बोगदा

बोगदा

पलीकडे कदाचित किंचित उजेड असेलही
या आंधळ्या आशेवर
परंतु निर्भीडपणे
थेटच शिरतो बोगद्यात आपण
...
क्षण सरकत असतात
..
आसपास वरखाली
बेफाम अंधारमिठ्या
मागच्या उजेडाच्या दोराचेही
मिटत जाणारे संकेत
शब्दशः गर्भाचे ठोके
सखोल शून्यतेचे काही
..
गरगरणारे विवर
आणि व्यापून निःस्तब्धता ..
फक्त आपलेच प्रकाशकाजवे आणि
बुबुळांचे दिवे जपत
सरकतच राहतो आपण नेटाने
मंतरल्यागत
ती निर्वात पोकळी पकडून
..
आणि काळोखाचा पाश चिरत
दूरवर दिसते एक क्षीण तिरीप
अंधुकशी
अवध्या काही श्वासांना छेदत
ती बस मग फाकतच जाते
रेषांच्या लंबरुपात .

आणि एक निर्णायक क्षणी
आपण झपकन फेकले जातो
उजेडाच्या अथांग कक्षात
आपण घेतो फुफ्फुस भेदून पलीकडे जाईल
असा मोठा श्वास
आणि दिपलेल्या डोळ्यांनी
बघत राहतो प्रकाशाने न्हाऊन निघालेल्या
स्वतःलाच
.
काही कळायच्या आतच
आपण विसरवूनही टाकलेला
असतो बोगद्याताला चौफेर चौखूर
निर्मम काळोख
जीव वेढून बसलेली काळाची अधोरी नाळ

माफ करून टाकलेले असते आपण
साऱ्या साऱ्यालाच
बोगदा बराच मागे पडलेला असतो .

field_vote: 
0
No votes yet