आगामी कादंबरीतील काही भाग

संकल्पना

आगामी कादंबरीतील काही भाग

- रमेश इंगळे उत्रादकर

दत्ताला पहाटे लवकर उठण्याची एक चांगली सवय होती. सवय चांगली असली तरी लवकर उठून काय करावं, हाही एक प्रश्‍नच असतो. चिखलीला त्याच्या शेजारी म्हणजे अगदीच भिंतीला भिंत नाही पण चार-पाच घर सोडून त्याच्या ओळखीचे चिखली तहसीलातच नायब तहसीलदार म्हणून सेवानिवृत्त असलेले सिताफळे साहेब राहतात. ते रोज त्याच्या दारावरून फिरायला जात. दत्ता पहाटे उठलेला असल्यामुळे अंगणात टिवल्याबावल्या करत वेळ घालवत राहायचा तेव्हा सिताफळे साहेबांचा आणि त्यांचा रामराम व्हायचा. एकदा साहेब 'लवकर उठताच तर फिरायला चला म्हणाले आणि दत्तालाही ते पटलं आणि ते सोबत फिरायला जाऊ लागले. त्याला एका चांगल्या सवयीतून अशी दुसरी चांगली सवय लागली. त्यांच्या कॉलनीतून मुख्य रस्त्याला लागल्यावर डावीकडे वळून थोडं पुढे आलं की राजमाता जिजाऊ चौक लागतो. चौक तसा गावाच्या बाहेरच होता. चौकातून फुटणार्‍या चार रस्त्यांपैकी एक चिखली शहरात जाणाराच होता. ज्या रस्त्यानं ते दोघं चालत यायचे. त्यांच्या दिशेनं सरळ पुढे जाणारा रस्ता खामगावकडे. उजव्या हाताकडचा महेकर देराजाकडे तर डाव्या हाताकडचा बुलढाण्याकडे जायचा. म्हणजे फिरायला जाण्यासाठी त्यांच्याकडे रस्त्यांचे तीन-तीन चॉईस होते. तेही कुणा एकावरच जास्त माया न करता प्रत्येकाला एकेक दिवस द्यायचे. खामगाव रस्त्याने सरळ निघाले तर शेलुद जवळच्या मार्कंडेश्‍वर मंदिरापर्यंत. उजव्या हाताला वळले तर थोडी चढण चढून पुंडलिक नगरच्या पाटीजवळ असलेल्या पुलापर्यंत व बुलढाणा रस्त्यानं वळले तर सरळ सवणा फाट्याजवळच्या बोंद्रेच्या मळ्यापर्यंत जायचे. तिन्ही रस्त्यांवरचं अंतर सरासरी दोन-अडीच किमीच होतं. म्हणजे जाऊनयेऊन चार-पाच किमी व्हायचे. फिरायचं म्हणजे बोलायचं नाही असा शारीरिक शास्त्राचा पाळावाच इतका काही प्रचलित नियम नाही. फिरणारे दोघंच म्हटल्यावर एकमेकांशी बोलणं आलंच. दोघांचंही नोकरीचं खातं महसूलच असल्यामुळे शक्यतोवर बोलण्यात खात्यातल्या भानगडी, साहेब लोकांचे चर्चित किस्से, वेगवेगळ्या गावातले सेवेतले अनुभव, आधीचा आणि आत्ताचा काळ, भ्रष्टाचाराची प्रकरणं असे विषय असायचे. केव्हा साहेब सांगायचे दत्ता ऐकायचा, केव्हा दत्ता सांगायचा साहेब ऐकायचे. साहेब रामदेवबाबांचे भक्त होते. ठरलेल्या ठिकाणी पोहोचल्यावर ते प्राणायम वगैरे १५-२० मिनिटं करायचे. त्यादरम्यान दत्ताही शाळेत शिकलेल्या काही मुक्त हालचाली करायचा. एक दिवस साहेबांनी त्याला प्राणायामचं महत्त्व वगैरे समजावून ते कसं करायचं ते शिकवलं. दत्ता तेही