विचार

#ललित #संसर्ग #ऐसीअक्षरे #२०२०

विचार

- -जयदीप चिपलकट्टी

'दे इकडे,' रागिणी म्हणाली, तशा हातात घेतलेल्या चपला सुशीलेने तिच्याकडे सुपूर्द केल्या. तिचा आणि स्वत:चाही जोड रागिणीने आपल्या खांद्यावरच्या झोळीत ठेवून दिला, आणि खाली वाकून दोन्ही हातांचे तळवे समुद्राच्या पाण्यात बुचकळून घेतले. हात झाडत ती वाळूतून चालू लागली.

'गुप्तधनाचा नकाशा कुठे आहे?' सुशीलेने विचारलं.

'चावटपणा नको,' रागिणी म्हणाली.

रागिणी आणि सुशीला ह्या सख्ख्या बहिणी आहेत. रागिणी तेवीस वर्षांची तर सुशीला अठरा वर्षांची आहे. लांबचा समुद्रप्रवास करून दोघी इथे येऊन पोहोचल्या होत्या. बोटीतून उतरताना कप्तानाने रागिणीच्या हाती एक कापडी थैली सोपवली होती.

पुळणीवर मांडी घालून बसून रागिणीने थैलीचे बंद सोडले. एक लखोटा आणि खुडखुड वाजणारी पितळी डबी अशा दोन वस्तू त्यातून बाहेर पडल्या. तिच्या शेजारी बसलेली सुशीला हे औत्सुक्याने पाहात होती. रागिणीने लखोटा फोडला. 'बाबांनी आपल्या दोघींना उद्देशून लिहिलेलं पत्र आहे,' ती म्हणाली. 'नकाशा मात्र दिसत नाहीय.'

बाबांचे पत्र

चि. रागिणी व चि. सुशीला यांस बाबांचे अनेक आशीर्वाद. हे पत्र तुमच्या हाती पडेल तेव्हा तुम्ही दोघी नुकत्याच एका बेटावर पोहोचला असाल. तुमचा प्रवास सुखरूप झाला असेल असं समजतो. हे बेट निर्जन आहे अशी तुमची प्रथमदर्शनी समजूत होईल, परंतु बाब तशी नाही. माझे तीन भाऊ, म्हणजेच तुमचे तीन काका, अनेक वर्षे या बेटावर वसती करून आहेत. त्यांना तुमची मदत व्हावी ह्या एकमेव हेतूने तुम्हाला इथे आणण्यात आलेलं आहे. इतक्या मोठ्या समुद्रप्रवासावर तुम्हांला धाडण्याआधी मी तुमची संमती घेतली नाही, किंवा तोंडदेखली घेतली जरी असली तरीदेखील तुम्हाला कशासाठी धाडतो आहे हे नीट समजावून सांगितलं नाही याबद्दल मी तुमचा दिलगीर आहे. पण तुम्ही विचारी आहात. परिस्थितीचं स्वरूप लक्षात येताच मला क्षमा कराल असा विश्वास वाटतो. हे तिघे इथे कसे आले व कशा प्रकारची मदत त्यांना तुमच्याकडून अपेक्षित आहे ह्याचा तपशील खालीलप्रमाणे :

हे माझे भाऊ तिळे आहेत आणि त्यांच्याशी दीर्घ व सूक्ष्म परिचय नसेल अशा व्यक्तीला ते वेगळे ओळखू येत नाहीत. माझ्याहून ते पाच वर्षांनी मोठे आहेत. थट्टेखोरपणा आणि समोरच्याच्या रागलोभाची पर्वा न करता चुरचुरीत बोलण्यात आनंद मानणं ही स्वभाववैशिष्ट्यं त्यांच्यात पहिल्यापासून होती. तिघांमध्ये सारख्याच प्रमाणात होती असं मी म्हणत नाही, पण होती.

