किनारा

पाठीवरचा जहरी वार मुकाट्याने सोसून
सांत्वन मात्र मीच तुझं केलं
कारण तुझं दुःख कायमच मोठं माझ्यापेक्षा
आणि माझं मन तुझ्यापेक्षा
तुझा दावा असा की तुला भुलवून सुरा हाती दिला गेला
पण तू तो घट्ट पकडलासच ना?
कदाचित मला घायाळ करायची संधी तू शोधत होतास
स्वतःच्याही नकळत
माझा दोष इतकाच की मला वहावत जाता येत नाही
भावनांच्या कल्लोळात
राहावं लागतं निःशब्द, शांत-स्थिर राहून आब सांभाळत
अन् तुझे हेलकावे झेलत
किनारा नकोच असेल तर वाहात जायला मोकळा आहेस तू
विनंती फक्त एकच आहे
नाकातोंडात पाणी गेल्यावर श्वास मागायला येऊ नकोस
मी शिकतेय कोरडं राहायला

field_vote: 
0
No votes yet