करायला लागला. मग साहेबांनी आस्था चॅनल लावून रामदेवबाबांच्या सूचनांनुसार करा म्हणून सुचवलं. दत्तानंही मनावर घेतलं व सारखा सात-आठ दिवस नेमानं चॅनलसमोर बसला मग त्याला अनुलोम-विलोम, भ्रामरी, कपालभाती सगळंच हळूहळू जमायला लागलं. अशी दुसर्‍या चांगल्या सवयीतून त्याला तिसरी चांगली सवय लागली. सिताफळे साहेबांनी फिरणं सुरू केलं तेव्हापासून तिन्ही रस्त्यांवरची ठरावीक निंबाची झाडं हेरून ठेवलेली होती. फिरून परतताना ते त्याची एक लांब काडी तोडून तोंडात टाकायचे. दातांखाली कचाकचा दाबून त्याचा ब्रश करायचे व चालताचालता बराच वेळ दात घासत राहायचे. स्वाभाविकपणे आता दोन काड्या तोडल्या जाऊ लागल्या. आपले दात अजून मजबूत असल्याचं हेच कारण असल्याचं सिताफळे साहेबांनी सांगितल्यावर दत्ताला तिसर्‍या चांगल्या सवयीतून अशी चौथी चांगली सवय लागली. सिताफळे साहेबांचा पुन्हा एक शिरस्ता होता. ते फिरायला निघायचे तेव्हा थोडा अंधारच असायचा. परतायचे तेव्हा मात्र चांगलंच फटफटलेलं असायचं. जगरहाटी सुरू व्हायची. राजमाता जिजाऊ चौकातल्या पुलाच्या कठड्यावर बसून जवळच्या खेड्यातून आलेले दोन-चार दूधवाले ताजे धारोष्ण दूध विकायचे. त्यातल्या खास एकाजवळून सिताफळे साहेब रोज लिटरभर दूध घ्यायचे. कधी नगदी घ्यायचे, कधी दोन-चार दिवसांचे पैसे एकत्र द्यायचे. हळूहळू दिवसांतलं व पैशातलं अंतर वाढत गेलं. व हिशोब मागण्यावरच येऊन ठेपला. सिताफळे साहेब दत्ताला म्हणाले, आम्ही पुडीतलं दूध कधीच वापरत नाही. ते म्हणजे पांढर्‍या रंगाचं दाट पाणी असतं फक्त. दुधातलं सत्त्वं सगळं काढून घेतात आणि पांढरं पाणी पॅक करतात. तुम्ही पहा, सुरडकर पुडीतल्या दुधावर कधी साय येती का? हे दुधावालेही बदमाशी करतात म्हणा. थोडंफार पाणी सोडतातच. पण हा आपला दूधवाला इमानदारीनं धंदा करतो. पाच रुपये जास्त घेतो पण दूध म्हणजे दूधच. तुम्हीपण वापरून पाहा एकदा. दत्तालाही वाटलं साहेब म्हणतातच तर एकदा टेस्ट करून पाहायला काय हरकत आहे? एक दिवस तो लिटरभर दूध घेऊन आला. घरी दुधाचा उकाडा लावलेला होता. ते उकाड्याचं व हे दत्तानं आणलेलं जवळजवळ ठेवून पाहिलं तरी नजरेलाच त्यातली घनता जाणवत हेती. तापवल्यावर उकाड्याच्या दुधावर चोरून साय यायची. या दुधावरच्या सायीचा जाड थर बोटानं बाजूला करावा लागला. संध्याताई या दुधाच्या प्रेमातच पडल्या व दुसर्‍याच दिवशी त्यांनी उकड्याच्या दूधवाल्याचा हिशोब करून उद्यापासून बंद सांगितलं आणि साहजिकच फिरून परतताना दत्ताच्याही हाती दुधाची पिशवी दिसू लागली आणि घराला, लेकरांना सकस दुध पुरवण्याची एक पाचवी चांगली सवय दत्ताला लागली.

गाव बदललं म्हणून माणसाच्या सवयी काही बदलत नाहीत. लातूर मुक्कामी दत्ता रोजच्या सवयीप्रमाणे लवकर उठला. संध्याताई, प्रियंका, अभिषेक झोपलेलेच होते. त्याला सिताफळे साहेबांची आठवण झाली. आठवणीतच त्यांना फोन लावून सांगितलं. 'साहेब आज चिखलीत नाही मायचानं, लातूरले येयेल हाये. पियूच्या अ‍ॅडमिशनले', सांगितले. साहेबांनी कधी परतणार वगैरे चौकशी केली. तर 'दुपारून निघतो. संध्याकाळलोक चिखलीत' म्हणाला. नव्या शहरात नाईट ड्रेसवर काय फिरावं म्हणून त्यानं कपडे बदलले व तो बाहेर पडला. रस्ते माहीत नव्हते. फक्त एक दिशा पकडायची व पुढेपुढे जात राहायचं. जिथं वळावं लागेल त्या वळणावरची एखादी वेगळी गोष्ट खूण लक्षात ठेवायची असं मनाशीच ठरवलं. तो लातूरच्या ज्या भागात होता त्या भागातली घरं मोठी पण रस्ते मात्र लहान होते. लहान होते पण सिमेंट क्रॉकीटचे पक्के होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना फूट-दीड फूट खोल नाल्या होत्या. नाल्या उघड्या असल्यानंही रस्ते लहान झाले होते. दोन मोठी वाहनं तर त्यावरून एकाचवेळी जाणं शक्यच नव्हतं. दोन कारही समोरासमोर आल्या आणि त्यातला एक ड्रायव्हरही सराईत नसला तर मग पंचाईतच होती. महत्त्वाचं म्हणजे नवीन माणसाला सगळे रस्ते सारखेच वाटायचे. आणि घरं बारकाईनं लक्षात ठेवली नाही तर तीही सारखीच दिसायची. भल्या पहाटे फिरायला निघालेल्या दत्तासाठी रस्ते लक्षात ठेवणं सोप्पं नव्हतं आणि सरळ चालत जाता येईल अशा मुख्य रस्त्यालाही तो अजून लागला नव्हता. या अवघडसमयी लातूरकरांची एक पद्धत त्याला कामी आली. त्याच्या चिखली, बुलढाणा भागात ही पद्धत नसल्यामुळे त्याला ती ठळकपणे जाणवली. लातूरकर काय करतात, ज्या घरी लग्नकार्य असेल त्या घराच्या दरवाज्याला बाजूला दर्शनी भिंतीवर सनई-चौघडा...स्वागतसज्ज द्वारपाल वगैरेंचं सुंदर चित्र काढून, सुबक वळणदार स्वच्छ अक्षरात 'अमुक अमुक परिवार आपले सहर्ष स्वागत करीत आहे' असं चांगल्या पेंटरकडून रंगवून घेतात. त्यावरून या घरी काही दिवसांआधी मंगलकार्य पार पडलं आहे. एवढा अर्थबोध तर होतोच. रस्ते लक्षात ठेवायला दत्तानं असे परिवार निवडले. पहिल्या वळणावर त्याला 'तिलमिले परिवार'... वळल्यानंतरच्या गल्लीत 'चुलबुले परिवार' तर मुख्य रस्त्याला लागण्याआधी 'चांदगुडे परिवार' त्याच्या कामी आले. मुख्य रस्त्यावर लागल्यावर त्यानं डावीकडे वळताना कोपर्‍यावरची IDIB बँक लक्षात ठेवली. व तो पुढे सरळ चालत राहिला. दुकानांवरच्या पाट्यांवरून हा औसा रोड आहे हे त्याच्या लक्षात आलं. क्वचित काही म्हातारी माणसं सोडली तर त्याला फिरणारे काही फार दिसले नाहीत. इथली माणसं बहुधा गार्डन वगैरे किंवा ट्रॅकवर फिरत असावीत. असं तो मनाशीच म्हणाला. रोजच्या सवयीइतकं फिरून झाल्यावर आता परत वळावं असं त्याला वाटलं. परंतु रस्ता दुपदरी होता म्हणून त्यानं पुढच्या चौकातून वळायचं ठरवलं. तो मनाशीच एकदोनदा म्हणाला- तिलमिले, चुलबुले आणि चांदगुडे. चौकात राजीव गांधींचा पूर्णाकृती पुतळा होता. तो पुतळा पाहून त्याला आपल्या लग्नाची आठवण झाली. कारण राजीव गांधींची हत्या झाली त्यादिवशीच त्याचं लग्न झालं होतं. लग्न लग्नासारखं झालं असलं तरी देशाच्या तरुण पंतप्रधानाची निघृण हत्या झाली आहे व 'आज मेरे यार की शादी है' म्हणत आपल मित्र नाचताहेत. फटाके फुटताहेत. आपल्या अंगावर अक्षता पडताहेत... पंगती उठताहेत... नव्या कोर्‍या कपड्यात सगळे मिरवताहेत. याची संगती लावताना त्याला लग्नाच्या दिवशी खूप त्रास झाला होता व अजूनही राजीव गांधींचा कुठेही फोटो दिसला, काही संदर्भ आला की, लग्नासाठी आपण चुकीचाच दिवस निवडल्याची दुखरी भावना त्याला शरीरभर फिरत राहते. परत फिरल्यावर त्याला फुटपाथवर एक निंबाचं झाड दिसलं. या नव्या शहरात मुख्य रस्त्यानं निंबांच्या काडीचा ब्रश करत चालत राहण्याचा मोह त्याने आवरला. तो पुन्हा एकदा मनाशीच म्हणाला, तिलमिले, चुलबुले आणि चांदगुडे. थोडं पुढं आल्यावर एका स्टॉलवर पेपरवाला पेपरांचे गठ्ठे सोडून मोकळे करत होता. दत्तानं हात मागच्या खिशावर नेला तर योगायोगानं कालचीच पँट घातली असल्यानं पाकीट खिशातच होतं. त्यानं लोकमत आणि पुण्यनगरी घेतले. थोडं पुढं चालत आल्यावर उजव्या बाजूला IDIB बँकेजवळ आल्यावर बँकेच्या खाली एटीएम होतं. त्याला वाटलं की थोड्यावेळानं एरव्हीही पैसे काढावेच लागणार आहेत. पाकिटात एटीएमही आहे. गर्दीही नाही. म्हणजे कळलं नाही तरी हळूहळू वाचून बटणंही दाबता येतील. कुणी मागं उरावर उभा असला की त्याचाच धाक राहतो. सांगताही येत नाही की, गड्या म्या नवीनच एटीएम घेतलं. त्यानं पिन नंबर आठवला. मनातल्या मनात तीन-चारदा म्हटंला, त्यानं एटीएमचं काचेचं दार लोटलं. आत शिरण्यापूर्वी पुन्हा त्याच्या मनात 'झालं आपल्याले जमणार नाही नाहीतं' असं भय चमकलं. नंतर डॉक्टरांसोबतच येऊ असंही वाटलं. दुसरं मन म्हणालं, किती दिवस दुसर्‍याले सोबत नेशील मायचान' एखादी गाडी येत जात होती. तीन-चार मिनिटं दत्तानं आत काय केलं माहीत नाही पण तो घामाघूम होऊन बाहेर आला. मन भेदरलेल्या नजरेनं इकडेतिकडे पाहू लागला.

दत्ताच्या खिशातली पाचशेच्या नोटांची संपूर्ण बंडल संपत आली होती. काल तुळजापूरकर सरांकडे २० हजार व रेड्डी सरांकडे २० हजार भरून chemistry व biologyला अ‍ॅडमिशन घेतली होती. प्रियंकाच्या खोली मालकाने अ‍ॅडव्हान्स म्हणून एका महिन्याचं भाडं रुपये चार हजार आधीच घेतलं होतं. पेट्रोलपाणी, जेवणखावण असा काही वरखर्च झाला होता. आणि अजून physicsची सरदारसरांची अ‍ॅडमिशन बाकी होती. आणि आता त्यासाठी म्हणून सगळे फ्रेश होऊन बाहेर पडले होते. डॉक्टरांनी हजारच्याच नोटांचं बंडल निघण्याआधीच बँकेतून काढून आणलं असल्यामुळे ते निश्‍चिंत होते. दत्तालाच काय करावं ते सुचत नव्हतं. चालताचालता दत्ता म्हणाला, 'डॉक्टर मायचान, माझ्याजवळचे पन्नास नं आटोपले. आता सरदारसरचे भरायचे काही उरलं नाही. म्हंजे बँकेत हायेत तसे पण मायसौ ते काढावं लागतीन एटीएममधून.'

डॉक्टर म्हणाले, मग काय प्रॉब्लेमहे? तू असं कर इथून थोडसं पुढं गेलं की एक चौक लागतो तिथंच एटीएम आहे. काढून आण. तोपर्यंत आम्ही चालत-चालत सरदार सरांच्या ऑफीसकडं जातो.
'नाही डॉक्टर. तुमी संग चला मायचान.'

'दत्ता, तू पैसे काढून आणोस्तवर आम्ही त्याहीचे फॉर्म वगैरे भरता. सर असले ते मी सरशी बोलतो.'
'डॉक्टर, तुमी माझ्यासंगे चला. तुमाले एक मोठ्ठी भानगड सांगायचीहे मायचान' डॉक्टरांनाही काही कळेना. भानगड तीही मोठ्ठी. त्यांना दत्ताची काळजी वाटली. कल्पनाताई, संध्याताईंना, त्यांची पोरांना घेऊन पुढं जायला सांगितलं. व दोघं चौकाच्या दिशेने वळले. डॉक्टर भानगडीच्या उत्सुकतेनं त्यांच्याकडं पाहात होते. बोलण्याआधी दत्ता स्वत:शीच हसला. आपल्याच तंद्रीत असलेले वेडे हसतात तसा. हसता-हसता बोलला. वेड्यासारखाच. 'पाह्यटं मझ्या चांगलीच गळ्यात आली मायझौ.' डॉक्टर त्याच्याकडं पहातच होते. 'अरे काय गळ्यात आलती? चांगलीच पंढरी घाबरली कृती मही'
'अरे, काय झालं ते सांगशील तं खरं'

दत्ता भानावर आला. त्यानं उठल्यापासून सुरू केलं. डॉक्टर शांतपणे ऐकत होते. युटर्न घेऊन तो IDIB बँकेजवळ आला. त्यानं एटीएमचं काचेचं दार लोटलं. 'तुमाले सांगतो डॉक्टर मायचान, तरी मले एक क्षण वाटलं बरं की मी डेअरिंग करू नही. तुमच्या हातानंच काढावं पैसे. पण मग मनाशीच म्हणलं मायझौ त्यात काय भ्यायचं. जायचं… मशीन जसंजसं सांगल तसे बटण दाबायचं अन् नोटा घ्यायच्या. व्हऊन व्हऊन काय व्हईल. बटण कमी जास्त दाबलं तं पैसे येणार नाही. आपलं कार्डतं काही खराब व्हणार नाही. हिंमत गोळा करूनच आत घुसलो मायचान. तोंडात जय सुरू व्हता. चार, तीन, दोन, पाच... जय जय राम कृष्ण हरी...चार, तीन, दोन, पाच जयजय राम कृष्ण हरी. तुमाले मायचान खोटं वाटंल डॉक्टर. म्या काचातून माघं इकडंतिकडं पाह्यलं. उजव्या हातात कार्ड धरलं. पुन्हा एकदा म्हटलं चार, तीन, दोन, पाच जयजय राम कृष्ण हरी. हातातलं कार्ड मशीनले लावून कपाळले लावलं मायझौ अन कार्ड दोन बोटात धरून आत लोटलं... अन वापस घ्यायला गेलो तं ते मशीननं गप्पकन गिळून घेतलं मायचान. जसं कार्ड आत गेलं तसा मले दरदर घाम फुटला. म्हटलं मायझौ आता आपलं काही खरं नाही. पैसेबी नाही अन कार्डबी नाही. मले वाटलं साली ही बिघडेल मशीनहे. आपलं कार्ड गिळून देल्लं टाकून इन खाली. अता बसा बोंबलत...आता बँक उघडोस्तोर इथंच बसा लागतं आपल्याले मांडी मारून...पण मांडी माराइनकीबी ताकद नव्हती राह्यली मझ्यात. पुरी पंढरी घाबरली व्हती. एसी सुरू व्हता आत अन मी लदबद झालो घामानं. म्हणलं - 'मायझौ या बिराण्या गावात आपुन आपल्या हातानंच बिबा भरून घेतली. आपलं कार्ड काढायले पुरी मशिन खोलाव लागलं आता बँकवाले कधी येतील...कधी खोलतील...पुन्हा त्याहीच्या चौकशा...कोणत्या बँकेचं कार्ड हे? कोणत्या शाखेचं? तुमाले मशीन बंद हे एवढी साधी गोष्ट समजत नाही का?' महं डोकं मायचान पुरं भण्ण झाल्तं डॉक्टर. इथं कोणी बँकेचा सिक्युरेटीवाला आसल तं त्याले सांगाव म्हणून बाहेर यायले दार लोटो तं ते झ्याट हालेना मायझौ. महां बनियन अन निकरबी मंग ओली गच्च झाली भौ... मग लक्षात आलं की बाहेर जायाले हे लोटाव नाही आणि मागं ओढावं लागते. खच्चकन ओढून बाहेर आलो तं सिक्युरिटीतं नाहीच पण जवळ काळं कुत्रं दिसेना. आपली अडचण सांगाव तं कोणाले सांगाव. शेवटी फोन करून तुमालेच बोलवून घ्यायचा इचार करत व्हतो. तं फोनबी संग आणेल नव्हता म्या. म्हणलं एवढ्य झापडत कोणाचा फोन येणारहे. तुमचा नंबर आठवून पाह्यला तं झ्याट आठवेना. ९९६ का ९८६ इथंच अडली गाडी. म्हणलं दत्ता तुहं काही खरं नाही आता. घामानं पुरा लदबद होयेल. बाहेर भामट्यावाणी उभा राह्यलो. २-३ मिनिटं काय करावं...काय नाही...काय करावं...काय नाही काही सुचेना मायचान. पुन्हा दार लोटलं अन आत गेलो. पाह्यतो तं एटीएम वापस येऊन तिथं अटकेल. हसावं का रडावं. खाली बसावं का लोळावं. काही कळेना. दहा मिन्टाचा एपिसोड झाला. डॉक्टर हा पण पुर्‍या जिंदगीत दणाणली नाही असी दणाणली व्हती मही पंढरी.'

निव्वळ नव्या तंत्रज्ञानाविषयीचं अज्ञान आणि आत्मविश्‍वासाच्या अभावाने दणाणून गेलेल्या दत्ताच्या पंढरीचं वर्णन ऐकून डॉक्टरही सुन्न झाले.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

नुसता मजकूर म्हणून माफक गमतीशीर आहे पण एवढ्यावरून कादंबरीविषयी फार उत्सुकता वाटली नाही. त्यामुळे कादंबरीच्या विषयाची थोडी ओळख आली असती तर संदर्भाने कदाचित अधिक मजा आली असती असं वाटलं.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0