माझे भाऊ सोळा वर्षांचे होते तेव्हाची ही गोष्ट. वेदपठण करून भिक्षा मागत फिरणारा एक कानडी ब्राह्मण त्या दिवशी आमच्या दारावर आला. तो जुन्या वळणाचा आहे हे उघड होतं. काष्ट्याचं लुगडं नेसलेल्या त्याच्या दोन पोरसवदा मुली सोबत होत्या. ह्या तिघांनी त्या मुलींची हलकी मस्करी सुरू केली. 'मुलींनो, इतका मोठा वितंडवाद होऊन गेला याची तुम्हाला गंधवार्ताही नाही की काय? सकच्छ नेसणं म्हणजेच कुलीन वागणं, विकच्छ म्हणजे थिल्लरपणा आणि पारंपरिक मूल्यांची पायमल्ली हा सनातन विचार आता कालबाह्य झाला आहे. तो काष्टा कशाला वागवता? पायात नाही का येत? गोल पातळ नेसायला सुरुवात करा. छान दिसाल. आणि प्रत्येकी चार वारांची बचत होईल ती वेगळीच.' ही थट्टा अशा सुरात काही वेळ चालली तसा ब्राह्मण संतापला. तो म्हणाला की आम्ही परदेशी माणसं. तुमची भाषा आम्हाला नीट येत नाही. याचा गैरफायदा घेऊन आणि मुद्दाम जडजंबाल शब्द वापरून तुम्ही आमची मस्करी करावी हे सभ्यपणाचं लक्षण नव्हे. इतकी जर तुम्हाला आपल्या वाक्चातुर्याची घमेंड असेल तर मी तुम्हाला शाप देतो की तुम्ही मराठी विसरून जाल. अनवट शब्द वापरण्याचा जर तुम्हाला सोस आहे तर यापुढे 'सकच्छ' आणि 'विकच्छ' हे दोनच शब्द तुम्हाला वापरता येतील. वास्तविक ही आगळीक करण्यातला तिघा भावांचा वाटा अगदी समसमान नसावा. चारगटपणा करायला कुणा एकाने सुरुवात करावी आणि दुसऱ्याने त्याची री ओढावी अशासारखं ते झालं असणार. पण मी वर म्हटल्याप्रमाणे तिऱ्हाईताला एकतर हे तिघे सहज वेगवेगळे ओळखू येत नसत, आणि त्यातदेखील संतापलेला तिऱ्हाईत माणूस असा प्रयत्न करण्याची शक्यता नव्हतीच. त्यामुळे परिणाम असा झाला की उडदामाजी काळंगोरं न होता हा शाप तसाच्या तसा तिघांच्या डोक्यावर बसला.

इतकं करून ब्राह्मण निघून गेला. माझ्या तिघा भावांची मोठी पंचाईत झाली. समोरच्याचं मराठी त्यांना व्यवस्थित समजत असे पण बोलता मात्र येत नसे. तुम्ही त्यांना भेटाल तेव्हाही अशीच परिस्थिती असेल. आपल्या मुलांची ही दशा पाहून तुमचे आजीआजोबा हवालदिल झाले. अनाहूत सल्ला देणारे रिकामटेकडे लोक आमच्या दारासमोर भाऊगर्दी करू लागले. 'मराठी विसराल' हा शाप 'नि:संतान व्हाल' किंवा 'तुमचं दिवाळं वाजेल' अशा शापांइतका प्रचलित नसल्यामुळे त्यावरचा उपाय कुणालाच ठाऊक नव्हता. आम्ही अथर्ववेदही चाळून पाहिला पण त्यातून काही मिळालं नाही. मग कुणीतरी सुचवलं की तिघांना नेवाशाला घेऊन जा, तिथे उपाय निघू शकेल.

आम्ही नेवाशाला गेलो. तिथे एक देवरुशी भेटला. तो म्हणाला की आज रात्री मी यावर चिंतन करीन, त्यातून कदाचित तोडगा निघेल. दुसऱ्या दिवशी सकाळी तो म्हणाला की तोडगा सापडला. ब्राह्नणाच्या त्या दोन मुली माझ्या स्वप्नात आल्या होत्या. त्यांनी मला एक कूटप्रश्न सांगितला. त्यांचा जो पाणउतारा झाला होता त्याची भरपाई म्हणून तुमच्या घराण्यातल्या दोन मुली कुणाचाही सल्ला न घेता जर हा कूटप्रश्न सोडवू शकल्या तर ह्या तिघांवरचा शाप विरघळून जाईल. मी तर तेव्हा फक्त अकरा वर्षांचा होतो, पण माझ्याकडे बोट दाखवीत देवरुशी म्हणाला की ह्या पोराच्या पोटी दोन हुशार मुली नक्की जन्माला येतील.

माझ्या तिघा भावांना देवरुशाने समोर बसवलं. त्यांना उद्देशून तो म्हणाला की ह्या कूटप्रश्नाची दोन अंगं आहेत. पहिलं असं की भाषा ही बोलता यायला हवीच. म्हणून तर तिला भाषा म्हणतात. पण ते जर शक्य नसेल तर निदान रुकार किंवा नकार समोरच्याला कळवता यायला हवा. त्यामुळे 'सकच्छ' आणि 'विकच्छ' हे जे दोनच शब्द तुमच्या पोतडीत आहेत ते तुम्ही 'हो' आणि 'नाही' या अर्थाने वापरत चला. यातल्या कुठल्या शब्दाचा अर्थ काय हे तुमचं तुम्ही ठरवा पण चौथ्या कुणाला सांगू नका.

दुसरं असं की मी तुम्हा तिघांनी नवीन नावं देतो. मोहनदास, शकुनी आणि चकोर अशी ती नावं असतील. कुठल्याही प्रश्नाला मोहनदास नेहमी खरं उत्तर देईल. तो 'हो' किंवा 'नाही' म्हणू शकणार नाही, पण 'सकच्छ' किंवा 'विकच्छ' हे शब्द वापरून उत्तर देईल. अर्थात हो-नाही पैकी उत्तर देता येईल असाच प्रश्न हवा. कुठल्याही प्रश्नाला शकुनी नेहमी खोटं उत्तर देईल. तोही 'हो' किंवा 'नाही' म्हणू शकणार नाही, पण 'सकच्छ' किंवा 'विकच्छ' हे शब्द वापरून उत्तर देईल. चकोर मात्र एकच एक नेम धरून बसणार नाही. मनातल्या मनात नाणेफेक करून तो 'सकच्छ' की 'विकच्छ' ते ठरवील.

देवरुशी मला म्हणाला की तुझ्या पोरींना स्वच्छ विचार करायला शिकीव. ते महत्त्वाचं आहे. त्यांना सकच्छ नेसवायचं की विकच्छ ह्या घोळात पडू नकोस. मोहनदास कोण, शकुनी कोण आणि चकोर कोण हे जर त्या तीन प्रश्नांत ओळखू शकल्या तर ह्या शापातून तिघांची सुटका होईल. मी तुम्हाला तीन मंतरलेले जर्दाळू देतो. यातला एक जर्दाळू एकाला खायला दिला की त्याच्याकडून एका प्रश्नाचं उत्तर मिळेल. अशा तीन प्रश्नांसाठी तीन जर्दाळू कामी येतील. ह्या तीन उत्तरांवरून तिघे कोण ते ओळखायचं आहे.

आम्ही सारेजण घरी परतलो. माझे तिघे भाऊ जगाला कंटाळले आणि एका दूरवरच्या बेटावर निघून गेले याबद्दल मी त्यांना दोष देणार नाही. या घटकेला तुम्ही दोघी त्या बेटावर आहात.

'अचानकच संपलं पत्र', कागद उलटसुलट करून पाहात रागिणी म्हणाली. सावधपणे डबीचं झाकण उघडून तिने आतले जर्दाळू हुंगले आणि 'वाईट वास येत नाहीय' असा निर्वाळा दिला. पत्राची घडी करून ते तिने लखोट्यात घातलं आणि डबीसकट तो लखोटा थैलीत अलगद परत ठेवून बंद आवळले. तिला अबोल झालेली पाहून सुशीलेने विचारलं, 'ताई, आता काय करायचं?'

'आपल्याला स्वच्छ विचार करावा लागणार आहे,' रागिणी म्हणाली. 'पत्रात तसं लिहिलंच आहे.'

'सुदैवाने आपल्याला तशी शिकवणही आहे,' सुशीला म्हणाली. 'तिला अनुसरून स्वच्छ आणि सुसूत्र विचार करूया.'

चमचमत्या पाण्याकडे पाहात दोघीही काही वेळ स्तब्ध बसून होत्या.

'माझा फार गोंधळ व्हायला लागलाय गं,' सुशीला म्हणाली.

'माझाही,' रागिणी म्हणाली. 'आपण एकमेकींना धरून ठेवून विचार करूया? सुसूत्रपणा त्यात नंतर आणता येईल.'

'असं पाहा की 'सकच्छ' आणि 'विकच्छ' या शब्दांचे अर्थ आपल्याला ठाऊक नाहीत,' सुशीला म्हणाली. 'यांतल्या एकाचा अर्थ 'हो' आणि एकाचा 'नाही' इतकंच ठाऊक आहे. ते शोधून काढावे लागतील. पण मी काय म्हणते की 'सकच्छ'चा अर्थ 'हो' आणि 'विकच्छ'चा 'नाही' असं तात्पुरतं गृहीत धरून चालूया. कारण नाहीतर मनात फार उलटसुलट होत राहील आणि प्रगती व्हायची नाही. पण हे फक्त एक गृहीतक आहे, खरे अर्थ आपल्याला ठाऊक नाहीत हेही आपण विसरता कामा नये.'

'खरं आहे तुझं,' रागिणी म्हणाली. तिने आपल्या तर्जनीने समोरच्या पुळणीत एक आयत आखला, आणि रेघा मारून लांबीचे समान तीन व उंचीचे समान दोन भाग केले. 'हा घे तक्ता,' ती पुढे म्हणाली.

शब्द सकच्छ विकच्छ
अर्थ हो नाही

'काळ्या दगडावर न काढता वाळूत काढला आहे. जेणेकरून हा अशाश्वत आहे याची जाणीव आपल्या मनात ताजी राहील.'

'मला तरी इथे काळा दगड एकही दिसत नाहीय,' सुशीला म्हणाली. 'पण ठीक आहे. भरती येईपर्यंत हाच तक्ता चालवून घेऊ. तर आता निदान काही सोप्या गोष्टी आपल्याला नीट समजल्या आहेत याची शहानिशा करून घेतलेली बरी. मी म्हणते ते बरोबर वाटतं का बघ. समज आपण मोहनदासकाकाला विचारलं की सूर्य पूर्वेला उगवतो का? तर तो मनातल्या मनात 'हो' म्हणेल. पण तो खरं बोलणारा माणूस आहे, त्यामुळे तोंडाने 'सकच्छ' म्हणेल. बरोबर?'

'बरोबर.'

