भारतीय तिरंग्याच्या उपेक्षित छटा - सदन झा

संकल्पना

भारतीय तिरंग्याच्या उपेक्षित छटा

मूळ लेखक - सदन झा.

भाषांतर - अवंती

"तीजा तेरा रंग था मैं तो तीजा तेरे ढंग से मैं तो..."

भारत एक स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र होऊन सत्तरच्या वर वर्षं झाली. वासाहतिक दास्यत्वापासून मुक्तता आणि देशाच्या सार्वभौमत्वाचं कदाचित सर्वांत ठोस आणि प्रभावी प्रतीक असलेला, स्वातंत्र्याचा आधारस्तंभ असा तिरंगा झेंडा कायमच दृश्य अवकाश व्यापून असतो. अलीकडच्या काळात अशा प्रदर्शनामागची आक्रमकता वाढीस लागली आहे. काही वर्षांपूर्वी बिहारमधील पूर्णिया गावात ७१,००० मीटर म्हणजेच ७.१ किमी लांब तिरंगा झेंडा फडकावला गेला आणि २०१७मध्ये दिल्लीत २२०० फूट लांब तिरंग्यासोबत एक रॅली आयोजित करण्यात आली. भारत-पाक सीमेवरच्या अटारी इथे झेंडा जमिनीपासून ३६० फूटांवर, सर्वांत उंचावर लावला जातो. ही फक्त काही उदाहरणं आहेत. ते पाहून एक प्रसिद्ध वाक्यच मनात रुंजी घालत राहतं: the size does matter. २०१८च्या जानेवारी महिन्यात प्रजासत्ताक दिनी जेव्हा 'अल्पसंख्य' समाजाचे लोक ध्वजारोहण समारंभ आयोजित करत होते, तेव्हा हिंसाचार झाला. तिरंग्यासारखे राष्ट्रीय, अधार्मिक प्रतीक प्रथमच जातीय उन्मादाशी जोडले गेले.

झेंडा फडकावण्याची कृती अनेक प्रकारची असते - रस्त्यापासून, क्रीडा सामन्यांपासून ते चित्रपटाच्या पडद्यांपर्यंत उन्माद आणि अभिमान या दोहोंचं प्रदर्शन केलं जातं. २००७ सालच्या 'चक दे' नामक हिंदी चित्रपटातलं एक गाणं हाही एक असाच क्षण.

ह्या देखाव्यांसोबतच बहुसंख्याकवादी राजकारणाच्या शक्तिप्रदर्शनासाठी आवश्यक असणारं प्रतीकांचे भडक प्रदर्शनही अंतर्भूत असतं. ह्या भूमिकेत नागरिकांची ध्वजाप्रती निष्ठा स्वयंभू नसून, तिचं जाहीर प्रदर्शन करणं महत्त्वाचं असतं, ती भावना बिंबवणं महत्त्वाचं असतं. ती भावना जागृत ठेवण्यासाठी झेंडा हे सर्वांत बलवान साधन आहे.

अशा बहुसंख्याकवादी राजकारणाचा पुरस्कार करणाऱ्यांसाठी एक रोचक गोष्ट म्हणजे तिरंग्याच्या सुंदर छटांमागे एक छुपा अल्पसंख्याक इतिहासही आहे. दुर्दैवानं जाणतेपणी वा अजाणता हा इतिहास विस्मृतीत जाऊ लागला आहे. त्या मागची मोठी गाथा विस्मृतीत जाऊ दिलेली आहे. ही कहाणी आहे तिरंग्याच्या उपेक्षित छटांची.

ही कहाणी सुरू होते भारतीय शासनाच्या 'Specification for the Indian National Flag of India (Cotton Khadi)' नामक अधिकृत दस्तावेजासोबत. यात Bureau of Indian Standardsनं शिफारस केली आहे की भारतीय राष्ट्रध्वज हा तीन रंगी आयताकृती असला पाहिजे; प्रत्येक रंगाच्या आयताची रुंदी सारखीच असेल. ते रंग म्हणजे 'India saffron' अर्थात केशरी, 'white' (ज्यामध्ये मध्यभागी नेव्ही ब्लू, निळ्या रंगाचं अशोकचक्र असेल) आणि 'India green' अर्थात हिरवा हे होत. यानंतर ह्या मानकात ध्वजरचनेतल्या प्रत्येक गोष्टीबद्दल रोचक तांत्रिक तपशिलांची चर्चा आहे. ही सर्व प्रचले (उदा. ट्राय-क्रोमॅटिक आणि स्पेक्ट्रोफोटोमेट्रिक व्हॅल्यू) रंगछटांच्या शास्त्रीय पैलूंकडे आणि नियमनाकडे निर्देश करतात.

रंगांच्या फक्त संख्यात्मक आणि शास्त्रीय पैलूंपुरतं पाहिलं, तर अधिकृत दस्तावेजात त्यांच्या नेमक्या किमती किंवा नेमके अर्थ दिलेले नाहीत आणि तसं काही सूचितही केलेलं नाही. २००२ सालच्या 'फ्लॅग कोड ऑफ इंडिया'मध्ये राष्ट्रध्वजाच्या प्रदर्शनाकरता तपशीलवार नियम आणि मार्गदर्शक सूचना दिलेल्या असल्या तरी त्यातही राष्ट्रध्वजातल्या रंगांना अर्थ प्रदान केलेला नाही. तरी त्यात प्रत्येक नागरिकानं आपापल्या कल्पनाशक्तीप्रमाणे ह्या रंगांंचा अर्थ कसा लावावा ह्याची एक चौकट आखून दिलेली आहे. याकरता भारताच्या घटना समितीनं तिरंग्याचा आराखडा १९४७मध्ये एकमुखानं संमत केला, त्या प्रसंगी तत्त्वज्ञ-राजकारणी एस. राधाकृष्णन यांनी दिलेलं स्पष्टीकरण पुढे केलं जातं: "भगवा अथवा केशरी रंग त्याग किंवा संन्यस्त वृत्ती दर्शवतो; आपल्या नेत्यांनी भौतिक फायद्याप्रती बेफिकीर राहून त्यांच्या कामाला वाहून घेतलं पाहिजे. मधला पांढरा रंग हा प्रकाश आहे; आपल्या वागणुकीसाठी दिशादर्शक असलेला सत्याचा मार्ग. हिरवा रंग आपला जमिनीशी, अन्य जीवन ज्यांवर पूर्णत्वानं अवलंबून आहे अशा वनस्पतींशी असलेला संबंध दर्शवतो. मधलं अशोकचक्र हे धर्मचक्र आहे. सत्य आणि धर्म ही या ध्वजाखाली कार्यरत असणाऱ्यांची नियामक तत्त्वं असली पाहिजेत. त्याखेरीज चक्र हे गतीचं सूचक आहे. गतिहीनता म्हणजे मरण. चलनवलन हे जिवंतपणाचं प्रतीक आहे. भारताने इत:पर बदलाला विरोध न करता पुढे जाऊन स्वागत केले पाहिजे. चक्र शांतिमय बदलाची गतिमानता दर्शवतं."

असं असलं तरीही, सर्व पातळ्यांवर पाहिलं तर एक विशिष्ट प्रकारचा स्मृतिभ्रंश, एकप्रकारे माहिती खोडणं आणि मोजणीत एक प्रकारची गफलतही आहे. आपण त्याला तिरंगा का म्हणतो? भारताच्या राष्ट्रध्वजातील रंगांविषयीच्या स्वजाणिवेतून आपण निळ्या रंगाला का हटवलं आहे?

