टोटल एकटं भजन

ललित

टोटल एकटं भजन

- संतोष गुजर

योगी डोअरच्या बाजूला उभा राहिला चार माणसांच्यामध्ये. चार माणसांप्रमाणे.
एकजण त्याच्या कानात खोकला. दुसरा तोंडावर शिंकला, ‘सॉरी’ म्हणाला. आधी जो खोकला होता तो पुन्हा खोकला आणि तोही ‘सॉरी’ म्हणाला. त्या सगळयांच्या चेहऱ्यांत त्याला स्वतःचा चेहरा दिसला आणि लघ्वीच्या इथे जळजळ सुरू झाली. त्यानं थांबवून ठेवलं.
उरलेली भजन मंडळी आत शिरली.
ज्ञानेश्वराचा फोटो खिडकीच्यावर लावला. हार घातला.
'पुंडलिक वरदा हाऽऽऽरी विठ्ठल!... . श्रीज्ञानदेव महाराज की जय... '
ज्ञानेश्वरापासून सुरुवात झाली-
'रूप पाहतां लोचनी । सुख जाले वो साजणी,
तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा…'
मध्ये तुकाराम हमखास येणार.
'सुंदर ते ध्यान उभे विटेवरी... '
भजन थेट कृष्णापर्यंत जाणार राधेला मिठी मारणार... गाडी लास्ट स्टेशनला खाली होऊन पुन्हा
भरणार.
पाठंय त्याला. टोटल भजन पाठंय. सवयीचं झालंय.
त्यानं तुकाराम-ज्ञानेश्वर गुगल केलेत. त्यांचे ऐकलेले अभंग ऑनलाईन वाचलेत. असंच...
रिकामा वेळ भरपूर असतो त्याच्याकडे. त्याला कसलं टेन्शन नाहीय असं त्याला वाटतं. पण मध्येच त्याला टेन्शन नसल्याचं टेन्शन येतं आणि तो गंभीर होतो.
पुन्हा एकदा त्याच्या कानात दंगलीसारखा शुकशुकाट निर्माण झाला.
टाळ-मृदंग-चिपळ्यांच्या आवाजानं मेंदू वाजायला लागला.
भजन आवडायचं, आता नाही आवडतं.
कंटाळा आलाय, संतांचा.
त्यांना वाचलंय; त्याचं सगळं कळतंय - असं अजिबात नाही. पण तरीही मला त्यांचा कंटाळा आलाय. मला ते नकोसे वाटतात. आजकाल. हल्ली. नेहमीच.

---

हे भजन का सुरुय मघापासून?... बंद करा! माझे कान किटलेत... डोकं दुखतंय... नीट श्वास घेता येत नाहीय... दोन्ही पायांवर नीट उभा राहू दे मला... प्लीज. प्लीज...

एकानं त्याच्या पायावर पाय दिला, पुढे गेला. तो मनात ‘आयझवाडा’ म्हणाला. स्वतःवर चिडला. जगावर चिडला. पेशी न् पेशी हालली. मेंदूला घाम आला. मेंदूला शेंबूड आला. मेंदू हाग्ला. मेंदूचा स्फोट झाला. मेंदूच्या चिंध्या झाल्या. शरीर गरम गरम झालं.
यात नवीन काहीच नाही. कालही हेच झालं - परवाही.
गुदमरत पुढच्या स्टेशनला गर्दीला गचके देत योगी बाहेर पडला डब्यातनं, उल्टीप्रमाणे.
ट्रेनला डोळ्यांदेखत सुटताना बघितली... मनातून रागराग आला सगळा.
'भेन्चोद लाइफंय आपली!'
'संत मेले, देव जिवंत राहिलाय'
'तुकाराम उडाला की उडवलं? ज्ञानेश्वरानं समाधी घेतली की त्याला गाडलं?'
आधी थांबवून ठेवलेली लघ्वी करायला गेला तो पटकन. तिथे लांबच लांब धारेसारखी लाईन लागली होती.
सगळ्यांनाच प्रॉब्लेम आहे वाटतं.
कसाबसा त्याचा नंबर आला. जोरात मुतला, आरामात मुतला. मागून लाईन ओरडली-
“हमें भी मुतना है!”
बेसिनला नळ नव्हते. हात पँटला पुसले. स्टेशनातून बाहेर आला.
चालताना पायाखालचे छोटे दगड उडवत विचार करत तो चौकात रिक्षा स्टँडपाशी थांबला. तिकडची लाईन बघून परत वैतागला. अजून थोडा पुढे आला जिथून चौथी सीट घेतात रिक्षावाले.
काय करायचं ?
समोरून एक रिक्षा गेली.
काय करायचं??
समोरून दुसरी रिक्षा गेली... रिक्षा जातच होत्या... त्याच्या मागून येणारे ‘रिक्षा-रिक्षा’ मजबुरीनं बोंबलत आत उडी घेत होते... रिक्षावाल्याच्या मांडीला मांडी लावून बसत होते.
ट्रेनमध्ये चौथी इथेपण चौथीच!
रिक्षावाल्याच्या मांडीला मांडी... ह्या असल्या गे-पणाच्या सुखात जगतात लोक. ह्यॅ...
त्याला कसंतरी वाटलं... मग मनात म्हटलं, आपल्याला काय करायचं?!

---

कुठे जायचं? पुन्हा प्रश्न.
-रिक्षा.
तो त्याच्याच ह्याच्यात होता.
काय करायचं? पुन्हा प्रश्न.
-रिक्षा.
तो त्याच्या ह्याच्यातच होता.
'अरे चुतीयागिरी काय करतोयस? ओरड लोकांसारखं ओरड – 'रिक्षा-रिक्षा -
शिवाजीचौक??... रिक्षा शिवाजीचौक? ’—पण आवाजच फुटत नव्हता गळ्यातनं. सगळं मनात ओरडत होता.
हल्ली मनात ओरडणं खूप वाढलंय.
- म्हणजे आता चालत जायचं का सरळ? किती वेळ लागेल चालायला? कधी गेलो नाही. दोन-तीन स्टेशनं. चाळीसेक मिनिटं-एक तास?
की ऑफिसला दांडी, आजपण?!
ऑफीस?
लौडा!
माणसानं जॉब नाही केला पाहिजे! जॉब म्हणजे पारतंत्र्य... गुलामी... modern slavery!
सकाळी लौकर निघा. सगळी सर्कस करून ट्रेन पकडा. लोकांना अंग घासत जिन्यावरून-पुलावरून चढा-उतरा. रिक्षा पकडा. टायमावर पंच करा.
लेटमार्क झाला तर हाफ डे... पण लेट थांबलं तर? त्याचं काय नाही... ‘कामच ते!’
पिळवणूक आहे ही! तरीही माणूस जॉब करतोच. सगळेच मालक कसे होतील? ते शक्य आहे का कोणत्या तरी युगात? कोणत्याही समाजव्यवस्थेत?
देवीदेवतांमध्ये-संतांमध्ये सुद्धा अहमहनिका सुरू असते.
कारण, वाटतं प्रत्येकालाच की ‘समोरच्याची ’मारूया... म्हणून जो-तो स्वत:च्या खालच्याला शोधत असतो समोरच्या प्रत्येकात... भेटला की मारा!!
जॉब म्हणजे शिवी. . no dignity... no respect... अपमान करायचा किंवा गिळायचा...
Dignity ठेवून आणि respect मिळवून जॉब करता आला पाहिजे... जमलं की बेस्ट! पण भेन्चोद
नकोच!

---

जॉब माणसातलं माणूसपण काढून घेतो.
स्वत:चं काय तरी केलं पाहिजे माणसानं!
माणसानं ठरवलं की माणूस काहीही करू शकतो... चंद्रावर जाऊ शकतो, हिमालयावर जाऊ शकतो... विमान, रॉकेट, सायकल, कार, बाईक, शूज, पेन, प्रिंटर, पेपर, कॉम्प्युटर, फोन, ऑफीस-अणुबॉम्ब नाही का बनवलं माणसानं? कायकाय एकेक बनवेल माणूस सांगता येत नाही.
माणूस ग्रेट आहे.

माणसानं माणसानं काय म्हणतोय मी मघापासनं? मी माझ्याविषयी बोलताना समाजाविषयी काय बोलतोय?! काय थोर लागून गेलोय मोठा? फालतुगिरीय नुस्ती.
चुतीया.
असं स्वतःलाच कितीदा चुतीया बोललोय मी!
शिवीच निघतेय तोंडातून सारखी. मी असा नव्हतो. मी असा नव्हतो. मला हे शोभतं का?
IZ, YZ, BZ, MC, BC, . . कितीतरी शिव्या.
जगातली पहिली शिवी कोणती? कुणी दिली? कुणाला दिली? का दिली? शिवी म्हणजे काय? मी का देतोय? शिवी ही उत्क्रांतीबरोबर विकसित होणारी भाषा आहे?
तुकारामानं शिव्या दिल्या. ज्ञानेश्वरानं दिल्या नाही. असं का झालं?
शिव्यांना काय अर्थ असतो? लिंगवाचकच का असतात त्या? एका माणसाला दुसऱ्या माणसाचा अपमान करायचा तो सोपा मार्ग आहे? फ्रस्ट्रेशन काढण्याचं प्रभावी माध्यम आहे ते?
लिंगावरून बोललेलं का लागतं मनाला??
चुतीया शब्दाचा खरा अर्थ काय? हा शब्द जरा कन्फ्युजिंग आहे! साधाभोळाय की वाईट?
तसं गुगल आल्यापासनं अनेक गोष्टीचं निरसन होऊ लागलंय. गुगल एक बरं झालंय. गुगल झिंदाबाद! इंटरनेट झिंदाबाद!... नेट न्यूट्रॅलिटी झिंदाबाद! स्वातंत्र्य झिंदाबाद!!
कामगारांप्रमाणे मनात घोषणा दिल्याबद्दल त्याला थोडी लाज वाटली पण मग पुन्हा तो चुतीयागिरीकडे वळला...
“ चूत-चुतीया-चुतीयागिरी-चुतीयापंती"
... Born out of cunt / vagina - not a cesarian – asshole - dickhead
किंवा VEG अर्थ- मूर्ख! बेअक्कल! बुद्दू! (ह्या तर शिव्याच वाटत नाहीत. )

