जालियनवाला बाग आणि मंटो: एक घटना, एक लेखक आणि अनेक तरंग

संकीर्ण

जालियनवाला बाग आणि मंटो: एक घटना, एक लेखक आणि अनेक तरंग

- ए ए वाघमारे

२०१९ हे वर्ष जालियनवाला बाग हत्याकांडाच्या शोकशतीचं वर्ष. १३ एप्रिल २०१९च्या तिसर्‍या प्रहरी अमृतसरात घडलेली ही दुर्दैवी घटना आधुनिक भारताच्या इतिहासाला अनेक अर्थांनी कलाटणी देणारी. महात्मा गांधी प्रेरित स्वातंत्र्यलढ्याला आणि समांतर चाललेल्या सशस्त्र लढ्याला निर्णायक 'दे धक्का' देणारी घटना. शंभर वर्षांनंतर आज या जखमा भरल्या असल्या तरी ज्या काळात अद्याप त्यांवर खपली धरायची होती त्या काळात या घटनेचं चित्रण समकालीन ललित साहित्यात कसं झालं असेल हे बघणं रोचक ठरू शकतं. यासाठी त्या धामधुमीच्या काळात पंजाबात आपलं बालपण व्यतीत करत असलेल्या आणि नंतर जाणत्या वयात आपल्या लेखणीद्वारे भवतालाला निर्भीडपणे भिडणार्‍या प्रसिद्ध उर्दू लेखक सआदत हसन मंटो शिवाय दुसरा योग्य लेखक मिळणं कठीण. मंटोचं उणंपुरं ४३ वर्षांचं आयुष्य प्रामुख्याने गेलं ते अमृतसर, मुंंबई आणि अखेरीस लाहोर या शहरांत. त्यामुळे ही तीन शहरंं त्याच्या कथांतून सतत भेटत राहतात. त्यातल्या अमृतसरमध्ये घडणार्‍या मंटोच्या तीन निवडक कथा 'तमाशा', 'दीवाना शायर' आणि 'सन १९१९ की एक बात' आपल्यासमोर एक वेगळा प्रयोग म्हणून ऑडिओ स्वरूपात सादर करत आहोत. जालियनवालासारख्या एखाद्या घटनेचा प्रभाव कलावंताच्या संवेदनशील मनावर किती दीर्घकाळ रेंगाळत असतो याची वानगी या कथांमधून मिळते. मंटोसारखा मनस्वी लेखक वेगवेगळ्या टप्प्यांवर जेव्हा या घटनेला पुन्हा पुन्हा भिडतो तेव्हा होणारा प्रतिभेचा नवा आविष्कार आणि नवा अनुभव रसिकाला स्तिमित करतो.

'तमाशा' ही उपलब्ध माहितीप्रमाणे मंटोची छापून आलेली पहिली कथा. खालिद नावाच्या एका सहा-सात वर्षाच्या मुलाच्या दृष्टीकोनातून लिहिलेली. त्याला दृष्टीकोन म्हणण्यापेक्षा 'खिडकी' किंवा 'फ्रेम' म्हणणे अधिक योग्य. एखाद्या खिडकीतून जसा आपल्याला आजूबाजूचा मोजकाच भाग दिसतो त्याप्रमाणे नायकाच्या चिमुकल्या भावविश्वात अवतीभवती चालू असलेल्या लष्करी दमनाचे काय तरंग उठतात याचं नाटकीय चित्रण लेखकाने या कथेत आहे.

'दीवाना शायर' ही कथा 'तमाशा' या कथेची 'सीक्वेल' म्हणता येईल अशी. आपल्या बालपणी घडलेल्या जलियांवालाच्या धूसर स्मृती मनात ठेवून तरूणपणात त्या ठिकाणी भेट देणार्‍या नायकाला तिथे भेटतो तो एक वेडा कवी. हा क्रांतिकारी दीवाना शायर नायकाच्या मनात क्रांतींचं स्फुल्लिंग कसं चेतवतो याची ही गोष्ट. या दोन्ही कथा मंटोच्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळातल्या, जेव्हा तो डाव्या विचारांनी प्रभारित होता. त्यामुळे डाव्या क्रांतीविषयीचं एक आकर्षण या कथेत दिसतं.

'सन १९१९ की एक बात' ही कथा विषयवस्तू, निवेदन आणि मंटोची स्वत:ची टिप्पणी या दृष्टीने एक अनोखी कथा आहे. हा दोन सहप्रवाशांमधला संवाद आहे. एक प्रवासी दुसर्‍या साथीदाराला अमृतसरच्या आंदोलनात सहभागी झालेल्या 'थैला कंजर' या एका य:कश्चित वेश्येच्या पोटी जन्माला आलेल्या माणसाची गोष्ट सांगतो आहे. मंटोच्या कथांमधून वारंवार भेटणार्‍या वेश्या, दलाल, गुन्हेगार आणि सामान्य वकुबाची माणसं इथे एका वेगळ्याच पार्श्वभूमीवर भेटतात. जलियांवाला बागेच्या घटनेमागची आपल्या परीनं केलेली कारणमीमांसा मंटो येथे मांडतो. इतिहास आणि कथात्म साहित्याची सरमिसळ कशी होते याचे उदाहरण असणारी ही कथा मंटोच्या शेवटच्या टप्प्यातली (१९५१).

टीप: या उपक्रमाची प्रेरणा 'भवन्स नवनीत' या हिंदी मासिकातील एका लेखावरून मिळाली. कथांचे हिंदी तर्जुमेही 'नवनीत'च्या सौजन्याने. ध्वनिमुद्रणात काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या माझ्या खात्यावर.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet