Skip to main content

एका नास्तिकाची धार्मिकता

सतीश तांबे म्हणतो, 'आस्तिक आणि नास्तिक हे विरुद्ध अर्थाचे शब्द नाहीतच.' याचं उत्तम उदाहरण पुस्तकी आहे. आयन रँडच्या ’फाउंटनहेड’ मधला हॉवर्ड रोर्क म्हणतो, ’मी आर्किटेक्ट झालो कारण माझा देवावर विश्वास नाही. हे जग जसं आहे, तसं मला आवडत नाही, ते मला बदलावंसं वाटतं.’ पुढे रोर्ककडे हॉप्टन स्टोडार्ड जेव्हा देऊळ बांधण्याचा प्रस्ताव घेऊन येतो तेव्हाही रोर्कचं तेच म्हणणं असतं: मी देऊळ कसं बांधू? माझा देवावर विश्वास नाही. पण एल्सवर्थ टूहीने पढवलेला हॉप्टन अत्यंत आत्मविश्वासाने त्याला ऐकवतो, ’मला नको सांगूस, तू नास्तिक आहेस म्हणून; तुझ्या धर्मपालनाची साक्ष तू निर्माण केलेल्या वास्तूच देताहेत!’

आणि स्वतःविषयी बाहेरून झालेल्या या ब्रह्मज्ञानाने रोर्कचा विरोध संपतो!

लक्षात घ्या, इथे ’धर्मपालन’ हा शब्दप्रयोग सरळ सरळ भारतीय अर्थाने केला आहे. पश्चिमी 'religion' पेक्षा राजधर्म, पुत्रधर्म, यातल्या धर्माच्या तो जास्त जवळ आहे. अर्थात, कादंबरीत religion असा शब्दप्रयोग नाही, religious असा आहे. आणि religious हा शब्दप्रयोग भारतीय अर्थाने(सुद्धा) करण्याची रीत इंग्रजीत आहे.

माझाही देवावर विश्वास नाही. पण मीदेखील religious असल्याचं मला काही प्रसंगी अनुभवास आलं आहे. पण इथे मी करत असलेला religious हा शब्दप्रयोग भारतीय अर्थापेक्षा पश्चिमी अर्थाला जवळ जाणारा आहे.

खूप जुनी गोष्ट आहे. काही समवयस्क आप्तमित्रांसोबत मी हिमालयात चाललो होतो. प्रथमच. हिमालय म्हणजे काय माहीत नव्हतं. प्रवास आवडत होता आणि आयुष्यात पहिल्यांदा इतक्या दूर जाताना अत्यंत रोमांचक वाटत होतं. अडीचेक दिवस गाडीत काढून भर दुपारी आम्ही हरद्वारला उतरलो. दुसऱ्या दिवशी केदारनाथची बस पकडायची होती. फ्रेश झालो आणि पाय मोकळे करायला बाहेर पडलो. 'चला घाटावर जाऊ, संध्याकाळी मस्त शोभा असते म्हणे तिथे.' निघालो. हरकी पौडीला पोचलो. नदीतलं पाणी बऱ्यापैकी वेगाने वहात होतं. पात्र फार रुंद नव्हतं. रस्ता लहान होता. छान झाडी होती. वातावरण आल्हाददायक होतं. इतके तास ट्रेनमध्ये काढल्यावर चालण्याचा आनंद भारी वाटत होता.

Har Ki Pauri

आणि अचानक डोक्यावर रट्टा मारावा तसं मला सुचलं, अरे, ही तर गंगा! ही स्वर्गातून आली. हिला शंकराने जटेत झेलली. भगिरथाने पुढे आणली म्हणून ही भागिरथी. जन्हुने प्राशली म्हणून ही जान्हवी. ही भीष्माची आई. ही गंगा!

सगळ्या मायथॉलॉजीचा तो एकत्र दणका मला सहन होईना. माझे पाय लटपटले. मी खाली बसलो. गंगेच्या प्रथमदर्शनाने माझे डोळे चक्क भरून आले. माझ्या सोबत्यांना हा नास्तिक मनुष्य हे काय नाटक करतो आहे, असं झालं. ते मला हसले.

