मलानाच्या गोष्टी - भाग 2

पहिला भाग इथे वाचा - https://aisiakshare.com/node/7433

मलानाच्या गोष्टी - भाग 2
मलाना गांव मे आपका स्वागत हैं असं लिहिलेल्या बोर्डखाली उभं राहून सभोवार नजर टाकली तर गाव काही नजरेच्या टप्प्यात येत नाही. ते लपलेलं असतं टेकडीच्या कुशीत. मग आजूबाजूचा निसर्ग डोळ्यांत साठवत चालत राहायचं. वाटेत पार्वती नदीचा खळाळणारा अल्लडपणा असतोच. या पार्वती नदीची फार रंजक गोष्ट आहे. मलाना आणि त्याच्या आसपासचा पार्वती वॅलीचा भाग शंकराच्या फार आवडीचा. (याचं कारण इथलं निसर्ग सौंदर्य असावं की उच्च प्रतीचा गांजा??, तुम्हाला खरं सांगतो, गाडी थांबवून रस्त्याकडेला उगवलेल्या गांजाच्या रोपट्याचं हिरवंकंच पान आणून हातात दिलेलं ड्राइवरने, म्हणजे इतकी मुबलकता हो.) तर शंकर थेट इथं तपश्चर्याच करायला आले. बरीच वर्षं तपश्चर्या केल्यावर त्यांनी डोळे उघडले आणि या खळाळत्या नदीच्या आणि तिच्या नितांत सुंदर खोऱ्याचा नजारा बघून त्यांना आपल्या बायकोच्या सौंदर्याची आठवण आली. (म्हणजे एवढी वर्षं तपश्चर्या करून माणसाला विरक्ती वगैरे येईल तर तसलं काही नाही डोळे उघडल्या उघडल्या आठवलं काय तर बायकोचं सौंदर्य !!) आणि मग त्या नदीचं नाव पडलं पार्वती. हिमालयातल्या हिमनदीतून उगम पावणारी ही पार्वती कुठल्याश्या असीम ओढीने आणि वेगाने बियास नदीला मिळते. तिच्या थंडगार फेसाळत्या पाण्यात पाय बुडवून बसायचं क्षणभर. बरं वाटतं. मलानाच्या वेशीपाशी थंडगार असणारं हे पाणी पुढे पवित्र माणिकरणला पोहोचतं तेव्हा वाफाळतं आणि गरम असतं. इतकं गरम की तिथल्या शंकराच्या मंदिरात भाविक लोक कापडी पिशवीत डाळ नेतात आणि त्या उकळत्या पाण्यात ती शिजली की तोच प्रसाद महादेवाला चढवतात. माणिकरण साहिब गुरुद्वाराच्या समोरून जेव्हा ही पार्वती जात असते, तेव्हा ती अक्षरशः "hot & wild" म्हणावी अशी असते. जणु काही कधी एकदा जाऊन बियास नदीच्या खांद्यावर हात ठेवतेय आणि प्रवासातल्या सगळ्या गप्पा सांगतेय असंच वाटत असावं तिला.
पार्वतीच्या थंडगार पाण्यात पाय बुडवून बसल्याचं समाधान मिळालं की मग उठायचं, मलाना लांब असतंय अजून. एक छोटासा पूल ओलांडून पार्वतीला निरोप द्यायचा. तुम्ही तुमच्या वाटेनं जायचं आणि ती तिच्या वाटेनं जाते. अरुंद, बऱ्यापैकी चढाची पायवाट चालताना दम लागलाच तर कडेच्या दगडावर जरासं टेकायचं. चालता चालता तुम्हाला सामान वाहून नेणाऱ्या गावातल्या बायका दिसू शकतात.
गावच्या दिशेने जाईस्तोवर रस्त्यात 3-4 टपऱ्या असतायेत. ते लोक मॅगी, मोमोस, कोल्ड ड्रिंक, सिगरेट वगैरे असलं काही विकतात. सोबत त्या टपऱ्यांमध्ये सतत ट्रान्स चालू असतं. गांजा पण मिळू शकत असावा कदाचित. आताशा मलाना बऱ्यापैकी फेमस झालेलंय त्यामुळे सोलो ट्रेकर्स असतात, काही 3-4 जणांचे ग्रुप्स असतात त्यांची सोबत होतेच वर पोहोचेपर्यंत.
गाव नजरेच्या टप्प्यात येतं तेव्हा दिसतात रस्त्याकडेला खेळणाऱ्या छोट्या मुली. किंवा मग त्याच अरुंद रस्त्यांवर धावत धावत पकडापकडी खेळणारी छोटी मुलं. आताशा बऱ्यापैकी जवळ आलेलो असतो आपण गावाच्या. अर्धा पाऊण तासाच्या या ट्रेक मध्ये बायकोची सॅंडल तुटलेली असते. गावात गेल्यावर घेऊ असं तुम्ही म्हणता पण मलाना मध्ये सॅंडल मिळते का, जीवनावश्यक वस्तू मिळतात का याबद्दल कुठल्याच ट्रॅव्हल ब्लॉग वाल्यानं लिहिलेलं नसतंय. विचार करत करत तुम्ही चालत राहता आणि एका क्षणी पायवाट संपते. रस्ता थोडासा निमुळता होतो आणि तुम्हाला, डाव्या बाजूला सार्वजनिक संडास दिसतं. त्यावरच गांधीजींचा चष्मा काढून स्वच्छ भारत लिहिलेलं असतं. शेजारीच एका छोटासा चर असतो त्यातून त्यातलं सांडपाणी वाहत असतं. गावातले लोक स्वतःला इतर भारतीयांपेक्षा कितीही उच्च समजो, हे गाव भारतातलं आहे याचा यापेक्षा ढळढळीत स्टॅम्प दुसरा कुठला असणार. अजून अजून आत शिरतो तसं तसं मलाना उलगडत जातं. लाकडाची एक वखार लागते उजव्या हाताला. त्यात बसलेले असतात विशी पंचविशीचे तरुण, गांजा मळत. थोडंसं पुढे गेलं की डाव्या हाताला एक मंदिर असतं. त्यावर स्पष्टपणे या मंदिराला बाहेरच्यांनी हात लावू नये असं लिहिलेलं असतं. मग थोडीशी घरं असतात दोन्ही बाजूला. काथकुनी पद्धतीने बांधलेली. एक मजली. वरच्या मजल्याच्या लाकडी खिडक्यांतून लहान लहान मुलं, मुली हसत, खिदळत बघत असतात तुमच्याकडे. थोडंसं अजून चाललं की मग तुम्ही पोहोचता एका प्रशस्त मोकळ्या जागी. गावची चावडी असं म्हणायला काही हरकत नाही. तिथेच जमदग्नींच मंदिर आहे एका चौथऱ्यावर. मलानावासियांचा जमलू ऋषी. साहजिकच, बाहेरच्यांना त्या चौथऱ्यावर जायलाही मनाई असते. डाव्या बाजूच्या चौथऱ्यावर बसलेले असतात गावातले ज्येष्ठ नागरिक. हवापाण्याच्या गप्पा मारत असावेत किंवा आमच्या वेळी इतके बाहेरचे लोक नव्हते हो येत बघायला असं म्हणत असावेत. असा अंदाज बांधायचा कारण त्यांची भाषा तर काही कळत नाही आपल्याला. पुढं चालत जायचं. एखादा म्हातारा मागनं हाक मारतो, गांजा हवाय का विचारतोच इशाऱ्यानेच . पुढच्या कोपऱ्यात अधिकृत शिधावाटप दुकान असतंय. एक वयस्कर व्यक्ती बसलेली असते गल्ल्यावर. आणि त्याच्या समोर जरा स्टेशनरी, इकड तिकडचं सामान मिळणारं दुकान. बायको इतक्या वेळ अनवाणी चालतेय याची जाणीव होते आणि मग विचार करतो, चला बघूयात सॅन्डल मिळेल का. दुकान ज्या चौथऱ्यावर असतं तिथून साधारण अर्धा हात लांब उभं राहायला सांगतो दुकानदार. पायाची साईझ सांगितल्यावर तो एकच कम्पनीच्या दोन रंगांच्या (लाल आणि निळा. केवढी ती व्हरायटी!!!) सॅंडल काढून दाखवतो. तिथे सापडते सॅन्डल, आणि मग ती वेळ येते, जेव्हा दुकानदार ती सॅन्डल पॅक करतो, बाजूला ठेवलेल्या एका चार -पाच फुटी काठीने ते पॅकेट सरकवत अगदीच चौथऱ्याच्या बाहेर ढकलतो. मग तुम्ही तिथेच चौथऱ्यावर पैसे ठेवायचे. त्याच काठीने तो पुन्हा ते आपल्याकडे ओढून घेतो. बाहेरच्यांना हात लावायचा नाही ही समजूत जपत एक 'ट्रेड' पूर्ण होतो. खरंतर तुम्ही अगदी प्रत्येक ट्रॅव्हल ब्लॉग मध्ये वाचलेलं असतं, अशी वागणूक मिळणारे हे माहित असतं तुम्हाला तरीही लागतंच कुठेतरी आत. एका क्षणात, या देशातल्या एका विशिष्ट समाजाने जातीभेदापायी काय काय भोगलं असेल हे अगदी स्पष्ट जाणवून जातं. अर्थातच फार काळ गावात रेंगाळून चालणार नसतं, एकतर कुठल्याच चौथऱ्यावर बसायची परवानगी नसते, राहायची बंदी असते, चावडीवरचे म्हातारे फार काही सलगी दाखवणार नसतात, दिवस उतरणीला लागलेला असतो, ड्रायवर वाट बघत असतो.
आज मी जेव्हा मलानाची भेट आठवतो तेव्हा मला स्पष्टपणे हे सगळं आठवतं. गावात शिरल्यानंतर जाणवलेलं एक गूढ वातावरण आठवतं. एक थबकलेपण असावं त्या गावातच असं वाटलेलं मला. जणु काही जगातली सगळ्यात जुनी लोकशाही वगैरे त्याच जुन्या काळात थांबून राहिली असावी.
थोडक्यात, "मलाना गांव में आपका स्वागत हैं" असं फक्त कमानीवर लिहिलेलंय बाकी स्वागताच्या व्हाइब्स कुणाकडूनच मिळत नाहीत. ना गावकऱ्यांकडून ना गावाकडून.

अभिषेक राऊत

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

छान लिहिलयं. आवडलं !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान पण बराच वेळ लावलात दुसर्या भागासाठी.

शिवाय अजून जास्त भाग असतील असंही वाटलं होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0