फोटोफीचर - मिरजेतले सतारमेकर्स

संकीर्ण

फोटोफीचर - मिरजेतले सतारमेकर्स

- इंद्रजित खांबे

सर्व छायाचित्रांचे स्वामित्वहक्क श्री. इंद्रजित खांबे यांचे आहेत. कृपया त्यांच्या परवानगीशिवाय फोटो इतरत्र शेअर करू नयेत.
लेखाच्या शेवटी आणखी दोन छायाचित्रं जोडली आहेत.

सतारी भोपळेसाधारण दहा वर्षांपूर्वीची गोष्ट. झाकीर हुसेन यांचा टीव्हीवर मुलाखतीचा कार्यक्रम चालला होता. त्याचं थेट प्रक्षेपण चालू होतं आणि देशाच्या विविध भागातून त्यांचे चाहते त्यांना फोन करून प्रश्‍न विचारत होते. त्या कार्यक्रमादरम्यान मिरजमधील त्यांच्या एका चाहत्यानं त्यांना प्रश्‍न विचारण्यासाठी फोन केला. आलेला फोन मिरजेहून आहे हे कळताच झाकीर हुसेन यांनी मिरजेची स्तुती सुरू केली. "मिरजेचे सतार, तानपुरे प्रसिद्ध आहेत त्यामुळे मला मिरजेबद्दल विशेष प्रेम आहे", असं झाकीर हुसेन म्हणाले. हे ऐकताच तो माणूस थोडा गोंधळला. कारण त्याला माहीत नव्हतं की मिरजेत सतार बनतात आणि त्या जगभर खूप प्रसिद्ध आहेत. हा किस्सा सांगत होते जीएस म्युझिकल्स या सतार बनवणार्‍या संस्थेचे चौथ्या पिढीचे मालक अल्ताफ मुल्ला. हे सांगताना अल्ताफ मुल्ला यांच्या चेहर्‍यावर निराशेचे भाव होते. "जिथं पिकतं तिथं विकत नाही हेच खरं आहे की नाही?" अल्ताफ मुल्लांनी मला प्रतिप्रश्‍न केला.

मिरजेच्या शनिवार पेठेत तुम्ही गेलात तर प्रत्येक गल्लीबोळात तुम्हाला अशी सतार बनवणारी कारागीर मंडळी दिसतील. दुकानांमध्ये सतार, वीणा, तंबोरे लटकवून ठेवलेले दिसतील. दुकानात पॉलिशचा एक टिपिकल वास भरून राहिलेला जाणवेल आणि प्रत्येक दुकानात साधारण चाळिशीच्या पुढची मंडळी वेगवेगळ्या प्रकारचं काम करताना दिसतील. दुकानाच्या छतावर आणि पोटमाळ्यावर विविध आकाराचे भोपळे टांगून ठेवलेले दिसतील.

001 002

त्याचबरोबर कोपऱ्यांमध्ये अर्धवट तयार झालेल्या सतारी उभ्या करून ठेवलेल्या दिसतील. त्यासोबत लागणारी विविध प्रकारची हत्यारं, कच्चा माल यांचा खच दिसेल. भिंतींवर संगीत क्षेत्रातील विविध प्रसिद्ध वादकांची छायाचित्रं अडकवलेली असतात. सर्व कारागीर अगदी हसतखेळत तुमचं स्वागत करतात. अगदी उत्साहानं तुम्हाला सगळी माहिती देतात आणि एका भोपळ्यापासून विविध टप्पे पार करत सतारीपर्यंतचा प्रवास तुम्हाला सांगतात. यांतील कित्येक कारागिरांनी हे काम वयाच्या १२ ते १५व्या वर्षीच शिकायला सुरुवात केलेली असते. 'पक्ष्याच्या पिल्लाला उडायला शिकवावं लागत नाही तसं आमचं आहे. हे आमच्या रक्तातच आहे', असं अभिमानानं सांगतात.

16

मिरजेच्या वाद्यांचा इतिहास आहे जवळपास पावणेदोनशे वर्षांचा. साधारण १८५०च्या आसपास तो चालू होतो. विजापूर शिखर्जी येथील शिकलगार कुटुंबानं याची पहिल्यांदा सुरुवात केली. भारत हा संस्थानिकांचा देश असतानाच्या काळात या कुटुंबाला कवठेमहांकाळ येथील वतनदारी मिळाली होती. युद्धासाठी लागणारी हत्यारं बनवणं हे या कुटुंबाचं मुख्य वैशिष्ट्य होतं. तिथून या कुटुंबाचे काही सदस्य मिरजेला आले. पण नंतर पटवर्धन संस्थानानं त्यांना राजाश्रय दिला आणि सतारी बनवण्यासाठी प्रोत्साहन दिलं. फरिदसाहेब सतारमेकर हे या व्यवसायाचे आद्य निर्माते. त्यांनी १८५०च्या दरम्यान या व्यवसायाची मुहूर्तमेढ रचली.

१३
सतारेचे आद्यनिर्माते फरिदसाहेब सतारमेकर्स व त्यांच्या पुढील पिढ्यांची डकवलेली छायाचित्रे.

पण या व्यवसायाला आणि मिरजेच्या सतारीला खरी गती आली ती किराणा घराण्याचे संस्थापक आणि प्रसिद्ध गायक अब्दुल करीम खाँसाहेबांच्या काळात. अब्दुल करीम खाँसाहेबांचा जन्म १८७२चा. १९१७च्या आसपास त्यांना एका असाध्य रोगानं जखडलं. काहीच उपाय होईना. मग ते मिरजेच्या मीरसाहेब दर्ग्यात आले, तिथं त्यांनी ध्यानधारणा सुरू केली आणि तिथं त्यांना गुण आला; त्यांची तब्येत सुधारू लागली. मग या श्रद्धेपोटी त्यांनी आपला मुक्काम मिरजेला हलवला. कालांतरानं त्यांनी मिरजेत, हातानं बनलेल्या या सतारीचा जगभर प्रसार केला. संगीत क्षेत्रातल्या कित्येक प्रसिद्ध कलाकारांना ते मिरजेत घेऊन आले. त्यांचा १९३७ साली मृत्यू झाला. आजही त्यांची कबर मिरजेच्या मीरसाहेब दर्ग्यात आहे. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचे चाहते दरवर्षी उरूसाच्या वेळी मिरजेत संगीत महोत्सव आयोजित करतात. देशभरातील कित्येक खाँसाहेब-प्रेमी मंडळी या उरूसाला हजेरी लावतात व आपली कला पेश करतात.

027 028
029 030
मीरसाहेब दर्गा व तिथं असलेली अब्दुलकरीम खाँ साहेबांची कबर.

भोपळ्याच्या एका बीपासून सतारीपर्यंतचा प्रवास खूपच दिलचस्प असाच म्हणावा लागेल. सतारीसाठी जो भोपळा वापरला जातो तो मूळचा आफ्रिकेतला. आफ्रिकेतल्या आदिवासी जमाती याचा वापर मध, दारू, पाणी साठवून ठेवण्यासाठी करत. कालांतरानं इतर गोष्टींसारखाच तो भारतात पोहोचला. पंढरपूर जिल्हामध्ये याचं उत्पन्न घेतलं जातं. हा भोपळा वाढण्यासाठी आणि चांगला वाळण्यासाठी कोरडी जमीन आणि उष्ण वातावरण लागतं. चंद्रभागेच्या काठावरच्या बेगमपूर, सिद्धापूर या खेड्यांमध्ये याची पैदास होते. साधारण श्रावणात याची लागवड होते. हे पीक आठ ते नऊ महिन्यांचं. साधारण मार्चच्या सुमारास पीक तयार होतं. या कालावधीत मिरजेतले सतार बनवणारे व्यावसायिक पंढरपूर, सोलापूरला जाऊन भोपळ्याची खरेदी करून, ते तिथेच वाळण्यासाठी ठेवतात. हा भोपळा वेलीवरच वाळलेला चांगला.

सतार बनविण्याची पूर्ण प्रक्रिया समजावून सांगताना अमीर हम्जा सतारमेकर्स.

वेलीवर चार-पाच भोपळे लागले की शेतकरी ती वेल खुडून, वेलीची वाढ थांबवतात. त्यामुळे वेलीला तोवर लागलेले भोपळे चांगले पोसले जातात आणि त्यांचा आकार मोठा होतो. हा भोपळा चवीला कडू असतो. त्यामुळे माणसं किंवा जनावरं तो खात नाहीत. भोपळ्याचा देठ चांगला वाळला की तो तोडला जातो. साधारण मेपर्यंत भोपळा कडक उन्हामध्ये चांगला वाळला की व्यापारी टेंपोत भरून तो मिरजेला घेऊन येतात. चांगल्या वाळलेल्या भोपळ्याला कीड लागत नाही व तो वजनानेही हलका होतो. भोपळा ओला असेल तर कालांतरानं तो किडू शकतो आणि आकसतो. त्यामुळे वाद्य बनवताना अडचण येते. मे महिन्यात हे भोपळे मिरजेत दाखल झाले की व्यापारी ते आपल्या दुकानात छताला टांगून ठेवतात. पुढची किमान ५० वर्षं या भोपळ्यांना काहीही होत नाही. भोपळा दुकानात दाखल झाल्यापासून वापरात येईपर्यंत आणखी दोन-चार वर्षं निघून जातात. एखाद्या वर्षी जर दुष्काळ पडला तर भोपळ्यांची किंमत भरमसाठ वाढते. मिरजेला दरवर्षी विविध आकाराच्या साधारण दोन हजार भोपळ्यांची आयात होते. हा पुरवठा करून जर भोपळा शिल्लक राहिला तर तो कलकत्त्याला पाठवला जातो. मिरजेशिवाय ही वाद्यं कलकत्ता आणि लखनौलाही बनतात. वाद्यांसाठी लागणारं लाकूड गंध देवदार जातीचं असतं. हे लाकूड वजनाला हलकं व लाल रंगाचं असतं. हे कर्नाटकातील सकलेशपूर जंगलातून येतं. वाद्यांवरती जे नक्षीकाम केलं जातं त्यासाठी पूर्वी हस्तीदंत, सांबरशिंगाचा वापर केला जायचा. परंतु पर्यावरण कायद्यातील अटी कडक झाल्यामुळे आजकाल या प्रकारचा माल वापरला जात नाही. त्याजागी सिंथेटीक मालाचा वापर केला जातो. लाकडाचीही आवक कमी झालीय. सतारीसाठी लागणारा बाकीचा कच्चा माल दिल्ली, मुंबई मार्केटमधून येतो. चांगल्या क्वालिटीची तार (स्ट्रींगज्) अमेरिका, जर्मनीतून आयात केली जाते.

005

004

006
दुकानात छताला टांगलेले व साठा करून ठेवलेले भोपळे


नक्षीकाम समजावून सांगताना शौकत अब्दुल सतारमेकर्स

गेल्या दहा ते पंधरा वर्षात या व्यवसायाने कित्येक स्थित्यंतरं पाहिली. सुरुवातीला इलेक्ट्रॉनिक तंबोऱ्याच्या बाजार प्रवेशामुळे अचानक मोठं संकट कोसळलं. इलेक्ट्रॉनिक तंबोरा स्वस्त व वाहतुकीसाठी सोयीस्कर असल्यामुळे त्यानं कमी कालावधीतच पारंपरिक तंबोऱ्याची जागा बळकावली. त्यामुळे तंबोऱ्याच्या मागणीवर मोठा परिणाम झाला. यामुळे ज्या उद्योगात नऊशे ते हजार कारागीर काम करत होते त्यांची संख्या आज २००वर आलीय. कालांतरानं कलाकारांना इलेक्ट्रॉनिक तंबोऱ्यांचे तोटे लक्षात येऊ लागले आणि परत पारंपरिक तंबोऱ्यांची मागणी वाढू लागली. परंतु आता त्या मागणीचा पुरवठा करण्यासाठी कारागीर कुठून आणायचे? त्यामुळे आज मागणीचा पुरवठा करण्यात मिरजेतले सतारमेकर्स कमी पडत आहेत. पर्यावरण कायद्यातील अटींमुळे लाकूड मिळणं अवघड झालंय, त्यामुळे फायबरपासून बनवलेली वाद्यं बाजारात आलीत.

