राष्ट्रवाद आणि देशभक्ती - उदयन वाजपेयी

संकल्पना

राष्ट्रवाद आणि देशभक्ती

मूळ लेखक - उदयन वाजपेयी

भाषांतर - सोफिया

देशप्रेम आणि राष्ट्रवाद ह्या दोन संकल्पनांमध्ये एक मूलभूत फरक आहे, एक संकल्पना तत्त्वाशी निगडीत आहे तर दुसरी प्रतिक्रियारूपातच असते; कुठल्या तरी गोष्टीवर दिलेली प्रतिक्रिया. सध्याच्या आधुनिक राष्ट्रांमध्ये ह्या दोन्ही संकल्पना आढळतात. आत्मभान असलेल्या राष्ट्रात देशप्रेमाची ही भावना अदृश्य रूपात पण प्रतिष्ठेची बाब असते आणि पक्की रुजलेली असते. त्या राष्ट्रात राष्ट्रवादाची भावना नक्कीच असते पण देशापेक्षा, देशप्रेमापेक्षा ती आतल्या स्तरावर असते. भारतासारख्या 'पेगन' देशात 'राष्ट्रवाद' ही भावना काही विशिष्ट परिस्थितीत दृश्य स्वरूपात समोर येते.

आपल्याला देशभक्त म्हणून परिचित असलेले महात्मा गांधी आणि रविंद्रनाथ टागोर यांनी वेळोवेळी 'राष्ट्रवाद' ह्या संकल्पनेवर प्रश्न उपस्थित केले होते. रविंद्रनाथ टागोरांनी तर आपली 'चार अध्याय' ही कादंबरी ह्या राष्ट्रवादाबद्दल प्रश्न विचारणं ह्या उद्देशानं लिहिली आहे, असं वाटतं. 'राष्ट्रवाद' ही काही फक्त संज्ञा नसून तिची आधुनिक प्रचितीही आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामागे गेल्या काही शतकांचा रक्तरंजित इतिहास आहे. 'चार अध्याय' ह्या कादंबरीत ह्याच राष्ट्रवादावर तडाखेबंद वादविवाद प्रस्तुत केला आहे.

ह्या कादंबरीत त्यांनी लिहिलेल्या वादविवादांना दोन ठोस ऐतिहासिक संदर्भ होते. पहिला तर अगदी उघडच आहे, त्यावेळी हिटलर आणि मुसोलिनी जर्मनी आणि इटलीतल्या राष्ट्रवादाच्या आड आपापल्या देशांत वाट्टेल तसा हिंसाचार आणि नरसंहार करीत होते. (असल्या राष्ट्रवादाच्या विरोधकांनी ज्यू लोकांच्या हत्याकांडाच्या विरोधात कितीतरी माध्यमांतून हिटलरच्या कृत्याचा तीव्र निषेध नोंदवला आहे. हजारो कादंबऱ्या, चित्रपट, कविता आणि लेखांमधून ह्या अन्यायाला वाचा फोडली आहे. पण त्या विरोधकांनीसुद्धा हिटलरच्या हातून जिप्सी लोकांचा जो संहार झाला त्याबद्दल कुठे लिहिलेले दिसत नाही. त्यांच्या लेखीसुद्धा जिप्सी जमातीला जर्मन राष्ट्रात काहीही स्थान नव्हतं.)

टागोरांच्या कादंबरीतल्या वादविवादांना दुसरा ऐतिहासिक संदर्भ होता, १९२०च्या सुमारास बंगाल आणि भारताच्या इतर काही भागांमध्ये उदयास येत असलेल्या जहाल राष्ट्रवादी स्वतंत्रता आंदोलनाचा! यात सामील असणाऱ्या आंदोलकांसाठी 'सकल' मानवता मूल्य प्रमाणित करणारा भारत हा सर्वोत्तम देश होता. ह्या राष्ट्रवादाच्या छायेत केलेलं कोणतंही हिंसक कृत्य राष्ट्रासाठी केलं असल्यामुळे वैध ठरत होतं. रविंद्रनाथ टागोरांनी राष्ट्रवाद हे सर्वोत्तम मूल्य असण्याबद्दल त्यांच्या कादंबरीत आणि काही इतरही निबंधांतून प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी आपल्या लेखनातून हे मर्म सुचवण्याचा प्रयत्न केला की "जर राष्ट्रवादानं बाकी सगळ्या मानवी मूल्यांचं मोजमाप होणार असेल, तर तो राष्ट्रवाद अनिवार्यपणे मानवी संबंध आणि भावना पोखरायला लागतो".

स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी असणाऱ्या महात्मा गांधी आणि भगतसिंग यांच्यामध्ये ह्या मवाळ आणि जहाल गटांबद्दल झालेला विवाद जर नीट समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्या असं लक्षात येईल की त्या द्वयीचा विवाद त्या दोन गटांच्या कार्यपद्धतीपेक्षा त्या गटांच्या मूल्य व्यवस्थेमध्ये असलेल्या राष्ट्राच्या स्थितीबद्दल होता. जहाल गटाचा सगळ्या मूल्यांचा मापदंड म्हणून राष्ट्र स्थापित करण्याचा विचार होता. दुसऱ्या बाजूनं, महात्मा गांधींच्या मते समस्त मानवजातीसाठी नीतीपूर्ण व्यवहार ( ज्याला ते 'हिंद स्वराज'मध्ये "धर्मांचा धर्म" असं म्हणतात) आचरणात आणणे हाच राष्ट्रवाद आणि इतर मूल्यांचा मापदंड होता. त्यांच्या दृष्टीनं हा 'धर्मांचा धर्म' जर नसेल तर तथाकथित परक्यांची (other) हिंसा योग्य ठरवली जाऊ शकते. आणि जर हे असं एकदा सुरू झालं तर गोष्टी कुठल्याही थराला जातील, त्या थांबणं, थांबवणं शक्य होणार नाही.

गांधीजींना जर्मनी, इटली आणि जपानसारख्या देशांमध्ये प्रत्यक्षपणे आणि युरोप मधील इतर काही देशांमध्ये अप्रत्यक्षपणे व्यवहारात आलेल्या राष्ट्रवादाच्या छायेत वाढीस लागलेल्या व्यापक हिंसाचाराची आणि तऱ्हेतऱ्हेच्या अत्याचारांची जाणीव होती. आज जेव्हा बऱ्याच ठिकाणी महात्मा गांधींना, भगत सिंग किंवा सुभाषचंद्र बोसांच्या तुलनेत हिणकस दाखविण्याचे प्रयत्न केले जातात, तेव्हा दुर्भाग्यानं, ह्या आंदोलनकर्त्यांच्या मूल्यांविषयी विचार करणं त्यांना गरजेचं वाटत नाही. हेच पश्चिम बंगालमधल्या काही मार्क्सवाद्यांनी रविंद्रनाथ टागोर आणि खुदीराम बोस ह्यांच्याविषयी केलं. ते "खुदीराम बोस यांच्या फाशीवर रविंद्रनाथ टागोरांनी काहीही न लिहून एक मोठा अपराध केला आहे", असं वारंवार, अथक म्हणत राहिले. ह्या आरोपाच्या मुळाशीसुद्धा शेवटी राष्ट्रवादाला सर्वोत्तम मूल्य मानणं हाच विचार दडलेला आहे. रविंद्रबाबूंवर आरोप करणाऱ्यांना हे समजलं नाही की, रविंद्रनाथ टागोरांच्या समोर, एका विशिष्ट क्रांतिकारकाच्या नियतीबरोबरच एका देशाच्या नियतीचा प्रश्न उभा होता आणि त्यासाठी त्यांनी ज्या व्यापकतेनं, मुळापासून राष्ट्रवादाचा भ्रम समजून घेतला तसं आधुनिक इतिहासात क्वचितच दिसतं.

विसाव्या शतकात चलनात आलेला 'राष्ट्र' हा शब्द इंग्लिश 'nation' ह्या शब्दाचं भाषांतर आहे. (ह्या शब्दाची उत्पत्ती वेद आणि प्राचीन विद्वतापूर्ण ग्रंथांत शोधणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की त्या ग्रंथांमध्ये आलेल्या राष्ट्र ह्या शब्दाचा अर्थ हा राष्ट्रवाद ह्या शब्दातल्या राष्ट्र ह्या संज्ञेपेक्षा पूर्णतः निराळा आहे. वेदज्ञानशून्य अभ्यासकांसाठी आणि राजकीय नेत्यांसाठी राष्ट्र ह्या शब्दाच्या उत्पत्तीचा संबंध मुद्दाम प्राचीन, विद्वतापूर्ण ग्रंथाशी लावून त्याला मान्यता मिळण्याचा प्रयत्न केला जातो.) 'नेशन'चा अर्थ फक्त भौगोलिक सीमा नाही; त्याचा मूलभूत अर्थ एका भौगोलिक सीमेअंतर्गत राहणारा जनसमुदाय असा आहे. आणि हे स्पष्ट आहे की जनसमुदाय हे एकवचनी एकक असू शकत नाही. एका देशात राहणारा जनसमुदाय हा अनेक संप्रदाय आणि समूहांमध्ये जगत असतो. आणि ह्या सगळ्या समूहांना बांधून ठेवणारे एकमेकांमधल्या संबंधाचे आणि संवादाचे धागे असले तरी ह्या प्रत्येक समूहाचं स्वत:चंच एक वैशिष्टपण असतं. ह्या त्यांच्यामधल्या संबंधांचे धागे आणि त्यांची वैशिष्ट्यं फुलत, पल्लवित होत देशाची संस्कृती समृद्ध होत असते.

कुठल्याही देशप्रेमी व्यक्तीसाठी देशातल्या विविध संस्कृती जेवढ्या समृद्ध तेवढा देश समृद्ध! राष्ट्रवाद ह्या सांस्कृतिक वैविध्यांवर केंद्रित करण्याऐवजी देशाच्या सांस्कृतिक विविधतेला काही सर्वग्राही धारणा किंवा विचारधारांमधे संकुचित करून समस्त देशावर थोपवतो. अशा प्रकारे राष्ट्रवाद सांस्कृतिक विविधता आणि त्या विविधतेचा मूलाधार असलेल्या देशामधल्या विविध संस्कृतींमधल्या संवादाला खीळ घालतो. हे असं होण्यामागचं कारण राष्ट्रवाद आपल्या देशाच्या अस्मितेची व्याख्या, ओळख ही त्या देशात नांदत असलेल्या संस्कृतींच्या संदर्भात व्यक्त करण्याऐवजी दुसऱ्या एखाद्या देशाशी असलेल्या भिन्नतेमुळे किंवा त्या देशाशी असलेल्या शत्रुत्वाच्या संदर्भात व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. यामुळे राष्ट्रवाद देशाच्या परिपूर्ण ओळखीऐवजी त्याची विरोधात्मक ओळख जनमानसावर ठासविण्याचा प्रयत्न करतो. किंवा असं म्हणणं जास्त संयुक्तिक ठरेल, की देशाची विरोधात्मक ओळख हीच देशाची खरी ओळख, आणि तीच ओळख देशाच्या अस्मितेच्या स्वरूपात रुजवली जाण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र देशप्रेमी व्यक्तींकरता ही ओळख देशाच्या टोकाच्या ओळखीनंतर येणारी असते. याचा अर्थ असा की राष्ट्रवादी व्यक्ती आपल्या देशाच्या मूल्यव्यवस्थेच्या संदर्भात इतर देशांबद्दल व्यक्त होण्याऐवजी इतर देशांच्या मूल्य व्यवस्थेच्या संदर्भात स्वत:ला व्यक्त करणं सुरू करते. ही एक विचित्र स्थिती आहे, इथे देश आपली खरी ओळख, अस्मितेचा त्याग करून एक भ्रामक, फसवी ओळख मिळविण्याचा प्रयत्न करतो, आणि ज्या संवादांमुळे देशाची अस्मिता आकार घेते, ते सगळे संवादच या प्रयत्नांमुळे निष्प्राण होतात.