'आता समज की हाच प्रश्न आपण शकुनीकाकाला विचारला, तर तोसुद्धा मनातल्या मनात 'हो' म्हणेल. पण तो खोटं बोलणारा माणूस आहे, त्यामुळे तोंडाने 'विकच्छ' म्हणेल. बरोबर?'

'बरोबर.'

'आता समज आपण विचारलं की 'उंटाला उडता येतं का?' तर मोहनदासकाका 'विकच्छ' म्हणेल आणि शकुनीकाका 'सकच्छ' म्हणेल. बरोबर?'

'बरोबर.'

'चकोरकाकाचं मात्र काही कळत नाही.'

'चकोरकाकाचं काही कळत नाही, हे मान्य,' रागिणी म्हणाली. 'जर कुणी डोक्यातल्या डोक्यात नाणेफेक करून खरंखोटं बोलत असेल तर अशा माणसाच्या उत्तरांतून आपल्याला काहीसुद्धा माहिती मिळणार नाही. असला कसला हा काका? नाणेफेक निदान आपल्या समोर करणार असता तर बाब वेगळी होती.'

'अगं, आपल्या समोर करणार असता तरी छापाचं अर्थ काय न् काटाचा काय हे आपल्याला कुठे माहीत आहे?' सुशीला म्हणाली. 'नाण्याला काही खरं आणि खोटं अशा बाजू नसतात. छापा आणि काटा अशाच असतात. खोटं असायचं तर अख्खं नाणंच खोटं असतं. तेव्हा नाणेफेक उघड्यावर करूनही काही फरक पडला नसता.'

'पण एकूण त्याच्यापासून लांब राहावं हेच बरं,' रागिणी म्हणाली.

'कबूल,' सुशीला म्हणाली. 'म्हणून निदान सध्या विचार करताना आपण असंच धरून चालू की जो काही प्रश्न विचारतो आहोत तो एकतर मोहनदासला किंवा शकुनीला. चकोरला नव्हे. चकोरकाका नेमका ओळखून वेगळा कसा काढायचा हा स्वतंत्र प्रश्न आहे. तो कसा सोडवायचा ते आपण नंतर बघूया.'

'अगदी, अगदी,' रागिणी म्हणाली. वाळूत आखलेल्या तक्त्याच्या बाजूला तिने एक गुबगुबीत पक्षी काढला. पक्षीजगताचं बारकाव्याने ज्ञान असणाऱ्याच्या दृष्टीला तो हुबेहूब चकोरासारखा दिसला नसता, परंतु प्राप्त परिस्थितीत तशी गरज नव्हती. दोन बाळसेदार कंसांमधोमध त्याला बंदिस्त करून जोरकस उभ्या रेघा ओढताच पक्षी पिंजऱ्यात अडकला.

चकोर
'एकूण पाहता इथपर्यंत आपली समजूत बरोबर वाटते,' सुशीला म्हणाली. 'उदाहरणार्थ, 'सूर्य पूर्वेला उगवतो का?' हा प्रश्न घे. याचं प्रामाणिक उत्तर 'सकच्छ' हे आपल्याला ठाऊक आहे. जर समोरच्यानं ते दिलं तर तो मोहनदास, नाहीतर तो शकुनी हे आपल्याला ओळखता येईल. अर्थात समोरचा तक्ता बरोबर आहे असं गृहीत धरून.'

'किंवा उलट समज की मोहनदास कोण आणि शकुनी कोण हे आपल्याला ठाऊक आहे,' रागिणी म्हणाली. 'आता मोहनदासला हा प्रश्न विचारला आणि तो 'सकच्छ' म्हणाला तर समोरचा तक्ता बरोबर आहे हे आपल्याला कळेल. जर 'विकच्छ' म्हणाला तर तक्ता उलट करावा लागणार हे कळेल. म्हणजे तक्त्यावरून काका ओळखता येईल किंवा काकावरून तक्ता.'

'पण सध्या आपल्याला काकाही ओळखता येत नाहीत आणि तक्ताही नाही. मग कसं करणार?' सुशीलेने विचारलं.

'हो ना. आणि शिवाय हे सगळं चकोरकाकाला आपण आधीच वेगळा पाडलेला आहे असं गृहीत धरून. ते अजून करायचंच आहे.' रागिणी म्हणाली.

'आणि ते कसं करायचं हे आपल्याला मुळीच ठाऊक नाही,' सुशीला म्हणाली.

'ठाऊक नाही हे खरंच,' रागिणी म्हणाली. 'पण मी म्हणते की चकोरकाकाला वेगळा पाडलेला आहे हे गृहीतक आपण घट्ट पकडून ठेवू. सोडूया नको. नाहीतर फार अनागोंदी माजेल.'

'बरं बाई,' सुशीला म्हणाली, आणि पिंजऱ्याशी ज्याचा यांत्रिक संबंध अस्पष्ट आहे अशा एका कुलपाची तिने चित्रात भर टाकली.

चकोर
'माझं चित्र तू खराब करते आहेस,' रागिणीने तक्रार केली.

'ते अशाश्वत आहे असं तूच तर म्हणाली होतीस. त्याच्यावर फार जीव लावून घेऊ नकोस,' सुशीला म्हणाली.

रागिणीने होय-नाही अशा अर्थाची मान हलवली, आणि दोन्ही हाताच्या तळव्यांत गाल झाकून घेऊन ती विचार करत राहिली.

'एक गोष्ट माझ्या लक्षात यायला लागली आहे,' सुशीला म्हणाली. 'सूर्य, उंट अशा वस्तूंबद्दल प्रश्न विचारून उपयोग नाही. कारण अशा प्रश्नांचं प्रामाणिक उत्तर आपल्याला माहीत जरी असलं तरी समोरच्या काकाने दिलेलं उत्तर कळत नाही. त्यामुळे दोहोंची तुलना करता येत नाही. तक्ता मध्ये अडमडतो.'

'हे माझ्याही लक्षात यायला लागलं होतं,' रागिणी म्हणाली. 'पण समज आपण प्रश्नाबद्दल प्रश्न विचारला तर?'

'म्हणजे कसा? 'काका, तुम्हाला एक प्रश्न विचारू का' असा?' सुशीलेने विचारलं.

'तसा नाही. 'तुम्हाला एक प्रश्न विचारू का?' हा वास्तविक प्रश्न नव्हे. ते घसा खाकरणं आहे. माझ्या मनात आहे तो वेगळ्या प्रकारचा प्रश्न. उंटाचं उडणं हा ज्याचा विषय नसून उंटाच्या उडण्यासंबंधी प्रश्न हा ज्याचा विषय आहे असा प्रश्न.'

'कोड्यात बोलू नकोस,' सुशीला म्हणाली.

'खवचट बोलू नकोस,' रागिणी म्हणाली. 'आपण कोडंच सोडवतो आहोत. हे बघ, उंटाला उडता येत नाही आणि गरुडाला उडता येतं इतकं तुला मान्य आहे ना?'

'मान्य आहे.'

'पण असं सरळ विचारायचं नाही,' रागिणी पुढे म्हणाली. ती उठून उभी राहिली आणि पुळणीवर पुरेशी सपाट जागा शोधून तिने आपल्या तर्जनीने वाळूत एक प्रश्न लिहून काढला. त्यापुढे पायाच्या अंगठ्याने कंस काढून त्यात एक चांदणी भरली, आणि ती म्हणाली, 'याला मी तारांकित प्रश्न असं नाव देते. हा बघ:

'गरुडाला उडता येतं का' असा प्रश्न जर मी तुम्हाला विचारला

तर तुम्ही 'सकच्छ' असं उत्तर द्याल का? (✴︎)

'तर आता आपल्यासमोरचा प्रश्न असा की तारांकित प्रश्न विचारला तर कुठला काका काय म्हणेल?' रागिणी पुढे म्हणाली. 'काका म्हणजे मोहनदास किंवा शकुनीकाका. चकोरकाका नव्हे.'

'नीट विचार करायला हवा. मीच मनोमन एकेक काका बनून पाहते,' उभी राहून तारांकित प्रश्नाला सामोरी जात सुशीला म्हणाली. 'गरुडाला उडता येतं का?' याला मी परप्रश्न म्हणते. असं सुटसुटीत नाव सोयीचं पडेल. पहिल्यांदा मी स्वत:ला मोहनदासकाका समजते. परप्रश्नाला माझं मनोमन उत्तर 'हो' असं असेल. पण मी खरं बोलणारा काका आहे, त्यामुळे उघड उत्तरही 'हो' या अर्थाचं म्हणजे 'सकच्छ' असं असेल. तात्पर्य काय तर तारांकित प्रश्नालाही माझं उत्तर 'हो' या अर्थाचं म्हणजेच 'सकच्छ' असं असेल.

'आता मी स्वत:ला शकुनीकाका समजते. परप्रश्नाला माझंही मनोमन उत्तर 'हो' असं असेल. पण मी खोटं बोलणारा आहे, त्यामुळे उघड उत्तर 'नाही' या अर्थाचं म्हणजेच 'विकच्छ' असं असेल. म्हणजे तारांकित प्रश्नाला माझं मनोमन उत्तर 'नाही' असं असेल. पण मी खोटं बोलणारा आहे, त्यामुळे उघड उत्तर 'हो' या अर्थाचं म्हणजेच 'सकच्छ' असं असेल. याचा अर्थ दोन्ही काका तारांकित प्रश्नाला 'सकच्छ' असंच उत्तर देतील.

'आता तक्ता उलट केला तर?' रागिणी म्हणाली. 'करूनच पाहते.' आपल्या उजव्या तळपायाने तिने तक्त्यात खाडाखोड केली आणि दोन शब्द नव्याने लिहिले. तक्ता असा दिसू लागला:

शब्द सकच्छ विकच्छ
अर्थ नाही हो

'अक्षर छान आहे गं माझं,' रागिणी म्हणाली.

'तक्ता बदलला आहे, पण परप्रश्न तोच आहे,' सुशीला म्हणाली. 'मी स्वत:ला पुन्हा मोहनदासकाका समजते. परप्रश्नाला माझं मनोमन उत्तर 'हो' असं असेल. पण मी खरं बोलणारा काका आहे, त्यामुळे उघड उत्तरही 'हो' याच अर्थाचं म्हणजे 'विकच्छ' असं असेल. तेव्हा तारांकित प्रश्नाला माझं उत्तर 'नाही' या अर्थाचं म्हणजेच 'सकच्छ' असं असेल.

'आता मी स्वत:ला शकुनीकाका समजते. परप्रश्नाला माझं मनोमन उत्तर 'हो' असं असेल. पण मी खोटं बोलणारा आहे, त्यामुळे उघड उत्तर 'नाही' या अर्थाचं म्हणजेच 'सकच्छ' असं असेल. म्हणजे तारांकित प्रश्नाला माझं मनोमन उत्तर 'हो' असं असेल. पण मी खोटं बोलणारा आहे, त्यामुळे उघड उत्तर 'नाही' या अर्थाचं म्हणजेच 'सकच्छ' असं असेल.

'गंमत आहे!' रागिणी म्हणाली. याचा अर्थ तक्ता कसाही असला आणि काका कुणीही असला तरी तारांकित प्रश्नाचं उत्तर 'सकच्छ' असंच येईल. 'मी प्रश्न बदलून बघते,' ती म्हणाली. तारांकित प्रश्नात स्थानिक खाडाखोड करून तिने नवा चंद्रांकित प्रश्न तयार केला:

'उंटाला उडता येतं का' असा प्रश्न जर मी तुम्हाला विचारला

तर तुम्ही 'सकच्छ' असं उत्तर द्याल का? (☾)

दोघी विचार करू लागल्या. 'गंमत आहे,' या खेपेस सुशीला म्हणाली. 'तक्ता कसाही असला आणि काका कुणीही असला तरी चंद्रांकित प्रश्नाचं उत्तर 'विकच्छ' असंच येतं आहे.

'मीही तोच हिशेब करत होते,' रागिणी म्हणाली. 'होतंय काय तर 'गरुडाला उडता येतं का' किंवा 'उंटाला उडता येतं का' ह्या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं आपल्याला मिळताहेत. आपल्याला जे समजलं आहे ते नीट मांडूया.' दोन्ही तळपाय घासत नेत तिने पुळण कोरी करून टाकली. 'समज 'प्र' हा एक प्रश्न आहे. हो-नाही उत्तर यावं असा कुठलाही प्रश्न घेता येईल. तर आता मी 'प्र' ला शिंपल्यात ठेवते.' आणि तिने पुळणीवर नवं वाक्य लिहून त्यासमोरच्या कंसात एक तळपता सूर्य काढला:

'प्र' असा प्रश्न जर मी तुम्हाला विचारला

तर तुम्ही 'सकच्छ' असं उत्तर द्याल का? (☀︎)

'याला मी भास्करांकित प्रश्न म्हणेन. समज हा आपण मोहनदास किंवा शकुनीकाकाला विचारला. निष्कर्ष असा निघतो आहे की 'प्र' ह्या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर होकारार्थी असेल तर काकाकडून आपल्याला 'सकच्छ' असं उत्तर मिळेल, आणि जर नकारार्थी असेल तर 'विकच्छ' असं उत्तर मिळेल. मग काका कुठलाही असो, आणि तक्ता कसाही असो,' रागिणी आनंदून म्हणाली.

'सगळं उफराटंच आहे!' सुशीला म्हणाली. 'प्रश्न सरळ विचारला तर घोळाचं उत्तर मिळतं. आणि शिंपल्यात दडवून विचारला तर सरळ उत्तर मिळतं!'

'आणखी एक गंमत! समज आपण हाच भास्करांकित प्रश्न चकोरकाकाला विचारला तरी बिघडणार नाही. खरं बोलायचं की खोटं बोलायचं हे तो भले नाणेफेक करून ठरवे ना का. एकदा ठरवल्यानंतर त्या खेपेपुरता तो एकतर मोहनदाससारखा नाहीतर शकुनीसारखाच वागेल. म्हणजे तोही प्रामाणिक उत्तरच देईल,' रागिणी म्हणाली.

'म्हणजे झालंच तर!' सुशीला म्हणाली. 'तात्पर्य काय की कुठलाही प्रश्न शिंपल्यात ठेवून कुणाही काकाला विचारला तर आपल्याला त्याचं प्रामाणिक उत्तर मिळेल.'

'पण असं जर असेल तर कूटप्रश्न सुटला असं नाही का वाटत तुला?' रागिणी म्हणाली.

