डीकोडिंग स्पॅनिश फ्लू (भाग ३)

भयंकर विषाणू पुन्हा जिवंत करण्याचं ठरलं आणि...
(डिकोडिंग स्पॅनिश फ्लू, भाग ३)

‘स्पॅनिश फ्लू’ हा रोग १९१८ सालचा. एका विषाणूमुळे उद्भवलेला. या विषाणूने जगात ५ कोटी लोकांचा, तर भारतात १.८० कोटी लोकांचा बळी घेतला. १९५१ नंतर हा विषाणू ‘डीकोड’ करण्याचे प्रयत्न झाले. गाडलेले मृतदेह उकरून त्यातून काही नमुने घेण्यात आले आणि या विषाणूच्या जनुकांचा क्रम शोधता आला. त्यासाठी ८० वर्षं जावी लागली. आता त्याच्याही पुढचा थरारक आणि अतिशय धोकादायक प्रयत्न होणार होता. काय होता हा प्रयोग?
लिहिताहेत, राष्ट्रीय पेशीविज्ञान संस्थेतील (NCCS) वरिष्ठ संशोधक डॉ. योगेश शौचे

......
‘स्पॅनिश फ्लू’ रोग पसरवणाऱ्या विषाणूच्या जनुकांचा क्रम संशोधकांच्या हाती आला. पण तेवढ्याने त्यांचं समाधान झालं नाही. आता सुरुवात झाली, अतिशय रोमांचक आणि धोकादायक प्रयोगाची. तो म्हणजे या विषाणूच्या आर.एन.ए.चा क्रम वापरून प्रयोगशाळेत हा अतिघातक विषाणू तयार करणे.

काळ होता, २००० सालनंतरचा. ‘जेनेटिक इंजिनिअरींग’चे तंत्र १९७६ साली अस्तित्वात आले होते. आतापर्यंत प्रयोगशाळेत विषाणू तयार करण्याचे आव्हान पेलण्याइतपत ते सक्षम झाले होते. ‘स्पॅनिश फ्लू’ विषाणूच्या आठही जीन्सचा पूर्ण क्रम माहीत होता. त्यामुळे हे आठही जीन्स प्रयोगशाळेत वेगवेगळे तयार करण्यात आले. मग ते एकत्र आणून संपूर्ण विषाणू तयार करणे आता शक्य होते.

सर्व जीन्स तयार करण्याची तयारी

ती जबाबदारी न्यु यॉर्कमधील माउंट सिनाई वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. पीटर पालेसी आणि अडॉल्फो गार्सिया-सास्त्रे यांच्यावर सोपवण्यात आली. पालेसी यांनी अशा तऱ्हेचे काम याआधीही केले होते. त्यामुळे त्यांना हे काम करणे फारसे जड गेले नाही. त्यांनी हे आठ वेगवेगळे जीन्स जेनेटिक इंजीनीअरींगचे तंत्र वापरून प्रयोगशाळेत स्वतंत्रपणे तयार करता येतील, अशा वाहकांमध्ये घातले. आणि ते प्रा. जेफरी टोबेनबर्गर यांना पाठवून दिले. आता टोबेनबर्गर यांना फक्त ते वाहक प्रयोगशाळेत योग्य वातावरणात वाढवून त्यातील प्रत्येक जीनपासून निघणारे प्रथिन मिळवायचे होते.

प्रा. जेफरी टोबेनबर्गर, सहकाऱ्यासोबत जनुकांचा क्रम तपासताना
प्रा. जेफरी टोबेनबर्गर, सहकाऱ्यासोबत जनुकांचा क्रम तपासताना

हे काम अतिशय धोकादायक होते. म्हणून ते करण्यासाठी सर्व प्रकारची काळजी घेण्यात आली. हे काम करणारे शास्त्रज्ञ, इतर कर्मचारी, आसपासचे लोक यांना अपघाताने विषाणूचा संसर्ग होऊ नये, याची काळजी घेणे आवश्यक होते. त्यासाठी उच्च दर्जाची सुरक्षा असलेली प्रयोगशाळा तयार करण्यात आली. सर्व नमुनेही कडक सुरक्षा असलेल्या स्थळी साठवले गेले. हे जोखमीचे काम करण्याची संपूर्ण जबाबदारी एकाच व्यक्तीवर द्यावी, असे ठरले. त्यासाठी डॉ. टेरेन्स टंपे यांची निवड करण्यात आली.

योग्य ती काटेकोर खबरदारी

काम सुरू होण्याआधी डॉ. टंपे यांची पूर्ण वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आवश्यक ते लसीकरण केले गेले. सुरक्षेच्या कारणास्तव टंपे यांनी, इतर सर्व लोक घरी निघून गेल्यावर एकट्याने रात्री किंवा सुटीच्या दिवशीच काम करावे, असे ठरवण्यात आले. त्यांच्या खास प्रयोगशाळेचे दार फक्त त्यांच्या हाताच्या ठशांनी उघडले जायचे, तर नमुने ठेवलेले फ्रीजर उघडण्यासाठी त्यांचे बुब्बुळ स्कॅन केले जायचे. इतर कोणाला ते उघडणे शक्य नव्हते.

प्रयोग यशस्वी आणि मोठी झेप

प्रत्यक्ष कामाला २००५च्या उन्हाळ्यात सुरुवात झाली. प्रयोगशाळेत वाढणाऱ्या माकडाच्या पेशीत हे आठ जीन्स एकामागून एक सोडण्यात आले. या पेशींमधे विषाणू तयार होतो का याची वाट पाहणे सुरू झाले. तो ऐतिहासिक क्षण लवकरच आला. प्रयोगशाळेत वाढणाऱ्या माकडाच्या पेशींमधे विषाणू वाढत असल्याची लक्षणे त्यांना दिसू लागली. डॉ. टंपे यांनी नील आर्मस्ट्राँग यांच्याच शब्दात आपल्या सहकाऱ्यांना सांगितले, “माणसासाठी एक छोटे पाऊल, पण मानवजातीसाठी एक मोठी झेप!”

डॉ. टेरेन्स टंपे प्रयोगशाळेत काम करताना
डॉ. टेरेन्स टंपे प्रयोगशाळेत काम करताना

लगेचच म्हणजे २००५च्या ऑगस्ट महिन्यात या विषाणूवर काम सुरू झाले. प्रयोगशाळेतील उंदीर आणि कोंबडीच्या फलित अंड्यांवर प्रयोग करण्यात आले. त्यावरून हा विषाणू इतका घातक का झाला, याचा अभ्यास करण्यात आला. त्यात जे काही आढळले ते धक्कादायक होते.

म्हणून विषाणू इतका संहारक

साधा फ्लू पसरवणाऱ्या विषाणूपेक्षा या विषाणूच्या वाढीचा वेग प्रचंड जास्त असल्याचे दिसून आले. उदा. चार दिवसांनंतर, उंदराच्या फुफ्फुसात या विषाणूची संख्या साध्या फ्लूच्या विषाणूच्या तुलनेत ४०,००० पट जास्त आढळून आली. तसेच, त्यांची संहारकता, म्हणजे प्रयोगातील उंदरांना मारण्याची शक्ती ही १०० पटीने जास्त होती.

या विषाणूचे एक वैशिष्ट्य १९१८ सालच्या रोग्यांमध्येही दिसले होते. ते म्हणजे हा विषाणू फुफ्फुसांवर हल्ला करून ती संपूर्णपणे द्रवाने भरून टाकत होता. त्याच्या ‘जीन्स’च्या क्रमामध्ये झालेले बदल या तीव्र परिणामांसाठी कारणीभूत असल्याचेही दिसून आले. शास्त्रज्ञांच्या मते, या विषाणूची संहारकता वाढण्याचे कारण म्हणजे - त्यातील कोणत्याही एका विशिष्ट ‘जीन’मध्ये नव्हे, तर सर्वच ‘जीन्स’मध्ये एकत्रित बदल झाले होते.

अशा रीतीने एक अफलातून प्रयोग पूर्णत्वाला गेला. योहान हल्टीन यांनी १९५१ साली एक ध्यास घेतला. तो पूर्ण करण्यात अनेक चढ-उतार आले. त्यांना इतरांची लाभलेली साथ, तंत्रज्ञानाचा झालेला विकास.. ही सर्व पूरक परिस्थिती. या सर्वातून मार्ग काढत १९५१ ते २००५ असे तब्बल ५४ वर्षांनंतर हाती यश आले.

एका महाविध्वंसक विषाणूचे सहस्य उलगडलेच, शिवाय त्याची अफलातून कहाणीसुद्धा समजून घेता आली.

डॉ. योगेश शौचे.
---
(समाप्त)

'ऐसी अक्षरे'वर लेख प्रकाशित करण्याची परवानगी दिल्याबद्दल डॉ. योगेश शौचे यांचे आभार.
सौजन्य : भवताल
चित्रे सौजन्य : सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन- सीडीसी

भाग १ - १०० वर्षांपूर्वीच्या 'स्पॅनिश फ्लू'च्या आठवणी
भाग २ - विध्वंसक विषाणू मृतदेहातून मिळवला जातो तेव्हा..

field_vote: 
0
No votes yet

इथे प्रकाशित करण्याची परवानगी दिल्याबद्दल डॉक्टरांचे आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तिन्ही भाग वाचले ,छान माहिती मिळाली.
व्हायरस प्रयोग शाळेत बनवता येतो ही माहिती महत्वाची.
व्हायरस बनवत येत नाही फक्त जतन करून नंतर जास्त प्रमाण निर्माण करता येतो असे माहीत होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

यावरुन एक प्रश्न आला आहे.

मध्यंतरी एका लेखमालेत वाचले होते कि स्पॅनिश फ्ल्यु आणि स्वाइन फ्ल्यू यांचा विषाणू एकच होता असे प्रयोगशाळेत झालेल्या अभ्यासात आढळले. हे खरे आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0