'हू इज द मोस्ट बिलव्हेड ?’

‘आपले सर्वाधिक प्रेम कोणावर आहे ?’ या प्रश्नाला ‘आई’ पासून ते ‘ओबामा’ अथवा ‘अण्णा’ पर्यंत अनेक उत्तरे येतील. पण खरे उत्तर मात्र तेच जे बिरबलाने शहेनशहा अकबराला दिले होते. ते म्हणजे __ ‘स्वत:वर’ !
कुणी यापेक्षा वेगळे उत्तर देतील, की नाही नाही, माझे खरे प्रेम आहे अमुक तमुकवर !
कशावरून ?
‘मी त्याच्या/तिच्यासाठी ...चा त्याग केला.’
पण मग त्या ‘अमुक तमुक’ चे खरे प्रेम कुणावर आहे बरं ? तुमच्यावर की स्वत:वर ?
आणि खरे प्रेम जिथे असते तिथे त्याग वगैरेंचे कामच उरत नाही. उरते ती फक्त एक नि:स्वार्थ कृती ...आवडत्या व्यक्तीच्या आवडीची ! आणि ही कृती तेव्हाच घडते जेव्हा आपण स्वत:इतकेच प्रेम त्या व्यक्तीवर करतो. होय, स्वत:इतकेच ! म्हणजे मग प्रथम स्वत:वर आपले खरेखुरे प्रेम असावयास हवे !
होय. प्रेमाची व्याख्या स्वत:पासून सुरु होते. जेव्हा आपण स्वत:वर प्रेम करू लागू तेव्हाच दुसऱ्यावर प्रेम करू शकू. स्वत: स्वत:ला समजू तेव्हाच दुसऱ्याला समजून घेऊ शकू. स्वत:ला क्षमा करू शकू तरच दुसऱ्यांना क्षमा करायला शिकू. अन स्वत:चे हित कशात आहे हे नीट जाणून घेऊ शकलो तरच दुसऱ्याचे भले करू शकू. जेव्हा स्वत:च्या अंत:करणाचा प्याला प्रेमाने पूर्ण भरून जाईल तेव्हाच आपण दुसऱ्याला प्रेम देऊ शकू.
पण प्रत्यक्षात फारच थोडे लोक असे वागतात. बहुतांश लोकांचे प्रेम स्वत:ला दुसऱ्यावर लादण्यानेच व्यक्त होते. ज्यांच्यावर प्रेम आहे त्यांना ते समजून घेताना दिसत नाहीत. त्यांच्या आवडीनिवडी, त्यांचे कल जाणून घेण्याचा प्रयत्न करीत नाहीत. त्यांचा आनंद कशात सामावला आहे याचा शोध घेत नाहीत. ‘मी म्हणतो की तुझे याने भले होणार आहे...’अशा पठडीचे त्यांचे प्रेम असते. प्रेमापोटी आपण प्रेमपात्रावर अन्याय करत आहोत याची पुसटशीही जाणीव त्यांना नसते. मग प्रेम असूनही वाद होऊ लागतात. मने दुखावतात, दुरावतात. संबध बिघडतात. हे टाळणे शक्य आहे का ?
खरं पाहिलं तर जीवनाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये प्रेमाची आवश्यकता प्राथमिक रुपाने भासत असते. प्रेमाशिवाय जीवनाचा दुर्ग मनुष्यासाठी दुर्गम आहे. जन्मताच ही गरज जननीच्या प्रेमाने पूर्ण होते. मातृप्रेमाचे महिमे गाऊन कितीक कवी प्रख्यात झाले. त्यानंतर पिता, भाऊ, बहिण अन इतर कुटुंबियांच्या प्रेमाने घडा भरत राहतो. मग येतात सखे सवंगड्यांचे दिवस. आता त्यांच्या प्रेमापुढे मातेचे बोलसुद्धा फिके वाटू लागतात. हळूहळू चाहूल लागते तारुण्याची. मग प्रेमापात्रापुढे जग तुच्छ वाटू लागते. त्यानंतरचे काही पावसाळे अपत्यप्रेमात चिंब भिजून येतात. अपत्ये मोठी झाल्यावर त्यांची अपत्ये म्हणजे तर दुधावरची साय ! त्यांच्याविना घर सुने वाटू लागते. आणि मग होता होता एक दिवस असा येतो की ही सगळी प्रेमपाखरे उडून आपापल्या विश्वात पंख पसरून विहार करू लागतात अन म्हातारपणी मायेचा आधार अन प्रेमाचा शब्द दुर्मिळ होऊन बसतो. प्रेम तर असतेच. प्रेमपात्रेही असतात. तरीही एकलेपणा छळू लागतो. प्रेमासाठी जीव तळमळू लागतो. आतापर्यंत दिले-घेतलेले सगळे प्रेम कुठे गेले ?
