रूपा (छोट्यांसाठी मोठी गोष्टं)

(एक ऐकलेली कथा)

ते गाव तसं लहानसच होतं. पण मोठं देखणं. नाव होतं रामपूर.
लहान मोठी कौलारू घरे होती. त्या भोवताली फुललेल्या शोभिवंत बागा, अंगणात दिसणाऱ्या मनमोहक रांगोळ्या, तुळशी वृंदावने. हे सारे पाहताना मनास सात्विक प्रसन्नता लाभत असे.

गावातले स्वच्छ, प्रशस्तं, तांबड्या मातीचे वळणदार रस्ते आणि त्यावरची माणसांची वर्दळ त्या देखण्या चित्रास जिवंतपणा आणीत असत.

गावाच्या एका टोकाला दाट झाडी होती. तेथे अनेक वन्य पशुपक्षी सुखेनैव विहार करीत असत. जवळच एक लहानशी नदी वाहत होती. नदीचे नाव कर्मावती. नदी जरी लहान असली तरी तिला बाराही महिने पाणी असे. त्यामुळे गावाला पाण्याचे दुर्भिक्ष असे कधीच नव्हते.

जसे निसर्गसुंदर गाव, तशीच तिथली माणसे देखिल. सभ्य, सज्जन, ज्येष्ठांचा आदर करणारी. देवभक्त आणि धार्मिकसुद्धा. एकमेकांबरोबर सौजन्याने, खेळीमेळीने राहत. भांडण-तंटे अगदीच नसत असे काही नाही. परंतु गावातली वडिलधारी, शहाणीसुर्ती माणसे ती शक्यतो वाढू देत नसत.

तर असं हे गाव मोठ्या गुण्यागोविंदाने नांदत होते. त्या गावात एक भव्य शिवमंदिर होते. खोल काळोखा गाभारा, नक्षीदार खांबांनी सजलेला सभामंडप, आणि खूप मोठा परिक्रमा मार्ग, असे त्या मंदिराचे स्वरूप होते. गाभाऱ्यासमोर मंडपात भलीमोठी घंटा टांगलेली होती. त्या घंटेचा नाद संपूर्ण गावात ऐकू जाई.

मंदिराच्या आवारात एक हत्तीण बांधलेली असे. सगळेजण तिला 'रूपा' म्हणत असत.
सगळ्यांचीच ती खूप लाडकी होती. अगदी लहान असल्यापासून, म्हणजे अगदी तिच्या जन्मापासून ती इथेच होती. सर्वांची तिच्यावर फार माया. कुणी तिला केळीचे घड आणून देत, तर कुणी मऊशार हिरवी गवताची पेंढी देत. तिच्या सोंडेवरून हात फिरवित. तिच्या पायात साखळदंड असत, परंतु त्याची तशी काही जरूरी नव्हती. इतक्या वर्षात रूपाने कुणाला कधीच काही इजा केली नव्हती. गावातील मुले तिच्याबरोबर मनसोक्त खेळत. तिच्या पाठीवर चढून बसत, तिच्या पाया मधून पळत, तिच्या सोंडेला लोंबकाळीत झोके घेत... पण रूपा शांत असे. दिवसभर ती देवळातच असे. फक्त रोज सकाळी माहूत तिला नदीवर स्नानासाठी नेत असे. तिच्या गळ्यात एक घंटा बांधलेली होती. ती रस्त्यावर जशी झुलत झुलत चालू लागे, तसा त्या घंटेची घणघण सुरू होई. तो आवाज ऐकला की आसपासची सारी मुले, " रुपा.. रूपा.. रूपा आली " असे आनंदाने ओरडत, धावत तिच्या रस्त्यावर येत. मग रूपा सोंड उंचावून त्यांना अभिवादन करे. कधी एखाद्या लहानग्याला सोंडेने उचलून पाठीवर ठेवत असे. रस्त्यावरची मोठी माणसे देखील कौतुकाने हा खेळ बघत उभी राहत.
मग रूपा नदीवर जाई. तेथील पाण्याने सचैल स्नान करी. नदीवर आलेली मुले, मोठी माणसे देखिल रूपाची वाट बघत. तिला कधी काही खाऊ देत. त्या नंतर ती परत माघारी देवळात येई.