020
फायबरच्या वीणा टेंपोतून उतरवताना.

परंतु तांत्रिक क्रांती काही तोट्यांसोबत काही फायदेही घेऊन येते तसंच या व्यवसायाचं झालं. जागतिकीकरण, इंटरनेट आणि सोशल मिडियाच्या उदयासोबत या कारागिरांना जगाची बाजारपेठ खुली झाली. अल्ताफ मुल्लांसारख्या नवीन पिढीतील काही सुशिक्षित मंडळींनी याचा योग्य फायदा उठवला. पंडित रवि शंकर, अनुष्का शंकर, विलायक खाँसारख्यांनी सतार जगभरात पोहोचवली. परदेशातील कित्येक लोकांना या वाद्यानं भुरळ पाडली आणि ते याचं शिक्षण घेऊ लागले. त्यामुळे अचानक विलायतेतून या वाद्याला मागणी वाढू लागली. जीएस म्युझिकल्ससोबत अजून तीन-चार व्यावसायिक आपली वाद्यं अमेरीका-युरोप सोबत रशिया, जपानमध्ये पाठवू लागले. या प्रत्येकांनी स्वतःच्या वेबसाईट बनविल्या आणि ते थेट ग्राहकाकडून ऑर्डर्स घेऊ लागले. त्यामुळे एजंट सिस्टम बंद झाली.

019

ग्राहकांची शारीररचना काय आहे, त्यांची उंची, बोटांची लांबी याचा विचार करून प्रत्येकाला कस्टमाईज वाद्यं बनवली जाऊ लागली. इंटरनेटमुळे इमेल, व्हिडीओ कॉलींग यांचा वापर करून वाद्यं बनत असताना प्रत्येक टप्प्यावरचे त्याचे फोटो आणि व्हिडीओ परदेशातील ग्राहकाला पाहता येणं सहज शक्य झालं. त्यातून मिरजेचा म्हणून एक ब्रँड तयार झाला. वस्तूला चांगली किंमत मिळू लागली. परंतु आजही कारागिरांच्या कमतरतेमुळे ही मागणी पुरवताना नाकी नऊ येतात. त्यात वाहतूकी दरम्यान वाद्याला काही मोडतोड झाली तर त्याचा भुर्दंडही सहन करावा लागतो. आपल्या व्यवसायावरील व कलेवरील प्रेमापोटी हे सर्व धोके पत्करून नव्या पिढीचे सतारमेकर्स हा व्यवसाय चालवत आहेत.

नव्या पिढीच्या व्यावसायिकांनी यात उत्तमोत्तम प्रयोग केलेत. परदेशी ग्राहकांमध्ये गिटार जास्त प्रसिद्ध आहे. ज्या गिटार वाजवणाऱ्या कलाकाराला सतार वाजवण्यात रस आहे त्यांच्यासाठी जिटार नावाचं एक फ्यूजन वाद्यही इथे बनतं. या वाद्याची बाकीची रचना सतारीसारखीच असते फक्त ते गिटारीसारखं पातळ असतं. त्याचा आवाज सतारसारखाच. सतारसोबतच वीणा, तंबोरा, सारंगी, दिलरुबा, संतूर, स्वरमंडळ, सूरबहार ही सर्व वाद्यं मिरजेत बनतात. अमीर हम्जा सतारमेकर्स यांनी बनवलेली मोराच्या आकाराची सतार असू दे नाहीतर अल्ताफभाई सितारमेकर्स यांनी बनवलेली शहामृगाच्या अंड्यापासूनची सतार असू दे, त्यांची कलाकुसर पाहताना मंत्रमुग्ध व्हायला होतं. काही परदेशी मंडळी या प्रकारची वाद्यं बनवून घेतात आणि आपल्या संग्रही ठेवतात. या वाद्यांना किंमतही चांगली मिळते.

017 018
मोराच्या आकाराची सतार दाखवताना अमीर हम्जा सतारमेकर्स शहामृगाच्या अंड्यापासून तयार केलेलं वाद्य दाखवताना अल्ताफभाई सतारमेकर्स.

ही वाद्यं बनवण्याचा व्यवसाय काही रोगांनाही निमंत्रण देतो. सतत बसून काम केल्यामुळे कण्याचा आजार आणि संधीवात जवळपास ८० टक्के कारागिरांमध्ये आढळतात. बारीक कलाकुसरीचं काम करणाऱ्या कारागिरांना कालांतरानं डोळ्यांच्या तक्रारी सुरू होतात. दिवसभर बसून काम आणि शरीराला व्यायाम नसल्यामुळे स्थूलता, रक्तदाब हे आजारही आढळतात. सरकारकडून कोणत्याही प्रकारची आरोग्य सुविधा या कारागिरांना मिळत नाही. खाजगी विमा कंपन्यांचे हप्ते या कारागिरांच्या आवाक्याबाहेर असतात. विमा कंपन्यांच्या पॉलिसीतून हे आजारही वगळलेले असतात. या कामानिमित्ताने मी ज्यांची भेट घेतली ते अमीर हम्जा सतारमेकर्स यांचं ११ ऑक्टोबर रोजी ह्रदयविकाराने निधन झालं. आठवड्यापूर्वी ज्यांच्यासोबत मी पूर्ण दिवस घालवून सतारीविषयी जाणून घेतलं त्यांच्या मृत्यूवर आजही माझा विश्‍वास बसत नाही.


014 015
अमीर हम्जा सतारमेकर्स संगीत अकादमी पुरस्कार दाखवताना. ११ ऑक्टोबर रोजी त्यांचं ह्रदयविकाराने निधन झालं. अत्यंत आजारी अवस्थेत काम करणारे ८५ वर्षीय अब्दुल रहमान आबासाहेब सतारमेकर्स.

सतार बनवणारे कारागीर गेल्या दशकात ७५ टक्के कमी झाले. त्यामुळे मागणीएवढा पुरवठा करणं अवघड होऊन बसलंय. त्यात नवीन पिढीच्या लोकांचा कल या व्यवसायाकडे नाही. सतार वाजवणारे प्रसिद्ध होतात; पैसा, प्रसिद्धी कमवितात आणि आम्ही वर्षांनुवर्षं गरीबीत अडकून पडतो हे सत्य त्यांना बोचतं. त्यामुळे नवीन पिढीतले कित्येक लोक सतार बनविण्याऐवजी ती वाजवण्यात जास्त रस घेताना आढळून येतात.

अल्ताफभाई सतारमेकर्स यांचे १५ वर्षीय चिरंजीव मुजम्मील, सतारवादन करून दाखवताना. मुजम्मील गेलं वर्षभर सतार वादन शिकत आहत व त्यांना या व्यवसायात फारसा रस नाही.

त्याचसोबत सतार बनवण्यापेक्षा त्याच्या व्यापारात कमी कष्ट व जास्त फायदा दिसतो. त्यामुळे मिरजेत कित्येक व्यावसायिकांनी वाद्य बनविण्याऐवजी ती विक्री करण्याची दुकानं उघडलीत.

012 012
मिरजेतील सतारीसोबतच इतर पाश्चिमात्य वाद्यं विकणारी दुकानं.

लाकूड व इतर कच्च्या मालाच्या कमतरतेमुळे फायबरची वाद्यंही आपलं बस्तान बसवू लागलीत. एका सतारीची किंमत साधारण पंधरा हजारापासून सुरू होते. परंतु त्यासाठी सात-आठ कारागीर महिनाभर काम करत असतात. या सगळ्याचा हिशोब घातला तर प्रत्येक कारागिराला दिवसाचे १४ तास काम करून महिन्याकाठी १० ते १२ हजार रूपयेच मिळतात; जी रक्कम त्यांचा संसार, मुलांचं शिक्षण, घरगुती आजारपण यासाठी पुरत नाही. त्यातून वैफल्य येतं; दिवसेंदिवस हे कारागीर गरीबीत लोटले जातात. त्यातून व्यसनाधीनताही वाढत जाते.

या सर्व परिस्थितीत या व्यावसायिकांचं भविष्य काय असेल हे आज नक्की सांगता येणार नाही. नवीन पिढीला यात रस नाही आणि जुन्या पिढीलाही असं वाटत नाही की आपल्या मुलांनी या व्यवसायात यावं. आम्हाला 'हे' सोडून काही येत नाही आणि माझ्या मुलांनी यात यावं असं मला वाटत नाही, असं अल्ताफभाई कोरडेपणानं सांगतात. येत्या १० वर्षांत हा व्यवसाय पूर्णतः बंद पडेल असं चाळfशीच्या घरात असलेले जीएस म्युझिकल्सचे अल्ताफ मुल्ला सांगतात. सतारमेकर्सची संपूर्ण पिढी भूतकाळात रममाण आहे. प्रत्येकाच्या घरात दिग्गज कलाकारांसोबतच्या तसबिरी, पत्रं, पुरस्कार आहेत.

009 010

सतारीवरील नक्षीकामावरून सतारमेकर्स आपली सतार ओळखतात. अशाच काही सतारींचे वर्तमानपत्रात आलेले फोटो सतारमेकर्सनी आपल्या दुकानांत चिटकवलेले आहेत.

परंतु या गोष्टींमुळे पोट कसं भरणार, हे सत्य नव्या पिढीचे लोक जाणतात. त्यामुळे आपल्या घराण्याच्या उज्जवल परंपरेचे पोवाडे गाण्यापेक्षा आजच्या काळाशी कसं जुळवून घेता येईल याचं भान नवीन पिढीला आहे; ही नवीन पिढीच या परंपरा यशस्वीपणे पुढे घेऊन जाईल अशी आशा करायला हरकत नाही.

023 024

अल्ताफभाई सतारमेकर्स यांच्याकडील जुन्या अल्बममधील काही संग्रहीत छायाचित्रे.

अन्य काही छायाचित्रे

032


022 033

007

026 036

008


शिळोप्याच्या गप्पा 038
विशेषांक प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (4 votes)

प्रतिक्रिया

वाह ! अप्रतिम ! सतार काय तबला काय , एकूणातच वाद्य बनवणाऱ्या कारागिरांबद्दल कमालीचं अज्ञान आहे आपल्याकडे. त्यांच्या समस्यांबद्दल आपण अजिबात जागरूक नाही आहोत. तबल्याची उत्तम ओढ काढण्याचं कसब असणारे कारागीर अगदीच फुटकळ असे पैसे कमावतात , हां आता तो तबला एखाद्या स्टारवादकाचा असेल तर गोष्ट वेगळी ! हे फोटो फीचर वाद्य बनवण्याच्या अनेक अंगांवर प्रकाश टाकतं ही फार महत्वाची गोष्ट आहे.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Observer is the observed

मिरजेच्या या अभिमानास्पद पैलूबद्दल लेख लिहून मिरजेच्या प्रसिद्धीत काकणभर भर घातल्याबद्दल लेखकाचे अनेक धन्यवाद!!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अप्रतिम!
या सतारीबद्दल बॅटमॅनला प्रश्न विचारला होता तीन वर्षांपूर्वी. चांगला भोपळा नदीच्या गाळात होतो. लाहोर,पंजाबातून ही कला इकडे आली.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

महत्त्वपूर्ण, दुर्लक्षित आणि लयाला जाऊ पाहणाऱ्या कलेबद्दलचा हा चांगला लेख सी. घे. वा. ग. ना. कारण को.स. ही हतबलता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्त लेख

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकच लंबर विषय घेतलाय.
सतारमेकरांकडे लै वेळ बसून कला पाह्यलिय मिरजेत.
फोटोतलं दारिद्र्य मात्र बघवत नाही. प्रत्यक्षातही तेच असतं. त्रास होतो पाहून.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फारच छान माहिती!

फोटोज १ नंबरच! तुमचे कोल्हापुरच्या तालमीवरचे फोटोजही तसेच जबरदस्त आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उत्कृष्ट फोटोज + व्हिडिओ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मिरजेला सतारी बनतात, हे वाचून माहित होते. पण इतका सचित्र, परिपूर्ण माहिती देणारा लेख प्रथमच वाचला. फोटो आणि लेख उत्तम!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही जंतुंची इतकी गर्दी जगात आहे का रास्त |
भरती विषाणुंचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त ||

सतारगीरांचं चित्रमय जगत् खिन्न करणारं आहे. खांबे नेहमीप्रमाणेच वेधक.
आभार!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फोटो अतिशय आवडले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

या लोकांनी वायोलिन बनवायला सुरू करायला हवं. त्याला मागणी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अशीच आहिती: मिरज आणि कलकत्ता अशी दोन सतार तयार करण्याची दोन सेंटर आहेत भारतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

इंद्रजितकडून आलेले आणखी दोन फोटो लेखाच्या शेवटी जोडले आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सगळेच फोटो आणि सोबतचा लेख आवडले, एवढंच नाही, विचार करायला भाग पाडलं. मात्र शेवटच्या दोन फोटोंबद्दल -

शेवटच्या (आडव्या) फोटोत त्यांचं घरगुती आयुष्य दिसतंय. सतारी बनवतात, स्वतःचं आणि या उद्योगाचं भविष्य काय याबद्दल प्रश्न आहेत मात्र रोजचं आयुष्य तसं समाधानी आहे, तशी शांतता या फोटोतून जाणवते. सतारींच्या उद्योगात फक्त पुरुषच आहेत, मात्र घरातल्या स्त्रियांचं अस्तित्व त्यात जाणवतं. आधीचे सगळे फोटो दिवसाउजेडी काढलेले, त्यांतला पार्श्वभूमीचा निळा रंग आणि या फोटोतमात्र दिव्याचा पिवळा उजेड, त्यातून जाणवणारी उब, फोटोत दोन पिढींतल्या स्त्रियाही दिसणं ...

सगळ्यात जास्त आवडला तो शेवटच्या ओळीतला उभा फोटो. सतारी, वाद्यं बनवणं हे काम आहे, तो आयुष्याचा एक भाग आहे. तसंच या दोन आज्यांनी शिळोप्याच्या गप्पा मारणं हासुद्धा आयुष्याचा एक भाग आहे. दुसरा भाग त्यातले रंग आणि सतारी पार्श्वभूमीला असणं. थंड-निळ्या पार्श्वभूमीला असणारी वाद्यं - वाद्य बनवण्याचा उद्योग उद्या असेल किंवा नसेल, मात्र समोर उबदार रंगात दिसणारं वार्ध्यक्य शाश्वत आहे.

फार सुंदर लेख आणि फोटो. इंद्रजितची दृष्टी सगळ्यांनाच असेल असं नाही; मात्र त्याचा दृष्टिकोन सगळ्यांना दाखवता येतो, याबद्दल तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेचाही आनंद झाला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

घरी जाऊन असे फोटो काढण्यासाठी खूप संपर्क आणि विश्वास निर्माण करावा लागतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अत्यंत अथक परिश्रमाने लिहीलेला लेख. वर्णनच इतकं सचित्र आहे की प्रकाशचित्रांमुळे लेख अधिकच सजीव झालेला आहे. तीही अप्रतिम. सतार बनवण्याचा प्रत्येक टप्पा, कामगारांचं आयुष्य, अडचणी बारकाईने विशद केल्यामुळे हा लेख संदर्भग्रंथातही शोभून दिसेल. माझ्याकडून पंचतारांकन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is for sissies.

सुंदर लेख आणि छायाचित्रे. तानपुऱ्यांशी संबंध आल्याने मिरजेबद्दल ठाऊक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अथक परिश्रमाने लिहीलेला लेख आवडला आणि खिन्नही करुन गेला. पण कालापुढे कोणाचे काही चालत नाही. गेले ते दिवस उरल्या त्या आठवणी बाकी काय !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0