संपादकीय : राष्ट्रवादळ, आताच का?

अंकाविषयी

राष्ट्रवाद-ळ, आताच का?

राष्ट्रवादानं मराठी माणसाची भलतीच अडचण करून ठेवली आहे. एकीकडे आपल्या संतांनी 'हे विश्वचि माझे घर' म्हणून ठेवलंय, तर दुसरीकडे आपले आधुनिक कवीसुद्धा म्हणतात : 'जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसताहेत'. उद्योजकांकडे वळावं तर जेआरडी टाटा म्हणून गेलेत : 'मला आर्थिक महासत्ता असलेला भारत घडवायचा नाही, तर आनंदी भारत घडवायचा आहे.' आपल्या प्रिय ठेच्यातली मिरची किंवा खिचडीतले साबुदाणा-बटाटासुद्धा बाहेरून आले आहेत.

आणि भारतीय माणसाची अडचण तर विचारूच नका. आपलं राष्ट्रीय जेवण असं काही आहे का? आणि संगीत? आपली किती तरी वाद्यं बाहेरून आली आहेत. 'तबला' हा शब्दसुद्धा फारशी 'तब्ल'वरून आला असावा. आणि राष्ट्रीय भाषा? भाषेवरून तर आपण दंगलीच करतो.

हे कमी पडलं म्हणून की काय सगळे व्हॉट्सअॅप अंकल सारखे मी, माझं कुटुंब, माझी जात, माझा गाव, ह्यांची फोडणी रोज देतच असतात. त्यातही जरा सीमेवरच्या जवानांची आठवण कुणी काढली, तर काही खवचट लोक लक्षात आणून देतात की ज्याला आज आपण भारत देश म्हणतो त्याच्या सीमाच ब्रिटिशांनी आखल्या.

मुळात 'राष्ट्र' म्हणजे काय आणि 'राष्ट्रवाद' म्हणजे काय ह्याच्या खोलात जाऊ लागलं तर अगदी एकोणिसाव्या शतकापर्यंत जगात कुणालाच असली काही संकल्पना ठाऊक नव्हती, कारण ती तशी अस्तित्वातच नव्हती. भारतापुरता विचार करायचा झाला तर, आपल्याला ही संकल्पना मान्य असो-नसो, ब्रिटिशांनी आपल्याला त्यांची वसाहत करून टाकल्यामुळे 'आपण नक्की कोण आहोत', 'कोणकोणत्या गोष्टी आपल्याला एकत्र आणू शकतात' आणि 'आपण ब्रिटिशांपेक्षा वेगळं आणि म्हणून पर्यायानं स्वतंत्र का असायला हवं' ह्याचा आपल्याला झक्कत विचार करावा लागला. म्हणजेच थोडक्यात आपला इतिहास, संस्कृती आणि आपलं जनमानस ह्यांच्याकडे काहीशा पद्धतशीरपणे पाहणं 'आपल्याला' 'बाहेरच्यां'मुळे भाग पडलं.

आज मात्र ह्याकडे पुन्हा एकदा थोडं चिंतित होऊन पाहणं भाग पडतं आहे, कारण एरवी तसे मृदू आणि स्नेहशील असणारे आपल्या परिवारातले किंवा परिसरातलेच लोक आपला मूळ स्वभाव सोडून काही तरी वेगळं म्हणू पाहताहेत. त्यामुळे ह्या राष्ट्राच्या मुळाशी जी काही संकल्पना होती तिचा कदाचित विस्तार आणि तोदेखील समंजसपणे करावा लागणार आहे. कारण भारतीय चौकटीतल्या राष्ट्रवादाच्या कल्पनेची गुणवत्ता वाढवत नेली नाही तर जी पोकळी निर्माण होते तिच्यात आज आपण आहोत. आणि एकोणिसाव्या शतकात वसाहत झाल्यामुळे ज्या पाश्चात्त्य विचारव्यूहाकडून आपण आधुनिकतेचं आणि प्रबोधनाचं बाळकडू घेतलं आणि त्याच्या पायावर भारतीय संघराज्याची उभारणी केली त्या पश्चिमेकडची आजची परिस्थितीही तिकडच्या समंजस राष्ट्रवाद्यांसाठी फार सुखावह आहे अशातला भाग नाही.

राष्ट्र म्हणजे काय, भारत हे एक राष्ट्र आहे का, आणि भारतीय चौकटीत राष्ट्रवाद असं काही दिसतं का, हे पाहताना महाराष्ट्रातल्याच काही विचारवंतांनी ह्याविषयी पूर्वी मांडलेले, पण आज कदाचित विस्मृतीत गेलेले विचार पुन्हा समोर आणायला हवेत. शिवाय, आपण हे सगळं मराठीत करतो आहोत आणि आज करतो आहोत ह्याचं भान ठेवत मराठी माणसाच्या प्रत्यक्ष अनुभवापलीकडचं जग त्याला दाखवायचा आमचा प्रयत्न आहे. ते फाळणीचं किंवा निर्वासितांचं किंवा अनिवासी लोकांचं वास्तव असू शकतं; आजच्या राष्ट्रसीमा ठळक करताना मराठी माणसाला हव्याहव्याशा वाटणाऱ्या काश्मीरचं किंवा आसामचं वास्तव असू शकतं. इतकंच नव्हे, तर अगदी आपल्या शेजारच्या (आणि मौजमजा करण्यासाठी आपल्याला विशेष प्रिय असलेल्या) गोव्याला महाराष्ट्रात विलीन होणं किंवा मराठी भाषा स्वीकारणं का पटत नाही, हेदेखील आपल्याला ह्या संदर्भात समजून घ्यायला हवं. हे केलं नाही तर नागरिकत्व म्हणजे काय आणि त्याला जोडून अस्मितेची जडणघडण ज्या प्रकारे होत आली आहे त्यातले आणि पर्यायानं राष्ट्रवादी प्रकल्पातले तपशील समोर न येता आपल्यासाठी ती केवळ (उदा : सीमेवर आपले जवान जिचं प्राणपणानं रक्षण करतात अशी) एक अमूर्त आणि धूसर संकल्पना राहते. आणि अशा अमूर्त धूसरतेत भावना भडकवणाऱ्या गोष्टींना शिरकाव करणं सोपं होऊन बसतं.

राष्ट्र म्हणजे काय ते समजून घेण्यासाठी त्यातली माणसं समजून घेणं गरजेचं आहेच, पण ज्या चिन्हव्यवस्थेद्वारे राष्ट्रसंकल्पनेची उभारणी केली जाते त्याच्या मुळांशी जाणंही गरजेचं आहे. आणि विशेषतः ह्या बाबतीत मराठीतला विचारव्यूह काहीसा अपुरा पडतो असं आमचं मत आहे. भारतमातेची प्रतिमा कशी निर्माण झाली, कशी बदलत गेली, किंवा आपल्या झेंड्यातले रंग काय सांगू पाहताहेत ह्यासारख्या गोष्टींकडे राष्ट्रवादाच्या चौकटीत बघणं आम्हाला रोचक वाटतं ते ह्यासाठी. एकंदरीत संगीत, दृश्यकला किंवा सिनेमा ह्यांसारख्या लोकानुरंजनी आणि म्हणून विश्लेषणापेक्षा शेरेबाजीच्या धनी ठरणाऱ्या कलांकडे राष्ट्रवादासारख्या रुक्ष वाटू शकणाऱ्या जाड भिंगांच्या चष्म्यातून पाहता येतं, हा (म्हटलं तर आधुनिकोत्तर वगैरे) दृष्टिकोनदेखील आम्हाला पटतो आणि मराठीत तो अधिक रुजायला हवा असं आम्हाला वाटतं.

गटागटांनी शिकार करणाऱ्या प्रागैतिहासिक टोळ्या, नगरराज्यं ते आधुनिक राष्ट्र-राज्य अशा प्रवासात माणसाच्या जाणिवा-नेणिवांना बांधून ठेवणारं नक्की काय आहे? आणि त्याला झिडकारण्यापेक्षा त्याची अपरिहार्य मानवी गरज ओळखून त्याची नैतिक गुणवत्ता वाढवता येईल का? ह्या प्रश्नांपर्यंत तरी किमान आपल्याला पोचायला हवं. उत्तरं मिळतील तेव्हा मिळतील आणि आजच्यासाठीची उत्तरं भविष्यासाठी कदाचित वैध नसतीलही. तरीही, अशा समूहांना एकमेकांशी लढवत ठेवणं काही मूठभर लोकांच्याच हिताचं असू शकतं आणि आपण सामान्य नागरिक ते लाभार्थी नक्कीच नव्हेत, हे लक्षात आणून देणं आज पुन्हा एकदा गरजेचं झालं आहे. त्याचप्रमाणे, नागरिकांच्या सुप्त-प्रकट वासना-भावना चाळवून आपलं आर्थिक-राजकीय हित साधणारा वर्गही सामान्य नागरिकांना वापरून घेतो; त्यांचं खऱ्या अर्थानं प्रतिनिधित्व करत नाही, हेदेखील नव्यानं अधोरेखित करणं सामाजिक संतुलनासाठी महत्त्वाचं आहे. त्यापायीच हे राष्ट्रवाद-ळ.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (3 votes)

प्रतिक्रिया

मी इथे आणि मिसळपाव वर २०१४ मध्ये "राष्ट्रवाद एक उन्माद " नावाचा लेख लिहिला होता.
तेव्हा जे एन यु प्रकरण नव्हते , मोदीजी नुकतेच सत्तेत आलेले होते.
आता ५ वर्षांनंतर याच विषयावर संपुर्ण अंक निघुन या विषयाला केंद्रस्थानी ठेऊन इतके सखोल चिंतन झालेले पाहतांना आनंद झाला.
स्वत:च्या घ्राणेंद्रियांचा अभिमान वाटला म्हणुन ही माझ्या धाग्याची जाहीरात अभिमानाने करतो
( अर्थात तेव्हा या विषया त कोणाला फारसा रस नव्हता ज्या कोणाशी बोलायचो त्यांना ते अजिबातच आवडायचे नाही हे ही नमुद करतो )

http://www.aisiakshare.com/node/3466

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

नागरिकांच्या सुप्त-प्रकट वासना-भावना चाळवून आपलं आर्थिक-राजकीय हित साधणारा वर्गही सामान्य नागरिकांना वापरून घेतो; त्यांचं खऱ्या अर्थानं प्रतिनिधित्व करत नाही, हेदेखील नव्यानं अधोरेखित करणं सामाजिक संतुलनासाठी महत्त्वाचं आहे

चपखल!

- (वादळी) सोकाजी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चिंजं, संपादकिय आवडले आहे. अंक जबरदस्त झाला आहे. इतका रोचकोत्तम कंटेंट इतर कुठल्या(छापिल वा अन्य प्रकारच्या) अंकात असेल असे वाटत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

आज संपादकीय वाचून अंक वाचन सुरू केले. संपादकीय आवडले. अंकाचे नावही अपेक्षा वाढवणारे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सर्व लेख कळत नाहीत पण जे कळले ते आवडले. बेस्ट अंक सो फार!! खूपच जबरदस्त झालाय अंक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अंक प्रसिद्ध होऊन आठवडा गेला. काही लेख पूर्ण वाचले काही बाकी आहेत.
राष्ट्रवाद संकल्पनेवर काय लिहिणार अंकात असा विचार येत होता. लेख वाचल्यावर गुंतत गेलो.

दिवाळी अंक म्हणजे हलकेफुलके लेखन , विनोदी चित्रे, राजकारणावर टीका, सिनेनाट्यकलाकारांचे अनुभवकथन या साच्यातून बाहेर पडणारा म्हणून 'कालनिर्णय' अंक आवडू लागला होता. ऐसी अक्षरे अंकाने या वर्षी दमदार विषयाला हात घालून 'लय भारी' अंक आणि मुखपृष्ठही केलं.
सर्व लेखकांचे, मंडळाचे आभार आणि अभिनंदन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नेहमीप्रमाणेच अतिशय सुंदर सुंदर अंक. वाचायला सुरुवात केली आहे पण निव्वळ लेखांचे विषय पाहूनच अत्यंत आनंद झाला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

संपादकीय आवडलं.

राष्ट्रीयत्वाच्या संकल्पनेचा उहापोह करताना, काही महत्त्वाच्या प्रश्नांकडे या अंकामधून प्रकाश पडेल अशी आशा आहे. (अंक पुरता वाचून झालेला नाही.)

राष्ट्रीयत्वाच्या संकल्पनेचा भारतीय संदर्भात विचार करताना काश्मीर आणि पाकिस्तानबरोबरच, पंजाब/आसाम सारख्या प्रदेशांमधल्या एकेकाळी पेटलेल्या प्रदेशांच्या अलगतावादी चळवळी, त्यांच्या निमित्ताने निर्माण झालेलं हिंसाचाराचं आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या दहशतवादाचं स्वरूप, त्या निमित्ताने मानवी अधिकार या गोष्टींना पूर्णपणे नेस्तनाबूत करून त्या प्रदेशातल्या विद्रोहाला गाडण्यात येणं या आणि अशा स्वरूपाच्या घटनांचा आढावा आवश्यक होता. पंजाब आणि तमिळ अस्मितांनी पेटलेल्या दहशतवादी प्रवृत्तींनी लाखो कुटुंबीयांना होरपळवलं आहेच; पण याचा विसर पडला तर इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या आई-मुलाच्या राजकीय हत्येच्या घटना आठवण करून देण्यास पुरेशा आहेत. थोडक्यात, अशा स्वरूपाचा विद्रोह-हिंसाचार-दहशतवाद ही सर्व भारतीय आयडेंटिटीला राष्ट्रीयत्वाच्या कक्षेत बांधण्याच्या संकल्पनेची फळं आहेत असं म्हणणं अनिवार्य ठरतं.

भारतीय राष्ट्राला अशा पद्धतीने सुरुंग लावले जाताना गेल्या ७० वर्षांमधे आपण पाहात आलेलो आहोत. या सुरुंगांमुळे प्रसंगी बरीच मोठी हानी झालेली असली तरी राष्ट्रीयत्वाचं हे - जणू गंजक्या लोखंडाचं बनलेलं असावं असं काटेरी - कुंपण शाबूत राहिलं आहे आणि केंद्रीय सत्तेची मूठ अधिकाधिक उलटी घट्ट होत जाणार असल्याने ते काटेरी कुंपण उलट मजबूत होत आहे असं दिसतं.

राष्ट्रीयत्वाच्या आजच्या रचनेला पर्याय काय आहेत याचा उहापोह आपण केला आहे कां? राज्यांना अधिक अधिकार मिळणं, अधिक स्वायत्तता मिळणं, राज्यांमधल्या (नद्यांच्या पाण्यासारख्या) नैसर्गिक साधनांच्या वाटणीतले बखेडे मिटवणं यांसारख्या गोष्टी राष्ट्रीयत्वाच्या संकल्पनेला बदलण्याचे पर्याय आहेत. आजमितीस कार्यरत असलेल्या भारतीय राजकीय व्यवस्थेमधे या पर्यायांना स्थान दिसत नाही. केंद्रीय सत्तेची मूठ अधिकाधिक उलटी घट्ट होत जाणार असताना जाणवते.

काही अस्वस्थ करणारे परिणाम अनार्की, सिव्हिल वॉरचे वगैरे आहेत. पुन्हा एकदा, विद्रोहाला दडपण्यात शासनव्यवस्थेला यश आलेलं दिसतं आणि त्यामुळे अनार्कीच्या धोक्यापासून आपण बरेच दूर आलेलो आहोत.

राष्ट्रीयत्वाची संकल्पना मार्केट इकॉनॉमीशी मित्रत्वाचं नातं राखून आहे असं एका अर्थाने म्हणता येईल. अर्थव्यवस्था कोसळू लागली तर राष्ट्रवादाला भूकंपाचे हादरे बसू लागतात; राष्ट्र एकत्र ठेवण्याकरताचा दंडुका अधिक जोराने वापरावा लागतो. या उलट मध्यमवर्ग जितका अधिक विस्तार पावेल आणि गरीबी/निरक्षरता/उपासमार/ बेकारी/संधींची अनुपलब्धता यावर जितका अधिक विजय मिळवला जाईल, तितका विद्रोह/उठाव/अलगतावाद कमी होईल असं एक गृहितक मानलं जातं. त्या गृहितकावर काही प्रकाश अंकातून पडला असला तर वाचायला आवडेल.

अंकाबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

दंडुका पद्धतीने राष्ट्रवाद जागवायचा म्हणता? दंडुका पद्धतीने आपल्या म्हाताऱ्या आइबापाची काळजी घ्यायला लावण्यासारखे होईल ना?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0