अरे संसार संसार

संकल्पना

अरे संसार संसार

- सई केसकर

हल्ली खूप लोक मला माझं लिखाण कमी का झालंय याबद्दल विचारतात. आणि जास्त खोलात जाऊन त्यांचा (आणि माझा) मौल्यवान वेळ घालवण्यापेक्षा एका शब्दात उत्तर देणं जास्त सोप्पं. लग्न. आपल्या ओळखीत असे अनेक लोक असतात ज्यांच्या कपाटात गिटारच्या वह्या, कवितांच्या डायऱ्या, ट्रेकचे फोटो आणि असे बरेच काही गुंडाळून ठेवलेले छंद सापडतील. त्या सगळ्या छंदांचं गुंडाळीकरण, लग्न (आणि संसार) या शब्दातच बहुधा झालेलं असतं. अर्थात असे कित्येक लोक आहेत जे "अगेन्स्ट ऑल ऑड्स" आपली कला जिवंत ठेवतात. ते मुळात माझ्यासारख्यांपेक्षा जास्त सरस असतात. पण संसारात कला हरवते हे मला फारसे पटत नाही.

कसंय ना, पूर्वी कसं म्हणायचे, अमुक अमुक राजा हा युद्ध"कलेत" पारंगत होता. शस्त्रकला, युद्धकला, वक्तृत्वकला या सगळ्या पूर्वी कला मानल्या जायच्या. आणि यात लोक 'निपुण' असायचे. पण तेव्हा युद्ध आणि संसार वेगवेगळे असायचे. राण्यांना सेपरेट महाल, दास-दासी असल्यामुळे या सगळ्या कला वेगळ्या ठिकाणी दाखवायला लागायच्या. हल्ली युद्धकला संसारातच वापरावी लागते. तसंच तह, करार, हे सुद्धा आता संसारातच बसवावे लागतात. त्यातच जर एखादं अपत्य झालं तर या सगळ्या कलांचा फुललेला पिसारा संसारातच वापरावा लागतो.

कला संसारात 'लेटंट हीट'चं काम करते.एखाद्या पदार्थाचं तापमान न वाढता तो जेव्हा उर्जा ग्रहण करतो तेव्हा त्याला लेटंट हीट असं म्हणतात. मात्र या प्रकारात पदार्थ नुसता टंगळमंगळ करत नसून, अंगभूत बदलत असतो. तसाच संसारदेखील कलाकारांचं कलेचं प्रदर्शन थांबवून, त्यांच्यातील कलेचा त्यांच्या रोजच्या आयुष्यात उपयोग करून घेतो.

जसं की आता माझी लेखणी व्हॉट्सॅपवर जास्त चालते. आपणच कसे बरोबर आहोत हे नवऱ्याला पटवून देणं हे जगातल्या दुसऱ्या कुठल्याही गोष्टीपेक्षा जास्त महत्त्वाचं आणि जास्त अवघड आहे. त्यामुळे कधीकधी नवराच मला सल्ला देतो की आता तू काहीतरी कम्प्युटरवर लिही, ब्लॉग वगैरे, नाहीतर अंगठ्याला कार्पेल टनल होईल उगीच. लेखनात जसं मध्येमध्ये, "आपलं हे काय चाललंय, याचा काहीच उपयोग नाही" अशी भावना यायची तशीच इथेही येते. पण जसं पूर्वीचं लेखन आणि आत्ताचं यातील गुणात्मक फरक दिसू लागतो, तसा पूर्वीचा नवरा आणि आत्ताचा, यातही थोडा थोडा फरक जाणवू लागतो.

पूर्वी असं फेसबुकवर वगैरे जळजळीत स्टेटस टाकून त्यावर (जगभर पसरलेल्या लुख्ख्या विद्यार्थ्यांशी) वाद घातल्यावर आपण किती फ़ेमिनिस्ट आहोत असं वाटायचं. पण आता आठवड्यातून एकदा घरकामाच्या प्रोसिजरचं फ़ेमिनिस्टिक कॅलिबरेशन करावं लागतं. यात
"माझे बाबा काहीच करायचे नाहीत घरात. तरी मी करतो."
"मी आज सकाळी उठून बाळाला चेंज केलं."
"माझी झोप पूर्ण झाली नाही."
"मी बाकीच्या नवऱ्यांपेक्षा जास्त काम करतो."
या आणि अशांसारख्या अनेक वाक्यांना कुठल्याही प्रकारची कृतज्ञ प्रतिक्रिया जाणीवपूर्वक न देता, "बरं मग?" अशी प्रतिक्रिया देणं येतं. यासाठी स्टेट्स शेयर करण्यापेक्षा आणि त्यावर वादविवाद करण्यापेक्षा खूप जास्त कष्ट पडतात. आणि ही वाक्यं उच्चारली जात असताना, जर आपली सासू असेल, तर या प्रत्येक वाक्यानंतर मनाच्या भिंतीवर, कुणीतरी टोकदार नख पुन्हापुन्हा घासत आहे अशी भावना सहन करत शांतपणे, "बरं मग?" म्हणावं लागतं.

लिखाण जसं तेच तेच वाटू लागतं, तसा संसारही घिसापिटा वाटू लागतो. पण दुर्दैवाने 'रायटर्स ब्लॉक'सारखा संसार ब्लॉक कधीच होत नाही. संसार मुळातच आपल्या खूप पुढचा असतो. त्याच्या हाती आपल्यापेक्षा खूप चांगल्या चांगल्या लोकांचे बळी गेलेले असतात. त्यामुळे आपल्याला कितीही संसार सोडावासा वाटला तरी संसार आपल्याला सोडत नाही. शेवटी मग आम्ही नवरा-बायको लग्न केल्याबद्दल एकमेकांचं सांत्वन करू लागतो. त्यातही आता नावीन्य आलंय. लग्न नवीन असताना अशी कंटाळ्याची फेज आली की आम्ही, "तुझ्यामुळे", "तुझ्यामुळे" करून एकमेकांवर ढकलायचो. आता अशा फेज मध्ये आम्ही सबंध विश्वाचा विचार करतो. की आपण म्हणजे या संसाराच्या यज्ञात एक तुपाचा थेंब, वगैरे. अगदीच बोर झालं तर, उभय पक्षांच्या आयांवरून एखादं झणझणीत भांडण करतो. पण भांडण हा संसार रिसेट करायचा चुकीचा मार्ग आहे हेदेखील आता आमच्या लक्षात येऊ लागलंय. आणि मुळात सुख-कंटाळा-भांडण-सुख या कालचक्रातून मुक्ती हीच संसाराची खरी शिकवण आहे असं आम्ही आता मानू लागलो आहोत.

संशोधनकलेचेदेखील नवीन पैलू संसाराने दाखवून दिले आहेत. मी आणि माझ्या काही मैत्रिणी आता आमच्या सगळ्यांच्या नवऱ्यांच्या आणि सासवांच्या (गुण-)दोषांवर उत्तम रिव्ह्यू-पेपर लिहू शकू. संसारात पडल्यापासून माझा मानसशास्त्राचा व्यासंगदेखील कलेकलेने वाढला आहे. विविध पुस्तकं वाचून माझ्या असं लक्षात आलंय की आपण सगळेच थोडेथोडे मनोरुग्ण आहोत. आधी निरागसपणे मी दुसऱ्यांचं वेड शोधायचे. आता मात्र मला पक्की खात्री पटली आहे की मीच सगळ्यात जास्त वेडी आहे. अशा अध्यात्मिक घटका आल्या की कौतुक वाटतं, पूर्वीच्या विचारवंतानी वानप्रस्थाश्रमाचा सिकवेन्स इतका चपखल कसा बसवला असेल. पण त्याही पुढे जाऊन असं म्हणता येईल की सराईताला जंगलात जाण्याची काय गरज? मन इतकं शांत झालं पाहिजे की संसाराच्या गोंगाटात जंगलच मनात आणता आलं पाहिजे.

तुम्ही तुमच्या संसारात शंभर टक्के सुखी असाल तर हा लेख तुमच्याबद्दल बिलकुल नाही. आणि जे लग्न करून प्रचंड सुखी झालेत (अशांच्या मी नित्य शोधात असते) त्यांच्यासाठी हा लेख लागू नाही. पण संसार इतका फूलप्रूफ सुखी असता तर एका अविवाहित प्रोड्यूसरनी त्यावर इतकी कमाई केलीच नसती. संसारातील खाचा आणि खड्डे, त्यातून येणारे चांगले वाईट अनुभव यामुळेच, लग्न या सतत चालू राहणाऱ्या संथ प्रवाहात, थोड्या लाटा वगैरे अनुभवायला मिळतात. नाहीतर नुसता इकडे सेल्फी, तिकडे सेल्फी, माझा हब्बूडी, माझी वायफी असं खोटं खोटं प्रदर्शन उरेल. संसारात पडल्यामुळे तरुणपणी आपण शाहरुख खान आहोत असं वाटणाऱ्या लोकांना आपण आता इरफान खान झालोय असं वाटू लागतं. पण हा बदल किती चांगला आहे हे ज्याला कळलं त्याचाच बेडा पार!

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (1 vote)

प्रतिक्रिया

संसार म्हणजे 'दिल्ली के लड्डू - जो खाये वो पछताये, जो न खाये वो भी पछताये' असं मी लग्न झाल्यानंतर ऐकलं. त्यामुळे मला दुसरा पछतावा करण्याची संधी न मिळाल्यामुळे मी पछतावलो होतो.

बाकी नवऱ्याच्या तोॆडून त्याची चूक कबूल करून घेणं हेच संसाराचं ध्येय असतं, याबाबत शंभर टक्के सहमत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या आणि अशांसारख्या अनेक वाक्यांना कुठल्याही प्रकारची कृतज्ञ प्रतिक्रिया जाणीवपूर्वक न देता, "बरं मग?" अशी प्रतिक्रिया देणं येतं. यासाठी स्टेट्स शेयर करण्यापेक्षा आणि त्यावर वादविवाद करण्यापेक्षा खूप जास्त कष्ट पडतात. आणि ही वाक्यं उच्चारली जात असताना, जर आपली सासू असेल, तर या प्रत्येक वाक्यानंतर मनाच्या भिंतीवर, कुणीतरी टोकदार नख पुन्हापुन्हा घासत आहे अशी भावना सहन करत शांतपणे, "बरं मग?" म्हणावं लागतं.

कडक!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

सोपा मंत्र. तुझ्यामुळे हरभरा टरारून वर !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

भारी लिहीलेयं Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इतक्या मोठ्या विषयावर इतका नेटका लेख! द्न्यानेश्वरांनी आणि टिळकांनीच नव्हे, तर वपु, ओशो- ज्या कोणी विचारवंतांनी गीतेवर भाष्य केलंय, त्या ओळीत तुम्ही सहज जाऊन बसू शकाल! माझ्याकडून वाक्यावाक्याला हशा आणि टाळ्या!!! _/\_

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0