आवाज

ललित

आवाज

- आरती रानडे

दिवसरात्र विविध प्रकारचे आवाज ऐकू येताहेत कानांना!
आवाज... सतत आवाज...
प्रचंड आवाज...
वेगवेगळ्या फ्रीक्वेन्सीचे आवाज
वेगवेगळ्या टेक्शरचे आवाज.

रात्रीच्या शांत प्रहरीदेखील
कर्णपिशाच्चासारखे पाठ न सोडणारे आवाज.

आज दोन आठवडे झाले
हे आवाज मला झोपूच देत नाहीयेत…
रात्रीअपरात्री केकाटणार्‍या कुत्र्यांच्या झुंडी
कदाचित एखाद्या लूत भरलेल्या कुत्र्यावर हल्ला करणार्‍या.
शेजारच्या बंगल्यातल्या म्हातार्‍या आजोबांची खोकल्याची उबळ.
बाप खोकतोय खालच्या अंधार्‍या खोलीत
तरी वरच्या बाल्कनीत उभं राहून पोराचं अपरात्री फोनवर न थांबणारं बोलणं.
थंडीनं कुडकुडणारी मांजराची पिल्लं माझ्या खोलीच्या खिडकीबाहेर
केविलवाण्या स्वरात 'मॉउ...' करणारी.
पेरूच्या झाडावर अवेळी चढणारी खार.
तिच्या नखांच्या आवाजानं शहारा येतोय अंगावर.
इलेक्ट्रीसिटीच्या तारांवर बसून घशातून घुमणारा पिंगळा.
ह्या आवाजानं आजारपणातल्या अनेक रात्री सोबत केलीये मला एकेकाळी...
... आताशा परत ऐकू यायला लागलाय.
अचानक बागेतल्या हौदावरच्या पत्र्यावर 'धप्प... ठण' असा आवाज करत
उंचावरून कोसळणारा नारळ.
आई-बाबांचं संथ 'साईन थीटा' वेव्हमधे घोरणं.
शेजारच्या घरात लागलेला बाथरूममधला पिवळा दिवा.
काही वेळानं फ्लशचा आवाज. दिवाही बंद.
पहाटे पाचचा आईचा गजर. आयपॅडचा थरारणारा टोन.
थोड्याच वेळात स्वयंपाकघरातल्या भांड्यांचे आवाज
चहाचं आधण ठेवल्याची माझ्या मनानं घेतलेली नोंद.
आईचं शुद्ध खणखणीत उच्चारांत पहाटेचे श्लोक म्हणणं.
ऐकून ऐकून दोन आठवड्यात मलाही पाठ झालंय हे सगळं.
'रामे शिळा उद्धारिली...' हा माझा अंथरूणातून उठण्याचा क्लू.
बाबांचं घोरणं तसंच संथ लयीत चालूच.

टेकडीवर लोकांच्या बोलण्याचे आवाज
'जय श्रीराम'च्या ओळख सांगणार्‍या आरोळ्या.
एखाद्या काकांच्या हातातल्या ट्रांझिस्टरमधून
अचानक उमटलेलं रफीचं 'अभी न जाओ छोडकर' हे आर्जव.
कोरड्या जमिनीवर आणि वाळलेल्या गवतावर उमटणारे
पावलांचे आवाज.
दीक्षित, दिवेकर.... साइझ झीरो... नो यार... ओम्ऽऽऽऽऽऽऽ.
एकमेकांत मिसळलेले आवाज.
धावणार्‍यांच्या श्वासांचे आवाज.
एका काकूंच्या आयफोन मधून 'लग जा गले' गाणारा डुप्लीकेट आवाज.
उद्या ह्या काकूंना ओरिजीनल लताचं गाणं आणून द्यायला पाहिजे - माझं स्वतःशी पुटपुटणं.
आवाज ... आवाज.... नुसते आवाज
टेकडीवरून खाली उतरेपर्यंत या आवाजांची संख्या, व्हॉल्यूम आणि डेसिबल सगळंच
मलटीप्लाय झालेलें...
दुकांनाची शटर उघडतानाचा
मेट्रोच्या खोदकामाचा
फेरीवाल्यांचा आवाज.
म्युनसिपालटीच्या कचर्‍याच्या गाडीची घंटा, आणि लाऊडस्पीकरवरुन 'प्लॅस्टीक बंदी आणि प्लॅस्टीक डिपॉसीट करणार्‍या जागांबद्दलची सूचना'.
'कोणीतरी यांना सांगा हो की मे महिना कधीच उलटून गेलाय.... त्या सूचना अपडेट करा'!
भंगारवाल्याचा, भाजीवाल्याचा रोजच्या फेरीचा आवाज
मधूनच उगवणार्‍या पोतराजाच्या आसूडाचा आवाज.
गाड्यांचे आवाज, स्कूलबसचे हॉर्न्स
'चला ठेवा हातातला फोन बाजूला. शाळेला जायचंय, आवरा.' आजूबाजूच्या घरातून आई-आजी-आजोबांचे आवाज.
कुत्री अजूनही भुंकताहेत.
त्या आवाजात आता पक्षांचे आवाजही मिसळलेत.
मांजरी आणि तिची पिल्लं आता लाडीक आवाजात दूध -पोळीसाठी पायात घुटमळताहेत.
फोनचे चित्रविचित्र रींगटोन्स
नोटीफिशेकन साऊंडस
व्हॉटसॅप व्हीडीयोमधून अचानक उसळणारी एखादी चायनीज किंवा कोरीयन 'इइइइइइइ हा.... चि चि' अशी किंकाळी.
मधूनच चालू होणारं एखादं भजन.
लोकांचं फोनवर बोलणं.
गर्दीतल्या वाहनांचे आवाज
हॉर्न्सचे आवाज.... त्यांच्यावर मात करुन
मोठ्या आवाजातल्या आई-बहिणीवरुन घातलेल्या शिव्या.
टीव्हीवर अखंडपणे चालू असणार्‍या ब्रेकींग न्यूज,
गाणी, खेळाची कॉमेंटरी
एकमेकांवर केलेले आरोप प्रत्यारोप
रस्त्यात वेळीअवेळी निघणार्‍या मिरवणूका, घोषणा, ढोल ताशे, फटाके.
सीरीयल्समधले अचंबित करणारे संवाद.
मंदिरातल्या घंटा. ख्रिसमस कॅरोल्स. लाऊडस्पीकरवरुन गायल्या जाणार्‍या आरत्या.
प्रत्येक खाण्याच्या दुकानात हातघाईला येऊन ऑर्डर्स देणारी माणसं.
ग्लास विसळल्याचे आवाज.
सिझलर्सचा 'चर्र.....'
डोशाच्या टपरीवरच्या उलथण्याची 'टक टक...'
बियरच्या बाटल्या उघडल्याचा, ग्लासांवर ग्लास आपटल्याचा
बार मधल्या लाऊड रीमीक्सचा आवाज....
चियर्स, चांगभलं...

