"गाय ने गोबर कर दिया है" : धूमिलच्या कवितांबद्दल

संकल्पना

"गाय ने गोबर कर दिया है" : धूमिलच्या कवितांबद्दल

- स्वामी संकेतानंद

"हवा से फड़फड़ाते हिन्दुस्तान के नक़्शे पर
गाय ने गोबर कर दिया है। "

ह्या वर्तमानकाळाशी अगदीच सुसंगत ओळी लिहिणारा कवी १९७५ला या जगातून गेला होता. 'धूमिल' या नावाने कविता लिहिणारा सुदामा पाण्डेय 'बीस साल बाद' या कवितेतून स्वातंत्र्यप्राप्तीच्या वीस वर्षानंतरचे दृश्य दाखवतो, पण कवीचे द्रष्टेपण म्हणा किंवा आपले दुर्दैव म्हणा, जवळपास पूर्ण कविताच आजही प्रासंगिक असल्याचे लक्षात येते. धूमिलच्या काव्याचे वैशिष्ट्य हे की, त्यात भारतीय राजकारणाच्या काही मूलभूत घटकांच्या अपरिवर्तनीयतेमुळे ती कायम प्रासंगिक वाटते. भारतीय लोकशाहीला थेट, बोचरे सवाल करणारा, जनतेच्या शोषणाविरुद्ध जनतेच्या भाषेत, बोलीभाषेतील शब्दांचा चपखल वापर करून व्यक्त होणाऱ्या काही मोजक्या समकालीन हिंदी कवींमध्ये धूमिलचा समावेश होतो.

मगर यह वक़्त घबराये हुए लोगों की शर्म
आँकने का नहीं
और न यह पूछने का –
कि संत और सिपाही में
देश का सबसे बड़ा दुर्भाग्य कौन है!

'साधू' आणि 'सैनिक' यांना देशाचं दुर्भाग्य म्हणणाऱ्या सुदामा पाण्डेय यांचा जन्म ०९ नोव्हेंबर, १९३६ रोजी वाराणसीजवळील खेवली गावात झाला. आर्थिक परिस्थितीमुळे फार शिक्षण घेता आलं नाही आणि पोटापाण्यासाठी छोट्यामोठ्या नोकऱ्या करत राहिले. सुदामा तिवारी नावाच्या वाराणसीच्याच दुसऱ्या एका कविसोबत लोकांनी गल्लत करू नये म्हणून सुदामा पाण्डेय यांनी 'धूमिल' या नावाने कविता लिहिणे सुरू केले. १९७२ साली प्रकाशित झालेला 'संसद से सड़क तक' हा त्यांच्या हयातीत प्रकाशित झालेला त्यांचा पहिला आणि एकमेव गंभीर प्रयत्न. १० फेब्रुवारी, १९७५ रोजी ब्रेन ट्यूमरने वयाच्या ३८व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांचे इतर दोन काव्यसंग्रह 'कल सुनना मुझे' आणि 'सुदामा पाण्डे का प्रजातंत्र' त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाले.

धूमिल
कवी धूमिल - 'कविताकोश'मधून साभार.

धूमिलच्या कवितांचा उगम तत्कालिन साहित्य चळवळींच्या आणि राजकीय घडामोडींच्या परिप्रेक्ष्यात पाहता येतो. ६०च्या दशकात कवींचा स्वप्नभंग होत रोमँटीक प्रवाह क्षीण होत गेला आणि नवकवितेचा, वास्तववादी कवितेचा प्रवाह वेग धारण करत गेला. बीट जनरेशनच्या कवितांचा प्रभाव भारतात जाणवू लागला होता. भारतात त्यांच्यापासून प्रेरणा घेत हंग्री जनरेशन, विद्रोही, वास्तववादी अशा साहित्यिक चळवळी सुरू होत होत्या. कवितांना रोमँटिक, काल्पनिक जगातून बाहेर आणत त्यांना वास्तविक जगाचे उघडेनागडे रूप दाखवले गेले, त्याकरिता भाषाही आलंकारिक, काहीशी बोजड, गेय न वापरता थेट, बोलीस्वरूप, संवाद-स्वरूपाची वापरली जाऊ लागली. या हिंदी नवकवितेच्या कालखंडात धूमिल हे महत्त्वाचे नाव ठरले. त्यांची कविता सर्वसामान्य भारतीयांचा स्वातंत्र्योत्तर राजकारणाने झालेला स्वप्नभंग स्पष्टपणे, तीक्ष्ण आणि औपरोधिक शब्दांत नोंदवते. स्वातंत्र्य मिळून, प्रजासत्ताक येऊन पुरेसा काळ लोटलेला आहे आणि अजूनही गरिबी, उपासमार, बेरोजगारी, शोषण या समस्या सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी जनतेने जी स्वप्ने पाहिली होती, ती केवळ स्वप्नेच असून प्रत्यक्षात उतरणार नाहीत, असे निराशेचे वातावरण भोवताली आहे. खुर्चीसाठी खालच्या थराचे राजकारण, आयाराम-गयाराम संस्कृती नित्याची झाली आहे. लायसन्स राजच्या काळात काही मोजक्या, शासनाच्या जवळ असलेल्या भांडवलवाद्यांचा फायदा होताना दिसतो आहे. समाजवाद क्षीण होऊन भांडवलवाद प्रबळ होत आहे. धूमिलच्या कविता या सर्वांविरुद्ध आवाज उठवतात. त्यांच्या कवितांचा विरोधी स्वर हा डाव्या भूमिकेतून, विचारसरणीतून येतो. पण तरीही त्यांच्या कवितेत 'विद्रोहाचे' थेट आवाहन नाही. त्यांची कविता जनतेच्या वेदनेला, आक्रोशाला वाट करून देते. त्याकरिता ती संसदेवर हल्ला करते, पण संसदीय लोकशाहीला उलथून आणायची भाषा करत नाही. धूमिलची कविता याही दृष्टीने वेगळी ठरते. 'विद्रोह' या कवितेतून कदाचित त्यांची विद्रोहासंबंधी भूमिका पुढे येते,
'ठीक है, यदि कुछ नहीं तो विद्रोह ही सही'
— हँसमुख बनिए ने कहा —
'मेरे पास उसका भी बाज़ार है'
तुमच्या विद्रोहाचाही सत्तारूढ व्यापारी 'समारोह' करतील, अशी भीती धूमिल व्यक्त करतात.

'रोटी और संसद' या कवितेतही राजकारण्यांकडे जनतेच्या भूकेशी खेळणाऱ्याच्या नजरेने पाहतात. 'राजकारण हे असं आहे, सामान्य माणूस इथं फार काही करू शकणार नाही', ही भूमिका त्यांच्या कवितांमधून वारंवार मांडली जाते.

'मोचीराम' ही धूमिलची अत्यंत गाजलेल्या कवितांपैकी एक आहे. मोचीरामच्या संवांदांतून धूमिल त्यांचेच तत्त्वज्ञान मांडतात. इथे नारायण सुर्वे आणि त्यांचे एखाद्या कामगाराच्या(शीगवाला, पोर्टर) संवादाच्या माध्यमातून आपले विचार मांडणे आठवते. अर्थात, सुर्वे आणि धूमिल यांच्या शैलींत फारसे साम्य नाही. आपल्या व्यवसायातले दॄष्टांत वापरून समानतेचा संदेश देणे, या अंगाने पाहिल्यास मध्ययुगीन कबीर, रैदास (रविदास) इत्यादी संतकवींच्या जवळ मोचीराम पोहोचतो, असे म्हणता येईल; पण 'मोचीराम' ही काल्पनिक व्यक्तिरेखा आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. हा सुदामा पाण्डेय यांचा जीवनानुभव नाही. पण कवितेच्या दृष्टीने 'मोचीराम'चा पट मोठा आहे.

न कोई छोटा है
न कोई बड़ा है
मेरे लिये, हर आदमी एक जोड़ी जूता है

इथून सुरू झालेला हा प्रवास, मानवी स्वभावाच्या, व्यवहाराच्या अनेक पैलूंवर भाष्य करत...
जबकि मैं जानता हूँ कि ‘इन्कार से भरी हुई एक चीख़'
और ‘एक समझदार चुप'
दोनों का मतलब एक है-
भविष्य गढ़ने में
… इथवर येऊन पोहोचतो, तेव्हा आपल्या लक्षात येते की 'मोचीराम'च्या निमित्ताने माणसाच्या स्वार्थावर, दलालखोर स्वभावावर आणि एकूणच मानवी मूल्यांच्या ऱ्हासावरच भाष्य करायचे आहे. इथे पुन्हा सुर्वेंचा "सबको पैसेने खा डाला" म्हणणारा 'शीगवाला' आठवतो.

'मोचीराम'च्या एका ओळीने काही वर्षांपूर्वी गदारोळ माजवला होता. एनसीईआरटीने 'मोचीराम'चा समावेश पाठ्यक्रमात केला होता. तिथल्या,
अगर सही तर्क नहीं है
तो रामनामी बेंचकर या रण्डियों की
दलाली करके रोज़ी कमाने में
कोई फर्क नहीं है
या ओळींतील 'रामनामी' आणि 'रण्डी' हे शब्द एकाच ओळीत आलेले पाहून रामाचा मक्ता घेतलेल्या पक्षाने गहजब केला नसता तरच नवल! ही कविता पाठ्यक्रमातून काढूनच ते शांत झाले आणि धूमिल पुन्हा हसला! धूमिल हा हिन्दी पट्ट्यातील राजकारण्यांच्या भाषणांत वारंवार येणारा कवि आहे.(उदा. "मेरे देश की संसद मौन है" ही ओळ) कारण तो राजकारणावर कटाक्ष टाकतो. त्याच्या कवितांच्या ओळी कसलेला राजकारणी वापरून 'आपण इतरांहून वेगळे आहोत' हे सांगू शकतो. पण त्यांना सोयीचा असेल तेव्हाच धूमिल वापरला जातो. इतर वेळेस धूमिल गैरसोयीचा ठरतो.

देश, देशभक्ती, यावर धूमिलने रोमँटिक कवींपेक्षा वेगळी भूमिका मांडली. नागर्जुन, मुक्तिबोध या इतर साठोत्तरी नवकवींप्रमाणे त्याचा देशभक्ती, देशप्रेम यांनी मोहभंग केला आहे.
"हर तरफ़ धुआँ है" या कवितेत धूमिल म्हणतो,
जो दांतों और दलदलों का दलाल है
वही देशभक्त है

कवितेचा समारोप करताना धूमिल लिहितो,
यहाँ, सिर्फ़, वह आदमी, देश के क़रीब है
जो या तो मूर्ख है
या फिर गरीब है

किंवा शान्तिपाठ या कवितेत धूमिल लिहितो,
देश-प्रेम की भट्ठी जलाकर
मैं अपनी ठण्डी मांसपेशियों को विदेशी मुद्रा में
ढाल राह हूँ।

पण हा स्वप्नभंग कशाने झाला आहे? फक्त राजकीय माकडचेष्टांनी का? तर नाही. धूमिलच्या कवितेत भूक, गरीबी पुन्हापुन्हा येते. शोषितांचा स्वप्नभंग पुन्हापुन्हा येतो. धूमिल या सर्व समस्यांना भारतीय लोकशाहीचे अपयश मानतो आणि त्याचे निराश मन पुन्हा विचारते,
क्या आज़ादी सिर्फ़ तीन थके हुए रंगों का नाम है
जिन्हें एक पहिया ढोता है
या इसका कोई खास मतलब होता है?

डाव्या विचारसरणीतून आलेल्या धूमिलचा तत्कालीन समाजवादानेदेखील स्वप्नभंग केला होता. समाजवादी राजकारण्यांनी समाजवादाचा फक्त राजकीय फायद्याकरिता वापर करणे सुरू केले होते. धूमिल या बेगडी समाजवादावरही आपल्या शैलीत भाष्य करतो,
मगर मैं जानता हूँ कि मेरे देश का समाजवाद
माल गोदाम में लटकती हुई
उन बाल्टियों की तरह है जिस पर आग लिखा है।
और उनमें बालू और पानी भरा है।

धूमिलच्या कवितेत वारंवार येणारा दुसरा शब्द म्हणजे 'भाषा'. धूमिलने भाषेवर पुष्कळच विचार केला आहे. त्याची कविता, त्यातील भाषा ही त्याने मुद्दाम घडवली होती, हे आपल्या लक्षात येते. धूमिलच्या मते भाषेचे कार्य व्यापक आहे. ती फक्त अभिव्यक्तीचे माध्यम उरत नाही. मोचीराम कवितेत 'माणसाला भाषा चावते' असे तो म्हणतो, पुन्हा भाषेवर टिप्पणी करताना 'भाषेवर माणसाचा नव्हे, तर जातीचा अधिकार आहे,' असे मोचीराम म्हणतो. 'जनतंत्र का सूर्योदय' मध्ये धूमिल भाषेला 'लाचार शोषित स्त्री'ची उपमा देतो. 'पटकथा' या दीर्घ कवितेत भूक माणसाला पशुतेकडे नेते, त्याची भाषा 'खाते', हे सांगतो.

मगर तुम्हारी भूख और भाषा में
यदि सही दूरी नहीं है
तो तुम अपने-आपको आदमी मत कहो

धूमिलच्या कवितेत सर्वत्र आक्रोशाला, वेदनेला वाट करून दिलेली दिसेल. कुठेही 'पर्याय' द्यायचा प्रयत्न नाही. धूमिल 'क्रांतिकारी' कवी नाही, तो जनतेच्या भावनांना शब्द देणारा कवी आहे. धूमिल स्वतः कोणत्याही चळवळीचा भाग नव्हता, रस्त्यावर उतरून त्याने आंदोलने केली नाहीत. कवी म्हणून आपल्या आणि जनतेच्या भावना जनभाषेत मांडणे, हे त्याने इमानेइतबारे केले.

सिर्फ एक शोर है
जिसमें कानों के पर्दे फटे जा रहे हैं
शासन सुरक्षा रोज़गार शिक्षा …
राष्ट्रधर्म देशहित हिंसा अहिंसा…
सैन्यशक्ति देशभक्ति आजा़दी वीसा…
वाद बिरादरी भूख भीख भाषा…
शान्ति क्रान्ति शीतयुद्ध एटमबम सीमा…
एकता सीढ़ियाँ साहित्यिक पीढ़ियाँ निराशा…
झाँय-झाँय,खाँय-खाँय,हाय-हाय,साँय-साँय…

बधीर करणाऱ्या या गोंधळातही धूमिल क्रांतिची भाषा करत नाही, तर हा देश म्हणजे आपले कारागृह आहे, हे तो मान्य करतो. त्याला ही कैद मंजूर आहे.

घृणा में
डूबा हुआ सारा का सारा देश
पहले की तरह आज भी
मेरा कारागार है।

आत्मपरीक्षण करताना धूमिल स्वतःच्या मर्यादा स्पष्टपणे सांगतो,
अन्त में कहूँगा
सिर्फ इतना कहूँगा
हाँ हाँ मैं कवि हूँ,
कवि - याने भाषा में
भदेस हूँ
इस कदर कायर हूँ
कि उत्तरप्रदेश हूँ।

या ओळी वाचताना भेकडपणाला उत्तर प्रदेशची उपमा खरेतर आजही देता येईल, असे वाटून जाते.

वर्तमानकाळात देश पुन्हा नव्या स्वप्नभंगाच्या उंबरठ्यावर आहे का? कोट्यवधी नागरिकांना नवीन 'मसीहा' मिळाला आहे आणि तो त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन आला आहे, असे वाटते. ज्या गोदोची ते गेली सत्तर वर्षे वाट पाहत होते, तो अखेर आला आहे, यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत, तर पुन्हा त्यांचा स्वप्नभंग होईल का आणि धूमिलला जर 'पिछले बीस सालों में कुछ नहीं बदला' असे वाटले, तसेच त्यांना 'पिछले पचहत्तर सालों में कुछ नहीं बदला' असे वाटेल का? या स्वप्नभंगाची परिणती कशात होईल? निव्वळ नव्या साहित्यप्रवाहात की याहीपेक्षा बृहत्‌ स्तरावर, राजकीय-सामाजिक पातळीवर काही घडेल? की यातले काहीच घडणार नाही आणि...

और जलते हुए जनतन्त्र के सूर्योदय में
शरीक़ होने के लिए
तुम, चुपचाप, अपनी दिनचर्या का
पिछला दरवाज़ा खोलकर
बाहर आ जाओगे

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
4.666665
Your rating: None Average: 4.7 (3 votes)

प्रतिक्रिया

>>>>>>>>> अगर सही तर्क नहीं है
तो रामनामी बेंचकर या रण्डियों की
दलाली करके रोज़ी कमाने में
कोई फर्क नहीं है>>>>>>>>
वाट्टेल ते सेन्सेशनल विधान आहे अशी 'नी-जर्क रिॲक्शन' झाली. पण मग 'बेचकर' हा शब्द वाचला आणि तो तर्क पटला.
___________________
ओळख आवडली. कविता शोधून वाचल्या, पण प्रत्येक कवितेमागे तत्कालिन संदर्भ असावे असे उगाचच वाटून गेले. मला असे वाटले की आयसोलेटेड या कविता वाचता येणार नाहीत. जसे ठाकऱ्यांची व्यंगचित्रे, त्या त्या काळचा संदर्भ लक्षात घेतला तर खूप एन्जॉय करता येतात, नाहीतर तितकेसे एन्जॉय करता येत नाही तसे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

मस्त! धूमिलची कवीता वाचायला हवी..

"इस कदर कायर हूँ
कि उत्तरप्रदेश हूँ।" हे वाचल्यावर झटकन आठवले राग दरबारीमधले बैद्यजी, सनीचर, प्रिन्सिपल, रंगनाथ आणि लंगड..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख अतिशय आवडला. अनेक मित्रमैत्रिणींना तो पाठवत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

लेख खुप आवडला...
हिन्दी कथा कविताकारांचा धांडोळा घेणं बर्याच दिवसांपासून 'टुडू'वर अहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0