मोनेकृत थिसॉरसातले कुरूप जिप्सी फुलपाखरू

लहानपणी मी ऐकल्याचं आठवतंय की फुलपाखरू, पाली, झुरळं इत्यादी 'निरुपद्रवी जीव' आहेत. फुलपाखरं तशी दिसायला बरी असतात. मस्त रंगीत पंख फडफडवत ती निवांत नेत्रसुख देतात. पण कुरूप फुलपाखरू एखादं असेल, तर ते सर्वथा (माणसासाठी) निरुपयोगी आहे. त्याच्या फडफडीकडे लक्षही जात नाही. गेलंच तर काय च्यायची कटकट... वगैरे मनात येऊन जातं. डिक्षनरीचा उलटा प्रकार थिसॉरस असतो. अर्थावरून शब्द शोधणे असा काहीसा. एखादं चुकार कुरूप फुलपाखरू अशा थिसॉरसावर जाऊन बसलं, की त्याच्या डोक्यात
थिसॉरस-सॉरस-डायनोसॉर-मी डायनोसॉरचा वंशज-वंशज-बघतोस काय रागानं, झेप घेतलीय टी-रेक्सनं
असे विचार येऊन जातात. ते उगीचच केविलवाणे कुरूप पंख अजून फडफडवतं.

वाचकांना जर प्रश्न असेल की वर काय लिहीलंय, तर ह्यापुढे ज्याबद्दल लिहीलेलं आहे त्या लेखनशैलीची एक झलक आहे. एखाद्या विषयावर लिहायला जावं, आणि मध्येच मालिकांसारखं आत्यंतिक फालतू विषयाभोवती दैनिक पंधरा मिनीटं कशी फुंकावीत, तसं एका शब्दावर केलेलं आणि शेवटी वास्तवाची फोडणी दिलेलं एक वाह्यात निरुपण आहे. ह्या फोडणीमुळे एकूणच प्रस्तावनेतल्या आशयाचा फोलपणा बरीक झाकला जातो.

हेच संजयराव मोनेंच्या 'मी जिप्सी' नामक लोकरंगातल्या सदरात वाचून पदोपदी जाणवत राहतं.

पहिल्याच लेखात लेखक आपली अत्यंत साक्षेपी, नम्र, विनयशील तरीही सडेतोड- अशी काहीतरी प्रतिमा दाखवतात. त्यामुळे वाचकाच्या अपेक्षा अचानक वाढतात. आपल्या मर्यादा ओळखून असलेल्या माणसा(लेखका-)बद्दल आपसूकच एक चांगलं मत तयार होत जातं.

त्याच्या पुढची पायरी म्हणजे, चक्क थापा. हा शब्द मी वापरण्यामागचं कारण म्हणजे सुरुवात फार तार्किक वगैरे करुन एकाएकी जन्तेला कसं कशाचंच पडलेलं नाही, पब्लिक कसा म्याड आहे आणि मी 'सेलिब्रिटी ॲक्टर' म्हणून त्यांच्या जीवनातले गंमतीशीर विरोधाभास कसे अधोरेखित करू शकतो ह्या ध्येयाने मोने पछाडले जातात. बरेचदा लेखातल्या विनोदांची अतिशयोक्ती केविलवाणी होते आणि सगळाच प्रकार एखाद्या फार्समधला जास्त वाटू लागतो. मोनेंनी फार्स लिहीलेले आहेत. त्यातली लकब 'जीवनातील गंमतीशीर विरोधाभासात' आली की त्या कुरूप फुलपाखराचे पंख अधिकच फडफडतात. खरंतर 'सेलिब्रिटी', 'अभिनेता' म्हणून वेगळं काय पहायला/जगायला/अनुभवायला मिळालं हे न देता लेखक जुने जुनेच लेखकांनी हाताळलेले विषय, (अर्थात, यथाशक्ती नवीन काळाच्या बेसिसवरच) उगाळत राहतात. ह्यामुळे त्यांना 'सिद्धहस्त लेखक' होण्याची प्रचंड चूष आहे असं जाणवल्यावाचून राहवत नाही.

सदराचं नाव आहे मी जिप्सी. तरीही, लेखकात्मा मराठी मध्यमवर्गीयांच्या संवेदना ह्यातच अडकून राहतो. अभिनयाच्या निमित्ताने झालेली भटकंती, अभिनय करताना आलेले अनुभव इ, स्वर्ग-नरकात न जाता तो ह्याच विषयांत घोटाळत राहतो. मग त्याला जाग येते, काहीतरी चांगलं लिहीलं पाहिजे अशा संवेदना जागृत होतात आणि तो अक्षरश: कुठल्याही प्रसंगात फार्स लिहून मोकळा होतो. ह्यातले संवाद विनोदी न होता हास्यास्पद होतात. अशा विषयांबाबत लिहीताना खरंतर त्या विरोधाभासांबाबत मस्त भाष्य करणं इ. मुळे दर्जा बराच वाढला असता. इथे जे वाचायला मिळतं ते सवंग स्ट्याण्डपकामेडीस्क्रिप्टछाप आहे. हास्यास्पद अतिशयोक्तिपूर्ण संवाद, वाक्यं ह्यामुळे ते लेखन काही उंची गाठत नाही. एक 'अभिनेता', 'सेलिब्रिटी' ह्यामुळे वेगवेगळ्या समाजातल्या, वेगवेगळ्या आर्थिक स्तरांतल्या, शहरी/ग्रामीण लग्न, प्रवास, समारंभ ह्याबद्दल बरंच सप्तरंगी लेखन केलं असतं तरीही लेखनाला सुमार दर्जा आला असता. इथे गोष्ट मराठी शिनुमाची इ. लेख बरे आहेत, त्यांचा उल्लेख केला पाहिजे.

साधारण साताठ तेचतेच विषय उगाळल्यानंतर लेखक अभिनय, सिनेमा आणि नाट्याकडे वळतात. इथे काहीतरी दैदिप्यमान वाचायला मिळेल तर काहीतरी कणेकरस्टाईल नॉष्ट्याल्जिया दिसतो. खरोखर त्यांचा स्पेशल म्हणावा असा लेख म्हणजे 'कोल्हटकरांनी शोले बनवला असता तर?' लेख उत्तम आहे. त्यातही सौमार्य बरंच जपलेलं आहे लेखकांनी- पण असो.

इथे काही विशेष उल्लेखनीय रत्नं म्हणजे 'कल्पनेतली ‘गोष्ट’'. हा लेख अत्यंत चिंतनीय(!) आहे. लेख मोनेंसारख्याच-लेखक झालेले अभिनेते-ह्यांवर आहे. लेखातली काही वाक्यं-

समोरच मागच्या महिन्यात शूटिंगला युरोपला गेलो होतो तेव्हा तिथून विकत आणलेला वाफाळलेला चहाचा कप होता. (स्त्री-लेखक असेल तर चहाची कॉफी होते.) तितक्यात अमुक किंवा तमुक गेल्याची बातमी व्हाट्स अ‍ॅपवर आली आणि माझा व त्या व्यक्तीचा गेल्या पंचवीस वर्षांचा परिचयपट डोळ्यासमोरून तरळून गेला..’ या रूपात वाचकांसमोर येतो. आता कोणीतरी गेला हे महत्त्वाचं, की तुम्ही परदेशातून कप विकत आणला, हे महत्त्वाचं?

अधिक काही लिहायची गरज नाही. मोने हे नक्कीच करत नाहीत, पण आपलं साजूक भाबडं देशीपण सगळ्या लेखांत मिरवल्यावाचून राहत नाहीत. कहर म्हणजे पुढे:

असं लिहिण्याचा दुसरा फायदा म्हणजे यात पाच-पन्नास शब्द अधिक लिहून निघतात.

खरंच? मोने स्वत: नसत्या शब्दांचे व्यर्थ कीस पहिल्या लेखापासून पाडतात. हेही जॉन्र पेलता आलं तर खुसखुशीत वाटतं, पण 'दळणवळण', 'वाचक', 'गावकुस', 'अंतर्मन' आदी शब्दांवर निरर्थक टिप्पण्या करून जवळपास एका स्तंभाएवढी जागा मोनेंनी खाल्लेली आहे. वानगीदाखल-

... छान टुमदार बंगला आहे. (आता- ‘टुमदार’! हे काही काही शब्द ना आपण बिनदिक्कत वापरत राहतो. विशेषत: नाटक-चित्रपटांत, आणि सध्या काही र्वष मालिकांत अभिनय करणाऱ्यांना लेखक मानायची एक चूष निर्माण झाली आहे. अन् आता आम्ही लिहिणारेही स्वत:ला तेच मानायला लागलोय. तेच जास्त धोकादायक आहे. त्यांच्या लिखाणात हा शब्द हटकून असतो.)

फार्स-वाईट फार्स-हास्यास्पद इतक्या पायऱ्या खाली गेलेलं लिखाण आता केविलवाणं होतं. ते फुलपाखरू आपण थिसॉरसावर बसलोय म्हणून उगीच बागेत बागडणाऱ्या रंगीत फुलपाखरांसमोर टिमकी वाजवू लागतं. ह्या लेखात अशी बरीच रत्नं आहेत. इच्छुकांनी आनंद घ्यावा. शेवटचा परिच्छेद कहर आहे.

अजून एक रत्न म्हणजे 'कथा केशवरावाची..'. कुरुप फुलपाखरू आता किळसवाणं दिसतं. लेखाची सुरुवात नेहमीप्रमाणे अत्यंत स्वतुच्छ (सेल्फ डेप्रकेटींग हो!) विनोदाने करून ते ह्या केशवरावांवर वळतात. फुलपाखरू थिसॉरसाच्या नादात खायचं-प्यायचं विसरतं आणि त्याची आत्यंतिक तडफड सुरू होते. जगायचं तर आहे, पण थिसॉरसाची ओढ काही जात नाही. इथे माझं त्याच्याकडे लक्ष जातं, आणि एरवी निरुपद्रवी म्हणून सोडून दिलेल्या ह्या स्तंभाबद्दल लिहीणं मला गरजेचं वाटू लागतं.
ह्या लेखात

आम्ही बाहेर भटकत असताना समोरच्या घरातून एक आवाज कानावर आला –
‘‘केशवराव! याद राखा.. एक पाऊल जरी पुढे टाकलंत तर! काय करताय तुम्ही? जरा भानावर या!’’ त्यानंतर अचानक त्या घरात दिवे लागले आणि परत एक-दोन क्षणांत अंधार झाला.

ह्या इतक्या वाक्यावरून जे काही कल्पनेचे इमले बांधलेले आहेत त्यांना काही तोड नाही. लेखन 'केविलवाणं'च्याही खालच्या पायऱ्यांवर उतरतं. मुळातच फुळकावणी ताकात अजून पाणी ओतायची धडपड दिसते. ह्यात त्या अतीव पाणचट ताकाला मठ्ठा करायचा प्रयत्नही;

स्त्रियांचा आवाज नैसर्गिकदृष्टय़ा मंजूळ असतो, तसेच त्या काळातल्या लेखिकांचे आवाज असायचे. मग ही अशा आवाजात त्या केशवरावला दटावणारी स्त्री म्हणजे काळाच्या आधी जन्माला आलेली एखादी लेखिका तर नव्हती?

अशा पदार्थांमुळे झालेला आहे. नंतरच्या परिच्छेदांबद्दल अधिक लिहीणं म्हणजे वेळेचा अपव्यय आहे. पालीने श्वास कोंडून बैल व्हायचा प्रयत्न करावा असा काहीसा लेख झालेला आहे. शेवटी लेखक

या अशा नुसत्या पाण्यातून बासुंदी निर्माण करणाऱ्या कथा भरपूर वाचल्या आणि वाटलं, आपणही असं काहीतरी लिहावं.

हे तद्दन कातडीबचावू धोरण घेतात, पण स्वत: तेच लिहून मोकळे होतात. फार्स हे बलस्थान असेल तर ह्या धर्तीवर कृष्णविनोदी फार्स उत्तम लिहीला गेला असता हे इथे नोंदवणं आवश्यक ठरतं. हाच फार्स ते दुसऱ्या ठिकाणी लिहून तो करूण आणि हास्यास्पद करतात हे आधी लिहीलेलं आहेच.

नंतर फुलपाखराची थिसॉरसवर बसल्यामुळे जामच पंचाईत होऊ लागते. त्याला दाखवायचं असतं की आपण लै स्पेशल आहोत. त्यामुळे ते इतर फुलपाखरं कशी टिपीकल रंगीत रंगीत आणि तीच-तीच असं काहीतरी दाखवू पाहतं. त्या प्रयत्नात आपणही फुलपाखरू आहोत हे विसरतं. मध्येच त्याला ते समजतं पण त्यातला विरोधाभास आणि पर्यायाने येणारी केविलवाणी अगतिकता मात्र ते टाळू शकत नाही.

मोनेंचे सुरुवातीचे लेख सुमार होते. नंतर कुठलाही लेखक साधारणत: विनोदाकडे वळतो. मोनेंचा विनोद फार्सकडे जातो, आणि केविलवाणा होतो. इथे ते जयवंत दळवी, पु.लं., चिं. वि. जोशी सारख्या विनोदी लेखकांचं कुरण- मध्यमवर्गीय जीवनातले विनोदी विरोधाभास-इथे वळतात. इथून त्यांची गाडी cliché, त्याचत्याच धर्तीच्या लेखांवर टिप्पणी करण्याकडे वळते. हे करताना त्यांचं लिखाण हे त्याहूनही अत्यंत बाष्कळ होतं ह्याचं भान त्यांना राहत नाही. ते ब्लॉग फ्याशनमंदी आहे म्हणून ब्लॉग लिहीणाऱ्या होतकरू ब्लॉगकऱ्याच्या पातळीला जातं.

मोनेंना विनंती आहे की त्यांनी थांबावं. लोकसत्ताला विनंती आहे की तो थिसॉरस दण्णदिशी मिटून त्या फुलपाखराचा त्यांनी अंत करावा. (जो आता वर्षअखेरीस होईलच, पण त्याचा फिनिक्स-पाखरू करून नवीन थिसॉरस आणि नवीन फुलपाखरू आणू नये.)

__________________
परिशिष्ट: (जस्ट इन केस)
फुलपाखरू: अभिनेत्याचा लेखक झालेला आत्मा.
थिसॉरस: शब्दांवरच्या केविलवाण्या निरुपणांचा आत्मा.
अतिशयोक्त फार्स: 'लोकप्रतीनीदीचं सांस्कृतिक कार्य', 'तदेव लग्नम्.. ', 'लग्न.. द इव्हेंट!', 'लग्नाची बैठक..', 'रेल्वेचं दळणवळण', 'ट्रिप पुराण'

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मोनेंकडून इतक्या अपेक्षा असणं गैर आहे!
वर म्हटल्याप्रमाणे, माझा पण ब्लॉग, टाईप लिहितात आपलं मोने. उदाहरणं वाचून वाटतेय की संपादन नामक संस्कार ह्या लेखनावर होत नसावेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मागे एकदा "मोने फार डोक्यात जातो" हे वारंवार ऐकल्यावर लेखकास विनंती केली मग पाड एक लेख एखादा. "नाही, तेवढे मोठे नाहीत."
हे आहे कुठल्या मागच्या खफ पानावर.
असो.
आता या लेखाबद्दल - थिसॅारस हे उलट डिक्शनरी नाही.
"फुलपाखरू एखादं असेल, तर ते सर्वथा (माणसासाठी) निरुपयोगी आहे."
फुलपाखराने अथवा इतर प्राणीमात्राने काय म्हणन माणसासाठी उपयोगी होऊन जगलेच पाहिजे? 'खा,मोठे व्हा,जोडीदार शोधा, आणखी असेच जीव स्वत:च्या आणि इतरांच्या खाण्यासाठी निर्मून मरायचे हा मार्ग धरताना कुणाला जरा गमत वाटली तर तर तो त्याचा प्रश्न नाही का?
पाल श्वास वगैरे फुगवून बैल होण्याचे स्वप्न पाहते ही गोष्ट जरा नवीनच आहे.
बाकी मोने अथवा इतर कुणी शिलेब्रिटी लोकसत्ता अथवा इतर कुठल्या पत्राचे रविवारचे अर्धे पान पाचसहा महिने भरून देण्यासाठी सोत्ता लिहीत असेल असा माझा समज अजिबात नाही. कुणी त्यांचे विचार शब्दांकन करतात.
तर मोनेंचे मागच्या घटनांतील विस्कळीत विचार थोडी तडकाफोडणी मारून येते ती आहे.
असो.
लेखाचा अर्धा भाग जिप्सी - फुलपाखरु - डाइनोसॅार -टी रेक्स याच्याशी जोडण्यात गंडला आहे हे नम्रपणे सांगू इच्छितो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेखक म्हणून ते खरंच तितके मोठे नाहीत. मला मूड झाला, मी लिहीलं.

ते फुलपाखरू वगैरे टाईमपास आहे हो. ते परागकण वगैरे जमा करणं इत्यादी सोडून थिसॉरसावर जाऊन बसणं इतकीच काय ती उपमा.
फुलपाखरू जसं माणसासाठी उपयोगी नाही, तसंच हा अभिनेत्याचा लेखकात्माही निरुपयोगीच आहे. 'माणसासाठी जगलं पाहिजे असं मी तरी कुठे लिहील्याचं दिसत नाही.
आणि उलटी डिक्षनरी ही फार अडाणी व्याख्या आहे हे माहितिए. त्याहून सुटसुटीत व्याख्या माहित असल्यास सांगावी. बदल करण्यात येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is for sissies.

टाईमपास!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हल्ली, असल्या लेखकुंची सदरे मी रॅपिड रिडिंगसारखी वाचतो आणि सोडून देतो. मराठी नाटक आणि त्यातले अभिनेते, अभिनेत्र्या आणि लेखक, यांच्याविषयी तर माझे फारच प्रतिकुल मत झाले आहे. मराठी नाटकातले टाळीला टपलेले, सो कॉल्ड चटपटीत डायलॉग, त्याला मिळणारे सुमार प्रेक्षकांचे रिस्पॉन्स आणि ओव्हरॲक्टिंग कडेच झुकलेला कृत्रिम अभिनय, हा आता नकोसा वाटू लागला आहे. आणि हे सगळं बघण्यासाठी पाचशेच्या घरातलं तिकीट काढणं, म्हणजे त्या क्लेशावरच्या डागण्या वाटतात. जसजशी, जागतिक स्तरावरच्या कलाकृती, नैसर्गिक अभिनय आणि आशय बघण्याची जालीय संधी मिळत गेली, तसतसं, मराठी नाट्य व चित्रपटक्षेत्र फार खुजं वाटायला लागलं!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

अशीच एक टिंगल सोनाली कुलकर्णी (थोरली) हिची करावी अशीही मनापासून इच्छा आहे. तिचे जे काही लेख वाचले होते, ते अत्यंत लेम(ळट) होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

व्हिवा पुरवणी ही कचराकुंडी आहे. ती चिवडण्याची जराही इच्छा नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is for sissies.

प्रवासात वाचण्यासाठी कोणते लेखक घ्यावेत? २००० अगोदर आणि नंतरचे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0