स्वातंत्र्यपूर्व काळातल्या प्रसिद्ध आठवणींप्रमाणे, निळा रंग संघर्षाचं प्रतीक आहे. 'नीळी'शी जोडलेल्या रंगाची राजकीय मांडणी पोचते ती इंडिगो रिव्हॉल्ट अर्थात १८५९-६० साली बंगालमधील गोऱ्या नीळ मळेवाल्यांविरुद्ध शेतकऱ्यांनी केलेल्या नीळ उठावापर्यंत. पुढे १९१७ साली बिहारमध्ये नीळ शेतकऱ्यांचा मोठा उठाव आणि संघटन साऱ्या देशानं पाहिलं. ह्या घटनेनं महात्मा गांधींचीही राजकीय विचारसरणी बदलली आणि त्यांनी शहरापासून ग्रामीण भागांतल्या अत्याचारांकडे लक्ष वळवलं. त्या पीडित, परंतु बंडखोर शेतकऱ्यांचं, आणि महात्म्याचं प्रतीक म्हणून राष्ट्रध्वजाच्या मध्यभागी 'नेव्ही ब्ल्यू' रंग आहे. परंतु ते चाक म्हणजे महात्माजींचा चरखा आहे. महात्मा गांधींसाठी चरखा हे सामान्य व्यक्ती, त्यांच्या हालअपेष्टा आणि संघर्षाचं प्रतीक आहे. ते म्हणत, "एक राष्ट्र म्हणून भारत फक्त चरख्यासाठी जगू आणि मरू शकेल." या चरख्यानं काँग्रेसच्या झेंड्यात स्वातंत्र्यचळवळीदरम्यान मध्यवर्ती स्थान मिळवलं होतं.

असं असलं तरी, जेव्हा स्वतंत्र राष्ट्रासाठीच्या झेंड्याचा आराखडा २२ जुलै १९४७ रोजी घटना समितीत प्रस्तावित आणि त्यानंतर संमत केला गेला, तेव्हा चरख्याची जागा अशोकचक्रानं घेतली. गांधीजींना हे अजिबात आवडलं नाही. ऐतिहासिक व्यक्तिरेखा व प्राचीन भारतीय दंतकथेतल्या सम्राटाशी निगडित प्रतीकानं सामान्य माणूस आणि त्यांच्या हाल अपेष्टांची जागा घेतली. इथे हेही महत्त्वाचं, की अशोकचक्र हेही एक अहिंसेचा पुरस्कार करणारे बौद्ध प्रतीक आहे. ह्या अर्थानं ते प्रतीक, अशोक आणि महात्माजी ह्या दोघांनाही जणू संवादाकरिता समोरासमोर आणतं.
सुरुवातीला गांधीजींनी स्वत:च 'झेंड्या'मधून चरखा हटवण्याबद्दल कडवट प्रतिक्रिया व्यक्त केली होती. ते लिहितात, "मला हे म्हणलंच पाहिजे, की जर भारतीय संघराज्याच्या झेंड्यावर चरखा नसेल तर मी त्या झेंड्याला अभिवादन करणार नाही..." हळूहळू त्यांचं मत बनलं की झेंड्यातील चक्र हे अशोकचक्र असून त्याचा सुदर्शन चक्राशी काहीही संबंध नव्हता. त्यांनी हेही स्वीकारलं की सुदर्शन चक्राचा हिंसेचं प्रतीक म्हणून असलेला प्रचलित अर्थ चुकीचा होता. ते पुढे लिहितात, "जर चरख्याकडे दुर्लक्ष केलं, तर आपण फक्त दु:खात देवाची आठवण काढणाऱ्या आणि सुखात त्याला विसरणाऱ्या माणसाप्रमाणे होऊ." याअगोदर त्यांनी सुचवलं होतं की तिरंग्याच्या एका कोपऱ्यात छोटा युनियन जॅकही असावा. असं केल्यास, त्यांच्या मते, आपल्या अगोदरच्या शासकांप्रतीची नम्र भावना दर्शवली जाईल.

तरीसुद्धा निळ्या रंगाबद्दलची अनास्था, किंवा त्याबद्दल काहीच न बोलण्याची प्रवृत्ती बदलत नाही. यामागचे आपल्या मनात दृढमूल झालेले राजकीय पूर्वग्रह धुंडाळताना आपण पोहोचतो दलित राजकारणापर्यंत… आणि पोहोचतो ते निळ्या रंगात रंगलेल्या प्रतीकांच्या जणू समुद्रापर्यंत (झेंड्यापासून ते दलित चळवळीतील सर्वांत महान आणि पूजनीय व्यक्तिमत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोटाच्या रंगापर्यंत सगळंच निळ्या रंगाचं आहे)... ह्या पार्श्वभूमीवर, भारताच्या राष्ट्रध्वजातला अशोकचक्राचा निळा रंग तिरंग्याबद्दल बोलताना नेहमी दुर्लक्षित रहावा हा निव्वळ योगायोग असेल काय?
आपल्या गोष्टीत अजून एका रंगाकडे लक्ष दिले पाहिजे, तो म्हणजे पांढरा. राष्ट्रध्वजातला निळ्याखालोखाल सर्वांत कमी चर्चिला जाणारा रंग. उपरोल्लेखित अधिकृत दस्तऐवजात केशरी आणि हिरवा ह्या रंगांवर भारतीयत्वाचा शिक्का मारून त्यांना एतद्देशीयपणाचा एक विशिष्ट इतिहास प्रदान केलेला आहे. पांढरा रंग मात्र यासम सांस्कृतिक वातावरणाशी जोडलेला नाही. तो फक्त वैश्विक स्तरावरील प्रचलित शांती आणि जागतिक मानवतेच्या संदर्भातच जाणून घ्यावा लागतो.

भारताच्या झेंड्यातल्या सगळ्या रंगांपैकी पांढऱ्या रंगाची कथा सांगणं कदाचित सर्वांत अवघड असेल. ख्रिश्चन परंपरेतल्या वधूवस्त्रापासून ते कालिदासाच्या मेघदूत नामक संस्कृत काव्यातल्या हिमाच्छादित कैलास पर्वतापर्यंत (हिंदू दैवत शंकराचं हास्य म्हणून), आणि हिंदू वैधव्याच्या एकसाची प्रतीकापर्यंत पांढऱ्या रंगाचं दृश्य विश्व मोठे आहे. १९२१ साली जेव्हा महात्मा गांधींनी स्वराज झेंड्यात पांढरा रंग समाविष्ट करण्याचा प्रस्ताव मांडला, तेव्हा त्यांच्या समोर कोणताही एक धर्म किंवा समाज नव्हता. हिंदूंचे प्रतीक असलेला लाल रंग आणि मुसलमानांचे प्रतीक असलेला हिरवा रंग यांसोबत पांढरा रंग सर्वच अल्पसंख्याकांचे प्रतीक म्हणून असावा अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या आराखड्याप्रमाणे, या 'पांढऱ्या'चं संरक्षण हिंदू आणि मुसलमान या बहुसंख्याक समाजांनी करायचं होतं. महात्माजींच्या ह्या आग्रहामुळे आपल्याला वैश्विक धवल संभाषितातील एकसाचीकरणाचा धोका टाळून अल्पसंख्याकांपुढचे धोके समजून घेण्याची प्रेरणा मिळते.

महात्माजींनी १९२१मध्ये स्वराज झेंडा स्वीकारल्यानंतर त्या झेंड्यानं अल्पावधीत लोकांची मनं जिंकली. ह्या झेंड्याच्या मुद्द्यावरून एक लांबलेली सविनय कायदेभंगाची चळवळही दिसते; प्रथम जुलै १९२२मध्ये जबलपूर इथे, तर मार्च ते ऑगस्ट १९२३मध्ये मध्यप्रांतातल्या नागपूरात. ह्या सत्याग्रहाचं महत्त्व त्यातला राष्ट्रवाद किंवा तिथे राष्ट्रीय एकात्मतेचे मोठे दावे केले हे नसून, निव्वळ एका झेंड्याचा सन्मान आणि प्रतिष्ठा राखण्यासाठी एक दीर्घकालीन राजकीय मोहीम राबवली गेली ह्यात आहे. यावेळी, सत्याग्रहामागची प्रेरणा असलेला स्वराज झेंडा प्रचलित होऊन निव्वळ एक वर्ष झालं होतं. सुरुवातीला ह्या चळवळीत सर्वोच्च पातळीवर झेंड्याचा स्वीकार मर्यादित प्रमाणातच केला गेला; पुढे ही चळवळ फोफावली आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सर्वोच्च वर्तुळातल्या अनेकांनी चळवळीत स्वतःला झोकून दिलं किंवा किमानपक्षी त्यामागच्या उद्दिष्टाची दखल घेतली.

दुसऱ्या पातळीवरून पाहिल्यास, देशपातळीवरील खिलाफत-काँग्रेस युती मोडली ती १९२०च्या दशकाच्या मध्याच्या सुमारास, जेव्हा प्रांतीय वर्तुळांत तीव्र सत्तासंघर्ष घडत होता. असहकार-खिलाफत चळवळीनं वेगवेगळ्या समूहांना वेगवेगळी आश्वासनं दिलेली होती. गांधीवादी लोकांसाठी स्वराज्य, पॅन-इस्लामिस्ट लोकांसाठी खिलाफतीदरम्यानच्या चुका सुधारण्याची हमी, १९१९-२०मध्ये पोळलेल्या कामगारांना दिलासा, पंजाब (जालियनवाला बाग) मधल्या चुका सुधारणं, आणि मलबारातील मोपले, उत्तर बिहारातील दरभंगा राजमधले शेतकरी, रायबरेली-प्रतापगडचे शेतकरी, तसंच फैझाबाद आणि संयुक्त प्रांतांततल्या अवधच्या सुलतानपूरमधल्या शेतकऱ्यांची जमीनदारांपासून होणारी पिळवणूक थांबवणं आणि करवसुलीपासून मुक्तता, इत्यादी. अशा प्रकारे तयार झालेल्या राजकीय ऊर्जेचं रूपांतर गांधींच्या अचानक राजकारणनिवृत्तीमुळे जातीयवादाच्या वणव्यात झालं. इतिहासात प्रथमच अख्ख्या उपखंडात जातीय दंगली होऊ लागल्या. ह्या तणावपूर्ण वातावरणात स्वराज झेंड्यासाठी एक नवीन रंगसंगती तयार करणं आवश्यक होते. याची जास्तच गरज होती, कारण गांधींनी १९२१ साली स्वराज झेंड्याचा पुरस्कार करताना रंगांची संगती धर्मांशी लावली होती.
आदर्श भविष्यातील व्यवस्था दर्शवण्यासाठी अधार्मिक रंग असलेला झेंडा आवश्यक होता. इथे शिखांनी पहिला मुख्य आक्षेप घेतला. डिसेंबर १९२९मध्ये त्यांनी महात्मा गांधींना गळ घातली की त्यांच्या समाजाचे प्रतीक असलेला पिवळा रंग त्यात असावा किंवा नपेक्षा सरळ अधार्मिक झेंडाच अंगीकारला जावा. पट्टाभि सीतारामय्यांच्या हाताखाली एक झेंडा समिती नियुक्त केली गेली. समितीनं शिफारस केली की 'राष्ट्रध्वज केशरी किंवा भगव्या रंगाचा असून वरच्या एकचतुर्थांश भागात निळ्या रंगाचा चरखा असावा.' परंतु झेंडा समितीचा निर्णय काँग्रेसच्या कार्यकारी समितीनं लवकरच फिरवला, आणि निर्णय दिला, की काँग्रेसचा अधिकृत झेंडा "केशरी, पांढरा आणि हिरवा असून गडद निळ्या रंगाचा चरखा मधल्या पांढऱ्या आयतात असावा". महात्माजींच्या लाल रंगाची जागा आता केशरी रंगानं घेतली होती.

काँग्रेसच्या झेंड्यात लाल रंगाच्या जागी केशरी रंग आल्यामुळे अनेक प्रकारच्या व्यावहारिक अडचणी उत्पन्न झाल्या. काँग्रेसच्या अनेक पातळ्यांवरच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रांची बरीच देवाणघेव‌ाण केली होती. त्यांत केशरी रंगाची विशिष्ट आणि सहज तयार होणारी छटा कशी तयार करावी, याबाबतचे तांत्रिक तपशील, त्याबाबत मार्गदर्शन आणि तोडगे सुचवणारी भरभरून चर्चा होती. ह्या व्यावहारिक अडचणींमधून केशरी रंगामागचा एक कच्चा रंग म्हणून रोचक इतिहास समजतो.

थोडक्यात पाहिलं तर हॉब्सन-जॉब्सन शब्दकोशात जाफरान (सॅफ्रनचं अरबी रूप) हे दक्षिण भारतात हळदीकरता वापरलं जायचं असं दिलं आहे. पोर्तुगीजही त्याला Acafrao da terra किंवा देशी केशर असं म्हणत. तपशिलात पाहिलं तर कळतं की ही हलदी (हिंदी), हळद (दख्खन), हरिद्रा, हरि (संस्कृत - पिवळा आणि हिरवा दोहोंकरिता) ही गार्सिया द ओर्ता ह्या पोर्तुगीज डॉक्टरानं Croco Indiaco ह्या नावानं संबोधिली आहे. हा डॉक्टर गोव्यातला होता; त्यानं भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरच्या औषधी वनस्पती, फळं, मसाल्याचे पदार्थ, इत्यादींचं वर्गीकरण करणारा एक प्रसिद्ध ग्रंथ १५६३ साली लिहिला. यात अशीही माहिती मिळते, की इराणी भाषेत याला al-kurkum असंही म्हणतात, कारण 'केशराप्रमाणेच त्यांचाही रंग पिवळा होतो'. जॉर्ज वॉटच्या भारतातल्या उत्पादनांच्या कोशातही हेच दिसतं - केशर किंवा सॅफ्रनला जाफरान, साफरान, केसर, कुंकुम, सौरभ, थान्वई, कुरकुम, इत्यादी अनेक नावं आहेत. युरोपात याचा वापर मुख्यत: रंग आणि चीज आणि इतर खाद्यपदार्थांसाठी रंगद्रव्य म्हणून, आणि मर्यादित प्रमाणात औषधी म्हणून केला जाई. वॉट लिहितो की भारतात केशर 'रंगद्रव्य म्हणून वापरण्यासाठी खूपच महाग आहे'.

काँग्रेसच्या निधर्मवादी नेत्यांनी अधिकृत झेंडा स्वीकारताना प्राचीन आणि पराक्रमाचं प्रतीक असलेला रंग म्हणून केशरी रंग पुढे केला. केशरी रंगाच्या संघासारख्या उजव्या, हिंदू संघटनेशी आणि शिवाजी ह्या योद्धा-राजाशी असलेल्या संबंधांकडे शक्य तितकं दुर्लक्ष केलं. असं असूनही प्रचलित स्मरणात केशरी रंगाचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुत्वाशी अतूट संबंध आहे. दुसऱ्या बाजूनं थोडंसं खोलात गेल्यावर ह्या रंगाचा इतिहास श्रमणिक आणि बौद्धांसारख्या अल्पसंख्याक धर्मपरंपरांपर्यंत जातो. नजीकच्या भूतकाळातच पाहिलं तरी विसाव्या शतकातील केशरी रंगाला अनेक स्थानिक नावे होती, उदा. गेरू, बसंती, भगवा, केसरी, इत्यादी.

सध्याच्या बहुसंख्याकवादी, आवेशपूर्ण राष्ट्रवादाच्या काळात आपण ह्या रंगांचा अल्पसंख्याकांशी निगडित असलेला इतिहास विसरलो ही गोष्ट रोचक आहे. अल्पसंख्याक इतिहास आणि त्यांच्या परंपरांच्या प्रदेशातच आपण ज्या गाण्यानं ह्या निबंधाची सुरुवात केली तो निबंध केंद्रस्थानी आहे.

मला असं वाटतं की प्रसिद्ध गाणी लोकमानसामधल्या स्मृतींचा पाया असतात. प्रसारमाध्यमं आणि शाळेच्या क्रमिक पुस्तकांसारखीच, प्रसिद्ध गाणीसुद्धा देशाची जाणीव घडवण्याचं काम करतात. जयदीप साहनींनी रचलेलं आणि कृष्ण व सलीम मर्चंट यांनी गायलेलं हे गाणं त्याचंच एक उदाहरण आहे. २००७ सालच्या शाहरुख खानच्या 'चक दे' ह्या चित्रपटातल्या गाण्यात अल्पसंख्याकांची अस्वस्थता पराकोटीस नेलेली आहे.

एखादं उत्तम गाणं, कविता किंवा चित्र अनेक पातळ्यांवरचे अनेक अर्थ सूचित करतं. कल्पनाशक्तीचं जणू वेगळं विश्वच उघड करतं. 'चक दे'मधल्या गाण्यात एक प्रबळ इच्छा व्यक्त केली आहे. तिचा विषय आहे आपल्या राष्ट्रध्वजातला तिसरा रंग, अर्थात हिरवा. ह्या रंगाचा संबंध साधारणपणे भूमीच्या समृद्धीशी लावला जातो. हा रंग आनंदोत्सव, आणि नववधूंच्या बांगड्यांचा आहे… आणि प्रेषित मुहम्मदाच्या झेंड्याचाही.

चित्रपटात दाखवलं आहे, की कबीर खान नामक प्रसिद्ध भारतीय हॉकी खेळाडू पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पेनल्टी स्ट्रोकवरून गोल करू शकत नाही आणि त्यामुळे भारताचा पाकिस्तानकडून पराभव होतो. कबीर खानची देशद्रोही म्हणून संभावना करण्यात येते. सिनेमाच्या पडद्यावर दु:ख ओसंडून वाहतं. मी तुझा तिसरा रंग होतो; मी तुझ्याप्रमाणे मला घडवलं; माझ्या मौलाला तुझ्यात पाहिलं; तरीही असा अपमान का? सध्याच्या विरोधाभासाकडे इथे अंगुलिनिर्देश होतो का? राष्ट्रध्वजामधल्या रंगसंगतीमध्ये हिरव्या रंगाच्या अस्तित्वाबद्दल स्मृतिभ्रंश दिसत नाहीये का?
ह्या स्मृतिभ्रंशानं राक्षसी रूप धारण केलं, जेव्हा उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी १० ऑगस्ट २०१७ रोजी त्यांच्या मुलाखतीत भारतातल्या सध्याच्या अल्पसंख्यांकांपुढच्या धोक्यांसंबंधी वाटणारी चिंता व्यक्त केली.

हिरव्या रंगाच्या इस्लामशी असलेल्या प्रचलित संबंधावर अवलंबून हे गाणं तिसऱ्या रंगाचं अस्तित्वच जणू वर्तमानकाळापासून दूर नेतं. तिसरा रंगच जणू दु:ख व्यक्त करत होता की तो इथून पुढे तिरंग्यातील तिसरा रंग असणार नाही. वर्तमानातून भूतकाळात झालेल्या हकालपट्टीबद्दल खोलवर विचार करण्याची गरज आहे.

सदन झा सेंटर फॉर सोशल स्टडीजमध्ये असोसिएट प्रोफेसर म्हणून शिकवतात. त्यांनी लिहिलेलं Reverence, Resistance and Politics of Seeing the Indian National Flag हे पुस्तक केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेसनं २०१६ साली प्रकाशित केलं.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

अतिशय सुन्दर आणि महितीपूर्ण लेख. भाषांतराबद्दल धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0