रुमाल

Man without handkerchief is a naked man.
रुमाल, कापडाचा एक तुकडा, अनेक आकार, रंग, उपयोग. शाळेतल्या बच्चेकंपनीचे रंगीबेरंगी, छोटे छोटे, मऊमऊ, शर्टवर सेफ्टी पिनने अडकवलेले. कधीकधी आवश्यकता म्हणून तर कधीकधी त्या दाग अच्छे है सारख्या जाहिरातीतल्या पुरुषी आवाजाच्या मम्म्यांसारख आव आणण्यासाठी. जरा कळती शाळकरी मंडळी, त्याच्या/तिच्या नावाचं इंग्रजी आद्याक्षर पेनानं/एंब्रायडरी, रुमालाच्या एका कोपऱ्यावर. कधीकधी रुमालाच्या घडीत पावडर किंवा अत्तराचा शिडकावा सुगंध, मटकने, टाईमपास. काॅलेजमध्ये जाणारी मंडळी, टुकारपणा मिरवायला कुठल्याशा देशाच्या झेंड्याचा लाल-काळा, तर कुठे पुन्हा रंगीबेरंगी, छोटे छोटे, मऊमऊ. "हाथोंमे आ गया जो कलsss रुमाल आपका" किंवा "राह मे एक रेशमी रुमाल मिला है". मोठी, कळती मंडळी, आवश्यकतेनुसार, रंग,‌ धर्मानुसार, पार्टीनुसार.
खिशात मावणारे छोटे रुमाल ते गळ्यात बांधायचे/टाकायचे, डोक्याला बांधायचे, चुंबळ करायचे, पंचे म्हणून कमरेला बांधायचे रुमाल.
रुमाल, पोराटोरांचे शेंबडाचे फुगे लपवायला, सर्दीचा सच्चा साथी, शिंकेमुळे होणारा पचका लपविण्यासाठी, घाम पुसण्यासाठी, तेलकट चेहरा पुसण्यासाठी, लागलं/खरचटलं तर साफ करण्यासाठी/बांधण्यासाठी, बसमध्ये जागा पकडण्यासाठी, धुतलेले हात कोरडे करण्यासाठी, प्रेम व्यक्त करण्यासाठी, परीक्षेत काॅपी करण्यासाठी, नातवंडांना खायच्या वस्तू बांधून आणण्यासाठी, उन्हापासून/धुळीपासून रक्षण करण्यासाठी, तोंड लपविण्यासाठी, बंडाना बनवण्यासाठी बांधण्यासाठी, लग्नात नाचण्याची अडचण सोडवण्यासाठी. रुमाल तुमच्या आमच्यासाठी, नागडेपणा लपविण्यासाठी.

field_vote: 
0
No votes yet