आवडती नावडती शहरं (आणि गावं!)
"खरडफळा ही धाग्यांची जननी आहे" असं एक अनाम लेखक म्हणून गेलाच आहे
तद्वत ही चर्चा सुरू करतो आहे.
आपण एखाद्या शहरात किंवा गावात जन्मतो. बरेचदा आयुष्यभर तिथेच राहून ते ठिकाण "आवडून घेतो". मग त्या जागेला नावं ठेवलेली आपल्याला आवडत नाहीत.
केल्याने देशाटन .. मनुजा चातुर्य मिळतसे फार हे आईशप्पथ खरं आहे.
म्हणजे इतर जागा पाहिल्या. नवे देश, नवी ठिकाणं दिसली की वाटतं - च्यायला. असंही असू शकतं!
तर उद्देश हा की - तुमच्या आवडत्या शहरांबद्दल (आणि गावांबद्दलही ) सांगा- की तुम्हाला त्यातलं काय आवडतं/काय आवडत नाही वगैरे.
खास नावडत्या जागांबद्दलही नक्की सांगा.
प्रतिक्रिया
केरळ आणि साउथ बर्लिग्टन /व्हरमाँट
माझी आवडती गावे/राज्ये - केरळ आणि साउथ बर्लिग्टन /व्हरमाँट
केरळ फार सुंदर आहे. किती खंड्या पक्षी, बॅकवॉटर, विपुल नैसर्गिक सौंदर्य. आहाहा!! आम्ही जुलाई मध्ये गेलो होतो. त्या मिस्टी हवेत तर केरळ इतकं सुंदर भासलं. भाताची खाचरं, त्यात इरकलं घेउन काम करणारे लोक.
रेल्वेने गेलेलो होतो. दी बेस्ट जर्नी!!!
शिवाय मासे, केळ्याचे, फणसाचे वेफर्स चविष्ट. कॉफि ओके ओके.
_______________________________
व्हरमाँट हे सर्वाधिक आरोग्यपूर्ण राज्य म्हणुन नावाजलेले राज्य (याहुवरती वाचले) आहे. पैकी साउथ बर्लिंग्टन मध्ये केवढे तरी बायसिकल ट्रॅक्स् होते, ट्रेकिंग ट्रेल्स होत्या.
ओह माय गॉड!!! ऑफिसातील लोकं प्रचंड बर्फात, लंचटाइममध्ये, त्या ट्रेल्स वरती जॉगिंगला जात असत. फार फार हेल्थ कॉन्शस लोक होते त्या ऑफिसात.
http://www.aapvt.org/news/vermont-once-again-tops-healthiest-state-rankings
________________
नावडते शहर/राज्य - सॅन अँटॉनिओ/टेक्सास - कोरडे वाळवंट, अति ऊन व ॲलर्जीजचा त्रास. फक्त पालीच्या रंगाची किंवा करडी घरे.
केरळात लहानपणी गेलो होतो.
केरळात लहानपणी गेलो होतो.
तिथला निसर्ग, हाऊसबोट्स लक्षात राहिल्यात आणि जेवण. ए-वण!
त्या छोट्या बोटीत तिथल्या एका म्हातारबुवांनी माशांचं जेवण दिलं होतं. आजोबा तसे काटकुळे, काळे आणि सुरकुतलेले होते. त्यांनी दाढीभर चेहेऱ्याच्या बोळक्यातून हसत माझ्यापुढे एका स्टीलच्या प्लेटमधे जेवण आणून दिलं.
लहान पोरांना "कण्णे" असं काहीसं म्हणतात असं त्यांनी माझ्या बाबांना सांगितलं.
मासा जब्री होता. उकडा भात, त्यात कसलीतरी आमटी होती. त्या भातासोबत तो मासा आणि डचमळणारी ती बोट. आजूबाजूला "बॅकवॉटर" असं काहीसं होतं त्यातून दिसणारी झाडंबिडं. मला तो प्रवास एकदम लक्षात आहे.
.
आणखी एक जेवण म्हणजे केरळातच कालडी (शंकराचार्यांचं जन्मस्थान बहुतेक) इथे गेलो असताना गाडीच्या ड्रायव्हरच्या आग्रहाखातर एका लोकल जागी गेलेलो. लक्षात राहाण्याचं एकमेव कारण म्हणजे तेव्हा मी आयुष्यातला सगळ्यात मोठा पापड पाहिला होता. जवळपास ताटभरून गेलेलं. फोटो काढला आहे
.
शिवाय तिथे टॅक्सीवाला इंग्रजीत बोलत होता हे तेव्हा मला प्रचंडच भारी वाटलेलं!
.
नंतर केरळी लोकं दोस्त झाले आणि त्यांनी आणखी बऱ्याच जागा सांगितल्या. सगळ्याच लक्षात नाहीत, पण पुढे कधी केरळात गेलो तर बरीच घरं आहेत पाहुणचारासाठी
...
==================
भूतकाळातील आस्वल्य.
केरळातच कालडी (शंकराचार्यांचं
अरे वा!!!! खूपच छान. बरोबर आदि शंकराचार्यांचे जन्मस्थान.
____________-
१००% साक्षरतेचे केरळ पहीले राज्य आहे.
लहानपणी प्रत्येकाच्या मनात
लहानपणी प्रत्येकाच्या मनात आवडतं गाव मामाचं गाव ( मामाचा गाव ) असतं तसं माझंही होतं. त्याला बरीच कारणं आहेत. सांगली जिल्ह्यात येतं. सुट्टी संपल्याने अभ्यासाचं लचांड नाही. मामा लोक थोडेसेच आपल्यापेक्षा मोठे. दिवसभर उंडारायचं. दुपारी झोप अथवा कुठे कुणाच्या शेतातलेच ऊस, कैऱ्या खायच्या. अंधार पडायच्या आत घरी. नंतर मोठे झाल्यावर दहावीत वगैरे गेल्यावर ते बंद झालं. गम्मत संपली, लाड संपले. मग एक दोन महिने फार वाटु लागलं.
दोष म्हणजे ( मुंबईच्या तुलनेत) पाणी लांबून आणावं लागणे, तिथे जातिव्यवस्था असते हे कळलं. इतर गोष्टींतही अमुक करायचं तमुक करायचं नाही हे लक्षात आलं. बऱ्याच ठिकाणी संडास आणि डुकरे हे समिकरण होतं. नोकरी धंध्यात दूर जावे लागते त्यात त्या लोकांचे पैसे जातात. रेल्वे सोय नाही, बेस्ट बस नाही.
मूलभूत सोयींमध्ये गावा/ शहरांत फारच तफावत. नवीन सिनेमा लवकर येत नसे.
भारतातल्या बऱ्याच गावांचे हेच होते. आता काळ बदलला.
पुढे आयुष्य मुंबईच्या उपनगरातच गेलं. साताठ दिवस पर्यटनानिमित्त भारतात फिरल्यावर सामाजिक प्रश्न कळू लागले. आर्थिक बाबी पेपरात वाचायला मिळतात पण सामाजिक असमानता तिथे गेल्यावरच कळते, लिहिली जात नाही.
अगदी लेखाच्या मुद्याला चिकटुन नाही पण मांडण्याचा प्रयत्न केलाय.
ज्या गावी गेल्यावर तिथे आपल्याला कुणी स्टेशन/स्टँडवर घ्यायला/ सोडायला येतो ते गाव/शहर आवडतेच.
ज्या गावी गेल्यावर तिथे
ओहोहो!!! च्रट्जी _/\_
ज्या गावी गेल्यावर तिथे
क्या बात है. सॉलिड आवडलं आहे हे.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
कवितेचं शीर्षक : ऋणानुबंध.
