स्वच्छंदी कोशातलं स्वप्नमय जग : टिळकोत्तर काळातल्या महाराष्ट्रीय पुरोगामित्वाबद्दल काही नोंदी

संकीर्ण

स्वच्छंदी कोशातलं स्वप्नमय जग: टिळकोत्तर काळातल्या महाराष्ट्रीय पुरोगामित्वाबद्दल काही नोंदी

- राहुल सरवटे

नऊ सप्टेंबर १९२३ रोजी मनोरमा आणि श्रीधर या दोघा रानडे पतीपत्नींच्या प्रोत्साहन आणि पुढाकारातून नगरच्या डॉ. वासुदेवराव देशपांड्यांनी त्यांच्याच नात्यातल्या शांताबाई शिरोळकर ह्या विधवा स्त्रीशी वैदिक पद्धतीनं लग्न केलं. देशपांडे कुटुंबाचा ह्या लग्नाला विरोध असल्यामुळे लग्न पुण्यात झालं. हा विवाह अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण होता. पहिलं म्हणजे, विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता अगदी १८५६मध्येच मिळाली असली तरी अशा विवाहांचं प्रमाण तुरळक असे आणि अशी लग्नं मुख्यत: अल्पवयीन आणि विनापत्य विधवांची होत असत. इथे शांताबाईंना तर एक मुलगी होती. दुसरं म्हणजे, हे लग्न लोकमान्य टिळकांच्या गायकवाड वाड्यात लागलं आणि त्याच्या नियोजनात टिळकांचे पुत्र रामभाऊ आणि श्रीधरपंत यांचा सक्रीय सहभाग होता. अनेक सुधारणावादी मंडळी लग्नाला उपस्थित होती. शिवाय, त्या काळाच्या संदर्भातली एक विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, ह्या लग्नात एक सुशिक्षित मुसलमान मुलगी 'करवली' म्हणून सहभागी झाली होती. (दुर्दैवानं ह्या मुलीविषयी इतर – म्हणजे तिचं नाव काय होतं, इत्यादी. – काहीही माहिती सापडत नाही.)

खरं पाहता, वैदिक पद्धतीच्या ब्राह्मणांच्या लग्नांत मुसलमान मुलगी 'करवली' असणं हे जरी काहीसं विस्मयकारक असलं तरीही, वर म्हटल्याप्रमाणे, विधवाविवाहांना कायदेशीर मान्यता मिळून तसा बराच काळ लोटला होता आणि विसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात अश्या विवाहांची समाजाला तितकीशी अपूर्वाई उरली नव्हती. उलट, इंग्रजी शिक्षणाच्या आणि सुधारकी विचारांच्या प्रभावातून अनेक तरुण मंडळी, "लग्न करेन तर विधवेशीच" असा निश्चयसुद्धा करत असत. रविकिरण मंडळाचे अध्वर्यू असलेले माधवराव पटवर्धन (माधव जुलिअन) ह्यांनी स्वतः बराच काळ अशीच वैयक्तिक मनीषा बाळगली होती. न्यायमूर्ती रानड्यांच्या काळातला सामाजिक सुधारणांना असणारा कडवा विरोध आता बोथट झाला होता. आपल्या प्रथम लग्नानंतर विधुर झालेल्या न्यायमूर्ती रानड्यांना स्वतः वडिलांच्या इच्छेपुढे मान तुकवावी लागली आणि त्यानंतर एका अकरा वर्षाच्या मुलीशी १८७३ साली त्यांनी पुनर्विवाह केला होता. सनातनी पक्ष याबद्दल रानड्यांची बराच काळ रेवडी उडवत असे. लग्नासंदर्भात वैयक्तिक निर्णयाला प्राधान्य देण्याबद्दल न्यायमूर्ती रानड्यांच्या तुलनेत श्रीधर आणि मनोरमा ही पुढच्या पिढीतली रानडे मंडळी अधिक आग्रही म्हणायला हवीत. त्यांनी स्वतः प्रेमविवाह केलेला होता. आणि पुण्यासारख्या सनातन्यांचं प्राबल्य असणाऱ्या ठिकाणी ही निश्चितच काहीशी नवलाईची गोष्ट होती. रानडे दंपती दोघंही कवी होते आणि पुण्यात नव्यानं उदयाला येत असणाऱ्या अनेक साहित्यविषयक संस्थांचे सदस्य होते.

ह्या काळात पुण्यात आणि एकूणच बृहन्महाराष्ट्रात – प्रचलित महाराष्ट्राबाहेरच्या बडोदा, इंदूर, देवास अश्या मराठी भाषक विभागांना सामावून घेण्यासाठी ही संज्ञा वापरली जाई – कितीएक कवीमंडळांची, काव्यप्रेमी वर्तुळांची सुरुवात होऊ लागली होती. देवास इथलं शारदोपासक मंडळ (१९२०), राम गणेश गडकऱ्यांनी स्थापन केलेलं तुतारी मंडळ (पुणे, १९११), काव्यप्रसारक मंडळ (ठाणे, १९२३) गोविंदाग्रज मंडळ (दादर, १९२३), भारतकवि मंडळ (कोल्हापूर, १९२१), वीणामंडळ (पुणे, १९२१), श्रीमहाराष्ट्रशारदामंदिर (पुणे, १९२१), अजमेर इथलं तांबे मंडळ (१९२३) असे अनेक कवितागट सुरू झाले होते. ह्या मंडळांतर्फे काव्यविषयक तात्त्विक चर्चा करणं, कवींचे फोटो आणि चरित्रं मिळवणं, गतकवींचे स्मृतिदिन साजरे करणं, कविसंमेलन भरवणं, काव्यवाचन करणं असे अनेक काव्यविषयक उपक्रम सुरू करण्यात आले होते. या सगळ्यातून काव्यप्रेमानं गजबजलेलं वातावरण निर्माण झालं. महाराष्ट्र साहित्य परिषद १९०६ सालीच स्थापन झालेली होती. विदर्भ साहित्य संघही १९२३ साली नागपुरात सुरू झाला. १९२२ साली श्रीमहाराष्ट्रशारदा मंदिर या संस्थेनं अखिल महाराष्ट्र काव्यसंमेलन भरवण्यात पुढाकार घेतला होता. आणि इथून पुढे आपल्याला विविध भौगोलिक स्तरावरची, निरनिराळ्या सामाजिक गटांची साहित्य संमेलनं नेमानं भरू लागलेली दिसतात.

ह्यांतली बहुतेक मंडळं अल्पजीवी ठरली असली तरीही या काळात कवितेच्या क्षेत्रातलं वातावरण किती भारावलेलं होतं ह्याची कल्पना यांवरून येऊ शकेल. ह्याकाळात साहित्याला एक संस्थात्मक आकार येऊ लागला होता आणि आता साहित्य हे निव्वळ राष्ट्रीय प्रबोधनाचं माध्यम न उरता, एक सुरम्य, रोमांचक आणि प्रगतीशील ठिकाण बनू पाहत होतं. १९२० नंतरच्या टिळकोत्तर महाराष्ट्रात साहित्य एक नवी सार्वभौम घटना म्हणून आकाराला आलं, जिचा महाराष्ट्रातल्या शहरी सुशिक्षित ब्राह्मण वर्गाच्या बदलत्या सामाजिक स्थानाशी घनिष्ठ संबंध होता.

अर्थात, ह्या घटनेची व्यापक राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेणंही आवश्यक आहे. १९१९ साली मॉन्टेग्यू-चेम्सफर्ड सुधारणा जाहीर झाल्या, ज्यातून निवडणुकांना अभूतपूर्व राजकीय महत्त्व प्राप्त झालं. लोकशाहीचं हे संख्याधारित स्वरूप आजवर राजकारणात अग्रेसर असणऱ्या ब्राह्मण वर्गाच्या हितसंबंधांच्या दृष्टीनं काही अनुकूल घटना नव्हती. दुसरीकडे, विसाव्या शतकाच्या अगदी सुरुवातीला घडलेल्या वेदोक्त प्रकरणातून ब्राह्मणेतर चळवळ अतिशय आक्रमक स्वरुपात पुढे आलेली होती. शाहू महाराजांमुळे ब्राह्मणेतर चळवळीला बहुजन समाजात एक व्यापक पाया लाभलेला होता. वा. रा. कोठारी, प्रबोधनकार ठाकरे, भास्करराव जाधव, भाऊराव पाटील, विठ्ठल रामजी शिंदे, दिनकरराव जवळकर असे नव्या दमाचे ब्राह्मणेतर शिलेदार नव्या बहुजनकेंद्री राजकारणाचं सूतोवाच करत होते. टिळकोत्तर काळात, एकीकडे टिळकांचे सुपुत्र श्रीधरपंत टिळकांनी बाबासाहेब आंबेडकरांसोबत गायकवाड वाड्यातच समता संघाची स्थापना केली होती, तर दुसरीकडे भारतीय राजकारणाचं नवं प्रारूप पूर्णपणे गांधींभोवती एकवटलं होतं आणि महाराष्ट्रातल्या टिळकपक्षीय नेतृत्वाची घसरण स्पष्ट दिसू लागली होती.

ब्राह्मणेतर चळवळीचे ब्राह्मणी विचारविश्वावर दूरगामी परिणाम झाले. मराठी वैचारिक आणि सांस्कृतिक जग मुख्यत: ब्राह्मणांच्या वर्चस्वाखाली असूनही, ब्राह्मणेतर साहित्यामुळे ब्राह्मणांत एका बाजूला काहीएक अंतर्मुखता निर्माण झाली आणि दुसऱ्या बाजूला राजकीय व्यवहारापासून आलिप्त राहून संस्कृतीकारण करावं आणि वैश्यवृत्ती जोपासावी असा दृष्टिकोण ब्राह्मणांत वाढीला लागला.

ह्या काळातला मराठी साहित्य व्यवहार मुख्यत: नवशिक्षित ब्राह्मणी मंडळींच्याच ताब्यात होता आणि आपलं राजकीय/सामाजिक वर्चस्व कमी होत चालल्याचं पाहून ब्राह्मणांनी आपली साहित्य-संस्कृती व्यवहारांवरील पकड अधिकच घट्ट करायला सुरुवात केली. आधुनिक मराठी साहित्याचे इतिहासकार गो. म. कुलकर्णी सांगतात, "हा वर्गही या परिस्थितीत अधिकतर प्रमाणात आपले हे वर्चस्व अबाधित कसे राहील याचाच विचार करू लागला. बुद्धिमंतांचा एक गट राजमान्य पदे प्राप्त करण्याच्या मागे लागला तर दुसरा अधिकतर प्रमाणात साहित्याभिमुख बनला. सांस्कृतिक क्षेत्रात रस घेऊ लागला. ही क्षेत्रे आपल्या हातात कशी राहतील यासाठी झटू लागला. परिणामी बहुजन समाजापासून अधिकच दूर गेला. आत्मकेंद्री बनत गेला. साहित्यक्षेत्रातील निरंकुश कलावादाचा या काळातील कैवार हा याचाच एक भाग. या कालखंडाच्या प्रारंभापासून अखेरपर्यंत (१९२०-१९५०) मध्यवर्ती मराठी साहित्यविश्वात या आत्मानुवर्ती संवेदना स्वरूपाचे वर्चस्व दिसून येते." (१९८८: ९)

तर, साहित्य आणि संस्कृती एक सार्वभौम मूल्य बनण्याच्या ह्या काळात, म्हणजे १९२१ सालच्या सुरुवातीपासूनच, दर रविवारी काही कवी मंडळी आधी श्रीधर रानड्यांच्या घरी जमत; तिथे काव्यचर्चा, हास्यविनोद करून मग सगळे जण श्रीमहाराष्ट्रशारदा मंदिराच्या बैठकांना जात. ते एकमेकांच्या कवितांचं हिरिरीनं रसग्रहण करीत. काव्यप्रेम, काव्यातली उत्स्फूर्तता, स्त्री-पुरुष सहजीवनाची नवी कल्पना, आणि सामायिक स्वच्छंदतावादी दृष्टी या धाग्यांनी ही मंडळी जोडली गेली होती. पुढे त्यांनी फर्ग्युसन कॉलेजच्या मागच्या टेकडीवरची एक खडकाळ जागा भेटीसाठी निश्चित केली आणि तिला नाव दिलं: कवि-कातळ. दर रविवारी भेटत असल्यामुळे त्यांनी ह्या गटाचं सन-टी-क्लब असं नाव ठेवलं. नऊ सप्टेंबर १९२३ रोजी, जेंव्हा रानडे पतीपत्नींच्या पुढाकारानं देशपांडे-शिरोळकर विवाह संपन्न होत होता, त्याच दिवशी ह्या कवींच्या एकत्र कवितांचा संग्रह 'किरण' प्रकाशित करण्यात आला आणि सन-टी-क्लब ला पर्याय म्हणून रविकिरण मंडळ असं ह्या मंडळींनी स्वतःचं नवीन नामकरण केलं.

रविकिरण मंडळ : स्त्री-पुरुष संबंधांचं नवं सौंदर्यशास्त्र

रविकिरण मंडळ
खुर्चीवर बसलेले डावीकडून : यशवंत, माधव जुलिअन. माडखोलकर आणि मनोरमाबाई रानडे
जमिनीवर बसलेले डावीकडून: गिरीश, दिवाकर, द. ल. गोखले आणि श्रीधरपंत रानडे
श्रेय : संपादन प्रभा गणोरकर इ., संक्षिप्त मराठी वाङ्मय कोश, (२००४: ६१०)

मंडळाचे सुरुवातीला एकूण आठ सदस्य होते: माधव त्रिंबक पटवर्धन (माधव जुलिअन), श्री. बा. उर्फ नाना रानडे, सौ. मनोरमाबाई रानडे, गजानन त्र्यंबक माडखोलकर, द. ल. गोखले, शंकर केशव कानेटकर (कवी गिरीश), यशवंत दिनकर पेंढारकर (कवी यशवंत), आणि शंकर काशिनाथ गर्गे (नाट्यछटाकार दिवाकर). 'किरण' हा पहिला कवितासंग्रह प्रकाशित होऊन त्यावर टीका झाल्यामुळे गर्गे मंडळातून बाहेर पडले आणि त्यांच्या जागी विठ्ठल दत्तात्रेय घाटे यांचा समावेश झाला. ही सर्व मंडळी वृत्तीनं पुरोगामी आणि सुधारक होती. रानडे पतिपत्नींच्या प्रेमविवाहामुळे ह्या मंडळाला एक अद्भुतरम्यतेचं वलय लाभलं होतं. रानड्यांचा विवाह हा ब्राह्मणांच्या पोटजातीतला – देशस्थ आणि कोकणस्थ – असला, तरीही तत्कालीन समजुतींनुसार आंतरजातीय विवाह होता आणि त्या विवाहाला दोन्हीकडच्या घरच्या माणसांचा विरोध असूनही तो झालेला होता. ह्या पतीपत्नींनी लग्नानंतर गरिबीत, अडचणीत दिवस काढलेले होते; पण त्यांनी काव्याची आणि प्रेमाची कोवळीक गमावलेली नव्हती. (गोखले १९७८: १७५). इंग्रजी कवी रॉबर्ट ब्राउनिंग आणि कवयित्री एलिझाबेथ ब्राउनिंग ह्यांच्याप्रमाणे आपला विवाह व्हावा अशी स्वतः रानडे पती-पत्नींची इच्छा होती. आणि झालंही तसंच. ब्राउनिंग कवीजोडप्याबद्दल कुतूहल असणाऱ्या मराठी वाचकांना तसंच एक तरुण कवी जोडपं पाहायला मिळत होतं. रविकिरण मंडळातल्या कवींचे काव्यप्रेम उत्कट होतंच, पण विधवाविवाहासारख्या कुटुंब-सुधारणेसंबंधातली रोमाँटिक बंडखोरीदेखील ह्या उपक्रमाच्या मुळाशी असल्यामुळे, मंडळाबद्दल विशेष कुतूहल निर्माण झालं होतं.

मंडळाला सुनिश्चित अशी घटना नव्हती. खरं म्हणजे, हा एक अनौपचारिक रीतीनं एकत्र आलेला समवयस्कांचा समूह होता, ज्याला कवितेच्या एका समान ध्येयानं प्रेरित केलेलं होतं, मुक्त प्रणयाच्या आणि धुंद जीवनाविष्काराच्या विचारानं भारावलेलं होतं, आणि सुखी कौटुंबिक जीवनासाठीच्या सामाजिक सुधारणेचं प्रगतीशील शिखर खुणावत होतं. कविकातळावर गप्पा मारण्यात त्यांचे दीडदोन तास मौजेने निघून जात, कधी दोनेक दिवसांची सुट्टी सापडली की त्यांचा पाय पुण्याबाहेर पडे, कधी भुलेश्वर, कधी पुरंदर अश्या बाहेरगावच्या सहली ते काढीत. स्त्रिया नुकत्याच पायात चपला घालू लागण्याच्या त्या काळात पुरुषांनी आणि स्त्रियांनी एकत्र सहल काढण्याची कल्पना सामाजिकदृष्ट्या अगदीच धार्ष्ट्याची होती. विठ्ठलराव घाट्यांनी आपल्या आत्मचरित्रात रविकिरण मंडळाच्या बोरघाटातल्या सहलीचं वर्णन केलंय:

"एकदा सदस्यांच्या बरोबर बोरघाटातील वार्षिक सहलीला गेलो होतो. मंडळाच्या ह्या सहली म्हणजे, एक श्रद्धापूर्वक पाळले जाणारे नैष्ठिक व्रत होते. खूप पाऊस पडत असला पाहिजे तर जायचे; नाही तर नाही. कोणीही छत्री घेता कामा नये. अंगात पाणकोट घालायचा; पुरुषांनी आणि स्त्रियांनीसुद्धा… बोरघाटाच्या सहलीत मुख्य कार्यक्रम म्हणजे धबधब्याखाली बसायचे आणि वरून डोक्यावर जपून उतरणाऱ्या जलप्रवाहाला अंगावर घ्यायचे. तसेच अंग वाळू द्यायचे आणि मग गात गात बरोबर आणलेल्या दशम्या, बटाट्याची भाजी, कोरडे पिठले, आणि लोणचे यांचा समाचार घ्यायचा. आणि हे सारे करत असता, हिंडता, फिरता, चालता, बसता, कविता म्हणायच्या, चर्चा करायच्या, अनेक बेत करायचे, आणि संध्याकाळी परत वर चढून, खंडाळ्यास पुण्याची गाडी गाठायची. फार मजा यायचा…. या सहली काव्यरचनेला मालमसाला हवा म्हणून झाल्या नाहीत. पायच जागेवर राहत नव्हते." (घाटे १९६१: ३३५-३३६)

ह्या लोकांचे पायच जागेवर राहत नव्हते हे खरंच असावं. ते दूरवर सहली काढत, मैल-मैल चालत असत, तासंतास टेनिस खेळत, रात्र-रात्र जागवून चर्चा करीत, पावसात मुद्दाम भिजायला जात, समविचारी स्त्रियांशी मोकळेपणाने संवाद करत, ज्या ठिकाणाहून सूर्योदय पाहिला असेल त्याच ठिकाणी परत येऊन सूर्यास्त पाहण्याचा वेडेपणा त्यांच्याकडे होता, ते एकमेकांचे वाढदिवस साजरे करीत, आणि शक्य तितक्या प्रेमविवाहांना जाहीरपणे पाठींबा देत. आणि काही वेळेला अश्या विवाहांच्या पत्रिका स्वतः ठिकठिकाणी वाटून येत. (द ता. भोसले. शिवाजी विद्यापीठाला सादर केलेला पीएचडी प्रबंध, १९७६:१४) घाटे स्वतःसकट सगळ्या रविकिरण मंडळाच्या सदस्यांसाठी त्यांचा ठेवणीतला इंदुरी शब्द वापरतात: 'उल्लू के पठ्ठे'. पुन्हा एकदा घाट्यांच्याच भाषेत सांगायचं तर : "रविकिरण मंडळ हा एक विचार होता. जीवनाचा आणि काव्याचा; मुख्यत: आणि मूलतः जीवनाचाच आणि त्याच्या अनुषंगाने काव्याचा. ती एक प्रेरणा होती; एक प्रयोगही होता – सामाजिक आणि सांस्कृतिक." (घाटे १९६१: २३८)

रविकिरण मंडळाचा जन्म जरी इतर काव्यवर्तुळांमधून झाला असला तरी इतर कुठल्याही मंडळाला लाभली नाही अशी लोकप्रियता आणि अद्भुतरम्यतेचं वलय रविकिरण मंडळाभोवती निर्माण झालं होतं. रविकिरण मंडळामुळे कवी हे कुणीएक लोकविलक्षण रसायन आहे अशी प्रतिमा तयार झाली. मराठी वाङ्‌मयाच्या आणि मध्यमवर्गीय संस्कृतीच्या इतिहासात रविकिरण मंडळ ही मोलाची घटना ठरली. रविकिरण मंडळानं प्रणयाच्या नावीन्यपूर्ण काव्य-आविष्कारांसोबतच, निखळ स्त्री-पुरुष मैत्रीचा जोमानं पुरस्कार केला आणि स्त्री-पुरुष मैत्रीला अनुकूल अश्या सामाजिक नीतीमत्तेची आकांक्षा ठेवली. अर्थात अशा सामाजिक उद्दिष्टांमुळे आणि मुक्त प्रणयाची आकांक्षा व्यक्त करणाऱ्या भाषेमुळे रविकिरण मंडळाला कठोर टीकेचं धनीदेखील व्हावं लागलं.

'किरण' ह्या त्यांच्या पहिल्यावहिल्या संग्रहाचं परीक्षण बाळकृष्ण भिड्यांनी 'विविधज्ञानविस्तारात' केलं होतं, ते मुळापासून पाहण्यासारखं आहे. भिडे लिहितात :

"ही सर्वच कवने अत्यंत मधुर उतरली आहेत. त्यांचे रचनाचातुर्य, श्रवणमाधुर्य, भावनातरलत्व, कल्पनाकौशल्य व विकारोन्माद कोणाही तरुणाच्या अंत:करणास भारून टाकल्याशिवाय राहणार नाहीत. पण या शृंगारिक कवनांचे भयंकरत्व काव्यप्रतिभेच्या दीप्तीने दुणावले आहे. चावणाऱ्या विषारी दातांच्या अगर कापणाऱ्या तीव्र शस्त्राच्या सुभगाकाराचे, तेजस्वी पाण्याचे किंवा कुशाग्रतेचे कौतुक आम्ही कोणत्या तोंडाने करावे? कवंडळाची कांती, वेसवेचे लावण्य, मदिरेचा सुवास, विषाचे माधुर्य, शठांचे साधुत्व व प्रस्तुत कवनांचे प्रतिभासंपन्नत्व, ही परिणामी सारखीच घातक होणारी आहेत." (: ८४-८५) इतकं लिहून पुढे भिड्यांनी रविकिरण मंडळ म्हणजे दुसऱ्या बाजीरावाच्या काळातल्या चटोरपणाची पुनरावृत्ती आहे असा निष्कर्ष मांडलेला आहे.

भिड्यांच्या टीकेमुळे, रविकिरण मंडळाची चांगलीच प्रसिद्धी झाली. अर्थात, प्रल्हाद केशव अत्र्यांसारख्या मंडळींना तरीही रविकिरण मंडळाचं सौंदर्यशास्त्र ओंगळ आणि तऱ्हेवाईक वाटत होतं. केशवकुमार या टोपणनावानं प्रसिद्ध केलेला, अत्र्यांचा अत्यंत गाजलेला कवितासंग्रह 'झेंडूची फुले' म्हणजे रविकिरण मंडळाच्या कवितेचं विडंबन होतं. (पहिली आवृत्ती १९२५, पाचवी सुधारित आवृत्ती १९४९)

झेंडूची फुले

त्याच्या प्रस्तावनेत अत्रे लिहितात :
अठरा-एकोणीस साली बालकवी आणि गडकरी वारले. त्यामुळे, शारदेच्या अंगणात काळोख पसरला… त्या अंधारात पुण्यातले सातआठ कवी एकमेकांचा हात धरत भीतभीत एका ठिकाणी जमले आणि त्यांनी एक लहानशी शेकोटी पेटवली. तिचे नाव रविकिरण मंडळ… कवींची मंडळे महाराष्ट्रात ह्या आधी स्थापन झाली नव्हती असे नव्हे; पण 'रविकिरण मंडळा'चे स्वरूप अभिनव होते. काव्यनिर्मितीसाठी स्थापन झालेली ती एक सहकारी पेढीच होती म्हणानात….पण माधव जुलिअन हाच त्यांच्यातला खरा 'रवि' होता, बाकीचे सगळे निदान तोवर तरी फक्त 'किरणे'च होती. माधव जुलिअन हे फर्ग्युसन कॉलेजात फारसी भाषेचे प्राध्यापक होते. फार्शी भाषेचा आणि कवितेचा त्यांच्यावर विलक्षण पगडा बसला होता. यांच्या विचारांत आणि भाषेत चमत्कारिक खोडी भरलेल्या होत्या. त्यांचा परिणाम 'रविकिरण मंडळा'च्या सभासदांवर इतका झाला की त्यांपैकी पुष्कळसे त्यांच्याच भाषेत आणि वृत्तांत कविता लिहू लागले. केशवसुतांच्या अनुयायांनी विकसित केलेल्या नवकवितेच्या बाळबोध परंपरांशी माधव जुलिअनांचा फार्शी फाशन पंथ अतिशय विसंगत होता. गणपतीची आरती सुरू असताना कुणी गॉड सेव्ह द किंग चालू केलं म्हणजे भाविक मनाला कसे वाटेल? मलाही तसेच वाटले. विडंबनकाव्य ही त्याच माझ्या दुखावलेल्या भावनेची वाङ्‌मयीन प्रतिक्रिया होती." (अत्रे १९४९: ४)

शारीरता: सामाजिक अस्वस्थता आणि आधुनिक काव्याचा मूलस्त्रोत

अत्र्यांचा एकंदर सूर भिड्यांनी विविधज्ञानविस्तारात केलेल्या टीकेशी मिळताजुळताच होता. दोघांच्याही – आणि इतर अनेकांच्याच – मते रविकिरणाची कविता मराठी कवितेच्या स्वभावाशी विसंगत होती. भिड्यांना त्यातली शारीरता आणि शृंगार खटकला तर अत्र्यांच्या मते, मुळात रविकिरण मंडळाचं बंड निव्वळ शाब्दिक होतं. अत्र्यांचं म्हणणं होतं, की जर पटवर्धन हाडाचे क्रांतिकारक असते तर त्यांची तऱ्हेवाईक शब्दांचा असंगत भरणा असणारी कविताही एकवेळ आम्ही चालवून घेतली असती पण त्यांच्या मते, पटवर्धन वैयक्तिक जीवनात अतिशय प्रतिगामी होते. अत्र्यांच्या ह्या भूमिकेमागे, टिळकांना मानपत्र देण्याच्या निर्णयाचा पटवर्धनांनी केलेला जाहीर विरोध होता हे एक कारण होतंच पण अत्र्यांच्या नजरेत पटवर्धन प्रतिगामी ठरण्याचं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे, "प्रेमविवाह करण्याची सुंदर संधी त्यांच्यापुढे चालून आली असता त्यांनी ती वेंधळेपणाने दवडली." (अत्रे १९४९: ५)

प्रेमविवाह म्हणजे पुरोगामित्व असं सुलभीकरण अत्र्यांनी करावं यात नवल नाहीच, पण इथे अत्रे पटवर्धनांच्या आयुष्यात चालून आलेल्या प्रेमविवाहाच्या ज्या "सुंदर संधीचा" उल्लेख करतात, त्या प्रसंगामुळे पटवर्धनांच्या आयुष्यात काय भूकंप आला होता हे अत्रे आपल्याला सांगत नाहीत. सुरुवातीला आपण ज्या विधवाविवाहाचा उल्लेख केला होता – डॉ. देशपांडे आणि शांताबाई – ज्या दिवशी रविकिरण मंडळाचं पहिलं पुस्तक प्रसिद्ध झालं – त्या ९ सप्टेंबर १९२३ रोजीच फर्ग्युसन कॉलेजातल्या एका विद्यार्थिनीशी – वरदा नायडूशी – पटवर्धनांची ओळख झाली होती. आणि त्यांचं प्रेमप्रकरण असल्याच्या वावड्या त्यासालच्या ऑक्टोबर महिन्यापासूनच पुण्यात उडू लागल्या होत्या.

माधवरावांचे एक चरित्रकार द. न. गोखले ह्या प्रकरणासंबंधात लिहितात:
"१९२१च्या जुलैमध्ये रविकिरण-मंडळातील कवी एकत्र आल्यापासून माधवराव सामूहिक जीवनात कमालीचे रंगले होते आणि आपल्याला हवे तसे 'रोमांटिक' वर्तन करताना भोवतालच्या जगाची पर्वा त्यांनी केलेली नव्हती. त्यांनीच म्हटल्याप्रमाणे, "काव्यमय स्वप्नसृष्टीत तरंगण्याचा आणि लोकमताचा बाऊ न करता योग्य वाटेल त्याप्रमाणे निडर वागण्याचा तो काळ होता." त्यांच्या वागण्यात अनैतिक काहीच नव्हते; पण तत्कालीन समजुतींना आणि अपेक्षांना त्यामुळे धक्के बसत होते. मंडळातील कवींचे ते रात्रीबेरात्री भटकणे, त्यांच्या त्या स्त्रीपुरुषमिश्र सहली, बोरघाटातले ते मनसोक्त भिजणे, काव्यातला मोकळा प्रेमाविष्कार – या साऱ्या गोष्टी सोवळ्या सनातन्यांनाच नाही तर शिष्ट व नेमस्त सुधारकांना सुद्धा चमत्कारिक वाटत होत्या. ही मंडळी आपल्यातील नव्हेत, भलत्याच पंथातील आहेत, बेहोष आहेत अशी त्यांच्याविषयीची भावना होती. माधवराव तर पुणेकरांच्या मनात, धाबळीत लपवलेल्या कोंबडीच्या अंड्यासारखे सुळसुळत होते. त्यांनी लोकमान्यांच्या मानपत्राला केलेला एकांडा विरोध कित्येक जण विसरलेले नव्हते. कित्येक जण त्यांचे धुंद गझल नि उत्कट प्रेमगीते आपल्या ओठांवर खेळवीत होते. ही सारी परिस्थिती अफवा आणि कंड्या पिकायला अगदी अनुकूल होती. तशात ह्या परिस्थितीच्या रंगीबेरंगी रंगमंचावर वरदा नायडू सारखी श्यामसुंदर युवती वेणी झुलवीत नि टेनिस रकेट हलवीत प्रविष्ट झाली आणि अफवा न उठणे अशक्य झाले. कुटाळक्यात रमणाऱ्या सदाशिव-शनवारांतल्या पांढरपेशांनी व कल्पनांचे फुगे फुगवणाऱ्या महाविद्यालयीन तरुण-तरुणींनी माधवरावांभोवती अफवांचे आणि दंतकथांचे जटील आणि अद्भुत जाळे विणून टाकले." (गोखले १९७८:१९७)

पण हे प्रकरण निव्वळ गावगप्पापुरतं सीमित राहिलं नाही. फर्ग्युसन कॉलेजनं माधवरावांच्या चौकशीसाठी समिती नेमली. एक वर्षभर ह्या चौकशीचा फार्स सुरू राहिला. त्यात वरदा नायडूशी त्यांचे प्रेमसंबंध असल्याचा पुरावा जरी आढळला नाही तरीही त्यांना अविवेकी वागणुकीसाठी (indiscretion) दोन वर्षांच्या बिनपगारी रजेवर पाठवण्याचा निर्णय झाला. रविकिरण मंडळाचे सदस्य कवी गिरीश लिहितात: "माधवराव सुधारक व निष्पाप होते. त्यामुळे त्यांचे वागणे सरळ व न्यायाचे होते. पण त्यांची विद्यार्थीप्रियता आणि लोकप्रियता यांबरोबर त्यांचे औदार्य व सहजता यांनी त्यांच्या कवितेच्या द्वारे त्यांचा दुर्लौकिक केला! पण कवितेत तरी असे काय होते, की ज्याने त्यांची बदनामी व्हावी! हा नुसता जुन्या जगाचा, जुन्या वातावरणाचा, व अंत:स्थ कलहाचा प्रतिध्वनी होता!" (कानेटकर १९६५: ५८) मुलींच्या शिक्षणाच्या प्रसारामुळे, मोठ्या संख्येनं मुली शाळा-कॉलेजात शिकायला येऊ लागतात, त्या काळात मराठीत ही रोमँटिक कविता बहरली. ह्या कवितेतला सगळा ताण स्त्री-पुरुष मैत्रीवरच्या सामाजिक बंधनांशी निगडीत आहे. पण पटवर्धनांच्या उदाहरणावरून ह्या सामाजिक निर्बंधांचं जाचक स्वरूप आणि सामाजिक कुचेष्ठेचे गंभीर परिणाम पुरेसे स्पष्ट होतात.

अर्थात, ह्या नव्या कवितेचा अंत:स्वर जरी स्त्री-पुरुष प्रणय आणि सामाजिक बंधनांपासून स्वातंत्र्याच्या आकांक्षांशी निगडीत होता तरीही, त्यात अनुस्यूत असणाऱ्या शारीरतेबाबत अजूनही एक अवघडलेपण होतं. मध्यमवर्गीय मानसिकतेवरचा अव्वल इंग्रजीतल्या व्हिक्टोरिअन नैतिकतेचा प्रभाव अजूनही गहिरा होता. रविकिरण मंडळाच्या कवितेतलं प्रेम शारीर प्रतिमांमधूनही प्रेयसीची अशारीरी पूजा करणारं, हौतात्म्याची आस असलेलं होतं. ही हौतात्म्याची आकांक्षा फलद्रूप होण्याचाही एक प्रसंग नोंदवला गेलाय. श्रीधर रानड्यांच्या एका मित्रानं आपल्या असफल प्रेमाच्या वैफल्यातून स्वतःच्या मनगटाची नस कापून आत्महत्या केली. मरण्यापूर्वी आपल्या शेवटच्या क्षणी त्यानं रानड्यांची 'मृत्युच्या दाढेतून' ही कविता मोठ्यानं वाचली आणि मृत्यूला कवटाळलं.

पण रानड्यांच्या कवितेपेक्षाही त्यांचा मनोरमाबाईंशी (माहेरच्या: दुर्गा हिवरगांवकर) झालेला प्रेमविवाह हा लोकांच्या चर्चेचा आणि कौतुकाचा विषय होता. वीसच्या दशकातील इतरही काही प्रेमविवाह – कुसुमावती जयवंत आणि आत्माराम देशपांडे (कवी अनिल), विमल आणि पु. य. देशपांडे – अतिशय गाजले आणि त्यांचे सार्वजनिक चर्चेत सतत उल्लेख होत. कुसुमावती आणि अनिल यांनी एकमेकांना १९२३ ते २७ दरम्यान लिहिलेल्या प्रेमपत्रांचा एक संग्रहही पुढे प्रसिद्ध झाला. त्यापैकी सुरुवातीच्या अनेक पत्रांत कुसुमावती आणि अनिल एकमेकांना भाऊ-बहीण या नात्यांनी संबोधतात. (पाहा, स्वाती कर्वे, २००९: ३५२-३६१) यावरून त्यावेळच्या मानसिकतेवर असलेला अशारीर (प्लाटोनिक) प्रेमाच्या संकल्पनेचा पगडा ठळक दिसतो. आणि हा प्रभाव केवळ कुसुमावती आणि अनिल यांच्यावरच आहे असं नाही. त्याकाळच्या कित्येक आत्मचरित्रात्मक कथनांतून एकीकडे प्रणयाची आस आणि दुसरीकडे शारीर प्रेमाविषयीची तीव्र संदिग्धता असा तिढा दिसून येतो.

उदाहरणार्थ, माधवराव पटवर्धन बडोद्याला असताना, त्यांना शांता हेर्लेकर या मुलीबद्दल तीव्र आकर्षण होतं. शांताबाईंनी एकदा माधवरावांची तुलना मारी कॉरेल्लीच्या 'गॉड्स ओन मॅन' ह्या नाटकातल्या जुलिअन अडर्ले ह्या पात्राशी केली होती, त्यामुळे, पुढे माधवरावांनी 'माधव जुलिअन' ह्या नावानंच कविता लिहिली. ह्या काळात हेर्लेकर आपल्या शारीर भावनांबाबत काहीश्या द्विधा मनस्थितीत दिसतात. त्यांनी आपल्या अप्रकाशित आत्मचरित्रात नोंद केलीय:
"वाढत्या वयाबरोबर पुरुषांना बिचकण्याची, स्त्रियांमध्ये वावरणारी प्रवृत्ती मला आवडेनाशी झाली. इंटरमीजिएट मध्ये गेल्यावर तर नरम वृत्ती तिरस्करणीय वाटू लागली. मी माझ्या पुस्तकांवर सरळ शांताराम हेर्लेकर लिहू लागले….माझ्या चित्तात लग्नाचा विचारही येत नाही….मी स्वतःला tom-boy म्हणवते. पुरुषी वृत्तीतर माझ्या रंध्रारंध्रांत मुरली आहे." (गोखले १९७८: ४९)

बडोद्याच्या काळातली पटवर्धनांची आणखी एक मैत्रीण लक्ष्मीबाई चौधरी या शांताबाई हेर्लेकरांच्या पुरुषी वृत्तीच्या आकंठ प्रेमात होत्या. हेर्लेकर सांगतात कि केवळ लक्ष्मीबाईच नाही तर आणखीही कित्येक मुली हेर्लेकरांवर प्रेमाचा वर्षाव करायच्या. लक्ष्मीबाई चौधरी आणि माधवराव ह्या दोघांनाही एकमेकांच्या शांताबाई हेर्लेकरांबद्दलच्या भावना नीट माहीत होत्या, एवढंच नाही तर हे दोघंही आपापल्या असफल प्रेमाबद्दल एकमेकांचं सांत्वन करत असत. आणि गंमत म्हणजे, हे तिन्ही मित्र एकमेकांना भाऊ-बहीण म्हणूनच संबोधित असत. (लक्ष्मीबाई, शांताबाई आणि माधवराव यांच्या नात्यातल्या गुंतागुंतीचे अधिक तपशील गोखल्यांनी दिलेले आहेत. पाहा: गोखले १९७८: ४७-५२) पुढे, १९१७ साली शांताबाई हेर्लेकरांनी आपल्या आईच्या मनाविरुद्ध जाऊन, बाबुराव कशाळकर ह्या सोनार जातीतल्या व्यक्तीशी लग्न केलं. ह्या लग्नाचा धक्का माधवरावांना जोरात बसलाच, पण लक्ष्मीबाईंना तो पचवणं फार अवघड गेलं. लक्ष्मीबाई वर्षभरातच देवाघरी गेल्या. इकडे, शांताबाईंच्या आईनंसुद्धा हाय खाल्ली. शांतेला ह्या लग्नापासून परावृत्त करण्यासाठी लिहिलेल्या पत्रात तिची आई लिहिते, "मी तुझ्यावर सत्ता गाजवू इच्छित नाही. मीही उदारमतवादी विचाराची होते आणि आहे. पण लग्नानंतर पुरुषाला जी सत्ता प्राप्त होते ती शेवटपर्यंत सुटत नाही. शिवाय, ब्राह्मणेतराकडे लग्नाच्या दृष्टीनं तुझं मन वळेल असं मला चुकूनही वाटलं नाही. ब्राह्मणांच्या मुलीने विजातीयांशी लग्न करून सुख लागणे संशयास्पद आहे." (हरिभाऊ मोटे १९७२: ३५२)

माधवराव पटवर्धनांच्या चरित्रात, हेर्लेकर आणि पटवर्धन यांच्यातला एक नाजूक क्षण चित्रित झालाय: हेर्लेकर माधवरावांना शारीरिकदृष्ट्या जवळ ओढतात पण लागलीच अपार्थिव प्रेमाच्या संकल्पनेच्या ओझ्याखाली त्या माधवरावांना "माधव! मी तुझी आई आहे. – आई!" असं म्हणतात. आणि पटवर्धनदेखील हृदयभंगाच्या त्या क्षणाशी तादात्म्य पावून पुढे आपल्या शांता-आई वर "प्रेमस्वरूप आई! वात्सल्यसिंधू आई" अशी कविता करतात. अगदी वरदा नायडूच्या बाबतीतसुद्धा अशीच काहीशी परिस्थिती उद्भवते. वरदा प्रकरणाने माधवरावांच्या पुण्यातल्या आयुष्यात उलथापालथ झाली, तरीही त्यांच्या परस्परविषयक भावना अस्फुट आणि संदिग्ध राहिल्या. श्रीधर रानड्यांना लिहिलेल्या एका पत्रात वरदा त्यांना माधवरावांना लग्नाला तयार करण्याची गळ घालते; तर माधवरावांना लिहिलेल्या पत्रात ती त्यांना आपलं मूल म्हणते. तिच्या शब्दांत म्हणायचं तर:
"My good wishes would be always with you. If you call me 'mother' (as you used to) my blessings are with you my baby forever!" (गोखले १९७८: २०२)

या सगळ्या कहाणीत स्त्री-पुरुष प्रणय, लग्न, जातव्यवस्था आणि अशारिर प्रेमाची कल्पना यांनी नवशिक्षित उदारमतवादी ब्राह्मणी सांस्कृतिक विश्वाचा अवकाश व्यापून टाकलेला दिसतो. इथे लैंगिकता (सेक्शुअलिटी), जात (कास्ट), लिंगभाव (जेन्डर) आणि पितृसत्ता (patriarchy) अश्या सामाजिक रचना एकमेकांत मिसळून नव्या क्लिष्ट सामाजिक संबंधांचं एक बृहद्जाल विणताना आपल्याला दिसतात. ह्या अतिशय बहुआयामी आणि गुंतागुंतीच्या प्रेमजाणिवांच्या तपशिलांच्या आधारे कदाचित दोन परस्परपूरक विधानं आपण करू शकतो : एक तर, विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातल्या ह्या पिढीसाठी शारीरतेचं काय करायचं हा एक अतिशय अवघड प्रश्न होता. आणि नेमक्या त्याच कारणामुळे, शारीरता ह्या नव्या काव्य आणि साहित्यजाणीवेच्या केंद्रस्थानी येऊन बसलेली दिसते.

फडके युग अर्थात 'द एज ऑफ द ऑर्डिनरी'

ना. सी. फडके
नारायण सीताराम फडके (१८९४-१९७८)

तत्कालीन मराठी ललित साहित्यात आणि साहित्य समीक्षेतही प्रेमाची अटळ शारीरता आणि अपार्थिव प्रेम यांच्यातला झगडा चाललेला दिसतो. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातले सर्वाधिक लोकप्रिय कादंबरीकार नारायण सीताराम फडके (१८९४-१९७८) यांच्या ललित लिखाणात आणि साहित्यविषयक सैद्धांतिक भूमिकेतही शारीरता, इहवाद आणि व्यक्तिवाद ही मूल्यं प्रभावी दिसतात. १९१७ ते १९७४ या दरम्यानच्या काळात, ना. सी. फडक्यांच्या नावावर सुमारे दीडशे पुस्तकं नोंदवलेली आहेत, ज्यांत शंभराहून अधिक कादंबऱ्यांचा समावेश आहे. शिवाय त्यांनी एक सोडून दोन भरभक्कम आत्मचरित्रं लिहिली आहेत. भारतातल्या लोकसंख्यावाढीसंदर्भातलं 'सेक्स प्रॉब्लेम इन इंडिया' (१९२७) या नावाचं एक इंग्रजी पुस्तकसुद्धा त्यांच्या नावावर आहे. तसं पाहता, फडके तहहयात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते; महात्मा गांधींच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून असहकाराच्या चळवळीत त्यांनी क्षणाचाही विचार न करता नोकरी सोडून दिली; किंवा प्रख्यात गांधीवादी चिंतक आचार्य जावडेकर यांच्याशी झालेल्या सार्वजनिक वादात त्यांनी काम आणि अर्थ ह्या दोन पुरुषार्थांना धर्म आणि मोक्ष ह्यांपेक्षाही श्रेष्ठ मानण्याचा आग्रह धरला (१९४१), इत्यादींपेक्षाही फडके निरंकुश कलावादाचा कैवार घेणारे, एकाच छापातल्या प्रेमी युगुलांच्या चटोर कादंबऱ्या लिहिणारे लेखक म्हणून अधिक लक्षात राहिले; ह्याचं एक कारण स्वतः फडक्यांच्या कादंबरीकार म्हणून असलेल्या अगाध मर्यादा आहेतच पण कादंबरी नावाच्या घटकाची मराठी समाजातली निर्मिती प्रक्रियासुद्धा ह्याला कारणीभूत आहे.

फडक्यांच्या एकूण साहित्यविषयक भूमिकेचा पडताळा देणारं त्यांचं – १९६६ सालचं – विधान इथेच पाहणं योग्य ठरेल:
"ज्यातून ज्यातून रसनिर्मिती करता येते, असे जीवनाचे सर्व प्रकार साहित्याचे वर्ण्यविषय होऊ शकतात, आणि झाले पाहिजेत, असे आपण नेहमी म्हणतो. राजे, राण्या, प्रधान, मंत्री, सेनापती, यांच्याप्रमाणेच रस्ता झाडणारा झाडूवाला, सफाई करणारा मेहतर, ढोर, चांभार, मांग, महार यांची म्हणून काही सुखदु:खे आहेत आणि शुद्ध साहित्यिक दृष्टीला ती दिसली पाहिजेत असे आपण नेहमी म्हणतो. परंतु हे सर्व म्हटल्यावरदेखील असा प्रश्न विचारावासा वाटतो की, ढोर-चांभारांच्या जीवनातील घटक घेऊन त्यावर कादंबरीची रचना करता येईल काय? दलितांच्या सुखदु:खावर लहान कथा लिहिता येईल, परंतु मोठ्या विस्ताराची कादंबरी लिहिता येईल काय? लिहिता येईल, असे मला वाटत नाही. कादंबरीचा चित्रफलक फार मोठा असतो. ह्या विस्तीर्ण फलकावर भरघोस चित्र रंगवायचे झाले तर ज्या प्रकारच्या प्रसंगांची आणि घटनांची गरज असते, तसे प्रसंग आणि घटना दलितांच्या जीवनात आढळत नाहीत; कादंबरीची भव्य इमारत ज्यावर उभी राहील, असा भरघोस भक्कम पाया सापडत नाही." (फडके १९६६: १५२)

महान साहित्य आणि लहानश्या आयुष्यांवरचं विसाव्या शतकातल्या मराठीतल्या सर्वाधिक लोकप्रिय कादंबरीकाराचं हे विधान आहे, तेही दलित साहित्य मराठी वैचारिक आणि सांस्कृतिक विश्वाला गदागदा हलवून जागं करत होतं त्यानंतरच्या काळातलं. फडक्यांच्या विधानातून आपल्याला विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातल्या मराठी साहित्यसंस्कृतीच्या मुख्य प्रवाहाच्या संकुचितपणाची आणि जातविषयक कोतेपणाची पुरेशी जाण येते. शिवाय, फडके ज्याला 'कादंबरीची भव्य इमारत' म्हणतात त्यात निव्वळ स्त्री-पुरुषांच्या प्रणयाखेरीज इतर काही घडताना दिसत नाही.

या बाबतीत अर्थात केवळ फडक्यांना दोष न देता, एकूण मराठी कादंबरीच्या ऐतिहसिक निर्मितीप्रक्रियेची समीक्षा करायला हवी. या संदर्भात, नरहर कुरुंदकर आपल्या 'धार आणि काठ' या मराठी कादंबरीच्या इतिहासाचा आढावा घेणाऱ्या पुस्तकात लिहितात:
"एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी, स्त्री-शिक्षणाला आरंभ झालेला होता. प्रौढ शिक्षणाला आरंभ झालेला होता. इ. स. १९००पासून, अगदी तुरळक का होईना पण कॉलेजात जाणाऱ्या मुली मुंबई-पुण्यात दिसू लागलेल्या होत्या, ज्यातून सहवासोत्तर प्रेमाची शक्यता अस्तित्वात येऊ लागली होती. नव्या वाचकाच्या स्वप्नरंजनात आता अनपेक्षित भेटी, सहवास व प्रेम यांना महत्त्व आले. फडक्यांच्या कादंबरीने ही सोय प्रथम यशस्वीरीत्या केली म्हणून ते तरुणांचे लाडके कादंबरीकार झाले." (कुरुंदकर, १९७१: १२७)

फडक्यांच्या कादंबऱ्यांनी स्त्री-पुरुष प्रणयाची एकच गोष्ट सांगताना, वाचकाला बहुविध अवकाशांमधून हिंडवलं, विविध भौगोलिकतांचा परिचय करून दिला आणि निरनिराळ्या प्रेम-अवस्था चित्रित केल्या. त्यांच्या कादंबऱ्यांत स्त्री-पुरुष परस्परांना भेटतात, मोहक संवांदांतून प्रेमात पडतात, एखाद्या संकटाला सामोरे जातात आणि मग सुखरूप सुटका होऊन आनंदानं उर्वरित आयुष्य व्यतीत करतात. जणू पुढे येऊ घातलेल्या गुलछबू हिंदी सिनेमाच्या स्वागतासाठी वाचकाच्या मनाची मशागत करणं हे फडक्यांचं इतिहासदत्त कार्य होतं.

नायक-नायिकेपुढच्या संकटांचं स्वरूप फडक्यांनी विविध प्रकारे मांडलं. कधी हे नायक-नायिका निराळ्या जातींचे असतात (बहुधा ब्राह्मणांच्या पोटजातींपैकी); कधी त्यातल्या कुणाला एखादा मानसिक गंड असतो (उदा. 'उद्धार' या त्यांच्या १९३५ सालच्या कादंबरीत नायिकेच्या स्वप्नात तिच्यावर बलात्कार होतो आणि त्यातून तिला गर्भ राहिला आहे असा तिला भास होत राहतो. मग उर्वरित कादंबरीभर तिच्या मानसिक गंडातून तिची सुटका करून नायक तिचा "उद्धार" कसा करतो याचं चित्रण येतं.) किंवा कधी नायक-नायिकांच्या आर्थिक परिस्थितली तफावत असते ('दौलत', १९२९); किंवा काही वेळा, फडक्यांच्या कादंबरीत राष्ट्रवादी ध्येयवादामुळे नायकावर तुरुंगवासाची वेळ येते आणि नायिकेपासून विरहाचं दु:ख त्याच्या वाट्याला येतं. 'इंद्रधनुष्य' (१९४१) या त्यांच्या कादंबरीतलं सगळं नाट्य त्यातल्या नायिकेच्या मनावरचा अशारिर प्रेमकल्पनेचा पगडा आणि त्यातून तिनं शारीर प्रेमाला नाकारणं ह्यात साठवलेलं आहे. मग कादंबरीभर, फडके आणि त्यांचा नायक तिला प्रेमाच्या शारीरिक प्रकटनाचं महत्व पटवत राहतात. त्यांच्या वाचकांना ते आधीच पटलेलं असतं त्यामुळे, कादंबरी अखेरीस नायिकेलाही ते मान्य होतं आणि शेवट अर्थातच गोड होतो.

नायक-नायिकांची शरीराविषयीची संदिग्धता फडक्यांच्या इतर कादंबऱ्यांतही दिसते आणि ते त्या तिढ्यातून मोठ्या कौशल्यानं मार्ग काढतात. फडक्यांनी एका कादंबरीत लोकमान्य टिळकांच्या मृत्यूचा खुबीनं वापर करून एका जोडप्याला कसं जवळ आणलं ते पाहण्यासारखं आहे. 'प्रवासी' (१९३७) ह्या कादंबरीत, राजा आणि उमा या नायक-नायिकांचं एकमेकांवर प्रेम असतं पण अशारिर प्रेमाच्या कल्पनेचा पगडा असल्यामुळे, ते परस्परांत एक शारीरिक अन्तर राखून वागत असतात. पण जेव्हा त्यांना टिळकांच्या मृत्यूची बातमी समजते तेंव्हा अपरिमित दुःखवेगानं त्यांच्यातलं अंतर वितळून जातं. राजा उमाच्या छातीवर डोके ठेऊन रडतो आणि उमाही त्याच्या मस्तकावर अश्रूंचा अभिषेक करते. या उत्कट शोकाच्या आवेगात दोघेहीजण स्पर्शाचा दुरावा विसरून अत्यंत जवळ येतात आणि इथून पुढे स्पर्श टाळण्याचं विसरून जातात.

प्रवासी ना. सी. फडके
ना सी. फडक्यांची 'प्रवासी' (१९३७)

कुरुंदकरांच्या मते, फडक्यांच्या कादंबऱ्या ह्या प्रेमात पडण्याचं प्रशिक्षण देणारी पाठ्यपुस्तकं होती. जणू फडके आपल्या वाचकांना सांगत होते, तुम्हाला प्रेमात पडायचं आहे ना, मग प्रेमात कसं पडावं आणि मोहक कसं बोलावं याचे शिक्षण तुम्हाला माझी कादंबरी देईल. फडक्यांच्या कादंबऱ्यांतून स्त्री-पुरुष प्रणय ही दैनंदिन जगण्याच्या मेटाकुटीपासून विलग अशी एक स्वायत्त सृष्टी बनली. प्रणयच स्त्री-पुरुष नात्यातली अमौलिक घटना बनली, प्रणय हेच मानवी आयुष्याचं सर्वस्व ठरलं, प्रणयामुळेच जगण्याला सौंदर्य प्राप्त झालं. दुसरं असं की, फडक्यांच्या लिखाणाच्या प्रभावामुळे शैली हेच वाङ्‌मयाचं अधिष्ठान ठरू लागलं. फडक्यांनी वाचकाची कौटुंबिकता आणि रूढी-परंपरेशी असलेली भावनिक नाळ न कापता मराठी संस्कृतीच्या पारंपारिक मूल्यांपासून निराळं असं एक कॉस्मेटिक पुरोगामित्व साकार केलं.

अर्थात, स्त्री-पुरुष प्रणय काही केवळ एकट्या फडक्यांच्याच कादंबरीत फोफावला नव्हता. वामन मल्हार, वरेरकर, खांडेकर, माडखोलकर या सगळ्यांचंच लिखाण प्रणयाभोवती पिंगा घालत होतं.
"प्रेमाची फुटली पेठ, लुटुया प्रेमाचा बाजार
प्रेमची भाकर, प्रेमची चटणी, प्रेमची कांदा गोड
लुटुया प्रेमाचा बाजार….
"
ह्या १९३९ सालातल्या अत्यंत गाजलेल्या व्ही. शांताराम दिग्दर्शित 'माणूस' या चित्रपटातल्या गीतात म्हटलंय, तसा सगळीकडे प्रेमाचा बाजार फुललेला होता.

शांता हुबळीकर
शांता हुबळीकर आणि शाहू मोडक (लुटुया प्रेमाचा बाजार… - 'माणूस', १९३९)

मीरा कोसंबी, दु. का. संत अश्या अनेक अभ्यासकांनी दाखवून दिल्याप्रमाणे, फडकेकृत रोमँटिसिझमनं वाचकांचं रंजन हे मराठी ललित साहित्याचं मुलभूत मूल्य निश्चित केलं. फडक्यांच्या शैलीचा आणि अर्थातच त्यांच्या अफाट लोकप्रियतेचा तत्कालीन मराठी साहित्यिकांवर खोल प्रभाव पडला. खांडेकरांसारखे जे फडकेप्रणित कलावादाचे वैचारिक विरोधक होते तेही कळत-नकळत फडक्यांच्याच शैलीचं अनुकरण करत होते. आधुनिक मराठी साहित्याच्या बहुतेक इतिहासकारांच्या मते, १९२० ते १९५० हे मराठी साहित्यातलं फडके युग होतं, ज्याला त्यांनी सुमार साहित्याचा कालखंड मानलेलं दिसतं. (कुसुमावती देशपांडे, १९५०; दु का संत, १९५७; गो म कुलकर्णी, १९८८)

एकोणिसाव्या शतकातल्या लोकहितवादींपासूनच्या (१८२३-१८९२) आधुनिक मराठी (ब्राह्मणी) वैचारिक संस्कृतीत सुधारणेचा म्हणजे, पुरोगामीपणाचा भर जड सृष्टीच्या स्वीकारावर होता. तर विसाव्या शतकातल्या पहिल्या पूर्वार्धात मराठी साहित्यात काव्य, कादंबरी आणि नाटक अश्या ललित माध्यमांतून एका स्वच्छंदतावादी (रोमँटिसिस्ट) दृष्टीचा प्रभाव दिसतो. हा स्वच्छंदतावाद अर्थातच, एकजिनसी नसून बहुआयामी पद्धतीनं व्यक्त होताना आढळतो. तो एका बाजूनं साहित्यिक पुरोगामीपणाच्या कल्पनेशी जोडलेला आहे तर दुसऱ्या बाजूला तो आगरकर-प्रणित नव्या सामाजिक सुधारणावादाचा पुरस्कर्ता आहे. ह्या स्वच्छंदतावादी पुरोगामित्वाला अभिप्रेत असलेले सामाजिक बदल प्रामुख्याने कौटुंबिक सुखवाद, व्यक्तिवाद आणि स्त्री-पुरुष प्रणयासंदर्भात व्यक्त होताना दिसतात. विशेषतः एका मर्यादेत स्वतंत्र असलेली, नवशिक्षित आणि महत्त्वाचं म्हणजे आधुनिक कादंबरीतल्या प्रणय संकल्पनेसाठी एक अपरिहार्यपणे आवश्यक अशी आधुनिक स्त्री हे ह्या स्वच्छंदतावादाचं प्रमुख ध्येय दिसतं. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात मराठी कवितेला झपाटून टाकणाऱ्या ह्या स्वच्छंदतावादामुळे शारीरता, सौंदर्यदृष्टी आणि भौतिकता हे पुरोगामित्वाचे आधार मानले गेले. आता, मराठी गद्य आणि पद्य हे विठ्ठलाऐवजी भौतिकसृष्टीत रममाण होऊ पाहत होतं आणि त्या वृत्तीलाच प्रगतीशील मानू लागलं होतं.

लोकमान्य टिळकांनी गीतारहस्यातून मांडलेला कर्मयोग किंवा इतिहासाचार्य राजवाड्यांचा विज्ञानाभिमुख होण्याचा आग्रह, ह्या पुरोगामित्वाच्या धारणेपासून मुदलात निराळा नव्हता, पण हे स्वच्छंदतावादी पुरोगामित्व प्रणयाच्या धुंदीत इतकं मग्न होतं की विज्ञान आणि कर्मरतता हे मुद्दे पुढे जरासे पुसट होत गेले. ह्या पुरोगामी साहित्याचा आधार होता: ब्राह्मणी पांढरपेशा कारकून. तरीही, आधुनिक यंत्रसंस्कृतीत जन्माला येणारी परात्मता किंवा शहरीकरणातून निर्माण होणारी घुसमट हे प्रश्न मराठी साहित्यात पुरेसे जोमाने चर्चिले गेले नाहीत, कारण त्या गोष्टींचा ज्या कष्टकरी वर्गावर थेट परिणाम होत होता, तो वर्ग पुरेसा सुशिक्षित नसल्यामुळे आणि हे साहित्यिक विश्व विशिष्ट जात-वर्गीय कोंडाळ्यात बंदिस्त झाल्यामुळे, व्यापक सामूहिक संवादाला फारसा वाव नव्हताच. ह्या पुरोगामी धारणेच्या केंद्रस्थानी शरीर आलेलं होतं हे झालंच, पण ते शरीर गुलाबी, धुंद रोमान्स करणारं शरीर होतं. परंपरा आणि आधुनिकतेच्या ताणापासून, दैनंदिन खर्डेघाशीपासून दोन घटका काल्पनिक आनंद मिळवू पाहणारं मोहक शरीर होतं. अंगमेहनत करून पोट जाळत दिवस ढकलणारं किंवा ज्याच्या सावलीचाही विटाळ मानला जातोय असं अस्पृश्याचं शरीर ह्या पुरोगामी शारीरतेच्या कक्षेपासून अजून पुष्कळ लांब होतं.

आधुनिक मराठी कादंबरीचा आलेख: शहरी पांढरपेशा कारकून आणि सदाशिवपेठी संस्कृती

ही नवी स्वच्छंदतावादी कादंबरी ज्याच्या भवतालात निर्माण होत होती, तो उच्चवर्णीय पांढरपेशा कारकून हा विविध आधुनिक प्रक्रियांचं फलित होता. पहिल्या महायुद्धामुळे (१९१४-१८) तदनुषंगिक कचेऱ्यांत वाढ झाली (चिं.वि. जोशींचा चिमणराव जोग अशाच कचेरीत कारकून असतो). ह्या नोकऱ्यांच्या आकर्षणामुळे, पांढरपेशा वर्ग शिक्षणाच्या आणि नोकऱ्यांच्या निमित्तानं शहरांकडे स्थलांतर करत होता. एकत्र कुटुंबातल्या गुंतागुंतीच्या आणि लांबलचक नातेसंबंधांतून हळूहळू मुक्त होण्याची आकांक्षा हा वर्ग बाळगू लागला. नवी, शहरी, सुटसुटीत, आत्मकेंद्रित कुटुंबपद्धती त्याला प्रिय होऊ लागली. युद्धोत्तर काळातील शहरी सुधारणांमुळे (वीज, टेलिफोन, इत्यादी) शहरी सुखवस्तू साधनांत भर पडत गेली. यामुळे, ठरावीक पद्धतीची, ठरावीक काम असलेली, ठरावीक तासांची चौकटीतली नोकरी सर्वाधिक प्रिय झाली. 'साहेब' बनणे या वर्गाचे लाडके स्वप्न होते. 'विलायत' हे त्यांचे नंदनवन होते. व्हिक्टोरियन संस्कृती आणि तिचं राहणीमान हा यांच्या आकर्षणाचा विषय होता. (गो. म. कुलकर्णी, १९८८: ३४)

माधव जुलिअनांच्या 'सुधारक' ह्या खंडकाव्यात ह्या वर्गाच्या मानसिकतेचं प्रातिनिधिक चित्रण आलं आहे:
भव्य बंगला, बगिचा भवती,
विचित्र सुमने नव टवटवती,
ठळक अक्षरे पाटीवरती
रावबहादूर के. व्ही. ठोसर
अलग बंगले बड्याबड्यांचे
वकील, डाक्तर, हपीसरांचे
रंगाकारहि विविध तर्हांचे,
गमे फिरावे शोभा पाहत
--(सुधारक: अध्याय पहिला)

जुन्या संयुक्त कुटुंबव्यवस्थेचं विघटन होऊ लागलं होतं, व्यक्तिवादाचा उदय झाला होता, वर्तमानपत्रं आणि नियतकालिकांचा सुकाळ झाल्यामुळे लेखक नावाची व्यवस्था विकसित होऊ लागली होती. अश्या विविध प्रक्रियांमधून कादंबरी वाढली आणि तिचं प्रसरण होऊ लागलं. कादंबरीनं एकोणिसाव्या शतकात ब्राह्मणी मध्यमवर्गात सुरू झालेल्या कुटुंबसुधारणा प्रक्रियांना आणखी गती दिली. कौटुंबिक सुखवाद, व्यक्तिमत्व विकास, आणि स्त्री-पुरुष प्रणय हे ह्या कादंबरीची मुख्य विषयवस्तू होते. प्रत्येकच प्रणयाची परिणीती लग्नसंबंधात व्हावी अशी सामाजिक अपेक्षा असल्यामुळे, लग्नाशी संबंधित निरनिराळे विषय – बालविवाह, विधवाविवाह, प्रेमविवाह, आईवडिलांनी जुळवलेली सोयरिक, आंतरजातीय लग्न, आंतरधर्मीय विवाह, घटस्फोट, लग्नबाह्य संबंध, असफल प्रेम, प्रेमातला त्याग, इत्यादी. – हे कादंबरीच्या जिव्हाळ्याचे विषय बनले.

गं. बा. निरंतर यांनी त्यांच्या १९१४ ते १९४४ दरम्यानच्या मराठी कादंबरीविषयक अभ्यासात नोंद केली आहे; "आधुनिक स्त्री, तिचं शारीरिक आणि कौटुंबिक सुख ह्याचाच आपले कादंबरीकार विचार करतात असं दिसतं. कारण ही एव्हढी एकच गोष्ट आपल्या कादंबऱ्या चित्रित करतात." (निरंतर १९४४: १४०) गंमत म्हणजे, स्वतः निरंतरांनी कौटुंबिक सुखवाद आणि लग्न याच विषयांना वाहिलेली 'सौ. मालती' (१९३४) नावाची कादंबरी लिहिली होती हे ते सोयीस्कररीत्या विसरले. मुद्दा असा, की आपण कौटुंबिकता नावाच्या चरकात सापडलोय आणि ठरावीक साचाचं ललित साहित्याचं दळण दळतो आहोत अशी जाणीव असणाऱ्या लेखकांनाही त्यातून सुटता येत नव्हतं.

कमलाबाई बंबेवाले ('बंधमुक्ता', १९२४) शांताबाई नाशिककर ('लग्नाचा बाजार', १९२९) अश्या स्त्री कादंबरीकारांच्या लिखाणातही लग्न, घटस्फोट, प्रणय अश्या विषयांचंच प्राबल्य दिसतं. पण विनया खडपेकर दाखवून देतात, की ह्या लेखिकांचं समाजातल्या स्त्री-पुरुष विषमतांच्या स्वरूपाचं आकलन अधिक खोलवरचं आहे. बंबेवालेंच्या कादंबरीतली सुधा नवऱ्याच्या छळाला कंटाळून आपल्या प्रियकरासोबत राहण्यासाठी धर्मांतर करते. तिच्या दुख:द शेवटासाठी ती हिंदूधर्माला जबाबदार ठरवते. अश्या प्रकारची प्रतिक्रिया पुरुष लेखकांकडून आलेली दिसत नाही.

या उलट, कित्येक पुरुष लेखक प्रेमविवाह आणि तत्सम पाश्चात्य फॅशनविरोधी मांडणी करतानादेखील दिसतात. एक पुराणमतवादी आणि अत्यंत लोकप्रिय लेखक वि. वा. हडप यांनी आपल्या 'बहकलेली तरुणी' (१९२४) नावाच्या कादंबरीतून एका वाममार्गाला लागलेल्या मुलीचं चित्रण केलं. एक वर्षानं, त्यांनी त्या कादंबरीचा 'निवळलेली तरुणी' नावानं पुढचा भाग प्रसिद्ध केला, ज्यात त्या आधीच्या बहकलेल्या मुलीनं स्त्री-स्वातंत्र्य वगैरे नव्या कल्पनांचा त्याग करून, स्वतःला निवळलं असं चित्रण केलं. आणखी एक लोकप्रिय कादंबरीकार द्वारकानाथ पितळे उर्फ नाथमाधव आपल्या 'प्रेमवेडा' (१९०८) ह्या कादंबरीच्या प्रस्तावनेत लिहितात; "पातिव्रत्य हे स्त्रियांना अलंकारापेक्षाही प्रिय असले पाहिजे." एका ठिकाणी म्हणलं आहे, "स्त्रियांना पतीशिवाय दुसरे दैवत नाही, दुसरी गती नाही, दुसरे धन नाही, पतीसेवेहून उत्कृष्ट धर्म नाही, पतिव्रताधर्म-चिंतन हेच ब्रह्मज्ञान, पतीसद्‌गुण-स्मरण हेच ब्रह्मज्ञान, पतीवियोगाभाव हाच ब्रम्हानंद अशी ज्या साध्वीची पक्की खात्री आहे, तिला सर्व सुखे आपोआप प्राप्त होतात." (नाथमाधव, १९०८: ३) ज्या काळात फडके, माडखोलकर, खांडेकर, पु. य. देशपांडे असे कित्येक लेखक स्त्री-पुरुष प्रणयाला सामाजिक 'बंधनांच्या पलीकडे' घेऊन जाऊ पाहत होते, तेंव्हा पितळे आणि हडपांसारखी मंडळी जुन्या मूल्यव्यवस्थांची तळी उचलून धरत होती.

फडके, खांडेकर, वरेरकर यांनी पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणच्या पार्श्वभूमीवरच्या कादंबऱ्या लिहिल्या तर केतकर, पु. य. देशपांडे, माडखोलकर यांनी विदर्भाचं चित्रण केलं. आणि ह्या सगळ्यांच्याच लिखाणाचा केंद्रबिंदू कौटुंबिकता असल्यामुळे, कुटुंबसुधारणा आणि आधुनिक स्त्री-पुरुष मैत्री ह्या संकल्पनांचा प्रसार या काळात महाराष्ट्रात सर्वदूर झाला होता असं मानायला जागा आहे. असं असलं तरीही लेखक, प्रकाशक, वाचक अशा अनेकच बाबतीत पुणं हेच मराठी कादंबरीचं केंद्र होतं. त्यातही, शनवार-नारायण-सदाशिव ह्या पेठांतलं मध्यमवर्गीय पुणं आणि डेक्कन जिमखाना हा भागच तसा महत्त्वाचा. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातलं मराठी साहित्य ह्या पेठांच्या बोळकांडीत बंदिस्त राहिल्याचा आरोप कित्येक वेळा झालेला आहे. त्यात निश्चितच तथ्य आहे. त्यामुळे, पुढच्या काळात मराठी साहित्यात 'सदाशिवपेठी साहित्य' अशी हेटाळणीची एक संज्ञा रूढ झाली.

मालती बेडेकर
मालती बेडेकर

तीसच्या दशकात उदयाला आलेल्या मालती बेडेकर उर्फ 'विभावरी शिरूरकर' यांसारख्या नव्या दमाच्या लेखिकेच्या साहित्याचं परीक्षण करताना, आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहास आणि संस्कृतीचे एक मार्मिक भाष्यकार त्र्यंबक शंकर शेजवलकर यांनी ह्या सदाशिवपेठी संस्कृतीची रोचक चिकित्सा केली आहे. विभावरीचं साहित्यिक बंड का जिरलं ह्याचं उत्तर शेजवलकरांना त्यांच्या सदाशिवपेठी संस्कृतीत सापडतं. "रुपये-आणे-पैंचा बारीक हिशेब ठेवणाऱ्या" सदाशिवपेठी संस्कृतीत वाढलेल्या विभावरी स्वतःला पुरेशा डी-कास्ट करू शकल्या नाहीत असं शेजवलकरांना वाटतं.

सदाशिवपेठी संस्कृतीविषयी अधिक भाष्य करताना शेजवलकर लिहितात:
"तीस वर्षांपूर्वी महाराष्ट्रात तीन निष्ठा सुरू झाल्या. त्यांतील एक टिळकपक्षाची, म्हणजेच पुणेरी पक्षाची – व हिचेच पुढे सदाशिवपेठी संस्कृतीत रूपांतर झालेले दिसेल. दुसरी साम्यवाद्यांची आणि तिसरी गांधीवादी निष्ठा….तुलनेने पाहता, महात्माजींची निष्ठा ही सात्त्विक, साम्यवादाची निष्ठा ही राजसी आणि सदाशिवपेठी निष्ठा ही तामसी असे म्हणावे लागेल." (शेजवलकर, १९७७: ४३०-३५)

'शब्दरंजन' मासिकाच्या १९६२ सालच्या दिवाळी अंकात महाराष्ट्राच्या सामाजिक नीतिमत्तेविषयी लिहिताना शेजवलकरांनी आपला मुद्दा आणखी स्पष्ट केलाय : महाराष्ट्रीय समाजाचं वैचारिक नेतृत्व लोकहितवादींकडून चिपळूणकरांकडे आणि त्यांच्या सदाशिवपेठी वारसदारांकडे गेलं ह्याची तीव्र खंत बोचऱ्या शब्दांत शेजवलकर व्यक्त करतात.

"या मंडळींच्या हाती महाराष्ट्राची सूत्रे गेल्याने सामाजिक नीतिमत्तादृष्ट्या आपले अतिशय नुकसान झाले असे मला मन:पूर्वक वाटते….स्वतःची बौद्धिक उंची वाढवण्याच्या एकच एक कार्यक्रमावर जन्मभर जोर दिल्याकारणाने या लोकांची बुद्धी प्रगल्भ झाली होती खरी, परंतु त्याबरोबरच ह्या बुद्धीची सारी कसरत स्वयंकेंद्रित असल्याने, ती कमालीची स्वार्थी आणि अहंकारी बनली होती. आपणाबरोबर समाजातील बहुजनांस शहाणे करावे या विचाराला हे लोक सर्वस्वी पारखे होते. उलट आपण शिकलेले, तेंव्हा सामान्यजनांपासून सर्वस्वी वेगळे आणि श्रेष्ठ प्रतीचे आहोत असा खोटा अहंकार मात्र त्यांच्यात ओतप्रोत भरलेला होता. अश्या वावदूक, अकार्यकृत आणि भंपक लोकांच्या हाती महाराष्ट्राची सूत्रे गेल्यावर त्याचा परिणाम अपेक्षित तोच झाला. आजचा सुशिक्षित समजलेला महाराष्ट्र कोणतेही समाजहिताचे कार्य करण्यास असमर्थ झालेला दिसत आहे त्याचे मूळ गेल्या ७५ वर्ष्यात त्याला लाभलेल्या सदाशिवपेठी नेतृत्वात आहे." (शेजवलकर १९७७: २७९-८१)

टिळक युगापर्यंतच्या ब्राह्मणी समाजातून उदयाला आलेल्या – वासुदेव बळवंतांचं बंड, चापेकर बंधू आणि सावरकर बंधूंचं क्रांतिकार्य, कान्हेरे आणि पिंगळे यांचं हौतात्म्य – ह्या घटना त्यानंतर मागे पडून आता आपापल्या कुटुंबापुरत्या सुखवस्तू आयुष्याची चौकट आखण्यात हा वर्ग गुंग झाला. शेजवलकर म्हणतात त्याप्रमाणे, त्या वर्गाला आधीच अहंकाराची बाधा झालेली होती आणि त्याचं व्यापक बहुजन समूहांशी असलेलं नातं एकूणच संशयास्पद होतं. पुढे टिळकोत्तर काळातल्या मराठी शहरी ब्राह्मणी मध्यमवर्गानं "घरबसल्या मिळणाऱ्या सुखाच्या प्राप्तीसाठी" साहित्य आणि सांस्कृतिकतेतून आपलं पुण्य कमवायचं ठरवलं.

महाराष्ट्राच्या पुरोगामी असण्याविषयीचं काहीएक सार्वजनिक कथन विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातल्या शहरी मध्यमवर्गात आकाराला आलं, जे आज प्रचलित असणाऱ्या फुले-आंबेडकरी धारणेनं प्रभावित असणाऱ्या पुरोगामित्वापासून फारच निराळं होतं. सुमारे शंभर वर्षांपूर्वीच्या महाराष्ट्रातल्या ह्या पुरोगामित्वाच्या धारणेत मुख्यत: सुधारकी दृष्टीतून स्फुरलेली संसारभिमुखता, बुद्धिप्रामाण्यवादाचा आग्रह, व्यक्तिवादी आणि इहवादी राजकीय जाणिवा, एका नव्या पार्थिव स्त्रीची साहित्यिक निर्मिती आणि शारीरतेला आलेलं अभूतपूर्व महत्व हे घटक प्रभावी होते. व्यक्ती सार्वभौम असून तिला स्वतःची आर्थिक आणि भौतिक उन्नती साधण्याचा आणि अधिकाधिक पार्थिव सुख मिळवण्याचा हक्क ह्या पुरोगामीपणाच्या धारणेत ग्राह्य मानला गेला. एकोणीसशे वीसच्या दशकात कौटुंबिक सुखवादात रमलेला आणि आधुनिक प्रणयोत्सुक स्त्री-पुरुषांच्या प्रतिमांच्या निर्मितीत गुंग असलेला हा स्वच्छंदतावादी विचार, पुढे तीसच्या दशकात सिग्मड फ्रॉईड, बर्ट्रांड रसेल आणि मार्क्सवादी विचारांच्या संयुक्त विद्यमाने प्रसारित झालेल्या नवमतवादी विचारांत परिणत होतो.

पण त्याबद्दल नंतर कधीतरी.

***

निवडक संदर्भ:
o. गो.म. कुलकर्णी आणि वा. ल. कुलकर्णी (संपा.) मराठी वाङ्मयाचा इतिहास (खंड ६, भाग १). महाराष्ट्र साहित्य परिषद, १९८८.
o. प्रभा गणोरकर इत्यादी. (संपा. ) संक्षिप्त मराठी वांग्मयकोश (१९२०-२००३). ग रा. भटकळ फौंडेशन. २००४.
o. शंकर केशव कानेटकर. स्वप्नभूमी: माधव जुलिअन यांचे चरित्र. व्हीनस प्रकाशन, १९६५.
o. गंगाधर देवराव खानोलकर. माधव जुलिअन: जीवनकथा स्वस्तिक पब्लिशिंग हाउस, १९५१.
o. द न. गोखले डॉ. पटवर्धन उर्फ माधव जुलिअन. मौज प्रकाशन गृह, १९७८ (दुसरी आवृत्ती २०१३)
o. विठ्ठलराव घाटे. दिवस असे होते…मौज प्रकाशन गृह, १९६१. (दुसरी आवृत्ती १९९८)
o. प्रल्हाद केशव अत्रे. झेंडूची फुले. नवभारत प्रकाशन संस्था, १९२५ (पाचवी आवृत्ती. १९४९)
o. स्वाती कर्वे (संपा.) स्त्रियांची शतपत्रे (इ.स. १८५० ते १९५०) प्रतिमा प्रकाशन, २००९.
o. ह वि. मोटे. विश्रब्ध शारदा (खंड पहिला, १८१७-१९४७) ह वि मोटे प्रकाशन, १९७२ (दुसरी आवृत्ती १९९३)
o. ना सी. फडके. प्रतिभाविलास. विश्वकर्मा प्रकाशन, १९६६.
o. ना सी. फडके. इंद्रधनुष्य. महाराष्ट्र ग्रंथ भांडार, ति.आ. १९५५
o. ना सी. फडके. माझ्या साहित्यसेवेतील स्मृती. कॉन्तीनेन्तल बुक सर्विस, 1943.
o. ना सी. फडके. समग्र वांग्मय: खंड १४ (आत्मचरित्रपर लेखन). ना सी. फडके फौंडेशन, २०१०.
o. नरहर कुरुंदकर. धार आणि काठ. देशमुख आणि कंपनी, १९७१ (पाचवी आवृत्ती २०१०)
o. दु. का. संत मराठी स्त्री. पद्मगंधा प्रकाशन, दु.आ. २००३ (पहिली आवृत्ती १९५७, पुणे विद्यापीठ)
o. विनया खडपेकर. स्त्रीस्वातंत्र्यवादिनी: विसाव्या शतकातील परिवर्तन, पॉप्युलर प्रकाशन, १९९१. (दुसरी आवृत्ती २००५)
o. ह वि. मोटे (संपा.) त्र्यंबक शंकर शेजवलकर: निवडक लेखसंग्रह. ह वि. मोटे प्रकाशन, १९७७.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (3 votes)

प्रतिक्रिया

हा लेख फारच आवडला. मुद्दाम स्फोटक लिहिण्याचा किंवा विनोद करण्याचा प्रयत्नही करण्याची गरज नाही. विषयच काय भारी आहे!

अत्र्यांनी मारे माधव ज्युलियनांवर टीका केली. पण त्यांच्या सिनेमात 'यमुनाजळी खेळू' गाणं आहेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जब्बरदस्त लेख!

काही टिप्पण्या :

अत्र्यांचा एकंदर सूर भिड्यांनी विविधज्ञानविस्तारात केलेल्या टीकेशी मिळताजुळताच होता.
>> मला नाही पटलं. भिडे-सनातन्यांना जुलियनांच्या कवितेतल्या नैतिकतेवर आक्षेप होता. पण अत्र्यांचा आक्षेप मात्र 'not practicing what you're preaching' असा काहीसा होता. दोन्ही आक्षेपांची जातकुळी पूर्ण वेगळी आहे.

माधवराव तर पुणेकरांच्या मनात, धाबळीत लपवलेल्या कोंबडीच्या अंड्यासारखे सुळसुळत होते.>>
बेकार हसलो! काय खतरनाक उपमा आहे!

"प्रेमस्वरूप आई! वात्सल्यसिंधू आई">>
याची जन्मकथा अशी आहे तर! शाळकरी निबंधांची गायडं पाडणाऱ्या मास्तरांना हे सांगितलं पाहिजे!

'सदाशिवपेठी साहित्यसंस्कृती' हा शब्द मस्त आहे. गंमत म्हणजे त्यातला 'पुणे३०'चा भौगोलिक मार्कर स्वतःच अत्यंत विरोधाभासांनी भरलेला आहे. लेखात उल्लेख झालेले पुरोगामी, रविकिरण मंडळाचे ओरिजिनल मेंबर नाट्यछटाकार दिवाकर, आणि सनातनी वृत्तीचे नाथमाधव पितळे शनिवार पेठेतल्या एकाच गल्लीत एकाच काळात राहात होते! (त्याच गल्लीच्या तोंडाशी संघाचं पुण्यातलं मुख्यालयही आहे!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

"प्रेमस्वरूप आई! वात्सल्यसिंधू आई">>
याची जन्मकथा अशी आहे तर! शाळकरी निबंधांची गायडं पाडणाऱ्या मास्तरांना हे सांगितलं पाहिजे!

आत्यंतिक संयत प्रतिक्रिया!

हे कळल्यावर माझीही प्रतिक्रिया काहीशी अशाच धर्तीवरची झाली होती. परंतु, इतक्या मोजक्या शब्दांत, इतक्या संयतपणे परंतु तरीही समर्पकपणे ती मांडणे मला जमले नसते ब्वॉ!

(आता माझे काम आपण इतक्या उत्कृष्ट रीतीने केल्यावर माझी प्रतिक्रिया मी मांडण्याचा प्रयत्न करण्याचे कष्ट घेण्याचे काहीच कारण मला दृग्गोचर होत नाही. परंतु तरीही, यदाकदाचित जर मी मांडलीच असती, तर ती "आर यू किडिंग मी??????"ने सुरू झाली असती. इतका हादरलो होतो. कारण शेवटी, आम्हीही त्या तसल्याच पठडीतल्या मास्तरांच्या खुराकावर वाढलेले! त्यामुळे, हे वाचेपर्यंत आमचीही त्या गाण्याबद्दलची समजूत काहीशी मास्तरांसारखीच होती. हे वाचल्यावर, "सोचा था क्या, क्या हो गया निकला!" असे झाले. अर्थात, असे असणे अशक्य आहे असा दावा मुळीच नाही, परंतु... आयला! हे माहीत नव्हते! एवढेच (असंयतपणे) व्यक्त होऊ इच्छितो.)

...सनातनी वृत्तीचे नाथमाधव पितळे शनिवार पेठेतल्या एकाच गल्लीत एकाच काळात राहात होते!

(लेखाच्या अनुषंगाने हे आत्यंतिक अवांतर आहे, परंतु तरीही,) नाथमाधव शनवारात राहात होते, याची कल्पना नव्हती. त्यांच्या अनेक पुस्तकांच्या प्रस्तावनांतून डेटलाइनीवर 'पितळे यांचा बंगला, कावसजी पटेल टँक, मुंबई' असा पत्ता वाचल्याचे स्मरते.

अर्थात, ते नंतर मुंबईस राहावयास गेलेले असू शकतातच म्हणा.

बाकी, नाथमाधवांच्या संदर्भात 'सनातनी वृत्तीचे' हे वर्णन खटकते. म्हणजे, चुकीचे आहे, म्हणून नव्हे. (चुकीचे मुळीच नाही.) परंतु, हे म्हणजे, हिटलरचे वर्णन थोडक्यात 'हिटलर मारकुटा होता' असे करण्यासारखे झाले. (उपमा अंमळ गंडली असेल, परंतु... यू गेट द पॉइंट.)

परंतु, हे अवांतर झाले. तेव्हा, असोच.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१) अत्र्यांचा एकंदर सूर भिड्यांनी विविधज्ञानविस्तारात केलेल्या टीकेशी मिळताजुळताच होता.>> मला नाही पटलं. भिडे-सनातन्यांना जुलियनांच्या कवितेतल्या नैतिकतेवर आक्षेप होता. पण अत्र्यांचा आक्षेप मात्र 'not practicing what you're preaching' असा काहीसा होता. दोन्ही आक्षेपांची जातकुळी पूर्ण वेगळी आहे.

दोन्ही आक्षेपांची जातकुळी तपशीलांत काहीशी निराळी आहे हे खरं. पण अत्र्यांच्याच शब्दांत पहायचं तर: "केशवसुतांच्या अनुयायांनी विकसित केलेल्या नवकवितेच्या बाळबोध परंपरांशी माधव जुलिअनांचा फार्शी फाशन पंथ अतिशय विसंगत होता. गणपतीची आरती सुरू असताना कुणी गॉड सेव्ह द किंग चालू केलं म्हणजे भाविक मनाला कसे वाटेल? मलाही तसेच वाटले. विडंबनकाव्य ही त्याच माझ्या दुखावलेल्या भावनेची वाङ्‌मयीन प्रतिक्रिया होती." भिडे आणि अत्रे आणि इतरही अनेकांच्या दृष्टीनं रविकिरण मंडळ आधुनिक मराठी कवितेच्या परंपरांशी विसंगत होतं. त्याहूनही वाईट म्हणजे त्यांच्या शारीरशुचितेच्या आणि वांग्मयीन संकेतांच्या धारणांना दुखावणारं होतं. आणि ते विलक्षण लोकप्रिय बनलेलं होतं. म्हणून त्याची विरचना आवश्यक ठरली. एवढ्या विशिष्ठ अर्थानं मी भिड्यांची आणि अत्र्यांची टीका एका प्रकारची होती असं म्हणतोय.

२. गंमत म्हणजे त्यातला 'पुणे३०'चा भौगोलिक मार्कर स्वतःच अत्यंत विरोधाभासांनी भरलेला आहे. लेखात उल्लेख झालेले पुरोगामी, रविकिरण मंडळाचे ओरिजिनल मेंबर नाट्यछटाकार दिवाकर, आणि सनातनी वृत्तीचे नाथमाधव पितळे शनिवार पेठेतल्या एकाच गल्लीत एकाच काळात राहात होते! (त्याच गल्लीच्या तोंडाशी संघाचं पुण्यातलं मुख्यालयही आहे!)

हे अगदी खरं आहे. मुदलात परंपरावादी आणि सुधारणावादी हे लोक वसाहतिक आधुनिकतेच्या एकाच प्रक्रियेची अपत्ये आहेत, हे माझं जुनंच म्हणणं पुन्हा अधोरेखित करतो. फर्गुसन कॉलेजात माधवराव पटवर्धनांच्या वरदा नायडूशी असलेल्या कथित संबंधांच्या चौकशीसाठी ज्या कानिटकर कंपूनं पुढाकार घेतला होता, त्यातली बहुसंख्य मंडळी समाजात पुरोगामी म्हणून ओळखली जात, तर ज्या नाईक गटानं त्यांना पाठींबा दिलं आणि त्यांची बाजू लढवली, ते लोक आपल्याला स्वतःच सनातनी म्हणवून घेत.

तर हा घोळ लई जुना आहे.

३. आणि तुझ्यासारख्या चोखंदळ वाचकाला लेख आवडल्याचं कळल्यामुळे फारच आनंद वाटला. खरं म्हणजे, हा लेख माझ्या प्रबंधातल्या एका प्रकरणाचा एक पंचमांश भाग आहे. त्या प्रकरणाच्या उरलेल्या भागात भांडारकरांची नात मालिनी पाणंदीकर आणि गुलाबखान बशिरुद्दिन खान यांच्या लग्नानंतर महाराष्ट्रभरात आयोजित केलेल्या सार्वजनिक निषेध सभा, ल रा पांगारकरांनी दिलेली हिंदू पुरुषांच्या दोषांची दीर्घ यादी, ओलेती या चित्राच्या निमित्तानं झडलेले अश्लीलताविषयक वाद, फडके आणि आचार्य जावडेकर यांच्यातला पुरोगामित्व म्हणजे काय या विषयावर झालेला सार्वजनिक वाद, नवमतवाद ह्या नव्या सामाजिक भूमिकेचा आशय, महादेवशास्त्री दिवेकर आणि भास्करराव जाधव यांच्यातला मारुतीच्या ब्रम्हचारी असण्याबद्दलचा वाद, ब्राह्मणेतर चळवळीची केसरीचे संपादक वा कृ भावे यांनी केलेली समीक्षा, स्त्री लेखिकांच्या कादंबरीतला प्रणय, व्यायाम या बडोद्याहून प्रकाशित होणाऱ्या मासिकातल्या शरीर संवर्धनाच्या चर्चा, किर्लोस्कर मासिकांतून व्यक्त झालेलं पुरोगामित्व, ना ह आपट्यांच्या सुखाचा मूलमंत्र ह्या कादंबरीतली मुख्य सूत्रे...अश्या अनेक सुरस आणि चमत्कारिक भानगडी आहेत.

अदिती वर म्हणते तसं मुद्दामहून स्फोटक आणि/किंवा विनोदी लिहायची आवश्यकताच नाही.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक2
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण राहुल, तुझं प्रबंधाचं काम पूर्ण झालं की तो पुस्तकरूपात प्रकाशित व्हायलाच्च पाहिजे. फार भारी विषय निवडला आहेस आणि त्याबद्दल तुला जे म्हणायचं आहे ते खूपच रोचक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

चालायचंच.
२०२० साल येणारे म्हणजे जवळपास लेखातल्या प्रसंगांना १०० वर्षं उलटतील -
तरी आजही कुठल्या मराठी पुस्तकात स्त्री पुरूष प्रणयाची,संभोगाची, स्पर्शाची, कामुकतेची वर्णनं असली की त्याला अश्लील तरी म्हटलं जातं नाहीतर एकदम मचाक लेवलची कबड्डी.
"आम्ही हे असे आहोत". असं सरळसोट नागडं सत्य मराठी "साहित्याला" झेपत नसावं.
मेघना पेठेने १९९०त थोडंफार मोकळेपणाने काही लिहिण्याचा प्रयत्न केला तर लगेच "बोल्ड" लेखिका.
असो.

ना.सी फडक्यांचं दलित-कादंबरीवरचं वक्तव्य लोल आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फारच सुंदर लेख. अगदी रसाळ. काही तुकड्यांबद्दल राहुलकडून प्रत्यक्ष ऐकलं होतं.

स्त्रिया नुकत्याच पायात चपला घालू लागण्याच्या त्या काळात पुरुषांनी आणि स्त्रियांनी एकत्र सहल काढण्याची कल्पना सामाजिकदृष्ट्या अगदीच धार्ष्ट्याची होती.

स्त्रियांनी चपला घालायला लागणे हे वस्तुस्थितीचे वर्णन आहे की उपमा आहे?

"(...) केशवसुतांच्या अनुयायांनी विकसित केलेल्या नवकवितेच्या बाळबोध परंपरांशी माधव जुलिअनांचा फार्शी फाशन पंथ अतिशय विसंगत होता. गणपतीची आरती सुरू असताना कुणी गॉड सेव्ह द किंग चालू केलं म्हणजे भाविक मनाला कसे वाटेल? मलाही तसेच वाटले. विडंबनकाव्य ही त्याच माझ्या दुखावलेल्या भावनेची वाङ्‌मयीन प्रतिक्रिया होती." (अत्रे १९४९: ४)

अत्र्यांना बाळबोध शब्दाचा काही वेगळा अर्थ अपेक्षित होता का? नाही तर बाळबोध परंपरेशी विसंगत हा टीकेचा मुद्दा कसा होऊ शकतो? प्रगल्भ परंपरेशी विसंगत अशी टीका समजू शकतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>>स्त्रियांनी चपला घालायला लागणे हे वस्तुस्थितीचे वर्णन आहे की उपमा आहे?

हे सिरिअसली विचारलं आहे का?

माझी चुलत आजी चपला घालत नसे. म्हनजे १९३०-५० काळात तरी रत्नागिरी जिल्ह्यात बायकांनी चपला घालायची पद्धत नव्हती. ती मुंबईला तिच्या मुलाकडे आली तरी तिच्याकडे चपला नसत.

आनंदी गोपाळ (ही कादंबरी आहे हे मान्य आहे पण) या कादंबरीतही आनंदीने चपला की बूट घालून समुद्रकिनारी फिरायला गेल्यावर तिच्यावर तिच्या आईचीच शेरेबाजी झाल्याचे उल्लेख आहेत.

मागे/तीनचार महिन्यापूर्वी कुठेतरी सिनेमातील द्वंद्वगीतांमध्ये हीरो बूट वगैरे घातलेला आणि हिरॉईन अनवाणी असते यावर चर्चा झाली होती. त्या प्रथेचे मूळ या जुन्या रूढीत असेल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

धन्यवाद मिहिर.

अरे, काशीबाई कानिटकरांच्या आत्मचरित्रात ह्या प्रकरणाचे रोचक तपशील आहेत. त्या चपला घालून घराबाहेर पडल्यावर लोकांनी कुत्सित शेरेबाजी केली आणि काही तर अगदी धोंडे फेकू लागले. अश्या परिस्थितीत रविकिरण मंडळाचं स्त्री-पुरुष मैत्रीचा धीट पुरस्कार करणं खरोखरीच धाडसाचं होतं. ज्याचे अनुषंगिक परिणाम पटवर्धनांवरच्या चौकशीत दिसून येतात.

बाळबोध म्हणजे elementary असं नाही. मोडी आणि बाळबोध अश्या दोन लिखाणाच्या परंपरा होत्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

झकास, लेख अत्यंत आवडला.
आपल्याशी एकदा या विषयावर चर्चा करायची आहे.
आपण भारतात आहात की गेलात परत ट्रम्पलँडात ?
(अजून एक सूक्ष्म माहिती हवी आहे.कदाचित आपण किंवा रा रा आदूबाळ सांगू शकतील.
माधव जुलीयन यांचे वास्तव्य प्रभात रस्त्यावर होते का ? म्हणजे आज जिथे ला प्रसिर आहे त्या जागी किंवा त्याच्या शेजारी)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माधव जुलीयन यांचे वास्तव्य प्रभात रस्त्यावर होते का ?

त्यांनी डेक्कन भागात घर बांधलं होतं असा उल्लेख त्यांच्या पत्नीने लिहिलेल्या आठवणींत* आला आहे. नक्की कुठे ते बघून सांगतो लिहिलं नाहीये.

*त्या आठवणी ("आमची अकरा वर्षें") कोणी मानसशास्त्रज्ञाने वाचून त्यावर लिहावं असं मला फार वाटतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

धन्यवाद अबापट.

"आपल्याशी एकदा या विषयावर चर्चा करायची आहे" -- या चर्चेला कधीही बसू. पण या वरून सच्च्या पुणेकराची पु.ल. देशपांड्यांनी सांगितलेली लक्षणं आठवली.

मी इथंच आहे. जमलं तर भेटू लवकरच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काय भारी लेख आहे हा! अदिती म्हणतात तसे पुस्तक येऊच द्या.
अत्रेंबद्दल जितकं वाचू तितकं कन्फ्युज व्हायला होतं. खुप गुंतागुंतीचं व्यक्तिमत्व आहे अत्र्यांचं. त्यांचे चांगले चरित्र लिहायला हवे कुणीतरी. इथे मला अत्र्यांची भुमिका पटली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

जे काही द्याल ते वाचून हो म्हणण्याशिवाय पर्याय नाही. आमचे आजोबा शिकलेले नसल्याने असल्या चर्चा ऐकिवात नव्हत्या.
बाकी जुन्या घटना वाचून पंडीत मंडळी समाजावर, त्यांना आवडणाऱ्या संस्कृतीवर आपला वचक ठेवण्याच्या प्रयत्नात होती हे कळले. संन्याशास देहान्त शिक्षा देण्यापासून ते शिरडीचा बाबा हा देवच नाही पटवण्यापर्यंत. प्रेम, विधवाविवाह, वगैरे फारच दूरच्या गोष्टी.
आचरटपणाचा कळसच.
पण आता परिस्थिती उलटली आहे. काहीही करा, श्रद्धास्थानांपुढे रांगा लावा आणि पैका ओता. पैका पैका आणि पैका फेका.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अप्रतिम असे हे तुमचे संशोधन आहे. मी तरी मराठीत आजपर्यंत इतके सखोल संशोधन या विषयावर वाचलेले नाही. यात तुम्ही घेतलेले परीश्रम जागोजागी दिसतात. या काळातील साधने ही इतकी कमी उपलब्ध असतांना आपण जो प्रयत्न केला आहे तो स्तुत्यच नाही तर नव्या संशोधकांना प्रेरणा देणारा आहे. तुमचा पुर्ण प्रबंध वाचावयास मिळाला तर मी स्वत:ला भाग्यवान समजेल.
तुमच्या दुष्टीत आधुनिकता तर आहेच शिवाय संवेदनशीलता दिसते. एकुण कालप्रक्रिया समजुन घेण्याचा प्रयत्न माणसे समजुन घेण्याचा प्रयत्न जो अभिनिवेशरहीत असल्याने अधिकच भावतो.

पुढे, १९१७ साली शांताबाई हेर्लेकरांनी आपल्या आईच्या मनाविरुद्ध जाऊन, बाबुराव कशाळकर ह्या सोनार जातीतल्या व्यक्तीशी लग्न केलं. ह्या लग्नाचा धक्का माधवरावांना जोरात बसलाच, पण लक्ष्मीबाईंना तो पचवणं फार अवघड गेलं. लक्ष्मीबाई वर्षभरातच देवाघरी गेल्या.

शांताबाई व लक्श्मीबाई मध्ये प्लॅटॉनिक लेस्बीयन रीलेशनशीप होती असे वरील विधानावरुन वाटते. तसे असेल तर ते रोचक आहे. म्हणजे शांताबाईचे त्या काळातील व्यक्तिमत्व रोचक वाटते. उत्सुकता वाटते.

प्रेमस्वरुप आई या कवितेची प्रेरणा वाचुन धक्का बसला. म्हणजे ती गेली तेव्हा रीमझीम पाऊस निनादत होता या ग्रेसच्या कवितेनंतर ही आई वरील बहुजनात प्रचलित अर्थाला धक्का देणारी दुसरी आई. हे माहीत नसण्यातुन एकूण मराठी समीक्शा व आस्वाद विषयक बाबतीत प्रश्नचिन्ह निर्माण होते.

तुमचा हा लेख वाचल्यावर तीव्रतेने आवर्जुन आठवण झाली ती दि.के. बेडेकर यांच्या " मराठी वांडगमयाची सामाजिक पार्श्वभुमी " या लेखाची. बरायच दिवसानंतर हा लेख पुन्हा वाचला यातील काही उतारे येथे देण्याचा मोह आवरला नाही म्हणुन इथे हे देतो. हा तुमच्या विषयाशी सरळ संबंधित आहे.
यात दि.के. बेडेकर एके ठिकाणी म्हणतात्

बंगाली सुशिक्षितांना सन १८१४ ते १८८० पर्यंतची चौसष्ट वर्षे नव्या संस्कृतीच्या आकलनासाठी लाभली. तर मराठी सुशिक्षितांना १८५० ते १८८० अशी फक्त तीसच वर्षे लाभली. सन १८८० पासुन सार्याच भारतीय सुशिक्षितांना पाश्चात्य संस्कृतीविरुद्ध मोहरा फिरवुन वागणे भाग पाडले. बंगाल व महाराष्ट्र या ठिकाणच्या सुशिक्षितांना नव्या संस्कृतीच्या स्वीकारासाठी असा कमी अधिक वेळ मिळाला याचा दुरवर परिणाम झालेला दिसेल. ह्या परीणामाची थोडी सुचना द्यावयाची तर रवींद्रनाथ व शरदबाबु यांच्या वांग्डमयात आधुनिक दृष्ट्या जी प्रगल्भता आहे ती आपल्या वांग्डमयात दिसु शकली नाही.

या ब्रिटीशांशी आंग्लशिक्षित वर्गाचे संबंध पाहणे हे मला वाटते फार महत्वाचे आहे.या संबंधात मराठी नव्हे भारतीयही सुशिक्षितांच्या मनाचे कपाट उघडण्याची किल्ली आहे. ब्रिटीश आणि कालांतराने युरोपीय संस्कृतीचा आम्ही स्वीकार केला हे फक्त ढोबळ सत्य झाले. त्या स्वीकाराची पद्धती कळायची असेल तर ब्रिटीश अधिकारी व मराठी नोकरपेशा , सुशिक्षित, ब्रिटीश प्राध्यापक व मराठी विद्यार्थी, आणि ब्रिटीश मिशनरी व राजकीय व सामाजिक क्षेत्रांतील त्या वेळचा सुशिक्षित पुढारी या द्वंदांचा अर्थ समजुन घेतला पाहीजे. या द्वंदातील विनिमय , समन्वय व संघर्ष , हा सुशिक्षित मनाच्या गाभ्यापर्यंत पोहोचतो., इतकेच नव्हे तर या विनिमयातुन ते मन घडत गेले असे काही अंशी तरी म्हणावे लागेल.

यात दि.के. बेडेकरांची वरील अपेक्षा तुमचे हे संशोधन पुर्ण करत आहे असे माझे मत आहे.

अजुन काही संबंधित उतारे

सन १९२० च्या सुमारास मराठी सुशिक्षितांना हे जाणवले होते की त्यांनी समाजाचे नेतृत्व घेतले पाहीजे व ते घ्यावयाचे तर " भोगशुन्य स्वामी" झाले पाहीजे. ही जेझुइटांचे अनुकरण करण्याची कल्पनाच थोड्या फरकाने आहे. तो फरक "राजे" म्हणजे आधुनिक काळातील "अनभिषिक्त राजे " होण्याच्या ध्यासाचा आहे. आता सन १९२० च्या राष्ट्रीय आंदोलनाचा व त्याच्या मागेपुढे झालेल्या घटनांचा थोडा संदर्भ घेतला तर असे दिसुन येते की " अनभिषिक्त राजे " होण्याची सुशिक्षितांची ही कल्पना स्वप्नासारखी ठरावी, अशा घटना त्या सुमारास होत गेल्या. पहिल्या महायुद्धातुन ब्रिटन विजयी व प्रबलतर झालेले दिसले.पंजाबचा मार्शल लॉ व रौलेट ॲक्ट या घटनांमुळे ब्रिटिशांच्या सनदशीर व न्यायी परंपरेबद्दल होत्या नव्हत्या त्या अपेक्षांची कोळीष्टके झटकली गेली. अभिनव भारताच्या व माणिकतोळा बॉम्ब केसच्या वाताहतीनंतर सशस्त्र क्रांतीचा मार्ग नुसताच बलिदानाचा विफल प्रयत्न आहे हे सुशिक्षितांना कळुन चुकले.माँटफर्ड सुधारणांच्या मार्गाने धर्मभेद व जातिभेद यांचा पुरेपुर फायदा घेणे ब्रिटिशांना शक्य आहे हे त्यांना उमगले. सारा समाज आपल्या विद्वत्तेचा , त्यागबुद्धेचा व परंपरागत अधिकाराचा आदर करील व ब्रिटिशांविरुद्ध झुंज़ण्यास सिद्ध होइल ही आशा आधीच्या पिढीतील राष्ट्रवाद्यांनी मनात धरली होती त्या आशेवरही पाणी पडल्याचा अनुभव या नव्या पिढीला आला. नेतृत्वाच्या महत्वाकांक्षेचे आकाश फाटल्यासारखे झाले. या साऱ्या गोष्टीत पुन्हा पुन्हा आपल्या जाणिवांच्या दुबळेपणाचा प्रत्यय येतो. हा प्रत्यय सन १९२० ते १९३० या काळातल्या वांड्गमयातही येणे स्वाभाविकच आहे.

फडके यांच्या कादंबऱ्यांमध्ये रचनेचे , भाषेच्या मोजकेपणाचे आणि वर्णनाच्या रेखीवपणाचे सौंदर्य खासच आहे. त्यांच्या कादंबऱ्या सुशिक्षितांना प्रियही झाल्या हेही खरेच. याचा अर्थ काय ? मला वाटते की सन १९२० नंतरच्या भ्रमनिरासानंतर सुशिक्षित वर्ग एका नव्या जाणिवेच्या पातळीवर स्थिर होत होता. ब्रिटिश सत्ताधाऱ्यांशी आर्यवंशीयत्वाबद्दल बरोबरी करणे, विद्वत्तेच्या व त्यागाच्या बळावर समाजाचे अग्रणी बनणे व या साऱ्या "पळत्या" ध्येयवादासाठी हातची माफक पण खरीखुरी सुखे सोडुन देणे हा सारा प्रकारच आता बहुसंख्य सुशिक्षितांना नकोसा झाला होता.पारतंत्र्य त्यांना नको होते. पण आहे या समाजात हुशार, कर्तबगार, निरलस तरुणाला संधी आहे ना ? तेवढ्या संधीसाठी त्याने प्रामाणिकपणे धडपड करुन यश मिळवावे व एखाद्या सुंदर व बुद्धिमान तरुणीचे प्रेमही मिळवावे, असा एक व्यवहारी ध्येयवाद समाजात रुढ होत होता. या कल्पनेभोवती निर्मीती करतांना बहुसंख्य वाचकांच्या मनाला आपण सहज स्पर्श करु शकु याची स्पष्ट जाणीव असल्यामुळे रचना, भाषा व वर्णने या बाबतीत एक नवा दर्जा मराठी कादंबरीला आणुन देण्याचा आत्मविश्वास फडके यांच्या ठिकाणी प्रथमपासुनच स्थिर झालेला दिसतो.समकालीन लेखकांच्या संशयवादापासुन व ध्येयवादी उपदेशकाच्या भुमिकेपासुन ते दुर राहीले व सुशिक्षितांच्या नव्या भ्रमनिरस्त मनाशी समरस झाले.त्यामूळेच ते यशस्वी होउ शकले.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

जी.एंच्या "कळसूत्र" कथेत म्हटल्याप्रमाणे- जिथे सगळा समाज सत्य बोलतो तिथे सत्य बोलण्यात कसलं आलयं धाडस? अशा ठिकाणी असत्य बोलणाराच धाडसी ठरतो.

तद्वत ज्या काळी अख्खा भारत स्वातंत्र्य, समता, देशप्रेम, राष्ट्र, ब्रिटीशविरोध, आत्मक्लेश वगैरेंच्या कैफात होते तेव्हा तो समाजाचा दबाव पूर्णत: झुगारून देऊन
एखाद्या तरूणीच्या सौंदर्याची (झेपेल इतपत का होईना) खुलेआम वर्णन , स्त्रीपुरूषांनी एकत्र यावं, चान्स मे डान्स करावा, नायक नायिकेने एकमेकांना जवळ घ्यावं, अधरामृतपान करावं
अशा विस्फोटक सामग्रीतून समाजाला जागृत करणारे फडके, माडखोलकर (आणि कं), ह्यांनाच खरं तर क्रांतीकारक म्हटलं पाहिजे.
फडक्यांनी आपल्या नायिकांची वर्णनं १९३० मधेच अशी केल्याने पुढे १९६० साली नेमाडे "खुल्लमखुल्ला पोरापोरींना चढू दिलं पाहिजे" वगैरे लिहू शकले.
तेही आपल्या समाजाने ऐकलं नाहीच.
-------------
स्वातंत्र्यपूर्व काळात संपादकीय वगैरे वैचारीक लिहून बाकी लोकांनी काव उगाच आणला.
पण प्रॅक्टिकली एखाद्या मुलीचा/मुलाचा हात पकडून - "येतोस्का?" असं विचारायला शिकवणारे खरे ग्रेट.

.
तीच गत झेंडूच्या फुलांची. रवीकिरण मंडळ म्हणजे कुणी एक कवींचा ग्रूप इतपतच मला ठाऊक होतं. त्यामुळे अशांची रेवडी उडवणाऱ्या अत्रेंच्या कविता वाचून मी (समाजदबावाखाली) हसलो होतो.
रविकिरण मंडळी प्रत्यक्षात धबधब्याखाली स्त्री पुरूषांनी एकत्र भिजावं, सहली काढाव्यात, आद्य मिल्फ(पहा: MILF)स्वरूपातली रिलेशन्स , लेस्बियन किंवा पार पुढपर्यंत Ménage à trois (पहा: त्रिसमागम) इथपर्यंत पोचली होती, हे जर मला तेव्हा ठाऊक असतं तर .......
.
आपल्याला खरा अभिमान असला पाहिजे तो ह्या पूर्वजांचा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाप रे केवढा सामाजिक दबाव, कुचंबणा, या सर्वावर मात करुन 'समानशील व्यसनेषु सख्यम' करण्याचा प्रयत्न. कौतुकास्पद आहे, अवघड वाटचाल आहे. बरीच मन मारावे लागणे, कुचंबणा होणे, भावना मोकळेपणी व्यक्त न होणे. हा काहीही इतिहास गावीही नव्हता. स्त्री-पुरुष मैत्री साधी गोष्ट आहे पण किती विरोध तो. त्या संघर्षातच , नाजूक भावना कोळपायच्या.
लेखाच्या सुरुवातीचा विधवा पुनर्विवाहाचा उल्लेख, प्रसंग त्यातील मुसलमान धर्मातील करवलीचा सहभाग सगळच केवढं पुरोगामी असणार त्या वेळेला. ब्राह्मणांनी फक्त देव देवच केलं नाही तर समाज सुधारण्यास, नवे पुरोगामी पायंडे पाडण्यातही हे अग्रेसर होते, त्यांचे नेतृत्व होते.
अतिशय अभ्यासपूर्ण लेख आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ब्राह्मणांनी फक्त देव देवच केलं नाही तर समाज सुधारण्यास, नवे पुरोगामी पायंडे पाडण्यातही हे अग्रेसर होते, त्यांचे नेतृत्व होते.

नाही. समाज ताब्यात ठेवण्यासाठी केलेला नीतीचा भंपकपणा. नंतर त्यांच्याच पुढच्या पिढीने झुगारायला केलेली सुरुवात होती.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख विशेष आवडला. अन्य लोकांनी निवडक भागांवर, त्यांना आवडलेल्या किंवा त्यांना चक्रावून टाकणार्‍या भागांवर उत्तम प्रतिक्रिया दिलेल्या आहेतच.

शेजवलकरांचं "सदाशिवपेठी" संस्कृती आणि पर्यायाने त्या संस्कृतीचं साहित्यात पडलेलं प्रतिबिंब यावरचं भाष्य विशेष मार्मिक. विभावरी शिरूरकरांचं साहित्य "जिरून गेलं" कारण त्या पुरेशा "डि-कास्ट" झाल्या नाहीत हे मत जरा तपासून घ्यावं असं आहे. ते सहजासहजी मान्य होता येण्यासारखं नाही आणि त्यात शिरूरकरांबद्दल आकस तर नाही ना अशी शंका येते आहे.

सदाशिव पेठी संस्कृती आणि अत्रे यांचं वर्तन यात काहीतरी साम्य आहे. समाजाच्या विचारांचं धुरीणत्व आपल्याकडे आहे असा समज असणं, एखाद्या गावगुंडाप्रमाणे वर्तन करणं, पाचकळपणा असं सामान्यपणे ज्याचं वर्णन करता येईल अशा पद्धतीने वागणं, त्यातल्या गॉसिपी, चावट गोष्टींचा दुसर्‍याचं चरित्रहनन करण्याकरता हत्यार म्हणून वापर करणं अशा प्रकारची साम्यं मला जाणवत आहेत. विष्णूशास्त्री चिपळूणकरी परंपरेतून निर्माण झालेल्या समाजाच्या या क्रॉस सेक्शनच्या मानसिकतेचा उल्लेख शेजवलकर करतात परंतु त्याबद्दल आणखी ऐकावाचायला आवडेल. पुरोगामीत्व आणि प्रतिगामित्व या संकल्पनांचा वापर सोयीस्करपणे करणं, वारा पाहून, देशकालपरिस्थिती आणि वैयक्तिक फायदे पाहून तो तो पक्ष घेणं हे अत्र्यांनी चांगलं केलं असं वाटतं.

१९२० ते १९५० या काळात सांस्कृतिक संदर्भात जो इतिहास घडत होता त्याचं केंद्र पुणं होतं, या सर्व घडामोडी ब्राह्मण समाजाच्या दरम्यान नि अवतीभवती घडत होत्या हे मला मान्य आहे. पण महाराष्ट्राच्या अन्य भागात नेमकं काय घडत होतं याचा उल्लेख असलेले इतिहासाचे संदर्भ सापडू नयेत इतपत त्याबद्दल काळोख आपल्या आर्काईव्हजमधे आहे काय? तसं नसलं तर या ब्राह्मणी सोवळ्या (आणि काही संदर्भात वैयक्तिक मलिद्यापोटी सोवळं बाजूला ठेवणार्‍या) समाजाच्या आणि प्रदेशाच्या पलिकडचंही वाचायला आवडेल. एकाच लेखकाला हे सर्व करता येणार नाही. पण किमान संदर्भ द्यावेत अशी विनंती.

ता. क. बहुपदरी प्रतिक्रिया या लेखावर द्याव्या असं वाटतं आहे. जमल्यास आणखीही प्रतिक्रिया द्याव्या म्हणतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

अनेक संदर्भात पुरुष-स्त्रियांना एकमेकांशी प्रेमसंबंध प्रस्थापित करण्याकरता भाऊ-बहीण, आई-मूल (बाप-मुलगीसुद्धा?) अशी "सोज्ज्वळ" निमित्ते शोधावी लागावीत, अशा प्रकारच्या बुरख्यांचा वापर करावा लागावा यात विनोद/कारुण्य याच्या अधलंमधलं काहीतरी आहे. या संदर्भात शांता हेर्लेकर यांनी स्वतःच्या लैंगिकतेबद्दल केलेली विधानं कौतुकास्पद आहेत. पटवर्धन-हेर्लेकर-चौधरी यांचं threesome मीलन झालेलं असलं तर त्यांच्याइतके त्या काळात sexually evolved तेच इतपत म्हणता येईल. अर्थात मी वर म्हण्टल्याप्रमाणे, इतपत होऊनही " हे तिन्ही मित्र एकमेकांना भाऊ-बहीण म्हणूनच संबोधित असत" हे करुणरसयुक्त विधान तिथेही लागू आहेच.

अत्र्यांच्या दुटप्पी वागण्याचा, गॉसिपी आणि गावगुंडवजा वर्तनाचा मी उल्लेख केला. तरी त्यांची झेंडूची फुले हा काव्यसंग्रह किंवा "रवि किरण मंडळात ज्युलियन हेच रवी आणि बाकीचे किरण" ही त्यांची चुरचुरीत मतं मी महाराष्ट्रातल्या कोट्यावधी अन्य लोकांप्रमाणे एन्जॉय केली इतपत कन्फेशन द्यायला हवं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

> अत्र्यांच्या दुटप्पी वागण्याचा, गॉसिपी आणि गावगुंडवजा वर्तनाचा मी उल्लेख केला. तरी त्यांची झेंडूची फुले हा काव्यसंग्रह किंवा … चुरचुरीत मतं मी .. एन्जॉय केली.

माझंही मत अशासारखंच आहे, पण कालांतर विचारात घ्यायला पाहिजे. आक्रस्ताळेपणा किंवा गुंडगिरी करणारे अत्रे (म्हणजे तेंडुलकरांच्या ‘प्रचंड’ ह्या लेखात आहे तशासारखी प्रतिमा) आणि ‘झेंडूची फुलं’ लिहिणारे अत्रे यांत तीसेक वर्षांचं अंतर आहे. माणूस बदलतो ना?!

बाकी लेख अतिशय आवडला.  

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

अतिशय रोचक आणि अभ्यासपूर्ण लेख.

तथाकथित विद्यापीठीय समीक्षकांसाठी वस्तुपाठ.

सदाशिवपेठी संकुचिततेबद्दल सहमत. ही संंकुचितता अद्यापही साहित्यव्यवहारात टिकून आहे असा अनुभव आहे.
पुण्याच्या बाहेर तेव्हा काय सुरू होतं हे वाचायला रोचक वाटेल.

शेजवलकरांच्या

आजचा सुशिक्षित समजलेला महाराष्ट्र कोणतेही समाजहिताचे कार्य करण्यास असमर्थ झालेला दिसत आहे त्याचे मूळ गेल्या ७५ वर्ष्यात त्याला लाभलेल्या सदाशिवपेठी नेतृत्वात आहे.

या मताशी सहमत. मराठी साहित्य पुणे किंवा पुणेरी संस्कृती याभोवतीच फिरत राहिल्यामुळे फार मोठी झेप मारू शकलं नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

वरदा नायडु यांचे एक जुने पत्र सापडले त्यावरील एक लोकसत्तातील लेखाचा वरदा :एक पत्रकल्लोळ दुवा इथे
https://www.loksatta.com/lekha-news/article-about-madhav-julian-letter-1...

अत्रेंचे झेंडुची फुले या पुस्तकाचा दुवा यातील अत्रेंची भुमिका व तात्यासाहेब कोल्हटकरांचे खाजगी पत्र वाचनीय आहे. याने अनेक बाबींवर प्रकाश पडतो.

https://archive.org/details/ZenduuchiPhuleByP.k.atre

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

धन्यवाद मारवा. तुमच्यासारख्या जालधुंडी लोकांमुळे आयते संदर्भ मिळतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख वाचला. बरंच प्रबोधन झालं. त्यातल्या आठवतील त्या गोष्टी लिहितो.

१. प्रेमस्वरूप आई. हे 'चावट' आहे, असं मला सरळ सरळ वाटत होतंच. माधव जुलिअन मराठीतले परंपरा मोडू पाहणारे कवी, म्हणून त्यांनी मुद्दाम 'वात्सल्यसिंधु' काव्यामध्ये 'वक्षी तुझ्या परी हे केव्हा स्थिरेल डोके' किंवा 'वाटे इथून जावे, तुझ्यापुढे निजावे' अशी शब्दरचना केली असावी, असं काहीसं समाधान मी स्वतःचं केलं. हे वाचल्यावर शंका दूर झाली. म वा धोंडांनी मर्ढेकरांच्या काव्याची केलेली डिटेक्टिवगिरी आठवली. पण वैयक्तिक अनुभवाचं सार्वत्रिकीकरण करताना स्वतःच्या खाजगी भावानुभवाला सुद्धा सांभाळणे, ही सर्कस दोघांना जमली आहे!
आता उरले बालकवी! त्यांचाही पंचनामा कुणीतरी केलाच असेल. तो वाचायला मिळावा.

२. त्या काळातल्या मराठी कादंबरीचं प्रतिगामी / दांभिक / कुंठित स्वरूप माहीत आहे; पण त्यात केतकर आणि शिरुरकर यांना काय स्थान हा लेख देतो आहे, याविषयी उत्सुकता होती. दोन्ही बाबतीत काहीसा अन्याय झाल्यासारखा वाटतो. केतकरांनी कुठेतरी स्पष्ट म्हटलं आहे की लोक कादंबऱ्या वाचतात, वैचारिक लेख वाचत नाहीत, म्हणून मी कादंबऱ्या लिहिल्या. अशा वेळी त्यांच्याही साहित्यात कौटुंबिक वातावरण आहे, स्त्री-पुरुष आकर्षण आहे, असा दोष दाखवणं एकांगी, अन्यायकारक आहे. विभावरी शिरुरकर बंडखोरीची अभिव्यक्ती शोधत होत्या! तरी त्यांनी खूप धीटपणा दाखवला आहे, असं वाटतं. वैज्ञानिक शोध असतील किंवा कलेतील नवे प्रवाह; टप्प्याटप्प्यानेच सिध्द होतात. एकदम हनुमान उडी मारल्याचं उदाहरण नाही. तसं उदाहरण सापडलं तर ते वैज्ञानिक नसतं की साहित्यिक नसतं.

३. माधव जुलिअन यांच्या 'सुधारक' या खंडकाव्यात पादाकुलक वृत्त वापरलेलं पाहून संतोष झाला. म्हणजे मर्ढेकरसुद्धा (वर म्हटल्याप्रमाणे) हनुमान नव्हेत!

४. नाथमाधव यांच्या 'सोन्याची टोळी' आणि 'वीरधवल' या दोन्ही कादंबऱ्या मी शाळकरी वयात वाचल्या. 'सोन्याची टोळी'मध्ये एक जण टिळक पुलावरून दादर टी टीच्या दिशेने सायकलवरून येताना एका मडमेला धडकतो आणि ती खाली पडते, तर तो थेट तिच्या छातीवर, हे वर्णनही आठवते. तसंच 'वीरधवल'मध्ये तो बंदिवान असताना अचानक त्याला दिव्यदृष्टी प्राप्त होते आणि तो भिंतीपलिकडचं पाहू शकतो. तेव्हा त्याची ती दिव्यदृष्टी पुढे जात जात ललितागौरीच्या महालात जाते तेव्हा तीसुद्धा छानपैकी अनावृत वगैरे असते. तर सांगायचं काय, तर सनातनी वृत्तीच्या लेखकांना असलं लिहिण्याची सुरसुरी जास्त असते. याची आणखी पुष्कळ उदाहरणं देता येतील.

नाथमाधवांच्या कादंबऱ्यांमधलं आणखीही आठवतं; इथे जे प्रस्तुत आहे, ते सांगितलं. उगाच माझ्याच आठवणींच्या selective पणाची चिकित्सा नको!

५. रविकिरण मंडळातल्या सभासदांची सामाजिक बंडखोरी आणि त्यांची साहित्यिक गुणवत्ता या वेगळ्या गोष्टी आहेत. मी केवळ साहित्यिक गुणवत्तेवरूनच मत बनवत होतो, जे चूक आहे. आणि त्यांच्या सामाजिक धीटपणाला अवास्तव वजन देणेदेखील चूकच आहे. त्यांना एक न्याय आणि केतकर-शिरुरकर यांना दुसरा, असं होऊ नये.

सगळं आठवणीतून लिहिलं आहे, समोर काहीच नाही. तेव्हा चूक भूल द्यावी घ्यावी परंतु आवश्य नजरेस आणून द्यावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख फारच जबरदस्त आहे. वाचून मनात आलेले अनेक प्रश्न/निरीक्षणे इथे नोंदवून ठेवतो.

१. रविकिरण मंडळासारख्या अन्य मंडळांचा उल्लेख लेखात आलेला आहे, त्या मंडळांचे पुढे काय झाले याबद्दल काही माहिती मिळते का? त्यांच्यातील साम्य व फरक इत्यादी....

२. ब्राह्मणेतर चळवळीमुळे बिथरलेला ब्राह्मण वर्ग सांस्कृतिक क्षेत्रात जास्त रस घेऊ लागला यापेक्षा तो जास्त डिफेन्सिव झाला असे म्हणता येईल का? हे जे काही आहे ते खूपच रोचक आहे. याबद्दल भारताच्या अन्य प्रांतांशी तुलना केली तर काय दिसतं? उदा. तमिळ ब्राह्मणी साहित्य व्यवहाराशी काही साधर्म्य वगैरे?

३. पटवर्धन-हेर्लेकर-चौधरी थ्रीसम बाकी लयच मजेशीर आपलं ते हे रोचक हां. मजा आली वाचून.

४. दलितांच्या आयुष्यावर महान काही लिहिता येणार नाही हे फडक्यांचे मत लोल आहेच, पण त्यामागील वर्गीय जाणीव, अज्ञान इत्यादी खूप लख्खपणे उठून दिसतं. हे उघड बोलल्याने फडके अडाणी ठरले खरे, पण त्यामागे डोकावते ती जवळपास अख्ख्या विशिष्ट वर्गाची भावना. हे महत्त्वाचं आहे.

५. प्रेमाचा फुललेला बाजार खूपच रोचक आहे.

६. सदाशिवपेठी संस्कृती ही कमालीची आत्ममग्न, स्वकेंद्रित होती इत्यादी आरोप केले जातात आणि त्यात तथ्य आहेच. परंतु हा फिनॉमिनन खरेच युनिक आहे का? म्हणजे अन्य प्रांतांत असेच दिसते काहीएक फरकाने की नाही दिसत? असे थोडेसे विश्लेषण असते तर एकूण स्कीम ऑफ थिंग्स मध्ये सदाशिवपेठी संस्कृती कुठे आहे हे नीट समजलं असतं. लेखात मायक्रो लेव्हलवर चिकित्सा केलीय आणि ते बेस्टच आहे. पण असंही पाहिजे असं वाटतं, नपेक्षा सदाशिवपेठी संस्कृती एक्सेप्शनल आहे का, हा प्रश्न कायम असं काही वाचताना भेडसावत राहतो. इन्टेन्सिव्ह चिकित्सेसोबतच एक्स्टेन्सिव्ह चिकित्साही पाहिजे.

बाकी यांपैकी काही गोष्टी थोड्या थोड्या लेखकाकडूनच ऐकण्याचे भाग्य मिळाले आहे, परंतु ते असे गोळीबंद स्वरूपात वाचायला मिळणे म्हणजे भारीच. नवीन माहिती, खूप भारी विश्लेषण, आणि जितक्या प्रश्नांची उत्तरे मिळतात तितकेच नवीन प्रश्नही उपस्थित होतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

क्र ६ तपासून पहायला हवे हे नक्की. उदा. हैदराबादेतील उर्दू भाषिकांची सदाशिव पेठ तिथे निर्माण झाली होती का? अर्थात तिथे जातीचा तितका भाग नसेलही. तामिळनाडू कर्नाटक आणि कोलकाता हे तपासण्याजोगे. कलकत्त्यातील रोचक भाग म्हणजे साहित्यविषयक किंवा सांस्कृतिक क्षेत्रात ब्राह्मणी वरचष्मा राहिला असेलच पण विद्रोहात आणि कम्युनिझममध्येही ब्राह्मणीच वरचष्मा राहिला.

पुण्यातील पेठांबाबत आणखी एक रोचक ऐतिहासिक डेव्हलप्मेंट होती. अगदी शंभर वर्षापूर्वीपर्यंत देशातल्या सर्वोच्च सत्तेजवळाचा वावर होता. आणि नजीकच्या भूतकाळातही देशाच्या राजकीय चळवळीतही शीर्षस्थ नेतृत्व - टिळक-गोखले-रानडे - (ब्राह्मणेतर चळावळी जोरात असूनही) इथलेच होते. या लेखात वर्णिलेल्या नेमक्या काळातच ते हातून निसटत चालले होते. आणि नव्या लोकांच्या ताब्यात जात होते. त्याचा परिणाम* म्हणाजे साहित्यविश्वावरील पकड मजबूत करण्याचा प्रयत्न असावा.

*जगन फडणीस यांनी गांधींच्या खुनास पुण्यातील पोषक पार्श्वभूमी सांगताना हे विवेचन केले आहे. ते इथेही लागू पडू शकेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

गेल्या दहा हजार वर्षात असा लेख वाचला नाही :) 

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Observer is the observed