१०० वर्षांपूर्वीच्या 'स्पॅनिश फ्लू'च्या आठवणी

कोरोनाच्या साथीमुळे आपण हतबल आहोत, मग शंभर वर्षांपूर्वीच्या त्या साथीमध्ये आपण काय केलं असतं? कारण त्या साथीमध्ये जगभर ५ कोटी लोक मरण पावले. एकट्या भारतात १ कोटी ८० लाख. ना औषध, ना लस, ना कम्युनिकेशन, ना आरोग्याच्या सुविधा. वर्ष होतं, १९१८ आणि साथ होती, 'स्पॅनिश फ्लू'ची. ही साथ बरंच काही शिकवून जाते. लिहिताहेत, राष्ट्रीय पेशीविज्ञान संस्थेचे (NCCS) वरिष्ठ संशोधक डॉ. योगेश शौचे.

भाग १

हवामानात बदल झाला की दरवर्षीच ‘फ्लू’ची साथ पसरते. या फ्लूचाच एक घातक प्रकार म्हणजे स्पॅनिश फ्लू. १९१८ म्हणजे पहिल्या महायुद्धाच्या अखेरीचा काळ. त्यात रोगाची लक्षणे दिसू लागताच काही तासातच रोगी दगावायचा. त्याची लागण जगाच्या त्या वेळच्या लोकसंख्येच्या एक-तृतियांश लोकांना (५० कोटी) झाली. त्यात तब्बल ५ कोटी लोक मरण पावले. ही संख्या दोन्ही जागतिक महायुद्धात मिळून झालेल्या मृत्यूंपेक्षाही जास्त आहे.

रुग्णांना घेऊन जाणाऱ्या परिचारिका
रुग्णांना घेऊन जाणाऱ्या परिचारिका

स्पॅनिश फ्लू नाव का?

ही साथ अमेरिकेत सुरू झाल्याचं बोललं जातं, पण तिला स्पॅनिश फ्लू नाव का पडलं? त्यावेळी पहिलं महायुद्ध सुरू होतं. युद्धात सहभागी असलेल्या देशांमध्ये बातम्यांवर सरकारी नियंत्रण होतं. त्यामुळे या सर्व देशांमध्ये फ्लूमुळे होणाऱ्या मृत्यूच्या बातम्या दाबल्या गेल्या. स्पेन हा युद्धातील तटस्थ देश होता. तिथल्या हानीच्या बातम्या जाहीर होत गेल्या. परिणामी, ही साथ ‘स्पॅनिश फ्लू’ या नावाने ओळखली जाऊ लागली.

अमेरिकेत ही साथ मार्च १९१८मध्ये दिसून आली. ५४ हजार सैनिकांना लागण झाली. त्यात केवळ ३९ जणांचा मृत्यू झाला. पहिल्या महायुद्धामुळे अमेरिकन सैन्य जगभर जात होते. त्यांच्यासोबत हा आजार युरोपभर पसरला. या आजाराची लागण निम्मे ब्रिटिश सैन्य आणि दोन-तृतियांश फ्रेंच सैन्याला झाली. पण या पहिल्या लाटेत मृत्यूदर नेहमीच्या सामान्य फ्लूप्रमाणेच होता.

विषाणूमध्ये झालेला बदल

मात्र, ऑगस्टपर्यंत युरोपमध्ये या विषाणूमध्ये बदल घडून आला. त्यामुळे तरूण आजारी पडू लागले आणि २४ तासांच्या आत मरू लागले. हा विषाणू ब्रिटनमधून जहाजांद्वारे फ्रान्स, अमेरिका आणि आफ्रिकेत पोहोचला. १९१८च्या सप्टेंबर ते नोव्हेंबर या तीन महिन्यांमध्ये प्रचंड संख्येने लोक मृत्युमुखी पडले. एकट्या ऑक्टोबर महिन्यात फक्त अमेरिकेत १ लाख ९५ हजार जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

शेक हँड करण्यावर बंदी

या आजाराची लागण कशी होते, याविषयी माहिती नव्हती. त्यामुळे त्यावर उपचार, लस, वगैरे काहीही असण्याची शक्यताच नव्हती. केवळ स्थानिक पातळीवर काही उपाय करण्यात आले. त्यात विलगीकरण, चर्च–शाळा-सभागृहे यांसारखी सार्वजनिक स्थळे बंद ठेवणे, रस्त्यावर थुंकायला बंदी घालणे या उपायांचा समावेश होता. आजच्यासारखी टाळेबंदी नसली तरी लोकांना घराबाहेर न पडण्याचा आणि हस्तांदोलन (शेक हँड) न करण्याचा सल्ला दिला गेला होता.

मास्क न वापरल्यास ५ डॉलर दंड

सॅन फ्रान्सिस्कोमध्ये मास्क वापरण्याची सक्ती केली गेली. मास्क न वापरल्यास ५ डॉलरचा दंड ठोठावला गेला. त्या काळातही लोकांनी गरम पाण्याच्या गुळण्या करणे आणि कापराच्या पुड्या गळ्यात बांधून फिरणे यासारखे उपाय केल्याची छायाचित्रे दिसतात.

सरासरी वयोमान १२ वर्षांनी कमी

दुसऱ्या लाटेची अनेक वैशिष्ट्ये होती. त्यातले पहिले म्हणजे रोग्यांमधे १५ ते ३४ वर्षे वयाच्या रुग्णांची संख्या जास्त होती. या लाटेमुळे अमेरिकेत सरासरी आयुष्यमान एकदम बारा वर्षांनी खाली आले.

भारतात शिरकाव

स्पॅनिश फ्लूचा भारतात शिरकाव २९ मे १९१८ रोजी झाला. युद्धभूमीवरून परतलेल्या सैनिकांच्यामार्फत तो पोहोचला. ते जहाजाने मुंबई बंदरात पोहोचले. तिथून रेल्वेच्या माध्यमातून हा आजार वणव्यासारखा देशभर पसरला. त्याने देशाच्या तेव्हाच्या ३२ कोटी लोकसंख्येपैकी ६ टक्के लोकांचा म्हणजे सुमारे १.८ कोटी लोकांचा बळी घेतला.

ब्रिटिश राजवटीची अनास्था, अपुऱ्या वैद्यकीय सेवा ही याची काही कारणे. अजून एक महत्त्वाचे कारण म्हणजे त्या वर्षी मोसमी पावसानेही अवकृपा दाखवली. असे मानले जाते की त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक खेड्यातून शहरात स्थलांतरित झाले आणि गर्दी वाढली. शिवाय उपासमारीमुळे जनतेची रोगप्रतिकारशक्ती देखील कमी झाली असावी.

मृतदेहांनी भरलेली नद्यांची पात्रं

देशातली स्थिती तेव्हा अतिशय भयंकर होती मृत्यूचे थैमान चालू होते, गल्लोगल्ली मृतदेह किंवा मरणासन्न लोक पडलेले होते. गंगा आणि इतरही नद्या मृतदेहांनी भरून वाहत होत्या. हिंदीतले प्रसिद्ध कवी सुर्यकांत त्रिपाठी ऊर्फ "निराला" तेव्हा बावीस वर्षांचे होते. या साथीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कुल्ली भाट हे पुस्तक लिहिले. ते आपल्या पत्नीला भेटायला निघाले होते, पण ते घरी पोचण्यापूर्वीच त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. त्यांचे अनेक नातेवाईकही या लाटेत बळी पडले. ते म्हणतात, ‘डोळ्याची पापणी लवायच्या आत माझे सगळे कुटुंब नाहीसे झाले.’ गंगेच्या पात्रातून वाहणाऱ्या मृतदेहांचाही उल्लेख त्यात आढळतो.

मोठ्या संख्येने असलेल्या रुग्णांना सामावून घेण्यासाठी उभारणात आलेले रुग्णालय
मोठ्या संख्येने असलेल्या रुग्णांना सामावून घेण्यासाठी उभारणात आलेले रुग्णालय

ब्रिटिश राजवटीविरुद्ध असंतोष

त्या वेळी नुकतेच राजकारणात आलेल्या महात्मा गांधी यांनाही सौम्य स्वरूपाचा संसर्ग झाला होता. त्यांची सून आणि नातू त्यात दगावले. प्रख्यात साहित्यिक प्रेमचंद यांनाही त्यावेळी फ्लू झाल्याचा उल्लेख सापडतो. ब्रिटिश राज्यकर्ते फारसे मरण पावले नाहीत. मे-जून महिन्यात सुरू झालेली साथ डिसेंबरपर्यंत जवळपास संपूर्ण देशातून नाहीशी झाली. पण तिथून लोकांच्या मनात ब्रिटिश राजवटीने दाखवलेल्या अनास्थेमुळे नाराजी निर्माण व्हायला सुरुवात झाली. नंतर लगेचच १९१९च्या एप्रिलमधे जालियनवाला बाग हत्याकांड झाले. या पाठोपाठच्या घटनांमुळे १९२० सालच्या गांधीजींच्या असहकार आंदोलनाला जनतेचा प्रचंड पाठिंबा मिळाला.

प्रचंड जीवितहानी होऊनही इतिहासात या साथीचा फारसा उल्लेख नाही. पहिल्या महायुद्धाचा काळ, त्यामुळे बातम्यांवर असलेले नियंत्रण यामुळे साथीचे गांभीर्य झाकले गेले. साथीतील मृत्यूचे खरे आकडे कळले ते महायुद्ध संपल्यावरच. तोपर्यंत साथ संपली होती. तरीही बंगालचा दुष्काळ किंवा प्लेग यांनी कितीतरी कमी बळी घेतलेले असूनही त्यांचा उल्लेख इतिहासात स्पष्ट आढळतो. फ्लुचा उल्लेख मात्र अभावानेच दिसतो हे एक कोडेच आहे.

डॉ. योगेश शौचे.
(क्रमश:)
'ऐसी अक्षरे'वर लेख प्रकाशित करण्याची परवानगी दिल्याबद्दल डॉ. योगेश शौचे यांचे आभार.
सौजन्य : भवताल
चित्रे : विकीपीडियातून साभार.

भाग २ : विध्वंसक विषाणू मृतदेहातून मिळवला जातो तेव्हा..
भाग ३ : भयंकर विषाणू पुन्हा जिवंत करण्याचं ठरलं आणि...

field_vote: 
0
No votes yet

प्रचंड जीवितहानी होऊनही इतिहासात या साथीचा फारसा उल्लेख नाही. पहिल्या महायुद्धाचा काळ, त्यामुळे बातम्यांवर असलेले नियंत्रण यामुळे साथीचे गांभीर्य झाकले गेले. साथीतील मृत्यूचे खरे आकडे कळले ते महायुद्ध संपल्यावरच. तोपर्यंत साथ संपली होती. तरीही बंगालचा दुष्काळ किंवा प्लेग यांनी कितीतरी कमी बळी घेतलेले असूनही त्यांचा उल्लेख इतिहासात स्पष्ट आढळतो. फ्लुचा उल्लेख मात्र अभावानेच दिसतो हे एक कोडेच आहे.

खरंच - इतक्या प्रचंड प्रमाणात जीवीतहानी होऊनही ह्या फ्लूबद्दल "ब्लॅक डेथ"सारखी दहशत नाही. म्हणजे निदान उपलब्ध समाजमाध्यमांत तरी "स्पॅनिश फ्लू" ने किती हाहा:कार घडवला होता ते सापडलं नाही. कदाचित १९१८ हा महायुद्धाचा काळ असल्याने ही साथ तितकीशी मिडियामधे कव्हर झाली नसावी?

(अप्रगत देशातली प्रचंड जीवीतहानी घडवणारी घटना तशीही फारशी माहिती नसते. उदा. गेल्या काही दशकातली सर्वात भयानक कत्तल कुठे झाली? असा एक पोल ट्विटरवर वाचला त्यात बहुसंख्यांनी अफगाणीस्तान/सिरिया/इराक वगैरे युद्धांची नावं घेतली. खरं उत्तर आहे काँगो.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इतिहास विषयात यावर एकही ओळ वाचली नाही. मला आठवतं त्याप्रमाणे, इयत्ता सहावी-सातवीच्या बालभारतीत कुठल्या तरी धड्यात कोणाचे तरी वडील/आजोबा इन्फ्लुएंजाच्या साथीत मेले एवढाच उल्लेख. इतका हाहाकार घडूनही!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

लेख आवडला; अस्वलाचा प्रतिसादही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.