चंद्रमोहन कुलकर्णी यांचं ‘ये शहर किसने बनाया’ हे चित्र-प्रदर्शन.....

‘इडली, ऑर्किड आणि मी’-- अनेकांना प्रेरणादायी ठरणार्‍या विठ्ठल कामत ह्यांच्या आत्मचरित्रात एक प्रसंग आहे. डोक्यावर कर्जाचा बोजा आणि भावाने धंद्यातून बेदखल केलेलं, अशा अत्यंत निराशाजनक मनोवस्थेत त्यांनी एक माणूस बघितला. एका गगनचुंबी इमारतीच्या सर्वांत वरच्या मजल्यावर, पराचीवर लटकवलेल्या झुल्यावर बसून तो रंगकाम करत होता. त्याला तशा धोकादायक अवस्थेत बघून त्यांच्या मनात आलं, ‘रोजीरोटीसाठी किती सहजपणे हा माणूस आपला जीव धोक्यात घालतोय!’ त्यांच्या मनाने उचल खाल्ली, मनातील निराशेला मागे सारून ते कामाला लागले.

चंद्रमोहन कुलकर्णी यांचं ‘ये शहर किसने बनाया’ हे चित्र-प्रदर्शन बघताना हा प्रसंग आठवला. त्याचवेळी रविन्द्र दामोदर लाखे यांच्या ‘संपर्कक्षेत्राच्या बाहेर’ ह्या कवितासंग्रहातली ‘काय माहीत’ ही कविताही आठवली.
उंचावर असलेल्या जाहिरातीच्या फलकावरचं घड्याळ रंगवणारा एक माणूस. संध्याकाळ झाली म्हणून बसल्या जागेवरून वळतो, वाकतो आणि खालून जाणार्‍या माणसाला ‘किती वाजले’ असं विचारताना तोल जाऊन पडतो व मरतो. त्या क्षणाला तो रंगारी आणि तो खालचा माणूस यांच्या मनात काय विचार आले असतील यांचा अंदाज लावता-लावता कवी शेवटी म्हणतो ‘काय माहीत’!

काय माहीत
(रविन्द्र दामोदर लाखे - संपर्कक्षेत्राच्या बाहेर.)

मोजता येतं ज्याला
त्याला ते शंभर दीडशे फूट वर.

मोजता न येणार्‍याला
खूप उंचीवर.

खूप उंचीवर असलेल्या होर्डिंगवर घड्याळाच्या जाहिरातीतील
घड्याळ रंगवत होता
एक माणूस.

दिवस संपला असे वाटून
मागे वळत, खाली वाकून पाहात,
रहदारीतल्या एका पादचार्‍याला
वाजले किती म्हणून विचारतांना,
घड्याळ रंगवणारा माणूस
तोल जाऊन खाली पडला

आणि मेला.

पडला आणि मेला दरम्यान
पादचारी एवढेच बोलू शकला,
“पाच वाजून...”

म्हणजे दिवस संपला नाहीय
संध्याकाळ झालेली नाहीय...

बायको मुलं वाट पाहात असतील,
बायकोचं औषध, मुलांच्या वह्या घ्यायच्या आहेत
घड्याळ पूर्ण रंगवून झालं नाहीय तर
पैसे आज मिळतील की नाही, कोण जाणे,
वगैरे विचार
घड्याळ रंगवणार्‍या माणसाच्या मनात
खाली पडताना आले.

घड्याळ रंगवणार्‍या माणसाला
पूर्ण वेळ सांगता आली नाही
म्हणून पादचारी
मनातल्या मनात चरफडला
आणि
पडणार्‍या त्याला वाचवताही आलं नाही म्हणून

पाठोपाठ जाहीर हळहळला.

तर प्रश्न असा की
मोजता येतं त्याला आता होर्डिंग
केवळ शंभर दीडशे फूट उंचीवर आहे
असं म्हणता येईल का?

मोजता न येणारा
ते होर्डिंग किती उंचीवर होतं
ते कसं सांगेल?

आणि मेल्यावर
घड्याळ रंगवणार्‍या माणसाला
च्यायला झक मारली आणि
वेळ विचारली असं
पश्चात्तापदग्ध होता आलं असेल
की नसेल?

अर्धवट रंगवलेलं घड्याळ
आता कोण पूर्ण करील?
त्या घड्याळ्यात
कुठली वेळ दाखवली जाईल?

काय माहीत.
----------------------------

एक अस्सल कलाकृती अलगदपणे दुसऱ्या अस्सल कलाकृतीत प्रवेश करायला भाग पाडते ती अशी...
कोणत्याही ठाम निष्कर्षाप्रत न येता ‘काय माहीत’ असं म्हणून जर बर्‍याच गोष्टी सोडून देता आल्या तर आपलं जगणं सुसह्य होईल ना!

बांधकामाचा परिसर, वातावरण, यंत्रं, माणसं, त्यांची देहबोली, कच्च्या मालांचे आकार, जडत्व-हलकेपण, त्यांचा भार पेलणारी शरीरं हे सगळं बघता-बघता एकीकडे ती चित्रं आपल्याशी बोलू लागतात.

किती सहजतेने माणसं तिथे वावरतात. त्यांची काम करतानाची एकतानता, अंगात भिनलेली लयदार गती, विश्रांतीच्या वेळातील थकलेपणा बघताना वाटतं, कशी बरं जगत असतील ही? पोटाची खळगी भरण्यासाठी गोळा केलेलं धाडस अंगी बाणवून चिकाटीने मेहनत करताना, एका जागेवर काही काळापुरतं थांबून, त्यालाच आपलं घर मानून, इतरांची घरं-दुकानं-कार्यालयं बांधत असताना त्यांच्या मनात काय येत असेल? जगण्यातल्या अनिश्चिततेला, तात्पुरतेपणाला ते कसे काय भिडू शकतात?
रोजी-रोटीसाठी माणसाला आपल्या जीवाची पर्वा करण्याचंदेखील स्वातंत्र्य उरत नसावं?

ही ‘जिवंत’ चित्रं बघताना उंच पराचींवर लोंबकाळत विटा रचणे, सिमेंट कालवणे-थापणे, रंगकाम करणे आपल्या नजरेसमोर घडत रहाते. यंत्रांचा घुरघुराट कानात घुमतो, माती-रेतीचा धुरळा नाक हुळहुळवतो. लोखंडाच्या सळ्यांवर आरामात बसलेल्या स्त्रियांची हलकीशी कुजबुज ऐकू येते. सुरक्षा-रक्षकाची झोप आपली भुवई उंचावते आणि चहाच्या कपासोबत विसावणारे थकलेले देह पाहून थबकायला होतं.
पराकोटीच्या मेहनतीला आणि त्यातून मिळणार्‍या तुटपुंज्या(!) कमाईला, जीव धोक्यात घालून काम करण्याऐवजी दुसरा पर्याय नसण्याने आलेली अगतिकता आपल्याही मनात प्रवेश करते.

नृत्यमय वाटावेत असे देहाकार, रंगीत तरीही काळवंडलेले कपडे, काळी धूळ, चाळण्या, जाळ्या, कडक-तडतडीत पत्रे, उंचावरची क्रेन, एकेक मजल्याने चढत जाणार्‍या इमारती आणि ह्या सगळ्याला सामावून घेणारं अवकाश...
जगण्यातील भार - तोल सांभाळायला भाग पाडणारं, एक 'बोलकं' चित्र-प्रदर्शन असंच म्हणावं लागेल!

चित्रा राजेन्द्र जोशी - १९.१०.१९

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

अजून सुरू आहे का प्रदर्शन?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Yes, upto 21 October...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

নয় ত, আমি জানতাম না|

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0