सुदेश : माझा, तुझा, त्याचा

ललित

सुदेश : माझा, तुझा, त्याचा

- धनंजय

माझा वर्गमित्र

मला सुदेश शेवटी कधी भेटला म्हणावे, तर त्यालाही बरीच वर्षे झालीत. नेमके मोजून सांगायचे तर आमच्या बारावीच्या वर्गाचे रजत पुनर्मीलन झाले होते, तिथे भेटला होता. म्हणजे ठीक नऊ वर्षे झालीत.

आज आठवायचे निमित्त काय, तर हा अकरावीच्या कॉलेज पिकनिकमधला फोटो. फोटोत पुढच्या रांगेत अगदी मध्ये आहे सुदेश. या जुन्या फोटोंचे धुळकट बंडल मागच्या आठवड्यात आई-बाबांना माळ्यावरची अडगळ साफ करताना सापडले. फोटो "टाकू की ठेवू" म्हणून त्यांनी मला विचारले, तर मी त्यांना ते कुरियर करून पाठवायला सांगितले.

फोटो मूळातच त्या काळात फिक्या रंगांचे असायचे की तीस-पस्तीस वर्षांत या फोटोचे रंग धुवट झालेत, कोणास ठाऊक. फोटोत मी त्या काळी नेहमीच घालत असे, तसा लांब हाताचा, आता मातकट दिसणारा काळा शर्ट घातलेला आहे. फोटोतल्या बहुतेक मुलांनी उकाड्याच्या हवामानाला साजेसे अर्ध्या बाह्यांचे बुशशर्ट घातले आहेत. फोटोतल्या सुदेशने बनियन घातलेला आहे. बनियन घातलेली मुले म्हणजे फक्त सुदेश आणि त्याच्या ग्रूपमधले तिघे-चौघेजण. त्याच्या ग्रूपमधील एकाचे नाव जाधव – तोही आला होता पंचविसाव्या वर्षीच्या गेटटुगेदरला – बाकीच्यांची नावे आता आठवत नाहीत.

सुदेश आणि त्याच्या ग्रूपमधील मुले अकरावी-बारावीत गल्लीतल्या व्यायामशाळेत जाऊ लागली होती, तेव्हापासून कुठेही हुंदडायला सदान् कदा बनियन घालून जायची. याच व्यायामशाळेत गल्लीतले गुंडही जायचे. आईची नेहमीची कोटी असायची, "तो सुदेश, इतका हुशार मुलगा, पण वाह्यात मुलांबरोबर अगदी 'वाह्या' जातो आहे. तिथे gymखाना नाही, shameखाना आहे". आईचे क्षुल्लक मतही आमच्या घरचा कायदा असे, तर मी त्या व्यायामशाळेत जाणे शक्यच नव्हते. खरे तर आईचे प्रतिकूल मत नसते तर मी लगेच तिथे गेलो असतो, असे नाही. मला शाळेतल्या साध्या पी. टी. तासाचाही भयंकर तिटकारा होता, मग मी थोडाच स्वतःहून व्यायामशाळेत आपली शोभा करून घ्यायला जाणार होतो!

नऊ वर्षांपूर्वी त्याला पुन्हा भेटलो, तेव्हाचा थोराड सुदेश मला लगेच ओळखू आला नाही. माणूस तरुणपणीसारखाच उंच-निंच होता, पण धिप्पाड म्हणजे आधीसारखा पिळदार नव्हे तर थुलथुलीत दिसत होता. बरेचसे वर्गमित्र डेरेदार झाले होते, पण सुदेशची ढेरी आठवणीतल्या बांधेसूद प्रतिमेशी खूपच जास्त विसंगत होती. बऱ्याच वर्गमित्रांचे केस बाजूने किंवा मधूनमधून पिकलेले होते, पण याचे यच्चयावत केस पांढरेफटक पडले होते, भिवयासुद्धा. डोक्यावर भांग पाडण्याइतके केस होते म्हणून बरे, टक्कल असते तर मुळीच ओळखू आला नसता. कातडी सुरकुतलेली असती, तर आलेल्या चार-पाच पोक्त शिक्षकांपैकी एक म्हणून मिसळून गेला असता.

शिक्षकांत मिसळायचे म्हणावे, तर बहुतेक शिक्षकांना शाळेत असताना तो आवडायचाच. कितीतरी शिक्षक त्याचे नाव वर्गात शाबासकी देण्यासाठीच घेत. म्हणजे प्रत्येक तासात दोनतीनदा त्याची प्रशंसा करण्याची सबब शोधणाऱ्या जीवशास्त्राच्या बिनीकर मॅडमसारखे अती नाही करायचे सगळे. पण तरी.

वर्गातल्या काही मुलींचेही सुदेशकडे विशेष लक्ष असे. तो जवळून जाताना मुलींच्या घोळक्यातून आतल्या गोटातला विनोद होऊन कधीकधी फिदीफिदी हसू ऐकू येई. त्या त्याच्याबद्दल काय बोलत असतील? आपणही त्यांच्यात जाऊन कॉमेन्ट करावी, असे मला खूप वाटे. पण आमच्या वर्गातील मुली फास्ट नव्हत्या. आणि मला चोंबडेपणा करण्याची धमक नव्हती. सुदेश मुलींच्या पुढेपुढे करायचा, पण थेट कोणाशी बोलायला जायला कच्चा होता. सुदेशचे वर्गातल्या मितालीशी लव्ह आहे, असे एकदा मुलींच्या बाथरूममध्ये कोणीतरी खरवडले होते. पण मी तरी सुदेश आणि मितालीला प्रत्यक्ष एकत्र बघितले नव्हते, आणि या अफवेला काहीही आधार असल्यास मला माहीत नव्हता. अफवा ऐकून मितालीला कुतूहल वाटावे, आणि त्या प्रकारे तिचे सुदेशशी सूत जमावे म्हणून सुदेशच्या टग्या चमच्यांनी बाथरूममध्ये खडू चालवला असावा, अशी शंका मला तेव्हा आली होती. पण पंचविसाव्या वर्षाच्या मेळाव्यात मला जाधवने नाही म्हणून सांगितले. एक तर जाधवला बाकीच्या धटिंगकंपनीच्या सर्व करतूती माहीत नसतील. किंवा हा आणखी एक विचारही करायला हवा – बाथरूम मुलींची होती ना? एखाद्या मुलीने लिहिले असेल ते.

ज्या मुलीशी सुदेशचा पुढे विवाह झाला ती गर्लफ्रेंड की अरेन्ज्ड माहीत नाही. बायको पोटजातीतली होती, म्हणजे अरेन्ज्ड असण्याची शक्यता खूप आहे. ती त्याच्याच मेडिकल कॉलेजात शिकणारी होती. गावच्याच मेडिकल कॉलेजात अगदी काठावर त्याला प्रवेश मिळाला होता – ते तरी बरे. कुठेच ॲडमिशन मिळाली नसती, तर बिनीकर मॅडमच्या भारंभार प्रशंसेची अगदी लाज काढली असती. सुदेश दहावीत मेरिटला आला असला, तरी बारावीत त्याचे मार्क तितके चांगले नव्हते. राष्ट्रीय स्तरावरच्या मेडिकल स्पर्धा परीक्षांना तो बसला तरी का, बसला तर तो यादीत आला नाही की कसे, ते मला माहीत नाही. तसे म्हणायचे तर माझे बारावीचे मेरिट फक्त सात मार्कांनी हुकले, पण इंजिनियरिंगच्या स्पर्धा परीक्षेत मला चांगला वरचा क्रमांक मिळाला. मग बारावीनंतर मी कॉलेजसाठी परगावी गेलो, त्यामुळे माझा शाळेतल्या वर्गमित्रांशी दैनंदिन संबंध तुटला. पुढे उच्चशिक्षणाकरिता मी परदेशी गेल्यानंतर घराशी, गावाशी मला बांधणारे धागे अगदीच विसविशीत झाले.

म्हणूनच पंचविसाव्या वर्षाच्या मेळाव्याला जायचे की नाही, याबाबत माझी शाश्वती नव्हती. नाही जायचे, असेच ठरत आले होते. पण सुदेश आयोजक मंडळापैकी होता, तो अक्षरशः वर्गमित्रांच्या घरोघरी गेला. त्याने आमच्या घरी जाऊन आईची किल्ली फिरवली. खरे तर शाळेत असतानाही एकमेकांच्या घरी ये-जा व्हावी असा सुदेशचा आणि माझा संबंध नव्हता. गल्लीतले लोक एकमेकांना जितपत ओळखतात तितपतच आई त्याला लहानपणी ओळखायची. पण तो इतक्या वर्षांनी गावाच्या पार त्या टोकावरून आवर्जून येऊन भेटून गेल्यावर आई मला फोनवर म्हणाली, "तुझा मित्र सुदेश किती जिव्हाळ्याने खपतो आहे, बघ तरी जमते का." मी दीड-दोन वर्षे घरी गेलो नव्हतो, ती भुणभूण आईने लावलीच होती. त्या तागडीत सुदेशच्या व्यक्तिशः बोलावण्याचे हे थोडे आणखी वजन पडले. म्हणून गेलो.

मेळाव्याच्या दिवशी केटररची काहीतरी दिरंगाई होती म्हणून सुदेश शेवटच्या क्षणापर्यंत वणवण फिरत होता, तो उशीरापर्यंत उगवला नाही. शाळेतले माझे काही दोस्त आले होते, ते आता अगदीच तिऱ्हाइतासारखे वागले. किंवा त्यांच्याशी काय बोलावे सुचेना, म्हणून मीच त्यांना बगल दिली. माझ्या अभ्यासचमूपैकी तो एक विवेकच आला होता. तो आजकाल ऑस्ट्रेलियात असतो म्हणाला, पण बाकी काही बोलणे झाले नाही. चमूतले बाकी भिडू कुठे आहेत, काय करत आहेत, ते ना मला माहीत होते, ना विवेकला. फार फार तर आम्ही दोन-चार मिनिटे बोललो असू.
त्यापेक्षा जास्त वेळ मी "सुदेश लव्ह" फेम मितालीशी आणि त्याच्या गँगमधल्या जाधवशी बोललो. "सुदेश" हा विषय सोडला तर जाधवशी बोलण्यासारखे माझ्याकडे काहीच नव्हते. मी जाधवपाशी उल्लेख केला की सुदेश तुझा खास मित्र म्हणून, तर त्याला आश्चर्य वाटले. त्याच्या आठवणीनुसार सुदेश हा अभ्यासू मुलगा होता आणि त्यांच्या उनाडक्यांत मोजकाच वेळ घालवायचा. जाधवच्या मते मी किंवा तो विवेक हेच सुदेशचे खास दोस्त होतो. नाही म्हणायला सुदेश आमच्या अभ्यासचमूत एकदा की दोनदा आला होता, हे मला अंधुक आठवले. मीसुद्धा शाळेतल्या मधल्या सुट्टीत सुरुवातीला त्याच्याबरोबर बसायला जायचो. पण त्याच्या प्रभावळीच्या आत मी कधीच पोचू शकलो नाही. आमचे मेतकूट आहे असे कोणाला, त्यातही जाधवला, चुकूनही का वाटावे, हे मला अनाकलनीय होते. जाधव म्हणाला की मेडिकल कॉलेजमध्ये गेल्यावर सुदेश त्याला क्वचित भेटायचा. कालांतराने त्याहून कमी कमी. लग्नानंतर सुदेश आणि त्याची पत्नी दोघे पुण्याला गेले, रफी होम हॉस्पिटलात रुजू झाले, म्हणाला. बहुधा त्याला रुबी हॉल म्हणायचे असावे.

मिताली माझ्याशी मस्त मोकळेपणाने बोलली. शाळेत असताना ती अबोल आणि शिष्ठ होती असे मला वाटे, ते अर्थातच चूक होते. चौफेर गप्पांमध्ये सुदेशचा विषय थोडकाच उद्भवला. मिताली आणि सुदेश दुरून नातेवाईक लागतात इतके त्या पुसट उल्लेखातून कळले. त्यावरून मला वाटते, की त्यांची लहानपणापासून ओळख होती, आणि त्यांना एकमेकांशी बोलताना कोणी बघितलेही असेल. आमच्या शाळेत साधारणपणे मुली आणि मुले एकमेकांशी बोलत नसत, म्हणून तेवढ्यावरून त्यांच्या लव्हची तात्पुरती अफवा पसरली असेल. काही का असेना, मितालीला कौटुंबिक नातेसंबंधामुळे सुदेशची हालहवाल ठाऊक होती. सुदेशचे लग्न एकूण अकरा वर्षे टिकले होते. एक मुलगीही झाली होती त्या काळात. घटस्फोटानंतर दोन वर्षे तो गावी परत येऊन घरी बसून होता. त्यानंतर तो इथल्याच एका छोट्या क्लिनिकमध्ये काम करायला लागला होता.

नंतर प्रत्यक्षात सुदेश भेटला तेव्हा तो आयोजनाच्या गुंत्यातच होता, शिवाय दमलेलाही होता. आमचे हॅलो-हॅलो इतकेच बोलणे झाले. वेळात वेळ करून आम्ही सेल्फी फोटो काढला. पण त्यावेळचा माझा फोन बदलून मी नवीन फोन घेतला, तेव्हा जुने फोटो मी कुठे बॅकप केले ते मला सापडत नाहीत. म्हणजे मी शोधले नाहीत. मेळाव्यात आणलेल्या प्रोफेशनल फोटोग्राफरनेही सर्वांचे एकत्र फोटो काढले. फोटोग्राफर ते फोटो सर्वांना ईमेलने पाठवणार होता. पण ते मला मिळालेच नाहीत, की स्पॅममध्ये हरवले, माहीत नाही. असो.

तर आज अवचित समोर आहे हा फोटो त्या मेळाव्यापेक्षा खूप आधीचा, अकरावीच्या पिकनिकमधला, दंड आणि भरगच्च खांदे शो-ऑफ करणाऱ्या सुदेशचा. फोटो आमच्यापैकीच कोण्या हौशी आणि शिकाऊ कॅमेरावाल्या वर्गमित्राने काढला असणार. तिन्हीसांजेचा अर्धवट प्रकाश असावा, आणि भगभगीत फ्लॅश लावला असावा. अंधारलेल्या तरी पांढुरकी झाक असलेल्या चित्रात सुदेशचे टक लावून समोर बघणारे लालसर डोळे भयाण दिसत आहेत. चेहऱ्यावरच्या बिनधास्त हसण्याशी विजोड आहेत.

मेळाव्यानंतरच्या गेल्या नऊ वर्षांत त्याचे काय नवीन आहे, ते नीट माहीत नाही. त्याची मुलगी मेडिकलच्याच पंथाला लागली आहे असे काहीतरी ऐकले होते. त्याचे पुन्हा लग्न झाले आहे आणि आता एक छोटे मूल झाले आहे, असेही मध्यंतरी कोणीतरी सांगितले होते वाटते. पण कोणी कुठल्या संदर्भात सांगितले, ते आठवत नाही. हे नव्या बायको-मुलाचे तपशील सुदेशबद्दल नसतीलही, अगदी शक्य आहे – दुसऱ्या कोणाबद्दल ऐकलेल्या गोष्टींची मनात सरमिसळ करत असेन मी.

***

तुझा पक्षपात

तुझ्या पक्षपाताचा सुदेशला फायदा नाही, मिताली. झालाच तर तोटा झाला.

अगदी शाळेत असल्यापासून तू त्याची बाजू घेते आहेस. खरे आहे, आठवी-नववीपर्यंत तुला सुदेश म्हणजे वर्गात पहिला-दुसरा येणारा मुलगा, इतपतच माहीत होता, त्याहून काही खास नाही. तुझी त्याच्याशी खरी ओळख दहावीच्या वर्षी झाली, तीसुद्धा शाळेबाहेर. सुदेशची आई, म्हणजे तुझा मावसभाऊ शीतलदादा आहे, त्याची आत्या, नाही का? शीतलदादाच्या लग्नात त्याच्या आईबरोबर सुदेश आला होता. इतके लांबचे नाते असल्यामुळे तिथेही ओळख झालीच असती असे नाही, योगायोगानेच झाली. पण सुदेशची आई तुझ्या मम्मीची किती वर्षांपूर्वीची वर्गमैत्रीण होती, म्हणून आयाआयांच्या गप्पा रंगल्या होत्या. तुझ्या मम्मीनेच "वा वा, हा तुमचा सुदेश का? म्हणजे मितालीच्या वर्गात मागच्या वर्षी पहिला आलेला," वगैरे, शाळासंबंध जोडला.

या सुरुवातीनंतर मग तू वर्गात त्याच्याकडे लक्ष द्यायला लागलीस. सुदेश मुलींच्या पुढेपुढे करायचा, तसा त्या लग्नातल्या भेटीनंतर मुद्दाम तुझ्याशी बोलायला यायला लागला. तुझी मैत्रीण वैशाली त्यावेळी तुला म्हणालीही, की कशाला त्याला लोचटपणा करू देतेस? तेव्हा तू तिच्यापुढे गप्प बसलीस. मग राखी पौर्णिमेला तू सुदेशला मावसभावाचा आत्येभाऊ म्हणून राखी बांधलीस. मग कितीतरी दिवस मैत्रिणी तुलाच "दादाभाई नवरोजी" म्हणून चिडवत होत्या. सुदेश कधीतरी मधल्या सुटीत येऊन तुझ्याशी बोलायचा, त्याचे कारण लोचटपणाच्या एकदम विपरीत होते, हे तेव्हाच कदाचित तुझ्या लक्षात आले होते. आईच्या ओळखीतली, आणि राखी बांधणारी म्हणजे तू बोलायला एकदम "सेफ" होती त्याच्या दृष्टीने. तुझ्या निमित्ताने मुलींच्या ग्रूपच्या जवळ येऊन त्याचे शायनिंग मारणे बघितले की तुला कधीकधी तिडीक यायची, तरी तू त्याच्याशी बोलायचीसच ना? इतकेच काय, तू थेट त्यालाच सांगितले होतेस की तसल्या वागण्याने त्याचे मुलींमध्ये हसे होते आहे. त्याने ऐकले नाही, तरी त्या वेळी कटू पण हितकर सल्ला देण्याची जबाबदारी तुझ्याकडून तू पार पाडलीस.

दहावीत तो काटकुळा चष्मिष्टर होता, पण अकरावीत तो टकाटक स्मार्ट दिसायला लागला होता. बाकीच्या मुलींची त्याच्याकडे बघायची नजर बदलली होती ते तुला दिसले होते. त्याच्याबद्दलच्या कॉमेन्ट्सचा सूर बदलला होता, हे तुला स्पष्ट ऐकू येत होते. तरी तुझी सुदेशशी मैत्री आधी आणि नंतरही प्लॅटॉनिकच होती हे ढळढळीत सत्य आहे. आता उगाच तुझ्या मैत्रिणी म्हणायच्या की त्याच्यावर तुझा गुप्त क्रश आहे – त्यात काही तथ्य असल्याची कुशंका तू आता या इतक्या वर्षांनी घ्यावी, हा निव्वळ कल्पनांचा खेळ आहे. मैत्रिणींपुढे लोचटपणा करू नकोस, असे तू सांगितल्यापासून तर "मुलींमध्ये इंटरेस्ट" हा विषय तुमच्या बोलण्यातून हद्दपार झाला होता. तू तरी त्याच्याशी कधी विषय काढलास का – मला अमुकतमुक मुलगा आकर्षक वाटतो? त्याच्याशी बोलताना तूही समाजातील स्त्री-पुरुषांचे स्थान हा विषय सैद्धांतिक स्तरावरच आणायचीस.
तो मेडिकलला गेल्यावर त्याने तुझ्याकरिता कॉलेजमधल्या मुलींचे सैद्धांतिकच वर्णन केले, नाही का? म्हणाला, एक तर त्या एकदम मध्यमवर्गीय, अभ्यासू आणि माणूसघाण्या असतात, किंवा नाहीतर उच्चभ्रू स्मार्ट आणि गर्विष्ठ असतात. ही अशी त्याची उडत-उडत केलेली निराशावादी सामाजिक मीमांसा. पुढे सुदेश ने तुला क्रेडिट दिले असले, तरी हे होपलेस वर्गीकरण करणाऱ्या सुदेशची मेडिकलमधल्याच विदिशाशी भेट घडली त्याचे श्रेय तुझे नाही. पहिली गोष्ट ही, की ते दोघे मेडिकलला होते आणि तू नव्हतीस. मेडिकलच्या एका वर्गात असून ते सेकंड इयरपर्यंत एकमेकांशी बोलले नव्हते, असे विदिशाने तुला नंतर सांगितले खरे, पण त्यांची ओळख तुझ्याशिवाय झालीच असती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू काही ठरवून मध्यस्थी केली नाहीस. कॅफे रसिकमध्ये ते पहिल्यांदा एकमेकांशी बोलले तेव्हा तूही तिथे होतीस, हा योगायोग आहे. विदिशा तुझी जीवश्चकंठश्च मैत्रीण नव्हती – सुदेशसाठी तिची जोडी चांगली आहे असे अनायासे मनात येण्यासारखी तर नाहीच. शाळेत घोळक्याने जाणाऱ्या मुलींपैकी इन-मिन-तिघी वेगवेगळ्या कॉलेजांमध्ये गेल्यानंतरही भेटत राहिल्या, त्यांतल्याच ती आणि तू. त्या दिवशी रसिकमध्ये तुम्ही दोघीच एका टेबलावर होतात. दाराशी सुदेश ताटकळत उभा दिसला, म्हणून तू त्याला "ये, इथे बस" म्हणालीस. बसल्यावर सुदेश अशा अविर्भावात बोलायला लागला, जणू काही त्याचा विदिशाशी आधीपासून परिचय होता. अक्षरशः "सुदेश – ही विदिशा" हे शब्ददेखील उच्चारण्याचे काम तू केले नाहीस. विचार कर : रसिकमध्ये कोणीही मुद्दामून एकटे जाते? सुदेश मित्रांबरोबरच आला असेल, तू आवाज दिल्यावर तुझ्यासोबत विदिशाला बघून त्याने मित्रांना डच्चू दिला असणार तिच्या इन्ट्रोसाठी. काही असो, तू त्यांच्या ओळखीत निमित्तमात्र होतीस.

सुदेशने तुला दिलेल्या दुहेरी वर्गीकरणात ओढून-ताणून विदिशाला बसवायचीच तर ती मध्यमवर्गीय-अभ्यासू-माणूसघाणी होती. पण त्याचे तिरसट वर्गीकरण कुचकामी आहे, हे तुला माहीतच होते. विदिशा माणूसघाणी नाही, पण अंतर्मुख प्रवृत्तीची आहे, असे योग्य वर्णन तू तेव्हाही केले असते. पुढे सुदेशच्या मोकळ्या स्वभावामुळे ती खुलावी, हे तू समजू शकलीस. पण सुदेशलाही इतकी शांत आणि बिनग्लॅमरची मुलगी आवडावी, हा त्याचा पैलू तुला नवीन होता.

विदिशा-सुदेशची जोडी जशी जशी कच्चीपासून पक्की होत गेली, पुढे घरच्यांच्या तथास्तूने ऑफिशियल झाली, तशा तशा तुझ्या सुदेशशी गप्पा कमी कमी होत गेल्या. पण गंमत म्हणजे त्याच वेळी विदिशाच्या तुझ्याबरोबर भेटी वरचेवर वाढत गेल्या. आठवड्याच्या आठवड्याला तुला सुदेशची तपशीलवार बातमी विदिशाकडून मिळायची.

विदिशाने तुला जे वर्णन केले त्यानुसार तिला सुदेश नुसताच डॅशिंग नाही, तर रोमँटिकही वाटायचा. डॅशिंग तू समजू शकत होतीस. म्हणजे जेव्हा त्याने तिला तिच्या अतिसभ्य आईवडलांना थाप मारायला उचकवले, आणि एक वीकेंड सोबत महाबळेश्वरला नेले, ते त्याच्या बेधडक – तू म्हणायचीस बेजबाबदार – स्वभावानुसारच होते. त्याच्या असल्या वागण्याने समंजस विदिशाशी त्याची जोडी आज नाही तर उद्या मोडेल, अशी तुला तेव्हा भीती वाटली होती. पण त्या बेदरकारपणाबरोबर तो कुटुंबवत्सल, हळवा प्रियकर होता, हे तुला स्वतःच्या निरीक्षणामुळे कमी, विदिशाच्या वर्णनावरून कळायचे. तू एकदा विदिशाला म्हणाली होतीस की "सुदेश रोमँटिक नाही, तुझ्याशी मिळवून घेण्याकरिता सूडो-रोमँटिक आहे!" तेव्हापासून विदिशानेच तुझ्या-तिच्या बोलण्यात त्याचे नाव सुदेश ऐवजी "सूडो" ठेवले. तू मात्र निक्षून "सुदेश" असेच म्हणायचीस.
मेडिकल, मग इंटर्नशिप झाल्यानंतर दोघे लग्न करूनच एम डी करण्यासाठी पुण्याला गेले. लग्नात तू करवली होतीस, आणि नंतरही आठवणीने अधूनमधून फोनने संपर्क ठेवत राहिलीस. पुण्यात मैत्रिणी नसल्यामुळे तिने पहिल्या तिच्या मिसकॅरेजच्या वेळी तुलाच फोन केला. तिचे सांत्वन केल्यानंतर तुला सुदेशशीही बोलायचे होते. पण तो त्या वेळी जवळ नव्हता. तर तू विदिशालाच त्याच्या वाटचेही सांत्वन बोललीस. मात्र जे तू बोललीस, "सुदेशला आपल्या बाळाशी खेळायची खूप खूप आशा होती, ते तूच मला सांगितले ना विदिशा? त्याला किती निराश वाटत असेल, त्याच्यासाठी तूच खंबीर हो विदिशा..." ते त्या प्रसंगी बोलायला नको होतेस. सुदेशने सुद्धा विदिशाकरिता खंबीर होणे तितकेच जरुरीचे होते, पण तुझ्या उपदेशातून एकट्या विदिशावरच जबाबदारी असल्यासारखे झाले.

पुढच्या खेपेस विदिशाने सहा महिने बेडरेस्ट घेतली, आणि बाळंतपण नॉर्मल झाले असे कळल्यावर तुला हायसे वाटले होते. त्यांच्या बाळाचे, समीक्षाचे, बारसे पुण्याला झाले, आणि तू जातीने हजर होतीस. विदिशा अजून दमलेलीच वाटली तुला. मेकप असूनही तिच्या डोळ्याखाली सूज असल्यासारखे तुला दिसत होते. बेडरेस्टकरिता सहा महिने रजा तिला एमडीच्या अभ्यासक्रमाच्या मध्यात घ्यावी लागली होती. त्यानंतर नवीन टर्म सुरू होईपर्यंत ती घरीच राहाणार होती असे तुला बारशाच्या वेळी कळले.

तिला पुण्यात एकटे एकटे वाटत असेल, हे माहीत असल्यामुळे तू तिला दर शनिवारी एकदा तरी फोन करायचीस. ती कधीकधी रडवेली असायची आणि कधीकधी चिडखोर असायची. तिच्याशी बोलून तुझाच मूड ऑफ व्हायचा पुष्कळदा. विदिशा कधी तुझ्याबद्दल आस्थेने चौकशी करायची नाही. त्या काळात तुझा आणि संजितचा ब्रेकप झाला, त्यानंतर दोन महिन्यांनी तुला एडविन भेटला, तेव्हा घरी काय कहर झाला, या सगळ्या गोष्टी तूच आपणहून विदिशाला सांगितल्या होत्या. पण तिचे लक्ष नसायचे. पुढच्या फोनच्या वेळी ती तुला यांत्रिकपणे संजितचे हालहवाल विचारत राहिली.

बाळाबद्दल तिची सारखी नकारात्मक पिरपिर असायची. कधी म्हणायची "समी माझ्याकडे हसतच नाही", कधी "मला जमत नाही तिचे करणे", कधी "माझे दूधच कमी आहे". याच काळात तुझ्यापाशी सुदेशबद्दल तिच्या तक्रारी सुरू झाल्या. विदिशा तुला एक मोठे शल्य सांगायची, की सुदेशने पाठबळ दिले असते, दाई ठेवायला हो म्हटले असते, तर डिलिव्हरीनंतर ती लगेच हॉस्पिटलात रुजू होऊ शकली असती. डिलिव्हरी व्हायच्या आधी सुदेश तिला फुलासारखे जपत होता, पण आता दुर्लक्ष करायला लागला होता, असे तिने तुला सांगितले. "हॉस्पिटलमधून आल्यानंतर सूडो बाळाला पाळण्यातून घेऊन खेळत बसतो, माझ्याकडे बघतसुद्धा नाही", असे विदिशा एकदा म्हणाली. तेव्हा "एकत्र खेळा ना समीबेबीशी", असे तू सुचवले, तर तिने चिडचिड करून तुला धुडकावले. अशी रडगाणी, तणतण ऐकून-ऐकून तू कयास केलास की विदिशाला समीक्षा नकोशी आहे, म्हणून सुदेश समीक्षाला जमेल तितके जपतो आहे, आणि विदिशा समीक्षाचा राग सुदेशवर काढत आहे. म्हणूनच टेलिफोनवरती तू विदिशापाशी सुदेशचे जमेल तितके समर्थन करायचीस.

पण या काळात सुदेशशी बोलायला हवे होतेस तू. विदिशा तुला सांगत होती ते सगळेच सुदेशला सांगत नसेल ती. त्यांच्या भांडणतंट्यात भडास निघत असेल, शल्य झाकलेलेच राहात असेल, याबाबत तू पुरेसा विचार केला नाहीस. सुदेशची बाजू घेण्याच्या घाईत सुदेशची बाजूच तू ऐकली नाहीस.

तुझ्याशी संवादांचा विदिशाला उपयोग झाला की नाही, कोणास ठाऊक. पण सहा महिन्यांत ती सावरली. तिची हॉस्पिटल ड्यूटी पुन्हा सुरू झाली, तसे तिच्याशी फोन संवाद जरी कमी कमी होत गेले, तरी संवाद पूर्वीसारखे मोकळे झाले. समीक्षाच्या पहिल्या दाताचे, पहिल्या बोबड्या बोलांचे, पहिल्या पावलांचे गोडवे तुला विदिशाकडून कळू लागले. सुदेशबद्दल तक्रारी बंद झाल्या, त्याबद्दल तुला हायसे वाटले. No news is good news! म्हणून तूही "सुदेशचे कसे काय"पुढे विषय वाढवायची नाहीस.

इकडे तू तुझ्या नव्या संसारात गुंतत गेलीस, तिकडे विदिशाचे कामाचे व्याप वाढत गेले, आणि तुमचे फोन बंदच झाले. तुझे तडकाफडकी लग्न दोन फक्त साक्षीदारांसमोर रजिस्टर झाले, त्यामुळे सुदेश-विदिशाला बोलावण्याचा प्रश्नच नव्हता.

पुन्हा त्या दोघांची भेट घडण्यासाठी शीतलदादाच्याच घरच्या मुंजीच्या कार्याचे निमित्त झाले. सकाळच्या मुहूर्ताला सुदेश-विदिशाच्या सोबत चिमुरडी समीक्षाही आली होती, पण जेवायच्या आधी तिच्या आजीने तिला घरी नेले. सुदेशचे पोट थोडेसे सुटले होते, पण तू "लग्न मानवले" म्हणावेस इतके नाही. कानशिलावरचे मधले-मधले केस पांढरे झाल्यासारखे तुला दिसले. तो सुपरस्पेशलायझेशन करायला दिल्लीला जायचा विचार होता, असे त्याने तुला तेव्हा सांगितले. त्याच्या व्यवसायावेगळ्या गप्पा त्याने तुझ्याशी केल्या नाहीत.

पंगतीतून उठताना विदिशा तुला म्हणाली "अग, कॅफे रसिक कार्यालयाच्या जवळच आहे, जाऊया का आपण कॉफी घ्यायला?" तुझ्यावरही नॉस्टॅल्जियाची जोरदार लहर आली, आणि तू लगेच हो म्हणालीस.

कॉलेज क्राऊडच्या गर्दीत नको, म्हणून तुम्ही एअरकंडिशन सेक्शनमध्ये गेलात, तिकडे तुम्हाला लगेच टेबल मिळाले. हवेचे तापमान वेगळे असले, तरी तुमच्या पूर्वीसारख्या गप्पा सुरू व्हायला वेळ लागला नाही. शाळेतल्या सगळ्या मैत्रिणींच्या बातम्यांची उजळणी झाली. मग तिने पर्समधून समीक्षाचे बरेचसे फोटो काढून दाखवले. मग तुला तिने "एडविनचा फोटो दाखव ना" अशी गळ घातली. तू पुढे केलेला त्याचा सुटातला फोटो बघून तिने तुला विचारले "हा लग्नातला आहे?" तू हो म्हणताच ती लटके रागावून म्हणाली "पण साक्षीदार म्हणून तू मला बोलावले नाहीस, हे बरे नाही केलेस!"

मग माझ्या घरी झालेली "चालती हो घरातून, आमची मिताली नावाची मुलगी मेली!" नाटके तू तिला तिखट-मीठ लावून सांगितलीस. मग तू तिला विचारलेस, " विदिशा, तुमचे घर तर इतके सनातनी –तू सुदेशबरोबर महाबळेश्वरला गेली, ती त्यांच्यासाठी धर्मबुडवेगिरीच!" ती खुदकन हसून तुला म्हणाली, "त्यांना अजूनही वाटते की ती फक्त मुलींची ट्रिप होती." मग तू तिला म्हणालीस, "पण खरे म्हणजे तू इतकी सत्त्वशील, सालस मुलगी, त्यांना तू सत्य सांगितले असतेस, तर तुझ्यावर विश्वास ठेवून विवाहपूर्व काही करशील असा वहीम..." तू वाक्य पूर्ण करायच्या आधी तुझ्या लक्षात आले की तिच्या ओठांचा कोपरा मिश्किलपणे थरथरत होता. तू तिला म्हटलेस "No! you didn’t!" ती म्हणाली, "More in one weekend, than the last two years…"

तिचा चेहरा ज्या त्या एका क्षणात काळवंडला, त्याच क्षणात संतापाची एक सणक तुझ्या डोक्यात गेली. तिला तुझ्या चेहऱ्यावरची मुद्रा दिसू नये, म्हणून तू मान खाली करून कॉफीकडे निरखून बघायला लागलीस. तुझ्या मनातल्या मनात "समीच्या जन्मानंतर तू इतके छळलेस त्याला, आणि आता त्याची तुझ्याबाबत वासना उडून गेली, त्याचा दोष तू सुदेशला देतेस!" अशा विचारांची वावटळ उठली, त्यातून तू बाहेर पडलीस ते तिच्या पुटपुटण्याचा आवाज ऐकून. ती म्हणत होती – "नाही, त्याचे अफेअर नाही, खात्री आहे मला. सूडो खरे सांगेल मला..." पण ते वाक्य ती स्वतःशीच बोलत होती, तुझ्याशी नाही, असे ठरवून तू काहीच म्हटले नाहीस, विचारले नाहीस.

त्या भेटीच्या आधीच्या गेल्या कित्येक वर्षांच्या सुदेश-विदिशाच्या सहजीवनात काय घडले, त्याची तुला कणभरही माहिती नव्हती, हे तुझ्या लक्षात यायला हवे होते. विदिशा तुझ्याकडे मन मोकळे करायला आली होती, पण मुद्द्याचे काहीही माहीत नसताना तू तिला दोषी ठरवलेस. सुदेशबद्दल कळवळलीस, ती तू त्याच्याबाबत सह-अनुभूती दाखवली नाहीस. आंधळा, अडाणी, मूर्ख पक्षपात दाखवलास – त्याचा सुदेशला काहीही फायदा झाला नाही, मात्र विदिशाची कुचंबणा झाली.

कॉफीचे बिल, रिक्षा, वगैरे काहीतरी निरर्थक वाक्ये बोलून ती भेट संपली. विदिशाने पुन्हा कधी तुझ्याशी संपर्क केला नाही, आणि सुदेश तर आधीही थेट बोलायचाच नाही.

काही वर्षांनी सुदेश-विदिशांनी डायव्होर्स घेतला, तेही शीतलदादाकडून कळले तुला.

***

ते तीन शिलेदार

ते तीन शिलेदार म्हणजे अतीश जाधव, पार्थ जामकर आणि अमर सुटवे. तीन शिलेदार ही उपाधी सुचवणारा जाधव होता. ॲलेक्झँडर ड्यूमासच्या Three Musketeers पुस्तकातले अथोस, पोर्थोस, आरामिस म्हणून अतीश, पार्थ, अमर – अनुप्रास जुळले, आणि "तीन शिलेदार" नाव चिकटलेच. सुदेश डांगेने पुढे एकदा सुचवले की स्वतः डांगे म्हणजे तीन शिलेदारांचा मित्र दार्तान्यां. पण ते कधी मान्य झाले नाही.

सुटवे शिलेदारांचा शिलेदार होता, कोणी वेगळा म्होरक्या असण्याचा प्रश्नच नव्हता. सुटव्यांचा बंगला जरी जामकर-जाधव राहायचे त्या गल्लीपासून लांब होता, तरी बंगल्यात सुटवेची स्वतंत्र खोली होती, तिथे त्यांचा अड्डा होता. बंगला शानदार होता : सुटवेचे वडील सुखवस्तू सरकारी कंत्राटदार होते. बंगल्याच्या दिवाणखान्याकरिता मोठा टीव्ही आणला, तेव्हा जुना ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही सुटवेच्या खोलीत येणार होता - तो त्याने स्वीकारला नाहीच, त्याच्यासाठी मग हट्टाने स्वतंत्र नवीन रंगीत टीव्ही आला होता. व्हिडियो गेम खेळायचा असला, तर जाधव-जामकर, आणि कधीकधी डांगेही, सायकल दामटत बंगल्यावर जायचे. अकरावीत पहिली ब्लू फिल्मही जाधवने सुटवेबरोबर त्याच खोलीत बघितली होती. जामकरही होता, पण डांगेला बोलावूया का? असा प्रश्नही उद्भवला नव्हता. कारण डांगे बंगल्यावर यायचा आणि सुटवेच्या आईशी गप्पा मारायचा. जाधव-जामकरकडे मात्र सुटवेची आई दुर्लक्ष करायची, आणि तेच बरे होते. कुठलेही गुपीत तीन शिलेदारांत तांत्रिकदृष्ट्या षट्कर्णी असले, तरी सुरक्षित असे. पण या सहा कानांचे आठ करणाऱ्या डांगेचे खरे नव्हते.

सुटवेच्या आईने बोलावूनच मुळी पहिल्यांदा डांगे बंगल्यात आला होता. दहावीच्या प्रीलिममध्ये सुटवे गणितात फेल झाला होता; अभ्यासात त्याला मदत करायला डांगेला तिने बोलावले होते. डांगे मग वरचेवर "एकत्र अभ्यास करायचा" असे सांगून बंगल्यावर येऊ लागला. यायचा आणि तीन शिलेदारांबरोबर टीव्ही बघत बसायचा. लवकरच अभ्यासाच्या सोंगाची गरज राहिली नव्हती : परीक्षेच्या वेळी डांगेच्या उत्तरांची पाने सुटवेपर्यंत पोचवायची योजना हेडसरांशी पक्की ठरली होती. पण तरी डांगे दहावीची परीक्षा होईपर्यंत, आणि मग पुढे अकरावी-बारावीतही बंगल्यावर येत राहिला.

यायचाच, म्हणून कधीकधी तीन शिलेदार जिथे कुठे जात तिथे डांगेला बरोबर येऊ द्यायचे. साहसी काही असले, तर डांगे कधीकधी कच खायचा, पण कधीकधी उलट फूस द्यायचा. उदाहरणार्थ : सुटव्यांकडेही मोटार होतीच, पण ती चालवायला अमर सुटवेला मुळीच परवानगी नव्हती. तर मग शेजारच्या बंगल्यातल्या भावे डॉक्टरांची मोटार गंमत म्हणून चालवायला घ्यायची कल्पना डांगेचीच होती. त्या वर्षी भावे लोक गणपतीला गावी गेले, तेव्हा बाहेरच्या कुलुपाची एक चावी सुटव्यांच्या घरी सोडून गेले होते. भाव्यांच्या दाराच्या आतच खुंटीला गाडीची चावी लटकवलेली होती. ते सुटवेला माहीत नव्हते, तरी तिकडे असणार, असे डांगेनेच सुचवले. गणपतीनंतर चवथ्या दिवशी दुपारी तीन वाजता कारने सफर करायचे ठरले. सुटवेचे वडील कामावर होते, नोकर सकाळचे काम करून घरी गेले होते किंवा निवांत होते. भाव्यांचा बंगला सामसूमच होता. सुटवेने गाडीची किल्ली आणली. चारही मुले गाडीत बसली. क्लच-ॲक्सेलरेटर-गियर, वगैरे, काय-काय असते, ते सुटवेला माहीतच होते. पण गाडी स्टार्ट केल्यावर सुटवेने क्लच नीट सोडलाच नाही. गाडी हलेना आणि काहीतरी घाण वास गाडीत भरला. मग त्याने क्लच सोडला, तर गाडी गच्चकन उडी मारून वीस फूट पुढे गेली, आणि मग लगेच इंजिन बंद पडून थांबली. सुटवेचा हात चुकून हॉर्नवर गेला आणि गाडी लांबलचक पीऽऽऽ किंचाळली. सुटवेची आई धावत बाहेर आली. मुलांना लगबगीने घरी बोलावून घेतले. ती रागावली असेल, तर बोलली नाही. परस्पर फोन लावून सुटवेच्या बाबांच्या ऑफिसातून ड्रायव्हरला बोलावून घेतले. भाव्यांची गाडी पुन्हा जागेवर लाववून घेतली. पुढच्या आठवड्यात सुटवेला त्याच्या बाबांनी मोटारसायकल आणून दिली. मग पुढे ड्रायव्हरकरवी मोटार चालवायचे धडेही दिले.

हक्काची मोटारसायकल मिळाल्याने तीन शिलेदार घोडेस्वार झाले. मोटारसायकलवर फारतर ट्रिपल सीटच मावायचे. डांगेला घेण्याचा प्रश्नच नव्हता. मोटारसायकलने दूर फेरफटके मारायला नाही, तरी तीन शिलेदारांच्या संगतीनेच सुरुवातीला डांगे गल्लीतल्या व्यायामशाळेत गेला होता. मग तो स्वतःहून जायचा, पण जमल्यास तीन शिलेदार असतील तेव्हाच तिकडे पोचायचा. तसा स्वतःहून मन लावून व्यायाम करायचा डांगे पुढे पुढे.
उलट सुटवे आणि जामकर पुढे व्यायामशाळेत यायचे बंद झाले. त्याचे असे झाले. व्यायामशाळेत येणाऱ्यांचे एकमेकांशी खूप इमान होते. "कोणी बाहेरच्याने एकाशी दुश्मनी केली, म्हणजे सगळ्यांशी दुश्मनी केली," अशी पहिलवान-पोरांची घट्ट एकी होती. एके दिवशी व्यायामशाळेत येणाऱ्या सरजे-पाटलाने बघितले की त्याच्या बहिणीशी विळख्यांपैकी मधला भाऊ लगट करत होता. त्याला बघताच दोघे प्रेमी सैरभैर झाले, पण सरजे-पाटील विळख्याचा पाठलाग करत त्याच्या घरापर्यंत पोचला. पण तिथे पोचल्यावर तिघे विळखे बंधू तरातरा बाहेर आले. त्यातल्या दोघांनी सरजे-पाटलाला आवळून धरले, तिसऱ्याने त्याच्या मुस्कटीत दोन-तीन मारल्या. आधी कावराबावरा, मग शरमून रडवेला, शेवटी संतापाने तापलेला असा सरजे-पाटील व्यायामशाळेत आला. व्यायामशाळेत तेव्हा तिघेचौघेच होते, पण ठरले! उद्या आठ-दहा जणांनी जाऊन विळख्यांच्या सगळ्या पोरांना ठोकून काढायचे. उद्या संध्याकाळी साडेसहा वाजता सगळ्या टीमनी एकत्र जमायचे होते. शाळेत जामकरने जाधव-सुटवेंना सांगितले. डांगेला व्यायामशाळेतल्या दुसऱ्या कोणी आधीच सांगितले होते. त्या संध्याकाळी दहा पोरे जमा झाली, आणि लाठ्या घेऊन तिन्हीसांजेच्या अर्धवट अंधारात गुपचूप विळख्यांचे घर गाठले. सगळ्यांनी नाकातोंडावर रुमाल बांधले होते. एकाने दार ठोठावले, आणि विळख्यांच्या आईने दार उघडल्यावर तिला ढकलून सगळे आत घुसले. घरातले लोक पानांवर उष्ट्या हाताने बसले होते. विळख्यांच्या आईवडलांना आतल्या खोलीत कोंडून पोरांनी तिघा भावांना बदड बदड बदडले. पूर्ण मोहीम दहा मिनिटांत संपली. सात वाजायच्या आत सर्व मुले जेवायला आपापल्या घरी परत आलेली होती. विळख्यांनी तक्रार करून नऊ वाजता पोलिसांची जीप गल्ली-गल्ली फिरायला लागली, तेव्हा रोज कोपऱ्यावर जमणाऱ्यांपैकी एकही टपोरी पोरगा घराबाहेर नव्हता. पोलीस आले तसे परत गेले. साधारणपणे व्यायामशाळेच्या दुश्मनांना इंगा दाखवण्याची कथा इथेच संपली असती. पण संपली नाही.

तीन शिलेदारांबाबत मुद्द्याची गोष्ट अशी, की तीनपैकी फक्त जाधव-जामकर दोघेच मोहिमेत होते. डांगे काहीतरी निमित्त करून साडेपाच वाजता सुटव्यांच्या बंगल्यावर गेला होता. सुटवेला न भेटता सुटवेच्या आईला भेटला होता, तरी तो सुटवेला जाता-जाता खिडकीतून दिसला होता. मग सुटवेचे वडील घाईघाईने घरी आले होते, आणि काहीतरी खरेदीचे निमित्त करून सुटवेला बरोबर घेऊन गाडीने जिल्ह्याच्या गावी गेले होते. व्यायामशाळेत जायची इमानी चुटपुट दाबत, डांगेच्या नावाने दातओठ खात, सुटवे वडलांबरोबर गेला.

एरव्ही गल्लीतल्या मारामारीच्या वेळी "आमचा मुलगा गावीच नव्हता" असे एवढे प्रदर्शन करायची गरज नव्हती. मुलाला खडसावून सांगून घरी बसवून ठेवण्याइतकी जरब सुटवेच्या वडलांच्या नरड्यात होती. पण थोरले सरजे-पाटील जिल्हा परिषदेत वजनदार असामी होते. त्यांच्या मुलाने बोलावूनही अपमानाचा बदला घ्यायला सुटवे आला नाही असे त्यांच्या लक्षात आलेच असते. त्यांच्या मतावर आणि सहीवर सुटवे कन्स्ट्रक्शनची कंत्राटे अवलंबून होती. "आला नाही" ऐवजी "इच्छा असून येऊ शकला नाही" असे जगजाहीर करणे आवश्यकच होते.

कथानक इथेही संपले नाही, तर गुंताडा आणखी जटिल होता. विळख्यांचे पाहुणे जिल्हा परिषदेत विरोधी पक्षनेते होते. काही वर्षांपूर्वी त्यांचे सरकार होते, त्यांची लाल दिव्याची गाडी होती. ते आलटून पालटून पुन्हा अध्यक्ष होणार हे ठरलेलेच होते. विळख्यांनी गाऱ्हाणे पाहुण्यांकडे नेले, आणि भांडणाचे मूळ म्हणून धाकट्या सरजे-पाटलाकडे बोट दाखवले. पण पोलीस धाकट्या सरजे-पाटलाला अटक करणार नव्हते, हे तर आलेच. पूर्ण व्यायामशाळेला दंड केला असता, तर दंगलच उसळली असती. हाणामारी करणाऱ्या दुसऱ्या कुठल्या एकच मुलाला अद्दल घडवावी, आणि सूडचक्र थांबवावे, अशी सूज्ञ मध्यस्थी पोलिसांनी थोरले सरजे-पाटील आणि विळख्यांच्या पाहुण्यांच्या दरम्यान केली. पण धाकटा सरजे-पाटील कोणाचे नाव देईना, आणि थोरले सरजे-पाटील त्याच्यावर दबाव आणू देईनात. सात दिवस काहीच हालचाल होत नव्हती, आणि समेट उसवण्याची भीती होती. सुटवे त्याच व्यायामशाळेत जायचा, म्हणून त्याच्या वडलांवर पोलिसांनी माहिती देण्याबाबत दबाव आणला. जिल्ह्यातल्या दिखाऊ खरेदीचे नाटक या "माहिती द्या" विरुद्धही तसे लागू होते, पण दबाव चालूच राहिला.

या शह-काटशहांचे तपशील पुढे कधीतरी सुटवेने जाधवला सांगितले, पण सांगता नेमकी कुठल्या डावपेचाने झाली, ते जाधवला कळले नाही. खुद्द सुटवेने शेवटपर्यंत कुठलेही नाव सांगितले नाही, असे त्याने जाधवला निक्षून सांगितले.

उघड दिसायला झाले ते असे : मारामारीच्या दहाव्या दिवशी पोलिसांनी जामकरला पकडून नेले. तीन दिवस तो पोलिसांच्या ताब्यात होता, मग दोन आठवडे तो हॉस्पिटलात होता. पोलिसांचे काम इतके चोख होते, की त्याच्या अंगावर एकही कायमचा व्रण राहिला नाही. फक्त उजव्या कानाचा पडदा फुटल्यामुळे त्यानंतर आयुष्यभर तो अशी मान वाकडी करत-करत ऐकायचा आणि बोलायचा. न्यायालयपूर्व कोठडी सहा महिने आणि मग दोन महिने शिक्षा अल्पवयीन तुरुंग-शाळेत – त्याने कॉलेजात बारावी पूर्ण केलीच नाही.

छापकाटा उलटा पडला असता, तर जामकरच्या जागी आपण असतो, याची जाधवला पुरेपूर कल्पना होती. कित्येक वर्षे हा विचार मनात येऊन तो नकळत शहारत असे.

डांगेचे म्हणावे, तर त्याला बारावीत गुण तितके चांगले मिळाले नव्हते, असे जाधवला कळले होते. तरी बारावीनंतर मेडिकलमध्ये प्रवेश त्याला कसातरी मिळाला. मेडिकलचा प्रवेश त्याला जामकरला गोत्यात आणल्याचे बक्षीस म्हणून विळख्यांच्या पाहुण्यांच्या किंवा सरजे-पाटलांच्या वशिल्याने मिळू शकला असेल का? अशी शंका जाधवला आली. त्याला डांगे आधीपासून कधीही आवडायचा नाही. जाधवने सुटवेला पुन्हा-पुन्हा खोदून विचारले, तरी "डांगेने मारामारीच्या योजनेबद्दल आईला सांगितले, त्यानंतर डांगेचा काहीच संबंध नाही", असेच सुटवे सांगत राहिला.
जर सुटवे डांगेच्या बाजूने खोटेच बोलत असेल, तर स्वतःच्या वतीनेही खोटे बोलत असेल, ही वेगळी शंका पुढे जाधवला बारीक टोचू लागली. पण त्याने या संशयांची वाच्यता कोणापाशी केली नाही. खूप पुढे शाळेच्या कार्यक्रमात एक तो मनुष्य सारखासारखा डांगेबद्दल विचारत होता – शाळेत तो एक बावळट तरी नखरेल मुलगा होता, इतपतच जाधवला आठवत होता – त्याला तर जाधवने काहीच सांगितले नाही. डांगे सुटवे कुटुंबाचा खुशमस्कऱ्या असेल, संधिसाधू असेल, तरी गद्दार नसेल, अशी शक्यता मनात ठेवून जाधवने मारून मुटकून स्वत:चे समाधान केले. जुन्या गोष्टीने डोक्याला त्रास करून घ्यायचा नसल्यास त्यावेगळे काही गत्यंतर नव्हते त्याला.

***

ऋणनिर्देश : सदस्य आदूबाळ यांनी कच्चा खर्डा वाचून काही सुचवण्या केल्या, त्याबाबत त्यांचे आभार मानतो.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

खुपच छान लिहिले आहे।

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0