पण मी तो शब्दांपलीकडला अनुभव जपून ठेवला आहे. माझ्या ’धार्मिकते’चा तो मलाच मिळालेला पहिला पुरावा होता. पुढे काही वर्षांनी जेव्हा उत्तर काशी - गंगोत्री करून पुढे गोमुखला गेलो तेव्हा थंडी वाजो न वाजो, ग्लेशरच्या मुखातून पहिल्यांदा आकाशाखाली येणाऱ्या त्या गंगेच्या प्रवाहात डुबकी मारण्याला इलाज नव्हता. तेव्हा निमूटपणे स्वतःमधल्या धार्मिकतेला शरण गेलो. नंतरचा अनुभव लदाखचा. मनालीहून निघालो. वाटेत सर्चूला मुक्काम. अचाट परिसर आणि जीवघेणी वळणं पार करत चढण संपली आणि थोडं पुढे होऊन जीपवाला थांबला.

का?

नदीचं पाणी तोंडावर मारून फ्रेश व्हायला. मी पण उतरलो.

या नदीचं नाव होतं सिंधू.

प्रवाहापर्यंत जाऊन थेट डोकं टेकलं. तोच अनुभव.

कसं सांगायचं? काय सिंधूचं महत्त्व विशद करू? ’आसिंधुसिंधु’ हा शब्दप्रयोग का निर्माण झाला, विचारू? सिंधुसंस्कृती उद्‌धृत करू? आणि माझा अनुभव तर शब्दातीत होता. गंगेच्या वेळची आठवण चाळवून मी या वेळी गप्प राहिलो. जे झालं ते स्वतःपाशी ठेवलं.

पण झालं ते झालंच! त्या अनुभवाला ’धार्मिक’ म्हटलं नाही, तर ’आध्यात्मिक’ म्हणावं लागेल. मुंबई महानगरीत मुक्काम असताना दोन्ही शब्द मला परके होते. च्यायला अध्यात्माचा अर्थ बदलावा का?

आणखी एक अनुभव. युरोपमधला. जर्मनी, इटली, वगैरे करून आम्ही फ्रान्सला आलो. पॅरिस पाहिलं. पुढचं गाव होतं लंडन. एका सोबत्याचं म्हणणं पडलं, पॅरिस-लंडन थेट ट्रेनने जावं. इंग्लिश चॅनेलच्या खालून जाणाऱ्या बोगद्यातून. वेळही वाचेल आणि एक वेगळा अनुभवही मिळेल. मी त्याचं म्हणणं साफ हाणून पाडलं. मला जमिनीवरून, पाण्यावरूनच जायचं होतं. मग आम्ही ट्रेनने कॅलेला गेलो. तिथून बोट पकडून डोव्हर. मी तसा पुस्तकात रमणारा. अगदी रममाण होणारा. या आणि त्या पुस्तकामधल्या संदर्भांना एकत्र आणून स्वतःच्या मनात खरी खोटी ऐतिहासिक मायथॉलॉजी तयार करणारा. मला कॅलेतच हिटलर आठवला. चार आठवड्यात आख्खा फ्रान्स पादाक्रांत करून इंग्लिश खाडीच्या या किनाऱ्यावर उभा असताना त्याच्यापाशी ब्रिटनवर हल्ला करण्याची काही योजनाच नव्हती. मग ती बनवण्यात आली. ऑपरेशन सी लायन! मग खाडीवर विमानांचं तुंबळ युद्ध झालं. ’बॅटल ऑफ ब्रिटन’ या नावाने ते इतिहासात अमर झालं. त्या युद्धात ब्रिटीश वैमानिकांनी काय पराक्रम गाजवला, हे खाडीकिनाऱ्यापासून दूर असलेल्या लोकांना कळलेलं नाही, हे लक्षात आल्यावर चर्चिलने त्या वैमानिकांचा खास गौरव केला,त्याच्या त्या अजरामर शब्दांमध्ये: Never before in the history of mankind have so many owed so much to so few! च्यायला काय हुकूमत आहे शब्दांवर!

ती ही इंग्लिश खाडी. ब्रिटनला अक्षरशः जीवदान देणारी. यूरोपपासून वेगळं करून एक चमत्कारिक अस्मिता प्रदान करणारी. मला बोटीवर बाहेरच रहायचं होतं. थंडी होती आणि वाराही होता. कॅले आणि डोव्हरमध्ये फार अंतर नाही. पण असं भूगोल म्हणतो! इतिहास वेगळं सांगतो.

