भाषा आणि राष्ट्रवाद व्हाया गोवा

संकल्पना

भाषा आणि राष्ट्रवाद व्हाया गोवा

- कौस्तुभ नाईक

भारताच्या संदर्भात भाषा आणि राष्ट्रवाद ह्या विषयावर विचार करायचा झाला तर 'हिंदी विरुद्ध इतर भाषा', 'उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारत', 'हिंदी विरुद्ध इंग्रजी' असे काही प्रचलित विवाद समोर येतात. ह्या विवादांबद्दल आधीच खूप खर्डेघाशी झाली आहे आणि हल्लीच अमित शहांनी एक राष्ट्र एक भाषा ह्या तत्त्वांतर्गत हिंदीला अधिकृत राष्ट्रीय भाषेचा दर्जा देण्यासंबंधी एक विधान केले होते तेव्हा हे सर्व वाद पुन्हा उफाळूनही आले होते. पण हिंदीच्या पलीकडे भारताच्या अंतर्गत असे अनेक भाषिक वाद आहेत ज्यांच्याद्वारे भाषा आणि राष्ट्रवाद ह्यांच्यामधलं वरवर दिसणारं नातं आणि खोलवर असलेली तफावत अधोरेखित केली जाऊ शकते. प्रस्तुत लेखात मी गोव्याचा भाषिक वादाचे उदाहरण देऊन काही मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. गोव्याचं उदाहरण देण्याचं कारण हेच की गोव्याच्या भाषिक वादाचा इतिहास एकाच वेळेला प्रांतवाद आणि राष्ट्रवाद ह्या दोन्ही विचारसरणीची भाषिक बैठक किती मर्यादित आहे हे स्पष्ट करते आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या साम्राज्यवाद, हिंदूकेंद्रित, जातीवाद इत्यादी मुद्द्यांनाही स्पर्श करते.

फेब्रुवारी १९८७मध्ये 'गोवा, दमण आणि दीव राज्यभाषा कायदा' बहुमताने गोव्याच्या विधानसभेत संमत झाला. त्याअंतर्गत (देवनागरी लिपीत लिहिलेली) कोंकणी गोव्याची राज्यभाषा असे ठरविण्यात आले आणि मराठीला सहभाषेचा दर्जा दिला गेला. गोव्याचं सांस्कृतिक वेगळेपण जपण्यासाठी गोव्याला घटक राज्याचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी झाली आणि मे १९८७मध्ये दमण आणि दीव ह्या भागांसोबत संघप्रदेश असलेला गोव्याला घटक राज्याचा दर्जा देण्यातही आला. गोव्याचे सांस्कृतिक वेगळेपण म्हणजे नेमके काय? आणि ते वेगळे कोणापासून? आणि मूळ प्रश्न हा आहे की साडेचारशे वर्षाच्या गोव्याच्या साम्राज्यवादी इतिहासात ज्या गोव्यात पोर्तुगीज, मराठी, गुजराथी, कोंकणी ह्या भाषा बोलल्या व वापरल्या जायच्या त्या गोव्याची भाषिक अस्मिता केवळ कोंकणीच्या आधारे अधोरेखित करून नक्की काय साध्य झाले?

इतिहासात डोकावून पाहिल्यास गोवा हा एकभाषीय प्रदेश कधीच नव्हता. किंबहुना कुठलाही प्रदेश एकभाषीय नसतोच. सोळाव्या शतकापासून मराठी, कोंकणी आणि पोर्तुगीज ह्या तीन भाषा गोव्यात प्रामुख्याने वापरल्या जायच्या. त्यांचा वापर हा वर्गवार विभागलाही होता. उच्चवर्णीय कॅथॉलिक पोर्तुगीज तर इतर कॅथॉलिक समूह कोंकणी वापरत. ही कोंकणी रोमन लिपीत लिहिली जायची व तिच्या प्रसारामध्ये ख्रिस्ती धर्मप्रसारासाठी गोव्यात आलेल्या जेजुइट मिशनरींचा मोठा वाटा होता.

मराठी ही प्रामुख्याने हिंदू समूहांची भाषा होती. हिंदू उच्चवर्णीय समाजातील लोक मराठी व पोर्तुगीज ह्या दोन्हीही भाषा वापरत असत पण सामाजिक वर्तुळात कोकणीचा वापर टाळत असत. कोंकणीप्रमाणेच जेजुइट मिशनरींनी मराठीतही विपुल लेखन आणि धर्मसाहित्य निर्माण केले. फादर थॉमस स्टीफन्स ह्यांनी रचलेले 'ख्रिस्तपुराण' मराठी साहित्यविश्वाला नवे नाही. बायबलचा केवळ मराठी अनुवाद नव्हे तर नवीनच धर्मांतरीत झालेल्या समूहांना समजण्यासाठी सोपे जावे म्हणून ओवीबद्ध छंदात त्यांनी वैष्णवपंथी धर्तीवर त्याचे अनुसर्जन केले. नवधर्मांतरित कॅथॉलिक ब्राह्मणांमध्ये ख्रिस्तपुराण मोठ्या उत्साहाने वाचले जाई असे आढळते. मराठी भाषेचा वापर हा पोर्तुगीजकालीन राजकीय व्यवहारात पोर्तुगीज भाषेबरोबर होते असे. मराठीचा वापर देवळातील नोंदी ठेवण्यास, जमिनीबद्दलच्या कागदपत्रांत, आणि स्थानिक धंद्यात होत होता.

१५१०मध्ये अल्बुकर्कने आदिलशाहकडून गोवा बेट जिंकून पोर्तुगीज साम्राज्याची मुहूर्तमेढ आशिया खंडात रोवली. सोळाव्या शतकाच्या अखेरीस ईल्हास, बार्देस, मुरगाव आणि सालसेत असे चार प्रांत पोर्तुगीजांच्या अमलाखाली आले. ह्या भागांना जुन्या काबिजादी असे म्हणत. तसेच सध्याच्या गोवा प्रदेशातील इतर भाग, डिचोली, काणकोण, पेडणे, फोंडा, केपे, सांगे आणि सत्तरी हे अठराव्या शतकाच्या अखेरीस पोर्तुगीजांच्या अंमलाखाली आले व त्यांना नव्या काबिजादी असे संबोधले जाई.

नव्या काबिजादी 'इस्तादो दा इंडिया'मध्ये सामील झाल्यानंतर पोर्तुगीज सरकारचे स्थानिक भाषाविषयीचे धोरण काहीसे क्षीण झाले. १८४३मध्ये पोर्तुगीज सरकारला मराठी शाळा सुरू करण्याची गरज भासू लागली. ह्याचे कारण एक असे होते की नव्या काबिजादीतील लोकांनी पोर्तुगीज ही शैक्षणिक माध्यमाची भाषा म्हणून मान्य करण्यास विरोध दर्शवला. मराठीविषयी पोर्तुगीज सरकारच्या उदार धोरणाचे दुसरे कारण होते की स्थानिक कुलकर्णी जमिनीच्या कागदपत्रात फेरफार करत असत आणि तेथील निरक्षर गावकारांना (जमिनीचे मालक) हे उशिरा कळून येई व ते ह्याची फिर्याद सरकारकडे करत. सरकारला ह्या तक्रारींचा अतिरिक्त भार सहन करणे शक्य नव्हते. किंबहुना गावकरांना साक्षर करावे ह्या हेतूने काही मराठी शाळा नव्या काबिजादीमध्ये सुरू करण्यात आल्या. मराठी शाळा सुरू करण्याची मागणी कॅथॉलिक उच्चवर्णीय समाजानेही उचलून धरली. गोव्यात अनेक जातीसमूहांनी मराठा अस्मिता घोषित केली आहे. गोमंतकीय क्षत्रिय मराठा समाज (गाबीत, खारवी आणि पागी), गोमंतक मराठा समाज (देवळातील सेवेकरी आणि कलावंत समाज), क्षत्रिय नाईक भंडारी समाज, क्षत्रिय कोमरपंत समाज व गौड मराठा समाज ह्या सगळ्या जातीसमूहांचं मराठाकरण हे त्यांनी स्वतः:च्या जातीसमूहाचा इतिहास मराठा साम्राज्याच्या इतिहासाशी जोडून केलं होतं. जातीय शोषणाविरुद्ध लढा देण्यासाठी मराठाकरण केलं होतं असाही दावा काही इतिहासकारांनी मांडला आहे. ह्यातील गोमंतकीय क्षत्रिय मराठा समाज (गाबीत, खारवी आणि पागी), गोमंतक मराठा समाज (देवळातील सेवेकरी आणि कलावंत समाज), क्षत्रिय नाईक भंडारी समाज, क्षत्रिय कोमारपंत समाज व गौड मराठा समाज ह्यांना एकत्ररीत्या बहुजन समाज असेही ओळखले जाते. नव्या काबिजादितील मराठा साम्राज्याचे पूर्ववर्चस्व व सतराव्या शतकातील मराठा राजांनी केलेली गोव्यावरची आक्रमणे ह्या गोष्टींनी बहुजन वर्गातील ह्या मराठाकरणाच्या प्रक्रियेला पुष्टी दिली. ह्यामुळे बहुजन समाजासाठी मराठी ही त्यांची सांस्कृतिक ओळख बनली. ह्याच भावनांवर पुढे गोवा मुक्तीनंतर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची राजकीय चळवळ उभी राहिली आणि तिला बरेचसे यश मिळाले.

एकोणिसाव्या शतकातील ह्या सामाजिक उलथापालथीचे भाषिक राजकारणावर उमटलेले पडसाद म्हणजे विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून गोव्यातील जनतेत, ढोबळ मानाने भाषावार तीन गट पडले होते. मराठी ही हिंदू बहुजनांची भाषा, पोर्तुगीज ही उच्चवर्णीय कॅथॉलिकांची भाषा, रोमी कोंकणी ही बहुजन कॅथॉलिकांची भाषा आणि देवनागरी कोंकणी ही हिंदू सारस्वतांची भाषा बनली होती. काही हिंदू सारस्वत मराठीच्या बाजूने होते हेही नमूद करणे गरजेचे आहे. देवनागरी कोंकणीद्वारे आपली अस्मिता अधोरेखित करण्याचा हिंदू सारस्वतांचा प्रयत्न हा एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस सुरू होताना आढळतो. त्याआधी तसे ठळकपणे केल्याचे जाणवत नाही. उलट, त्यांना पोर्तुगीज राजवटीत शासकीय नोकरीत स्थान आणि हिंदू समूहावर त्यांचे असणारे वर्चस्व मिळवणे हे त्यांच्या मराठी आणि पोर्तुगीज भाषेच्या ज्ञानामुळे शक्य झाले होते. मग त्यांना देवनागरी कोंकणीद्वारे आपली अस्मितेची व्याख्या परत करावीशी का वाटली? माझ्या मते ह्याला दोन कारणे आहेत. त्यातलं पहिलं कारण म्हणजे महाराष्ट्रातील इतर ब्राह्मण समूहांकडून मिळणारी त्यांना सापत्नभावाची वागणूक. सारस्वत हे त्रिकर्मी ब्राह्मण मानले जातात आणि त्यांच्या मांसाहारामुळे मुख्यतः चितपावन आणि देशस्थ ह्या दोन प्रमुख ब्राह्मण समूहांकडून त्यांना अपेक्षित मान मिळत नसे. त्यामुळे आपण त्यांच्यापेक्षा वेगळे आहोत हे अधोरेखित करण्याच्या प्रयत्नांत हिंदू सारस्वत देवनागरी कोंकणीकडे वळले. मुंबईस्थित वामन रघुनाथ वर्दे वालावलीकर हे त्यांत अग्रस्थानी होते. त्यांनी देवनागरी कोंकणीत साहित्यलेखन केलेच पण आपले वेगळेपण सिद्ध करण्याच्या प्रयत्नांमध्ये त्यांनी मराठी आणि महाराष्ट्र ह्यांच्याविरुद्ध जहाल अशी मते आपल्या लेखांतून आणि भाषणातून प्रसिद्ध केली.

ह्या वादाला अजून एक संदर्भ गोवा मुक्तीनंतर प्राप्त झाला. स्वतंत्र गोव्यात झालेल्या पहिल्या निवडणुकीत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने बहुमताने सत्ता मिळवली. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे प्राबल्य नव्या काबिजादींमध्ये अधिक होते. बहुजन समाजाला सत्ताकारणात स्थान मिळवून देण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या ह्या पक्षासमोर तीन प्रमुख उद्देश होते. पहिला म्हणजे गावोगावी मराठी शाळा सुरू करून बहुजन समाजाला शिक्षित करणे, 'कसेल त्याची जमीन' ह्या तत्त्वावर जमीन मालकी हक्काचे पुनर्वाटप करणे आणि तिसरा म्हणजे गोवा महाराष्ट्रात विलीन करण्यासाठी जनमत तयार करणे. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर ह्यांनी गोव्याच्या कानाकोपऱ्यात मराठी शाळा उघडण्याचा सपाटा लावला. पण गोवा विलीनीकरणासंबंधी त्यांना जोरदार विरोध झाला. १९६७ साली विलीनीकरणाच्या मुद्द्यावर स्वतंत्र भारतात पहिल्यांदा जनमत कौल गोव्यात आजमावण्यात आला. गोव्याने महाराष्ट्रात विलीन व्हावे का संघप्रदेश म्हणून राहावे ह्यावर तो कौल घेतला गेला. विलीनीकरणाच्या विरोधात सर्वाधिक मते पडली आणि गोवा संघप्रदेश म्हणून कायम राहिला.

विलीनीकरणाच्या विरोधात गोव्यातील कॅथॉलिक समाज आणि सारस्वत समाज उभा राहिला. पण ह्या दोन्ही भिन्न समूहांचे एकमत व्हायला दोन वेगवेगळी कारणे होती. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची बैठक जरी बहुजन समाजाच्या उद्धाराची असली तरी त्याला काहीश्या हिंदूवादी राजकारणाची किनार होती. त्यामुळे गोव्यातील कॅथॉलिक समाज त्या बाबतीत साशंकच होता. दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे गोव्यासारख्या छोट्या प्रदेशात कॅथॉलिकांना आपले राजकीय अस्तित्व जपणे सोपे होते कारण हिंदू लोकसंख्या जरी वरचढ असली तरी कॅथॉलिक समाजाची लोकसंख्या अगदीच कमी नव्हती. जर गोवा महाराष्ट्रात विलीन झाला असता तर ते एका हिंदुबहुल प्रदेशात मिळून फारच अल्पसंख्याक झाले असते. पण सारस्वतांचे तसे नव्हते. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या राजकारणामुळे गोव्यात असलेल्या सारस्वत समाजाच्या वर्चस्वाला धोका निर्माण झाला होता. पोर्तुगीज सरकारशी त्यांच्या जवळीकेमुळे जमीन मालकी, देवस्थानातील हक्क, व्यापारावरचे हक्क त्यांना प्राप्त झाले होते आणि ह्या सर्वांद्वारे त्यांचे गोव्यातील समाजावर बऱ्यापैकी वर्चस्व स्थापन झाले होते. जर गोवा महाराष्ट्रात विलीन झाला असता तर ते तसेच राहील ह्याची शाश्वती नव्हती. आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या राजकारणामुळे गोव्यातील बहुजन समाज, ज्याने स्वतःला मराठा इतिहासाशी आणि पर्यायाने मराठा ज्ञातीसमूहाशी जोडले होते, सत्तेत येऊ लागला होता. तो बहुजन समाज गोवा महाराष्ट्रात विलीन झाल्यावर महाराष्ट्रातील मराठा समूहात मिसळून एक प्रबळ समाज म्हणून उदयास येण्याची शक्यता होती. आणि महाराष्ट्रात सारस्वतांच्या ब्राह्मणत्वावर नाही तरी प्रश्नचिन्ह उपस्थित होतच होते. हे सर्व टाळण्यासाठी आणि स्वतःचे वर्चस्व नवनिर्मित भारतीय लोकशाहीत पुनर्निर्वाचित करणे सारस्वतांना गरजेचे होते. म्हणून त्यांनी विलीनीकरणाच्या विरोधात मतदान केले.

विलीनीकरणावरच्या निर्णयाने गोव्याचे भाषिक राजकारण थांबले नाही. गोव्याची स्वतंत्र ओळख राखण्यासाठी आणि भविष्यात विलीनीकरणाची शक्यता टाळण्यासाठी गोव्याला नव्या भाषिक अस्मितेची गरज होती. जेणेकरून तो महाराष्ट्रापासून किती भिन्न आहे हे विलीनीकरणविरोधी गट ठळकपणे मांडू शकतील. भाषावार प्रांतरचना झालेल्या स्वतंत्र भारतात भाषिक अस्मिता ही प्रादेशिक सत्ता काबीज करण्याची किल्ली होती. त्यामुळे गोव्याची भाषा मराठी का कोंकणी हा जुना वाद परत निर्माण केला गेला. गोव्यातील हिंदू बहुजन समाज हा मराठीच्या बाजूने उभा राहिला तर हिंदू सारस्वत समाज आणि कॅथॉलिक समाज कोंकणीच्या बाजूने उभे राहिले. ह्या चळवळीने हिंसक वळणही घेतले आणि सरतेशेवटी १९८७ साली राज्यभाषा कायदा संमत होऊन देवनागरी कोंकणी हीच गोव्याच्या राष्ट्रभाषा असे ठरविण्यात आले. मराठीच्या प्रती गोमंतकीय हिंदू बहुजनांचे प्रेम पाहता मराठीला सहभाषेचा दर्जा देण्यात आला.

राज्यभाषा कायद्याच्या ह्या निर्णयांतर्गत दोन गोष्टी अधोरेखित होतात. कोंकणीची बाजू लढवताना मराठी ही गोव्याची भाषाच नव्हती, ती मराठी शाळा सुरू करण्यासाठी आणलेल्या महाराष्ट्रातील मास्तरांनी प्रचलित केली असा अपप्रचारही झाला. ज्यांना मराठी हवी असेल त्यांनी गोवा सोडून महाराष्ट्रात जावे (हे सध्याच्या 'भाजपाविरोधकांनी पाकिस्तानात जावे', ह्या धर्तीवर) असाही प्रवाद झाला. ह्या सर्व अपप्रचारामुळे गोमंतकीय मराठीचे जे काही योगदान होते ते केवळ गौण नव्हे तर एकूणच पुसून टाकण्याचे प्रयत्न झाले. दुसरी गोष्ट रोमी कोंकणीची. रोमी कोंकणीत विविध स्तरांवर साहित्यनिर्मिती सोळाव्या शतकापासून चालू होती. प्रामुख्याने ख्रिस्ती समाजातील लेखकांनी विविध साहित्यप्रकारांचे लेखन रोमी कोंकणीतून केले होते आणि आजतागायत करत आहे. रोमी कोंकणी चर्चमधून प्रचलित झाल्याने गोव्यातले ख्रिस्ती समाज विशेष आत्मीयतेने ह्या भाषेकडे बघतात. रोमी कोंकणीच्या शब्दकळेवर लॅटिन आणि पोर्तुगीज ह्या दोन भाषांचा प्रभाव बऱ्यापैकी आहे. ह्याउलट गोव्यातील हिंदूंमध्ये बोलल्या जाणाऱ्या कोंकणीत थोडाफार फरक करता येतो. देवनागरी कोंकणी म्हणून जी भाषा प्रमाण कोंकणी मानण्यात आली ती मुळातच सारस्वतांच्या कोंकणी बोलीशी मिळतीजुळती आहे. त्यामुळे पेडणे ते काणकोणपर्यंत बहुजनांच्या बोली कोंकणीलाही मूठमाती दिली गेली. देवनागरी लिपीतल्या कोंकणीला प्रमाण राज्यभाषा करण्याच्या प्रक्रियेत भारतीय भाषिक राष्ट्रवादाचे काही पैलू समोर येतात. पहिला म्हणजे उच्चवर्णीय हिंदूंची सांस्कृतिक ओळख, भाषा इतर समाजांच्या माथी मारून तिला प्रमाण बनविण्याचा घाट घालणे जेणेकरून समाजातील सांस्कृतिक वर्चस्व हे उच्चवर्णीयांकडेच राहील ह्याची दक्षता घेणे. रोमी कोंकणीला डावलले गेले कारण तिच्यावर 'विदेशी' भाषांचा प्रभाव होता आणि ती एका विदेशी लिपीमध्ये लिहिली जात होती. आजही रोमी कोंकणीतून लेखन करणाऱ्या लेखकांना साहित्य अकादमी पुरस्कारासाठी अर्ज करायचा असेल तर त्यांच्या रोमी कोंकणीत लिहिलेल्या साहित्याचे देवनागरीत लिप्यंतर करावे लागते. रोमी आणि देवनागरीसारखीच कन्नड आणि मल्याळम ह्या लिपींतही कोंकणी लिहिली जाते पण तेही साहित्य आणि पर्यायाने त्या साहित्याशी निगडित असलेली संस्कृती ही अधिकृततेच्या परिघाबाहेरच राहते. एकेकाळी ब्रिटिश भारतातल्या लोकांना पोर्तुगीजशासित गोव्यात यायला पासपोर्ट लागत असे. तेव्हा गोवा हा भारतासाठी विदेश होता. पण त्याच भागात रुजून विकसित झालेली रोमी कोंकणी ही भाषा गोव्याला भारतीय राष्ट्रवादाचा परिसस्पर्श होताच परकी झाली. प्रश्न भाषेचाही नसतोच. ह्या प्रक्रियेअंतर्गत त्या भाषेशी निगडीत असलेला समाज, त्यांचं अनुभवविश्व ह्या सगळ्याच गोष्ट अवैधतेच्या पाटाखाली येतात, अराष्ट्रीय आणि प्रसंगी राष्ट्रविरोधी बनतात.

गोव्यासारख्या छोट्या प्रदेशातसुद्धा भाषिक संस्कृतीची विविधता आणि तफावत पाहायला मिळते. ह्या तफावतीतून काही निरीक्षणे समोर येतात. पहिलं म्हणजे भाषा आणि भूभाग ह्यांचा नैसर्गिक संबंध कधीच नसतो. पण तो असल्याचे भासवणे आणि तो संबंध कृत्रिमरीत्या तयार करणे हे राष्ट्रवादाचे कार्य आहे. भाषेला मातृभाषेचा दर्जा देणे हा ह्याच प्रक्रियेचा भाग आहे. ह्याद्वारे भाषेचं नातं हे भावनेशी जोडून त्यामागच्या राजकारणाला बगल दिली जाते. भाषेचा आणि ती बोलणाऱ्या माणसांचा जनुकीय संबंध असल्याचे भासवले जाते. फ्रेंच तत्त्ववेत्ते देल्यूज आणि ग्वातारी ह्यांनी मातृभाषा असे काही नसते, तर कुठल्याही राजकीय प्रदेशात एका सांस्कृतिकदृष्ट्या प्रबळ, वर्चस्ववादी भाषेने दुसऱ्या भाषांवर केलेली मात असते असे म्हटले आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे भाषिक अस्मितांवर आधारलेले राष्ट्र आणि प्रदेश हे मुळातच भाषा संवर्धन किंवा तिच्या उत्कर्षावर कितीसे उत्सुक असतात ह्याचेही निरीक्षण करणे गरजेचे आहे. गोव्यातल्या उदाहरणात आपल्याला असे आढळून येते की गोव्यात कोंकणी अस्मिता निर्माण करण्यामागे जातीय वर्चस्व अबाधित राखण्याची महत्वाकांक्षा होती. भाषिक राजकारण हे केवळ त्यावरचे एक भावनिक आवरण होते. त्यामुळे समाजातील भेद अधिक तीव्र झाले. भाषिक प्रांतवाद आणि राष्ट्रवाद ह्यांच्या आहारी जाऊन सत्ता मिळवलेल्या बहुतेक प्रदेशांत आणि राष्ट्रांत थोड्याफार फरकाने हीच अवस्था आहे.

भाषा आपण सभोवतालच्या समाजाकडून शिकतो. त्यात भौगोलिक प्रदेशाचा काहीच वाटा नाही. भारतात भाषावार प्रांतरचनेमुळे आणि जगात इतर बऱ्याचश्या देशांत भाषावार राष्ट्रनिर्मिती झाल्याने आपण नेमकी ही गल्लत करतो. जगभर राष्ट्रवादी आणि साम्राज्यवादी शक्तींनी अनेक भाषिक संस्कृती दडपून स्वतःच्या वर्चस्ववादी संस्कृती लोकांवर लादल्या आहेत. माणसामाणसांत भेद करायचे ते एक प्रभावी हत्यार आहे. भाषांना राजकीय सीमांची बंधने नसतात. माणसांच्या स्थलांतराने भाषाही स्थलांतरित होतात. इतर भाषांशी संग करून स्वतःला तसेच इतर भाषांनाही बदलवून टाकतात. ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. राष्ट्र ही संकल्पना त्याविरुद्ध आहे. राष्ट्र सीमा आखून लोकांची ये-जा करण्याचे मार्ग अडवते, त्यांना रोखून त्यांच्यावर अंकुश ठेवू पाहते. सांस्कृतिक विविधता ही वस्तुस्थिती आहे. सांस्कृतिकदृष्ट्या एकजिनसी समाजावर राज्य करणे आणि सत्तेचे केंद्रीकरण करणे सोपे आहे. लोकशाहीत विविधता जपणे म्हणूनच गरजेचे आहे कारण समाजाला एकजिनसी बनविण्याच्या, त्यातले अंतर्विरोध, इतिहास, अनुभव पुसून टाकण्याच्या प्रक्रियेला ते सतत आव्हान देत राहतात.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

गोवा महाराष्ट्रात विलिन न होण्यामागे असलेले गुंतागुंतीचे भाषिक राजकीय प्रवाह प्रथमच समजले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख अतिशय आवडला

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख आवडला. मुख्य कारण गोव्याचा इतिहास आणि इथला राष्ट्रवाद जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे. ते दुसऱ्या राज्यांतून फक्त पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना कळणार नाही. समुद्र, वाळू, सोरा, फिशफुड,काजू ,आणि मांडवीतील क्रूज, नाच यापलिकडे विचार करत नसावेत.
मी गोव्यात फार उशिरा (वयाच्या) एकदाच गेलो कारण वरील यादीतील कोणतीच गोष्ट भुलवत नव्हती. तरी काय आहे हे पाहण्यासाठी ओफसीजनला म्हणजे होळीनंतर गेलो.
थोडेफार जाणून घेण्यासाठी कोकणी भाषेचे विडिओ पाहिले (कौस्तुभ कंसारेचे).
एकमेव कोकणी दैनिक (देवनागरीतले कोंकणी) भांगरभूय अजुनही epaper*1 उपलब्ध आहे. आणि एक कोंकणी खोबरोही रोज युट्युबवर येतात.

#1. thegoan.net >> भांगरभूय. ( इथे इतर चार पेपर आहेत.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गोव्याच्या लोकांना महाराष्ट्रात जायचे की कर्नाटकात असा पर्याय ठेवला असता तर गोवेकरांनी महाराष्ट्राला पसंती दिली असती अशी चर्चा मी लहानपणी ऐकली होती. तेही तितकेच न-पर्यायी धोरण ठरले असते असे मला वाटते. मोठ्या व्यवस्थेत आपला आवाज हरवून जाऊ नये म्हणून आपली अस्मिता राखण्याचा गोवेकारांचा निर्णय त्यांच्या जागी योग्य असला तरी मराठी भाषकांबाबत केंद्र सरकारकडून पुन्हा पक्षपात अशी भावना तेव्हा झालेली होती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख अतिशय आवडला. निकटच्या परिवारात दोन्ही बाजूंकडील लोकांचा भरणा असल्याने (भाषक/ज्ञातीसंदर्भात), वाचताना जागोजाग 'अगदी, अगदी!' असं वाटत राहिलं.

किंचित अवांतर: फ्रेंचभाषक कॅमेरूनमध्ये इंग्रजी भाषकांनी चालवलेल्या अलगतावादी चळवळीची या संदर्भात (भाषा आणि राष्ट्रवाद) आठवण झाली. या दोन (मूळच्या) युरोपियन भाषांच्या झगड्यात आजवर सुमारे २००० कॅमेरुनियांनी आपले प्राण गमावले आहेत! पहा: https://en.wikipedia.org/wiki/Anglophone_Crisis

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक2
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अगदी अगदी, सेम टू सेम!

अजूनही अवांतर - कॅमेरूनच्या उल्लेखावरून फारा वर्षांपूर्वी लिहिलेल्या रवांडावरील लेखाची आठवण झाली!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गोव्याच्या भाषिक अस्मितांचा हा धावता आढावा आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गोव्यातील मराठी-कोकणी ह्या वादामागील वर्गीय पार्श्वभूमी माहितीच नव्हती! मिपावर गोव्याबद्दल काही चर्चा वाचली होती तेव्हा तेथील काही गोवेकर डिफेन्सिव्ह मोडमध्येच होते, मराठीचा कोकणीवर अन्याव वगैरेचा पाढा वाचत होते. त्यांना हे दाखवलं पाहिजे.

एकुणात सांगायचे तर, माझ्यासाठी अस्सल चुलीवरची नवीन माहिती, आणि नुसतीच नवीन माहिती नाही तर दृष्टिकोन बदलणारी नवीन माहिती. त्यामुळे लेख खूप आवडला, अतिशय संग्राह्य. पीएचडी लवकर संपवा आणि हे सगळं पुस्तकरूपात लवकरात लवकर वाचायला द्या. म्हणजे आम्ही वाचायला आणि तुम्ही नव्या मुद्यावर रिसर्च करायला मोकळे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं