"...तो मेरा नाम इस देश से खारीज कर दो" - पाशच्या कविता

संकल्पना

"...तो मेरा नाम इस देश से खारीज कर दो" - पाशच्या कविता

- अवंती

मध्यंतरी जे शेतकरी आंदोलन, मूक मोर्चा झाला त्यावेळी पाश ह्यांच्या ह्या कविता न आठवत्या तर नवलच!

"मैं पूछता हूँ आसमान में उड़ते हुए सूरज से
क्या वक़्त इसी का नाम है
कि घटनाएँ कुचलती हुई चली जाए
मस्त हाथी की तरह
एक समूचे मनुष्य की चेतना को?
कि हर सवाल
केवल परिश्रम करते देह की गलती ही हो
क्यों सुना दिया जाता है हर बार
पुराना लतीफा
क्यों कहा जाता है हम जीते है
ज़रा सोचें -
कि हममें से कितनों का नाता है
ज़िंदगी जैसी किसी चीज़ के साथ!
रब्ब की वह कैसी रहमत है
जो गेहू गोड़ते फटे हाथों पर
और मंडी के बीच के तख्तपोश पर फैले माँस के
उस पिलपिले ढेर पर
एक ही समय होती है ?
आखिर क्यों
बैलों की घंटियों
पानी निकालते इंज़नो के शोर में
घिरे हुए चेहरों पर जम गयी है
एक चीखती ख़ामोशी ?
कौन खा जाता है तल कर
टोके पर चारा लगा रहे
कुतरे हुए अरमानो वाले पट्ठे की मछलियों?
क्यों गिड़गिडाता है
मेरे गाँव का किसान
एक मामूली पुलिस वाले के सामने ?
क्यों कुचले जा रहे आदमी के चीखने को
हर बार कविता कह दिया जाता है ?
मैं पूछता हूँ आसमान में उड़ते हुए सूरज से"

"मेरे सम्मान का सबसे महान शब्द
जहाँ कहीं भी प्रयोग किया जाए
बाकी सभी शब्द अर्थहीन हो जाते है

इस शब्द के अर्थ
खेतों के उन बेटों में है
जो आज भी वृक्षों की परछाइओं से
वक़्त मापते है
उनके पास, सिवाय पेट के, कोई समस्या नहीं
और वह भूख लगने पर
अपने अंग भी चबा सकते है
उनके लिए ज़िंदगी एक परंपरा है
और मौत के अर्थ है मुक्ति
जब भी कोई समूचे भारत की
'राष्ट्रीय एकता' की बात करता है
तो मेरा दिल चाहता है -
उसकी टोपी हवा में उछाल दूँ
उसे बताऊँ
के भारत के अर्थ
किसी दुष्यंत से सम्बंधित नहीं
वरना, खेत में दायर है
जहाँ अन्न उगता है
जहाँ सेंध लगती है"

भारत नावाची ही कविता कवी पाशनं लिहिलेली. भारत म्हणजे पुराणातले संदर्भ नव्हे तर भारत म्हणजे इथले लोक, इथले शेतकरी, इथली जमीन. सामान्य लोक, त्यांची सामान्य स्वप्नं, शेतकरी त्यांच्या अडचणी आणि बलाढ्यांकडून होणारं शोषण हे कवितेचे विषय असणारा अत्यंत संवेदनशील पण तितकाच प्रगल्भ कवी पाश म्हणजेच अवतार सिंह संधू.

जलंधर जिल्ह्यात १९५०साली पाश म्हणजेच अवतार सिंह संधूचा जन्म झाला. यानं दाखवून दिलं की साहित्यातून-कथाकवितालेखनाटक यातून अत्याचारी लोकांविरूद्ध आवाज उठवता येतो, त्यांना घाबरवता येतं हे दाखवून दिलं. व्यवस्था, सत्ताधिकारी यांना सरळ, स्पष्ट प्रश्न विचारणाऱ्या रचना पाशनं केल्या. आपण अगदी सामान्यच आहोत, जनतेतलेच एक आहोत असंच पाशला वाटत असे. म्हणजे तोच एके ठिकाणी म्हणाला,
"मैं आदमी हूं
बहुत-बहुत छोटा-छोटा कुछ
जोड़कर बना हूं."

पाशनं आयुष्यभर या "बहुत छोटा छोटा" असणाऱ्या गोष्टी जपायचा, जगायचा प्रयत्न केला आणि हे करत असताना माणसातलं माणूसपण राखण्यासाठी अस्वस्थ होत, तळमळत राहिला. शोषण, अत्याचार, मुस्कटदाबी या साऱ्यांच्या तावडीतून सामान्य लोक सुटले पाहीजेत, मुक्त विचारांचं असं त्यांचं आयुष्य पाहीजे, समता असणारं आयुष्य-जग सर्वांनाच मिळालं पाहीजे हे पाशला लहान वयातच म्हणजे पंधराव्या वर्षापासून वाटत राहिलं.

पाशच्या कवितांचा अर्थ कुणाला समजावून सांगण्याची कधी गरज पडली नाही; ना त्याला स्वतःला, ना त्याच्या वाचकांना. त्याने कधी जड-बोजड शब्द वापरले नाहीत की कुठे गूढ प्रतिमा-प्रतीकं वापरली नाहीत. जसे शब्द वापरले तसेच त्यांचे अर्थ. कुठे छुपे अर्थही त्यात नाहीत इतकी सरळ पण अर्थवाही कविता त्याची! पाशच्या कवितांमध्ये गाव, गावातली माणसं, जमीन, माती, शेत, हे सारं येतं. हिंदीत "मिट्टी की महक" म्हणतात तशी पाशची कविता 'महकणारी' आहे. कष्टकऱ्यांच्या जीवनाचं स्वच्छ प्रतिबिंब दाखवणारा आरसा म्हणजे पाशच्या कविता. कदाचित म्हणूनच पंजाबी भाषेत कविता लिहिलेल्या असूनही हिंदी साहित्यवर्तुळानं पाशला आपला कवी मानलं. विद्रोही कविता केवळ कडव्या शब्दांचा वापर करूनच लिहिता येते या समजूतीला पाशच्या या विद्रोही कविता छेद देतात.

भारतीय साहित्य लेखनात विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात एक प्रकारची क्रांती घडली असं लक्षात येतं. हे लेखन अधिकाधिक लोकशाहीवादी होत गेलं. सामाजिक जागरूकतेचं बी रूजण्याचा, साहित्यनिर्मितीतून ती मुळं घट्ट करण्याचा तो काळ होता. त्या काळात सबाल्टर्न स्टडीज म्हणजेच वंचितांच्या समस्यांचा अभ्यास करण्याला सुरुवात झाली. तेव्हाच दलित साहित्य, विद्रोही साहित्याची निर्मितीही लक्षणीय प्रमाणात होऊ लागली होती. धनदांडग्यांनी, सत्ताधाऱ्यांनी, राजकारण्यांनी, सवर्णांनी, उद्योजकांनी, व्यापाऱ्यांनी, आपल्यापेक्षा गरीब, आपल्या हाताखालच्या, 'खालच्या जातीच्या', कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या केलेल्या शोषणाबद्दल, अत्याचाराबद्दल, शोषितांनी, वंचितांनी बोललं पाहिजे, त्यांचे हक्क या साऱ्यांची जाणीव करून देणाऱ्या साहित्याची निर्मिती या काळात होत होती. पाशच्या कविता या साहित्यप्रकारात येतात असं म्हणता येईल. पंजाबी साहित्यात सबाल्टर्न कवितांची सुरुवात पाशनं केली असंही म्हणता येईल. पाशच्या कवितांमधून शेतकऱ्यांचा राग, खदखद, शोषितांची तगमग आपल्याला दिसून येते.

हिंदी साहित्यवर्तुळात पाशला 'जनकवि' म्हणून संबोधलं जातं. व्यवस्थेच्या विरोधात सतत आवाज उठवणं हे त्याच्या क्रांतिकारी कवितांचं वैशिष्ट्य. माणसानंच माणसाचं चालवलेलं शोषण आणि यावरच व्यवस्थेचा सारा डोलारा उभं असणं हे समाजाच्या हिताचं नक्कीच नाही हे पाश सतत सांगत राहिला त्याच्या कवितांमधून. देशभक्ती, राष्ट्रभक्ती म्हणजे सत्तेत असणाऱ्यांचे गोडवे गाणं? त्यांची हांजी हांजी करणं? की जनतेचे, तळागाळातल्या लोकांचे अस्पर्शित प्रश्न जाणून घेऊन ते सत्ताधाऱ्यांपर्यंत पोचवणं? ते सोडवण्याचा प्रयत्न करणं?

पाशसाठी देशप्रेम, राष्ट्रप्रेम हे कुणाची हांजी हांजी करणं नव्हतं तर जनसामान्यांच्या समस्या, दुःखं, वेदना समजून घेऊन त्यावर भाष्य करणं होतं.
पाश म्हणतोच,

"मुझे देशद्रोही भी कहा जा सकता है
लेकिन मैं सच कहता हूँ
यह देश अभी मेरा नहीं है
यहाँ के जवानों या किसानों का नहीं है
यह तो केवल कुछ 'आदमियों' का है
और हम अभी आदमी नहीं हैं,
बड़े निरीह पशु हैं
हमारे जिस्म में जोंकों ने नहीं पालतू मगरमच्छों ने दांत गड़ाएं हैं…"

पाशनं कम्युनिस्टांच्या उणिवांबद्दलही भाष्य केलं. तळागाळातल्या लोकांबद्दल लिहिताना पाशनं निम्नमध्यमवर्गाकडे दुर्लक्ष केलं नाही, त्यानं या लोकांची सत्तेपुढं झुकलेले, सत्तेचे, धनदांडग्यांचे गुलाम म्हणून हेटाळणी करण्याऐवजी कष्टकरी, कामगार आणि शेतकऱ्यांच्या संघर्षात या लोकांनीही सामील व्हावं असं सुचवलं. आणि म्हणूनच शेतकरी, कष्टकरी यांच्याबरोबरच शिपाई, शिक्षक यांचा उल्लेखही पाशच्या कवितांमध्ये दिसतो.

पहिली कविता पाशनं वयाच्या पंधराव्या वर्षी लिहिली आणि जेव्हा पाश २० वर्षांचा होता तेव्हा तो पंजाबमध्येच नक्षलवाद्यांशी संबंधित असल्याच्या आरोपांमुळे तुरुंगात शिक्षा भोगत होता. याच वेळी तुरुंगातूनच पाशनं आपला पहिला कवितासंग्रह "लौह कथा" प्रकाशित केला. त्यानंतर "उड्डदे बाँजा मगर", "साडे समियाँ विच्च", "लडांगे साथी" हे चार पंजाबी कवितासंग्रह प्रकाशित झाले.

पंधरा-सोळाव्या वर्षीच पाश भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा भाग झाला आणि त्यानंतर त्यानं नागा रेड्डी गटात शिरकाव केला. असं असलं तरीही पाश हिंसेच्या विरोधातच होता. १९७० साली पाशनं तुरुंगातूनच आपल्या ३६ कविता प्रकाशित करण्यासाठी दिल्या आणि तो पंजाबी कवींमधे "लाल तारा" म्हणून ओळखला जाऊ लागला. पुढे वर्षभरातच पाश तुरुंगातून बाहेर आला आणि त्याने हस्तलिखित "हाक"चं संपादन केलं. वयाच्या केवळ ३७-३८ आणि कवितेच्या प्रांतात जेमतेम २१ वर्षं काढलेल्या, शे-सव्वाशे कविता लिहिलेल्या पाशनं, ज्यांच्या साहित्यनिर्मितीच्या केवळ आकड्यांचीच पुस्तकंच्या पुस्तकं भरतील अशा सरकारच्या, खुर्चीपुढे हांजी-हांजी करणाऱ्या अनेक वयोवृद्ध साहित्यकारांपेक्षा फारच लवकर जनमानसात आपली जागा निर्माण केली. इतकंच नव्हे तर कवितेच्या त्याच त्या घीस्यापिट्या 'फाॅर्म'ला छेद देत आपली नवीन शैली निर्माण केली. परंपराभंजक स्वभावामुळेच कदाचित पाश स्वतःबद्दल म्हणतो,

"तुम्हें पता नहीं
मैं शायरी में किस तरह जाना जाता हूं
जैसे किसी उत्तेजित मुजरे में
कोई आवारा कुत्ता आ जाये
तुम्हें पता नहीं
मैं कविता के पास कैसे जाता हूं
कोई ग्रामीण यौवना घिस चुके फैशन का नया सूट पहने
जैसे चकराई हुई शहर की दुकानों पर चढ़ती है।"

पाशच्या कवितांमध्ये वर म्हटलं तसं अनेकविध विषय असतात पण त्याचा भाव नेहमीच एक असतो - अन्याय, दुःख, वेदना यांना शब्द, आवाज देणं. पाशचा जन्म पंजाबातच, जलंधर जिल्ह्यात तलवंडी गावात झाला. पंजाबातच दहावीपर्यंतचं शिक्षणही झालं. पुढं कसाबसा टीचर्स डिप्लोमा पूर्ण केला, बीएही केलं पण विद्यापीठीय अभ्यासात त्याचं मन रमत नव्हतं; लोकांत, लोकांसाठी लिहिण्यात, काम करण्यात त्याला समाधान मिळत होतं. यासाठी कवितेचं माध्यम त्यानं वापरलं. पाशसाठी कविता म्हणजे केवळ प्रेमपत्रं, विरह वगैरे लिहिण्यासाठी नव्हत्या; तर कविता आपल्या मनातला असंतोष दाखवण्यासाठीही लिहिल्या जाऊ शकतात; अन्याय होतो आहे हे दर्शवण्यासाठीही कविता लिहिल्या जाऊ शकतात हे दाखवून देण्याचं एक माध्यम होतं. पाश त्याच्या एका कवितेतून सांगतो की कष्टकऱ्यांनी, अन्यायग्रस्तांनी आपल्या हातांचा वापर ते केवळ कष्ट करण्यासाठी, कुणापुढं ते पसरण्यासाठी न करता शोषण करणाऱ्यांवर उगारण्यासाठीही, अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठीही हात वापरता येऊ शकतो.

"हाथ अगर हों तो
जोड़ने के लिए ही नहीं होते
न दुश्मन के सामने खड़े करने के लिए ही होते हैं
यह गर्दनें मरोड़ने के लिए भी होते हैं
हाथ अगर हों तो
'हीर' के हाथों से 'चूरी' पकड़ने के लिए ही नहीं होते
'सैदे' की बारात रोकने के लिए भी होते हैं
'कैदो' की कमर तोड़ने के लिए भी होते हैं
हाथ श्रम करने के लिए ही नहीं होते
लुटेरे हाथों को तोड़ने के लिए भी होते हैं।
(हीर म्हणजे पंजाबी लोकगायिका, सैद आणि कैदो म्हणजे हीरचा मनाविरूद्धचा नवरा आणि हीररांझाच्या प्रेमात अडकाठी करणारा हीरचा काका)

हे असं लिहित असतानाच पाश स्वतःही कुणाला बिचकत नसे किंवा कुणापुढे विनाकारण नमतही घेत नसे.

वर म्हटलं तसं पाशसाठी कविता म्हणजे प्रेमपत्रं नाहीत तर कविता म्हणजे वंचितांच्या, सामान्यांच्या स्वप्नांचा आवाज. आणि ही स्वप्नं काय होती तर समानता, स्वातंत्र्य. एक झेंडा, तिरंगा फडकवता आला म्हणजे स्वातंत्र्य मिळालं? म्हणजे माणूस स्वतंत्र झाला? नाही. पाशसाठी स्वातंत्र्य म्हणजे मुक्तपणे 'स्वप्नं' पाहता येणं, कुणालाही . आणि देश म्हणजे केवळ नकाशात दिसतो, राज्य आणि गाव आणि शहरं मिळून झालेला एक जमिनीचा मोठा भाग नव्हे तर देश म्हणजे या जमिनीच्या मोठ्या तुकड्यावर राहणारे लोक, तळागाळातले, सामान्य, कष्टकरी, कामगार, शेतकरी म्हणजे देश.
पाश अनेक राजकीय पक्षांशी संबंधित होता पण राजकारण त्याला कधी जमलं नाही. तो वेगवेगळ्या राजकीय पक्षांशी संलग्न असण्याचं कारणच हे होतं की त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता यावं. आणि याचमुळे पाशची ओळख राजकीय नेता म्हणून न होता एक क्रांतिकारी कवी म्हणून आहे.

पाश तसं पाहता वैचारिकदृष्ट्या पिचून गेला होता; कारण एकीकडे खलिस्तानी लोकांचा उपद्रव, एकीकडे सत्ताधाऱ्यांचा, एकीकडे स्टॅलिनवादी कम्युनिस्ट. पाश एकाचवेळी तिघांचाही सामना करत होता. आपल्या पहिल्या कवितासंग्रहाचं नाव 'लौहकथा' असं ठेवलं, त्यात एक कविता आहे "लोहा" या नावानंच, त्यात पाश समाजातली दुफळी दाखवून देतो. म्हणजे एकच लोखंड पण समाजात एकाकडे लोखंडाची मोटरगाडी आहे तर त्याचवेळी दुसऱ्याच्या हाती मात्र लोखंडाचीच कुदळफावडी आहेत. कुदळफावडं हाती असणारा रोजच्या जगण्यासाठी आक्रोश करतो आहे तर मोटरगाडीवाला मात्र माज दाखवत आहे. आणि तरीही यांतला पाशला जाणवलेला फरक तो असा सांगतो.

"आप लोहे की चमक में चुंधियाकर
अपनी बेटी को बीवी समझ सकते हैं
लेकिन) मैं लोहे की आंख से
दोस्तों के मुखौटे पहने दुश्मन
भी पहचान सकता हूं
क्योंकि मैंने लोहा खाया है
आप लोहे की बात करते हो।..."

पाश आणि भगतसिंह यांच्यात साम्य आहे असं म्हणतात. भगतसिंगची वेगळी ओळख सांगायची गरज नाहीच! क्रांती, क्रांतिकारी म्हटल्यावर भगतसिंगाचं नाव घेणं अपरिहार्य आहे. भगतसिंग कवी पाशचा आदर्श होता. साम्य असं की दोघेही पंजाबचेच, दोघांचा जन्मही एकाच महिन्यातला, दोघांचा मृत्यू एकाच महिन्यातला, नव्हे एकाच तारखेचा निराळ्या सालांतला. दोघांनाही मारलंच गेलं शोषणकर्त्या सत्ताधाऱ्यांकडून. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे दोघांनाही सामान्य जनतेबद्दल, तिच्या स्वप्नांबद्दल आत्मीयता होती. दोघांचे विचार समान होते. भगतसिंगाबद्दल पाश लिहितो,
"भगत सिंह ने पहली बार
पंजाब को
जंगलीपन, पहलवानी व जहालत से
बुद्धि‍वाद की ओर मोड़ा था
जिस दिन फांसी दी गई
उसकी कोठरी में
लेनिन की किताब मिली
जिसका एक पन्‍ना मोड़ा गया था
पंजाब की जवानी को
उसके आखिरी दिन से
इस मुड़े पन्‍ने से बढ़ना है आगे
चलना है आगे."

भगतसिंगनं पोकळ धर्मवादाला, राष्ट्रवादाला थारा दिला नाही, स्वतंत्र देश - स्वतंत्र भारत म्हणजे केवळ इंग्रजांच्या गुलामीतून सुटणं आणि त्याऐवजी धनदांडग्या बलाढ्यांची मुजोर सत्ता येणं नव्हे तर कगार-शेतकऱ्यांचं राज्य येणं म्हणजे देश स्वतंत्र होणं. आणि इकडे पाशलाही हेच वाटत होतं की भारत - देश म्हणजे कष्टकरी, कामगार, सामान्य जनता, शेतकरी म्हणजे देश.. तसं भारत या त्याच्या कवितेत पाश म्हणतोच. पण त्याच्या आणखी एका कवितेत तो म्हणतो,
"हां, मैं भारत हूं चुभता हुआ उसकी आंखों में
अगर उसका अपना कोई खानदानी भारत है
तो मेरा नाम उससे खारिज कर दो"...

हांजीहांजी करणे, सरकारचं लांगुलचालन करणे, मान झुकवून सगळ्यालाच हो म्हणत अन्याय सोसत राहणे हे पाशला पटत नसे. तो म्हणतो,
"यदि देश की सुरक्षा यही होती है
कि बिना जमीर होना ज़िन्दगी के लिए शर्त बन जाए
आँख की पुतली में हाँ के सिवाय कोई भी शब्द
अश्लील हो
और मन बदकार पलों के सामने दण्डवत झुका रहे
तो हमें देश की सुरक्षा से ख़तरा है ..."

जमीर...आत्मसन्मान, असणं हे माणसाच्या "जिवंत "असण्याचं एक प्रमुख लक्षण आहे. हेच पाश मानत असे आणि लिहीत असे. लोकांना कवितांमधून सांगत असे.
पाशच्या कविता अन्यायाविरुद्ध, अस्तित्वाचा संघर्ष आणि जनसामान्यांची जिजीविषा सांगणाऱ्या असतात. त्याच्या कवितांमध्ये संघर्षाला महत्त्वाची जागा असते. पाश म्हणतो,
"दुनिया में लड़ने की जरूरत बाकी है...
तब तक हम लड़ेंगे,
हम लड़ेंगे साथी,
कि लड़ने के बगैरे कुछ भी नही मिलता..."

पाश त्याच्या कवितांमधून सत्ताधाऱ्यांना सरळ आव्हानच करतो! सत्ताधाऱ्यांच्या ताकदीबद्दल तो अनभिज्ञ नक्कीच नव्हता, पण त्याला जनसामान्यांच्या अफाट ताकदीवर , त्यांच्या ठायी असलेल्या जिजीविषाबद्दल अतोनात विश्वास होता. पाश जनसामान्यांची तुलना गवताशी करतो. तो म्हणतो,
"मैं घास हूं
मैं आपके हर किए-धरे पर उग आऊंगा
बम फेंक दो चाहे विश्वविद्यालय पर
बना दो होस्टल मलबे का ढेर
सुहागा फिरा दो भले ही हमारी झोपड़ियों पर
मुझे क्या करोगे?
मैं तो घास हूं, हर चीज ढक लूंगा
हर ढेर पर उग आऊंगा"

पाशच्या मते गवत दिसताना एकदम मामुली दिसत असतं, खूप कमकुवत, दुबळं वाटत असतं. पण त्याचं अस्तित्व संपवून टाकणं इतकं सोपं, सहज शक्य नसतं. त्याचप्रमाणे जनता असहाय्य असेल पिचलेली असेल पण कुठलीही सत्ता, कितीही क्रूर सत्ता असली तरीही ही जनता एकत्र येऊन त्यांना पळता भुई थोडी करू शकते. कितीही मिटवायचा प्रयत्न केला तरी लव्हाळ्यासारखी ही जनता तग धरून असते हेच तिचं सामर्थ्य आहे.

पाश वयाच्या ३८व्या वर्षी गेला. मृत्यूपूर्वी पाश अमेरिकेत वास्तव्यास गेला होता. मार्च महिन्यात आपल्या व्हिसाच्या नूतनीकरणासाठी तो पंजाबात परत आला होता. या कामासाठी २३ मार्चला तो दिल्लीला जाणार होता पण तत्पूर्वीच त्याला मारलं. १९८०च्या दशकात पंजाबमध्ये शिख सेपरेटिस्ट म्हणजेच खलिस्तानी चळवळ सुरू होती. पाशचा या साऱ्याला वैचारिक विरोध होता. यांपैकीच हंस राज आणि त्याच्या साथीदारानं पाशला गोळ्या झाडून मारलं. तो दिवस होता २३ मार्च १९८८, म्हणजेच भगतसिंगला फाशी दिली त्याचा स्मरणदिवस. जनकवी पाश त्या दिवशी संपला. मुक्तिबोधांच्या पंगतीत असणारा पाश, भगतसिंगशी साम्य साधणारा पाश, पंजाब साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळवून पंजाबी साहित्यात "लाल तारा" झालेला पाश, पंजाबी लोर्का अशी ओळख प्रस्थापित करणारा कवी पाश निर्घृणपणे मारला गेला. त्याची स्वप्नं तशीच अर्धी राहिली. जो स्वप्नं पाहणं फार महत्त्वाचं असं मानत आला तो संपून गेला स्वप्नं तशीच अर्ध्यात टाकून. पाशची एक अर्धवट कविता आहे, ती तो पूर्ण करू शकला नाही. पण आपण केवळ कल्पनाच करू शकतो पाशनं ही कविता पूर्ण केली असती तर काय झाली असती… पाश म्हणतो,
"मेहनत की लूट सबसे ख़तरनाक नहीं होती
पुलिस की मार सबसे ख़तरनाक नहीं होती
ग़द्दारी और लोभ की मुट्ठी सबसे ख़तरनाक नहीं होती
बैठे-बिठाए पकड़े जाना - बुरा तो है
सहमी-सी चुप में जकड़े जाना - बुरा तो है
पर सबसे ख़तरनाक नहीं होता
कपट के शोर में
सही होते हुए भी दब जाना - बुरा तो है
जुगनुओं की लौ में पढ़ना -बुरा तो है
मुट्ठियां भींचकर बस वक्‍़त निकाल लेना - बुरा तो है
सबसे ख़तरनाक नहीं होता

सबसे ख़तरनाक होता है
मुर्दा शांति से भर जाना
तड़प का न होना सब सहन कर जाना
घर से निकलना काम पर
और काम से लौटकर घर जाना
सबसे ख़तरनाक होता है
हमारे सपनों का मर जाना..."

पाशच्या लेखणीला लोक घाबरले असंच म्हणता येईल! त्याचा खून केला त्याला घाबरून. पण पाश माणूस म्हणून नसला तरी आजही, आजच्या परिस्थितीतही त्याच्या कविता तितक्याच लागू होतात; आजही त्याच्या कविता लढण्याचं बळ देतात. एनसीइआरटीच्या अकरावी हिंदीच्या पाठ्यपुस्तकात पाशच्या कवितांचा समावेश केला आहे. परंतु सध्या सत्तेत असणाऱ्या पक्षाच्या नेत्यांपैकी काहींना पाशच्या कविता या अभ्यासण्यायोग्य वाटत नाहीत, प्रक्षोभक वाटतात त्यामुळे त्यांनी अभ्येसक्रमातून या कविता वगळण्यात याव्यात अशी याचिका सादर केली आहे. एक अर्थी हे पाशच्या लेखणीला आज'ही' लोक घाबरत असल्याचं लक्षण आहे. ही पाशच्या लेखणीची, त्याच्या कवितांची ताकद आहे.

पाशच्या कविता, पाश वाचताना जाणवत राहतं पाश आज असता तरीही त्यानं हेच लिहिलं असतं; अधिक टोकेरी, अधिक विखारी झालं असतं हे कारण परिस्थिती तेव्हापेक्षाही जास्त चिघळलेली आहे. सत्ताधारी तेव्हापेक्षा आज जास्त लालची होत आहेत, दोन वर्गांतली दरी वाढतच गेलेली आहे. पण प्रश्न आजही उरतोच की त्या लोकांनी आजतरी पाशला लिहू दिलं असतं? की लिहूनही परत एकदा पाशला "मेरा नाम इस देश से खारीज कर दो" म्हणायची वेळ आली असती?

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet