'एकाच आईबापाची, एकाच रक्ताची मुलं...' - सुभद्रा बुटालिया (भाग २)

संकल्पना

'एकाच आईबापाची, एकाच रक्ताची मुलं...' - सुभद्रा बुटालिया (भाग २)

मूळ लेखिका - उर्वशी बुटालिया

- भाषांतर नारायण आवटी

उर्वशी बुटालिया सुभद्रा

उर्वशी बुटालिया यांनी सुमारे दहा वर्षे परिश्रम करून या पुस्तकासाठी संशोधन केले आहे. फाळणीचा एक चालताबोलता इतिहास त्यांनी पुस्तकातून मांडला आहे. या इतिहासात लेखिकेने सामान्य माणसालाच स्थान दिले आहे. फाळणीची झळ सोसलेल्या सामान्य माणसाच्या व्यथा आणि यातना पुस्तकात केंद्रस्थानी आहेत. पुस्तकातील 'एकाच आईबापाची, एकाच रक्ताची मुलं...' हे प्रकरण 'ऐसी अक्षरे' दिवाळी अंकासाठी निवडले आहे.

सुभद्रा बुटालिया ही माझी आई. मी राणामामाला भेटून आल्यानंतर आणि माझ्या आईलाही तिच्या माहेरी नेऊन आणल्यानंतर (म्हणजेच लाहोरला जाऊन आल्यानंतर) आम्ही राणामामा व फाळणीच्या संदर्भात थोडंबहुत बोलू लागलो. मला नंतर समजलं, की आपण फाळणीविषयी, लाहोरविषयी जुन्या घराविषयी, आजी-आजोबांविषयी जे काही सतत ऐकत होतो, त्यांपैकी फार थोड्या गोष्टी आमच्या लक्षात राहिल्या होत्या. माझ्या मामानं पत्रं लिहायला सुरुवात केली आणि माझी आई पुन्हा लाहोरला गेली. तेव्हा माझ्या मनाला उत्सुकता लागून राहिली, ती म्हणजे लाहोरला गेल्यानंतर आपल्या भावाला बघून माझ्या आईला काय वाटलं असेल?लाहोरला जाण्याची मलाच जर इतकी ओढ लागली होती, तर तिच्या मनाची अवस्था काय झाली असेल? नंतर काही वर्षं तरी मी तिला, हळूहळू का होईना, पण बोलतं करीत होते. शेवटी तिचे जे अनुभव होते, ते सांगायला मी तिला प्रवृत्त केलं. आणि पुन्हा मी माझ्या मनाच्या द्विधा अवस्थेत विचार करू लागले. पुन्हा विरोधाभास, शंका, कुशंका... माझ्या आई-वडिलांच्या पिढीतले लोक फाळणीविषयीच्या गोष्टी, आठवणी नेहमीच सांगत असतात. त्यांच्या मनांत खूप काही साठलेलं असतं. त्यांच्या आयुष्याबद्दल, गतकाळाबद्दल त्यांच्याकडून बरंच काही ऐकायला मिळतं. परंतु तुम्ही जर त्यांच्या मुलाखती घ्यायला गेलात, तर अशी माणसं काहीच सांगायला तयार नसतात. मी या गोष्टीवर खूप चिंतन केलं. शेवटी मी त्यातून माझं अनुमान काढलं, की अशी माणसं त्यांच्या मनांत बरंच काही सांगायचं असलं, तरी अशी माणसं अनुभव सांगताना फार सावध, चिंताग्रस्त असतात. कारण स्वतःच ती माणसं अनुभवांत गुरफटलेली, गुंतलेली असतात. त्यातलं सत्य पडताळून बघतात. म्हणून ही माणसं सहसा मुलाखत द्यायला तयार नसतात. पण एकजात असं अनुमान काढता येत नाही. माझ्या आईबद्दलच सांगायचं झालं, तर तिच्या हृदयातली जखम, आघात इतके खोलवर होते की, त्यांविषयी काही बोलणं कठीणच! आणि मी तर तिची मुलगी; म्हणून तर फारच कठीण! कदाचित तिथं एखादा अनोळखी माणूस यशस्वी झाला असता. पण मी अयशस्वी झाले. एका मुद्द्यावर बोलायचं झालं, तर म्हणजे मी तिला विचारलं होतं की
'तू तुझ्या आईला लाहोरमध्येच नाइलाजास्तव सोडून इकडं आलीस, त्या वेळी तुला काय वाटलं?' तेव्हा ती म्हणाली की,
'आपल्या आईला सोडून येताना काय यातना होतात, हे कसं सांगता येईल?'

नंतर माझ्या लक्षात आलं, की हा प्रश्‍न विचारण्याआधी आपण योग्य विचार करायला पाहिजे होता. कारण मुलांना कुठं सोडून येताना आई-वडिलांना जे दुःख होतं, यातना होतात, ते सारं आपण समजू शकतो. परंतु याच्या उलट प्रकार जेव्हा घडतो, तेव्हा त्याची दखल फारशी घेतली जात नाही. फाळणीच्या ऐतिहासिक फटकार्‍यात किती आई-वडिलांनी आपल्या मुलांचं बरंवाईट बघितलं असेल, किती मुलं अपघातानं पारखी झाली असतील, या फाळणीच्या रेषेनं कुठं परागंदा झाली असतील, हे समजायला काहीही मार्ग नाही.

मी या मुलाखतीचा अंतर्भाव माझ्या पुस्तकात करण्याचा निर्णय जाणूनबुजून घेतला. त्याचं मुख्य कारण म्हणजे, राणामामाची जी हकीकत आहे, तिची दुसरी बाजू मला वाचकांसमोर ठेवता येईल. त्याशिवाय आमच्या या कुटुंबात जी नीरव शांतता पसरली आहे तिच्यामागचं कारण समजून घेता येईल. आणि मग माझा पुढचा मार्ग सुकर होईल. मी ही कोंडी फोडणार आहे. यातून अनेक प्रश्‍न निर्माण होतील. मी ही कोडी कशी फोडली? दुःखद, यातनामय मौनाला मोकळी वाट कुणी करून दिली? आणि नंतरची, म्हणजे मुलाखती घेऊन त्या प्रसिद्ध झाल्यानंतरची जबाबदारी कोण घेणार? आणि मौन स्वीकारलेल्या लोकांना बोलतं करणं ही सुद्धा एख जबाबदारीच नाही का? माझ्या एका मित्रानं माझ्या या मोहिमेचं वर्णन पुढील शब्दांत केलं आहे.

"अनेक वर्षं शांत राहिल्यानंतर फाळणीचा शोध घेणार्‍या एका स्त्रीनं आपल्या आईला बोलतं केलं. तेव्हा तिच्या आईनं हा निर्णय घेतला. फाळणीच्या आठवणी इतक्या दुःखद, यातनामय होत्या, की तिला रात्र रात्र झोपच येत नव्हती. जी महिला फाळणीचा शोध घेत होती, ती नंतर कुठं दुसरीकडं मुलाखतीसाठी गेली असणार."

तेव्हा जी माणसं आधी मौन पाळून होती आणि नंतर त्यांनी आपलं मन मोकळं केलं, आठवणी सांगितल्या, भावनेला वाट मोकळी करून दिली. हे एक कौतुकच! तेव्हा वर्षानुवर्षांच्या मौनानंतर एकदम मोकळेपणानं बोलणं ही गोष्ट वाटते तितकी सोपी नसते. आता जबाबदारीचाच विचार केला, तर मी अशाच लोकांना आपले अनुभव सांगण्यासाठी प्रवृत्त केलं, की जे मनमोकळं बोलू शकतील व आपण जे काही बोलणार आहोत, त्याची जबाबदारी स्वतःवर घ्यायला तयार होतील. अर्थात माझी ही मुलाखतीची पद्धत योग्य होती का नव्हती, हे मला समजत नव्हतं. आणि समजायला इतर मार्गही नव्हता. परंतु लेखनाची, मुलाखतीची माझी पद्धत सहज, सोपीच होती, असं मला वाटतं.

मी माझ्या आईची मुलाखत घेतली, त्या मुलाखतीला माझ्या दृष्टीनं आणि इतरही कारणानं फार महत्त्व होतं.
माझा मामा माझ्या आईशी फार मोकळेपणानं बोलला, म्हणजे माझ्यापेक्षा. पाकिस्तानात वडिलोपार्जित घर होतं, म्हणून तो तिथं राहिला, हे त्यानं मान्य केलं होतं. आणि ही एक कुटुंबाची, मामाची शोकांतिकाच होती. पारंपरिक घर आणि मामा यांचे संबंध नियतीलाच मान्य नव्हते. कारण ज्या घरासाठी मामा फाळणीच्या उद्रेकातसुद्धा तिथंच राहिला, तेच घर नंतर त्याच्याभोवती एखाद्या जात्यासारखं फिरत राहिलं. मामाच्या मुलांच्या दृष्टिकोनातून पाहिलं, तर त्या घरात राणामामाला काडीचीही किंमत नव्हती. आणि हे राणामामाच्या आधीच लक्षात यायला पाहिजे होतं. हेच ते मामानं सांभाळलेलं घर, ज्या घरानं नंतर मामाची किंमत शून्य केली. एकदा तो आईला म्हणाला होता की,
"मी या घरात परकाच आहे. मुलांना माझी काहीही किंमत वाटत नाही. मी कुणीच नाही. मला झपाटल्यासारखं झालं आहे."

सुभद्रा बुटालिया

१९४६ साली मी नाभामध्ये सरकारी शाळेत नोकरी करत होते. शाळेची इमारत खूप मोठी होती आणि शाळेचं आवारही खूप मोठं होतं. शाळेच्या आसपास झोपडपट्टी होती. त्या झोपडपट्टीत काही वेश्या राहत होत्या. आणि त्याच झोपड्यांमधून काही गरीब मुसलमान राहत होते. शाळेच्या आजूबाजूला मुसलमानांची संख्या जास्त होती. त्याच वेळी एका बाजूला लोक फाळणीबद्दल बोलत होते आणि दुसरीकडं फाळणी होणार आहे की नाही, याची चर्चा चालू होती. लोक शंका व्यक्त करत होते. त्या वेळी आमच्या हायस्कूलची मुख्याध्यापिका रणजित, माझी आई, भाऊ, बहिणी आम्ही सगळे एकत्रच राहत होतो आणि आम्ही सतत भीतीच्या छायेत वावरत होतो. कारण बातम्याच चमत्कारिक पसरत होत्या, की ज्या वेळी फाळणीचा उद्रेक होईल, दंगल सुरू होईल, त्या वेळी आधी मुलींच्या शाळेवर हल्ला होईल. त्या वेळी आमच्या शाळेचा चौकीदार आणि आया हे दोघे मुसलमान होते. तरीसुद्धा आम्ही घाबरलो होतो. असा प्रसंग आलाच, तर आम्ही काय करणार आहोत या विचारानंच आम्ही हैराण झालो होतो. फाळणीची चाहूल लागली, तेव्हा आम्हांला अशा सूचना दिल्या होत्या, की आम्ही सर्वांनी शाळेच्या पटांगणातच झोपायचं. पटांगणात चारी बाजूंना भिंतींचा आडोसा होता आणि रात्री झोपल्यानंतर काही गडबड, गोंधळ, हिंसाचार सुरू झाला, तर लगेच शाळेत पळायचं. शाळेच्या जवळ जो रस्ता होता, त्या रस्त्याच्या पलीकडे एक वेश्या राहत होती. एक दिवस काय झालं, तर सैन्यातील एका जवानाबरोबर तिचं भांडण झालं. तेव्हा त्यानं तिला गोळ्या घालून ठार केलं. रात्रीच्या वेळी दोन गाळ्या झाडून तो पळाला नंतर त्यानं भिंतीवरून उडी मारली आणि स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या आणि आत्महत्या केली. आम्ही खरोखरच घाबरलो आणि आत पळालो. आणि माझी छोटी बहीण मुन्ना, ती तर आत येण्याऐवजी पिसाटल्यासारखी बाहेरच पळाली आणि नाहीशी झाली. आम्ही तर गर्भगळीत झालो. काळजीनं जवळजवळ वेडेच झालो. मुन्ना, मुन्ना, कुठं आहे ती? बाहेर काय गोंधळ चाललाय, हे कुणाला माहीत नव्हतं. रणजित मला बाहेर सोडायला तयार नव्हती. मी तिला म्हणलं की, मी मुलीला एकटीच कशी सोडू? परिस्थिती फार हातघाईवर आलेली. मग मुन्नाला आमचं ओरडणं ऐकू गेलं. ती सापडली आणि आम्ही तिला आत आणलं. दुसरे दिवशी सकाळी आम्हांला समजलं, की त्यात विशेष काही नव्हतं. त्या जवानानं एका बाईला ठार केलं, एवढंच. ज्या वेळी तो सैन्यात दाखल झाला आणि दूर गावी गेला, त्या वेळेपासून तो त्या बाईला पैसे पाठवत होता. जेव्हा तो परत आला, तेव्हा त्यानं त्या वेश्येला, तू माझ्याशी लग्न करशील का, म्हणून विचारलं होतं. तेव्हा ती बाई म्हणाली की, आधी बाहेर जा. तुझ्यासारखे अनेक येतात आणि माझ्या पायांवर लोळण घेतात. असाच काही प्रकार झाला. पण नंतर त्या बाईची म्हणजे वेश्येची आई रात्री बाहेर रडत बसायची. अल्ला, ती अगदी घाबरलेल्या सुरात देवाला हाक मारायची, रडायची. पुरुष माणूस नव्हतं. आम्ही सगळ्याच बायका. मनावर ताण होता तो पराकोटीचा. आणि अशा अवस्थेत मी विचार केला, की आपण हे गाव सोडावं आणि दूर कुठं तरी जावं. आणि मुलांनी विचार केला, की लाहोरला निघून जावं. लाहोरमध्ये काय घडेल, याची आम्हांला माहिती नव्हती. तेव्हा रणजित म्हणाली, "लाहोरला जाऊ नका. तिथली परिस्थिती आणखी वाईट आहे." आणि आम्ही याची चर्चा करीत असता, विचार चालू असतानाच माझा भाऊ तिथं आला, जो लाहोरमध्येच राहत होता. तो म्हणजे राणा. तो म्हणाला की, तिथं फाळणीविषयी बरीच चर्चा चालू आहे. तेव्हा त्याचा विचार होता, की लाहोरमधलं घर विकून टाकायचं.

मला राणाविषयी थोडं सांगायचं आहे. आमच्या आई-वडिलांची एकूण नऊ मुलं. त्यांपैकी राणा हा सहावा. जेव्हा माझे वडील वारले, तेव्हा त्यांनी आमच्यासाठी चांगलीच तरतूद करून ठेवली होती. भविष्यात आम्हांला काही कमी पडू नये म्हणून. घराची वास्तू मोठी होती. तोच एक आधार होता. वडील गेल्यानंतर आमच्या सांत्वनासाठी जे नातेवाईक येत, ते म्हणत, की घरातल्या माणसांना काही एक कमी पडणार नाही. कुणाला काही मागावं लागणार नाही. परंतु आमच्या नशिबात काही तरी दुसरंच होतं. आमच्या कुटुंबात एकुलता एक हुशार होता, तो म्हणजे विक्रम. माझा सर्वांत मोठा भाऊ. त्याला कॉलेजमध्ये जायचं नव्हतं. त्यानं उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यासाठी त्यानं आईकडून पैसे घेतले होते. परंतु त्याचा उद्योगधंदा काही चालला नाही. धंद्यातल्या नुकसानीची अजून तरी फारशी झळ लागली नव्हती. नंतर विक्रमनं रॉयल एअर फोर्समध्ये नोकरी पत्करली; आणि ज्या वेळी त्यानं नोकरीतल्या नेमणुकीचं घरी पत्र आणलं, त्याच वेळी तो एका सुंदर, मुसलमान मुलीला घरी घेऊन आला. तिचं नांव होतं 'अमीना'. त्यानं सांगितलं, की त्याला पहिला पगार हातात पडला, की तो तिच्याशी लग्न करणार आहे. पण तसं काही घडायचं नव्हतं. ज्या दिवशी विक्रम आपला पहिला पगार आणण्यासाठी म्हणून त्या ऑफिसमध्ये गेला तेव्हा ऑफिस अजून उघडलं नव्हतं. तेव्हा त्यानं ठरवलं, की त्याचं जे छोटं विमान होतं, ते घ्यायचं आणि हवेत एक रपेट मारायची. परंतु त्यानं ते विमान कुठल्यातरी विजेच्या तारेवर धडकवलं आणि तो आपले प्राण गमावून बसला. विक्रमच्या मृत्यूमुळं राणाच्या आयुष्यावर बराच परिणाम झाला. त्याला आणखीही कारण होतं. आमचे एक काका होते. ते लाहोर हायकोर्टाचे न्यायाधीश होते. त्यांनी हुकूम काढला, की राणाला खेड्यात पाठवायचं. तेव्हा वयाच्या बारव्या-तेराव्या वर्षीच राणाला शाळेतून काढलं आणि त्याला परागपूरला पाठवलं. राणाला ते आवडलं नाही. त्याच्या मनात तिरस्कार निर्माण झाला. त्यानं एक दिवस घरी पत्र पाठवलं, ते असं, "इथं मला माझ्या बिछान्यावरच्या चादरी धुवायला लागतात. मला इथं राहायचं नाही. तुम्ही जर मला परत बोलावणार नसाल, तर मी कुठं तरी पळून जाईन." आणि नंतर लवकरच आम्ही ऐकलं, की तो नाहीसा झालाय. आम्हांला काय करावं, हेच सुचेना. त्याला कुठं आणि कसा हुडकायचा. अशा वेळी माझ्या आईला फेफरं येण्याचा विकार जडला. माझ्या मोठ्या बहिणींची लग्न झाली होती आणि त्या आपापल्या घरी गेल्या होत्या. मी त्या वेळी फक्त वीस वर्षांची होते. राणा माझ्या मावशीकडं गेला होता, हे आम्हांला नंतर केव्हा तरी कळलं. कसं, हे माझ्या आता लक्षात नाही. आम्ही त्याला परत आणण्याचा प्रयत्न केला. पण तो आला आणि पुन्हा पळून गेला. राणाचा दोन वर्षं तरी पत्ता लागला नाही. आमचा हा भाऊसुद्धा आमच्यापासून दूर गेला. तो नाहीसा झाला, असेच विचार आमच्या मनात येऊ लागले. इतरांपेक्षा स्वतःचं फार मोठं नुकसान झालंय, ही भावना माझ्या मनात निर्माण झाली. आणि एक दिवस माझी मोठी बहीण राणाला घेऊन घरी आली. तिला तो रेल्वे कँटीनमध्ये सापडला. एक उधळ्या मुलगा घरी आला होता. घरातल्यांना तो परका वाटत होता. परंतु जगावं कसं, ही कला त्याला आता अवगत झाली होती. त्यानंतर आम्ही सर्वजण पुन्हा नभाला गेलो आणि राणा लाहोरमध्येच राहिला. नभामध्ये मी नोकरी पत्करली आणि माझ्या आईला, लहान भावाला व बहिणीला माझ्याजवळच ठेवून घेतलं. राणा लाहोरच्या घरीच राहिला. त्यानं दिवस कसे काढले, काय केलं आणि कसं केलं, हे कुणालाच माहीत पडलं नाही. कित्येकदा तो मला उसने पैसे मागायचा.

मग जेव्हा फाळणीचे ढग आमच्या डोक्यावर जमू लागले तेव्हा मला लाहोरमधल्या घराची काळजी वाटू लागली. कारण आम्हांला तेवढाच एक आधार होता. तेच एक तारण होतं. फाळणीच्या गदारोळात जर घर कुणी बळकावलं, तर जवळ काहीच शिल्लक राहणार नाही. असले विचार माझ्या मनात येऊ लागले. एक दिवस मी वर्तमानपत्रात सहारनपूरच्या घराविषयी एक जाहिरात वाचली. त्या घराचा मालक मुसलमान होता. त्याला सहारनपूरच्या बदल्यात लाहोरमध्ये घर पाहिजे होतं. कारण त्याला सहारनपूर सोडून लाहोरला वास्तव्य करायचं होतं. मला हा व्यवहार बरा वाटला. मी त्या माणसाबरोबर बोलणी सुरू केली आणि माझ्या काकांनासुद्धा पत्र लिहिलं. माझ्या काकांनी काही पत्राचं उत्तर पाठवलं नाही. परंतु काही दिवसांनंतर राणाच आम्हांला भेटायला आला. घराच्या व्यवहाराच्याबाबतीत मी प्रयत्न केल्याबद्दल त्याला आनंद झाला होता आणि घराबाबतीतच त्याला आईशी काही सविस्तर बोलायचं होतं, म्हणून तो आईला लाहोरला घेऊन जायला आला होता. मी आईला पाठवायला तयार झाले. माझ्या प्रयत्नाला यश आल्याबद्दल मला खूप आनंद झाला होता. मी आईला पाठवलं. नंतर बरेच दिवस झाले, तरी आई परत आली नाही. त्यामुळं मला काळजी वाटू लागली. ती आजारी तर पडली नसेल? तेव्हा मी तिला बघण्यासाठी लाहोरला गेले. तिथं गेल्यावर मला भलतंच समजलं. माझ्या काकांनी राणाला सावध केलं की, मी सगळी संपत्ती, घरदार गिळंकृत करील, म्हणून. खरं तर राणानं आईला इथं (लाहोरला) आणलं, ते घरावर ताबा ठेवण्यासाठी. आई हे एक निमित्त होतं. जेव्हा मी त्याला याबद्दल विचारलं. तेव्हा तो म्हणाला की, मी एक अशिक्षित माणूस आहे. मी भारतात येऊन काय करू? आणि तुम्ही मला किती दिवस मदत करणार? जेव्हा तू लग्न करशील, तेव्हा तुझा संसार तुला आधी महत्त्वाचा वाटेल. इथं या घरात निदान मी राहू तरी शकेन. मला आसरा मिळावा, म्हणून मी त्याला पटवायचा खूप प्रयत्न केला. पाकिस्तान जर खरंच अस्तित्वात आलं, तर तू इथं किती दिवस आणि कसा काय राहू शकशील? राणाचं मत अगदी स्पष्ट होतं. तो म्हणाला की,
"जगण्यापेक्षा धर्म महत्त्वाचा नाही. माझी सगळी योजना तयार आहे. काय करायचं ते मी ठरवलंय. जतिंदरच्या घराशेजारी ज्या खोल्या आहेत, त्यांत ज्या मुलीची आई राहतेय, ती मुलगी तुला माहीतेय. ती माझ्याशी लग्न करायला तयार आहे. कारण मी तिला बरेच दिवसांपासून ओळखतोय. फक्त तिची एक अट आहे, ती म्हणजे मी मुसलमान धर्म स्वीकारला पाहिजे."
"मग आईचं काय?" मी विचारलं.
तर तो म्हणाला,
"ती माझी सुद्धा आई आहे. मी धर्मांतर करीन, त्या मुलीशी म्हणजे फझियाशी लग्न करीन आणि आईला माझ्याकडंच ठेवीन."
आजारी आणि उपरी भावना झालेल्या, एकाकी आईचं दुःख कसं आणि कोण समजू शकणार?...

मी राणाला पटवून द्यायचा प्रयत्न केला. आईला आणि माझ्या लहान भावाला माझ्याबरोबर येऊ दे म्हणून. राणावर विश्‍वास ठेवण्यात काही अर्थ नाही, असं मला वाटायला लागलं. माझ्या मनात असंही आलं, की संपत्ती, मालमत्तेच्या लालसेनं राणा माझ्या आईचा आणि माझ्या भावाचा जीवसुद्धा घेईल... माझ्यावर खूपच दडपण आलं होतं. मी घाबरले होते. मला रात्री त्या घरात राहण्याची अजिबात इच्छा नव्हती. पण शेवटी मला राहावं लागलं. शेवटी मी गरीब, आजारी, दुःखी कष्टी आईला तिथंच सोडलं. आणि नंतर राणाच्या या दुष्टपणाबद्दल मी त्याला कधीच क्षमा केली नाही. घर सोडताना मला रडू आलं. तेव्हा राणा माझ्याकडे बघून म्हणाला,
"मी मुसलमान धर्म स्वीकारतोय, म्हणून तुला वाईट वाटतंय."

मी त्याचा हात धरला आणि रडले आणि आईकडे लक्ष दे, म्हणून त्याला सांगितलं. मी त्याला असंसुद्धा सांगितलं, की तू हिंदू किंवा मुसलमान झालास, तरी त्याबद्दल मला काही देणंघेणं नाही. शेवटी माझे वडील निधर्मी आणि दूरदृष्टीचे, पुरोगामी विचारसरणीचे होते. परंतु ज्या बाईला तो माझ्यापासून हिरावून नेतोय, ती आजारी आणि दुबळी होती. आणि तिची काळजी घेणं भाग होतं... मी जड अंतःकरणानं बाहेर पडले. मला वाटलं होतं, की माझ्या बहिणींपैकी एक जण तरी आईला जाऊ दे, म्हणून राणामामाला पटवायचा प्रयत्न करील. पण तसं काही घडलं नाही. ती नंतर घरी कशी राहिली, तिची काळजी घेतली का नाही, तिला जेवण वगैरे व्यवस्थित मिळत होतं का नाही, का उपाशीच राहत होती, की तिची उपासमार झाली... हे नंतर मला कधीच समजलं नाही. माझ्या मनात तिच्याविषयी एक कायमची हुरहूर लागली होती. वडिलांच्या मृत्यूनंतर आई माझ्याजवळच राहिली होती. ती कडवी हिंदू होती. ती नेहमी संध्याकाळी देवाचं नामस्मरण करायची. आता माझ्या मनात येतं, की तिची दिनचर्या काय असेल, म्हणून…

राणा आता अब्दुल्ला झाला होता. आणि फजियानं त्याच्याशी लग्न केलं होतं. आमच्या बाळपणीचं घर आता धर्मांतरित मुसलमानाचं आश्रयस्थान झालं होतं. किंवा 'मुसलमान धर्माची बांधिलकी स्वीकारलेल्याचं' असं म्हटलेलंच जास्त खरं. पण राणा सुखी होता का? त्यानं माझ्या आईची नीट देखभाल केली का, हे कळायला माझ्याकडं काहीच साधन नव्हतं. कुठलाच मार्ग नव्हता. एक-दोन वेळा त्यानं माझ्या लहान बहिणीला पत्र पाठवलं होतं. परंतु तिचा नवरा सैन्य दलात होता आणि याबाबतीत त्याच्यापुढं अनेक प्रश्‍न निर्माण झाले असते, म्हणून माझ्या बहिणीनं राणाला पत्रव्यवहार थांबवायला सांगितलं... जसे दिवस निघून जात होते, तसं राणाला जास्तच एकाकीही वाटू लागलं. पुढं मला वाटतं, तो आम्हांलाही विसरत चालला. त्याला चुकल्यासारखंही वाटलं असावं. परंतु त्यानं मला काहीच कळवलं नाही. आणि काही वर्षांनंतर तू त्याच्याशी संपर्क साधलास आणि तुझ्याजवळ त्यानं पत्र दिलं. त्यानं लिहिलं, की तो आता चार मुलांचा व तीन मुलींचा बाप झाला होता. तो म्हणाला, "तरुण वयात मी जे काही केलं आहे, त्याबद्दल मी स्वतःला कधीच क्षमा करणार नाही. एकदा वाकडं पाऊल पडलं, ते पडलं. माझा इथं कुणीच स्वीकार केला नाही. माझ्या घरातल्या माणसांनीसुद्धा मला स्वीकारलेलं नाही…" राणाच्या पत्रानं मी अस्वस्थ झाले. मी त्याला उत्तर पाठवलं, "तू नशीबवान आहेस, कारण तू आपल्या वडिलोपार्जित घरात आपल्या बायकोमुलांसह राहत आहेस." तेव्हा तो म्हणाला, "तू माझी आवडती बहीण आहेस. पण तू मला नशीबवान म्हणू नकोस." तो म्हणतो, "मी धर्मांतर केलं, तेव्हापासून मी एक रात्रसुद्धा शांतपणे झोपू शकलो नाही. या घराची प्रत्येक वीट अन् वीट मला टोचतेय; मी अपराधी असल्यासारखं ती माझ्याकडं बघतेय. खरं तर, जे माझं म्हणून होतं, ते मी नाकारलं आणि मी जे स्वीकारलं, ते नशिबानं नाकारलं."

राणानं जेव्हा आईला बरोबर नेलं, तेव्हा त्याच्या मनात काही काळंबेरं असेल, याची मला कल्पना नव्हती. तरीपण मला फार काळजीच वाटत होती. काय करावं, हेच मला सुचत नव्हतं. मी नंतर विचार केला की, मुलांना मसुरीला, सुनीतीकडं म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीकडं पाठवावं. तेव्हा मी तिला तसं पत्र लिहिलं. पत्रात मी लिहिलं, की ही जागा मला आता सुरक्षित वाटत नाही, म्हणून मुलांना तुझ्याकडं ठेवून घे. परिस्थिती सुधारली, की मी त्यांना परत नेईन. मुलांना पाठवल्यानंतर मी रशियन भाषा शिकण्यासाठी म्हणून मिरांडा हाउसमध्ये गेले. कारण मुलांची काळजी थोडी दूर झाली होती. शिवाय मला रशियन भाषा शिकावी, असं सारखं वाटत होतं. तेव्हा मी वसतिगृहात राहिले. ते १९४९ साल होतं. जुलै महिना होता. त्या वेळी तिथं ताणतणाव बराच वाढला होता. परिस्थिती फार वाईट झाली होती. तरी पण मुलं तरी निदान सुरक्षित होती, याचं मला समाधान होतं. परंतु सुनीतीनं मुलांना परत पाठवून दिलं. ती म्हणाली, की इथं आम्ही सुटीवर आलो आहोत; आणि त्यामुळे मुलांच्याकडे बघणं तिला जमणार नव्हतं. पण नंतर रणजित मला म्हणाली, की तू काळजी करू नकोस. आम्ही आता खेड्यात जाणार आहोत आणि तुझ्या मुलांनासुद्धा आम्ही आमच्याबरोबर घेऊन जाऊ. तिथं मुलं सुखात असतील. तू तुझा रशियन भाषेचा अभ्यास सुरू ठेव. रणजित ही एक फार चांगली मैत्रीण होती. मी माझं रशियन शिकणं पुढं चालू ठेवलं.

पहिले सहा महिने फार चांगले गेले. मग सुट्टी लागली, म्हणून मी नाभाला गेले. आणि उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर मी जेव्हा परत आले, तेव्हा परिस्थिती फार चिघळली होती. फार वाईट दिवस आले होते. झालं काय, तर एकदा आम्ही मुलींनी प्राचार्य राजाराम यांच्या जीपमधून बाजारात खरेदीसाठी जायचं ठरवलं. राजारामपण यायला तयार झाले. तो रविवारचा दिवस होता. पण आम्ही जेव्हा बाहेर पडलो, तेव्हा फार भयानक प्रकार आम्हांला बघायला मिळाले. सर्वत्र प्रेतं पडलेली दिसली. आम्ही विद्यापीठ भागातून लाल किल्ल्यापर्यंत गेलो. आणि मला एक आठवतं, ते म्हणजे, तिथं मी एक टांगा बघितला. टांग्यात चार मुली व एक सुरा घेतलेला माणूस बसला होता. त्या मुलींनी टांग्यातून उड्या टाकल्या, तसा तो सुरेवाला माणूसही त्यांच्यामागं धावला. पुढं काय झालं, हे मला माहीत नाही. त्या जागी प्रेतं पडली होती. तेव्हा राजाराम यांनी जीप राजपूर रस्त्याला घ्यायला सांगितली. तिथं एक पोलिस चौकी होती. तेव्हा राजाराम म्हणाले, "आपण पोलिसांना ही माहिती कळवू या." म्हणून ते पोलिस चौकीत गेले व त्यांनी पोलिसांना प्रेतांबद्दल माहिती दिली. तेव्हा पोलिसांनी सांगितलं की, आमच्या चौकीत फारसे पोलिस नाहीत. तेव्हा आम्ही याबाबतीत काहीही करू शकत नाहीत. नंतर राजाराम यांनी रेल्वे स्टेशनकडं जायचं ठरवलं. त्यांनी तसा निर्णय का घेतला, हे काही कळलंच नाही. आणि रेल्वेस्टेशनवर आम्ही गेलो. बघतो, तर सगळीकडं रक्ताचा नुसता सडा! मग राजाराम म्हणाले, की आता पुढं जाण्यात काही अर्थ नाही. तेव्हा आम्ही तसेच मागं फिरलो. नंतर राजाराम यांनी आम्हांला वसतिगृहावर सोडलं.

त्या वेळी माझ्या खोलीमध्ये झाहिरा इलाही नावाची एक मुलगी राहत होती. मला असं वाटतं, की ती सर सय्यद अहमद यांची पुतणी होती. ती फार समजूतदार, परिस्थितीची जाणीव असणारी मुलगी होती. आम्ही वसतिगृहावर आलो. त्या वेळी विद्यापीठात जाळपोळ, लुटालूट, दंगल हे प्रकार चालूच होते. विद्यापीठात कुरेशी नावाचे एक प्राध्यापक होते. मला चांगलंच आठवतं की, त्या प्राध्यापकांना काही मुलांनी घेराव घातला होता. एका मुलानं कुरेशी सरांचा कोट आणि टाय धरून ठेवला होता. नंतर मला बातमी समजली, की कुरेशी यांच्याजवळ जी काही मौल्यवान चित्रं, इतर चीजवस्तू होत्या, ती सर्व चित्रं, वस्तू मुलांनी पळवल्या. विद्यापीठात फारच गडबड, गोंधळ चालू असून, तणाव वाढला आहे. ही बातमी जेव्हा आमच्या कानांवर आली, तेव्हा मात्र आम्ही खूपच घाबरलो. माझ्या आठवणीप्रमाणे त्या वेळी वसतिगृहात फक्त आम्ही सहा-सात जणीच होतो. वसतीगृहाची देखरेख करणारी एक बाई होती. आणि तिची एक मुलगी होती. ती चांगलीच गलेलठ्ठ होती. आम्हांला चांगलीच भीती वाटत होती. कारण आमच्या रक्षणाला तिथं कुणीही नव्हतं.

एक दिवस असंच आमचं खाणंपिणं चाललं होतं. आणि तेवढ्यात एकजण कुणीतरी पळत-पळत आला आणि त्यानं झाहिराचा हात पकडला आणि म्हणाला, "चल, आपल्याला गेलं पाहिजे. नीघ लवकर." आणि त्यानं झाहिराला फरफटतच बाहेर नेलं. आम्हांला हा प्रकार काय आहे, हे समजलंच नाही. आम्ही अगदी सुन्न झालो. नंतर केव्हा तरी आम्हांला समजलं, की तो माणूस झाहिराचा भाऊ होता. त्याला म्हणे समजलं होतं, की तिथं कुठं बराच मोठा, लोकांचा समुदाय होता आणि ती माणसं वसतिगृहावर की, कुठं हल्ला करायला निघाली होती. म्हणून त्यानं तिला पटकन बाहेर काढली. झाहिराचं सर्व सामान, मोठ्या पेट्या वगैरे जे होतं, ते खोलीत तसंच पडून राहिलं होतं. नंतर आम्हांला कळलं, की ते दोघे कोटा हाऊसमध्ये राहत होते. नंतर तिच्या भावानं तिला हैद्राबादला की, कुठे नेलं. आणि मग माझा आणि झाहिराचा संबंधच तुटला. परंतु ती दोघं गेल्यानंतर लोकांचा जमाव वसतिगृहावर आला आणि 'आम्हांला झाहिरा पाहिजे', 'आम्हांला झाहिरा पाहिजे' अशा घोषणा देऊ लागला. 'तिला बाहेर आणा' असंही लोक म्हणू लागले. आम्ही सर्व जणी एका खोलीत अगदी बंदिस्त होतो. झाहिरा पळून गेली हे लक्षात आल्यावर जमाव निघून गेला. नंतर त्या अधीक्षक बाईनं आम्हांला वसतिगृहातून कसं तरी बाहेर काढलं आणि राजाराम यांच्या घरी पाठवून दिलं. त्यानंतर आम्ही राजाराम यांच्या घरी काही दिवस राहिलो. आणि मला आठवतं, की तो जमाव जेव्हा इकडून म्हणजे राजाराम यांच्या घरासमोरून गेला, तेव्हा लोकांच्या हातांत मोठमोठ्या पेट्या होत्या. त्या लूटमार केलेल्या वस्तूंनी भरलेल्या होत्या. त्या वेळी घरामध्ये आम्ही फक्त मुलीच उभ्या होतो. जमावातील काहीनी आम्हांला सिल्कचे कपडे वगैरे विकत घेता का, म्हणून विचारलं. आमच्यापैकी कुणी लग्न करणार असेल, तर त्या वस्तू, साड्या उपयोगी पडतील, असं त्या जमावातील लोकांचं म्हणणं. त्यानंतर वसतिगृहात ज्या मुली होत्या, त्या मुली आपआपल्या गावी निघून गेल्या. त्यांना जावंच लागलं.

मला मात्र कुठं जावं, हे समजत नव्हतं. वेळ फारच चमत्कारिक होती. मी खूप विचार केला. मी थोडी धीट होते. तेव्हा मी नामा महाराजांच्या ऑफिसमध्ये जाण्याचा विचार केला. मी तिथं गेले. मी सांगितलं, की नाभामध्ये मी नोकरीस होते. मला नाभाला जायचं आहे. इथं माझं कुणीही नाही. तेव्हा कृपा करून मला मदत करा, मी म्हणाले. तेव्हा ऑफिसमधल्या एका माणसानं सांगितलं की, आमच्या गाड्या रोज नाभाला जातात. आम्ही तुम्हांला एका गाडीतून पाठवू. तेव्हा त्या लोकांनी माझी जाण्याची सोय केली. मी ज्या गाडीतून नाभाला गेले, त्या गाडीत मामाचा एक मित्र पण होता. ती सैन्याची गाडी होती. मला नाभाच्या नोकरीचा कंटाळा आला होता. चांगली सहा वर्षं मी नोकरी केली होती. म्हणून मी रजा काढली होती. माझ्या लग्नाविषयीसुद्धा मी नक्की विचार केलेला नव्हता. नाभामध्ये सारखा ताणतणाव वाढत होता. शिवाय माझे काही वैयक्तिक प्रश्‍न होते. तेव्हा मी नोकरी सोडून जाण्याचा आणि पुढं शिक्षण चालू ठेवून आपली पात्रता वाढवण्याचा विचार केला व इतर काही तरी करावं या उद्देशानं मी नाभा सोडण्याचं ठरवलं. मग आम्ही गाडीतून नाभाकडं जात असता अंबाल्याजवळ थांबलो. त्या वेळी रात्र झाली होती. मी खरोखरच घाबरले होते. मी त्या सज्जन माणसाला विचारलं, "काका, तुम्ही मला रेल्वे स्टेशनवर सोडाल का?" तेव्हा त्या गृहस्थांनी सांगितलं, की तम्ही काळजी करू नका, आम्ही सर्व जण इथं आहोत. तुमची जबाबदारी आमच्यावर आहे.

आम्ही जेव्हा नाभामध्ये आलो, तेव्हा रात्रीचे अडीच वाजले होते. माझ्याबरोबर जे गृहस्थ होते, त्यांनी मला सुचवलं, की तुम्हाला वाटलं तर तुम्ही आता माझ्या घरी चला; मी तुम्हांला इथं सकाळी आणून सोडतो. मी त्यांना म्हणलं की, नको, मी घरीच जाते. शेवटी आपलं घर, ते आपलं घर! तेव्हा माझ्या मनात रात्रीचं कुठं जावं, हे येत होतंच. शेवटी त्यांनी मला शाळेच्या फाटकाजवळ सोडलं आणि ते आपल्या घरी गेले. शाळेच्या चौकीदाराचं नाव होतं जिवना. मी जिवना जिवना म्हणून हाका मारायला सुरुवात केली. परंतु तिथं कुणीही नव्हतं. मी हलकेच फाटक उघडलं. मी शाळेत आले. बघते, तर त्या भल्या मोठ्या जागेत सगळा शुकशुकाट होता. कुठंही उजेड नव्हता. सगळा अंधार. मी बघितलं, तर जिवनाची खोली बंद होती. ते सगळे जण पाकिस्तानात गेले होते. माझ्या हे डोक्यातच आलं नाही. कदाचित सायरा असेल, म्हणून मी तिला हाक मारली. तिथं कुणीही नव्हतं. मी आत घरापर्यंत गेले, तर घराला कुलूप होतं. माझ्या मनात आलं, की कदाचित ही सगळी माणसं नक्कीच खेड्यात गेली असणार. रणजितनं माझ्या भावाला आणि बहिणीला बरोबर नेलं होतं. सुधा माझी बहीण. तिनं लग्न केलं. माझी जी दुसरी बहीण भुदेर, तिला मी जालंदरच्या कन्या महाविद्यालयाच्या वसतिगृहात ठेवलं होतं. तेव्हा तीही खेड्यात गेली होती. आणि माझा दुसरा भाऊ, बिल्लू तो लाहोरला पळून गेला होता. मला आता काहीच सांगता येत नव्हतं की, मुन्ना आणि माताजी कुठं आहेत. मी गोंधळून गेले होते. पण राणानं माताजीला बरोबर नेलं होतं. हे मात्र आठवतं, तिथं कुणीही नव्हतं.

सगळं घर रिकामं झालं होतं आणि ही एवढी मोठी सहा-सात एकरांची जागा... काळोखी रात्र... शेजारी चिटपाखरूही नव्हतं मी चांगलीच हादरून गेले होते. मला काहीही सुचत नव्हतं. मी बाहेर व्हरांड्यात बसले खरी पण मी फार घाबरले होते. शेजारी अंधार होता. शिवाय आजूबाजूला मुसलमानांची वस्ती होती. नंतर माझ्या मनात आलं, की आपण हा धोका पत्करून मूर्खपणा केलाय. नंतर माझ्या लक्षात आलं, की शाळेच्या मागच्या बाजूस आम्ही मश्की घेत होतो. त्याचं नाव होतं... कोण तो? मला आता आठवत नाही. मग मी आवाराच्या भिंतीला धरून सरकत-सरकत मागच्या बाजूला गेले. मी त्याला हाक मारली. तसा तो एकदम उठला. त्याला धक्काच बसला. तो म्हणाला, "बिबाजी, तुम्ही कुठं होता? आणि आता आला कुठून?" भिंतीवरून उडी मारून तो आत आला. त्यानं घराचं कुलूप उघडलं आणि नंतर मी व्हरांड्यात येऊन झोपले. तो सकाळी उठला आणि सायकलवरून त्या खेड्यात गेला रणजितकडं. आणि रणजित आली. मग मी थोडे दिवस तिथंच राहिले. दरम्यान मी एकदा लाहोरला गेले आणि राणाला सांगितलं, की मी आईची काळजी घेईन. तू तिला माझ्याबरोबर तिथं पाठव. तेव्हाच मी तिथं पत्र पडलेलं बघितलं आणि माझ्या लक्षात आलं, की हेच ते पत्र. ज्या पत्रात लिहिलं होतं, "सुभद्रा सगळी संपत्ती, मालमत्ता गिळंकृत करील. तुझ्या आईला तू कुठं पाठवू नकोस." तेव्हा मला समजून चुकलं की, आता याचा काही उपयोग नाही, राणा आईला पाठवणार नाही.

मग मी निदान बिल्लूला तरी माझ्याबरोबर पाठव, म्हणून राणाजवळ भीक मागितली. त्याला विनंती केली. बिल्लू लाहोरला पळून आला होता. माझ्या मनात शंका आली, की ज्या अर्थी राणानं इस्टेटीसाठी आईला इकडं आणलं, तर तो माझ्या भावाला, म्हणजे बिल्लूला ठारसुद्धा मारील. मी खूप आग्रह केला, तेव्हा त्यानं बिल्लूला माझ्याबरोबर पाठवलं. आणि हे सगळं घडलं, ते फाळणीच्या थोडे दिवस आधी. १९४७ साली. फाळणीच्या आधी मी दोन वेळा लाहोरला गेले होते. पण केव्हा, हे नक्की आठवत नाही. एखाद्या मूर्खासारखं मी लाहोर स्टेशनपासून आमच्या घरी टांग्यानं गेले. मनात कसली भीती नव्हती किंवा काही विकल्प नव्हते आणि ते दिवस म्हणजे धगधगते दिवस होते. दुसर्‍या वेळी मी जेव्हा राणाकडं गेले, तेव्हा त्याला मी पटवून दिलं, की बिल्लूचं तू धड पालनपोषण करू शकणार नाहीस, त्याच्याजवळ बिल्लूची मी अक्षरशः भीकच मागितली आणि मी बिल्लूला आणलं. रेल्वेतून येताना बिल्लू डब्याच्या दुसर्‍या भागात बसला होता. आणि नंतर केव्हा तरी एक माणूस माझ्याकडं आला आणि सांगू लागला, की तुमच्याबरोबर प्रवास करणारा मुलगा गाडीतून खाली पडलाय म्हणून. मी तर वेडीच झाले, आणि तो बसला होता, त्या जागेकडं पळत सुटले. बघितलं, तर बिल्लू सुखरूप होता. नंतर तो नोकरी शोधण्यासाठी म्हणून गुरगावला गेला. पण बिल्लू तसा भटक्याच मुलगा होता... अशा तर्‍हेनं मुलं थोडी स्थिरस्थावर झाली. मग मला तुझ्या वडिलांकडं, सिमल्याला जावं लागलं. माझ्यापुढं दुसरा मार्गच नव्हता. तिकडं रेल्वे जात नव्हती. तरी पण मी प्रयत्न करत राहिले. मग मला कुणी तरी सांगितलं, की तिकडं टॅक्सीनं तुम्हाला जाता येईल. परंतु त्यासाठी तुम्हांला सहाशे रुपये द्यावे लागतील. तेव्हा मी पैसे जमा केले आणि टॅक्सीनं दिल्लीहून सिमल्यास गेले. माझं जे सामान वगैरे होतं, ते मी झाहिरा इलाहीच्या पेटीतच ठेवलं होतं. ते नंतर मला कधीच मिळालं नाही. वसतिगृहाची जी अधिक्षक बाई होती, तिच्या ताब्यात मी माझं सामानसुमान दिलं होतं. आम्हांला नंतर त्या पेट्या मिळाल्या. पण पूर्ण रिकाम्या.

जेव्हा तू आम्हांला परत लाहोरला घेऊन गेलीस, तेव्हा विमानतळावर राणाला बघून मला काय वाटलं, हे सांगणं तसं कठीण होतं. मी विमानतळावर त्याला बघितलं, तेव्हा तो सडपातळ अंगकाठीचा, तरुण राणा नव्हता. म्हणजे जेव्हा मी चाळीस वर्षांपूर्वी त्याला बघितला होता, तसा तो आता स्थूल झाला होता. आमच्या वडिलांसारखा. आणि विक्रम तर उंच, चांगला सहा-सव्वासहा फुटी, देखणा होता. राणा जेव्हा विमानतळावर माझ्यासमोर उभा राहिला, तेव्हा तो मला जवळजवळ वडिलांसारखाच दिसला. तेव्हा माझ्या आठवणी पुन्हा जागृत झाल्या. माझं तेव्हाचं बाळपण, आई-वडील... आणि फार मोठा विश्‍वासघात... तरीही मी भावाचा तिरस्कार केला नाही. उलट, मला त्याच्याविषयी वाईटच वाटलं. कारण एक पळपुटा माणूस स्वतःच्याच जाळ्यात अडकलेला... मी पुढं जाऊन जेव्हा त्याला कवटाळलं, तेव्हा तो हलकेच म्हणाला, "तू माझ्यावर अजून रागावलेलीच आहेस ना?" मला रडू आलं. कारण आम्ही एकाच आईबापाची, एकाच रक्ताची मुलं. पण आज आम्ही जणू परके झालो होतो. दोन देश, जे एकमेकांचे शत्रू आहेत, त्या देशांचे आम्ही रहिवासी होतो. त्याच्या धर्मांतराचं मला एवढं काही वाटलं नाही. परंतु आईशी तो जसं वागला, त्याबद्दल माझ्याजवळ शब्द नव्हते. क्षमा नव्हती. आम्हांला घरी घेऊन जाण्यासाठी त्यानं गाडी आणली होती. आम्हांला त्यानं अशा जागी नेलं, की ती जागा म्हणजे कित्येक वर्षं तरी माझं राहतं घर होतं. आम्ही आत गेलो, तसं मी घराकडं बघितलं, घराचा दिमाख तसाच होता. परंतु मी अंधारातून बघितलं, तर मला तिथं दोन गोष्टी गायब झालेल्या दिसल्या. बाहेरच्या फाटकावर माझ्या वडिलांचं नाव रंगवलेलं होतं, ते कुठंच दिसत नव्हतं. आणि वर पाण्याच्या टाकीवर मोठा ॐ काढलेला होता, तोही दिसत नव्हता. आम्ही राणाच्या घरातल्या इतर माणसांना भेटलो. त्याची बायको आणि तीन मुलं. चौथा कुठं बाहेर गेला होता. आम्ही आरामात बसलो. तो डिसेंबर महिना होता. प्रत्येक खोलीत उष्णता निर्माण करणारी यंत्रं बसवल्याकारणानं खोल्या उबदार झाल्या होत्या. पाकिस्तानातली स्वयंपाकाचा गॅस पुरवणारी यंत्रणा फारच भिकार होती. गॅस नळीवाटे पुरवला जात होता. दुसऱ्या दिवशी मी सकाळी उठून बघितलं, तर पूर्वी होती ती सगळीच फळझाडं नाहीशी झाली होती. राणा म्हणाला, की पाण्याची कमतरता असल्यामुळं सगळी फळझाडं नाहीशी झाली होती. काढून टाकावी लागली. पण मला मात्र खूप वाईट वाटलं. मला काहीतरी हरवल्यासारखी जाणीव झाली. जशी न भरून येणारी जखम! माझ्या वडिलांनी इतर गोष्टींपेक्षा झाडांवर फार प्रेम केलं होतं. एका अर्थी हा सूड घेण्याचाच प्रकार होता. माझ्या मनात आलं, की फाळणीमध्ये आपण बरंच काही गमावून बसलो आहोत. या थोड्याशा झाडांच्या नाशानं मला तर सर्वस्व गेल्यासारखं वाटलं. कारण ती झाडं म्हणजे त्या वेळच्या वैभवाची प्रतीकं होती.

त्या दिवशी तुझी मैत्रीण लाला आली आणि तिनं आम्हांला लाहोरमधली महत्त्वाची ठिकाणं दाखवली. आता लाहोरमध्ये खूपच बदल झाला होता. मला हॉल रोडवरचं माझं जुनं कॉलेज बघायचं होतं. परंतु आम्ही जेव्हा तिथं गेलो, तेव्हा समजलं, की ते कॉलेज आता दुसरीकडं गेलं आहे. मला चांगल्यापैकी माहीत असलेली अनेक स्थळं मी बघितली. परंतु त्या वेळचं, अनेक धर्मीयांचं वसतिस्थान असलेलं लाहोर आता राहिलेलं नव्हतं. आता फक्त दिसत होतं ते मुसलमानांचं लाहोर. प्रार्थनास्थळावरच्या ध्वनिक्षेपकावरून बांग ऐकू येत होती. गल्ल्या, मोहल्ले, दुकानं वेगळीच दिसत होती. पाकिस्तानातल्या आमच्या त्या घरात मी दिवसभर राहत होते. पण एकाच खोलीत. मी घरातल्या इतर खोल्यांतून कधी गेले नव्हते. माझी जी खोली होती, ती कशी आहे, हे बघण्याची माझी खूप इच्छा होती. परंतु माझं धाडसच झालं नाही. आमची ती बैठकीची खोली मी सहज, एकदाच बघितली आणि परत फिरले. दुसर्‍या ज्या खोल्या होत्या, त्या खोल्या हुंडा देण्यासाठी म्हणून जमवलेल्या भेटवस्तूंनीच भरून गेल्या होत्या. पुढं होणार्‍या मुलींच्या लग्नाची तरतूद होती; आणि त्या खोल्यांमध्ये कुणी राहत असेल, असं वाटत नव्हतं. मला वाटतं, त्या घरातली सगळी माणसं पहिल्या मजल्यावरच राहत असावीत. जेवणासाठी म्हणून सर्वजण एकत्र येत. आणि आमच्या मुक्कामात आम्हांला अतिशय रुचकर असं जेवण मिळालं. काही दिवसांनंतर राणा आमच्या खोलीत अला. त्यानं खोलीचं दार येतायेता बंद करून घेतलं. आणि त्यानं बोलायला सुरुवात केली. तो म्हणाला;
"जर हे घर नसतं, तर मला वाटतं, आपण सर्वजण एकत्र राहिलो असतो. मी धर्मांतरही केलं नसतं आणि आयुष्यभरातली शांतताही घालवून बसलो नसतो."
"पण धर्मांतर करून घेण्याचं तूच ठरवलं होतंस ना?" मी त्याला विचारलं.
"बरोबर आहे." तो म्हणाला, "अजूनसुद्धा मला ते मान्य नाही. त्यांच्या दृष्टीतून मी अजूनही हिंदूच आहे. आणि त्या मुलीनं जर लग्न करायचं ठरवलं नसतं, आणि तरीसुद्धा मला राहावं लागलं असतं तर मी नक्कीच जेलमध्ये राहिलो असतो. मला अटक झाली असती."

हे ऐकल्यानंतर आम्ही सुन्न जालो. त्यानं आणखीही सांगितलं की, त्याच्याच एका मुलानं, तो- म्हणजे राणा (प्रत्यक्ष पिता) हा हेर आहे, म्हणून त्याच्यावर खटला भरला होता.
"मी इथं एखाद्या परक्या माणसासारखाच आहे." तो म्हणाला. "माझ्याच घरात माझी मुलं भुतासारखी माझ्या मागं लागली आहेत." त्यानं मला पुन्हा पुन्हा सांगितलं की, या अनुभवातून तो एकच शिकलाय की, कुणीही कुणाचा धर्म बदलू शकत नाही.

ती पाकिस्तानातली माझी शेवटची रात्र होती. दुसर्‍या दिवशी आम्ही परत निघणार होतो. त्या दिवशी सकाळी आम्ही न्याहरीसाठी बसलो होतो. तेव्हा राणानं फ्रिज उघडला आणि पांढर्‍या शुभ्र लोण्याचा एक बाऊल बाहेर काढला. तो लोण्याचा बाऊल माझ्यापुढं ठेवत तो म्हणाला, "तुला पांढरं लोणी किती आवडायचं, हे मी विसरलो नाही. कालच मी हे तुझ्यासाठी आणलंय."

तेवढ्यात माझे डोळे भरून आले. आम्ही दोघं जे बोललो, ते शेवटचंच.

त्या वेळी राणा खरंच बोलत होता, की खोटं, हे माझ्या समजण्यापलीकडचं होतं. धर्मांतर हीच त्याची खरी अडचण होती का? परंतु तिथं अजूनही कित्येक माणसं आहेत, की धर्मांतर करूनसुद्धा ती तिथंच राहिली आहेत. म्हणजे धर्माला शेवटी किती महत्त्व द्यायचं? राणा सरळसरळ खोटं बोलत होता, की स्वतःचा बचाव करण्यासाठी तो वाकड्या वळणानं जात होता? आधीसुद्धा त्यानं अशीच नाटकं केली होती का? मला काही माहीत नाही. राणाला समजणं कठीणच!

मूळ पुस्तक - The Other Side of Silence, Duke University Press, 2000
भाषांतर - नारायण आवटी; मेहता प्रकाशन; २००१
पुनर्मुद्रणाची परवानगी देण्याबद्दल लेखिका उर्वशी बुटालिया आणि मराठी भाषांतराचे प्रकाशक मेहता प्रकाशन ह्यांचे आभार.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet