लेग पीस

वाईट हस्ताक्षराला कोंबडीचे पाय म्हणायची प्रथा कोणत्या शतकात आणि कोणत्या प्रदेशात सुरू झाली, याविषयी ठोस माहिती उपलब्ध नाही. पण ही प्रथा (कुप्रथा म्हणावं का?) प्राचीन वगैरे नसून सांप्रतकाळातीलच असावी, असा माझा कयास आहे. त्याला कारण ही आहे. आपल्याकडे अनेक ऋषीमुनींनी विपुल लेखन करून ठेवलं आहे. चार वेद, शेकडो महाकाव्यं, हजारो ग्रंथ आणि बरंच वाङ्मय हस्तलिखित स्वरूपात उपलब्ध आहे. यातल्या एकातही हस्ताक्षराला कोंबडीचे पाय म्हटल्याची माहिती सापडत नाही. आता इतक्या ऋषींमधे सर्वांचीच अक्षरं म्हणजे मोत्यांच्या माळा, असं असणं तर शक्य नाही. एखादा तरी मुनी आपल्या माळेतला असेलच की. पण कोणत्याही मुनीच्या हस्ताक्षराला कोंबडीचे पाय म्हटलेल्याचे दाखले नाहीत. महाभारत सांगता सांगता महर्षी व्यासांनी गणपतीचा कान पकडून, "हे गर्दभः, तव हस्ताक्षरं अस्ति वा कुक्कुटपदश्रुंखला ?"असं म्हटल्याचंही कोणत्या संस्कृत श्लोक किंवा सुभाषितात मी वाचलं, ऐकलं नाही. त्यामुळे हा शोध अलिकडेच लागलेला असावा, एवढं नक्की.

माझा एक शाळेत असल्यापासूनचा मित्र आहे. त्याच्या हस्ताक्षराचा उद्धार न केलेला आमच्या बॅचचा एकही शिक्षक सापडणार नाही. शाळेत हस्ताक्षर स्पर्धेच्या दिवशी हा दर वर्षी न चुकता दांडी मारायचा. वाईट हस्ताक्षर म्हणजे कोंबडीचे पाय असतील तर याची वही म्हणजे अक्खं पोल्ट्री फार्म. अरुंद खुराड्यात दाटीवाटीने कोंबलेल्या शेकडो कोंबड्या.. तिथेच खातायत, त्यातच हागतायत, असं जे काही एक रमणिय दृश्य पोल्ट्री फार्म मध्ये असतं, अगदी तस्संच दृश्य याची वही उघडल्यावर दिसायचं. असंख्य कोंबड्या आणि त्यांचे पाय, गुण्यागोविंदाने त्याच्या वहित नांदत असत. हल्ली बँकेत कॅशियर म्हणून नोकरीला आहे. ० ते ९ इतके दहा आकडे, इतरांना कळतील असे लिहायला शिकलाय, त्यामुळे भागून जातंय. माझं हस्ताक्षरही फार काही मोत्यांचे दाणे वगैरे नव्हतंच. पण सुंदर अक्षर हाच खरा दागिना असेल, तर माझी उत्तरपत्रिका म्हणजे अगदीच लंकेची पार्वती वगैरे नसायची, इतकं नक्की.

मागे एक बातमी वाचली. कुठल्याशा देशातल्या संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार, "ज्यांच्या विचारांचा वेग अफाट असतो, त्यांच्या हातांना त्या विचारांचा वेग पेलवत नाही, त्यामुळे अशा व्यक्तींचं हस्ताक्षर वाईट असतं.." हे वाचल्यानंतर मला, माझ्या ओळखीतली सारी मंडळी त्यांच्या विचारांच्या वेगाच्या उतरत्या क्रमाने उभी असलेली दिसली होती. आमच्याकडे एच आर मधे काम करणारी दिव्या गुप्ता, अगदीच मंद विचारांची आहे, हे ही मला त्याच दिवशी कळलं. इतक्या सुंदर मुलीला मंद ठरवणारं हे अजब संशोधन मी तिथल्या तिथे फाडून फेकून दिलं. एरवीही या उनाड संशोधकांच्या फोकनाड संशोधनावर माझा काडीचा विश्वास नाही. हे नवीन संशोधन म्हणजे तर सचिन ने शोएब अख्तर ला "तू फार फास्ट बॉलिंग करतोस, मी नै खेळणार जा" असं म्हटल्यासारखं आहे. असो, माझा मुद्दा तो नाही.

व्यक्तीशः मला वाईट हस्ताक्षराला कोंबडीचे पाय म्हणणं, हा समस्त कुक्कुटप्रजातीवर अन्याय वाटतो. मूळात कोंबडीचे पाय हे काही जगातले सर्वात कुरूप पाय नसावेत. मोराचे पाय सर्वात कुरूप असल्याचं कुठेतरी ऐकलेलं आठवतं. पण तो पडला राष्ट्रीय पक्षी. त्याच्या पायांना कुरूप कोण बोलेल..? एक तर या मोराला राष्ट्रीय पक्षी कोणी बनवलंय कोणास ठाऊक. पाऊस पडल्यानंतर आत्ममग्नतेत दोन-चार ठुमके मारण्याव्यतिरिक्त मोराचं कर्तृत्व काय? पण राजाविरुद्ध कोण बोलेल?? उगीच देशद्रोही वगैरे असल्याचा शिक्का माथ्यावर बसायचा. म्हणून मग हा विटाळ गरीब बिचाऱ्या कोंबड्यांच्या माथ्यावर (खरं तर पायावर) मारण्यात आलाय. आणि समजा असलेच कोंबडीचे पाय कुरूप, तरीही ज्या जीवाची उत्पत्तीच मानवजातीच्या उदरभरणासारख्या महान यज्ञकर्मासाठी झाली आहे, त्या जीवाच्या एखाद्या शारीरिक व्यंगावर असं बोट ठेवणे, हा अक्षरशः कृतघ्नपणा आहे. बाजारातून चिकन आणताना फक्त "लेग पीस" मागणाऱ्यानी तरी हे पातक टाळलं पाहिजे.

चार-सहा महिन्यांपूर्वी कोंबड्यांचं एक शिष्टमंडळ, प्रस्तुत शब्दप्रयोग रद्द करण्याची मागणी घेऊन राज्यपालांची भेट घ्यायला गेलं होतं. त्या वेळी राज्यपाल वेगळ्या कोंबड्यांच्या झुंजीचा निकाल लावण्यात व्यस्त होते. त्यामुळे त्यांनी "मी याविषयी संविधान पंडितांशी बोलून कळवतो", असं उत्तर दिल्याने शिष्टमंडळ रिकाम्या हाती परतलं होतं. यानंतर परवा म्हणे कोणत्यातरी महिलावादी कोंबडीने फेसबुकवर पोस्टसुद्धा टाकली होती की, "जर संबंधित शब्दप्रयोग रद्द करणं ही मागणी संविधानबाह्य असेल, तर कमीत कमी त्यात बदल करून 'कोंबडी अथवा कोंबड्याचे पाय' असा शब्दप्रयोग रूढ करावा. हे फक्त 'कोंबडीचे पाय' असे शब्दप्रयोग म्हणजे कोंबडासत्ताक व्यवस्थेचं लक्षण आहे..."

सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि चार शुद्घ शाकाहारी न्यायमूर्तींचं खंडपीठ यावर निर्णय देणार आहे. निर्णय होईपर्यंत चिकनच्या दुकानांत लेग पीस विकू न देण्याची भूमिका अ.भा. कुक्कुटकल्याण संघटनेने घेतली आहे. असो, प्रकरण न्यायालयात असल्याने त्यावर जास्त बोलणं उचित ठरणार नाही, त्यामुळे माझं हे लेग पीस पुराण मी इथेच आवरतं घेतो.

field_vote: 
0
No votes yet