---

चुतीया लोकांच्या तीन कॅटेगरी असतात-
चुतीया - चमन चुतीया - सर चुतीया. ” (सर ही उपाधी ब्रिटिशांनी सुरू केलीय! आणि आमच्या ऑफिसमध्ये सगळे एकमेकांना ‘सर’ बोलतात!)
चुतीया हा शब्द योगीनं पहिल्यांदा वसीमच्या तोंडून ऐकला होता… ‘चुतीया इधर आ!’ तो धावत वसीमकडे गेला होता. तेव्हा वसीमबद्दल त्याला फार वाटायचं.
वाटायचं आपण ह्याच्यासारखं व्हायचं एक दिवस! काय दिसतो - काय बॉडीय!
पण योगीला कसं काय कळलं तो त्यालाच बोलवतोय? कसं!
वसीम योगीच्या दीदीला घेऊन बसायचा. त्यानं पाहिलं होतं दोघांना दोन-तीनदा.
एकदा त्यानं योगीच्या हातात एक चिठ्ठी दिली आणि म्हणाला,
“तेरे दीदी को दे! ”
त्यानं दिली. दीदीनं घेतली आणि मेकअप करायला लागली. ज्याम खुश दिसायला लागली अचानक. आणि बाहेर पडली खुशीत!
योगी असा खुश कधी झाला नाही. खुश कसं होतात?
पाचवी चिठ्ठी योगीनं दीदीला दिली नाही, बापाला दिली.
आज दीदीचं आकाशजीजूबरोबर लग्न झालंय. एकूण सहा वर्षं झालीत. एक मुलगाय पाच वर्षांचा. ती खुश दिसते.
मी कधी खुश होणार? खुश कसं होतात?
मी जाऊन सांगू आकाशजीजुला सगळं दीदीबद्दल?
नीचंय मी. नीच.
मला स्वतःचाच खून करावासा वाटतो. म्हणजे आत्महत्या?
मी आत्महत्या केली ना तर चिठ्ठीत बॉसचं नाव लिहीन... त्याला अद्दल घडली पाहिजे!
पण आत्महत्येसाठी मोठं कारण लागतं. ज्ञानेश्वर-तुकाराम यांनी आत्महत्या तर केली नसेल ना?
आत्महत्या का करतात माणसं? यावर योगीनं खोल विचार केलेला नाहीय. बातम्या ऐकल्यात आणि पाहिल्यात फक्त.
योगीच्या पायानं एक छोटासा दगड नकळतपणे उडून समोर चालणाऱ्या मुलीच्या डाव्या पायाला टाचेच्या वरती लागला.
ती जागेवरूनच वळून हसली.
तो कन्फ्युज झाला.

---

त्यानं साईड बदलली.
एक जुनं थिएटर दिसलं रस्त्यात, जे मल्टीप्लेक्स येण्याआधी नेहमी हाउसफुल असायचं. स्टेशनपासून जवळ आणि प्रसिद्ध. आता इथे भोजपुरी आणि ‘B-grade’ मुव्ही लागतात.
आपण कधी ‘B-grade’ मुव्ही पाहिला नाहीय. तेपण असं थिएटरमध्ये बसून. बघूया तरी!
तसंपण हिंदी ‘B-grade’ मुव्हीमध्ये दाखवून दाखवून काय दाखवणार?? भिजलेल्या ब्रातली छाती?!
आधी टुथपेस्ट-बॉडीक्रीम-बाईक इत्यादी माणसाला सुंदर आणि फास्ट बनवणाऱ्या अॅडस्‌नं पकव पकव पकवलं... मग माणसाला सेफ अँड सेक्युर्ड बनवणाऱ्या Mutual funds Investmentची अॅड सुरू झाली- डोक्यातच गेली आणि ती लाइफ पॉलिसीवाली अॅड बघून तर त्याला भीतीच वाटली.
अंगावर सुरकुत्या आणि डोक्यावर टक्कल पडल्या सारखं झालं...
‘ भेन्चोद लाइफंय आपली! म्हातारा झालो !’ असं पुन्हा एकदा वाटलं त्याला. उठून जावसं वाटलं
पण—
मग राष्ट्रगीत सुरु झालं, त्याला आश्चर्य वाटलं... असल्या पिक्चरच्यावेळेसपण असतं? ह्यॅ—जाऊ दे!
पिक्चर सुरू झाला. त्यानं आसपास पाह्यलं. गर्दी अर्थातच नव्हती. त्यात गुरुवार. लोकांना कामं आहेत, सगळे माझ्यासारखंच थोडं वागतात. थोडेच लोक थोड्या लोकांप्रमाणे वागतात.
तिकडे कोपऱ्यात एक कॉलेजकपल सुमडीत बसलं होतं... थोड्या वेळानं त्यांचा स्वतःचा पिक्चर सुरू झाल्याचा आवाज आला - ‘दाबादाबी’. ते बघून त्या दोघांच्या बाजूला बसलेल्या भैयाला सेक्स चढला असावा बहुतेक तो पटकन उठून निघून गेला, कदाचित टॉयलेटला. योगीनं लक्ष्य स्क्रीनवर टाकलं आणि आठवलं – आपण एकदाच हलवलं. पहिलं आणि शेवटचं. ते पांढरं द्रव्य बघून किळस आली होती. आता फक्त स्वप्नदोष.
पिक्चर पुढे सरकत होता... त्यात असं काहीच ‘घडत’ नव्हतं. टोटल अपेक्षाभंग. टोटल चुतीयागिरी.
तो उदास होऊन उठला... लाजही वाटली.
गेलेला भैया आपल्या जागेवर येऊन बसला - खुश दिसत होता. हलवून आला असणार.
योगी बाहेर आला. बाहेरचा उजेड बरा वाटला - मोकळी हवा नाकात गेली, अंग जरा उन्हानं शेकलं - स्वतंत्र वाटलं.
आता काय?
माणसानं जॉब नाही केला पाहिजे!

---

माणसानं मोकळं राह्यलं पाहिजे.
ना आगा-ना पिछा. ना आई, ना बाप, ना भाऊ, ना बहीण, ना...
टोटल एकटं
दूर.
असं उन्हातच आयुष्य घालवायला पाहिजे… चालत. आणि मग सुकून मरायचं एक दिवस हळूच.
फोन वाजला.
ऑफिसचा नंबर.
काय करू?
काय करू, काय, काय करू? मी काय घाबरतो कुणाला?
“हलो?”
जीतू होता फोनवर. त्याचा कलीग.
“कहा है तू, बॉस?”
“संडास में!”
“नया ऑफिस मुबारक हो हगरे!”
खबर काढण्यासाठी फोन केला त्यानं?
जीतू चांगला आहे की वाईट हे मला सांगता येत नाही. मी चांगला आहे की वाईट हे तो सांगू शकेल? ऑफिसचं वातावरण मंत्रालयासारखंय. सगळे टोपी घालतात.
फ़ूड पॉइजनिंगचं मंगळवारचं कारण अजून पुरवतोय...
मंडेला गेला होता. ज्याम बाचाबाची झाली संध्याकाळी निघताना. केबिनमधला आवाज रिसेप्शनपर्यंत जात होता.
सगळे ऐकून घेतात. त्यालाही सवयीचं होतं तरीही ऐकायचा वीट आला होता. त्यानंपण ऐकवलं बॉसला - जमेल तसं.
मंगळवारी उठला नेहमीप्रमाणे. ताप आल्यासारखं वाटलं. ट्रेन पकडली. भजन ऐकलं.
मध्येच उतरला आणि फिरत बसला.
तेच बुधवारीही केलं.
आणि आताही उतरलाय. तिथेच. तसाच.
म्हणजे ऑफिसची दांडी – लागोपाठ तिसरा दिवस - म्हणजे हॅट्रिक!
सेलिब्रेशनसाठी तो एका रेस्टॉरंटमध्ये बसला. घरून डबा आणत नाही कधी. कशाला त्रास ना आईला?

---

मला खरंच आईची काळजी आहे?
मला स्वत:च्या सगळ्याच गोष्टींबद्दल शंका का घ्यावीशी वाटते आता?
बायको आल्यावर मी आईची काळजी घेईन?
आता बायको कुठून आली मध्ये लगेच? वेळ आहे त्याला. निदान तीन वर्षं?
त्याची तर गर्लफ्रेंडपण नाहीय, मागे मागे लागायला. तुकारामनं केलं – ती पण दोन, ज्ञानेश्वरानं केलं नाही. पण माणसानं लग्न करायला पाहिजे. लग्न केल्यावर माणूस सेटल होतो - असं म्हणतात.
लग्न नक्की का करतात माणसं? यावरही योगीनं खोल विचार केलेला नाहीय. बातम्या ऐकल्यात आणि पाहिल्यात फक्त.
वेटर बोट घातलेला पाण्याचा ग्लास आणि मेन्यू कार्ड ठेवून निघून गेला. पलीकडच्या टेबलावर एक वयस्क इसम येऊन बसला. आईनस्टाइनसारखा दिसत होता. केस पांढरे पिंजारलेले. वेळ घेत मेन्यूकार्ड बघून शोध लागल्यासारखा ओरडला –
‘एक कडक चाय’
‘बस?’ वेटर चिडत म्हणाला.
‘अब इस उम्र में ‘कडक’ सिर्फ चाय ही मिलेगी मुझे, बेटा!’ डोळे मिचकावत आईनस्टाइन मंद हसला.
वेटर हसून योगीकडे आला.
- ‘बुर्जीपाव!’
गुरूवारी नॉनव्हेज खातोय असं वाटलं त्याला काही क्षण.
गुरूवारी लोक दत्त मंदिरात जातात. असंही वाटलं त्याला काही क्षण.
पण अंडं व्हेज-नॉनव्हेज हा काश्मीरप्रश्न सुटलाय कुठे अजून? पण प्रश्न हाच नव्हता.
मी आस्तिक आहे की नास्तिक आहे?
मला कधीकधी वाटतं की देव आहे. कधीकधी वाटतं तो नाहीय.
चुकून कधी मूर्तीपुढे गेलो की मनात काहीच येत नाही. टोटल ब्लँक - दोघेही.
त्याचं काही करण्यात मला इंटरेस्ट नाही.
पण काहीच खात्रीनं सांगता येत नाही.
इतक्यात तो आईनस्टाइन विचित्र पद्धतीनं ओरडला,
‘कडक हा कडक, एकदम कडक!’

---

योगीनं दोन पाव संपवले. बुर्जी उरली.
फोन पुन्हा वाजला. त्यानं उचलला नाही.
बघू काय होतंय ते! तो मला काय समजतो?
योगी ओरडला ‘और एक पाव . ’
म्हातारा म्हणाला, ‘पाव पेट में फुगता है, ज्यादा मत खाव!’
योगीनं विचारलं, ‘आपने कुछ कहा?’
‘नही तो!’, आईनस्टाइन कडक चहात मनसोक्त बुडाला.
योगी बाहेर आला. तीन वाजले होते. त्याच मॉलमध्ये घुसला.
आधीही आलो होतो. काय घेत नाही मी, फुकट पाय दुखतात.
‘सर तुमचा बर्थ-डे कधीय?’
मंगळवारी मॉलमध्ये मेन्स-वेअर सेक्शनमधल्या त्या मुलीनं एकदम प्रश्न टाकला होता आणि हा बोल्ड झाल्याप्रमाणे बघत बसला होता.
‘फक्त डेट विचारतेय. महिन्यातल्या त्या दिवशी तुम्हाला discount! ’, तिनं शिकवलेलं स्मित करत स्पष्ट केलं.
बुधवारी तिनं पाहिलंसुद्धा नाही त्याच्याकडे.
आज गेलो तर मॅनेजरलाच बोलवायची, काय सांगावं? — नकोच इथे .
मॉलमधून निघाला. ट्रेन पकडली आणि थेट मानलेल्या मामाच्या ऑफिसला पोचला. त्याचं ऑफीस बंद होतं. भेटला असता तर आधीच्या राहिलेल्या गप्पा कंटिन्यू करता आल्या असत्या किंवा कशावरही नवीन चर्चा करता आली असती. ‘इथे कसा?’ ह्या प्रश्नावर काय छान गुंडाळलं त्याला.
की त्याला डाऊट आला असेल म्हणून तो आज—
त्याच्याकडे विषय खूप असतात. किती इन्स्पायरिंग बोलतो तो.
तू तुझेच बघ! – असं लिहिलेलंय एका भिंतीवर. नपुसकलिंगी आणि कन्फ्युजिंग वाक्य.
कदाचित ‘आत्म्यासाठीही’ असेल ते. आत्म्याला लिंग नसतं. आकार नसतो. त्याला फक्त शरीर लागतं. मामा टोटल फॉलो करतो ह्या असल्या गोष्टी!
आत्म्याला जॉब करायला लावला पाहिजे दहा-दहा-बारा-बारा तास, कळेल त्याला की शरीराचे कसे हाल होतात! मग तो पण अमरत्वाच्या गोष्टी सोडेल आणि समाधी घेईल.

---

टाईम गेला असता.
ऑफिसचा आठ-नऊ तासांचा वेळ कुठे कसा घालवायचा हा सुद्धा काश्मीर प्रश्न आहे. लोकांना वेळ पुरत नाही आणि ह्याच्याकडे अमाप.
वेळ विकता आला असता तर हा श्रीमंत झाला असता आज.
ऑफीस बंद. चांगलं सरप्राईज मिळालं. त्यानं मामाला फोन केला नाही. एका अर्थी बरंच झालं! रोज रोज कोण स्वागत करेल ना?
जवळच्या स्टेशनला पोचला, छप्पर काढलेलं. बेक्कार फिलिंग आली.
ऊनच ऊन. सावलीतल्या एका बाकावर बसला. साडेचार वाजलेले. अजून दीड तासांनी ऑफीस सुटेल. सुटतं. आम्ही नाही. बरोबर सहाला केबिनमधून फोन -
‘हे पाच मिनिटांचं कामंय, तेवढ मेल करून जा मला!’
जगातलं कोणतं काम पाच मिनिटांत होतं? योगीला मुतायला सात मिनिटं लागतात. मुतखड्याचा प्रॉब्लेम आहे त्याला. आरामात करतो. त्यावरूनही त्याला एकदा ऐकवला होता.
ऑफिसचं कोणी चुकून इथे आलं आणि चुकून आपण दिसलो तर?
तर काय? काय होणार? होईल ते होईल!... कोण कशाला येतंय मरायला?
मग बसल्या बसल्या योगीनं स्वतःचे प्लस पॉइंटस् मोजायला सुरुवात केली. मग शोधायला सुरुवात केले जेव्हा स्टॉक संपला तेव्हा तो बाकड्यावरून ह्या विचारांत उठला की माणसानं घाबरू नये, स्वतःला कमी लेखता कामा नये. स्वत: स्वत:ला इंस्पीरेशन द्यायला पाहिजे. मोटिव्हेट करायला पाहिजे. प्रत्येकवेळी स्वतःच स्वत:चा असा अपमान करून, एखाद्याशी तुलना करून दु:खी का व्हायचं?? खुश राहता आलं पाहिजे. दीदी कशी खुश झाली. मामा कसा खुश असतो.
दुसरं ऑफीस जॉईन केलं तरी असाच अनुभव येईल? की ह्याहून खराब? कदाचित खूप चांगलंही असू शकेल दुसरं ऑफीस?
पण काहीच खात्रीनं सांगता येत नाही.
रस्त्यावर अपघात बहुदा इतरांच्या चुकीमुळेच होतात.
माणसानं जॉब नाही केला पाहिजे!
इतका विचार करून त्याला तहान लागली.
आता ऑफिसमध्ये गेला असता तर पाणी आणि फुकटचा दोन वेळचा चहा मिळाला असता.
‘फुकटचा’ हा शब्द वापरून त्यानं पुन्हा समस्त कामगारांची इज्जत काढलीय असं वाटलं
त्याला. लाज वाटली. खरंच खूप लाज वाटली.

---

सॉरी कार्ल मार्क्स! नाही सुधारणार मी!
त्यानं स्टॉलवरून एक बिसलरी घेतली आणि परत येऊन बसला.
ऑफीस शिवायचा वेळ कसा घालवायचा हे कुणी कुणाला नाही सांगू शकत. ती एक परीक्षा असते. ती एक सवय असते.
काहीतरी करत बसणे... म्हणजे वेळ जाणे... पण काहीही केल्यानं वेळ घालवण्यानं कुणी काहीच होऊ शकत नाही, त्यासाठी ठरवून काहीतरी करावं लागतं.
ज्ञानेश्वर २१चे असताना गेले... मी ज्ञानेश्वरपेक्षा तीन वर्षांनी मोठाय... मी काय करू?
तुकाराम हा ज्ञानेश्वर आणि माझ्यापेक्षा मोठा... तो पन्नासच्या आसपास मेला... ज्ञानेश्वरांनी पाया रचला तुकारामानं कळस लावला. दोघांनी काय ना काय केलं... काहीतरी बांधून अमर झाले. त्यांनी जॉब केला असता तर ते अमर नसते झाले... जॉब सामान्य माणसंकरतात... माझ्यासारखे. त्याकाळी कोणते जॉब होते?? काहीतरी बांधता आलं पाहिजे.
तुला नक्की काय करायचंय योगी-चुतीया?
त्याला मनात शांतता जाणवली.
डोळ्यांपुढे सगळं अंधुक झालं. कानांत स्टेशनाचा आवाज जाईनासा झाला. डोळ्यांतून पाणी आलं. शरीरावर काटा आला.
डोळे पुसले तेव्हा समोर भिकारी होता. भीक न देता तो निसटला आणि WhatsAppमध्ये लपला. पी. जे. वाचले. नॉन व्हेज वाचले. बालिश विडीयो फॉरवर्ड केले. नागड्या बायकांचे फोटो बघितले. गेल्या तीन दिवसांतलं ‘ग्रूप’चं संभाषण – जे त्यानं हट्टानं टाळलं होतं, वाचत बसला. आठशेच्या वर मेसेजेस होते. तिथे स्वत:चा उल्लेख शोधत बसला. कंटाळला.
डास चावायला लागल्यावर गार्डनमधून बाहेर पडला.
स्टेशन गाठलं. साडे नऊची ट्रेन पकडली. डोअरला उभा राहिला.
खाडी लागली. पुलावरून खाडीपण समुद्रच वाटते. मस्त बघत बसला.
पाण्याकडे एकटक बघितलं की वाटतं ‘बोलवतंय’, नकोच बघायला.
त्यानं मान वर केली आकाशाकडे आणि यशोदेनं बाळकृष्णाच्या तोंडात पहावं तसं बघत बसला निरागसपणे. सगळं ब्रम्हांड. निळं-निळं. त्याला चक्कर नाही आली.
वाऱ्यानं केस उजव्या डोळ्यासमोर आले.

---

त्यानं मागे केले.
आईचा फोन आला. म्हणाला--
‘हो आजपण लेट झालो... येईन दहा-साडेदहापर्यंत... बाबा आले ना? तुम्ही लोक जेऊन घ्या.’
दुसऱ्या दिवशीची सकाळ.
आई किचनमध्ये.
योगीची रूम. छोटीशी. आधी दीदीबरोबर शेअर करावी लागायची. आता एकट्याची.
खिडकी बंद. पडदा लागलेला. खिडकीच्या बाजूला पी. सी., टेबल.
टेबलावर मोबाईल-घड्याळ-वॉलेट-रुमाल.
आंघोळ करून आलाय. फॅन सुरुय. केस पुसत उभाय अंडरवेअरवर.
मग शर्ट-पँट घालायला लागतो आणि तोच पुन्हा एकदा त्याचा मूड जातो.
एकदम हरल्यासारखं खुर्चीवर बसतो.
त्याला उगाच एक किस्सा आठवला बसल्याबसल्या -
एकदा असाच पीसीवर काहीतरी important काम करत बसला होता आणि अचानक त्याच्या अडीच वर्षाच्या भाच्यानं येऊन खालून CPUचं बटणच बंद केलं आणि एकटक बघत बसला त्याच्याकडे.
त्याला धरून आपटावंसं वाटलं पण भाच्यानं स्मित केलं.
असल्या कंडीशनमध्ये काय करायचं असतं माणसाने? योगीला प्रश्न पडला.

जायचं का आजतरी?
पुन्हा बाचाबाची. चिडचिड.
आज जर तो ‘fuck off’ म्हणाला ना तर त्याची वाटच लावीन. काय समजतो स्वत:ला?
फक म्हणजे झवणे! हा झवतो काय मला?? मादरचोद!! आयझवाडा!
‘हे सर लोक’ काय समजतात स्वत:ला? आम्हालाच यांची गरजंय? यांना नाही आमची? कसं वागतात साले? मादरचोद!!... शिवी काय देतोय मी सकाळी-सकाळी... मी वाईट होत चाललोय... मी असा नव्हतो... की होतो आणि आता बाहेर निघतंय?... प्लीज मला चांगलंवागायचंय... प्लीज... आईला वाटत असेल किती गुणाचाय आपला पोरगा… शांत. सुशील.
आई मी खरंच चांगलाय...
मध्येच कसला तरी आवाज आला. तो थांबला.

---

मी काही बोलत नाही याचा अर्थ मला बोलता येत नाही? गांडच मारेन!... शी यार... हे असलं... सकाळी सकाळी... हे आतल्या आत ओरडणं कधी बंद होणार??
-- काय होणार होऊन होऊन? काढून टाकेल मला? माझं नशीब तर नाही घेणार ना??... fuck off!
मी त्याला एकदा तरी म्हणणारच--fuck off!!
किती इच्छाय माझीपण... fuck off म्हणण्याची!! शब्द जबरदस्तंय, कायपण बोल! तुकाराम पण fuck off च म्हणाला असता!
आज जायचंच... नेहमीप्रमाणे टायमावर तेपण... अगदी रोजच्यासारखं-प्रामाणिकपणे. . मग बघू... पुढचं पुढे...
मनात हे सगळं ओरडत असताना त्याला येणारा कसलातरी आवाज आता पुन्हा पुन्हा येत होता... बाहेरून... कसलातरी...
त्यानं फॅन बंद केला. आवाज ऐकण्याचा प्रयत्न केला. फडफड होती. त्यानं पटकन खिडकी उघडून बघितलं बाहेर.
बाहेर समोरच्या बिल्डिंगीच्या त्याच्या समोरच्या खिडकीला एक कबूतर उलटं लटकत होतं. कबुतराच्या पायाला मांजा अडकलेला दिसत होता, कुणीतरी त्याला पकडण्यासाठी फास टाकला असणार. बिचारं नेहमीप्रमाणे खिडकीच्या छज्ज्यावर बसायला गेलं आणि अडकलं.
फडफड वाढतच होती. योगीला असह्य झालं. अंतर फक्त पंधरावीस फुटांचंय पण काय करायचं? कसं?
तो समोरच्या खिडकीत कुणी दिसतंय का बघत होता म्हणजे त्याला सहज सोडवता येईल. पण समोर कुणी फिरकतच नव्हतं!
हरामखोर असतात माणसं!
योगी किचनच्या खिडकीतन बघू लागला. आईनं विचारलं,
‘काय बघतोयस, ऑफिसला उशीर होत नाहीय का? चहा ठेवलाय टेबलावर’
‘जायचंय, ते समोर कबूतर अडकलंय खिडकीच्या जाळीला-ते बघ.’
‘अरे हो. पण तू काय करणार? तू जा. उशीर होईल ऑफिसला.’ आई बघत म्हणाली.
‘समोर कुणी दिसतं नाहीय... सांगता येईल काढायला!’
‘मी सांगते. तू जा! कशाला उगाच लेटमार्क?’
‘सांगशील तू? नक्की? दिसल्या दिसल्या सांग!...’
खूप अस्वथ झाला तो. काय करावं काही कळेना. आई तर मागेच लागलीय ‘जा-जा’ करून. गेले तीन दिवस मी कुठे जातोय, तिला काय माहिती? किती निरागस असतात आया... मी जॉब सोडला तर फायनॅन्शियल फरक नाही पडणार, आईला वाईट वाटेल.

---

‘तू काय नको ते टेन्शन घेतोयस... हे असं कामाला जाताना बरं नाही... ’ आई म्हणाली.
‘नक्की काढ त्याला! आणि मला फोन कर!’ कपडे वगैरे करून योगी बाहेर पडला.
डोक्यात फडफड.
तो रिक्षातनं स्टेशनला पोचला.
प्लॅटफॉर्मवर वाट बघत उभा राहिला. एक फास्ट लोकल पलीकडून निघून गेली भजन करत.
त्याला बेक्कार फिलिंग आली.
मी असं यायला नको होतं! माणसं स्वार्थीच राहणार!
डोक्यात पुन्हा फडफड झाली.
माणसानं जॉब नाही केला पाहिजे!
मनात बडबड केली.
त्यानेच फोन केला घरी.
‘अरे आत्ताच काढलं कबूतर!’, आई नॉर्मल म्हणाली.
त्याला एकदम मोकळं वाटलं. सगळी गर्दी एकदम उतरल्यासारखं.
सकाळच्या उन्हाचा एक लहान तुकडा त्याच्या पायाशी आला.
त्यानं बॉसला SMS टाकला - Fuck off.
समोरून त्याची नेहमीची भरलेली ट्रेन निघून गेली भजन करत.
रात्री योगीच्या स्वप्नात एक कुत्रा आला.
याचा काय अर्थ असतो?
सकाळी-सकाळी त्यानं गुगलवर टाईप केलं, ‘DOG IN A DREAM’

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

फ्रस्ट्रेशनची गोष्ट आवडून गेली. न सुटणाऱ्या प्रश्नाला काश्मीर प्रश्न, मधेच ग्यानबा-तुकाराम, खुश कसं होतात वगैरे स्टाईल आवडली. सर्वात धम्माल वाक्य म्हणजे,
आत्म्याला जॉब करायला लावला पाहिजे दहा-दहा-बारा-बारा तास, कळेल त्याला की शरीराचे कसे हाल होतात! मग तो पण अमरत्वाच्या गोष्टी सोडेल आणि समाधी घेईल.
वाचून लोळलो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वयाच्या चोविसाव्या वर्षी इतकं फ्रस्ट्रेशन. अवघड आहे. ROFL

रच्याकने, लेख भारी जमला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0