ममव पुरुषांची लक्षणे

ललित

ममव पुरुषांची लक्षणे

- राजेश घासकडवी

मी एक मराठी मध्यमवर्गीय - ममव - पुरुष आहे. याबद्दल कोणाचंही दुमत नाही. तरीही 'मी म्हणजे नक्की कोण?' असा अस्तित्ववादी प्रश्न, इतर ममव लोकांप्रमाणे मलाही पडतो - विशेषतः क्रिकेटची मॅच बघताना जाहिराती सुरू झाल्या की. 'मी एक माणूस आहे', हे पहिलं उत्तर 'ये टॉइंग की बात है' सारख्या पहिल्या-दुसऱ्या जाहिरातीतच सापडतात. पण ते इतकं व्यापक उत्तर आहे, की मॉलमधल्या नकाशात 'तुम्ही इथे आहात' दाखवणारा बाण काढून टाकल्यासारखं वाटतं. हो, मी मॉलमध्ये आहे, पण नक्की कुठे? हा प्रश्न उरतोच.

पुढच्या दोनतीन जाहिरातींमध्ये अजून विचार चालतो. मध्येच कुठच्यातरी सॅनिटरी पॅड्सच्या जाहिरातींत लांब लांब उड्या मारणाऱ्या तरुणी दिसतात. त्या जणू सांगतात की कुठेही असा, मुक्तता महत्त्वाची! आणि माझा अंतरात्मा ओरडून म्हणतो, नाही, नाही, मी कोण आहे हे समजण्यासाठी मला मुक्तता नको, मला स्थैर्य हवं. मला माझ्या जागेची जाण हवी. जीपीएस सांगतं त्याप्रमाणे मी नक्की कुठे आहे, माझ्या रस्त्यावर मी बरोबर दिशेने जातोय का, माझी मंजिल काय आहे, आणि विसालेमंजिल कधी होणार, याबद्दल माहिती हवीय मला. मला स्वातंत्र्य नकोय; कुठच्या रस्त्यावर झापडबंद नजरेने, किती ओझं वाहात किती काळ जायचंय, हेच शोधायचंय. कारण मी ममव पुरुष आहे!

इतका तात्त्विक विचार करून मी दमतो. सुदैवाने सहाएक मिनिटांत जाहिराती संपतात आणि मी पुन्हा वास्तवात येतो. वनडे टीमच्या चौथ्या नंबरावर बॅटिंग करायला कोण येणार, हे ठरवणं अजून सिलेक्शन कमिटीला कसं जमलेलं नाही, यासारखे गहन प्रश्न माझ्या मनाचा पुन्हा एकदा ताबा घेतात. बायकोचं 'कधीपासून सांगतेय, जेवायला ये' कानी पडतं. 'मी टीव्हीसमोरच जेवण करणार आहे आज' हे अनवधानाने दिलेलं उत्तर, आणि त्यावर आत वाढलेले भांड्यांचे आवाज, पावलांची धाडधाड, यावरून मला माझं काहीतरी चुकलंय याची जाणीव होते. पण नवरा असूनही चूक कबूल करणं यात माझ्या ममवपणाशीच प्रतारणा होते. तेव्हा काहीतरी मार्ग काढणं आवश्यक ठरतं.

काही दिवसांपूर्वी जेव्हा हे घडलं, तेव्हा या परिस्थितीतून मार्ग काढायला क्षणभर चाचपडलो. मार्ग दिसला तरी घेण्याची हिम्मत होत नव्हती. पण मी माझ्या मनावर एक जडसा दगड ठेवला. चॅनल बदललं, आणि कुठलातरी रसोईवाला कार्यक्रम लावला. त्यात 'रोगन जोश बिना रोगन, बिना जोश, विथ पनीर' कसं करायचं हे एक बया, सेटवरच्या स्वच्छ स्वयंपाकघरात हिंदी, इंग्लिश भाषेत सांगत होती. त्यात वरनं कोथिंबीर-खोबरं भुरभुरवल्यासारखी मराठी क्रियापदं येत होती, त्यामुळे तो मराठी कार्यक्रम होता हे उघड होतं. 'ओनियन्सचे स्मॉल पीसेस करून ते ऑइलवर पिंक होईपर्यंत मीडियम हीटवर जेंटली फ्राय करून घ्यायचे'. एक्सलंट! मी बायकोला लगोलग बोलवून म्हटलं, 'कधीतरी मला हे खायला आवडेल.'

बायकोला स्वयंपाकात काहीतरी प्रयोग करायला सांगणं पोटावर बेततं हे मला माहीत होतं. मी न सांगताच ती इतके प्रयोग करायची की विचारता सोय नाही. ऑफिसच्या डब्यात दिलेल्या पोळ्या मी एकदा वातड, चिवट आणि विचित्र लागल्यामुळे मी कचऱ्यात टाकून दिल्या होत्या, आणि भूक भागवण्यासाठी शेव-बटाटा-दही-पुरी हाणली होती. घरी आल्यावर डबा तपासून 'बघ, मी तुला पोळीत नाचणी, बाजरी, आणि इतर नऊ पिठं घातली होती हे कळलंच नाही' असं जीतं मया स्टाइलमध्ये म्हणाली होती. रात्री जेवणासाठी त्या एसबीडीपीमुळे भूक नव्हती, याचाही अर्थ तिने 'त्या हेल्थी पोळ्यामुळे भूक कमी होते' हे ग्लायसेमिक इंडेक्स, शुगर-इन्सुलिन सायकल वगैरे तांत्रिक संज्ञा फेकत मलाच पटवून दिलं होतं.

असं असताना तिला नवीन प्रयोग करायला सांगणं हे जिवाशी खेळणंच होतं. पण त्याचबरोबर, 'जेवण टाळून मॅच बघत बसलाय' अशी प्रतिमा होणं त्याहीपेक्षा वाईट. कुकिंग शो बघायला ती आली, आणि माझ्या अपेक्षेप्रमाणे रमली. त्या रेसिपीची प्रमाणं चुकायला नकोत म्हणून जाहिरातींच्या वेळात ताटात घाईघाईने अन्न वाढून घेऊन तीच टीव्हीसमोर बसली.

तो कार्यक्रम संपल्यानंतर मला पुढची मॅच टीव्हीसमोर बसून जेवण घेत पाहाता आली हे सांगणे नलगे. त्यासाठी चार दिवसांनी रोगन जोश विदाउट रोगन अँड जोश, विथ पनीर खाण्याची माझी तयारी होती. कदाचित तिच्या अकरा धान्यांच्या पिठाच्या पोळ्या खाऊन 'आज फारच त्या पोटात बसल्या आहेत.' असं म्हणावं लागेल बहुतेक.

***

या प्रसंगानंतरही 'मी कोण?' हा प्रश्न मनात येणं थांबलेलं नव्हतं. मॉलमध्ये ती कपड्यांची खरेदी करत असताना दीडेक तास बॅगा सांभाळत बसायची वेळ आली, आणि तरुण फॅशनेबल पोरींकडे बघून कंटाळा आला की अधूनमधून हा प्रश्न मला सतावायचाच. असाच एकदा एका मॉलमध्ये शिणून, कंटाळून बसलेलो असताना, समोर मला माझ्याच वयाचा, माझ्याच परिस्थितीतला अजून एक ममव पुरुष दिसला. त्याच्याही हातात पिशव्या होत्या. तोही आपल्या बायकोला मोकळी सोडून 'आलिया भोगासी सादर' होऊन बसला होता. आणि तरुण पोरी पाहाण्याचा उत्साह वयापरत्वे काही मिनिटांत शीघ्रपतित झालेला दिसत होता. त्याचे माझे डोळे क्षणभरच भिडले. दोघांच्याही ओठांवर क्लांत का काय म्हणतात, तसलं स्मित उमटलं. आम्ही एकमेकांना समजून चुकलो. पुढच्या दोन सेकंदांतच त्याची बायको आली म्हणून हे विश्व मोठ्या आनंदाला मुकलं. आत्म्याची परमात्म्याशी ओळख पटावी, तशी आम्हा दोघांनाही आमच्यात असलेल्या, आणि चराचर भरून दशांगुळं उरलेल्या ममवपणाशी एकतानता जाणवली होती. ममवच असल्यामुळे हातातल्या पिशव्या टाकून त्या जिवाशिवाची गाठ घालणारी मिठी आम्ही निश्चितच मारणार नव्हतो. पण त्या दोन सेकंदांपलिकडे आम्ही एकमेकांकडे पाहून जी मान डोलावली असती त्यातच त्या मिठीचा अर्क सामावला असता. दुर्दैवाने, ते होणं नव्हतं...

मात्र, त्या न घडलेल्या प्रसंगाने माझ्या मनाचा अक्षरशः ठाव घेतला. 'मी कोण?' या प्रश्नाला, 'गर्व से कहो हम ममव है' 'एक ममव, लाख ममव!' अशी घोषणात्मक उत्तरं मिळायला लागली. ममवत्वाने माझं हृदय उचंबळून यायला लागलं. आणि माझ्याच ममवपणाचं उत्तर मला गवसलं. गौतम बुद्धाच्या काळात मॉल नव्हते, म्हणून त्याला बिचाऱ्याला कुठच्यातरी वृक्षाखाली बसून आत्मज्ञानप्राप्ती करावी लागली होती. मला सुदैवाने एसीमध्ये, गुबगुबीत खुर्चीत बसून ते मिळालं होतं.

त्यातून मी या निष्कर्षाला पोचलो की ममवपणाची व्याख्या करणं शक्य नाही. ती एक अनुभूती आहे. पोर्नोग्राफीबद्दल एका अमेरिकन जज्जाने म्हटलं होतं, 'पॉर्नची मला व्याख्या करता येणार नाही, पण पाहिल्यावर मला हे पॉर्न आहे की नाही हे निश्चित सांगता येईल.' त्या अर्थाने ममवपणा हा पॉर्नसारखाच आहे. व्याख्या करणं अशक्य. केवळ अनुभूतींतूनच तो जाणवू शकतो.

मराठीत ग्रेस या नावाचे कवी आहेत. त्यांचं खरं नाव 'माणिक गोडघाटे', असं अत्यंत अनग्रेसफुल आहे. पण त्याला न जुमानता त्यांनी काही ग्रेसफुल, अलवार शब्दांच्या कविता लिहिल्या. आणि दोनतीन वाचूनही त्या अजिबात न कळल्याने मी इतर ममव करतात तेच केलं. उंची हॉटेलात तीन वेगवेगळे काटे ठेवलेले असताना ममव काय करतात? आसपासचे लोक सॅलडसाठी कुठचा काटा वापरतात ते बघून तोच काटा उचलतात. ग्रेसच्या कवितांनाही असंच इतर लोक 'अहाहा, शब्द आणि प्रतिमांचं केवढं घनदाट मोहजाल विणलं आहे.' असं म्हणतात म्हणून मीही त्याला मम म्हणायचं ठरवलं. त्यामुळे त्यांनी लिहिलेलं काही वाचण्याच्या जबाबदारीतून अर्थातच मुक्तता झाली. पण त्याचबरोबर दुसरा फायदा असा झाला, की कुठल्या लेखनाला वा वा म्हणायचं हे शोधताना त्यांनी 'संध्यामग्न पुरुषांची लक्षणे' असं काहीसं लिहिलेलं आहे, हेही कळलं. आणि त्यातूनच प्रेरणा घेऊन मी 'ममव पुरुषांची लक्षणे' लिहायला घेतली.

ममवपणा हा समजावून सांगणं शक्य नाही, तो अनुभवला पाहिजे, या विचारापोटी मी, एक ममव पुरुष म्हणून मला आलेले अनुभव केवळ मांडणार आहे. तुम्हीही ममव पुरुष असाल तर त्या अनुभवांमध्ये तुमच्या जीवनाचं प्रतिबिंब पडलेलं दिसेल. कदाचित जीवनातील टक्क्याटोणप्यांमुळे त्या आरशाला तडे गेले असले, तरी तुकड्यांतुकड्यांतून त्या प्रतिबिंबाचा अर्थ तुम्हाला लावता येईल. 'सत्य खंडांशांतूनच प्रतीत होतं' असं जीएंनीच म्हटलेलं आहे.

तेव्हा सादर आहेत, माझ्या ममव आयुष्यातले काही खंडांश.

***

परवाचीच गोष्ट. नुकतंच वपुंचं एक विधान फेसबुकावर दिसलं. 'जर गृहिणी शांत व तृप्त असेल तर घराचं मंदिर होतं'. मी आमच्या घरात आसपास बघितलं. मी तपशीलांत शिरत नाही, पण जे काही दिसलं त्यावरून हे मंदिर निश्चितच नाही हे माझ्यासारख्या मंदिरात नाइलाजाने जाणारालाही कळलं. काहीसा चिंताग्रस्त होत्साता मी माझ्या सुविद्य पत्नीला ते वपुवचन दाखवलं. विचारलं, 'काय गं, तू शांत आणि तृप्त आहेस ना?' त्यावर ती म्हणत्साती झाली, 'मी शांत आहे, पण तृप्त नाही. मला प्रचंड भूक लागलेली आहे. माझ्यासाठी पोहे करशील?' पहिली दोन वाक्यं ठीक होती, पण शेवटचं वाक्य पिन निघून शेजारी येऊन पडलेल्या हँडग्रेनेडसारखं वाटलं. आपण घराचं मंदिर करायला जावं, आणि हे नसतं लचांड गळ्यात का पडावं? पण 'मंदिर यही बनायेंगे' असा निर्धार केला होता. तोही भाजपा-आरेसेस यांच्यापेक्षाही तीव्रतेने. म्हणजे जवळपास उद्धव ठाकऱ्यांइतका! पण निर्धार कितीही तीव्र असला म्हणून काय झालं, त्यासाठी पोहे करायला कोण तयार होणार? मंदिर बनलंच पाहिजे हे खरंय. पण मला त्यासाठी फार कष्ट करावे न लागता ते आपोआप उभं राहिलं पाहिजे, या मताचा मी आहे. फारतर 'गोष्टि सांगेन युक्तिच्या चार'साठी माझी तयारी असते. बायको स्वयंपाक करत असताना मी ते अनेक वेळा करतो. त्याला माझी बायको 'लुडबूड' म्हणते. कलयुग आहे, दुसरं काय? आजच्या जमान्यातला अर्जुनही साक्षात भगवान कृष्णाला 'लुडबुड करू नको' म्हणेल.

पोहे हा शब्द ऐकल्यावर माझ्याही पोटातली तृप्ती किंचित काही ढळत्साती झाली होतीच. पण मंदिराचं पुण्य मिळवायचं, पोहे मिळवायचे, ते करण्यासाठी कष्टही करायचे नाहीत, आणि वर आधीच अतृप्त पत्नीला अशांतही करायचं नाही असं चतुरावधान सांभाळण्यासाठी काहीतरी चातुर्यमिश्रित व्यवधान दाखवणं गरजेचं होतं. मग पोह्यांचा डबा काढला. आणि पुरुषसुलभ कुतुहलाने विचारलं, 'पोहे तसेच भिजवायचे असतात की त्याआधी भाजून घ्यायचे?' यावर बाहेरच्या खोलीतून काहीसा अतृप्त आवाज आला 'भिजवायचे. आणि फोडणीला टाकायचे.' आता पुढचा प्रश्न, 'पातेल्यात पोहे घेतले आहेत. ते पाण्यात किती बुडायला हवेत?'

यावर बाहेरच्या खोलीतून एक अशांत हालचाल जाणवली. तिला तृप्ती हवी असली तरी ती पोह्यांचं पिठलं खायला निश्चित तयार नव्हती. तिने स्वयंपाकघरात येऊन जाळीचं भांडं काढलं, आणि 'यात धुवून निथळत ठेवायचे, आणि पाणी शोषेपर्यंत फोडणी तयार करायची' एवढं म्हणून ती बाहेर जाणार तितक्यात मी फ्रिजमधून काढलेली सॉय सॉसची बाटली तिला दिसली. तिच्या वक्र भ्रुकुटींना उत्तर म्हणून म्हटलं,
'आज मी चायनीज स्टाइलचे पोहे करणार आहे.'
'(इथे आठ्या अधिकच बळकट झाल्याची इमोजी)'
'(कसनुसं हसल्याची इमोजी)'
असा इमोजीसंवाद बराच वेळ झाल्यानंतर काय झालं कोण जाणे. पण तिच्या टीशर्टला जर पदर असता तर तिने तो नक्कीच खोचला असता, असं मला एक वाटून गेलं.

स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता असते असं काहीतरी म्हणतात खरं. पण माझ्या मते ते चूक आहे. ती पत्नीच राहाते, फक्त आपल्या नवऱ्याला काडीचीही अक्कल नाही हा दृढ विश्वास वर्षोनवर्षं सुपरदृढ होत जातो इतकंच. त्यातून ती आपल्या नवऱ्याला 'याला कुठे न्यायची सोय नाही!' अशा भावनेतून लहान पोरासारखं वागवत जाते. म्हणून काही सुभाषितकारांचे गैरसमज होत राहातात.

थोडक्यात सांगायचं झालं तर पोह्यांवर आलं होतं ते कोथिंबीर आणि मिरच्या कापून देण्याच्या कामावर निभावलं. पोहे, आणि तेही मनासारखे खायला मिळाल्यामुळे माझी बायको तृप्त झाली. पोहे करायची वेळ न येता चवदार पोहे मिळाल्यामुळे मीही तृप्त. वर स्वयंपाकात मदत करण्याची तयारी दाखवल्यामुळे उदारमतवादी, आधुनिक नवरेपणाचा पुसटसा शिक्काही मिळाला.

पोट भरल्यावर मी सोफ्यावर लवंडून आसपास घराकडे पाहिलं, अजूनही घराचं मंदिरात रूपांतर झालेलं नव्हतंच. पण बऱ्याच वेळा बाह्य बदलापेक्षा आंतरिक बदल महत्त्वाचे असतात. कारण आंतरिक बदलांमुळे दृष्टिकोन बदलतो, पोट भरून तृप्ती मिळाली की इतर नसलेल्या गोष्टींची चणचण जाणवेनाशी होते. मीही पसारा पडलेल्या, अस्ताव्यस्त घराकडे एकवार बघितलं आणि मनाशी म्हटलं, 'तसंही मंदिर हवंय कोणाला?' उद्धवजी ठाकरेजीही हे ऐकून मिशीतल्या मिशीत खुदकन हसले असणार. ते खुदकन हसताना सशासारखे दिसतील अशी कल्पना करत मला शांत आणि तृप्त झोप कधी लागली हे मलाच कळलं नाही.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

शेवटी एकदा दिवाळी अंक हातात घेऊन वाचतोय असं म्हणण्यासारखा लेख आलाच.
किती गंभीर राष्ट्रवादी लेख बाजूला सारले. कसंकाय लिहितात बुवा हे लेख?
------
बाकी हा लेख पोष्टाने मत पाठवतात तसा पाठवलाय का लेखकाने? ( एकदाही लॉगिन नावात दिसले नाहीत सहा महिन्यांत.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख आवडला. सुंदर

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चकलीसारखा खुसखुशीत. मजा आली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

+१

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0