आवाजांनी मी भंजाळून गेलीये.

गेले काही दिवस बाबा म्हणताहेत मला 'अगं, तू खूप मोठ्यानं बोलतीहेस. थोड्या हळू आवाजात बोल'.

मी प्रयत्नपूर्वक हळू आवाजात उत्तर देते -
"सांभाळून घ्या बाबा. अजून थोडेच दिवस तर असणार आहे मी इथे"
आता वय झालेल्या बापाला काय सांगू मी?
'तुम्हाला हल्ली कमी ऐकू येतं म्हणून बोलतीये मोठ्यानं... की
आजूबाजूच्या आवाजात दबून गेलाय माझा आवाज
निदान तो माझा मला तरी ऐकू यावा
म्हणून बोलतीये मोठ्यानं!'

जरा कुठे आवाजांची सवय होतीये असं वाटेपर्यंत मी
दूर निघून आलीये
सगळ्या आवाजांपासून.

पहिले काही दिवस ऐकू आले
कानातच अडकून राहिलेले
वाहनांचे, माणसांचे, फोनचे, घंटांचे
गाण्यांचे, गाड्यांचे आवाज.
नंतर हळूहळू ते ही विरत गेले आपसूकच.
मी एका साऊंडफ्रूफ बबलमधे आहे
असं वाटतंय आता.

एखादा पक्षाचा आवाज
कोसळलाच जर धो धो तरच ऐकू येणारा पावसाचा आवाज
लॅबमधल्या उंदरांची पिंजर्‍यामधली खुडखूड
जिममधला वेट्स मॅटवर पडल्याचा दबका आवाज
पहाटेचा गजर, मायक्रोवेव्हचा आवाज
पावसात गाडीच्या व्हायपर्सचा आवाज.
क्वचित व्हायब्रेट होणार्‍या फोनचा घरघराट.
की-बोर्डवरची टायपिंगची टपटप.
मी ऐकायला घेतलं तरच कानावर पडणारा गाण्याचा आवाज.
वेदर रीपोर्ट, एन पी आरचा तोच तो परिचित टोन.
नेटफ्लिक्स. सिनेमातल्या पात्रांचे आवाज.
कधीतरी विकेंडला भेटणार्‍या मित्रमंडळींच्या गप्पांचे हास्याचे आवाज.
बस्स!
इतकेच आवाज.
सगळेच एकमेकापासून वेगळे, एकमेकांत न मिसळणारे आवाज.
संयमित, हलके, कुजबुजणारे, सोफिस्टिकेटेड... दबलेले.
वेल प्लॅन्ड आवाज.

ह्या साउंडफ्रुफ बबलमधे
सध्या
मी झगडतीये,
निकराचा प्रयत्न करतीये
मोठ्यानं बोलण्याचा
स्वत:चा आवाज ऐकण्याचा
माझा आवाज दुसर्‍यांपर्यंत पोचवण्याचा
संवादाचा
माझे ओठ नुसतेच हलताहेत
आवाज मात्र ऐकू येतोय
कानठळ्या बसवणार्‍या
शांततेचा.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

सगळ्या आवाजांची जंत्री वाचून, काकड आरती म्हणावीशी वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

मस्त जमली आहे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बोसचे नवीन नॉईज क्यानसलेशन हेडफोन्स*1 ($५००?)लावल्यामुळे हे सगळे आवाज 'मिस' करतेय लेखिका.
चालायचंच.
पूर्वी वि. आ. बुवांवर उड्या पडायच्या आपलं त्यांचे नवीन ताज्या पिठाचे विनोदी लेख वाचण्यासाठी 'आवाज' दिवाळी अंकावर. सरवट्यांची घडी छाप विनोदी चित्रं - चट्टेरी पट्टेरी अर्ध्या चड्डीत एक पोट सुटलेले ५०+ तात्या आराम खुर्चीत 'आवाज' वाचताहेत. बबलमध्ये ३६-२४-३६ चे चित्र.
सध्याचं चित्र काय असेल?

#1. ठराविक फ्रिक्वन्सी प्याटर्न असलेले आवाजच क्यान्सल होतात हे रिव्यु सांगतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सेन्सरी ओव्हरलोड!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0