता बोलवले गेले. २६ फेब्रुवारी इ.स. १७८१ रोजी हणमंतरावाने त्यासंबंधात भाषण केले. इंग्लिश येत नसल्याने तो मराठीतच बोलला असावा असे परिस्थितीजन्य पुराव्याने म्हणता येईल. पुढे त्याचे इंग्लिश भाषांतर केले गेले असावे. यात त्याने हिंदू धर्मातील चार वर्ण, स्पृश्यास्पृश्य, दिवाणी व फौजदारी कायदे, वाळीत टाकणे, कर्जवसुली, इत्यादी अनेक गोष्टींबद्दल विवेचन केले. नंदकुमारला फासावर लटकवल्याबद्दल त्याने कंपनीवर टीका केली. नंदकुमार हा ब्राह्मण होता आणि हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे ब्रह्महत्या निषिद्ध होती. त्यातूनही खूप मोठा अपराध घडला तर शस्त्राने डोके उडवावे, परंतु फाशी देऊ नये अशी धर्मशास्त्रातील तरतूद असल्याने याविरुद्ध आचरण हणमंतरावाला साहजिकच रुचण्यासारखे नव्हते.

एडमंड बर्क
यामुळे कमिटीच्या कामकाजाला चांगली गती मिळाली. या आणि काही अशाच काही वाटाघाटींचा परिपाक म्हणून पुढे इ. स. १७८१ चा बंगाल ज्युडिकेचर ॲक्ट आणि १७८४चा पिट इंडिया ॲक्ट असे दोन कायदे पास करून अंमलात आणले गेले. यात भारतीयांच्या धार्मिक व सामाजिक रूढींचा विचार करून न्यायनिवाड्याची पद्धत सांगितली होती. अगोदरच्या कायद्यांत भारतीय समाजव्यवस्थेची साधी दखलही घेतली गेली नव्हती. आता या कायद्यांनुसार ब्रिटिशांच्या प्रभावाखालील क्षेत्रात भारतीयांना काही प्रमाणात तरी न्याय मिळणार होता. पुढे वॉरन हेस्टिंग्सवर त्याच्या भारतातील वर्तणुकीबद्दल खटला भरतानाही बर्कला हणमंतरावाच्या भाषणातून मिळालेल्या पुराव्याची अंशत: मदत झाली.

यानंतर ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालकांना शिष्टमंडळाची दखल घेणे भाग पडले. शिष्टमंडळाच्या प्रतिनिधींना त्यांनी निर्वाहभत्ता व घरभत्ता पुरवला. परंतु तरीही राघोबांना द्यायचे उत्तर तयार करेपर्यंत जून महिना उजाडला. ६ जुलै इ. स. १७८१ रोजी एक सीलबंद लखोटा शिष्टमंडळाला देण्यात आला. तेव्हा मणियार व कर्सेटजी यांनी लखोट्यातल्या पत्रातील मजकुराबद्दल पृच्छा केली. इतक्या लांबवर येऊन जर मोघम उत्तर मिळाले तर पूर्ण प्रवासच वाया गेल्यात जमा होता. त्यामुळे पत्रातील मजकूर समजणे शिष्टमंडळासाठी गरजेचे होते. परंतु कंपनीच्या संचालकांनी ते न ऐकता आठ दिवसांच्या आत इंग्लंडहून परत जाण्यास सांगितले. त्यामुळे मणियारने भडकून संचालकांना शिव्या दिल्या. त्यावर संचालकांनी दोघांना खोलीबाहेर काढून त्यांचा निर्वाहभत्ता थांबवण्याची तंबी दिली. बहुधा याची कल्पना असल्यानेच हणमंतराव या भेटीस उपस्थित राहिला नसावा. अशा धमक्या मिळूनही शिष्टमंडळाने इंग्लंडहून जाण्याची तयारी केली नाही. पुन्हा एकदा बर्क त्यांच्या मदतीला धावला. एका सार्वभौम राजाच्या प्रतिनिधींशी अशा प्रकारे वर्तणूक करणे ही कंपनीला बट्टा लावणारी गोष्ट असून, मणियारचे वर्तन योग्य नसले तरीही इंग्लंडची आतिथ्यशीलता त्यांच्या मनावर ठसावी याकरिता त्यांना काही भेटी देऊन सन्मानाने परत पाठवावे, असे त्याने नमूद केले. याखेरीज कंपनीच्या काही शेअरहोल्डर्सनीही या मुद्यावरून कंपनीला धारेवर धरले होते. त्यामुळे कंपनीच्या संचालकांनी शिष्टमंडळाला १००० पाउंड परतीच्या खर्चाकरिता देऊन १ ऑगस्ट १७८१ च्या आत इंग्लंडहून परत निघण्यास सांगितले. तरीही अजून इंग्लंडच्या राजाचे पत्र न मिळाल्यामुळे शिष्टमंडळ परतायला नाखूष होते. अखेरीस स्टेट सेक्रेटरी हिल्सबरोने राघोबांना उद्देशून एक पत्र लिहून शिष्टमंडळाला दाखवले. मोघम गोष्टींखेरीज त्यात काहीच नव्हते. त्याशिवाय बर्कने जॉर्ज राजाच्या मनातही या शिष्टमंडळाबद्दल अनुकूल भावना तयार केली. परिणामी सुमारे दोनशे पौंड किमतीच्या भेटवस्तू जॉर्ज राजातर्फे शिष्टमंडळाला देण्यात आल्या. वरखर्चासाठी अजून दोनशे पौंड दिल्यावर १५ ऑगस्ट इ.स. १७८१ रोजी शिष्टमंडळ परतीच्या मार्गाला लागले.

इंग्लिश खाडी ओलांडून ते ब्रुसेल्स, फ्रँकफर्ट आणि तिथून व्हेनिसला पोचले. सोबत पीटर मोलिनी नामक इंग्रजही होता. हणमंतराव आणि मणियार यांच्यात व्हेनिसहून भारतात कोणत्या मार्गे जायचे या प्रश्नावरून भांडणे झाली. व्हेनिसहून इजिप्तमधील अलेक्झांड्रिया, तिथून आलेप्पो व बसरामार्गे भारतात यायचे असे मणियारचे म्हणणे, तर तुर्कस्थानातील इस्कन्दरून मार्गे आलेप्पो व बसरा असे जावे हे हणमंतराव म्हणत होता. मणियार भडकून हणमंतरावाला मारणार एवढ्यात रिची नामक इंग्रजाने त्याला घट्ट घरून ठेवले. या भांडणांमुळे हणमंतराव आणि मणियार व कर्सेटजी हे दोघेही वेगवेगळ्या मार्गांनी प्रथम आलेप्पो इथे आले आणि तिथून बसरामार्गे वेगवेगळेच मुंबईला परत आले. राघोबांना भेटेपर्यंत इ.स. १७८२ सालचा उत्तरार्ध उजाडला. काही काळाने जॉर्ज राजाने पाठवलेल्या भेटवस्तूंच्या अकरा पेट्याही आल्या.

परत आल्यावर हणमंतरावाने समुद्र ओलांडल्याबद्दलचे प्रायश्चित्त घेतले. सोन्याची योनी तयार करून तीतून बाहेर येणे असे त्याचे स्वरूप होते. म्हणजेच तो प्रतीकात्मक पुनर्जन्म होय. सर्व प्रतिनिधी परत आल्यावर राघोबांनी प्रथम बर्कला त्याने केलेल्या सहाय्याबद्दल त्याचे आभार मानणारे पत्र पाठवले. बर्कने उत्तरादाखल भविष्यात अजून हिंदू प्रतिनिधी पाठवल्यास त्यांच्या धर्माप्रमाणे राहण्याची सर्व सोय केली जाईल असे वचनही दिले.

राजकीयदृष्ट्या पाहता शिष्टमंडळाचा हेतू आजिबात साध्य झाला नाही. इ.स. १७८२-८३ मधल्या सालबाईच्या तहान्वये इंग्रज-मराठे युद्ध संपले व राघोबांची पेशवेपदाची उरलीसुरली आशाही संपुष्टात आली. तरीही राघोबांनी जॉर्ज राजाला एक पत्र लिहून मदतीचे आवाहन केले. त्याचाही काही परिणाम झाला नाही. १७८३ साली राघोबाही मरण पावले.

तरीही या शिष्टमंडळाचा हा प्रवास अनेक प्रकारे ऐतिहासिक ठरला. ब्रिटिश संसदीय कमिटीपुढील भाषणाच्या माध्यमातून अनपेक्षितरीत्या हणमंतरावाने सर्वसामान्य भारतीयांना अनुकूल असा कायदा तयार करण्यात भरीव योगदान दिले. इतकेच नव्हे तर पुढे जवळपास एका शतकभराने बंगालमध्ये जेव्हा हिंदूंनी समुद्र ओलांडावा किंवा नाही याची मोठ्या प्रमाणावर चर्चा होऊ लागली, तेव्हा देशभरातून या विषयावर मते मागवण्यात आली. तेव्हा प्रसिद्ध लेखक व राजकीय नेते न्यायमूर्ती रानडे यांनी हणमंतराव व रंगो बापूजी यांच्या उदाहरणाद्वारे हे सिद्ध केले की हिंदू धर्माला समुद्रप्रवास वर्ज्य नाही.

इंग्लंडमध्ये गेलेला भारतातील पहिला हिंदू आणि पहिला मराठी राजप्रतिनिधी, ब्रिटिश पार्लमेंटरी कमिटीपुढे आपल्या मातृभाषेत भाषण करणारा पहिला आणि बहुधा एकमेवच भारतीय, म्हणून हणमंतरावाचे स्थान इतिहासात अढळ आहे. समुद्रप्रवासाबद्दल हिंदू समाजाच्या समजुतींचा पूर्वग्रह निवारण करण्यातही त्याचे अंशत: योगदान आहे. समुद्र ओलांडणाऱ्या हनुमानाचेच नाव या मराठेशाहीच्या प्रतिनिधीस असावे हाही एक योगायोगच!

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

एक टीप: पहिले चित्र राघोबादादांचे आहे, हणमंतरावाचे नाही. गोंधळ न व्हावा म्हणून खुलासा. ऐसीच्या टीमला लेख देण्याअगोदर ते स्पष्ट केलं पाहिजे होतं पण लक्षात आलं नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लेख आवडला!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

बॅटमन म्हणजे माहितीचा खजिना! या लेखातली माहिती यापूर्वी कधीच वाचली नव्हती. इतिहास आणि खवैय्येगिरी या दोन्ही प्रांतात, अशी मुलुखगिरी करणारे बॅटमन, पूर्वजन्मी नक्कीच, पेशवे किंवा त्यांचे मातब्बर सरदार असावेत!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही जंतुंची इतकी गर्दी जगात आहे का रास्त |
भरती विषाणुंचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त ||

बॅटमॅन , उत्तम हो.नेहमीप्रमाणे ..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आवडला

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ढेरेशास्त्री, तिरशिंगराव, थत्तेचाचा आणि बापटाण्णा: अनेक धन्यवाद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हणमंतराव आणि हे प्रकरण रोचक दिसतय. एक चांगल्यापैकी चित्रपट किंवा निदान मनोरंजन-कम-माहितीपट नक्कीच बनू शकेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रोचक आणि रंजक माहिती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फारच छान माहिती. शिवचरित्रात रघुनाथपंत हणमंते होते आणि पेशवाईत राघोबा व हे हणमंतराव!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रोचक लेख.

(तूर्तास ही फक्त पोच.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्तच लेख.

सगळ्यात पहिल्यांदा तिथे गेलेल्यांना भाषेची केवढी अडचण आली असेल आणि ती कशी सोडवली असेल काय माहित. भाषण मराठीतून केले आणि मग ते इंग्रजीत भाषांतरीत केले तरी ते भाषांतरीत करणाऱ्याला तरी दोन्ही भाषा यायला हव्यात. त्या कशा येत असतील काय माहित? त्यावेळी तर्खडकर भाषांतर पाठमाला थोडीच होती?

परत आल्यावर हणमंतरावाने समुद्र ओलांडल्याबद्दलचे प्रायश्चित्त घेतले. सोन्याची योनी तयार करून तीतून बाहेर येणे असे त्याचे स्वरूप होते. म्हणजेच तो प्रतीकात्मक पुनर्जन्म होय.

रोचक माहिती. सोन्याचाच वापर का झाला असावा?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

झकास लेख. एडमंड बर्क यांचं आयरिश मूळ, त्यांच्या व्हिग पक्षाची भूमिका आणि त्याच वेळी घडत असणारं अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध ही पार्श्वभूमी रोचक आहे.

याआधी भारतातून असे प्रतिनिधी फक्त एकदा आले होते, तेही चौदा वर्षांपूर्वी इ. स. १७६६ साली.

हे कोण?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उत्कृष्ट लेख.

तुर्कस्थानातील इस्कन्दरून

हे इस्कंद म्हणजे आजचे कुठले शहर?

समुद्रोल्लंघनाबद्दल प्रायश्चित्त घ्यायची प्रथा कधी सुरु झाली? शिवाजी महाराजांची जहाजे येमेनपर्यंत जाउन आली आहेत असे कुठेतरी वाचले होते शिवाय त्याच्याही आधी कित्येक शतके चोळांची जहाजे मुक्तपणे संचार करीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मनोबा, हारुन शेख, शिवोऽहम, नबा, हत्तीशेठ, नंदन, प्रचेतस: अनेक धन्यवाद लोक्स!

हत्तीशेठ: लेख बराच संक्षेपाने लिहिलेला आहे. मूळ कागदपत्रांत सर्वच गोष्टी विस्ताराने आलेल्या नाहीत. रूज़ बॉटन नामक एक इंग्रज इंटरप्रिटर तिथे हजर होता. त्याला हिंदुस्तानी भाषा येत होती. हणमंतरावाचे मराठी पारश्यांनी हिंदुस्तानीत भाषांतरित केले असावे असे इंग्रजी तर्जुम्यावरून दिसते. बाकी ते सोन्याचाच वापर का झाला असावा? मला माहिती नाही. धर्मशास्त्रे चाळून बघावी लागतील त्याकरिता. पुढेमागे तेही करेनच.

नंदन: येस, अगदी रोचक पार्श्वभूमी आहे. या सर्व प्रकरणात एडमंड बर्कच हीरो म्हणून उभा राहतो. ना गो चापेकरांनी त्याचे चरित्रही लिहिलेय. खूप सहृदय माणूस होता असे दिसते. बाकी ते १७६६ साली इंग्लंडला गेलेले प्रतिनिधी तत्कालीन मुघल बादशहाचे होते. त्या मोहिमेचे नेतृत्व एका इंग्रजाकडे दिले गेले आणि त्याने फक्त मुघल बादशहाचा पैसा खाऊन चैन केली, काम असे केलेच नाही त्यामुळे सर्व औम फस्स झालं. हे लक्षात घेऊन राघोबाने आपला माणूस नेमला असावा असा तर्क प्रो. फिशर करतात. मलाही ते योग्य वाटतं.

प्रचेतस: इस्कंदरून हे आजच्या तुर्की देशातील शहर आहे.

https://en.wikipedia.org/wiki/%C4%B0skenderun

बाकी ती प्रायश्चित्ताची प्रथा फार जुनी नसावी असे वाटते. त्यातही जातीवर आणि स्थलपरत्वे अवलंबून असावी असे वाटते. अधिक खोलात जाऊन मी अजून तरी शोध घेतलेला नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मस्त लेख. खूप आवडला

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जाम आवडला. समुद्रापार गेलेले पहिले मराठी लोक कोण आणि कुठे गेले असतील हे कुतूहल वाढीस लागले आहे.
प्रायश्चित्त थोडं लोल आहे Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कडक!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकदम झक्कास.. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सदैव शोधात..

हा लेख युवकभारती (११ वी /१२ वी मराठी ला हेच म्हणतात न?) ला लावायला पाहीजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बोले तो,‌ अकरावी-बारावीला मराठी हा विषय किती जण घेतात?

थोडक्यात, लेखास ऑब्लीव्हियनमध्ये धाडण्याचा प्रकार काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फार सुंदर लेख. संशोधनात्मक लिखाणात लालित्य आणता तुम्ही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

अतिशहाणा, अस्वल, घाटावरचे भट, अस्वस्थामा, साबु, पुंबा: अनेक धन्यवाद!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं