खास रे : ट्रेंड बघून खास ब्लेंड

संकल्पना

खास रे : ट्रेंड बघून खास ब्लेंड

- खास रे

संपादकीय नोंद:
लोककलेबद्दल बाळकृष्ण लळीत लिहितात, सीतास्वयंवरात महागाईबद्दल पात्रं बोलायला लागली तरी "पौराणिक पात्रांचे असे कालविसंगत बोलणे असले तरी प्रेक्षकांना त्यात वावगे वाटत नाही." नरेंद्र मोदी आणि ट्रंप(तात्या) एकाच कॉलेजात शिकले, अशा छापाची स्थल-कालविसंगत वाक्यं व्हिडिओत दिसली की लोक हसतात. एका परीनं डब केलेले व्हिडिओ, आणि नरेंद्र मोदींनी इस्रायलहून धनंजय मानेंसाठी डायबिटीसचं औषध आणण्याच्या मीम्समध्ये लोकांना वावगं वाटत नाही. हे व्हिडिओ आणि मीम्स आजच्या लोककला आहेत.

‘ट्रंपतात्या हे पात्र प्रसिद्ध करणाऱ्या,’ ‘खास रे खास’ हे फेसबुक पान आणि ‘खास रे’ हा यूट्यूब चॅनल सुरू करणाऱ्या संजयची मुलाखत ऐसी अक्षरेनं घेतली.

डॅशी : तुझं शिक्षण, तू कुठचा याबद्दल माहिती देशील का?

संजय : माझा जन्म पुण्याचा, आई पुण्याची. वडील बार्शी, सोलापूरचे. बार्शीलाच संपूर्ण कुटुंब आहे. वडील माध्यमिक शाळेत शिक्षक आहेत. आई घरीच असते. पहिलीपासून सगळं शिक्षण बार्शीला झालं.

जंतू : तुमच्या व्हिडिओंमध्ये जो आवाज, हेल असतो तो सगळा बार्शीचा का?

संजय : हो. मला पुण्यात शिकण्याची इच्छा होती. मी दहावी झाल्यावर डि्प्लोमासाठी पुण्यात सिंहगड कॉलेजला होतो. तिसऱ्या वर्षाला असताना व्हिडिओ प्रॉडक्शन करत होतो; माझी शॉर्टफिल्म पुणे, गोवा, अशा दोन-तीन ठिकाणी शॉर्टफिल्म फेस्टिवलसाठी निवडली गेली. डिप्लोमाचा थोडासा बॅकलॉगही होता. मग डिप्लोमाचा प्लॅन बदलला. पुन्हा बारावी केलं. पुढे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून मी बी. ए. झालो.

सुरुवातीला छोटे व्हिडिओ एडिट करायचो. आमच्या ग्रूपमध्ये दोन-तीन लोक होते. 'राजा शिवछत्रपती' म्हणून सिरीयल आहे, त्याचं गाणं किंवा नाना पाटेकरचं नॅरेशनचं जे फुटेज आहे गरूड उडतानाचं, त्यावर आपलं फुटेज लावणं असे प्रकार केले. त्यासाठी फोनचा कॅमेरा वापरायचो. मूव्हीमेकरवर डेव्हलप करायचो. तेव्हा सॉफ्टवेअरची फार माहिती नव्हती.

जंतू : गावामध्ये सिनेमा सोडून करमणुकीच्या गोष्टी असायच्या का?

भाषणं, निबंध लेखनाच्या, चित्रकलेच्या स्पर्धा वगैरे असायच्या. चित्रकलेच्या इंटरमिजिएट वगैरे परीक्षा मी पास झालोय. व्हिडिओ एडिटिंग वगैरे शाळेत असताना काही माहीत नव्हतं. मला तेव्हा व्हिडिओत रस नव्हता. फिल्म्सही बोअर व्हायचा. 'उडान' सिनेमा बघितला, त्यात मुलाला लेखक व्हायचं असतं, ते बघितल्यानंतर फिल्मबद्दल काही लक्षात यायला लागलं. मग ते पुढे वाढलं. मग अनुराग कश्यपच्या सगळ्याच फिल्म्स बघितल्या.

कोणा नेत्याचा वाढदिवस, निवडणुकांच्या तोंडावर गावात तमाशा वगैरे असायचा. किंवा पथनाट्य, वगैरे. आमच्या व्हिडिओमध्ये आम्ही जे दाखवतो ते आम्ही जे बघितलेलं आहे त्यावरून येतं. ट्रंप अमेरिकेचा अध्यक्ष त्याला दूध संघाचा अध्यक्ष बनवतो, असं काही. ‘बबन’ फिल्ममध्येही तेच केलंय.

डॅशी :खान मंडळी, किंवा अमुक हिरॉईन, किंवा सिनेमा, संगीत असं काही खूप आवडलं का?

मला रॅप आवडायचं.

स्नेहा खानविलकरचं संगीत आवडतं. आपले भारतीय आवाज, सैराट, फँड्रीमुळे हलगी, अजय-अतुलमुळे ढोलताशे ऐकू येतात; ते आवडतात.

तर फेसबुकवर पब्लिक फोटो टाकायला लागलं. भारी काही असेल तर आधी ते आवडायचं. मग समजायला लागलं, फोटोत काही गोष्ट असेल, त्यातून काही सांगायचं असेल तर ते बघायला लागलो. मी आणि एका मित्रानं एक महिनाभर रोज तीन तास घालवून एका रस्त्यावर बसून सगळ्या गोष्टींचे फोटो काढले. माझा एक मित्र आहे सचिन, त्याचा मोठा भाऊ व्हिडिओ एडिट करायचा. त्यानं मला हॅरी पॉटरचा व्हिडिओ घेऊन दाखवलं तो कसा एडिट करतो ते. माझंही व्हिडिओ एडिटींग तिथपासून सुरू झालं.

मग 'राजा शिवछत्रपती' मालिकेचं बोललो ते. मग 'शूर आम्ही सरदार' गाण्यावरती मालिकेतले मावळ्यांचे सीन्स एडिट केले. सध्या जसा वेबसिरीजचा बोलबाला आहे तसा २०१०-१२ हा काळ शॉर्टफिल्मचा होता. हे जेवढं इंटरनेटवरून शिकता येईल, माहिती मिळवता येईल त्यातून मी स्वतः शिकत गेलो. स्क्रिप्ट कशी लिहायची, सीन्स कसे असतात, डायलॉग कसे असतात, अशा अनेक गोष्टी. स्क्रिप्ट पातळीवर जेवढं काम चांगलं करता येईल तितकं चांगलं, हे शिकलो. मग मी शॉर्टफिल्म बनवली. ती पुणे शॉर्टफिल्म फेस्टिवलला निवडली गेली.

डॅशी :आता थोडं ट्रंपतात्याबद्दल बोलू. कशामुळे हे सुरू झालं? हे नक्की काय आहे?

संजय : ट्रंपतात्या हे मुळात ‘खास रे’ टीव्हीचं पात्र होतं. शॉर्टफिल्मवर काम करत होतो. पण ‘कास्टिंग काऊच’ सुरू झालं होतं. ‘बॅकबेंचर्स’ नावाची सिरीज होती. साधारण २०१६मध्ये. सोशल मिडीयावर जेवढ्या पटापट या गोष्टी शेअर होत होत्या, ते पाहून आपणही असं करू शकतो, हे लक्षात आलं. शॉर्टफिल्म फेस्टिवलपुरत्या मर्यादित राहतात. त्यांना पुढे काही आयुष्यच नाही. सोशल मिडीयावर, फेसबुकवर पेज बनवूया असा विचार केला. आमच्या भागातल्या मुलाचं एक फेसबुक पेज आहे. त्यावर इंजिनियरींगच्या मुलांवर विनोद टाकायचे. त्यावर बऱ्याच फिल्म्सचं प्रमोशन केलं. इंजिनियरींगच्या क्लासेसच्या जाहिराती घातल्या. आपल्या भागातल्या पोरांनी नॅशनल लेव्हलचं पेज बनवलंय, हे मी 'एबीपी माझा'वर बघितलं. या ऑडियन्सपर्यंत पोहोचता येईल असा विचार मी केला.

सोशल मिडीयावर वर्षभर काही प्रयत्न करू बघू, असं मी ठरवलं. शाबासकी द्यायला म्हणून 'खास रे' असा शब्द कुठेही वापरता येतो. म्हणजे ते खवचटपणेसुद्धा म्हणता येतं आणि मनापासून शाबासकी द्यायची असेल तरीही म्हणता येतं. हिंदीमध्येही हा शब्द चालतो. उद्या काही हिंदीत काही करायचं ठरवलं तर नावामुळे अडचण नको, म्हणूनही हा शब्द वापरला. ट्रंपतात्याला अशी सुरुवात झाली.

जंतू : सुरुवातीला त्यात कोण कोण होतं?

संजय : मी आणि विश्वनाथ म्हणून माझा एक मित्र, असे आम्ही दोघं होतो. त्यावेळी 'बाहुबली-२' प्रदर्शित झाला होता. 'कट्टप्पानं बाहुबलीला का मारलं' यावर आख्खं इंटरनेट वेडं झालं होतं. लोक त्यावर प्रतिक्रिया देत होते. रिव्ह्यूजचे व्हिडिओ यायला लागले. 'बाहुबली-२'वर व्हिडिओ बनवला तर तो ट्रेंड होईल, व्हायरल होईल, याची मला १००% खात्री पटली. मुळातून काही बनवायचं तर त्याला लोकांपर्यंत पोचवायला वेळ लागला असता. ते नशीबावर अवलंबून असतं.

त्याच वेळी डॉनल्ड ट्रंपनं सोशल मिडीया काबीज केलं होतं. ट्विटरवर डॉनल्डट्रंप हा हॅशटॅग ट्रेंडिंग होता. यूट्यूबवर बाहुबली. मग ते दोन्ही ब्लेंड केले. डॉनल्ड ट्रंप बाहुबलीसारखा बनवला. पुढे मला त्यात बरीच पात्रं आणायची होती. ओबामा, पुतीन, बरेच. तर मी डॉनल्ड ट्रंपला प्रश्न विचारले तर त्याची काय उत्तरं येतील? मी किरकोळ प्रश्न विचारले तर तशीच उत्तरं येतील. तसा पहिला व्हिडिओ बनवला.

रिव्ह्यू लिहायला लागला तर तो फार तांत्रिक बनवायचा नाही असं मी ठरवलं. गावाच्या कट्ट्यावर, चौकात, टपरीवर बसून पोरं जसा रिव्ह्यू देतात, तसं लिहिलं. चर्चा वाटली पाहिजे. "कट्टापाचं असं झालं. हजारो कोटी कसले वापरता, माझा पिच्चर पाहा. मला तिकिटं मिळाली नाहीत. मग मोदीला फोन केला..." तो व्हिडिओ व्हायरल झाला.

जंतू : तुम्ही हे करत होतात, तेव्हा हे सगळं एवढं मोठं आणि व्हायरल होईल असा अंदाज होता का?

संजय : तसा अंदाज होता. पण एवढं व्हायरल होईल असं वाटलं नव्हतं. प्रत्येकाच्याच मोबाईलमध्ये तो व्हिडिओ. लाख-दोन लाख लोक पाहतील अशी अपेक्षा होती. पण दहा लाख लोकांनी तो व्हिडिओ बघितला. फेसबुक, यूट्यूब मिळून.

‘ट्रंपतात्या’ हे नाव आम्ही ठेवलेलं नाही. त्या नावाचं पेज फेसबुकवर आधीच अस्तित्वात होतं. अमित वानखेडे नावाचे शिक्षक आहेत. त्यांचं ते पान. ते विदर्भातले, म्हणून ट्रंपला तात्या केलं. व्हिडिओखाली आम्ही डोनाल्डतात्या वगैरे उल्लेख केले, पण हॅशटॅगमध्ये ‘ट्रंपतात्या’ असा उल्लेख नव्हता. त्यात डॉनल्डट्रंप असंच म्हटलं. ‘ट्रंपतात्या’ हे नाव फारच दिलखेचक आहे. आम्ही ते नाव इतर पात्रांच्या तोंडी ते नाव घातलं.

जंतू : पहिला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर?

२९ एप्रिल २०१७ला पहिला व्हिडिओ टाकला. लगेच दोन दिवसांनी महाराष्ट्र दिन. तेव्हा डॉनल्ड ट्रंप म्हणतोय, "थ्यँक्यू, मला एवढा सपोर्ट दिला... महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा" असा व्हिडिओ टाकला. मग निखिल वागळेंसोबत 'दिलखुलास डॉनल्ड' अशा मुलाखतीचा व्हिडिओ बनवला. त्यात ग्रेटभेटची शैली वापरली. ट्रंपच्या आयुष्यावर दिलखुलास गप्पा होत्या. 'डॉनल्ड, प्रवास कसा झाला; तू अमेरिकेत गेल्यावर तुझ्यात काय बदल झाले', असे प्रश्न त्यात होते. मध्येच एकदम 'तुला पित्ताचा त्रासही झाला होता' असाही प्रश्न होता. त्यावर ट्रंपही, 'गड्या, तुला तर माहीतच आहे. मला सुपारीचंही व्यसन आहे.' हे पब्लिकला आवडलं. गावाचं नाव घेतलं की किमान तिथला प्रेक्षकवर्ग मिळतो. असा तो व्हिडिओ आहे.

जंतू : तुमची डबिंगची स्टाईल अशी आहे की ज्याची मुलाखत घेतली जाते, तोही तुमच्याच शैलीत बोलतो. हे करणारे तुम्ही एकटेच आहात की आणखी कोणी आहे?

संजय : आम्ही सुरू केलं तेव्हा एकटेच होतो. सहा-सात महिन्यांनंतर बरेच लोक आले. नंतर फक्त ट्रंपतात्या, ट्रंपवरच व्हिडिओ बनवणारे खूप चॅनल आले. 'खास रे, आता बास रे' अशा नावाचा चॅनलही आला.

आपल्या देशातलं राजकीय वातावरण असंं झालंय की, लोकांना आपल्या नेत्याविरुद्ध तिरस्कार वाटायला लागला आहे. अशा परिस्थितीत दुसऱ्या देशातला नेता टिंगल करण्यासाठी योग्य वाटायला लागला आहे. त्याबद्दल मी लेख लिहिला होता. ट्रंपतात्या विधानसभेत मतदारसंघातून निवडून जातो. त्या लेखाला ७००-८०० कॉमेंट्स होत्या. ते पात्र लोकांना आवडलं.

डॅशी :समाजातल्या कोणत्या प्रश्नांकडे तू आकर्षित होतोस? आजूबाजूला बरंच काही घडत असतं, याचं काही तरी करावं, हा निर्णय कसा घेतोस?

संजय : ज्या देशात तरुण लोकसंख्या बरीच असेल तर तो देश भरभर पुढे जाऊ शकतो.

२०२०मध्ये भारत विकसित देश असेल असं स्वप्न होतं. इंटरनेटमुळे कामं खूप वेगानं व्हायला लागली. ९०% भारतीय तरुण समाज इंटरनेटवर टाईमपाससाठी गेलेला असतो. उगाच फोटो एडिट करायचे, संगीताचं काहीबाही करतात. ही सामाजिक समस्या आहे असं मला वाटतं. या अशा गोष्टी खूप पसरतात, शेअर होतात. लोक हसण्यासाठी या गोष्टी पाहतात. त्याबद्दल आम्ही 'यूपॉझिटिव्ह' नावाचा व्हिडिओ बनवला. फेसबुकच्या फ्रेंडलिस्टमध्ये कोणी यूपॉझिटिव्ह लोक असतील तर त्यांच्यापासून सावध राहा.

इंटरनेटवर, यूट्यूब-फेसबुक वगैरेंवर मला किती फॉलोइंग आहे, किती लोक लाईक करतात, किती शेअर होतात, यावर गोष्टी अवलंबून आहेत. हे आभासी जग आहे. त्यात कायमस्वरूपी असं काही नाही. भारतामध्ये विविधततेतून एकता कुठे आहे असं म्हणतात. आता जातीपातींचे मोर्चे निघायला लागलेत. असे काही विषय आहेत त्याला आम्ही हात घालू शकत नाही. त्यासाठी जेवढी क्षमता लागेल तेवढी अजून आमच्याकडे नाही. त्यात थोडीही चूक झाली तर ती अंगलट येणार.

तरुण लोकांत ज्या गोष्टींबद्दल गैरसमज आहेत; किंवा भ्रामक कल्पना आहेत, ते विषय मला महत्त्वाचे वाटतात. कोणता राजकीय नेता चुकला, याविरोधात उगाच 'याला अक्कल आहे का' छापाचं काही बोलायचं, हे मला ठीक वाटत नाही.

शिवजयंतीच्या वेळेस मराठा-ब्राह्मण शीतयुद्ध सुरू होतं. त्याला ऑफलाईन संदर्भ होते. आम्ही त्यावर व्हिडिओ बनवला. आंबेडकरांची मूर्ती आणि शिवाजीची मूर्ती एकाच खोलीत असतात. त्या अंधाऱ्या खोलीत शिवाजी आणि आंबेडकर भीमा-कोरेगांव घटनेवरून चर्चा करतात. शिवाजी महाराज म्हणतात, "मी अठरापगड जातींसाठी स्वराज्य स्थापन केलं." आंबेडकर म्हणतात, "मी भारताचं संविधान बनवताना अशा गोष्टींची कल्पना केली नव्हती." आपण कुठे चुकलो, याबद्दल ते दोघे चर्चा करतात. प्रश्नांचा डोंगर तयार होतो. बाहेर तरुण मुलं डीजेवर नाचत असतात.

या अशा व्हिडिओंपेक्षा व्हायरल व्हिडिओजना अधिक प्रतिसाद मिळतो.

जंतू : एखादी गोष्ट लोकांपर्यंत पोहोचत्ये, हे तुम्हांला कसं कळत गेलं?

संजय : मराठीत डबिंगवर चालवलं जाणारं चॅनल नव्हतं. इंग्लिश पात्र मराठी बोलतंय, हे लोकांना आवडलं. त्यानंतर ती लिंक लागत गेली.

डॅशी :पूर्वी लोककलाकार अशी कामं करायचे. उपहास, उपरोध अशा प्रकारच्या गोष्टी वापरून सामाजिक, राजकीय भाष्य करणं. तू किंवा तुझ्यासारखं काम करणारे लोक, हे असं काम करत आहात, असं वाटतं का? तुमचा फॉर्म तेवढा आजचा आहे.

संजय : नक्कीच. हे मला माझं वाटलं पाहिजे, तर मी लोकांपर्यंत पोहोचतो. मी महाराष्ट्राचा ट्रंप वाटलो, तर लोक पाहतात. फक्त डॉनल्ड ट्रंप किंवा बराक ओबामा काही बोलतो, असं म्हटलं तर लोक येत नाहीत. मात्र सातारच्या पद्धतीनं बराकआबा ओबामा म्हटलं तर लोक पाहतील.

पोतराज, हलगी, लेझिम या गोष्टी आम्ही बघितल्या. त्या योग्य प्रकारे वापरल्या की त्या लोकांना आवडतात, चालतात. किंवा ट्रंप भारत-पाकिस्तान मॅचच्या वेळेस एंट्री मारतो, हलगीच्या आवाजावर. इथला राजकीय नेता एंट्री घेतानाही हलगी वाजते. गुलाल उधळतात. ओवाळलं जातं. ट्रंपतात्याचंही तसंच केलं. कपडे बदलले, स्टोरी बदलली, पण हलगीचा आवाज तसाच ठेवला.

संपादकीय नोंद - मूळ व्हिडिओ यूट्यूब नियमावलीमुळे मिळत नाही. तशाच प्रकारचा हा व्हिडिओ.

पुण्यात क्रिकेटच्या स्पर्धा होतात. तशा मंगळवेढा चषकमध्ये ट्रंपनं चांगली बॅटिंग केली होती, असं म्हटलं. चषक म्हटल्यावर कुठलीही छोटी गोष्ट घेतली आणि त्यात टाकली.

डॅशी :अशा प्रकारची काही माणसं, पात्र बार्शी किंवा पुण्यात तुझ्या आजूबाजूला होती का, की त्यांची भाषा किंवा काही तू या व्हिडिओंत आणलंस?

संजय : ओबामा किंवा ट्रंप ज्या पात्रांची नावं घेतात, पप्या, पांडबा, पिंट्या, चंकी, वसंता ही आमच्या लोकांचीच नावं आहेत. व्हिडिओत वसंताकडे कोणी तरी आलं होतं, असा संवाद असतो, तेव्हा ते प्रत्यक्षात घडलेल्या प्रसंगावरून काही बनवलेलं असतं. बायपासवरून येत होतो, तेव्हा गाडी पंक्चर झाली, तेव्हा मला समजलं आपली काय जिंदगी आहे! या गोष्टी व्हिडिओत आहेत.

'नार्कोस'वर आम्ही पाब्लोची सिरीज केली. तो पोलिसांना सांगतो, मी कोण आहे. पाब्लो म्हणतो, "शिंदे, परवा तुमचं लग्न झाल्याचं कळलं. जा थोडे दिवस महाबळेश्वरला." मुळात पाब्लो धमकी देऊन जातो.

किंवा आम्हाला पुण्या-मुंबईचा संदर्भ घेऊन काही म्हणायचं असेल तर उदा. आम्ही "मुंबईवरून मृण्मयी आली आहे" असं म्हणतो. कारण, मुंबई-पुण्याची मुलगी म्हटलं की तेच नाव आठवतं.

डॅशी :या सगळ्या व्हिडिओंमध्ये भाषेमुळे, तुमच्या निरनिराळ्या बोलींमुळे गंमत आहे. त्याबद्दल सांग.

संजय : आतापर्यंत या गोष्टी पुण्यातून केल्या गेल्या. टिव्ही, पेपर, सिनेमा सगळीकडे मराठी भाषा म्हणजे पुण्याची. पुस्तकी आहे. मकरंद अनासपुरे, फँड्री, नटरंग, सैराट अशांमुळे बदल दिसायला लागले. मालिकांमध्ये अशी काही भाषा असते ती मूळ बोलींची थट्टा असते. 'मी'ला ते 'म्या'च म्हणणार. त्याची गरज नाहीये. 'माह्या घरी या' असं कोणी म्हणत नाही. "तुम्ही या माझ्या घरी" असं म्हणतात. ते सगळं आव आणल्यासारखं वाटतं.

आम्ही वापरतो ती पोरांमध्ये, चौकाचौकांमध्ये, इलेक्शनच्या सभांमध्ये बोलली जाणारी भाषा आहे. ती इंटरनेटवर आल्यावर लोक थक्क झाले. बार्शीतल्या लोकांना 'ही आपली भाषा' असं लगेच वाटतं. त्यात आव आणून बोललं जात नाही. त्यात मजा राहिली.

डॅशी :विनोद या गोष्टीकडे, उपरोध, उपहास, याचा विचार कसा करतोस? विनोद करणं ही गंभीर घटना असते. बऱ्याच वेळा गंभीर घटनेवरही विनोदी कसं लिहितोस?

संजय : लोकं हसली तर तो विनोद झाला, एवढीच माझी व्याख्या आहे.

पुणे विरुद्ध मुंबई असा वाद असतो; हा भांडणतंटा नव्हे. आयपीएलची मॅच होती पुणे विरुद्ध मुंबई त्यावर व्हिडिओ बनवला. मुंबई म्हटलं की वडापाव आणि पुणे म्हटलं की मिसळपाव; तर पाव ही गोष्ट मांडत गेला. त्याचा जोक बनवला.

एखाद्या गोष्टीवर दोन-चार जोक करायचे असतील तर ते जवळ घ्यावं लागतं. एकाद्या जोकमध्येच उडवायचं असेल तर तसा विचार करावा लागतो. जी गोष्ट ट्रेंडमध्ये आहे, ती आपल्या पद्धतीमध्ये, विचारांत ब्लेंड करायची. त्यातून जोक तयार होतात.

आता आम्ही जॅमिंग सेशन करतो. एखादा मुद्दा असतो. आम्ही चार-पाच लोकांची टीम त्यावर विचार करायला बसते. रँडम बोलायचं त्याबद्दल. माणूस बोलतो, त्याला आणखी डाऊन करत राहायचं, अशी आमची पद्धत. आता ‘होम स्वीट होम’ सिनेमा आला होता तेव्हा आम्ही स्पृहा जोशी आणि हृषिकेश जोशीला घेऊन एक व्हिडिओ केला. ह्या सगळ्या जोशी टाईप पब्लिकला आम्ही 'खच्ची पब्लिक' म्हणतो. म्हणजे हेच पाहा, की आमच्या व्हिडिओत स्पृहा म्हणते, "मला दादरची हवा खूप आवडते." अरे काय! म्हणून मग आम्ही खाली लाईन देतो, "म्हणजे आम्ही येडे - हवामान खातं." हे एक उदाहरण.

डॅशी :तुझ्या कामाची प्रक्रिया काय असते? कुठले व्हिडिओ, कोणत्या इमेजेस निवडता? काही उदाहरण देऊ शकशील का?

संजय : शाळा सुरू झाल्यात सगळ्या. क्लासेस सुरू होणार'. डॉनल्ड ट्रंप करियर कोचिंग करणारा. लोक फोन करून त्याला विचारणार. मग फोनसंदर्भातले सगळे इफेक्ट्स पाहिजेत. फोनवर बोलणाऱ्यांचं निराळं मटेरियल पाहिजे. इंटरनेटवर या गोष्टी शोधायच्या आणि डबिंगला बसायचं. एक-दोन नवीन लोक आहेत, बाकी सवयीचे. त्यांना मी थेट बोलायला सांगतो. कारण लिहायला सांगितलं की ते खूप तयारी करत बसतात. ओरिजिनल व्हिडिओची गोष्ट निराळी असते. जागा शोधायची, कास्टिंग, स्क्रिप्ट असं सगळंच करावं लागतं. मेहनत दोन्हींकडे सारखीच असते. मूळ व्हिडिओत हवं तसं बोलता येतं, पण डबिंग करताना मूळ व्हिडिओत ब्लेंड होईल असंच बोलता येतं. ट्रंपची एकच मिनिटाची क्लिप असेल तर मिनिटभर आणि तेवढंच बोलावं लागतं. फार तर तीसेक सेकंद तीच क्लिप पुन्हा वापरता येते; त्यापुढे तेच-तेच फुटेज वापरल्याचं लोकांना कळतं.

डॅशी :याचा फीडबॅक काय प्रकारचा येतो? चांगल्या अर्थानं किती प्रतिसाद येतो? आणि धमक्या वगैरे येतात का, कोणी चिडतं का?

संजय : सुरुवातीला बऱ्याच लोकांनी व्हिडिओ बघितले. 'दुसऱ्या देशाच्या पंतप्रधानाला तुम्ही असं करता, आपल्या देशाच्या पंतप्रधानांना असं काही केलं तर तुम्हाला काय वाटेल', असा एक फोन आला. साधारण १०% लोक असं करू नका असं म्हणतात, नकारात्मक नाही म्हणणार त्याला. समजावून सांगणारे असतात. काही लोक रिकामटेकडे म्हणतात आम्हाला.

मोदींचा व्हिडिओ केला. तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला. नरेंद्र मोदी लिहिलं तर 'नरेंद्र मोदीजी लिहिलं पाहिजे' असं म्हटलं. राजकीय गोष्टींत पडू नका असंही कोणी म्हटलं. तर त्यावर आम्ही म्हटलं, "तसं लिहून द्या आम्हाला". तुम्हाला ट्रंपतात्यावर हसायला येतं, पण आपल्या लोकांवर व्हिडिओ केला तर ... तेव्हा आम्ही सीमा आखून घेतल्या. कोणतीही जात, व्यक्ती, व्यसनाविरोधात वरवरच्या गोष्टींबद्दल जेवढं बोलता येईल तेवढं बोलायचं. कोणी असंही म्हटलं, "मी मोदींचा फॅन आहे. पण व्हिडिओ बघून मला राग न येता हसूच आलं." नकारात्मक प्रतिक्रिया खूपच कमी आल्या. खूप देशांमधून प्रतिक्रिया आल्या. फेसबुकवर मेसेज आले. ट्रंपतात्यावर व्हिडिओ करताना परदेशांमधल्या लोकांनाही सामावून घेतलं. "दुबईत शांतता पसरली", "अमेरिकेत शांतता पसरली" असं.

गेल्या वर्षांतले मराठीतले टॉप टेन व्हिडिओ बघितलेत तर त्यात 'खास रे'चे व्हिडिओ नक्की सापडतील. कारण व्हॉट्सॅपवर व्हिडिओ खूप पसरले.

एकदा अॅपलचं सिरी मराठीत बोलायला लागलं तर काय याचा व्हिडिओ बनवला. तर एक मुलगा सिरीला नाव, आडनाव विचारतो. आडनाव सांगायला ती नकार देते. त्याला खूप प्रतिसाद मिळाला.

हल्ली पब्लिकला कूल बनण्याचा किडा आहे. एका मुलाला शिक्षक मारतोय आणि मुलगा शिव्या देतोय. तो ओरडतो, "ओह फक्, आता खूप दुखतंय." तर शिक्षक थांबतो. "आता तू कूल झालास", म्हणतो.

आम्ही व्हिडिओ प्रॉडक्शनवाले लोक आहोत. सध्या आम्ही डबिंगचे व्हिडिओ बनवतो. पण आम्हाला ओरिजिनल व्हिडिओ बनवायचे आहेत. सिनेमा काढायचा आहे. यूट्यूबच्या अटी-नियमांत बदल झाल्यामुळे आम्हाला डबिंग कमी करावं लागलंय. सिनेमा येईपर्यंत हे करावं लागेल. नियमांमध्ये जर काही बदल झाले तर ते सांगतील परत. यूट्यूबकडून आम्हाला इमेल येतं. आम्ही ४०-४५ व्हिडिओ बनवले आहेत. त्यामुळे आमच्या चॅनलचे सबस्कायबर्स तेवढेच आहेत. दोन दिवस यूट्यूबचं चॅनल बंद होतं.

नार्कोस, ट्रंप आणि डेडपूल हे तिन्ही आंतरराष्ट्रीय व्हिडिओ वापरले. तेव्हा मग यूट्यूबनं आमच्या चॅनलचा रिव्ह्यू केला. मराठी लोकांना ट्रंपच्या तोंडी गायछाप भारी वाटतं. पण नियम बघितले तर तो गुन्हाच आहे. त्यामुळे डबिंगचे व्हिडिओ कमी करावे लागले. त्यांना पटवून द्यावं लागतं, हे औपरोधिक आहे. 'नार्कोस'नं म्हटलं की 'खास रे'च्या व्हिडिओमुळे आम्हाला प्रसिद्धी मिळत्ये, तर यूट्यूब ते मान्य करेल.

[संपादकीय टिप्पणी : पॅरडी म्हणून छोट्या क्लिप्स वापरल्या तर ते ‘फेअर यूज’खाली येतं, पण हे सगळं स्थानिक भाषेत असल्यामुळे कदाचित परदेशी मीडियाशी आणि यूट्यूबशी व्यवस्थित वकील घेऊन भांडावं लागेल.]

डॅशी :भारतीय नेत्यांबद्दल असे व्हिडिओ करण्याबद्दल तुमची काय भूमिका आहे. 'नकोच ही कटकट' असं वाटतं, तुम्ही घाबरता का इच्छा नसते?

संजय : एक फोन आल्याचं मी म्हटलंच. त्यानंतर आम्ही मोदींचे ३-४ व्हिडिओ केलेच. भारतीय माणूस मराठी बोलतोय, यात फार गंमत नाही. अभारतीय, इंग्लिश माणूस मराठी बोलतोय हे आश्चर्यकारक वाटतं. मोदींची एक शैली आहे, त्या शैलीत मराठी बोललं तर ते लोकांना गमतीशीर वाटेल. मराठी लोकांचंच मराठी डबिंग करण्यात हशील नाही. म्हणून मराठी नेत्यांचे व्हिडिओ करत नाही. महाराजांचे व्हिडिओ केले तर त्यात मजा येणार नाही. तो विषय ट्रेंडिंगही नाही. मला ट्रेंडींग विषयही हवेत, त्यात स्थानिक विषयही घालायचा आहे.

तसेही आपले स्थानिक नेते स्थानिक गोष्टी बोलतातच. दूधसंघाबद्दल मराठी नेता बोलण्याजागी ट्रंप बोलायला लागला तर जोक वाटतो. म्हणून आम्ही स्थानिक नेत्यांचे व्हिडिओ करत नाही.

शिवाय मला दुसऱ्यावर हसायला आवडतं. माझ्यावर विनोद केला तर राग येतो. इंटरनेटमुळे हे थोडं बदलायला लागलं आहे. पण वाद पेटवून द्यायला तो विषय चांगला आहे.

डॅशी :या प्रकारचं काम करणारी बरीच मंडळी आहेत. तुम्ही सगळे मिळून काही करताय, त्याचा काही परिणाम होतोय, असं वाटतं का?
जंतू : तुमच्यातुमच्यात काही इंटरॅक्शन आहे का?

संजय : आम्ही सुरुवात केली, हळूहळू सगळीकडे या गोष्टी होत आहेत. ज्यांना हे काम चांगलं जमतंय, असे लोक आमच्या सोबत आहेत. आमचा एक ग्रूप आहे. मराठी मीम्सचा ग्रूप आहे, आम्ही एकमेकांना सपोर्ट करतो.

डबिंगचं आयुष्य कितपत आहे, याबद्दल प्रश्न आहे. उद्या डबिंग बंद झालं तर फायदा-तोटा काहीच नाही. Good for nothing अशा प्रकारची गोष्ट आहे. आज आपल्याकडे 'सेक्रेड गेम्स'सारखी भारतीय मालिका आहे, तेव्हा प्रश्न पडतो की आपण असं डबिंग कंटेंट किती काळ बनवायचं? टेलिव्हिजन हल्ली बघतोय कोण? मालिका तर लेडीज लोक पाहतात. पुरुष बातम्या. तरुण जनता इंटरनेटवरच आहे.

नेटफ्लिक्सवर सेन्सॉर नाहीये. तरुण लोक टेलिव्हिजनवर का येतील? जोकमधला पंच मारून टाकलेला, साउंड इफेक्टवाला जोक त्यांना नकोच आहे. हा जोक आहे, मी आता हसलं पाहिजे, हे साऊंड इफेक्टमधून सांगायची गरज नाहीये. इंटरनेटवर रोज नवा ट्रेंड येतो. असा कंटेंट बनवणारे आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहोत. एकमेकांना कळवत असतो, काय ट्रेंडिंग आहे ते, किंवा कल्पना देणं. एकमेकांचे इन्स्टाग्राम किंवा फेसबुक फॉलोअर्स मिळतात. आम्ही आपसांत धरून असतो.

याला चळवळ नाही म्हणता येणार. पण ही चांगली गोष्ट झाली आहे. लोक आपापल्या भागांतल्या गोष्टी सांगायला लागले आहेत. तांबडा-पांढरा रस्सा, महालक्ष्मीचं मंदिर या पलीकडे कोल्हापूरच्या गोष्टी समजायला लागल्या आहेत. मावा-तंबाखू खाताना आमच्याइथली पोरं काय बोलतात, हे दाखवायला सुरुवात केली. नागपूरी स्पायडरमॅन किंवा शिनचॅन ही गोष्ट सुरू झाली. कोकणाचा स्पायडरमॅन आला. हे सगळे माझे मित्रच आहेत. आम्ही एखादी सकारात्मक गोष्ट चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रासमोर मांडू शकतो. लोकांना राग येईल असं आम्ही काही बनवलेलं नाही. आमच्या टीममध्ये असं काही होणारही नाही.

डॅशी :हे जागतिक राजकीय मुद्दे असतात, त्यावर काही कॉमेंट करावीशी वाटते का?

संजय : त्या मुद्द्यांमध्ये काही आश्चर्यजनक नाही म्हणून त्यावर काही करत नाही. प्रसिद्ध व्हायचं तर आपण पहिलं असलं पाहिजे किंवा एकमेव असलं पाहिजे. त्यामुळे कितीही मोठी गोष्ट असली तरी ती छोटी करून, स्थानिक बनवून सांगायची. मग आपण एकमेव होतो.

'खास रे' टीव्हीचे आणखी काही व्हिडिओ

गारठा

थेट भेट विथ निक्की जिगर

मावा पे चर्चा

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

एकच लंबर,
गाववाल्यांचं कवतिक ऐकून अंहं झालं.
ए खासरे जिगर.
संध्याकाळी नियोजन होऊ दे. बसू चोप्राला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक नंबर. ट्रंपतात्या व्हिडियो लय आवडतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मजा आलि. सिरी आणि ट्रंपची थेटभेट फारच आवडले.

खास रे टीव्हीला स्वतःचा चित्रपट काढण्यासाठी शुभेच्छा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

१) डॅशी = ?
२) मालवणी डबिंग अधिक मजेदार वाटते. त्या भाषेत अंगचाच तिरकसपणा आहे.
३) बाकी हा प्रकार सोपा असल्याने पुढे स्पर्धा फार वाढणार. एक दोघांचीच खूप थट्टा केल्याने गम्मत निघून जाईल.
४) ट्रंप जिकल्याने मत्सराने टिंगल करतात पण पुढच्या टर्मला त्याच टाइपचा अध्यक्ष होणार आहे हे नक्की. दुसरं टार्गेट शोधा.
५) मुलाखतीतल्या प्रश्नोत्तरांत तोचतोचपणा आला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0