असे का होते ? याचे एक कारण म्हणजे आपण आपल्या अंतरातल्या प्रेमावर खूप मर्यादा घालतो. मुरड घालतो. दिसणाऱ्या भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर अन प्रत्येक वस्तूवर प्रेम जडू शकते. पण आम्ही नाही करत ! कधी लक्षच देत नाही त्यांच्याकडे. आपल्या आकांक्षा, सुखदु:खे, त्यांची पूर्ती, आपल्या समस्या इ. मध्ये आपण इतके गुरफटून गेलेलो असतो की छोट्या छोट्या गोष्टींवर प्रेम करणे, त्यांचा आनंद घेणे आपण विसरून जातो. लहान असताना आपण दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे कुतूहलाने पाहत असतो. तीवर प्रेम करत असतो. तिला समरसून प्रतिसाद देत असतो. अन आनंद घेत असतो. म्हणून लहानपणच्या आठवणी सगळ्या रम्य अन प्रेममय असतात.
माझ्या लहानपणीचा एक किस्सा आठवतो.
१२-१३ वर्षाची असेन. मी, संगीता अन अनुराधा शाळेतील जिवलग मैत्रिणी. एकमेकीच्या कानाशी लागून कुचूकुचू करून खिदळल्याशिवाय अन दप्तरातली चिंचेची बुटूके चिमणीच्या घासाने एकमेकीला खिलवल्याशिवाय एकही दिवस आम्हा तिघींचा जात नसे. पण एके दिवशी त्या दोघींचे अन माझे काहीतरी बिनसले ! झाले. अबोला सुरु झाला. २-३ दिवसांनी त्या दोघींचे येताजाता तिरकस टोमणेही सुरु झाले. प्रत्युत्तरे अगदी माझ्या ओठावर येत. पण त्या दोघींवरचे बालसुलभ प्रेम त्यांना बाहेर पडण्यापासून रोखून धरी.
आणखी २-३ दिवस गेले. गणिताचा तास. बाईंनी काल करून आणायला सांगितलेल्या गृहपाठाच्या वह्या काढायला सांगितल्या आणि पहिल्या रांगेपासून तपासायला सुरुवात केली. मी वही बाहेर काढली. शेजारी संगीता अन अनुराधा. त्यांनी गृहपाठ केलेला दिसत नव्हता. दोघीचे चेहेरे गोरेमोरे झालेले, संभाव्य बोलणी अन अपमानाच्या कल्पनेने. मला काहीतरी सुचले. मी पटकन गृहपाठाचे पान उघडून त्या दोघींसमोर ठेवले. तिघींची नजरानजर झाली. मी नजरेनेच धीर दिला. त्या समजल्या. पटापट दोघींनी आपापल्या वह्यांमध्ये गृहपाठ लिहून काढला. सारा २ पानांचा गृहपाठ ! बाई आमच्या रांगेशी येईपर्यंत झालासुद्धा ! तिघींचेही चेहेरे हास्याने खुलले. मग काय ? रुसवे अन फुगवे सगळे विरून गेले अन त्यानंतरच्या संपूर्ण शालेय जीवनात आमची मैत्री अशी अभेद्य टिकून राहिली की ज्याचे नाव ते.
असे शुद्ध अन निरपेक्ष प्रेम हा आपला सहज स्वभाव आहे. निरपेक्ष अन उस्फुर्त मदत हा प्रेमाचा राजमार्ग आहे. तो अनुसरला तर जीवनाच्या कोणत्याही टप्प्यात कधी प्रेमाची उणीव भासणार नाही. स्वजनांचे प्रेम दूर गेले तरी परिसरातील इतरांचे सहज मिळत राहील. आजवर प्रेम केलेल्या वस्तूंचा विरंगुळ्यासाठी उपयोग होईल. एखादे झाड लावून प्रेम करा अगर एखादे कुत्रे मांजर. त्यांच्या संगतीत प्रेमाची उणीव कधीच भासणार नाही.
पण हे सगळे कधी साध्य होईल ? जेव्हा आपण स्वत:वर खरे प्रेम करायला शिकू तेव्हा ! अंतराच्या हाकेकडे थोडे लक्ष देऊ तेव्हा. अंतरातल्या प्रेमाला वाट देऊ तेव्हा. नेहमीच्याच धबडग्यातून इतरांसाठी थोडा वेळ काढू तेव्हा. अन प्रत्येक क्षणाचे रुपयात रुपांतर करण्याचे विचार सोडू तेव्हा. दैनंदिन जीवनात भेटणाऱ्या अन दिसणाऱ्या प्रत्येक व्यक्ती अन वस्तूबरोबर आपण अंतरातले प्रेम वाटत राहिलो तर हा प्रेमाचा झरा कधी आटणार तर नाहीच उलट त्याला अनेक लहान मोठे ओघ येऊन मिळत राहतील अन जीवनाच्या निर्झराचा प्रवाह कसा सदैव खळखळत वहात राहील !

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

आपले सगळ्यात जास्त प्रेम स्वतःवरच असते आणि प्रेम लादण्यातून नाती संपतात या दोन्ही मुद्यांशी सहमत.

पण << म्हणून लहानपणच्या आठवणी सगळ्या रम्य अन प्रेममय असतात.>> हे सुदैव मात्र सगळ्यांनाच लाभतं असं नाही. किंबहुना गेलेल्या दिवसांबद्दल (जसं मेलेल्या माणसाबद्दल बोलतात तसं) चांगलच बोलायची आपली एक सवय आहे असं मला अनेकदा जाणवत. त्यातून कदाचित आपण सध्याच्या आयुष्यातल्या ताणतणावाला सामोर जायचा एक मार्ग शोधत असतो का? म्हणजे गेलेले दिवस चांगले असतातही, पण सध्याचे तरी काय वाईट असतात..असा मला एक प्रश्न पडतो.

त्यावरून आठवलः डेनिसच्या गोष्टी मला तरूण वयात फार आवडायच्या पण जेव्हा मी त्या लहान (८ ते १२ वयोगट) मुलांना सांगायचा प्रयत्न केला (गोष्ट सांगण्याची माझी पद्धत चांगली नसेल कदाचित) तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्यांना त्या विशेष आवडत नाहीत. पण त्याचवेळी २० ते ३० वयोगटातील माझ्याभोवतीच्या लोकांना मात्र त्या प्रचंड आवडत होत्या. तेव्हा मला कळलं की माणसाला 'जे करता येत नाही' त्यात रस असतो जास्त!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लहानपणीच्या सर्वच आठवणी रम्य नसल्या तरी चांगल्याच फक्त आठवणीत राहतात. याचे कारण वाईट आठवणी विसरण्याचा मानवी मनाचा गुण लहानपणी प्रकर्षाने जागृत असतो . एक चांगला गुण. कटू आठवणी सर्वांच्याच जीवनात असतात. पण त्या विसरण्यातच शहाणपण आहे. विस्मरण ही मानवी बुद्धीला मिळालेली श्रेष्ठ देणगी म्हटली पाहिजे. आयुष्यातल्या ताणतणावाला सामोरे जाताना जर वाईटच आठवणी प्रकर्षाने मनात असतील तर मानवी मन तग धरू शकणार नाही.
दिवस सगळे सारखेच असतात. पण मनोवृत्तीत फरक पडतो. आतिवास ताई, मला तरी प्याला अर्धा रिकामा आहे यापेक्षा अर्धा भरलेला आहे हेच समाधानाचे वाटते.
चिंतनीय प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0