डीकोडिंग स्पॅनिश फ्लू (भाग २)

विध्वंसक विषाणू मृतदेहातून मिळवला जातो तेव्हा..
(डिकोडिंग स्पॅनिश फ्लू, भाग २)

‘स्पॅनिश फ्लू’च्या विषाणूने १९१८ साली जगभरात ५ कोटी लोकांचा बळी घेतला. एकट्या भारतात १.८० कोटी लोक मरण पावले. हा रोग पसरवणारा विषाणू इतका जहाल कसा बनला, त्याने इतका विध्वंस कसा केला.. असे अनेक प्रश्न संशोधकांना भेडसावत होते. त्यातूनच एक अफलातून कल्पना बाहेर आली. ती प्रत्यक्षातसुद्धा उतरली, पण त्यासाठी तब्बल ८० वर्षे उलटावी लागली. काय होती ही कल्पना?
लिहिताहेत, राष्ट्रीय पेशीविज्ञान संस्थेतील (NCCS) वरिष्ठ संशोधक प्रा. योगेश शौचे.

---

‘स्पॅनिश फ्लू’ ज्या काळात उद्भवला, तेव्हा प्रयोगशाळेत विषाणू वाढवण्याच्या पद्धती विकसित झालेल्या नव्हत्या. त्यामुळे या विषाणूचे नमुने साठवले गेले नव्हते. पण या विषाणूने केलेल्या मनुष्यहानीमुळे त्याच्याबाबत कुतूहल होते. ते शास्त्रज्ञांना शांत बसू देत नव्हते. त्यामुळे हा विषाणू पुन्हा मिळवता येईल का, ही कल्पना पुढे आली.

हा सर्वसाधारण १९५१चा काळ. अमेरिकेच्या आयोवा विद्यापीठात योहान हल्टीन हा २५ वर्षांचा विद्यार्थी शिकत होता. योहान मूळचा स्वीडिश. त्याने एका तज्ज्ञाच्या व्याख्यानात असे ऐकले होते की, १९१८च्या फ्लूचे गूढ उकलण्याचा एकमेव मार्ग म्हणजे बर्फाळ प्रदेशात दफन केलेल्या देहातून विषाणू मिळवून वाढवणे. कारण सर्वसाधारण तापमानात मृतदेहांचे पूर्ण विघटन होऊन फक्त हाडेच शिल्लक असणार होती. योहान याने हे ऐकले आणि पीएच.डी. करण्यासाठी हाच विषय पक्का केला.

अलास्कामधील ब्रेव्हिग मिशन

अलास्का आणि तेथील 'ब्रेव्हिग मिशन' हे गाव (लाल रंगाच्या ठिपक्याने दर्शवले आहे)
अलास्का आणि तेथील 'ब्रेव्हिग मिशन' हे गाव (लाल रंगाच्या ठिपक्याने दर्शवले आहे)

आता बर्फाळ प्रदेशात मृतदेहांचा शोध घ्यायला लागणार होता. त्यासाठी योहान याने अलास्कामधल्या ‘ब्रेव्हिग मिशन’ या गावाची निवड केली. हे गाव छोटेसे. समुद्रकिनारी वसलेले. तिथली जमीन कायम गोठलेल्या अवस्थेत असते. या गावात १९१८ साली केवळ ८० लोक राहायचे. त्यापैकी ७२ जण ‘स्पॅनिश फ्लू’मुळे मरण पावले. केवळ ८ मुले बचावली होती. मृतदेहांचे दफन एका टेकडीवर करण्यात आले होते.

योहान याने या मृतदेहांमधून नमुने मिळवण्याबाबत स्थानिकांकडून परवानगी मिळवली. बर्फाळ प्रदेशामुळे जमीन गोठलेली. ती उकरण्याचे काम कठीण होते. त्यासाठी योहान व त्याच्या टीमला वारंवार तिथे आग पेटवावी लागली. अखेर थडग्यांपर्यंत पोहोचता आले. पहिले उकरलेले थडगे छोट्या मुलीचे होते. निळा पोशाख, केसांना बांधलेल्या लाल रिबिनी.. तो देह पाहणे अतिशय हृदयद्रावक होते. त्यांना अजून असे चार देह मिळाले. त्यातून त्यांनी फुफ्फुसाचा नमुना घेतला.

एक फसलेला प्रयोग

हा फुफ्फुसाचा नमुना प्रयोगशाळेत कोंबडीच्या फलित अंड्यात टोचला, जेणेकरून तो विषाणू वाढावा. मात्र, योहानची निराशा झाली. विषाणू वाढला नाही. त्यामुळे योहानने तो नाद सोडून दिला. मग त्याने एका वैद्यकीय महाविद्यालयात पॅथॉलॉजिस्ट म्हणून खूप वर्षे काम केले. या काळात जग पालथे घातले, एव्हरेस्ट शिखरावर संशोधन केले. तब्बल ४६ वर्षांनी ‘स्पॅनिश फ्लू’ पुन्हा त्याच्या आयुष्यात आला.

इतरत्र झालेले प्रयत्न

१९९७च्या सुमारास योहान यांच्या वाचनात प्रा. जेफरी टोबेनबर्गर यांचा एक शोधनिबंध आला. टोबेनबर्गर हे ‘आर्म्ड फोर्सेस इन्स्टीट्यूट ऑफ पॅथॉलॉजी’ मध्ये काम करत होते. तिथे पॅथॉलॉजी विभागाचे प्रमुख होते. त्यांनाही १९१८च्या फ्लूमधे रस होता. त्यांच्या संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यांच्याकडे सैनिकांचे रोगनिदान करतेवेळी नमुन्यांचा मोठा संग्रह होता. त्यात १९१८च्या साथीत दगावलेल्या सैनिकांचे नमुनेही जतन करून ठेवले होते. हे नमुने ८० वर्षांपूर्वीचे असल्याने त्यात जिवंत विषाणू सापडणे शक्य नव्हते.

परंतु, १९५१ नंतर आता विज्ञान-तंत्रज्ञानाने खूप प्रगती केली होती. १९८४ साली पी.सी.आर. तंत्राचा शोध लागला, त्यानंतर १९९५ पर्यंत ते चांगलेच विकसित झाले होते. या तंत्राचा वापर करून, संपूर्ण विषाणू उपलब्ध नसतानाही त्या विषाणूच्या आर.एन.ए.चा अभ्यास करणे शक्य झाले होते. या तंत्राद्वारे मूळ आर.एन.ए.च्या लक्षावधी प्रतिकृती तयार होत असल्याने अगदी इवलासा नमुनाही अभ्यासासाठी पुरेसा ठरत होता.

दक्षिण कॅरोलिना प्रदेशातील २१ वर्षांचा एक सैनिक १९१८ मधील ‘स्पॅनिश फ्लू’च्या साथीत मरण पावला होता. त्याच्या फुफ्फुसाचा एक तुकडा पुढच्या अभ्यासासाठी जपून ठेवण्यात आला होता. तो टोबेनबर्गर यांना मिळाला. त्यांनी त्यातून पी.सी.आर. तंत्राचा वापर करून ‘स्पॅनिश फ्लू’ विषाणूच्या आर.एन.ए.च्या छोट्या भागाचा क्रम मिळवला. थोडा-थोडा करत बऱ्यापैकी क्रम त्यांनी मिळवला. हे योहान यांच्या वाचनात आले. पण आता योहान ७२ वर्षांचे होते.

नवी आशा आणि मिळालेले यश
योहान यांनी या वयातही टोबेनबर्गरशी संपर्क साधला. आपण ‘ब्रेव्हिग मिशन’मध्ये केलेल्या कामाबाबत त्यांना सांगितले आणि तिथे स्वखर्चाने जाऊन नमुने गोळा करण्याची तयारी दाखवली. दोघांचाही उत्साह दांडगा होता. पुढच्याच आठवड्यात योहान ‘ब्रेव्हिग मिशन’ गावी पोहोचले. तिथून लुसी नावाच्या विशीतल्या तरुणीची कबर उकरली. त्यातून तिच्या मृतदेहातील फुफ्फुसाचे नमुने मिळवले. ते टोबेनबर्गर यांना पाठवून दिले. टोबेनबर्गर यांनी त्यावर तातडीने काम सुरू केले. त्यांना पुढच्या दहा दिवसांत त्या नमुन्यातून विषाणूचा आर.एन.ए. मिळवण्यात यश आले होते.

'ब्रेव्हिग मिशन' गावाची आताची रचना
'ब्रेव्हिग मिशन' गावाची आताची रचना

फ्लूच्या या विषाणूमधे एकूण आठ जीन्स (जनुके) असतात. टोबेनबर्गर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पी.सी.आर.च्या मदतीने त्यांचा क्रम ठरवला. त्यांनी तुलनात्मक अभ्यास केला, त्यातून विषाणूची उत्पत्ती कशी झाली, तो इतका घातक कसा झाला याविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. हे एवढ्यावरच थांबले नाही.

त्यातून जन्म झाला एका रोमांचक, पण तितक्याच धोकादायक प्रयोगाचा. त्यात थोडीशीही चूक झाली असती, तरी ती अंगलट येणार होती.
काय होता हा प्रयोग??

(वाचा, “डिकोडिंग स्पॅनिश फ्लू”च्या तिसऱ्या भागात)

डॉ. योगेश शौचे.
(क्रमश:)
'ऐसी अक्षरे'वर लेख प्रकाशित करण्याची परवानगी दिल्याबद्दल डॉ. योगेश शौचे यांचे आभार.
सौजन्य : भवताल
चित्रे : विकीपीडियातून साभार.

भाग १ - १०० वर्षांपूर्वीच्या 'स्पॅनिश फ्लू'च्या आठवणी

field_vote: 
0
No votes yet

रोचक. वाचतोय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अतिशय छान माहिती दिली आहे लेखात,पुढच्या भागाची आतुरतेने वाट बघत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0