कवितेचं शीर्षक : ऋणानुबंध.
तसे हे गाव आणि मी
एकमेकांचे काहीच लागत नव्हतो देणे
टिपायचे होते तेवढे टिपून घेतले झाले चोचीत दोनचार दाणे
मग गावासाठी मी उरले नाही आणि संपले माझ्यापुरते हे गाव,
पुन्हा शोधणे: नवे रस्ते, नवी माणसे, पुन्हा एखादे नवे गाव.
याहून दरवेशी बरा.
निदान त्याला असते सोबत
चड्डी घातलेले एखादे माकड नाहीतर अस्वल.
आणि असतो हाताशी जुना तरीही प्रत्येक दारापुराता नवा खेळ.
शिवाय प्रत्येक प्रेक्षक उत्सुक प्रसन्न डोळ्यांनी
स्वागत करतो, हातावर ठेवतो एखाद दुसरे नाणे;
निदान चार घरांमागे तर हक्काचे असतातच
वरून नेमून दिलेले पायलीभर दाणे.
आणि दरवेशाला ओळखतात सारे
रस्ते, झाडे, मुले, माणसे दरवर्षी नव्याने
तेवढे असतात त्याचे नि गावाचे
ऋणानुबंध.
पण आपण चालावे. दरवेशी नसलो तरी.
सोबत घेऊन आपली सावली.
शोधावा नवा रस्ता.
पायांना जर फुटल्याच आहेत दिशा आणि जर आहेतच गावे प्रत्येक रस्त्यावर,
तर सापडेलही एखादे आपल्यासाठी थांबलेले.
नाही तर हा आहेच रस्ता रस्त्यांना मिळणारा
आणि ते रस्ते दुसर्या रस्त्यांना मिळत जाणारे.
— प्रभा गणोरकर
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
वा!!
अगदी हेच्च. हेच्च!!! अस्सच वाटतं घराबद्दल. कसं आहे, कुठे आहे, थांबलय माझ्यासाठी/आमच्यासाठी. हेच.
"कोसला" कादंबरीतलं हे वाक्य
"कोसला" कादंबरीतलं हे वाक्य आठवतं.
"चिरंतन आहे शेवटी जागाच. वर्षं काय आपण मेलो की संपलीच."
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
काहीही!!!
कोठल्या गाढवाने लिहिले हे???
वर्षांचे जाऊ द्या. नारायण पेठेत वाढलेल्या माझ्यासारख्याला आज सत्तावीस वर्षांनंतर तिथे पाऊल टाकले, तर गोंधळायला, हरवायला होते. हजारांतली अर्धी वगैरे ओळखीची खूण दिसते. रस्ते अजिबात ओळखू येत नाहीत. कसली चिरंतन जागा?
आमचे सोडा एक वेळ. आमचे (आणि नारायण पेठेचेही) आयुष्य शांततेने गेले त्या मानाने. फाळणीच्या वेळी लाहोरहून पळून आलेल्या एखाद्याला सोडा आज पुन्हा लाहोरमध्ये, नि सांगा त्याला, की जागा चिरंतन असते, म्हणून. पाहा काय म्हणतो ते.
किंवा, धरणे बांधतात, तेव्हा कायमच्या पाण्यात जाणाऱ्या गावांच्या रहिवाशांपैकी एखाद्याला सांगा, की जागा चिरंतन असते म्हणून. असली हिंमत (किंवा तितकाच कोडगेपणा) तर.
जागा चिरंतन असती, तर तिथे रामजन्मभूमी होती, की बाबरी मशीद, हा वादच न उद्भवता. समोर दिसतेय ना काय आहे ते? चिरंतन आहे!
वर्ल्ड ट्रेड सेंटर ही 'जागा' कॅटेगरीत मोडत नसावी बहुधा. चिरंतन नव्हती. पडली साली.
नेमाड्या ('कोसला' बोले तो नेमाड्याच ना?) नेमके काय ओढून असली वाक्ये लिहितो, ते त्याचे त्यालाच माहीत. नि तुम्ही लगेच बैलोबासारखे 'होऽऽऽऽऽऽ' म्हणून माना डोलावता. नि सगळीकडे ती वाक्ये डकवत सुटता. तुम्हाला तारतम्य नको?
किंवा, नेमाड्याचे (त्याच्यापुरते) ठीक असेलही. त्याचे गाव असेल डबक्यासारखे साचलेले, वर्षानुवर्षे तसेच. त्याच्या अनुभवकक्षेची मर्यादा तितपतच, म्हणून ते सोडून देताही येईल एक वेळ. पण तुम्हाला चोखंदळपणा दाखवायला नक्की काय जाते?
नेमाड्या असली कैच्याकै वाक्ये फेकून पैसे मिळवतो. तुम्ही त्याला डोक्यावर घेता, म्हणून परवडते त्याला. याला जबाबदार कोण? नेमाड्या नव्हे. तुम्हीच.
असो चालायचेच.
हा हा हा
अग्रतः चतुरो नेमाड्या:, पृष्ठतः सशरं "नबा": ।
इदं ग्रेटं इदं एलोएलम् शापादपि शरादपि ||
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
आँ!
नेमाडे चार आहेत??????
(अरे बापरे!)
नेमाड्यांच्या प्रसिद्ध चार
नेमाड्यांच्या प्रसिद्ध चार कादंबर्या आहेत. (म्हणजे तशा एकंदर सहा आहेत; पण चार कादंबर्या एका कथानायकाबद्दलच्या, अतएव चतुष्ट्यक म्हणून माहिती असलेल्या आहेत.) ते काम नेमाड्यांचं, पर्यायाने ते "नेमाड्य" - असं पोएटीक लायसन घेतलं आहे.
कळावे आपला
सेल्फ अपॉईंटेड् नेमाडे अपॉलॉजिस्ट्
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
खुसपट
नेमाड्य, की नैमाड्य?
बरोबर. नैमाड्य.
बरोबर. नैमाड्य.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
लोल!
न.बा. पेटले
पकाऊ दिली आहे (भडकाऊ देणार होतो)
==================
भूतकाळातील आस्वल्य.
शाब्बास न बा शाब्बास !! (
शाब्बास न बा शाब्बास !! ( तुमच्यापेक्षा चार वर्ष आधी जन्माला आलो या बिनकामी वस्तुस्थितीचा गैरफायदा घेऊन शाब्बासकी दिली.)
नाव राखलेत हो पेठेचे !!!
अशी करारी आणि वस्तुनिष्ठ विचारशैली अजून कुठे मिळेल ( बऱ्याच ठिकाणी , पण असो.. {आणि विचारसरणी आणि जागा यांचा संबंध काय , तर काही नाही } तरीपण असो )
ही
तुमच्यापेक्षा चार वर्ष आधी जन्माला आलो या बिनकामी वस्तुस्थितीचा
ही वस्तुस्थिती मात्र चिरंतनच रहाणार आहे!
नबांची ही नाबा बाजू (नारायण) नवीनच कळली.
ते वाक्य नेमाडेंनीच लिहिलं
ते वाक्य नेमाडेंनीच लिहिलं आहे का नक्की? उचलेगिरी केली असल्याची शक्यता आहे,
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
"स्वदेश संबंध त्याज्य
"स्वदेश संबंध त्याज्य
स्वग्राम संबंध त्याज्य
संबंधीयाचा संबंध तो विशेष त्याज्य
संबंधीचेया गावा न वचावे"
- चक्रधर , "लीळाचरित्र"
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
महानुभाव जीए
चक्रधर बहुतेक याच्या पुढेच म्हणतात, की कोल्हापूर आणि मातापूर देवीची गावं असली तरी तेथे फार थांबू नये. दक्षिणेकडे बेळगावकडे जात राहावे.