अनेक वर्षांपासून हा उपक्रम सुरू होता. त्यात कधीही खंड पडला नाही.

पण एकदिवस मात्र काही तरी वेगळेच घडले. रूपा नदीवर आली. तिच्या गळ्यातली घंटा घणघणत होती. नदीकाठावर गर्दी होती. पण आज कुणाचे तिच्याकडे लक्षच नव्हते. सगळे एकाच दिशेला तोंड करून काहीतरी तन्मयतेने पाहत होते.
रूपाला नवल वाटले. असे आजतागायत कधी घडले नव्हते. म्हणून तिने देखिल सगळे ज्या दिशेला पाहतं होते, तिकडे नजर वळवली. आणि ती सुद्धा स्तब्ध झाली. एक सुंदर मोर, आपला रंगीत पिसारा फुलवून स्वतःभवती गिरक्या घेत होता. दाट हिरव्या झाडीच्या पार्श्वभूमीवर, तो चकाकणाऱ्या निळ्या, हिरव्या रंगाचा मोर आणि त्याचा पिसारा, खूपच सुंदर दिसत होता. मोराने पिसारा थरथरवत जशी परत एक गिरकी घेतली, तशी सारी मुले आनंदाने टाळ्या वाजवीत होती.
मोठी माणसे, " किती सुंदर! किती देखणा, " असे उद्गार काढीत होती. आणि रूपाकडे कुणाचेच लक्ष नव्हते. ती अगदी हिरमुसून गेली.

मग पुढील काही दिवस हे नेहमीचेच झाले. मोर पिसारा फुलवून थुई थुई नाचत असे, आणि मुले, माणसे आनंदाचे चित्कार काढीत ते दृश्य बघत राहत. रूपा बिचारी बाजूला उभी राही. पण तिच्याकडे कुणाचे लक्षच नसे. तिला अगदी काही सुचेनासे झाले होते. दिवसेंदिवस ती उदास राहू लागली.

एक दिवस असेच घडले. सारेजण त्या मयुराच्या कौतुकात मग्नं होते. रूपाला आता सहन होईना. पण ती बिचारी तरी काय करणार? मयुराचे नृत्य संपले. सारेजण आपापल्या कार्याकडे परतू लागले. माहूत रूपाजवळ आला आणि परत फिरण्यासाठी हातातल्या अंकुशाने तिच्या मस्तकावर जरासे टोचले. पण आज रूपाने लक्षच दिले नाही. ती कुणाचेही काही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हती. मग माहूत देखिल जरा दूर जाऊन बसला. त्याला तरी कुठे घाई होती?

रूपा सोंडेत पाणी घेऊन उगीचच इकडे तिकडे फवारत होती. तिथेच पलीकडे मोर थांबला होता. रूपाकडे बघत तो म्हणाला,
"अशी कशी गं तू रूपा? तुला ना रूप ना रंग. किती तू बेढब, कुरूप, बेरंगी. मी बघ कसा? माझा चमकदार निळा पिसारा, त्यामधली सुंदर रंगसंगतीची मोरपिसे. मी नृत्य देखिल करू शकतो. कारण मी तुझ्यासारखा अजस्त्र आणि बेडौल नाही. तुझे डोळे किती बारके, आणि सुरकुतलेली लांब सोंड. माझे डोळे बघ कसे? पाणीदार आणि माझी डौलदार मान. माझ्या डोईवरचा हा शोभिवंत तुरा बघ. माझ्या सौदर्यात भर घालतो. तुझे तर कान सुद्धा किती मोठे आहेत? आणि हे लांबच लांब सुळे. किती तू कुरूप? देवाने तुला अशी का बनवली? म्हणूनच मी इथे असताना कुण्णी तुझ्याकडे बघत नाही. "
असं बरच काही कुत्सित, बोचरे बोल बोलून मोर तिथून निघून गेला.

मोराचे बोलणे ऐकून रूपा अजूनच दुःखी झाली. तिच्या जखमेवर जणू मीठच चोळले गेले होत. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. निराश होऊन ती देवळाकडे परतली. आता कशातच तिचे मन रमत नव्हते. भविक येत. देवाचे दर्शन घेऊन तिला काहीबाही देत. मुले येऊन तिच्याबरोबर खेळत. पण रूपा गप्प राही. पहिल्यासारखी सर्वांमध्ये सामील न होता अलिप्तं उभी राही. कुणालाच काही कळे ना, हिला झालय तरी काय?

एकदिवस ती नदीवर गेली होती नेहमीप्रमाणे. यांत्रिकपणे सोंडेने पाणी घेत होती. नदीच्या स्वच्छ पाण्यात तिला तिचे प्रतिबिंब दिसत होते. तिला ते बघायची इच्छाच नव्हती.
अचानक तिला कसली चाहूल लागली. पाण्यावर तरंग उमटत होते. तेजस्वी प्रकाशाने पाणी चकाकत होते. साऱ्या परिसरात आगळा सुगंध पसरला होता. रूपाने समोर पाहिले तर काय? साक्षात वनदेवी तिच्यासमोर उभी. रूपाने सोंड उंचावून तिला अभिवादन केले.
वनदेवीच्या चेहऱ्यावर प्रसन्न स्मितहास्य होते.

"रूपा, गेले काही दिवस मी पाहते आहे, तू उदास दिसतेस. काय झाले? कसले दुःख आहे तुला? कुणी त्रास देते आहे का? "
देवीने नादमधुर आवाजात पृच्छा केली.
रुपाला काय बोलावे, कसे सांगावे काहीच सूचेना. प्रत्यक्ष वनदेवीने आपली दखल घेतली या जाणिवेने तर ती हरखूनच गेली होती.
" माते माझ्या सारख्या सामान्य जीवाकरिता तुम्ही स्वतः इथे अवतरलात, त्यानेच माझ्या दुःखाचे निवारण झाले आहे. " रूपा म्हणाली.
"म्हणजे काहीतरी दुःख आहे हे नक्की. " वनदेवी हसत हसत म्हणाली. "काय ते पटकन सांग बघू. तुला अशी उदास, गप्प राहिलेली बघणे मला आवडत नाहीये. "
मग रूपाने जास्त आढेवेढे घेतले नाहीत. सुरुवातीपासूनचा सारा घटनाक्रम तिने कथन केला. आणि म्हणाली,
"हे देवी, माझ्यावर असा अन्याय का केलाय? माझे रूप असे का आहे? "
आता वनदेवीचा चेहरा गंभीर झाला. पण शांत स्वरात ती म्हणाली,
" तू त्या मयुराचे बोलणे मनावर घेऊ नकोस. तो जे तुला बोलला, त्यावरून त्याची अत्यंत उथळ आणि कोती मनोवृत्ती दिसते आहे. पोकळ गर्वाने तो मतीभ्रष्ट झालाय. अशांकडे शहाण्यांनी दुर्लक्ष करावे हे उत्तम. रुप काही काळापुरतेच असते, नंतर त्याचा क्षय होतो आणि ते नाश पावते. परंतु गुण मात्र सर्वकाल अबाधित असतात. म्हणून रूपा पेक्षा गुण श्रेष्ठं असतात हे नेहमी लक्षात ठेव. "

परंतु रूपाला ते काही पटेना. ती गप्प उभी होती. मग देवीने विचारले,
"काय केले म्हणजे तुझे दुःख संपेल असे तुला वाटते? "
रूपा क्षणभर शांत राहिली. मग हलकेच म्हणाली, " मला सुंदर रूपाचे दान दे. मग माझे दुःख नाहीसे होईल. "
देवीने तिला समजाविण्याचा प्रयत्न केला. पण रूपा तिच्या मागणीवर ठाम होती. तिला सुंदर व्हायचे होते. त्या मयुरासारखे. मग कुणी, कधीच तिची अवहेलना केली नसती.
वनदेवीचा निरूपाय झाला. तिने तिचा वरदहस्त रूपाच्या मस्तकी ठेवला.

बघता बघता रूपाचे रूपच पालटले. सर्वांग मोरपंखी रंगाचे होऊन गेले. पाठीवर चमकदार लाल रंगाची, सोनेरी तारांनी नक्षीकाम केलेली झुल होती. त्या झुलीला सोनेरी रंगाचे गोंडे लटकत होते. गळ्यातील घंटा चांदीची झाली होती. तिच्या शुभ्र सुळ्यांवर विविध रंगी मण्यांच्या माळा होत्या. कानावर सोनेरी नक्षी होती. सोंडेवर देखिल पिवळ्या, हिरव्या रंगांची नक्षी होती. नदीच्या पाण्यातले आपले प्रतिबिंब पाहून ती हर्षभरीत झाली.

तिने देवीला मनःपूर्वक नमस्कार केला आणि ती देवळाच्या दिशेने चालू लागली. तिच्या गळ्यातील घंटा घणघणू लागली, तशी आसपासची मुले "रूपा --रूपा-- "असे ओरडत रस्त्यावर धावली.
पण त्यांना त्यांची रूपा कुठेच दिसेना. हा कुठला नवीन प्राणी आहे ते कळेना. धावत आलेली सारी मुले परत माघारी जाऊन उभी राहिली. बघणारे चकीत होत. असा प्राणी त्यांनी कधीच पाहिलेला नव्हता. तिला बघितल्यावर झालेली सर्वांची प्रतिक्रिया बघून तिचा जरासा विरसच झाला. पण ती तशीच देवळात आली. नेहमीच्या जागी उभी राहीली. दर्शनाला आलेले भाविक सवयीने तिच्या दिशेला येत, तिला बघून थबकत आणि माघारी वळत. हा कोणता प्राणी देवळात आलाय, हे काही त्यांना कळत नसे. पण हीच आपली रूपा आहे, हे मानायला काही ते तयार नसत.

असे काही दिवस लोटले. रूपा खूपच एकाकी झाली होती. नेहमीचे लोक, तिला बघून दुसरीकडे जायला लागत. नेहमी तिच्या मागेपुढे करणारी मुले, तिच्याजवळ यायला बिचकत. इतकेच काय, माहूत देखिल तिला नेहमीच्या कामांसाठी नेईना. जड लाकडी ओढणे, धान्याने भरलेली गाडी ओढून साठवण गृहाकडे आणणे इ. तिची कामे. पण आता ती कोण करत असेल माहीत नाही. रूपा नुसतीच देवळाच्या आवारात उभी असे.

रूपा निराश झाली. असे का व्हावे तिला कळे ना. त्या चमकदार रंगीबेरंगी मयुराचे कौतुक करणारी माणसे, तिच्याशी असे का वागत आहेत हे तिला समजत नव्हते. ती नदीकाठावर आली. हिरव्यागर्द जंगलाच्या दिशेने तिने पाहिले. त्या मयुराचा देखिल मागमूस नव्हता. ती खिन्न झाली. तिच्या अपेक्षेप्रमाणे काहीच घडत नव्हते.

तितक्यात पाण्याच्या लाटांवर दिव्य प्रकाश पसरू लागला. रूपाला कसलीतरी चाहूल लागली. तिने वर पाहिले. सुहास्यवदना वनदेवी समोर उभी होती. चेहऱ्यावर तेच अश्वासक स्मित.
"रूपा कशी आहेस आता तू? आनंदात आहेस ना? "
रुपाने आपले मस्तक नकारार्थी हलवीत सोंडेने नकारार्थी खूण केली. नदीच्या पाण्यातल्या तिच्या प्रतिबिंबाकडे उदासपणे बघत राहिली. आपल्या स्वरूपामध्ये अट्टाहासाने केलेल्या आमूलाग्र बदलाचा परिणाम अगदीच अनपेक्षीत झाला, हे वनदेवीला कसे सांगावे याचा ती विचार करीत होती.
तिला आठवले की वनदेवीने तिला परोपरीने समजावले होते. तिला तिचीच लाज वाटली. आपणच हा प्रसंग ओढवून घेतला आहे, हे आठवून अजूनच दुःखी झाली.
"काय झाले रूपा? बोलत का नाही? " वनदेवीने मायेने विचारले.

रूपाचा धैर्याचा बांध आता मात्र फुटला. ती रडू लागली. तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. रडत रडतच ती म्हणाली,
"देवी मला आता कुणी ओळखतच नाही. कुणी माझ्या जवळ येत नाही. अनोळखी नजरेने बघून, मला टाळून निघून जातात. कुणालाच माझ्या या रूपाचे कौतुक वाटत नाही. "

वनदेवीला सारे काही कळले होते. ती म्हणाली,
"रुपा रडू नकोस. तुला मी म्हणाले होते ना, की रूप बदलून तू कुणाच्या मनात स्थान मिळवू शकत नाहीस. तुझ्या पूर्वीच्या रूपातच लोक तुला ओळखतात. त्यांना तीच रूपा आपली वाटते. आधीतर तू सर्वांची आवडती होतीस. त्यांच्या आवडीच्या, आपुलकीच्या आड तुझे रूप कधी आले का? ते सर्व तुझ्या गुणांवर प्रेम करत होते. "

" परंतु देवी.. " अश्रू आवरत रूपा म्हणाली,
"तो मोर आला, तर सारे त्याचेच कौतुक करू लागले. मला वाटले मला सगळेजण विसरूनच गेले".
वनदेवी हसू लागली.
"रूपा, अग ते सारे तात्पुरते होते. तो मोर आता कुठे दिसतोय का? आणि तो नाही म्हणून कुणाचे काही अडतेय का? नाही ना? त्या मोराचे पिसारा फुलवून नाचणे काही काळापुरतेच. औटघटकेचे मनोरंजन फक्तं. नंतर तो दाट जंगलात एकटाच फिरतो, कुणी त्याला शोधायला जात नाही. त्याचे महत्त्व तितकेच मर्यादित आहे. त्याचा कुणाला फारसा उपयोग पण नसतोच. स्वतःच्याच विश्वात मग्नं होऊन नाचणाऱ्या मयुराचे, कुणाशीच काही नाते नसते. तो नसल्याने कुणालाच त्याची आठवण येत नाही, की काही फरक पडत नाही. पण तुझे तसे नाही. तुझ्याबद्दल साऱ्यांना स्नेहभाव वाटतो. त्यांच्या आयुष्याचा तू एक घटक आहेस. सारे जण त्यांच्या रूपाला शोधताहेत, तिची वाट बघतायत. आणि हा स्नेह तुझ्या बाह्यरूपावर अवलंबून कधीच नव्हता. त्याचे कारण तर तुझे गुण आहेत."

रूपाला काही कळेच ना.
"परंतु देवी मी तर इथेच आहे. मग...? "
वनदेवीने तिला समजावीत म्हणले,
"तू इथे आहेस, पण त्यांना माहीत नाही, की तूच ती रूपा आहेस. त्यांना ती जुनीच रूपा परत हवी आहे. तुला ते कुणी वेगळाच प्राणी समजतात आणि म्हणून तुझ्यापासून दूर जातात "

रूपाला आता सारे काही लख्खं कळले होते. ती देवीसमोर नतमस्तक होउन उभी राहिली आणि म्हणाली,
"हे देवी, तूच मला यावर उपाय सांग. मला माझे पूर्वीचे आयुष्यच परत हवे आहे. सुंदर रूपाहूनही, त्या सर्व लोकांचा स्नेह मला प्रिय वाटतो. "
वनदेवीने काही क्षण विचार केला आणि म्हणाली,
"बघ हं, तू नीट विचार केला आहेस ना? मी तुला परत पहिल्यासारखी करेन. पण मग तू तशीच राहशील कायमची. चालेल? "
"हो हो नक्की चालेल. "
रूपाने एक क्षणही न गमावता उत्तर दिले.
वनदेवी हसली. तिने तिचा वरदहस्त रूपाच्या मस्तकी ठेवला.

क्षणार्धात रूपाचे रूपच पालटले. परत ती पहिल्यासारखी साधीसुधी दिसू लागली. तिने कृतज्ञतेने वनदेवीला वंदन केले.

घंटा घणघणू लागली. रूपा झुलत झुलत चालत होती. घंटानाद ऐकून मुले दबक्या पावलाने, साशंक मनाने रस्त्याकडे धावली. माहीत नाही ही रूपा आहे, की तोच तो विचित्र नवीन प्राणी.
बघतात तर काय. ती त्याचीच रूपा होती. नेहमीची, ओळखीची.
सारी मुले धावत येऊन तिला बिलगली. तिला म्हणत होती "रूपा तू कुठे गेली होतीस इतके दिवस? का आली नाहीस? "
जाणारी येणारी माणसे तिच्या सोंडेला, पायांना स्पर्श करीत म्हणत होती " आपली रूपा आली बरं का परत. "

सर्वांच्या चेहऱ्यावर खुशी पसरली होती आणि रूपाच्या डोळ्यांतून आनंदाश्रू ओघळत होते.

field_vote: 
0
No votes yet