मारा / साद - एक आधुनिक अभिजात नाट्यकृती

संकल्पना

मारा / साद - एक आधुनिक अभिजात नाट्यकृती

- वसंत आबाजी डहाके

पडदा उघडला जातो तेव्हा रंगमंचावर स्नानगृहाचे दृश्य दिसते. हे शाराँतों मनोरुग्णालयातील स्नानगृह आहे. पांढर्‍या टाइल्स लावलेल्या भिंती, बाथटब, शॉवर्स, बाके आणि मसाज टेबल्स. रुग्णांच्या स्नानासाठी जागा. समोर वर्तुळाकार रंगपीठ. उजव्या बाजूला एक डायस, त्यावर बाथटब. डाव्या बाजूच्या डायसवर खुर्ची. डावीकडे, उजवीकडे उंचवट्यावर काही आसने. नाटक या स्नानगृहात व्हायचे आहे. मागे प्लॅटफॉर्मवर रुग्ण बसलेले किंवा पहुडलेले आहेत. परिचारक मसाजच्या आणि स्नानाच्या तयारीत मग्न आहेत. मनोरुग्णालयातील या स्नानगृहात ज्या नाटकाचा प्रयोग व्हायचा आहे, त्याचा लेखक आणि दिग्दर्शक मार्की द साद नाटक सुरू होण्यापूर्वीच्या तयारीत मग्न आहे. साद खूण करतो तेव्हा मागच्या दारातून पात्रे येऊ लागतात. रुग्णालयाचा संचालक कूल्मिए, त्याची बायको आणि मुलगी, सिस्टर्स, पुरुष परिचारक, पांढरे कापड गुंडाळलेला मारा, सिमोन, कोर्दे, द्यूपेर, रू अशी पात्रे येतात. चार गायक येतात. चुण्याचुण्यांचा सैल झगा घातलेला आणि हातात दंड घेतलेला अग्रदूत येतो. त्याच्या टोपीला घंट्या आणि टिकल्या लावलेल्या आहेत. वेगवेगळे आवाज काढता येतील अशी काही साधने त्याच्या झग्यावर लटकवलेली आहेत, घंटा घणघणते आहे. आता रंगमंचावर आलेली सारी पात्रे त्या मनोरुग्णालयातील रुग्ण आहेत आणि त्यांनी रुग्णालयाचा पांढरा पोषाख केलेला आहे. त्यावर भूमिकेनुसार इतर पोषाख चढवलेला आहे. सादने लिहिलेले नाटक या स्नानगृहात हे मनोरुग्ण सादर करणार आहेत. त्यापूर्वी रुग्णालयाचा संचालक प्रेक्षकांचे स्वागत करतो, नाटककाराचे आभार मानतो आणि रंगमंचावर उभ्या राहणार्‍या या नवख्या नटमंडळीकडे कृपादृष्टीने बघावे अशी विनंती करतो. हे सारे मनोरुग्ण जे नाटक आता सादर करणार आहेत ते आहे - 'जाँ पोल मारा याचा छळ आणि हत्या.'

पीटर वाइसच्या, "मार्की द साद यांच्या दिग्दर्शनाखाली शाराँतों मनोरुग्णालयातील परिजनांनी सादर केलेल्या 'जाँ पोल मारा याचा छळ आणि हत्या'" (संक्षिप्त 'मारा-साद') या नाटकाची ही सुरुवात आहे. जागतिक रंगभूमीवर गाजलेले, कोनरॅड स्विनारस्की, पीटर ब्रूक अशा विख्यात दिग्दर्शकांनी बसवलेले, ब्रेश्ट (Bertolt Brecht) आणि आर्तो (Antonin Artaud) यांच्या रंगमंचविषयक विचारसरणीचा समन्वय असलेले, रंगमंच आणि नाटक यांतील नव्या शक्यतांचा शोध घेणारे, चर्चात्मक आणि चर्चेला प्रेरित करणारे असे हे नाटक आहे. या नाटकाचा लेखक पीटर वाइस हा मूळ जर्मन लेखक. नाझींच्या ज्यूविरोधी कारवायांमुळे त्याला १९३४मध्ये देश सोडून परागंदा व्हावे लागले. १९३९पासून तो स्वीडनमध्ये राहू लागला. १९१६ ते १९८३ हा त्याचा जीवनकाल. वाइसने साहित्य, चित्रकला, चित्रपट अशा विविध क्षेत्रांत काम केले. नाटककार म्हणून त्याची ख्याती अधिक आहे आणि जर्मनीतच त्याला सर्वप्रथम नाटककार म्हणून मान्यता मिळाली. 'नाइट विथ गेस्ट्स' (१९६३) यानंतर १९६४मध्ये त्याने 'मारा-साद' हे नाटक लिहिले. जर्मनीतल्या या प्रयोगाचे दिग्दर्शन स्विनारस्कीने केलेले होते. रंगमंचावरील नेपथ्य स्वत: वाइसने उभे केलेले होते आणि पात्रांची वेशभूषा वाइसच्या पत्नीने. (नेपथ्य आणि वेशभूषेसाठी करड्या राखाडी रंगाकडून पांढर्‍या रंगाकडे झुकणारी रंगसंगती योजिलेली होती. डोळ्यांसमोर मनोरुग्णालयातील स्नानगृह जसेच्या तसे साकार व्हावे हा उद्देश होता.) 'मारा-साद' नंतर 'दि इन्व्हेस्टिगेशन', 'डिस्कोर्स ऑन विएतनाम', 'ट्रॉट्स्की इन एक्झाइल', 'होल्डरलिन' ही त्याची नाटके इंग्रजीत आलेली आहेत. वाइसची बहुतेक नाटके मुक्तछंदसदृश शैलीत लिहिलेली, चर्चात्मक आहेत. परंतु दृश्मात्मकतेकडे त्याने दुर्लक्ष केलेले नाही. मूकाभिनय, मुद्राभिनय, देहविभ्रम, विविधांगी आविर्भाव, हालचाली या सार्‍यांचा त्याने कुशलतेने उपयोग केलेला आहे. तसेच रंगमंचावर असलेल्या पात्रांनी प्रसंगामध्ये सहभागी असणे, घटिताचा भाग बनणे हे त्याच्या नाट्यकृतीचे लक्षणीय वैशिष्ट्य आहे. मारा, साद, ट्रॉट्स्की, होल्डरलिन या लेखकांविषयी वाइसला विशेष आकर्षण आहे असे दिसते. या चारही ऐतिहासिक व्यक्तींवर त्याने लिहिलेली नाटके लेखक आणि जग, कल्पना आणि प्रत्यक्ष यांच्यातील द्वंद्व साकार करणारी आहेत. 'मारा-साद' मध्ये जाँ पोल मारा (Jean-Paul Marat) आणि मार्की द साद हे दोघे फ्रान्सच्या राज्यक्रांतीच्या काळातले विचारवंत समोरासमोर आणलेले आहेत. या दोघांच्या विचारांतील भेद हा नाटकाचा संघर्षात्मक गाभा आहे. मारा शाराँतोंच्या मनोरुग्णालयात कधीही नव्हता. परंतु त्वचारोगाच्या असह्य पीडेमुळे त्याला सतत बाथटबमध्ये बसून राहावे लागत असे. तसा तो बसलेला असतानाच त्याचा खून झाला, ही ऐतिहासिक घटना. दुसरी गोष्ट म्हणजे, माराच्या हयातीत मार्की द सादची आणि त्याची ओळख होती किंवा नाही याविषयी माहिती नाही. परंतु १७९३मध्ये माराची हत्या झाल्यानंतर त्याच्या शोकसभेत सादने भाषण केले होते, हीदेखील ऐतिहासिक वस्तुस्थिती. मात्र साद शाराँतोंच्या मनोरुग्णालयात होता आणि १८०१ ते १८१४पर्यंतच्या वास्तव्यात त्याने तेथे नाटके बसविली होती. प्रस्तुत नाटक सादच्या त्या वास्तव्याच्या काळातच १३ जुलै १८०८ रोजी त्या शाराँतों रुग्णालयात मनोरुग्णांच्या सहकार्याने साकार केले जात आहे अशी कल्पना पीटर वाइसने केलेली आहे. नाटकात नाटक आहे. फ्रान्सच्या राज्यक्रांतीचे वातावरण मनोरुग्ण साकार करताहेत. या सार्‍या व्यक्ती मानसिक रुग्ण आहेत आणि त्या कोणती तरी भूमिका करीत आहेत. मनोरुग्णालयाचे हे रूपक वापरून वाइसने अनेक गोष्टी साधलेल्या आहेत.

अग्रदूत पात्रांचा परिचय करून देतो. माराच्या महत्त्वाच्या भूमिकेसाठी जलचिकित्सेचा प्रयोग सुरू असलेल्या रोग्याला निवडले आहे. माराची हत्या करणार्‍या कोर्देची भूमिका निद्राव्याधी आणि खेदोन्माद जडलेल्या मुलीने केली आहे. ती मुलगी मध्येच आपली भूमिका विसरणार तर नाही, अशी अग्रदूताला काळजी. रुग्णांचा आणि त्याबरोबरच ते ज्या भूमिका करताहेत त्यांचाही परिचय अग्रदूत करून देतो आहे. हे नाटक आहे, आपण समोर चाललेल्या गोष्टींकडे नाटक म्हणून बघायचे आहे हे भान बाळगत असतानाच ह्या भूमिका करणारी माणसे मात्र मनोरुग्ण आहेत ही जाणीव ठेवायची आहे. रू या माजी धर्मोपदेशक व जहाल समाजवादी, माराच्या अनुयायाची भूमिका करणार्‍या रुग्णाचे हात समोर बांधलेले आहेत. त्याला हातांच्या हालचाली करता येत नाहीत. शेवटी नाटकाचा लेखक आणि दिग्दर्शक साद याचा परिचय. 'कुप्रसिद्धीचा काळा तारा माथ्यावर घेऊन आलेला' साद.

दोनातिआँ आल्फाँस फ्राँस्वा, मार्की द साद इतिहासातील एक चमत्कारिक मनुष्य, विकृत म्हणून ओळखला गेलेला, अश्‍लील पुस्तके लिहिणारा, नीतिभ्रष्ट आणि वेडा इसम. तो तत्त्ववेत्ताही होता. 'सॅडिझम' ही संज्ञा त्याच्या नावावरूनच तयार झालेली. यातना देऊन लैंगिक सुख मिळवण्याच्या लैंगिक विकृतीला 'सॅडिझम' हे नाव आहे. सादने आपल्या जीवनात आणि वाङ्मयात अशा लैंगिक विकृतीचे दर्शन घडवलेले आहे. साद क्रौर्य हा वाङ्मयाचा विषय बनवणारा पहिला लेखक. तो अनीतीचा, विकृतीचा, दुर्गुणांचा तत्त्ववेत्ता होता. त्याने स्वतःच्या अनुभवातून आणि निरीक्षणातून आपल्या काळातील विकृतींचे चित्रण केलेले आहे. महान क्रांतीच्या काळातील फ्रान्समधील मूल्यहीन जीवनाचे वैशिष्ट्यपूर्ण चित्रण त्याने केलेले आहे. न. चिं. केळकर यांच्या 'फ्रेंच राज्यक्रांती' या पुस्तकात १७९३मधील हत्याकांडाविषयी माहिती दिलेली आहे. ते म्हणतात, 'रानटी समाजाच्या काळाप्रमाणे यावेळी फ्रान्सची स्थिती झाली होती. जो भेटेल तो शत्रू आणि जर तो आपला जीव घेणार तर आपणच त्याचा जीव आधी का घेऊ नये […] देशाचे किंवा स्वातंत्र्याचे नाव घेऊन मग काय वाटेल ते दृष्कृत्य करावे, असा तो काळ येऊन गेला खरा. शिरच्छेदाची नेहमीची साधने अपुरी पडू लागली. म्हणून 'गिलोटीन' नावाचे डोकी तोडण्याचे यंत्र तयार करण्यात आले. चौकशी कमिटी आणि हे शिरच्छेदाचे यंत्र यांचे भयंकर कार्य सतत चौदा महिने सुरू होते […] १७९३च्या नोव्हेंबरपासून १७९४ मार्चपर्यंत दर महिन्यास सरासरी ६५. पहिल्या बावीस दिवसांत ३८१ व पुढील ४७ दिवसांत १३६६. पॅरिसमधील सॅमसन नावाच्या एकट्या मारेकर्‍याने आपल्या हाताने दोन हजार सहाशे पंचवीस लोकांची कत्तल केली.’ सादच्या पुस्तकांतून व्यक्त होणारे क्रौर्य आणि फ्रान्सच्या जनजीवनातून व्यक्त झालेले क्रौर्य यांच्यातील परस्परसंबंधांचे चित्रण 'मारा-साद'मध्ये झालेले आहे. साद जे जगला तेच त्याने आपल्या लेखनातून आविष्कृत केलेले आहे. १७९०मध्ये तुरुंगातून सुटल्यानंतर सादला न्यायाधीशाच्या जागेवर काही काळ काम करावे लागले होते. त्यावेळचा त्याचा अनुभव या नाटकातून व्यक्त झालेला आहे: 'ते होतं अमानुष, ते होतं कुरूप आणि चमत्कारिकपणे तंत्रकुशल'.

सादचा जन्म १७४०मधला तर माराचा १७४३मधला. दोघेही समकालीन होते. साद सरदार घराण्यातला, देखणा. वयाच्या तेविसाव्या वर्षी त्याचे लग्न करून देण्यात आले. पण त्याला बायकोपेक्षा मेव्हणी अधिक आकर्षक वाटली. इथूनच त्याच्या लैंगिक विकृतीच्या चाळ्यांना सुरुवात झाली. तो वेश्यावस्तीत जाऊ लागला, मुलींना भाड्याने घेऊन त्यांच्या निर्वस्त्र शरीरांवर तो आसुडाचे फटकारे ओढायचा. या प्रकाराबाबत त्याला पहिला तुरुंगवास घडला तो १७६३मध्ये. नंतर १७६८मध्ये दुसर्‍यांदा तुरुंगवास. नंतर १७७८ ते १७८९पर्यंत व्हँसेन आणि बास्तियच्या तुरुंगात, एप्रिल १७९०पर्यंत शाराँतोंच्या मनोरुग्णालयात तो होता. राज्यक्रांतीच्या गोंधळात तो सुटला. बारा वर्षांच्या या तुरुंगवासात त्याने कादंबर्‍या, निबंध इत्यादी साहित्य लिहिले, सतरा नाटके लिहिली. १८०१मध्ये नेपोलियनविरुद्ध लेखन केल्यामुळे त्याला परत तुरुंगात धाडण्यात आले. दोन वर्षांनी त्याला शाराँतोंच्या मनोरुग्णालयात हलवण्यात आले. आयुष्यातली अखेरची अकरा वर्षे त्याने तिथे काढली. १८१४मध्ये तो मरण पावला.

माराचे वडील डॉक्टर होते. प्रॉटेस्टंट पंथाची दीक्षा घेतल्याने त्यांना (कॅथॉलिक) फ्रान्स सोडून स्वित्झर्लंडमध्ये जावे लागले. मारा सोळाव्या वर्षी वैद्यकीय शिक्षणासाठी फ्रान्समध्ये आला. १७६२मध्ये तो इंग्लंडला गेला. तेथे त्याने स्वखर्चाने स्वत:ची 'मनुष्याविषयी निबंध' (A philosophical Essay on Man, १७७३) आणि 'गुलामीच्या बेड्या' (Chains of Slavery, १७७४) ही पुस्तके छापून प्रसिद्ध केली. १७७६ मध्ये तो पॅरिसमध्ये परत आला. ल कोम्त द आर्त्वाकडे तो वैद्यकीय सल्लागार म्हणून नोकरीस होता. १७८३मध्ये त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. 'लोकमित्र' नावाचे (L'Ami du peuple) वृत्तपत्र त्याने काढले. त्यात राजवटींविरुद्ध कडक टीका असल्याने त्याच्या पकडीसाठी हुकूम निघाले. माराला लपूनछपून वावरावे लागत असे. त्यातच त्याला त्वचारोग जडला. साद आणि मारा दोघांनाही बराच काळ एकांतवासात काढावा लागला हे या दोघांच्या आयुष्यातील साम्य. प्रस्तुत नाटकात दोन भिन्न प्रवृत्तींचे लेखक समोरासमोर आलेले आहेत. शारीरिक व आत्मिक वासनांच्या कोठडीत अडकलेला साद आणि सर्व प्रकारच्या कोठड्या विचारांनी व कृतींनी नष्ट करू इच्छिणारा मारा.

क्रांतीनंतर चार वर्षांनी म्हणजे १७९३मध्ये या नाटकातली केंद्रवर्ती घटना म्हणजे माराची हत्या घडते. प्रस्तुत नाटकात या चार वर्षांतली आणि माराच्या हत्येनंतर नाटकाच्या प्रयोगकाळापर्यंतची म्हणजे १८०८पर्यंतची स्थिती निवेदनातून व्यक्त होते. अग्रदूत हा सूत्रधार भाष्य करतो, कथानकाचा दुवा जोडून घेतो, पात्राला वाक्याचे स्मरण करून देतो आणि चार गायक व रुग्ण वृंदाची भूमिका करतात. हा वृंद निवेदन करतो आणि दृश्यातील जनतेचा भागही बनतो. मारा, रू, कोर्दे, द्यूपेर, सिमोन ही नाट्यकथेतली पात्रे. साद हा निर्माता, दिग्दर्शक, प्रेक्षक आणि एक पात्र म्हणूनही त्याचा सहभाग. ३३ प्रवेशांतून ही नाट्यकृती साकार होते. वाइसने पात्रांच्या तोंडी असलेल्या शब्दांनाच नव्हे तर आवाज, मुद्राभिनय, हावभाव, शारीरिक हालचाली, रंगभूषा, शिरोभूषा, वेशभूषा, आवश्यक वस्तू, नेपथ्य, प्रकाश, संगीत या सार्‍यांनाच महत्त्व दिलेले आहे. नाटकाच्या आरंभी पात्रांचा परिचय करून देताना वाइसने त्यांची वैशिष्ट्ये नोंदवलेली आहेत. उदा. साद : दमेकर्‍यासारख्या जड हालचाली, कष्टाने श्‍वास घेतो. सिमोनविषयी : तिच्या शरीराची ठेवण वक्र, हालचाली विचित्र आणि जखडल्यासारख्या. कोर्दे झोपेत चालणार्‍या माणसासारखी हालचाल करते इत्यादी.

पात्रांचा परिचय झाल्यानंतर व नाटकाचे मुख्य सूत्र सांगितल्यानंतर सारी पात्रे आपापल्या जागांवर स्तब्ध बसलेली असतात. चार गायक पुढे येतात आणि १७८९च्या क्रांतीनंतरचे वातावरण उभे करतात. हे चार गायक व रुग्णांचा एक समूह तयार होतो. ही पॅरिसमधील जनता आहे. क्रांतीनंतर अजूनही दरिद्री आणि अभावग्रस्त राहिलेली ही जनता माराकडे आदराने आणि विश्‍वासाने पाहते आहे.
'मारा आम्ही खोदणार नाही आता आमचीच नतद्रष्ट थडगी.
मारा आम्हांला वस्त्र पाहिजे, अन्न पाहिजे.
मारा आम्ही कंटाळलोय गुलामासारखं राबून वेठकोडगी.
मारा आम्हाला स्वस्त भाकरी मिळालीच पाहिजे.'
ही जनतेची मागणी आहे आणि या जनतेने माराला आपला नेता म्हणून निवडले आहे.
'क्रांती आली आणि क्रांती गेली
असंतोषानं अशांतीची जागा घेतली'

क्रांतीमुळे काहीही साध्य झालेले नाही. गरीब गरीबच राहिलेले आहेत.

'आम्हांला पाहिजे आमची क्रांती. आता, नंतर नाही' हा जनतेचा आग्रह आहे. मारा या चार वर्षांत जनतेच्या हक्कांसाठी लढतो आहे - पांढरपेशांशी, पुरोहितांशी, व्यापार्‍यांशी, सैनिकी अधिकार्‍यांशी. कधी न्यायालयात, कधी भूमिगत अशी माराची स्थिती आहे. नवे राज्यकर्ते स्वत:चा स्वार्थ साधण्यात मग्न आहेत. हे अधिकारांविषयी बोलतात, पण त्यांची भाषा कुणालाही कळत नाही. जनतेला अधिकार मिळाले आहेत ते उपासमारीने मरण्याचे, आणि काम मिळाले आहे कामासाठी वाट पाहण्याचे. माराकडे आपले गार्‍हाणे सांगणारी मंडळी आहेत, तशीच माराच्या लेखनाने, त्याच्या विचारसरणीने दुखावलेली मंडळीही आहेत. कोर्दे - शार्लोत कोर्दे (Charlotte Corday) ही जिरोंदँ (Girondin) पक्षातली मुलगी माराची हत्या करणार आहे. तिला वाटते, मारा लोकांना खून करण्यासाठी आणि लुटण्यासाठी उद्युक्त करतो आहे. त्या माराचा खून करून सारी मानवजात मुक्त करण्याचे स्वप्न ती पाहते आहे. कोर्देची भूमिका करणारी रुग्ण मुलगी सदैव झोपेत असल्याप्रमाणे हालचाल करते, बोलते. मधूनच तिला जाग येते, काही वेळा तिला जागे करावे लागते. तिने असे झोपेत असणे, जागे होणे, स्वप्नातून वास्तवात येण्यासारखे आहे. प्रत्यक्षातल्या कोर्देची कृती, माराची हत्या हीदेखील एक स्वप्नसदृश कृती आहे. मठात जोगीण असलेली ही साधी सरळ मुलगी बायबलमधल्या ज्युडिथचे स्वप्न मनात बाळगून क्रांतीच्या या लाटेत सामील झाली आहे. माराचा खून करण्यासाठी म्हणून जेव्हा ती पॅरिसमध्ये येते तेव्हा तिला काय दिसते याचे अत्यंत भेदक चित्रण नाटकाच्या दहाव्या प्रवेशात आलेले आहे. तिला या शहरात मुंडक्यांचे, धडांचे, कापलेल्या अवयवांचे ढीग दिसतात. लोक किंचाळताहेत, उड्या मारताहेत, भांडताहेत. लोक असे का वागताहेत ते तिला कळत नाही. या दहाव्या प्रवेशात मूकाभिनयाच्याद्वारे रस्त्यावरील विविध दृश्ये साकार केली जातात. कोर्दे कट्यार घेण्यासाठी हिंडते आहे. वेगवेगळे दुकानदार, वेगवेगळ्या वस्तू. एक मूक मिरवणूक येते. घोडागाडीत अपराधी उभे आहेत, पुरोहित मंत्र म्हणतो आहे. गिलोटीन साकार केले जाते. फाशीची शिक्षा विद्रूप तपशिलासह अमलात आणली जाते. कोर्दे पॅरिसमधले हे वातावरण पाहते, गळून जाते. ती म्हणते:
'लवकरच हे सारे चेहरे मला घेरून टाकतील.
हे डोळे आणि ही तोंडं मला त्यांच्यात येण्यासाठी हाक मारतील.'

फाशीचे हे दृश्य अकराव्या प्रवेशातही पुढे सुरू आहे. हात तोडणे, डोके उडवणे, डोके खाली पडल्यावर त्याचा चेंडू करून खेळणे, विजयोन्मादाने किंकाळ्या फोडणे अशा विविध हावभावांसह फाशीचे, शिरच्छेदाचे दृश्य साकार होत राहते. क्रांतीनंतरचे हिंसेचे थैमान या हालचालींतून व्यक्त होते. कोर्देचे झोपेत चालणे, हळूहळू बोलणे आणि त्याच्या अगदी विरुद्ध समूहातल्या लोकांच्या उन्मादनिदर्शक हालचाली, अंगाला पिळे देणे, फेफरे आल्यासारखे झटके देणे, ही ही हसणे, कण्हणे असा विरोध तयार होतो.

क्रूरतेच्या या पार्श्‍वभूमीवर मारा आणि साद यांचा संवाद सुरू होतो.

प्रवेश बारावा. जीवन आणि मृत्यू यांसंबंधी संवाद. मारा सादला उद्देशून म्हणतो :
'मी वाचलं आहे साद तुझ्या पुस्तकात.
की सार्‍या जीवनाचा पाया आहे मृत्यू.'
यावर साद जे बोलतो त्यातून त्याचे तत्त्वज्ञान व्यक्त झाले आहे. त्याच्या मते कुठलेही मरणारे जनावर, रोपटे किंवा मनुष्य हे निसर्गाच्या दृष्टीने खत आहे. या खताशिवाय काही वाढू शकले नसते. मृत्यू जीवनाच्या प्रक्रियेचा एक भाग केवळ आहे आणि निसर्ग मृत्यूविषयी अगदी उदासीन आहे. संपूर्ण मानवजात नष्ट करून टाकली तरी निसर्ग निश्‍चलपणे पाहत राहील. पॅरिसमध्ये अहोरात्र चालत असलेले हे गिलोटीन किती दयाळू आहे असे त्याला वाटते. पण याचबरोबर त्यात काही भावना नाही, थरार नाही अशी त्याची तक्रारही आहे. यांत्रिकपणे हे हत्यासत्र सुरू आहे. पंधराव्या लुईचा खून करण्याचा अयशस्वी प्रयत्न करणार्‍या दामिआँच्या (Robert-François Damiens) हत्येचे तो वर्णन करतो. दामिआँची छाती, बाहू, मांड्या चिरून उघड्या केल्या आणि त्यात उकळते तेल, डांबर, लाख, गंधक ओतले. नंतर त्याचे हातपाय जखडून चार घोड्यांना त्याला बांधले आणि नंतर त्याचा एकेक अवयव कापला. वाइसने लिहिले आहे :
'आणि शेवटी त्याचं रक्ताळलेलं धड हलत्या डोक्याचं लटकत राहिलं
कण्हत आणि टक लावून पाहत क्रूसाकडे,
एका धर्मोपदेशकानं त्याच्यासमोर धरून ठेवलेल्या.

सादच्या मते तो खरा उत्सव होता. हत्येचा उत्सव. आजचे उत्सव हे निव्वळ यांत्रिक आहेत. भावनाच नाहीत क्रांतीनंतरच्या हत्यांमध्ये. क्रांतीनंतरच्या वेडसर, अतर्क्य हत्यांवरचे हे भाष्य अतिशय प्रखर आहे. त्याआधी दामिआँच्या हत्येत आनंद घेणार्‍या जनसमूहाची मनोविकृती साद उघडी करतो. पंधराव्या प्रवेशात माणसाच्या बेभरवशी वृत्तीबद्दल सादने आपला एक अनुभव सांगितला आहे. लोक एकाएकी बदलतात, निराळेच होऊन जातात आणि अनाकलनीय कृत्ये करू लागतात. एक सभ्य, सुसंस्कृत, तत्त्वचर्चेची आवड असणारा शिंपी एका शस्त्रसज्ज माणसाला खलास करतो आणि नंतर त्याची छाती फाडून त्याचे अजून धपापणारे हृदय गिळून टाकतो. साद मनुष्याला उघडे करून त्यातल्या भयावह क्रूरतेचे दर्शन घडवतो.

सादचे हे बोलणे सुरूच असताना एक रुग्ण एक एक पाऊल टाकत येतो. कूलमिएकडे पाहत म्हणू लागतो :
'पागल जनावर
माणूस आहे एक पागल जनावर.'

फ्रान्समधल्या त्यावेळच्या हत्याकांडाविषयीच नव्हे तर केव्हाही कोणत्याही काळी जगात होत असलेल्या हत्याकांडाविषयीचे वाइसचे हे भाष्य आहे.
माराला सादचे विचार मान्य नाहीत.
'निसर्गाच्या स्तब्धतेविरुद्ध मी कृती वापरतो.
असीम उदासीनतेत मी अर्थ शोधत असतो.
मी अविचलित नुस्ता पाहत राहत नाही. मी मध्ये पडतो.
आणि सांगतो हे आणि हे चुकीचे आहे.'
ही त्याची भूमिका आहे. तेराव्या प्रवेशात मारा जनतेचे शोषण कसे चालत होते हे सांगतो. राजे हे आमचे मायबाप आहेत असे गिरवले जायचे आणि पुरोहित प्रेषिताचे चित्र उभे करायचे. गरिबांचे शोषण करणारे हे पुरोहित उपासमारीने हैराण झालेल्यांना म्हणत :
'सहन करा
सहन करा जसं त्यानं सहन केलं क्रूसावर.'

मारा ही वाक्ये उच्चारताना रुग्णांचा समूह ही वाक्ये उच्चारतो. रंगमंचावर गरीब, पीडित, अज्ञानी जनता साकार होते. तसेच चार गायक चर्चच्या अधिकारीगणांचे चित्रण करतात. झाडूंचा क्रॉस, बादली धुपाटण्याप्रमाणे हलवणे वगैरे. यातूनच चर्चच्या पुरोहितशाहीचा उपहास साधलेला आहे. मुक्तछंदातील स्वगतांना अशी दृश्यांची जोड मिळाल्यामुळे नाटक निव्वळ शब्दप्रधान राहत नाही; मारा आणि साद यांच्यातल्या चर्चेचे केवळ नाटक राहत नाही. या दोन व्यक्तींच्या आसपास क्रांतीनंतरच्या काळातली जनता आहे याचे भान रुग्णांचा समूह करून देत असतो.

सादचे क्रांतीविषयीचे भाष्य अठराव्या प्रवेशात येते.
'फ्रान्सच्या सन्मानासाठी ते सगळे मरायला तयार आहेत.
जहाल अणि मवाळ
त्या सगळ्यांना रक्ताची चव पाहायची आहे.'

सादच्या मते, त्यांची देशभक्ती म्हणजे निव्वळ पिसाटपण आहे. सादचा कशावरही विश्‍वास नाही. तो म्हणतो : 'मी या देशाची मुळीच पर्वा करीत नाही.' त्याचा कुठल्याही त्यागावर विश्‍वास नाही. विसाव्या प्रवेशात साद म्हणतो :
'आधी मला दिसली क्रांतीमध्ये एक संधी
सुडाच्या भयंकर उद्रेकाची
माझ्या स्वप्नांहून कितीतरी भयंकर.'

न्यायाधीश म्हणून सादची नेमणूक झाली तेव्हा त्याला फाशीची शिक्षा ठोठावणे जमले नाही याची तो कबुली देतो. भोवताली सुरू असलेल्या भीषण हत्याकांडाचे चित्रण तो करतो आणि म्हणतो :
'पातं खाली यायचं, वर उचललं जायचं रहाटासारखं पुन्हा खाली यायचं.
सारा अर्थच निघून गेला त्या सुडातला.
ती बनली निव्वळ एक यांत्रिक प्रक्रिया!'

साद क्रांतीविषयी हे बोलत असताना त्याच्याच इच्छेनुसार कोर्दे त्याच्या उघड्या पाठीवर आसुडाचे फटके ओढत असते. साद जणू काही स्वतःमधल्या गुन्हेगाराला शिक्षा देतो आहे. साद या ठिकाणी गुन्हे करणार्‍या माणसाचे प्रतिनिधित्व करतो. त्याच्या पात्रांच्या यातना स्वतः भोगणारा तो लेखक आहे. तो म्हणतो :
'गुन्हेगारांच्या समाजात
मी खणून काढला गुन्हेगार माझ्यातून बाहेर
म्हणून मी समजू शकलो माझ्यातल्या गुन्हेगाराला आणि समजू शकलो
हा काळ ज्यात आपण जगतो आहोत.'

साद हा विकृत, नीतिभ्रष्ट, वेडसर इसम असा इथे राहत नाही तर अत्यंत संवेदनशील लेखक म्हणून व्यक्त होत राहतो. साद क्रांतीची चेष्टा करतो.
'त्यांना दाढदुखी आहे'
आणि त्यांच्या दाढा त्यांना उपटून हव्या आहेत.
त्यांचा रस्सा करपला
की ते ओरडतात चांगल्या रश्श्यासाठी.'

कुणाला वाटतं तिचा नवरा ठेंगणा आहे! तिला उंच हवाय तर एखाद्याला गुबगुबीत बायको हवी आहे. एकाला स्वतःचा जोडा चावतो, पण शेजार्‍याचा चांगला बसतो.
'आणि मग ते क्रांतीमध्ये सामील होतात
त्यांना वाटतं की क्रांती देईल सारं काही'
पण क्रांतीने त्यांना काहीही दिलेले नाही. ते होते तसेच आहेत, तसेच राहणार आहेत.

मारा सादच्या विचारसरणीला विरोध करतो. पॅरिसमधल्या हत्याकांडाविषयी मारा म्हणतो :
'लोकांना सवय होती सारं काही सहन करण्याची
आता ते घेताहेत त्यांचा सूड.'
तुम्ही तो सूड पाहताहात आणि तुम्हीच त्यांना सुडात ओढलं आहे. आता निषेधाला काही अर्थ नाही.

माराच्या मते, जनतेने सांडलेल्या रक्ताच्या तुलनेत अमीर-उमरावांचे रक्त विशेष मोलाचे नाही. मात्र क्रांती भरकटत चालली आहे याची तीव्र जाणीव माराला आहे.
'आम्ही शोधून काढली क्रांती
पण ती कशी चालू ठेवावी हे आम्हांला ठाऊक नाही'

लोक अजूनही भूतकाळातील गोष्टी जपताहेत. स्वत:पुरते पाहताहेत. प्रत्येकजण 'स्वतःपुरता लक्षाधीश' होण्याच्या प्रयत्नात मग्न आहे.
'आम्ही आहोत इथंच उभे अधिकच अन्यायाच्या ओझ्याखाली दबलेले
आरंभी होतो त्याहून
आणि त्यांना वाटतं की क्रांतीचा विजय झाला आहे.'

माराला भान आहे की, 'आता त्या राज्यकर्त्यांच्या जागा दुसर्‍या राज्यकर्त्यांनी घेतल्या आहेत' आणि 'क्रांती लढली गेली ती व्यापारी आणि दुकानदार यांच्यासाठी.' माराच्या या स्वगत भाषणासोबत चार गायक आणि रुग्ण शोषित जनतेचे चित्र उभे करतात. जाक रू हा माराचा कट्टर अनुयायी. माराच्या संयत आत्मस्वीकृतीनंतर जाक रूचा चेतावणारा, चिथावणी देणारा स्वर उमटू लागतो.
'उचला तुमची हत्यारं
झगडा तुमच्या हक्कांसाठी
हिसकावून घ्या जे तुम्हांला हवं आहे आणि हिसकावून घ्या आत्ताच!'

जाक रू या पात्राची निर्मिती ही या नाटकातली एक लक्षणीय गोष्ट आहे. ज्या रुग्णाने ही भूमिका केलेली आहे त्याचे हात समोरच्या बाजूने बांधलेले आहेत. त्या तशा जखडलेल्या हातांनीच तो रुग्ण नाटकभर वावरतो. त्याचे वेड अधिक हिंस्र, उन्माद अधिक भयानक. जाक रू हा माजी धर्मोपदेशक, नंतर जहाल समाजवादी, जनतेवर होणार्‍या अन्यायाचा तो तीव्र निषेध करतो. नव्या राज्यकर्त्यांचा कडवट शब्दांत उपहास करतो. जनतेच्या भावना भडकतील अशी भाषणे चालू असताना परिचारक त्याला खेचत असतात. परंतु तो त्यांना न जुमानता आक्रमक असे बोलत राहतो. त्याचवेळी रंगमंचावर असलेले चार गायक परस्परांकडे बाटली फिरवत आहेत. थट्टामस्करी करताहेत. रुग्णालयाचा संचालक रूच्या भाषणाने अस्वस्थ होतो. परंतु अग्रदूत आणि साद स्वस्थ आहेत. 'पायघोळ झगा घालून क्रांतीचा प्रचार करणं' हे बरेच झाले आहे असे साद म्हणतो. रू आग ओकणारी भाषणे करतो पण कृतिशून्य आहे, हे अग्रदूताचे मत आहे.

शेवटी परिचारक रूला बाकाला बांधून ठेवण्यात यशस्वी होतात. रूचे बोलणे तरीही थांबत नाही. तो माराला आवाहन करतो :
'मारा
तुझा काळ आला आहे
आता प्रकट कर मारा स्वतःला
ये बाहेर आणि लोकांचं नेतृत्व कर
ते वाट पाहताहेत तुझी.'

रूच्या या आवाहनावर सादची प्रतिक्रिया आहे :
'मारा, आज त्यांना तुझी गरज आहे, कारण तू दु:ख भोगणार आहेस त्यांच्यासाठी' आणि गरज संपली की ते विचारतील 'मारा, कोण होता मारा?'

माराची वैचारिक अनिश्‍चितता एकविसाव्या प्रवेशात व्यक्त होते. त्याला 'अंधार साकळून आल्यासारखं वाटतयं', 'आपण मरणप्राय गोठतो आहोत की जळतो आहोत' हे त्याला सांगता येत नाही. त्याच्या समोरचे कागद त्याला दिसत नाहीत, लेखणी कुठे आहे हे तो सिमोनला विचारतो. 'इतका काळोख कसा झालाय' हे तो विचारतो. सिमोनचे यावरचे उत्तर आहे, 'एखादा ढग सूर्यावर आला असेल - अथवा कदाचित धूर - ते जाळताहेत प्रेते.' शहरभर चालू असलेल्या वेडसर हत्याकांडाचा हा सूचक संदर्भ अत्यंत अर्थपूर्ण होऊन जातो, हे हत्येचे नाटक आहे. केवळ माराच्या हत्येचे नाही. क्रांतिकाळातील अमीरउमरावांच्या, क्रांतिकारकांच्या, सामान्य मनुष्याच्या हत्येचेही ते आहे. क्रौर्य, हिंसा, मनुष्यहत्या हा यातल्या पात्रांचा चिंतनविषय आहे. साद मृत्यूविषयी उदासीन, मारा जनतेच्या सुडासंबंधी उदासीन, जाक रू जनतेच्या बदल्याच्या भावनेला भडकावणारा, कोर्दे पॅरिसमधल्या हत्याकांडाने अस्वस्थ, पण माराच्या हत्येसाठी उद्युक्त झालेली असा परस्परविरोधी ताणांचा पट येथे विणलेला आहे.

मारा बाथटबमध्ये बसलेला आहे. तेथेच त्याची हत्या व्हावयाची आहे. तो बाथटब नसून मृत्यूचा सापळा आहे. त्याची शवपेटी आहे. माराचा सर्वत्र शोध घेतला जात आहे. त्याचा छापखाना जाळून टाकला. आता त्याच्या घराचा, त्याच्या लपण्याच्या जागेचा शोध घेताहेत. मारा टबात बसून लिहिण्यात मग्न आहे. तो मधूनच अस्वस्थ होतो, थकून जातो. त्याच्या डोळ्यांसमोर त्याचे स्वतःचे आयुष्य तरळते. 'माराचे चेहरे' या भागात माराचे गतायुष्य, त्याच्याविषयीच्या इतरांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. एक पुरुष व एक स्त्री गाडी ओढत येतात. ते माराचे आईवडील. गाडीत विज्ञान, धर्म, सैन्य, नवश्रीमंत यांचे प्रतिनिधित्व करणारी माणसे. मारा टबात बसून स्वत:च्या आंतरिक विश्‍वात हरवलेला आहे. तेथे ही सारी माणसे त्याला दिसताहेत, त्यांचे बोलणे त्याला ऐकू येते आहे. त्यातल्या बहुतेकांना माराविषयी यत्किंचितही आदर नाही. शाळामास्तर येतो आणि निंदाव्यंजक आवाजात बोलतो, 'लहानपणापासून हा मारा मित्रांच्या टोळ्या जमवायचा आणि आरडाओरड करीत ते धावून जायचे एकमेकांच्या अंगावर.' माराची आई तक्रार करते की, 'अन्न खायचा नाही धड, दिवसदिवस पडून राहायचा - काही बोलायचा नाही, तळघरात कोंडून घातलं, पण काही उपयोग झाला नाही.' वडील म्हणतात, 'मी जेव्हा चावलो त्याला, तो उलट मला चावला.' माराला ताप चढला आहे आणि त्या भ्रमात तो बरळतो आहे असे सिमोनला वाटते. माराला दिसणारे त्याचे आयुष्य असे हे दृश्य योजून, मारा हा कुणालाच नीटसा समजलेला नव्हता हे वाइस दाखवू पाहत आहे. त्याचे लेखन, त्याचे कार्य यांविषयी गैरसमज आहेत. तो जहाल क्रांतिकारक आहे, रक्तपिपासू आहे, असे त्याचे एक चित्र इतिहासात उभे राहिलेले आहे; परंतु वास्तवात माराची तळमळ काय होती, त्याचा ध्यास काय होता, त्याचे आंतरिक द्वंद्व काय होते हे वाइस स्पष्ट करू इच्छितो. माराने स्वत:चे पैसे खर्च करून छापलेल्या पुस्तकांविषयी शाळामास्तरांचा अभिप्राय आहे, 'चोरलेले विचार, वेडेचार, शिवीगाळ.' लष्करी प्रतिनिधीला वाटते की मारा मानमरातबांचा लोभी होता. शास्त्रज्ञांच्या मते मारा हा बूर्ज्वा वर्गाचाच प्रतिनिधी होता, श्रीमंतीची सारी सुखे त्याला हवी होती. त्याला सभ्य समाजाने जेव्हा गावंढळ म्हणून हाकलून दिले तेव्हा तो गरिबांची बाजू घेऊन उभा राहिला. त्याची क्रांतीची आच खरी नव्हती तर आयुष्यातील वैफल्यामुळे तो क्रांतिकारकांमध्ये सामील झाला. 'शोषितांनी उठलंच पाहिजे' माराच्या या घोषणेतील 'शोषित' कोण तर 'मीच आहे शोषित' असेच त्याला म्हणायचे होते. समाजातील उच्चभ्रू वर्गातील हे विविध प्रतिनिधी माराच्या लेखनाची, त्याच्या कर्तृत्वाची अशी चेष्टा करतात. पण माराचा अनुयायी जाक रू याचे मात्र माराविषयी वेगळे मत आहे. तो म्हणतो,
'आणि तू वळलास एके दिवशी क्रांतीकडे कारण तुला झाली होती एक अत्यंत विलक्षण जाणीव,
की आमच्या भोवतालची स्थिती मुळातच बदलली पाहिजे.'

२६ प्रवेशांचा पहिला अंक इथे संपतो. साद, मारा व रू यांच्या विचारांशी आपला परिचय या अंकातून होतो. तसेच या पहिल्या अंकात कोर्देने माराला दोनदा ठार करण्याचा प्रयत्न केलेला होता हेही दाखवले जाते. तिच्या पहिल्या प्रयत्नाच्या शेवटी दिग्दर्शक साद तिला सांगतो,
'आत्ताच नाही कोर्दे
तुला यायचं आहे त्याच्या दाराशी तीनदा.'
हे प्रत्यक्ष कृतींचे अंग नसून नाटक आहे याचे भान वेळोवेळी दिले जाते.

संचालक मधून मधून उठून हा भाग आपण कापला होता, या ओळी गाळल्या होत्या असे सांगत असतो. अग्रदूत दाखवलेल्या भागाचे समर्थन करतो. यामुळे ब्रेश्टला अभिप्रेत असलेला अलिप्तता परिणाम साधला जातो.

कोर्दे आणि द्यूपेर यांच्यातील संभाषणाचे प्रसंग पहिल्या अंकात आहेत. द्यूपेर हा जिरोंदिस्त नेता, जो रुग्ण ही भूमिका करतो आहे तो एराटोमेनिआने पछाडलेला आहे. कोर्देचा प्रियकर म्हणून वावरत असताना त्याच्यातली कामुकता झळकत असते. द्यूपेर सतत कोर्देच्या मागेमागे असतो. तिच्या पाठीला हातांचा आधार देत, आलिंगन देत, शृंगारिक हावभाव करीत असतो. अग्रदूताला वारंवार हस्तक्षेप करावा लागतो आणि त्या रुग्णाला भूमिकेचे भान करून द्यावे लागते. क्रांतीच्या, हिंसेच्या, क्रौर्याच्या या वातावरणात द्यूपेरची विषयासक्ती एक व्यत्यास साधते. अर्थात द्यूपेरचे प्रेमप्रदर्शन आल्हाददायक नसून हास्यास्पद ठरते. आत्ममग्न, जवळजवळ झोपेत असलेली कोर्दे आणि तिला वारंवार कवटाळणारा द्यूपेर असे हे मिथुन आहे. द्यूपेर आणि कोर्दे या प्रेमलीलांना आणखी एक अर्थ आहे. तो म्हणजे, काही काळाने यांचीही मस्तके धडावरून गळून पडायची आहेत. हिंसेच्या त्या वेडसर उद्रेकात प्रेम, विषयासक्ती या सार्‍याच गोष्टी अत्यंत केविलवाण्या ठरतात. द्यूपेरचा आदर्शवादही हास्यास्पद ठरतो.

दुसर्‍या अंकात कोर्दे आणि माराच्या तिसर्‍या भेटीची सिद्धता आणि नंतर लगेच तिची तिसरी व अखेरची भेट आहे. पहिल्या अंकात पॅरिसमध्ये प्रवेश केल्यानंतर कोर्देला जाणीव झाली होती की, आपल्यालाही कधीतरी फाशीच्या तख्तावर उभे रहावे लागणार आहे. ती येथे माराला मारून स्वत: हुतात्मा होण्यासाठीच जणू आलेली आहे. या नाटकात निद्राव्याधी जडलेल्या रुग्णाला माराच्या हत्येचे काम करायचे आहे. तिला जागे ठेवणे, नाटकाचे भान देत राहणे हे अग्रदूताचे कामच बनते. परिचारक तिला हलवतात, हाका मारतात, उठवून उभी करतात. डोळे मिटलेले असतानाच ती बोलते. गिलोटीनपुढे माणसांनी रांगा लावलेल्या आहेत. एकएक पुढे सरकतो, गुडघे टेकतो, मान खाचेत घालतो, मग पाते सरसरत खाली येते हे सारे दृश्य तिला आतल्या आत दिसत असते. 'जेव्हा डोकं वेगळं होतं धडावरून, हात पाठीमागे जखडलेले, पाय बांधलेले, मान उघडी, केस कापलेले, गुडघे फळीवर टेकलेले, डोकं आधीच ठेवलेलं धातूच्या खाचेत, पाहत खाली निथळणार्‍या टोपलीत...' तिच्या उद्गारानंतर द्यूपेर म्हणतो, 'जागी हो तुझ्या दुःस्वप्नातून.' यातला 'दुःस्वप्न' हा शब्द अनेक अर्थ व्यक्त करतो. क्रांती हेच एक दुःस्वप्न आता ठरलेले आहे. कोर्देला या शहरात काय दिसले आहे : 'तुरुंग भरून गेलेले आहेत तुडुंब' आणि पहारेकरी शिरच्छेदाविषयी कोणत्या भाषेत बोलतात, 'आता ते बोलतात लोकांविषयी जसे माळी बोलतात जाळून टाकायच्या पानांविषयी.' मनुष्याचे अस्तित्व अर्थशून्य झालेले आहे. लहान लहान मुले गिलोटिनचे खेळणे बाळगताहेत. छोटी धारदार पाती असलेली छोटी छोटी गिलोटिने. 'कसली ही मुलं आहेत जी खेळू शकतात असल्या खेळण्याशी...' तिच्या मते माराच या सार्‍या प्रकारांना जबाबदार आहे. याची हत्या केली की सगळे नष्टचर्य संपेल. द्यूपेर तिला हत्येपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतो. पण तिचा निर्धार ठाम आहे. ती माराची हत्या करण्यासाठी त्याच्या दारात येते. मारा टबात बसून लिहितो आहे. ती त्याच्यासमोर उभी राहते. कट्यार उंच करते आणि हळूहळू खाली आणते. नाटकात या ठिकाणी तिची कृती थांबवलेली आहे. माराला त्याच्या हत्येनंतरचा इतिहास ऐकवला जातो आणि नंतर हत्येची कृती पूर्ण होते.

दुसर्‍या अंकाच्या आरंभी 'राष्ट्रीय सभा' दाखवली आहे. जिरोंदिस्त आणि जॅकोबाइट्स बसलेले. ही राष्ट्रीय सभा माराच्या मनातली आहे. त्याच्या मनातच निषेधाचे आणि जयजयकाराचे ध्वनी ऐकू येत आहेत. प्रेक्षकांना उद्देशून त्याने केलेले भाषण त्याच्या मनातले आहे. क्रांतीनंतरच्या राजवटीवर मारा टीका करतो आहे. क्रांतीनंतर सत्तेला आलेले व्यक्तिवादी, भांडवलवादी वळण तो दाखवतो आहे. फ्रान्सचा द्रोह करणार्‍यांची नावे तो घेतो आहे. राजनिष्ठांची, परकीय सत्तेला सामील झालेल्यांची, क्रांतीशी द्रोह करणार्‍या समकालीनांची नावे तो उच्चारतो. ज्या स्वातंत्र्यासाठी आपण लढलो ते स्वातंत्र्य आपल्याला मिळालेले नाही. उलट शोषण करणार्‍यांचे फावले आहे. मारा म्हणतो,
'आपल्याला जनतेच्या खर्‍या प्रतिनिधीची आज गरज आहे
जो असेल भ्रष्टाचाराच्या पलीकडे
ज्याच्यावर आपला विश्‍वास बसेल.'

परंतु मारा गोंधळलेला आहे, त्याच्या विचारात स्पष्टता नाही, कृती आणि विचार यात समन्वय नाही. काळाने जे आव्हान त्याच्यापुढे उभे केले आहे ते कसे स्वीकारावे हे त्याला समजत नाही. माराची ही शोकात्मिका आहे. हिंसेच्याविरुद्ध तो असूनही नव्या हिंसेला उत्तेजन देतो. हुकूमशाहीच्या तो विरोधात आहे पण त्याच्या विचारातून त्याला हुकूमशहा व्हायचे नाही हे स्पष्ट होत नाही. शारीरिक व्याधीने तो जेरीस आलेला आहे. मानसिकदृष्ट्याही तो त्रस्त झालेला आहे. त्याच्या विचारांची झेप मोठी आहे, परंतु ते विचार प्रत्यक्षात कसे आणावे हे त्याला उमगत नाही.
'का आहे आता सगळं काही इतकं गोंधळून गेलेलं
सारं काही मी लिहिलेलं अथवा बोललेलं होतं विचार करून केलेलं आणि खरं आणि आता संदेह
का वाटतंय सारं काही अगदी खोटं, भ्रामक.'
हताश, स्वतःवरचा विश्‍वास उडत चालला आहे ही माराची जाणीव या उद्गारातून व्यक्त होते.

सादला तर माराच्या विचारात किंवा क्रांतीत, कशातही काही अर्थ वाटत नाही. लिहिणे हे त्याच्या दृष्टीने खरडणे आहे आणि त्याने काहीही साध्य होत नाही हे त्याचे मत आहे. माराच्या दृष्टीने लिहिणे ही एक पूर्वतयारी होती. 'जेव्हा जेव्हा मी लिहिलं, मी नेहमी लिहिलं कृती मनात ठेवून', 'मी नेहमी लिहिलं एका ज्वरात, कृतीची गर्जना ऐकत.' पण आता कोणतीही आवाहने व्यर्थ आहेत. माराचा क्रांतीवरचा विश्‍वास सादला हास्यास्पद वाटतो. तो म्हणतो, 'पाहा या भटकलेल्या क्रांतिकारकांकडे,' रंगमंचावर चार गायक पसरले आहेत, स्वत:ला ओरबाडत, जांभया देत, रिकाम्या बाटलीत एखादा थेंब आहे का पाहत. सादच्या मते, 'साधायचं असतं काय, कुठल्याही क्रांतीमधून', तर 'सार्वत्रिक मैथुन.' आपल्या आतल्या आत्म्याच्या कोठड्या दगडी अंधारकोठड्यांहून अधिक भयंकर आहेत आणि त्या जोवर बंद आहेत तोवर सारी क्रांती म्हणजे तुरुंगातले दडपून टाकले जाणारे बंड ठरते. वृंदाचा उद्घोष उमटतो :
'साधायचं असतं काय
कुठल्याही क्रांतीमधून
सार्वत्रिक मैथुन
मैथुन मैथुन मैथुन'

क्रांतीला सार्वत्रिक मैथुनाचे, यांत्रिक प्रक्रियेचे, भावनाहीन सुडाचे रूप आलेले आहे. मैथुन-घोषातच हे नाटक संपते. रंगमंचावर आरडाओरडा, गोंधळ, धावपळ - एक अराजक माजते. या अराजकाला छेद देणारा एक स्वर उमटतो तो जाक रूचा :
'कधी तुम्ही शिकाल पाहण्यासाठी
कधी तुम्ही शिकाल बाजू घेण्यासाठी.'

त्याचे हात जखडलेले आहेत. तो उडी मारून पुढे येतो आणि नेपोलियनचा जयघोष करणार्‍यांच्यावर आवाज चढवून म्हणतो -
'कधी तुम्ही शिकाल...'

साद आपल्या खुर्चीवर उभा राहून मोठमोठ्याने हसत रंगमंचावर चाललेल्या गोंधळाकडे पाहत असतो. सादचा हा विजय आहे की पराजय हे प्रेक्षकांनी ठरवायचे.

हे नाटक म्हणजे फ्रेंच राज्यक्रांतीवरचे प्रखर भाष्य आहे. जग हे मनोरुग्णालय आहे आणि त्यातले मनोरुग्ण वेगवेगळ्या भूमिका करतात. क्रांतिकारकांच्या भूमिकाही हे रुग्ण कधी वठवतात. दुसरा अर्थ म्हणजे, क्रांतिकाळ हा असा वेडसरपणाचा काळ होता. शाराँतोंमध्ये केवळ मनोरुग्णच असत असे नाही तर राजकीय कैदीही असत. ज्यांच्यावर उघडपणे खटले चालवणे धोक्याचे ठरेल असे, प्रचलित राजवट आणि समाजव्यवस्था यांना विरोध करणारे लोक त्यात असत. क्रांतीनंतर तर अशा लोकांची संख्या वाढलीच असेल. शिवाय या काळातून गेलेल्यांची मानसिक स्थिती व्यवस्थित राहिली असेल असे नाही. १८०८मध्ये क्रांतीनंतरच्या पंधरावीस वर्षांत अनेक उलथापालथी पाहिलेले लोक या रुग्णालयात असतील. क्रांतीच्या वेडसर वातावरणाचे चित्रण करायचे तर मनोरुग्णालयाखेरीज अन्य समर्पक रुपक सुचणार नाही. मूळचे हे सारे रुग्णच, वरून त्यांनी क्रांतीकारकांचे कपडे तेवढे घातलेले आहेत. वाइसने त्या पात्रांना त्यांच्या हॉस्पिटलच्या पोषाखावरच भूमिकांचे कपडे चढवलेले दाखवलेले आहे. क्रांती म्हणजे मनोरुग्णांच्या दडपलेल्या वासनांचा, विकारांचा, प्रक्षोभांचा अनिर्बंध उद्रेक.
'महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे केस धरून तुम्हाला उचलायचं.
तुम्हाला अंतर्बाह्य बदलून टाकायचं आणि सार्‍या जगाकडे स्वच्छ डोळ्यांनी पाहायला लावायचं.'

माराच्या ओळी देऊन हे नाटक असेच काही कार्य करते असे पीटर ब्रुक या दिग्दर्शकाने म्हटले आहे. त्याच्या मते या नाटकात गंभीर आणि विनोदी, उदात्त आणि सवंग, काव्यात्म आणि ओबडधोबड, बौद्धिक आणि शारीरिक अशा गोष्टी एकापुढे एक ठेवल्या जातात. इथे अमूर्त गोष्टी रंगमंचीय प्रतिमेने स्पष्ट केल्या जातात, हिंसात्मकता विचारांच्या शीतल उजेडाने उजळली जाते. अगदी लांबलचक शीर्षकापासून प्रत्येक गोष्ट प्रेक्षकांना धक्के देणारी ठरते आणि नंतर विचार करायला प्रवृत्त करते. ख्रिस्तोफर इनेसच्या मते या नाटकाचे यश त्याच्या गुंतागुंतीच्या रचनेत आहे. काळ, स्थळ आणि कृती यांना तीन वेगवेगळ्या पातळ्यांवर ठेवलेले आहे. १७९३मधली माराची हत्या आणि १८०८मधला मारा-साद संवाद, विवाद या दोन गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या ठेवलेल्या आहेत. तसेच 'माराची हत्या' या कथेतली पात्रे आणि रुग्णालयातील मनोरुग्ण या दोहोंचेही भान कायम ठेवले आहे. संपूर्ण नाटक अलिप्त-परिणाम साधते ते कूलमिए वाइसच्या नाटकातील पात्र म्हणून येतो, तर सादच्या नाटकाबाहेर तो कायम राहतो आणि वारंवार त्या नाटकात तो हस्तक्षेप करतो, त्यामुळे. चार्ल्स मारोविझला हे नाटक आर्तोच्या रंगमंचीय विचारसरणीच्या जवळचे वाटले. कथानक नसलेले, रंगमंचीय प्रतिमासृष्टीच्या दृष्टीने संपन्न.

मारा, साद, जाक रू, कोर्दे, द्यूपेर या व्यक्तिरेखा, मारा आणि साद यांच्यातील वैचारिक द्वंद्व, चार गायक आणि रुग्ण यांनी निर्माण केलेला समूह, वृंद, विचारसंपन्न स्वगत भाषणांच्या समकाल उभी राहिलेली दृश्यात्मकता या सार्‍यांनीच या नाटकाला बळ दिलेले आहे. त्यामुळे रूढ अर्थाने कथानक नसून हे नाटक खिळवून ठेवते. नाटककाराने शब्द, ध्वनी आणि प्रतिमा या तिन्ही गोष्टींचा कलात्मकतेने उपयोग केलेला आहे. मारा, साद या ऐतिहासिक व्यक्तिरेखा न राहता कोणत्याही काळातील आत्मसंघर्ष अनुभवणार्‍या व्यक्तिरेखांत त्यांचे रूपांतर होते, इथला समूह फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळातल्या अभावग्रस्त जनतेचे प्रतिनिधित्व केवळ करीत नाही, तर कोणत्याही राजकीय-सामाजिक स्थितीतल्या जनतेचे प्रतिनिधित्व करतो. लेखनावर, कृतींवर विश्‍वास असलेला मारा आणि कशावरही विश्‍वास नसलेला साद या मनुष्याच्या मनातल्या दोन प्रवृत्ती आहेत असेही मानता येईल. नाटककाराने कोणत्याही प्रश्‍नाचे उत्तर दिलेले नाही. ते वाचक, प्रेक्षकांनी स्वत:च शोधायचे आहे. कुणाची बाजू घ्यायची की नाही, की या बाजू घेण्याच्या गोष्टीत काही अर्थ नाही हे स्वत:च पाहायचे आहे. आधुनिक रंगमंचावरील ही एक महत्त्वाची नाट्यकृती आहे, हे मात्र निःसंशय म्हणता येईल.

---

('मराठी नाटक आणि रंगभूमी : विसावे शतक' या आगामी पुस्तकातून साभार.)

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)