२००० साली मे महिन्यात मी काही आठवड्यांसाठी स्वित्झर्लंडमध्ये जिनिव्हापासून शंभर किलोमीटर अंतरावरील लेविनी नावाच्या एका गावात 'रायटर इन रेसिडन्स' म्हणून होतो. आम्ही सहा लेखक ब्रिटन, अमेरिका, माल्डोव्हा, झेक गणराज्य आणि भारत ह्या पाच देशांतून तिथे एकत्र राहत होतो. दिवसभर आम्ही आपापल्या खोल्यांत बसून आमची कामं झाली की संध्याकाळी सगळे एकत्र जमून गप्पाटप्पा, जेवण करायचो. आमच्या बरोबर माल्डोव्हाचा नाटककार कॉन्स्टेण्टाईन केनूही होता. संध्याकाळी भेटलो की तो आमच्या सगळ्यांशी इंग्रजीतून बोलायचा आणि झेक कवी पीटर काबिशशी मात्र नेहमी रशियन भाषेत.

त्या वेळेपर्यंत माल्डोव्हा आणि झेक गणराज्य सोव्हिएट रशियापासून स्वतंत्र झाले होते. ह्या ऐतिहासिक घटनेनंतरदेखील ह्या दोन लेखकांना रशियन भाषेत संवाद साधावा लागावा, ह्या गोष्टीचं मला आश्चर्य वाटायचं. तीच भाषा त्यांच्यामधली नेहमीची भाषा झाली होती. ज्या भाषेच्या अतिक्रमणामुळे केनू आणि काबिशच्या भाषा जवळपास नष्ट होण्याच्या मार्गावर होत्या आणि त्या कारणामुळे ती भाषा त्या दोघांच्याही घृणेस पात्र होती, त्याच भाषेतून त्यांना बोलावं लागत होते. हा तिथल्या कम्युनिस्ट शासनाच्या छत्रछायेखाली फोफावलेल्या, रशियन राष्ट्रवादाचाच दुष्परिणाम होता, पण ह्या अतिक्रमणामुळे जी हानी झाली ती ह्या दुष्परिणामांपेक्षा कितीतरी अधिक आहे.

मी याबद्दल विचारल्यानंतर कॉन्स्टेण्टाईन केनूनं मला सांगितलं की सोव्हिएट रशियाचे तुकडे झाल्यानंतर आणि माल्डोव्हा स्वतंत्र झाल्यानंतर, माल्डोव्हाची भाषा पुन्हा माल्डोव्हामध्ये प्रचलित व्हायला लागली. पण आता त्यात नव्यानं उदयास आलेल्या राष्ट्रवादाचं विष पेरलं गेलं आहे. आता माल्डोव्हाची भाषा ही सामान्य जनमानसाची, नवनिर्मितीची भाषा न राहता, ती रशियन संस्कृतीच्या विरुद्ध उभी ठाकलेली माल्डोव्हियायी संस्कृतीच्या अस्मितेचं माध्यम झाली. याचा अर्थ असा की जी भाषा सोव्हिएट रशियानं काबीज करण्याआधी माल्डोव्हियायी संस्कृतीची सहजसंवादिनी होती, तीच भाषा आता सोव्हिएट संस्कृतीच्या (जी तोपर्यंत रशियन संस्कृती म्हणून ओळखल्या जाऊ लागली होती) विरोधाच्या विषाने रंजित झाली होती. लातव्हिया, युक्रेन, जॉर्जिया, ताजिकीस्थान वगैरे देशांमध्येही हे असंच झालं होतं.

पंधराव्या शतकापासून तर जवळजवळ दोनशे वर्षांपर्यंत युरोपीय जहाजं अमेरिका खंडावर जात होती. त्या दोनशे वर्षांमध्ये त्यांनी तिथे आपापल्या राष्ट्रांची स्थापना करण्यासाठी त्या खंडावरच्या मूळच्या रहिवाशांची मोठ्या संख्येनं हत्या केली. एका अभ्यासानुसार, युरोपीय जेत्यांनी ह्या दोनशे वर्षांत मारलेल्या अमेरिकतील मूळ रहिवाशांची (इंडियन) संख्या त्याकाळच्या युरोपच्या एकूण लोकसंख्येएवढी होती. राष्ट्रवादानं राष्ट्रच नष्ट केल्याचे हे आणखी एक उदाहरण पण हे दुसऱ्या बाजूचं.

राष्ट्रवाद ह्या संकल्पनेची निर्मिती युद्धाच्या संदर्भातच केली जाते. म्हणजे ही संकल्पना एक निर्मिती आहे आणि त्याचे काही ऐतिहासिक संदर्भ असे आहेत : जेव्हा हिटलरनं जर्मनीला अवघ्या युरोपाच्या विरुद्ध फितवून युद्धासाठी तयार केलं होतं, राष्ट्रवाद हा शब्द जर्मनीमध्ये अत्यंत लोकप्रिय झाला होता. असंच काहीसं अमेरिकेने स्वत:ला व्हिएतनाम किंवा कोरिया किंवा अफगाणिस्थान यांच्या विरुद्ध, आणि सोव्हिएट रशियानं स्वत:ला सर्व तथाकथित भांडवलशाही जगाविरुद्ध तयार केलं होतं. सध्या उत्तर कोरिया अमेरिकेच्या विरुद्ध तेच करत आहे.

अशा तऱ्हेनं राष्ट्रवाद हा एक विरोधात्मक संकल्पना आहे, हे दिसून येतं. याचा उपयोग देशाला त्याची खरी आणि परिपूर्ण ओळख तयार करण्याजागी किंवा समजून देण्याऐवजी शत्रुदेशाच्या संदर्भाने पटवून दिली जाते. ह्या तऱ्हेनं देशाला पटवून देण्याची पुढची पायरी म्हणजे सरळसरळ युद्धाची तयारी. आणि मग युद्ध!! राष्ट्रवाद हा शब्द जनमानसावर थोपवल्यामुळे देशाचं सामान्य जनजीवन तणावपूर्ण होतं आणि सामान्य नागरिक ह्या तणावाचं कारण शत्रुदेश हेच समजू लागतो. यामुळे देशाचे रोजचे व्यवहारसुद्धा हळूहळू अडचणीचे होऊ लागतात.

जनमानसातील शत्रुदेशांबद्दल वाढत असलेला ताणतणाव तिथेच थांबत नाही; तो तणाव पुढे पसरून सामान्य नागरिकांच्या रोजच्या आयुष्यात प्रवेश करायला लागतो आणि मग देशातल्या प्रत्येक भागातल्या संस्कृतीला तिच्यावर आलेल्या कोणत्याही प्रकारच्या संकटाचं कारण हे आपल्याच देशातल्या इतर संस्कृती किंवा इतर नागरिकांमध्ये दिसायला लागतं. अशा तऱ्हेनं देशातल्या संस्कृती आणि स्मृती ह्या एकांगी होऊन त्यांतली तरलता लोप पावायला लागते. भाषा आणि कला, नीती आणि मर्यादा आपापली वैशिष्ट्यं हरवून जणू काही स्वत:चं अस्तित्व गमावून बसतात. शतकानुशतकांच्या काळात निर्माण झालेल्या असंख्य कल्पना आणि स्मृतींच्या आधारानं आलेली तरलता हळूहळू रोजच्या व्यवहारातून वजा व्हायला लागते आणि मग देश आपली सांस्कृतिक समृद्धी गमवायला लागतो. याचा अर्थ असा आहे की, त्या देशाच्या हजारो वर्षांच्या जीवनानुभवाच्या संचिताचा प्राण घेण्यास राष्ट्रवाद व त्यातून निर्माण झालेला तणाव कारणीभूत ठरतो.

राष्ट्रवाद शून्यातून उभा राहू शकत नाही. काही वेळेला परिस्थितीच अशी असते की ज्यामुळे राष्ट्रवादाची भावना भरभराटीला लागते. कमीतकमी भारतात राष्ट्रवाद फोफावला यामागचं कारण आपण आधुनिकतेचा डोळे मिटून केलेला स्वीकार आणि तसाच डोळे मिटून केलेला आपल्या पारंपारिक दृष्टीकोनांचा तेवढाच तिरस्कार. स्वातंत्र्यानंतर आमच्या शिक्षणसंस्थांकडून एक साधी अपेक्षा होती की त्या संस्था आपली पारंपारिक जीवनदृष्टी, जी ब्रिटिश शासनानं अंधाऱ्या कोपऱ्यात ढकलून दिली होती, ती पुनर्जीवीत करण्याचा प्रयत्न करतील. आणि ती दृष्टी आमच्या शिक्षणसंस्थांनी तिरस्कृत केलेल्या इथल्या संस्कृतीच्या ज्ञान परंपरांचा शोध घेऊन त्यांना पुन्हा संस्थांमध्ये स्थान देतील. दुर्दैवानं हे ना आमच्या शिक्षणसंस्थांमध्ये झालं ना कुठल्या बौद्धिक चर्चासत्रांमध्ये!

आपण हळूहळू आपल्या दैनंदिन आयुष्यापासून फारकत घेत असलेल्या आपल्या संस्कृतीच्या बौद्धिक विचार-चर्चांमध्ये सामील होऊ लागलो. आपले पारंपारिक विचार-चर्चा आधुनिक, पाश्चिमात्य बौद्धिक विचारांची बरोबरी करू शकण्याच्या योग्यतेचे नाहीत, हे आपण स्वीकारलं. आपण आधुनिक शिक्षण संस्थांमधून पारंपरिक विचार-चर्चा दूर लोटण्याचं इंग्रजांचं कार्य पुढे नेत होतो, याचा आपल्याला विसर पडला. हेच पारंपरिक विचार-चर्चा आपली तीव्रता, खोली आणि आपलं सत्य हरवून, दयनीय अवस्थेत आपल्या आयुष्यात मागच्या दारानं येऊन आपल्या अभिसरणावर सावली पाडत आहेत. आणि इथूनच राष्ट्रवादाचं मूळ धरायला सुरुवात होऊ शकते.

वेगळ्या शब्दांत सांगायचं झालं तर, आपल्या देशात राष्ट्रवादाचा विचार शक्तिशाली होण्याचं कारण आपल्याला आपल्या शिक्षणपद्धतीत आणि स्वातंत्र्यानंतरच्या बुद्धिवादी अभिसरणामध्ये शोधावं लागेल. आपल्या बुद्धिवाद्यांनी ज्या पारंपरिक अभिसरणाच्या ज्या गोष्टींची यथेच्छ निंदा केली होती, तेच राष्ट्रवादाच्या विचारात त्यांच्या व्यापक आणि उथळ स्वरूपात प्रगट झाले आहेत. जर आपले बुद्धिवादी आजही स्वत:ला प्रश्न न विचारता फक्त काही नीतींचे किंवा लोकांचे राक्षसीकरण करत राहिले, (जसे सध्याचे, स्वत:ला डावे बुद्धिवंत समजणारे बहुतेक लोक करत आहेत) तर राष्ट्रवादाची चर्चा आणि भावना सातत्यानं बलवान होत राहणार.

देशप्रेम किंवा देशभक्ती ही तात्त्विक असते, प्रतिक्रियात्मक नाही. त्यासाठी इतर कुठल्याही देशाचा द्वेष करणं अनिवार्य नसतं. देशप्रेमी एका वेळेस अनेक देशांशी संबंध राखूनही आपली देशभक्ती निभावू शकतात, आपल्या देशांच्या प्रति आपल्या धर्माचं पालन करू शकतात. जसं महात्मा गांधींनी आपल्या देशासाठी आजन्म केलं होतं. त्यांचं योगदान भारताला ब्रिटिशांच्या शासनापासून मुक्त करणं एवढंच नव्हतं, (त्यांंच्या ह्या योगदानाला कमी लेखण्याचे यथेच्छ प्रयत्न पहिल्यांदा डाव्या पक्षांनी केले आणि आता उजवे पक्ष करत आहेत); तर त्यांनी ह्या संस्कृतीला, सभ्यतेला तिच्या वैशिष्ट्यांसकट, बारकाव्यांसकट, मुळापासून समजून घेऊन, तिचं चैतन्य जनमानसामध्ये आणि नागरिकांमध्ये जागवलं. त्यासाठी अंतर्मुख होऊन त्यांनी स्वत:ची कठोर समीक्षा करण्यासाठी प्रवृत्त केलं. पण आपण त्या मार्गावर स्वातंत्र्यप्राप्तीनंतर फार काळ मार्गक्रमणा करू शकलो नाही. म्हणून तो मार्गच बंद झाला आहे असं नाही. त्या मार्गावर चालत राहूनच फक्त नारेबाजीऐवजी काही ठोस विचारांनी आणि समजुतीनं राष्ट्रवादाबद्दल प्रश्न विचारता येऊ शकतात.

संपादकीय नोंद : उदयन वाजपेयी ज्या पारंपरिक विचार-चर्चांबद्दल लिहितात, त्याचं एक उदाहरण म्हणून त्यांचाच लेख बघता येईल, Image of Reality and Reality of Image

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

प्रतिक्रिया

>>राक्षसीकरण >> demonization
>>>>>>>>कुठल्याही देशप्रेमी व्यक्तीसाठी देशातल्या विविध संस्कृती जेवढ्या समृद्ध तेवढा देश समृद्ध! राष्ट्रवाद ह्या सांस्कृतिक वैविध्यांवर केंद्रित करण्याऐवजी देशाच्या सांस्कृतिक विविधतेला काही सर्वग्राही धारणा किंवा विचारधारांमधे संकुचित करून समस्त देशावर थोपवतो. अशा प्रकारे राष्ट्रवाद सांस्कृतिक विविधता आणि त्या विविधतेचा मूलाधार असलेल्या देशामधल्या विविध संस्कृतींमधल्या संवादाला खीळ घालतो. >>>>>>>>>>>>>
बाप रे!!! खरे आहे हे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उत्तम गोळीबंद लेख आहे.
जबरदस्त.
१. राष्ट्रवाद हा प्रतिक्रियात्मक आहे.
२. स्वातंत्र्यानंतरही स्वदेशी विचार, शिक्षण आणि भारतीय असं काही शोधण्यात आपण कमी पडलो. युरोपिअन संकल्पना इथे आणून तशाच राबवल्याने आपलं असं काही उरलं नाही. त्यामुळे 'राष्ट्रवाद' फोफावू शकतो.
३. " आपल्या बुद्धिवाद्यांनी ज्या पारंपरिक अभिसरणाच्या ज्या गोष्टींची यथेच्छ निंदा केली होती, तेच राष्ट्रवादाच्या विचारात त्यांच्या व्यापक आणि उथळ स्वरूपात प्रगट झाले आहेत."
इतकी वर्षं पारंपारिक (चांगल्या आणि वाईटाची) केवळ टाकाऊ असं म्हणून त्याला झिडकारल्याने आता ती बाजू उलटली आहे.
फक्त फरक एवढाच की खास भारतीय असं काही मांडू शकणारं कुणी नसल्याने हा विरोध आता थिल्लर गोष्टीतून मांडला जातो.
उदा. भारतीय परंपराच कशा चांगल्या, आमचे पूर्वज इ.इ.

४.
जर आपले बुद्धिवादी आजही स्वत:ला प्रश्न न विचारता फक्त काही नीतींचे किंवा लोकांचे राक्षसीकरण करत राहिले, (जसे सध्याचे, स्वत:ला डावे बुद्धिवंत समजणारे बहुतेक लोक करत आहेत) तर राष्ट्रवादाची चर्चा आणि भावना सातत्यानं बलवान होत राहणार.

+१.
सध्याची "पुरोगामी" हिणवणारी जी वृत्ती आहे तिचं मूळ ३ आणि ४ ह्यात शोधावं लागेल.

माझ्यातर्फे अंकातल बेस्ट लेख.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0