राष्ट्रवादावर भिकाजी जोशी (आधारित)

संकल्पना

राष्ट्रवादावर भिकाजी जोशी

जॉर्ज ऑरवेलच्या Notes on Nationalismवर आधारित; संपादन - ओ. दाग

रूपांतर - आदूबाळ

बेंबट्या, शिंच्या कह्णावयास काय झालें? केंस पिकले पण अद्याप आयडीनास घाबरणे गेले नाही तुझे. झोंबेल जराशीक आणि मग बरें वाटेल. काय? हां - आता सांग, कशाला बोंबलावयास गेला होतास त्या मल्टिप्रेक्ष्यात? म्हातारा झालास, गुडघी रोग झाला तुला, आतां चट्कन जागचे उठता येत नाही तुला. थेटरांतल्या राष्ट्रगीतांस कसा उभा राहणार होतास? खाल्लास ना मार?

आं? काय म्हणतोस? गुडघी रोग हे कारण नव्हें? मग? कांय? तूच तोंड सोडलेस? कां?

तुला शिकवलेली देशभक्ती ही असली नव्हे? शुंभा, तुला कोणी सांगितले ही देशभक्ती आहे म्हणून? देशभक्ती निराळी आणि राष्ट्रवाद निराळा. देशभक्तीत आपणांस आपला देश आवडतो. त्यांतले लोक आवडतात, सौंस्कृती की काय ती आवडते. प्रेम असतं रे आपल्या गोष्टींवर. बेंबट्या, लक्षात घे - प्रेम. अभिमान नव्हें! गर्व तर नव्हेच नव्हे. स्वकर्तृत्वावर कमावतों त्याचा अभिमान धरायचा. आपोआप मिळतें त्यांवर प्रेम असणे ठीक, अभिमान कशाचा? आयुष्यभर मी शेंडी ठेवली. सप्ताहातून दोनदां न चुकता तींस तेल लावले. शेंडीवर माझे प्रेम होते, पण शेंडीचा अभिमान धरून मी चळवळ करावी का गवालिया ट्यांकात?

पण दुसऱ्यास पाण्यात पाहणे ही देशभक्ती नव्हे. हा तो राष्ट्रवाद. एकावर प्रेम करतो म्हणून दुसऱ्याचा द्वेष करणे. जें आपलें नाही त्यावर आपली सत्ता असावी अशी हाव वाटणे. तुझा विश्वंभरकाका घे - आयुष्यभर आपल्या आगराची हाव धरून बसला, वशाडी येवो त्यांस. पण विश्वंभर काकाचे उदाहरण चुकले हो. विश्व्या फोकलीचा आप्पलपोटा, पण किमान स्वत:च्या फायद्यासाठी तरी करत होता. राष्ट्रवादात स्वत:साठी काही नको असतं, तर 'माझें राष्ट्र' यामध्ये जे जे येतं त्यासाठी हवं असतं. माणूस माणूस राहात नाही, राष्ट्राची पताका घेतलेला 'सैनिक' होतो. मग कसला बेंबट्या, कसला भिकाजी, आणि कोणता विश्वंभर?

भोपळ्या, राष्ट्र म्हणतांच शंकऱ्याचे भूगोलाचे पुस्तक शोधू नकोस हो. झोपला असलास तरी मनातला प्रश्न कळतो मला. म्हणतोयस “तीर्थरूप, कोणतें राष्ट्र? आपलें एक तर राष्ट्र आहें.” शुंभा, म्हणून लहानपणी तुला सभांस पाठवत असे. अरे प्रत्येकाचे राष्ट्र वेगळे. खानेसुमारींत आपल्याला प्रश्न विचारतात बघ. तुमची मातृभाषा कोणती, धर्म कोणता, जात कोणती. सगळी ही राष्ट्रंच आहेत, बेंबट्या. पुस्तकच बघायचें तर भूगोलाऐवजी जीवशास्त्राचे बघ. त्यात कशा किड्यामुंग्यांच्या जाती पाडलेल्या असतात? तसे कप्पे पाडता येऊ शकेलशी वस्तू म्हणजे 'राष्ट्र'.

हे राष्ट्रवादांत न्हालेले लोक मजेशीर असतात, बेंबट्या. कोपऱ्यात उभे राहून त्यांची गंमत पाहावी. अरे, सबळाच्या पक्षात जाणं हा जगाचा नियम. पण यांची वेगळीच तऱ्हा. हे सबळांच्या पक्षात जात नाहीत, तर आपण एखाद्या पक्षात गेलोय म्हणून तोच पक्ष सबळ आहे अशी श्रद्धा ठेवून असतात. सांगून ऐकत नाहीत. पुरावे द्या नाहीतर साक्षी द्या. हायकोडताने सांगितलें तरी फरक नाही. राष्ट्रवाद जहाल ठर्रा आहे बेंबट्या. सत्तेच्या हावेचा काळा गूळ घालतात, नि वर आत्मवंचनेचा नवसागर मारतात. कडक काम.

काय म्हणालास? कसें ओळखायचें असे लोक? अरें लपता लपत नाहीत गळवें. आपल्या राष्ट्रवादाचं प्रदर्शन केल्याशिवाय चैन नाही पडत त्यांस. तोंडाने बोलावयास पाहिजे असें नाही. कपडे, दुचाक्या, चारचाक्या, घराची सजावट, सगळें नीट पहा. शिवाय हल्लीं तुमचें काय ते फेसबुक आणि इन्ष्टाग्र्याम की काय ते पहा. लघवीस गेला की हळूंच त्याचें व्हॉट्सॲप ग्रुप चेक कर. एकेकाचें राष्ट्र प्रदर्शनांत मांडलेले असतें - देश, जात, पोटजात, धर्म, गुरू, पंथ, गांव, शहर, भाषा, शाळा. छाती पिटून पिटून महती सांगतील. सगळ्या जगाचें शाहाणपण, साजिरेंपण, गोजिरेंपण, शुचिता यांच्याच राष्ट्रांत तडफडलेल्या असतात. यांची कला श्रेष्ठ, यांचे ग्रंथ थोर, यांचे खेळ मर्दानी, यांची भाषा जगात सर्वात चांगली. यांचे जेवण पौष्टिक, आणि म्हणून यांचा वंश जगात आदर्श. पुरुष मदनाचें पुतळें आणि स्त्रिया लावण्याच्या खाणीं. हें सगळें कसे सांभाळायचे, तर प्रतीकांची पूजा बांधून. ध्वज अमका असाच फडकवा, माणसाला दिलेली पद-पदवी अमक्याच पद्धतीने म्हणा. वस्तूंची, ठिकाणांची, माणसांची नावें बदला. लेबलांत सगळं आहे रे, बेंबट्या. राष्ट्रवादात तर फारच.

यापैकी काहीतरी नीट झालं नाही तर घोर अपमान होतो. म्हणून तू मार खाल्लास आज, बेंबट्या.

इकडे तिकडे काय पाहतोस, बेंबट्या. बघतांय हां मी. भोवतालच्या सत्यपरिस्थितीचा आणि राष्ट्रवादाचा काय संबंध? अरे सत्य म्हणजे तरी काय शेवटी? या लोकांची वास्तवाशी असलेली नाळ तुटून गेलेली असते रे. आसपास जे घडतंय त्याचा अर्थ आपल्या राष्ट्रवादाला अनुसरून लावतात हे लोक. काय केलांय, यापेक्षा कोणी केलांय याला जास्त महत्त्व. आपला तो बाळ्या. समोरच्याने जीव घेतला तर 'नरपशूने केलेला निर्घृण खून'; पण आपल्या बाळ्याने केला तर 'राष्ट्रवेदीवर दिलेला नरबळी'. समोरचा 'गावगुंड' असतो, आपला बाळ्या 'भगतसिंग' असतो. राष्ट्रवादाची कवचकुंडलं फार टणक, बेंबट्या. आणि त्यातून आपल्या बाळ्याने काही फारच वाईटसाईट केलं, तर त्या बातम्यांना खोटं मानायचं असतं. 'फेक न्यूज' की काय म्हणतात ते.

बेंबट्या, ऐक. पूर्वी सभेस पिशवी घेऊन जायचास चप्पल ठेवायला. तेवढे पुरें होते. आता घराबाहेर जाशील तेव्हा कोणाला 'की जय' म्हणायचं, कोणाला 'झिंदाबाद' हे नीट पाहून ठेव. चार माणसे वागतात तसें वागावें हा उपदेश तूंस तेव्हाही देत होतो. त्यानंतर अकलेचे कोंभ उगवले असतील तर खुडून टाक. लोकांची गळवे बघायला ठीक, फोडायला जाऊं नकोस.

मार पडलाय त्या जागी अन्नपूर्णेकडून तेल लावून घे.

नव्वदीला टेकलेल्या धोंडो भिकाजी जोशींच्या थोतरीत खरंच कोणी ठेवून दिली का, आणि त्याचं कारण काय यावर खात्रीलायक माहिती उपलब्ध नाही. एवढं मात्र नक्की, की ते एक सिनेमा बघून परत आले तेव्हा अत्यंत क्षुब्ध होते. सडकून ताप भरला होता, आणि तापात बरळत होते. चि० आशुता उल्हास जोशी या त्यांच्या नातीने त्यांची तापातली बडबड रेकॉर्ड केली. स्वप्नात त्यांचे वडील आले असावेत, आणि त्यांनी जोरदार लेक्चर झोडलं असावं असा कयास आहे. स्वप्नातली मतं जॉर्ज ऑरवेलच्या 'नोट्स ऑन नॅशनलिझम' या लघुनिबंधाशी मिळतीजुळती आहेत असं चि० आशुताचे राज्यशास्त्राचे प्राध्यापक श्री० अंगद वऱ्हाडपांडे कळवतात.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (4 votes)

प्रतिक्रिया

अफलातून.
मजेदार कल्पना! सोप्या भाषेत आणि रंजक पद्धतीने सांगितलेल्या राष्ट्रवादावरच्या टीपण्या आवडल्या

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कल्पना आवडली !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

क्या बात है!!! सोप्या शब्दात राष्ट्रवाद शिकवलात आबा. धन्य आहात. खूप आवडला हा लेख. विचार करण्यास उद्युक्त करतो पण हसत हसवत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हिसका झकास. चिंचेचा फोक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(तूर्तास, ही निव्वळ पोच. सविस्तर टिप्पण्या जमल्यास पुढेमागे कधीतरी लिहिता येतील. असो.)

----------

हे सबळांच्या पक्षात जात नाहीत, तर आपण एखाद्या पक्षात गेलोय म्हणून तोच पक्ष सबळ आहे अशी श्रद्धा ठेवून असतात.

क्या बात है|

"Patriotism is, fundamentally, a conviction that a particular country is the best in the world because you were born in it." - George Bernard Shaw.

पण, पण, पण... शॉसाहेब तर हे देशभक्तीबद्दल बोलून गेला होता, राष्ट्रवादाबद्दल नव्हे! असो.

राष्ट्रवाद जहाल ठर्रा आहे बेंबट्या. सत्तेच्या हावेचा काळा गूळ घालतात, नि वर आत्मवंचनेचा नवसागर मारतात. कडक काम.

उपमा छान आहे, परंतु... भिकाजीपंतांच्या तोंडी औटॉफ्प्लेस वाटते.

ठर्रा (ही संकल्पनाच नव्हे, तर हा विशिष्ट शब्दसुद्धा), काळा गूळ, नवसागर, झालेच तर हे काँबिनेशन, वगैरे भानगडींशी भिकाजीपंत वाक़िफ़ असण्याची शक्यता अंमळ धूसर वाटते.

समोरचा 'गावगुंड' असतो, आपला बाळ्या 'भगतसिंग' असतो.

भावनेशी सहमत आहे, परंतु... आता 'आपले' गावगुंड तुम्हाला धरून ठोकणार बघा.

असो. बाकी (जमल्यास) पुन्हा कधीतरी.

==========

हातभट्टी, गावठी, किंवा अगदी देशीसुद्धा म्हटले असतेत, तर, सेम डिफरन्स, परंतु भिकाजीपंतांना ते शब्द निदान ऐकून तरी माहीत असण्याची शक्यता थोडी अधिक होती. पण ठर्रा??? भिकाजीपंतांनी कोंकणाबाहेर यदाकदाचित चुकून पाऊल ठेवले असलेच, तरी त्यांची मजल उत्तर हिंदुस्थानापर्यंत गेली असेल, असे वाटत नाही. (चूभूद्याघ्या.) त्यांची धाव मुंबईपर्यंतच!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आबा, कल्पना आणि अंमलबजावणी दोन्ही एक नंबर.

अवांतर - 'न'बा, तुमची जागा कुठे आहे हे तुम्ही मान्य करींत नाहीं. अंमळ संपादनात मदत करायला पाहिजे तुम्ही!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

धोंडोपंत आपले ओझ्याचे बैल हो. त्यांना आज कुणी "जय श्रीराम" म्हणायला सांगितलं तर ते "जय श्रीराम" म्हणणार.
उद्या जर का "अल्ला हु अकबर" जी गर्जना द्यायला सांगितलीत तर तसं म्हणतील.
शेवटी चार माणसं जसं वागतात तसं वागण्यात धोडोपंतांचं आयुष्य जाणार.
फारफार तर ते मनातल्या मनात निषेधाचे शब्द पुटपुटतील, पण ओशाळलेल्या नजरेने लगेच म्हणून जातील- "हॅ हॅ, तसं काही नाही हो. सर्वधर्म सारखेच असं म्हटलंच आहे... तेव्हा...."
.
.

त्या मानाने भिकाजीपंत कडमडेकर जोशी तसे खमके. क्यारेक्टर असलेले. त्यांना कुणी जर उगाच "जय श्रीराम म्हणा" असं सांगायला गेला तर ते वर "अरे आमचा देव कोकणात, काय समजलेंत? तिथे अयोध्येच्या नावावर कुणी एयरकंडिशन रथात बसून आरडलेत म्हणून तुम्हीही इथे बोंबा मारून काय उपयोग?"
.
.
असो! शेवटी भिकाजीपंत म्हणून गेलेच आहेत -
"जगात कुंभार थोडे गाढवेच फार....................................."

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक3
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भिकाजीपंत "होळीत बोंब आणि तीर्थात मुंडण केलेच पाहिजेत म्हणतात की"

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

बरोबर! भिकाजी जोशींचा हुतात्मा होण्यावर विश्वास नसावा. म्हणून इथेही ते "चार माणसे वागतात तसें वागावें हा उपदेश तूंस तेव्हाही देत होतो. त्यानंतर अकलेचे कोंभ उगवले असतील तर खुडून टाक. लोकांची गळवे बघायला ठीक, फोडायला जाऊं नकोस." असंच सांगतात.

अवांतर : "कोडतात भांडण आणि तीर्थात मुंडण"

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

बरोबर. म्हणूनच मला ऑरवेल वदवायला हे पात्र योग्य वाटलं. प्रभातफेरी काढणाऱ्यांना "तुमच्या लेंग्याचा आणि पंचाचा सायबाच्या प्यांटीवर काही परिणाम होणार नाही" हे कोकणी तिरकसपणे सांगणे, पाल्हाळ लावणाऱ्या नटाला "त्या सुभद्रेचे लग्न होऊन तीस पोरदेखील झाले असेल" असं भर थेटरमध्ये ओरडून सांगणारे भिकाजी जोशी डझ नॉट सफर फूल्स ग्लॅडली.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

असा आणखी एक कोकणी म्हणजे अंतू बर्वा.
जॉर्ज ऑर्वेल सारखं अनंत बर्वे Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आबा, नंदा खऱ्यांचा अंताजी काय लिहेल, अशा पद्धतीचं काही पुढेमागे लिहिण्याचा विचार कराल का?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.