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
संदर्भ
याचं संपूर्ण उधृत देता आलं तर आभारी आहे
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
प्राचीन मराठी गद्य
या पुस्तकात वाचलं. चक्रधरोक्त सूत्रपाठ किंवा दृष्टांतपाठ, नक्की आठवेना. पुस्तक माझ्याकडे होतं, आता जवळ नाही.
लिंक इथे.
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
प्रीव्ह्यू छान आहे. पुस्तक
प्रीव्ह्यू छान आहे. पुस्तक संग्राह्य वाटतं आहे. बहुदा मिळत नसावं.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
"बेळगांव नावाच्या गावास....
"बेळगांव नावाच्या गावास....
पावले जरी दूर भटकत गेली तरी
तुझ्या जुन्या आठवणींची बुत्ती
सतत जवळ राहिली आहे..."
- "रमलखुणा", अर्पणपत्रिका
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
...आणि हे, कोठेतरी वाचलेले :
...आणि हे, कोठेतरी वाचलेले :
".... आणखी ऐक लवडू. तुमची इच्छाशक्तीच ह्या सर्वव्यापी घाणीने इतकी नपुंसक केलीये, की रोजच्या रोज अॅमस्टरडॅम, टोरांटो, प्राग, ब्रिस्बेन इ.इ. चे फोटो रोज फेसबुकवर बघता, अव्याहत गळणाऱ्या सोशल मिडियातलं हे सगळं रोजच्या रोज डोळ्यांसमोर असूनही तुम्हाला वाटत नाही की आपलं शहर असं ओंगळवाणं आणि गलिच्छ का? तिकडे टूर्सबरोबर जाऊन कौतुकं कराल आणि इथे- च्यायला. जाऊ देत. may be you don't deserve this. fuck you."
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
कोनेत याचे जनक ? आक्रस्ताळे
कोनेत याचे जनक ? आक्रस्ताळे पणा सोडला तर बरोबरच आहे की
काही प्रश्न काही उत्तरे
>>>कोनेत याचे जनक ? <<<
http://aisiakshare.com/node/6072
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
एकोळी.
एकोळी वाक्यांनी कशी हानी होते, हे मला आणखी चांगलं समजलं. (अस्वलाला कोण आक्रस्ताळा म्हणणार!)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
चिरंतन नसल्याचा मुद्दा पटला
चिरंतन नसल्याचा मुद्दा पटला आहे न'बा.
पिव्वर हेडॉनिझम.
जिथे नोकरी असते, शिकण्याची सोय असते, मित्रमैत्रिणी असतात आणि दारू मिळते असं कोणतंही शहर. शहरच. तीन वर्षं माणसांबाहेर राहून झाल्यावर आता ती इच्छा संपली आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
जेव्हा ओफिसात केरळवर चर्चा
जेव्हा ओफिसात केरळवर चर्चा होत असे पर्यटन म्हणून तेव्हा सहज केरळच्याच सहकाऱ्यांना विचारलं. " तुम्ही तिकडे झाडं,डोंगर,समुद्र , वाडे पाहायला जाता पण आमचा संबंध अमच्या नातेवाइकांशी, महागाई, सामाजिक, अन्यायाशी येतो. वीस पंचवीस वर्षांनी गेल्यावर भांडूनच येतो.
मच्छिमार्केटातली कोळीण गावातल्या कोणाचे कोण कुठे आहे जाणून असते आणि भाव करायच्या अगोदरच तुला परवडणार नाही सांगून हाकलते." केरळ तीन जागांत तीन धर्मांत वाटला गेलाय . उत्तर,मध्य आणि दक्षिण. मुस्लिम,क्रिश्चन,हिंदु बहुल. पुन्हा त्यात जातीपाती/पंथ. शिया सुनी क़थलिक,प्रटेस्टंट,सिरिअन, नंबुद्री,नायरवगैरे. कॅाम्युनिस्टांचा जोर. कारखाने नाहीत. सरकारी किंवा शैक्षणिक नोकऱ्या. हॅाटेल आणि ट्रावेलवाले कमवतात. काही परदेशातून पैसे पाठवतात. सतत सोनं विकत घेतात. पन्नास तोळे सोनं+ हुंडा, पस्तिशी पुढे लग्नं.
दुरून डोंगर साजरे, पद्मनाभस्वामि मंदिरात माणकं आणि हिरे. हात लावेल त्याचा निर्वंश करायला दोन नाग फणा काढून दारावर पहारा देत आहेत.
गोव्यातही तेच. बाहेच्यांना चार दिवस छान वाटतात, स्थानिक चिडलेले.
आवडणं नावडणं वगैरे तात्कालिक
आवडणं नावडणं वगैरे तात्कालिक घटनांशी संबंधित असावं. बाकी सगळी माया....मिथ्या
कधीकाळी आवडलेलं म्हणा फारतर...
१९८० च्या सुरुवातीचं भीमाशंकर अमुक निरीक्षण तमुक निरीक्षण अशांकरता खेपा घातलेलं. भर पावसाळ्यातील, किंवा उन्हाळ्यातील किंवा थंडीतील...
पावसाळ्यातील २४ तास ओलं, दमट हा शब्द कोरडा वाटेल असं, रानात नवनव्या गोष्टी सापडलेलं, बायोल्युमिनसंट फंजाय भरलेली लाकडं मिळालेलं, पायाखालून फुरसं निघाल्यावर गांड फाटलेली अवस्था आलेलं, शेकरू अर्थात जायंट स्क्विरलच्या मशीनगन कॉल्सनी भरलेल्या रानातले, गुप्त भीमाच्या इथल्या कमरेपेक्षा जास्त प्रवाहातून चालत चालत मजा आणणारं., लाकूडचोर ट्रक पकडल्यावर बालिश आनंद झालेलं
थंडीत२४ तास टाईट मोरमाऱ्याच्या पडवीत रात्री पडल्यावर निरभ्र आकाशातील दिवाळी दिसणारं , फेअरी ब्लुबर्ड दिसणारं
उन्हाळ्यात सगळं पाणी आटल्यानंतर एकमेव पाणी उरलेल्या तळ्यावर एकापाठोपाठ उतरणारे जंगल दिसणारं पाम सिव्हेट ते लेपर्ड , असे
एक ना दोन , हजार गोष्टी. पण सगळ्या वैयक्तिक.
दवणीय झालं का ?
ही सगळी ( मला वाटलेली तात्कालिक )मज्जा माहीत असेल इथल्या फक्त आचरटबाबा ना.
का लिहिलं मी हे असलं काहीतरी ?
ब्लेम इट ऑन अस्वलराव .
लिहा म्हणालात ना, घ्या भोगा त्याची फळं
आवडले
दवणीय नाही झालेलं अजिबात. उलट निसर्गप्रेम जाणवयतय शब्दाशब्दातून.
दमट हा शब्द कोरडा वाटेल असं
बेश्ट.
तुम्ही जंगल मे बरंच मंगल केलं आहे असं दिसतंय
ती मोरमाऱ्या आणि लाकूडचोराची हकीगत वाचायला आवडेल.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
हकीगत वगैरे फार काही नाही.
हकीगत वगैरे फार काही नाही.
त्याकाळी भीमाशंकर मधे राहण्याच्या कमी सोयी होत्या. (MTDC रिसॉर्ट नंतर झाला)एक जुनाट फारेस्ट बंगला , ज्याचं बुकिंग कधी मिळे कधी नाही. देवळात जाणारे यजमानलोक पुजाऱ्याकडे किंवा कमळजा देवीच्या धर्मशाळेत. आम्ही यात बसणारे नसल्यामुळे आमच्यापुढे मोरमारेच्या झोपडीवजा घरात बाहेरच्या बाकड्यावर झोपण्याची मस्त सोय एवढाच पर्याय असे. या सेव्हन स्टार फॅसिलिटी मधे एंटरटेनमेंट मोफत असे.
तिथे दिवसाला एक निवासी यष्टी येई.तेवढीच दळण वळणाची व्यवस्था.
मोरमारे कधीकाळी शाळेत मास्तर होता म्हणे. सकाळपासून रात्रीपर्यंत टाईट असे. डोस कमी झाला की कुठे जंगलात जाऊन टॉपअप करून येई.
सकाळी सात वाजल्या पासून रेडिओ ऐकून तुर्यावस्थेत इंटरनॅशनल घटनांवर कॉमेंट्री करे. त्याची गरीब बिचारी बायकू आणि दोन दत्तू आणि कैलास नावाची लहान मुलं गप ऐकून घेत. गप्पा मारायला बेष्ट माणूस होता. नाश्त्याला पोहे आणि जेवायला झणझणीत कांदा बटाटा रस्सा भाकरअसा (त्या वातावरणात अत्युच्च लागणारा) मेन्यू असे.
आता बजबजपुरी माजलीय तिथे. पण परवा परवा पर्यंत त्याची म्हातारी होती आणि हाटेल पण. दोघांपैकी एक पोर चालवते ते अन दुसरं यष्टीत कंडक्टर असावं.आताची कल्पना नाही.
रिकामा नॉस्टॅलजीआ हो, पण मस्त दिवस होते ते.
लाकूडचोरांचा ट्रक पकडण्याची चित्तथरारक, रोमांचक आणि बालिश घटना पुन्हा कधीतरी. खास आग्रहच असेल तर वेगळे आर्टिकल पाडण्यात येईल.
आर्टिकल
सवडीने लिहा हो, वाचायला नक्कीच आवडेल.
फेअरी ब्लुबर्ड दिसणारं
फेअरी ब्लुबर्ड दिसणारं भिमाशंकर!!
नशिबवान हो!!
मी उशिराच तिकडे जाऊ लागलो हे कारण असेलच.
सध्या शेकरु पांगली आहेत आतल्या रानात, देवळाजवळ नसतात.
फेअरी ब्लुबर्डचं देशी नाव
फेअरी ब्लुबर्डचं देशी नाव ललिता आहे हे आपलं उगाच ... माहितीकरिता..
ललिता? अगं बाई!
ललिता? अगं बाई!
आणि एक उगाचच आवडलेलं गाव/भाग
आणि एक उगाचच आवडलेलं गाव/भाग म्हणजे Ede Wageningen आणि Amsterdam १९९४ तलं....
आणि नावडलेलं गाव म्हणजे दुबई ... च्यायला का एवढी लोकं उड्या मारतात या गावाच्या नावाने कळे ना...
नावडती.
एकदम एकदम.
दुबैला कधी गेलो नाही, आणि जावंसंही वाटत नाही. नाही म्हणायला एमिरेट्सने जाताना वगैरे कधी ते प्रमोशनल विडियो पाहिलेत.
वाळवंटात भली थोरली शिमिटची ढेप आणून ठेवल्यागत दिसते. परत मग पामच्या आकाराची बेटं वगैरे करून उगाच काहीतरी नाविन्य.
आणि मॉल्स.
मुद्दाम वेळात वेळ काढून दुबैला जावं असं दोनच प्रकारचे लोक म्हणत असावेत - स्मगलर आणि शॉपिंगवाले.
अर्थात नोकरीचा भाग वेगळा असणारे.
----
आणखी एक नावडतं शहर म्हणजे लास वेगस. इथे आजवर दोन तीनदा जाणं झालं. पण कधीही तिथलं काहीच झेपलं नाही. सिगरेटच्या धूराचा वास गिळत कॅसिनो फिरलो, पायाखाली पडलेली उत्तान अंगप्रदर्शन करणाऱ्या ललनांची चित्र तुडवत ती बहुख्यात "स्ट्रीप" पाहिली. तिथले नवनवे कॅसिनो आणि होटेल्सही चक्कर मारून आलो.
मजा नाय.
अर्थात, केवळ मध्यमवर्गीय भारतीय माणसासाठी हे शहर नाही. आपण चोरून चोरून फार तर एखादा "शो" बघणार. बोंबला.तिथे इतक्या प्रकारचे मोह आजूबाजूला वावरत असताना मी झापड लावलेल्या घोड्यासारखा फिरलो असल्याने बरेच अनुभव मुळातच बाद.
पण अतिमहाभयानक प्रकारचे लोक म्हणजे वेगसला आपल्या वयोवृद्ध आईवडीलांसह दर्शनाला आलेले लोक. मीरा नायरचा "कामसूत्र" तुम्ही सहकुटूंब बघायला जाल का? आपल्या आईवडलांसोबत वेगस कसं फिरतात लोक? कदाचित वेगसच्या चॅप्टर लोकं आबालवृद्धांचं मनोरंजन करणारे कार्यक्रमही दाखवत असावेत.
पण त्या उकीरड्यासारख्या वाटणाऱ्या रस्त्यावरून सहकुटूंब सहपरिवार जाताना मला डोळे बरेचदा बंद ठेवूनच जावं लागेल.
----
टाईम स्क्वेअर हा न्यूयॉर्कचा बहुचर्चित प्रकारही उबग आणणारा वाटला. नक्की काय बघायचं ते समजलं नाही. बरीच गर्दी, भगभगीत दिवे, सतत काहीतरी खाणारे लोकं आणि फोटो काढणारं पब्लिक.
चार दिवस तिथे राहून हे मत बदलतं का ते पहायचं आहे.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
१००% लाल वेगस बकवास आहे.
१००% लास वेगस बकवास आहे. Somebody has called me a loser for not liking Las Vegas
पण खरच नग्न स्त्रियांच्या फोटो तुडवत फिरायचं म्हणजे नकोच वाटतं.
पण खरच सिन सिटि आहे.
I have tried watching UTSAV movie in presence of my mother in law. I needed a psychiatrist couch after that LOL. अतोनात कटकट करून बंद करायला लावला. तसाही माझा डोंबल्याचा मूड होता .
लास वेगास हे नाइटलाइफ आणि
लास वेगास हे नाइटलाइफ आणि कसिनोसाठी फेमस हे वाचून आहे.
हिस्ट्री चानेलवरचे दोन कार्यक्रम पाहतो - pawn stars - यामध्ये काय काय मजेदार वस्तू विकायला आणतात त्यासाठी बघतो.
दुसरा - restoration kings यामध्ये जुन्या वस्तू पुन्हा नव्यासारख्या आणि चालू स्थितीत करतात/ आणतात.
तर यांचे दुकान / ग्यारेज या लास वेगासमध्ये आहे म्हणून उत्सुकता आहे.
मुंबई- फोर्ट - रविवार सकाळ.
मोक्षमुल्लर भवन अशा अचाट नावाची इमारत आहे तिथे काही काळ येणं जाणं झालं.
जर्मन शिकावी- असा विचार डोक्यात का आला ते आठवत नाही, पण त्या निमित्ताने अनेक रविवार सकाळी मी फोर्टात गेलो.
अख्खी मुंबै अशीच असती तर काय बहार आली असती असे विचार दरएकवेळी यायचे. प्रोग्रॅम मस्त होता.
सकाळी ७.३० का ८ चा क्लास असायचा. लवकरची लोकल पकडून अरामात खिडकीत बसायचं. पोचल्यावर चर्चगेटच्या भुयारात काहीतरी खान-पान. पण मोक्षमुल्लरभवनातले आचारी काका सँडविच छान बनवायचे. (मुख्य म्हणजे ते हिंदीत बोलायचे.)चीझ सँडविच आणि भरपूर वेफर्स. त्या मोहापायी वेळेत पोचायचो.
मग जर्मन क्लास. आणि तो संपला की भटकंती.
वाटेत मैदानात पोरांचं क्रिकेट बघायचं थोडावेळ. नेट लावून प्राक्टिस आणि स्वीटस्पॉट हिट झाल्याचे "टॉक्क" असे आवाज यायचे. एखादा भिडू खांद्यावर छोटा रेडिओ घेऊन तिथे काहीतरी ऐकत बसलेला असायचा.
"कान कोरणारे" ही जमात मी प्रथम तिथे त्या कट्ट्यावरच पाहिली. एकदा समोर बसून त्या माणसाचा काम करताना विडिओ घ्यायचा होता, पण डिजिटल क्रांती झाली नसल्याने.. असो.
रस्त्यावरची पुस्तके पहाणे- हा पुढला प्रोग्राम. दगडी इमारतींच्या पायथ्याला बसलेले हे लोक म्हणजे खरी मुंबै युनिवर्सिटी. अर्थात भाव करणे आलेच.
माझ्या एका मित्राने "२०० रू." म्हणताच २०० रू. दिल्यावर विक्रेता चकित झाला होता. (आठवा- माँटी पायथन लाईफ ऑफ ब्रायन).
तर मग तिथे इंग्रजी पुस्तके धुंडाळणे, उगाच काही जुनी पुस्तकं बघणे हे सगळे सोपस्कार पार पाडले की मग उसाचा रस. गाडीवाल्याकडे रविवारी वेळ भरपूर. संध्याकाळी त्यांची मेन गिऱ्हाईकं (कपल्स) येणार त्याआधी ते मोठा पेलाभर रस देत आणि एक्स्ट्रा डिमांडही पुऱ्या करीत.
स्टेशनपर्यंत चालत आलं की दुपारी चर्चगेटच्याच भुयारात तिथे एक जण सरबतं/कोल्ड्ड्रिक्न्स असं ग्लासावर विकायचा म्हणजे १ ग्लास कोक, किंवा लेमन सोडा. ते घ्यायचं आणि शांतपणे चर्चगेट स्टेशन बघत फिरायचं. निवांतपणा असा मुंबैत तेव्हाच अनुभवला आहे.
दुर्दैवाने गर्लफ्रेंड हा प्रकार नव्हता. नाहीतर चित्रपट पहाणे, समुद्रावर भटकणे, न परवडणाऱ्या रेस्टॉरंटाबाहेर आणि दुकानांसमोर काचेला नाकं लावून आत पहाणे असे त्या वयातले अनुभवही फोर्टात घेतले असते.
वीकेंडला फोर्टात भटकणे हा मुंबैतला ए१अनुभव.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
मस्त
तंतोतंत!
झकास !!!
झकास !!!
+१
अस्वल आणि आमचं ह्याही बाबतीत प्रचंड जमतंय.
चर्चगेट, फोर्ट, कुलाबा हा एरिआच पायी पालथा घालण्याचा आहे. रस्त्यावरची पुस्तके, ब्रिटिशकालीन इमारती इ. बघत पायी फिरणे. सध्या उन आणि भुयारी मेट्रोची कामं ह्यामुळे ट्रॅफिक आणि एकूणच कंटाळा प्रचंड येतो.
फक्त 'वीकेण्ड' बाबत असहमत. कॉजवे, मेट्रो इ. कारणांमुळे प्रचंड होतकरू मुंबईकरांची गर्दी असते. ती टाळलेलीच बरी. एखाद्या 'उनाड दिवशी' हा उद्योग करावा.
-
आमचे मित्रमैत्रिणी मात्र 'ह्यातले' नाहीत. त्यांना कुठेतरी जायचं म्हणजे जेवायला किंवा पिच्चर टाकायला इतकंच माहिती. मॉल ह्या बिनडोक प्रकारामुळे अशा पब्लिकची नस्ती सोय झालेली आहे. अर्थात हे असं भटकून त्यातला आनंद शोधण्यामागे जरा इतिहासाची आवड, मुंबईशी भावनिक नातंबितं असण्याची गरज आहे.
-
मागे एका व्यक्तीस काही कामासाठी भेटलो. त्यांचं म्हणणं हे, की शिवाजी पार्कला जाऊन बसू. भरदुपारी तिथे बसायची माझी काही इच्छा नव्हती. तरीही जरा खादाडी झाल्यावर जाऊन बसलो. छान सावली, थंडी, मस्त कंपनी. दुपार आनंदात गेली. गंमत वाटली. एकेकाळी हा हट्ट मी केला असता.
...समेयाता महोदधौ!
तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.
हे पण मस्त.
हे पण मस्त.
पूर्वी एकदा पिताश्रींसोबत फिरायला गेलो असता त्यांनी महालक्ष्मी ते चर्चगेट असा पार पायाचा भुगा होईस्तो फिरवलं. क्वीन्स नेकलेस, मरीन ड्राईव्ह, वाटेतली ५* हाटेलं दाखवली आणि मग माझा रडकुंडीला आलेला चेहेरा पाहून म्हणाले - "चल अनंताश्रमात जेवू".
त्या काळी बाप लोक "सरप्राईज!" असं ओरडून काही म्हणत नसत, डायरेक्टच सांगत.
अनंताश्रम काय आहे ते माहिती नव्हतं, नावावरून एखाद पकाव हाटेल वाटलं.
पण तिथे गेल्यावर अत्युत्तम मत्स्याहार केला- ट्यानोबा, तुम्हाला म्हटलं सांगावं
ती पायपीटही लक्षात आहे.
(पु.भा. भावेंची (?)(चू.भू.द्या.घ्या) "आईस्क्रीम" नामक एक कथा आहे- तीत काही मित्रांनी मुंबैत केलेल्या फेरफटक्याचं वर्णन आहे. तीही वाचनीय.)
==================
भूतकाळातील आस्वल्य.
फ्लॉरेन्स, इटली.
फ्लॉरेन्स आवडलं. नक्की काय आवडलं असं शब्दांत सांगणं जमेलसं वाटत नाही. पण मी जर गोर विदाल सारखा थोडेफार पैसे मिळवलेला लेखक वगैरे असतो तर नक्कीच उन्हाळ्याचं/लिखाणाचं घर वगैरे बांधलं/घेतलं असतं तिथे. फारसा गजबजाट नाही, पण कॅरॅक्टर, डौल वगैरे जाणवतो गावाचा.
-Nile
.
सर्वसाधारणपणे अत्यंत तर्काला धरून लिहिणारे निळे यांना कुठल्यातरी गावाबद्दल आवडण्याच्या भावना आहेत हे ऐकून आश्चर्य वाटले.
कुणी सांगावं, उद्या कदाचित न बा सुधा आवडणारे गाव वगैरे लिहितील ..
का बरं?
भावना ही नैसर्गिक आणि म्हणूनच तार्किकच आहे. ती शब्दांत व्यक्त करता येणं अथवा न येणं हा केवळ कौशल्याचा भाग.
बाकी, नबांचे प्रिय गाव पुणे आहे हे तुम्हाला अजून कळलेलं नाही याचं मला आश्चर्य वाटलं.
-Nile
मी शनिवारी मुंबईत जात असे.
मी शनिवारी मुंबईत जात असे. मॅक्षमुल्लरच्या बाजुचं जहान्गिरचं प्रदर्शन पाहणे हा उद्योग.
आचरटबाबा,
आचरटबाबा,
मग पीटरच्या हातचं चिकन आलापूझ खाल्लं नाही का कधी?
तिथली प्रदर्शनं पाहिली नाहीत म्या कधी. आता वाटतं बघायला हवी होती.
-------------------
छोटी सी बात च्या चाहत्यांकरिता - हे पहा! https://chickenalapoos.com/
==================
भूतकाळातील आस्वल्य.
मस्तं वेबसाईट. धन्यवाद!
मस्तं वेबसाईट.
धन्यवाद!
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
राजगुरुनगर ...खेड
१९८७/८८ च्या सुमारास आईच्या आजारपणामुळे हवापालटासाठी १ वर्ष आम्ही राजगुरुनगर मध्ये राहिलेलो. माझ्या आवडत्या गावांपैकी एक.. आम्ही ब्राम्हण आळीत राहायाला होतो. दुपारच्या वेळी भीमा नदीच्या पात्रातील चिखलात खेळत असू...तिथे ५ का ७ चिंचेची झाडे होती...त्याच्या चिंचा खायचो...मक्याची कोवळी कणसे चोरून खायचो...अष्टर चे शेत पहिल्यांदाच बघितले..हाडक्या ..हा गोटी सारखाच असतो पण काचेचा नाही तर वेगळाच कशाने तरी बनलेला असतो ..भरीव असतो ..तो खेळायला शिकलो. जवळच्या धुम्या डोंगरावर जायचो उन्हाळ्याच्या सुट्टीत..वाटेतल्या झांडाच्या कैर्या पाडत पाडत.
गणपती मध्ये विविध गुण दर्शनाचे कार्यक्रम पाहायचो...रोज वेगवेगळ्या आळीत वेगवेगळे सिनेमे लावीत पडद्यावर ..सिद्धेश्वर मंदिरा समोरचे कुंड आठवतंय...
छान होते ते दिवस...
इस्ट लांसिंग , मिशिगन ....
इस्ट लांसिंग , मिशिगन ....
न आवडलेलं गाव..
(पण , इथली माणसं उत्तम हो बरीक)
कारण काय पण? अबा थोडं सविस्तर
कारण काय पण? अबा थोडं सविस्तर लिहा की.
काही विशेष नाही हो,
काही विशेष नाही हो, युनिव्हर्सिटी टाऊन असूनही इतकं रिकामं आणि काही नसलेलं (काही फारसं रोचक नसलेलं वगैरे)
धन्यवाद अबा.
धन्यवाद अबा.
लबक
उत्तर टेक्सासात लबक नावाचं गाव आहे. त्यापेक्षा कंटाळवाणं गाव दुसरं असूच शकत नाही. गाव छोटंच आहे. जरा गावाबाहेर आलं की सगळीकडे सपाटच सपाट, गवताळ प्रदेश आणि तेलविहिरी. सगळीकडे खनिज तेलाचा वास भरून राहिलेला असतो.
गाव किती कंटाळवाणं असावं, ह्याचा अनुभव घेण्यासाठी एखाद दिवस तिथे जाऊन यावं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
मॅडिसन , विस्कॉन्सिन ... आवडलेलं
बाकी तुमचं विस्कॉन्सिन आवडले हो मामी !!!
मॅडिसन , त्यातील तळी वगैरे मस्त हो ( फार नाही राहिलो तिथे , पण आवडलं हो !!!)
आणि एक बिव्हर डॅम नावाचं छोटंसं खेडं पण
(पण हे तिथल्या माणसांच्यामुळे हो!! मिडवेस्टी साधी सरळ ग्वाड माणसं भेटली तिथं)
क्या बात है!!! विस्कॉन्सिन
क्या बात है!!! विस्कॉन्सिन आहे मस्त पण वसंतात किंवा उन्हाळ्यात. बाकी थंडी फार.
इंदोर जळगाव
फार वेळेला गेलो नाहीये पण इंदोर झकास वाटलं होतं. निवांत, गजबज नाही , खाणे पिणे वगैरे
फक्त उन्हाळा नको.
तसेच जळगाव चे. उन्हाळा सोडून मस्त !!!
नोकरीला लागल्यावर पहिली ३
नोकरीला लागल्यावर पहिली ३ वर्ष खोपोली(रायगड) येथे गेली, आणि तोच माझा आवडता गाव किंवा नगर आहे. मुंबई पण जवळ पुणे पण जवळ, जवळ लोणावळा, पावसाळयात तर जबरदस्त.
रूम प्राचीन शिवमंदिर आणि तळ्याच्या शेजारी होत बहुतेक नाना फडणवीसांनी बांधलेले दगडी, त्याच दगडी बांधकामाच्या तल्याळून पाणीपुरवठा होत असे आणि त्यात पोहायला मनाई होती. पण मी जायचो पोहायला त्यात ( पोहायला गेल्यावर लघवी का होते?)
त्यात पोहायला मनाई होती
ह्याचा कार्यकारणभाव बघा राव.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
अमेरीकेत स्विमिंग पुलमध्ये शू
अमेरीकेत स्विमिंग पुलमध्ये शू केली तर आजुबाजुचं पाणि निळं होउन पकडले जातो. हे आमच्या कन्यारत्नाला शाळेत शिकवलेले आठवते.
ऑलिंपिक नॅशनल पार्क
आयुष्यातल्या सगळ्यात आवडत्या जागांमधे "olympic national park" चा समावेश केला नाही तर पाssssप.
मी आधी टी.व्हीवर पहायचो तेव्हा पिक्चरातले किंवा सिरीअल्समधले मोठे लोक "आपल्या आवडत्या जागी" सुट्ट्या घालवायला जायचे. हा प्रकार मला तेव्हा कळूच शकत नसे. अरे एकदा गेलास ना? मग परत परत तिथे जाऊन पैशे फुकट का घालवता? मराठी (किंवा एकूणच म.व) अशा वृत्तीने पैशाची बचत करून दुनिया बघायचा फंडा होता तेव्हा.
हे आठवायचं कारण असं की olympic national park ला गेल्यावर मला पहिल्यांदा समजलं की लोकं एकाच जागी पुन्हा पुन्हा का जातात. (खरं तर ते माथेरानलाच कळलं होतं, पण तिथे माझ्या मित्रांनी प्रेमभंग वगैरे एक्स्ट्रा गोष्टी टाकून माथेरानची चव बिघडवली. असो.)
olympic national park ह्या नावाने ओळखलं जाणारं पार्क प्रचंड मोठ्ठं आहे. बारा महिने तेरा काळ थंडच वाटणारा पॅसिफिक महासागर असा तिथे असतो. कधीही गेलं तरी "कसलं थंड पाणी!" म्हणावं लागेल अशी परिस्थिती. फकस्त जुलै-ऑगस्टात मात्र पाणी जरा कोमट होतं. अतिशय निर्मनुष्य समुद्रकिनारे आहेत. काही किनारे खडकाळ - चपट्या दगडांचं आगार. काही किनाऱ्यांवर मोठे वृक्ष येऊन विसावले आहेत. काही किनाऱ्यांवर चक्क वाळू आहे.
त्याबाजूलाच दोन-तीन मस्त कँपग्राऊंड्स. त्यातल्या एका कँपग्राऊंडवर रात्री आयुष्यात पहिल्यांदा चंद्रकिरणांची तिरीप पाहिली होती.
दोन सुंदर तळी आहेत. त्यातलं एक lake crescent नामक तळं ही कयाक चालवायला निदान उत्तर अमेरिकेतली तरी सर्वोत्कृष्ट (लोकसत्ता- सर्वोत्कृष्ट, सवरेत्कृष्ट नव्हे.) जागा आहे असं आमचं मत. इथे पाण्याला निळाई आहे आणि तरी तळ्याचा काठ दिसतो. अद्भुत. अशा सुंदर तळ्याकाठी आपली कयाक घेऊन आसपासच्या गौरांगना किंवा कृष्णांगनांचं दर्शन घेत वल्ही मारत समोरच्या डोंगरापर्यंत जाऊन येणे - हे फार उच्च सुख.
दुसरं एक lake ozette नामक अवली तळं आहे. ते पार टोकाला. आता च्यायला तिथे जायला एक नागमोडी पायवाट आहे आणि आसपास मुबलक झाडी. उत्तर हम्रिकेच्या उत्तर-पश्चिम टोकाला इथून टाटा करता येतं.
ह्या तळ्याचा काठही उत्तम. पण तळ्यापेक्षा तिथपर्यंत जाणारी वाटच जास्त सुंदर.
मग "हो" (Hoh) नामक सदाहरित वन (hoh rainforest!). इथून पार mount olympus पर्यंत ट्रेकला जाता येतं. मी तिथवर गेलो नसलो तरी एक १०-१२ मैल आत जाऊन कँप टाकून आलो आहे. जाताना ३ लोकं भेटले आणि येताना रेंजर आणि २ हरणं धरून ३. ह्या जंगलात प्रचंड दाट झाडं, सगळीकडे old man's beard lichen, चिखल आणि बऱ्यापैकी थंडी. इथला लांबचा ट्रेक ज्यांना झेपत नाही त्यांना एक hall of mosses म्हणून छोटेखानी १ मैलाचा फेरफटका आहे. त्यात हो!चं थोडक्यात दर्शन होतं.
असं आणखी बरंच काही आहे. वर्षाचे १० महिने बंद असणारे ट्रेक्स आहेत, थोडे आणखी अवली बीचेस, काही हिमशिखरं. एक वाळवंट सोडलं तर बाकी खूप काही बघता येतं.
ऑलिंपिक नॅशनल पार्क आपला दोस्त आहे
कुणीही तिथे जायला उत्सुक असलं तर आपण कधीपण तयार!
==================
भूतकाळातील आस्वल्य.
एकंदरीत भारी जागा दिस्तीय.
एकंदरीत भारी जागा दिस्तीय. उर्वरित भारतीय अमेरिकी लोकांकडून ऐकली नाही ही जागा.
अस्वलराव सीआटल किंवा पोर्टलॅंड मध्ये राहतात का ?
भारी आहे एवढंच लिहितो. ( आणखी
भारी आहे एवढंच लिहितो. ( आणखी काय लिहिणार म्हणा?)
तीनचार महिन्यांनी एखादे प्रवासवर्णन चार पाच फोटोंसह टाकणे.
मी पीटरला कसा ओळखणार? वेजवाला.
बाकी समुद्रात पोहता येत असतं तर नक्कीच सर्फिंग शिकून गोव्यात गेलो असतो. तरीही एकदा गेलो. आवडलं गोव्याचं वातावरण, पब्लिक ट्रानसपोर्ट, माणसं, पोहोचण्याची रेल्वेवगैरे. थोडं आवाक्यातलं आहे आणि पन्हापुन्हा जाणार. माथेरान हा वीक पॅाइंट आहेच.
येताना रेंजर आणि २ हरणं धरून
हरिणी बावरलेली होती काय?
रेंजरचं काय? त्याला कसे धरले?
( नबाश्टाइल)
अबा - हो हो, तिथंच जवळपास
अबा - हो हो, तिथंच जवळपास रहातो.
आचरटबाबा - खरंय, कँपिंग कुठही नाही करता येत. पण कँपग्राउंडही बरीच आणि बऱ्याच प्रकारची असतात.
गाडीवालं कँपिंग -> काही नाही, ऑनलाईन वगैरे रजिस्टर करायचं आणि गाडी घेऊन जायचं. बूड गाडीतून एकदम तंबूत. बरेच ठिकाणी तंबूही रेडीमेड असतात.
चालत जायचं कँपिंग -> इथे तंबूपर्यंत गाड्या पोचत नाहीत. थोडी पायपीट करावी लाग्तते. पण बाथरूम वगैरे सुविधा असतात.
बॅकपॅकिंग वालं कँपिंग -> इथे काहीच सोयी नसतात. जाताना ट्रेकच्या सुरूवातीला चिठी लिहून ठेवायची की आम्ही जातोय आणि २ दिवसात येऊ म्हणून. वर चढल्यावर मोकळ्या जागा असतात तिथे तंबू ठोकायचा.
पाणी असलं तर ठीक नाहीतर स्वत: घेऊन जायचं. शूशी केली तर त्याची नीट विल्हेवाट लावायची.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
मला असं कळलं की घेतली धोपटी
मला असं कळलं की घेतली धोपटी टाकली पाठीवर आला फिरुन रानात किंवा घेतला तंबू आणि गेला रानात टाकला तंबू असं अमेरिकेत करता येत नाही, अगोदर परमिशन काढावी लागते म्हणे??
?
हे शिरीष कणेकरांनी लिहिलेल्या लेखांएवढं, किंवा भारतात सगळीकडे हत्ती असतात इतपत सत्य आणि मूलगामी आहे. अमेरिका हे छोटंसं गाव नाही; ५० निरनिराळी राज्यं आहेत; तिथे निरनिराळी उद्यानं आणि जंगलं आहेत; त्यांची मालकी निरनिराळ्या संस्था, आस्थापना आणि व्यक्तींकडे आहेत; आणि चिकार निरनिराळ्या प्रकारचे नियम आहेत.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
आवडती शहरं
हैदराबाद:
हैदराबादेत रहदारीच्या निष्पर्ण रस्त्यांवर रोज वीसेक किलोमीटर्स प्रवास व्हायचा, त्यात गर्दी,कोलाहल, कचऱ्यांचे ढीग, धूर आणि धग याशिवाय फारसं काही दिसायचं नाही. तेलुगु सिनेमाच्या पोस्टर्स वरचे आणि बस मधले, बाहेरचे, सगळीकडे सारखेच चेहरे. अंगावर आणि पोस्टर्सवर तथाकथित fashon सुद्धा सारखीच अशी ती मायानगरी, विद्यार्थ्यांनी खचाखच भरलेली. मध्ये असेम्ब्लीजवळ, कधीतरी बस सेक्रेटरीयाट,हुसेनसागरवरून जाई तेव्हा थोडी गर्द झाडं दिसत, तो बुद्धाचा पुतळा दिसे न दिसे तोवर कुठल्याश्या गुड्यात गाडी वळूनसुद्धा जायची. अतिशय रुक्ष असं वातावरण, विद्यार्थ्यांना परवडेल अशी भरभरून भात देणारी सागर-हॉटेलं, स्वस्त घरं, हलीम नावाचे जालीम पेय अश्या खिचडीमुळे तितक्याश्या नयनरम्य भागात न राहूनही हैदराबाद आवडलं.
कोल्हापूर:
<>
बेळगाव:
<>
बेंगलोर:
<>
पुणे:
<>
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
खेडं - एक रसहीन नावडतं ठिकाण
प्रतिसाद वाचले अन् मी असं काहीच कसं भटकू शकलो नाही, मजा करू शकलो नाही; याचा अंमळ त्रास झाला.
ठिकाण आवडायला मी अजून तशी ठिकाणंच पाहिली नाहीत. अगदी नेटवरही नाही. थोडंसं ‛सिंगापूर’बद्दल वाचलं-ऐकल्याने त्याबद्दल आकर्षण वाटलंय/वाटतंय इतकंच काय ते. मी महाराष्ट्र सोडून अजून बाहेर गेलोच नाही. इतकंच नव्हे तर मी खेडेगाव वा निमशहर सोडून शहरातही फारसा राहिलो नाही. त्यामुळं खेड्यांचा, निमशहरांचा मला प्रचंड तिटकारा आला आहे.
खेडेगावात चांगली हवा आहे. पाणी आहे. पण सुविधा नाहीत.
कधी-मधी शहरात गेलो की, शहरं झपाट्याने बदलताना दिसतात. मात्र खेडेगाव जसं पूर्वी पाहायलंय त्याहून ओस, भकास वाटू लागतं. खेडेगावातलं वातावरण बौद्धिक व्यायाम घडवणारं नसतं, असं माझं वैयक्तिक मत आहे. तिथं एकसारख्या विचारधारेचाच काय तो वास पाहायला मिळेल. सवयी, संस्कार एकसारख्याच पाहायला मिळतील. काही थोडे अपवाद वगळता माणसं कामापुरतीच गोड बोलताना दिसतील. कसली स्पर्धा नाही. कसली पळापळ नाही. सगळं कसं नीरव शांततेत चालू असतं. पटलं नाही तर ऊठसूट कुणीही कुणाला मारतं. आया-बहिणीला मारलं तरी त्यांचं काहीच म्हणणं नसतं. म्हणजे बाहेरून बघणाऱ्याला ते कितीही चुकीचं वाटलं तरी मार खाणाऱ्यालाच ते फारसं चुकीचं वाटत नाही. सुनेचा छळ पाचवीला पुजलेला असतो. थोडक्यात, अशा वातावरणात वेगळ्या विचारधारा पचवणं अवघड बनून जातं. उदा., जातीबाहेर लग्न करायचं झालं तर खेडेगावात आजही दार बंद केलं जातं किंवा दोन्ही घरच्यांना बेदम मार दिला जातो. असं करायचं असेल तर शहरातच गाडून घ्यावं असंच शिकवलं जातं. उंबरठ्यावर कितीही बदल येऊन ठेपले असतील तरी घरात त्याना थारा नसतो. घरातले संस्कार थोडे उच्च असतील तर आज्जी-आजोबाच तिथले बॉस असतात आणि सरळ हुकूमशाहीच चालवली जाते. आज्ञाधारकपणा हेच तिथलं मोठं मूल्य मानलं जातं. असो.
तर या सगळ्याची कीव येऊन शहराचं आकर्षण वाटलं नसेल तर नवलंच! पंचवीशी गाठली तरी अजून नोकरीचा पत्ता नसल्याने आता कशातच राम दिसत नाही. त्यामुळं भटकणं वगैरे तरी भविष्यकाळ आहे.
डबक्यातला दीर्घ ‘वि’चारी…
प्रतिसाद आवडला...
... तो अशासाठी की शहरात, आता प्रगत देशात असूनही मला आजूबाजूची बहुतेकशी माणसं रटाळ वाटतात. तुम्ही लिहिलं आहेत तसा अन्याय वगैरे नसतो; तरीही बहुतांश लोकांचा कंटाळाच येतो. दर शुक्रवारी "माझा विकेण्डला काहीही बेत नाही. घरी बसून लेखन-वाचन-घरकामं आणि वेळ मिळाला तर ऑफिसचंही काम करेन", असं कितीदा सांगायचं! आज शुक्रवार. संध्याकाळी चार निरनिराळ्या लोकांना हेच उत्तर द्यावं लागलं. त्यापेक्षा शुक्रवारी दुपारीच ऑफिसातून सटकावं आणि घरी बसून उरलेलं काम संपवावं.
मात्र मध्येच कधी कोणी माझ्यासारखेच नीरस लोक भेटतात. आपण काय पुस्तक वाचलं, आपण काय किडे केले ह्याबद्दल बोलायला लागतात. मग मजा येते.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हम्म
विक्षिप्त अदिती, आचरट बाबा, MindsRiot, धन्यवाद.
लेखन लिहिल्यानंतर प्रकाशित करण्यापूर्वी शुद्धलेखनाचा एक हात फिरवायचा विसरल्याने लेखनात बऱ्याच चुका झाल्या होत्या. उदा., ‛आकर्षण’ऐवजी आकर्षक, ‛खेडेगावातलं’ऐवजी खेडेगावतलं आणि ‛ऊठसूट’ऐवजी उठसूठ अशा. त्या आता दुरुस्त केल्या आहेत.
मात्र मध्येच कधी कोणी माझ्यासारखेच नीरस लोक भेटतात. आपण काय पुस्तक वाचलं, आपण काय किडे केले ह्याबद्दल बोलायला लागतात. मग मजा येते.
हा. बरोबर. तोचतोचपणाचा कंटाळाही आलेला असू शकतो. त्यात दरवेळी नावीन्य कुठलं आणणार हाही प्रश्नच असतो. तरीही आपणहून त्यात नवे किडे केले म्हणजे जरा बरं वाटून घ्यायला मदत होते.
अवांतर : विक्षिप्त अदिती, ‛विदा-भान’चा पहिला अंक वाचल्यापासून डोक्यात एक किडा सारखा वळवत आहे की, ‛अदिती इतकं सोपं कसं काय लिहू लागली आहे?’
डबक्यातला दीर्घ ‘वि’चारी…
@कासव, पटलय.
@कासव, पटलय.
लहानपणी मामाच्या गावचा अनुभव घेतला आहे. मोठेपणी भटकंतीत महाराष्ट्र आणि इतर राज्यात एसटीनेच भटकलोय. गावातले लोक कुठल्या ना कुठल्या फासात ( शिकंजा?) असतात. शहरात श्रीमंत बनणे , मनाला येईल तसे वागणं सोपं असतं गावात नाही.
ढिम्म बदल
गावातले लोक कुठल्या ना कुठल्या फासात ( शिकंजा?) असतात.
अगदी. गावातल्या लोकांवर पूर्वांपार चालत आलेली गावातलीच म्हणून एक सांस्कृतिक परंपरा जास्त नियंत्रण करत असते. नाही म्हणायला ह्यात बदल घडवून आणणाऱ्या प्रभावी साधनांमध्ये वर्तमानपत्र, आकाशवाणी वा T.V. वगैरे माध्यमं जास्त भूमिका बजावतात. अजून एक म्हणजे, ह्यात धार्मिक बाजूनं जर लोकशिक्षण घडवून आणलं तर लवकर परिणाम साधून येतो. पण बदलास वर्षोनुवर्षे वेळ लागतो. परंपरेला छेद देणारं काही असेल तर जुनी लोकं नव्यालाही ते स्वीकारू देत नाहीत. थोडक्यात, जोपर्यंत हा परंपरा-नवता संघर्ष बहुतांश प्रमाणात मिटत नाही; तोवर गावात बदल झालेला दिसून येत नाही. असो.
डबक्यातला दीर्घ ‘वि’चारी…
+१
@कासव. सगळ्यांचे प्रतिसाद वाचून आभासी पर्यटन केलं.
भांबड आलं