आणखी एक. खाडीवर असताना मी पश्चिमेकडे नजर टाकली. ते तिथलं क्षितिज अटलांटिक महासागराच्या निकटचं बरं का. गोल पृथ्वीवरून नजर वळत नाही आणि अंतरही अंमळ जास्त आहे; नाही तर या पाण्याच्या पलीकडे असलेला ’न्यू वर्ल्ड’ नावाचा एक प्रदेश दृष्टीस पडला असता. भाषा इंग्रजीच, पण त्यांच्या लहरीनुसार हवी तशी वाकवलेली, इथूनच तिथे गेलेल्या लोकांचा प्रदेश. जगावर एक प्रकारे राज्य करणारा देश. ती अमेरिका आणि मी यांच्यात हे पाणी काय ते आहे.

हे वाटणं असतं ना, ते फार खाजगी असतं. असं नंतर छान वगैरे वर्णन करून सांगता येत असलं तरी शेअर नाही करता येत. ते फारच स्वतःचं, एकट्याचं असतं.

पण या यूरोपच्या आठवणीने मला दिलासा मिळाला, की मी ’तसा’ धार्मिक नाही! हे जे काही आहे, ते माझं आहे. सेक्युलर आहे. आता लिहायला बसलो आहे, तर आणखी आठवू लागलं आहे. अलिकडची गोष्ट. दादरमध्ये राहून गेलेल्या थोर थोर लोकांच्या दादर निवासांना भेटी देत फिरत होतो. सी रामचंद्र, गदिमा, बालगंधर्व, अत्रे, ठाकरे कंपनी, सुधीर फडके, सावरकर, किती. येवढी मोठी माणसं दादरमध्ये राहून गेली. पण कुणाचा प्राण कुठल्या पिंजऱ्यातल्या पोपटात असेल काही सांगता येत नाही. सुभाष गुप्तेच्या घरात गंमत वाटली; पण चपला काढून जमिनीला हात लावून नमस्कार करावासा वाटला तो वसंत प्रभूच्या घरी! माझं मलाच कळलं, मला वसंत प्रभू किती प्रिय आहे ते. त्याच्या चालींमध्ये पुष्कळ पुनरुक्ती आहे, खरं आहे; पण शिखरावर असलेल्याने कुठल्याही दिशेने पाऊल टाकलं तरी ते खालीच जाणार असेल, तर त्याने तिथे, एका जागी रहाण्यात शहाणपणा नाही का?

आणि आता शेवटचं. या सगळ्या धार्मिक - आध्यात्मिक आठवणी जागं व्हायचं कारण. परवा काही कामानिमित्त विधान भवनात गेलो होतो. एका ठिकाणी थोडा वेळ वाट पहावी लागणार होती. म्हणून एकाने एका दाराचं लॅच उघडलं आणि आम्हाला आत नेलं. तर आत विधानसभागृह! त्या वरच्या आसनावर सभापती बसतात, इथे मुख्यमंत्री, असे इतर मंत्री. हा भाग विरोधी पक्षांचा. त्या तिथे पत्रकार ... समोर शिवाजी, फुले, आंबेडकर, गांधी, नेहरू, टिळक यांच्य़ा तसबिरी.

मला एकदम भरून आलं. दहा कोटी लोकांच्या जीवनाविषयी निर्णय इथे घेतले जातात. माझ्या वतीने घेतले जातात. इतक्या प्रचंड वैविध्याने भरलेल्या देशाचा कारभार चालवणारी व्यवस्था निर्माण करणे आणि ती सुरळीत चालवत रहाणे, हे महान काम या इथून होतं. इथे कायदे केले जातात. राज्याचं बजेट मंजूर होतं. एका प्रौढ व्यक्तीस एक मत, या तत्त्वावर निवडून आलेले लोकप्रतिनिधी इथून काम करतात. हे महाराष्ट्र राज्यातलं सर्वोच्च सत्तास्थान आहे! लोकशाही राज्यव्यवस्थेची थिअरी मला माहीत होती पण विधानसभेच्या दालनात उभा असताना धाडकन तिला मूर्त रूप आलं.
अधिवेशन चालू नव्हतं आणि दालन रिकामं होतं. पण मला बोलताना आवाज उतरवावासा वाटला.

आणि तिथून परतताना चक्क यूनोची रजिस्ट्रेशन प्लेट असलेल्या गाडीतून प्रवास केला!

तर, ही माझी धार्मिकता. माझ्या आत्मओळखीचे हे काही आधार. एका अर्थी हा थोडासा ’मी’.

Node read time
5 minutes

ललित लेखनाचा प्रकार

5 minutes