'मला वाटतं सुटला,' सुशीला म्हणाली. 'पण नेमका कसा सुटला याचा मी मनोमन रियाज करत होते. त्यात एकच एक कित्ता पुन्हा पुन्हा येतो आहे. तो कसा ते सांगते, बरोबर वाटतो का बघ. असं समज की अलबत्या आणि गलबत्या नावाचे दोन काका आहेत. त्यातला एक इथे आहे तर दुसरा तिथे आहे, पण कोणता कुठे आहे ते आपल्याला माहीत नाही. म्हणजे दोन पर्याय आहेत:

इथे तिथे
अलबत्याकाका गलबत्याकाका

किंवा

इथे तिथे
गलबत्याकाका अलबत्याकाका

आता यातला कुठला पर्याय खरा आहे हे एकुलता एक प्रश्न विचारून आपल्याला शोधून काढता येईल. आपण विचारायचं - म्हणजे अर्थात शिंपल्याआडून विचारायचं की 'अलबत्याकाका इथे आहे का?' जर होकारार्थी उत्तर मिळालं तर पहिला पर्याय, नाहीतर दुसरा.

'सोपं आहे,' रागिणी म्हणाली.

'तर याला मी कित्ता म्हणते. तो पुन्हा पुन्हा गिरवत राहायचा,' सुशीला म्हणाली. 'आपण करायचं काय तर तिन्ही काकांना ओळीने समोर बसवू. डावीकडच्याला विचारू की 'तू मोहनदास आहेस का?' इथे दोन शक्यता आहेत:

समज तो 'हो' म्हणाला. तर याचा अर्थ बाकीचे दोघे शकुनी आणि चकोर आहेत. त्यांतला कुणीतरी एक मध्ये आणि एक उजवीकडे आहे. आता कित्ता गिरवला की तिघेही कोण ते कळेल. म्हणजे एकूण दोनच प्रश्नांत भागेल आणि आपला एक जर्दाळू वाचेल.

'तो अख्खा तूच खाल्लास तरी माझी हरकत नाही,' रागिणी म्हणाली.

'सगळं ऐकून तर घे,' सुशीला म्हणाली. 'समज तो 'नाही' म्हणाला. तर याचा अर्थ डावीकडचा काका शकुनी किंवा चकोर आहे. मग त्याला आपण विचारायचं की तू शकुनी आहेस का? समज तो 'हो' म्हणाला, तर बाकीचे दोघे मोहनदास आणि चकोर आहेत हे कळेल, म्हणजे पुन्हा कित्ता आला. समज तो 'नाही' म्हणाला, तर तो स्वत: चकोर आहे आणि बाकीचे दोघे मोहनदास आणि शकुनी आहेत हे कळेल. म्हणजे पुन्हा कित्ता आला. एकूण काय तर काहीही झालं तरी तीन प्रश्नांत उरकता येईल.'

रागिणी उठून उभी राहिली आणि तिने शरीराला आळोखेपिळोखे दिले. 'चिंगे, मी तुझं अभिनंदन करते आणि तूही माझं कर,' ती म्हणाली. 'कूटप्रश्न सुटलेला आहे. चल आता.'

पण विचारांत गढलेली सुशीला तशीच बसून होती.

'अगं, चल आता,' रागिणी अधिरेपणाने म्हणाली. 'जर्दाळू शिल्लक राहिला तर तो तुला द्यायचं मी कबूल केलं आहे. आणखी काय हवं? इतक्या हलक्या बौद्धिक कसरतीचं इतकं घसघशीत फळ पुरेसं नाही का झालं?'

सुशीला जागची हलली नाही. 'ताई, तो कागद मला पुन्हा दाखव पाहू,' ती म्हणाली.

कपाळावर लहानशी आठी पाडून रागिणीने ते पत्र सुशीलेच्या हाती दिलं. 'कसं लिहिलंय ते नीट ऐकूया,' सुशीला म्हणाली. 'चकोर मात्र एकच एक नेम धरून बसणार नाही. मनातल्या मनात नाणेफेक करून तो 'सकच्छ' की 'विकच्छ' ते ठरवील.'

रागिणीच्या चेहऱ्यावर जाग दिसली नाही.

'यात कुठेतरी मेख आहे,' सुशीला म्हणाली.

'एकच एक नेम म्हणजे खरं बोलायचा नेम किंवा खोटं बोलायचा नेम असं मी समजून चालले,' रागिणी म्हणाली. 'बाबा म्हणताहेत की असा एकच एक नेम चकोर धरून बसणार नाही. याचा अर्थ तो काही वेळा खरं बोलेल आणि काही वेळा खोटं बोलेल.'

'मान्य,' सुशीला म्हणाली. 'पण मला वाटतं आपण गोंधळ केला. सकच्छ-विकच्छातला फरक, हो-नाहीतला फरक आणि खऱ्याखोट्यांतला फरक हे आपण गोळाबेरीज एकच समजून चाललो. आपल्याला वाटलं की चकोरकाका मनोमन नाणेफेक करून खरं बोलायचं की खोटं बोलायचं ते ठरवतो. पण तसं म्हटलेलं नाही. 'सकच्छ' म्हणायचं की 'विकच्छ' हे तो नाणेफेक करून ठरवतो. ती वेगळी गोष्ट आहे.'

रागिणीने हुंकार भरला. 'मेख आहे खरी,' ती म्हणाली. 'म्हणजे पहिला फरक आणि दुसरा फरक यांत फरक नाही, पण पहिलादुसरा फरक आणि तिसरा फरक यांत फरक आहे! बरोबर म्हणाले ना मी?'

'तसं का म्हणेनास?!' सुशीला उद्गारली. 'जिची जशी लकब असेल तसं ती म्हणेल. तुझं वेगळं अन् माझं वेगळं. आपण कुठे जुळ्या बहिणी आहोत?'

'तेही खरंच आहे,' रागिणी म्हणाली. 'पण आता थोडं मागे जायला हवं. हे बघ, मी काय म्हणते की आधी तारांकित प्रश्न, नंतर चंद्रांकित प्रश्न आणि त्यातून पुढे भास्करांकित प्रश्न यावर आपली भिस्त होती. तेव्हा हे सगळं आपण पुन्हा तपासून बघूया. आपण असं म्हणत होतो की भास्करांकित प्रश्नाला मोहनदास आणि शकुनी ह्या दोन्ही काकांकडून प्रामाणिक उत्तर मिळेल. हे मला अजूनही बरोबर वाटतं. पण चकोरकाकाचा भरवसा नाही. मनोमन नाणेफेक करूनच जर तो उत्तर ठरवणार असेल तर त्याने प्रश्न ऐकला काय आणि नाही ऐकला काय.'

'आपल्याला आधी वाटलं होतं की चकोरकाकाला खड्यासारखा वेगळा काढायला हवा,' सुशीला म्हणाली. 'नंतर वाटलं की तसं करण्याची गरज नाही. आत्ता लक्षात येतंय की आपला पहिलाच अजमास बरोबर होता. पण जमेची बाजू अशी की अमुक एक काका चकोर नाही अशी जर आपल्याला खात्री असेल तर प्रश्न शिंपल्यात ठेवण्याची युक्ती निदान त्या काकावर लागू पडेल.'

रागिणी विचारात गढून गेली. तिने स्वत:चा डावा तळहात डोळ्यांसमोर आणला. आधी अंगठा आणि मग तर्जनी मुडपून पाहिली. मग सगळी बोटं सरळ करून फक्त अंगठा मुडपून पाहिला, तसे तिचे डोळे चमकले. ती म्हणाली, 'शिंपल्याची युक्ती फार छान आहे. तिचा वेगळा उपयोग करता येईल.' आणि तिने पुन्हा दोन्ही तळपायांनी भास्करांकित प्रश्न पुसून टाकून नवा प्रश्न लिहिला. ती म्हणाली, 'समज आपल्यासमोर दोन काका आहेत: एक इथे आहे आणि एक तिथे आहे. आता आपण तिथे असलेल्या काकाकडे बोट करून इथे असलेल्या काकाला विचारायचं:

'तिथे असलेला काका चकोर आहे का' असा प्रश्न जर मी तुम्हाला विचारला

तर तुम्ही 'सकच्छ' असं उत्तर द्याल का? (†)

'याला मी खड्गांकित प्रश्न म्हणते, कारण यानेही जर कूटप्रश्न सुटला नाही तर माझ्या हातून रक्तपात घडेल,' रागिणी पुढे म्हणाली. 'आता दोन शक्यता आहेत:

पहिली शक्यता: समज इथे असलेला काका 'सकच्छ' म्हणाला. तर याचे दोन अर्थ होऊ शकतात: एकतर इथे असलेला काका स्वत: चकोर आहे आणि मनोमन नाणेफेक करून उत्तर देतो आहे. किंवा तो चकोर नाही आणि प्रामाणिक उत्तर देतो आहे, म्हणजेच तिथला काका खरोखरीच चकोर आहे. दोहोंपैकी काही असलं तरी इथेही नाही आणि तिथेही नाही असा तिसरा पडद्याआडचा काका चकोर नाही हे नक्की. कारण चकोर एकच आहे.

दुसरी शक्यता: समज इथे असलेला काका 'विकच्छ' म्हणाला. तर याचे दोन अर्थ होऊ शकतात: एकतर इथे असलेला काका स्वत: चकोर आहे आणि मनोमन नाणेफेक करून उत्तर देतो आहे. किंवा तो चकोर नाही आणि प्रामाणिक उत्तर देतो आहे, म्हणजेच तिथला काका खरोखरीच चकोर नाही. दोहोंपैकी काही असलं तरी तिथला काका चकोर नाही हे नक्की.

एकूण काय तर कुठलीही शक्यता प्रत्यक्षात आली तरी एक बिनचकोर काका आपल्याला खात्रीने सापडेल. शिंपल्याची युक्ती वापरली तर त्याच्याकडून प्रामाणिक उत्तरं मिळतील, तेव्हा आता उरलेले दोन जर्दाळू त्याच्या डोंबलावर घालून आपल्याला तिन्ही काका ओळखून काढता येतील!'

'शाबास, ताई!' सुशीला म्हणाली. 'आता मात्र आपला कूटप्रश्न खरोखरीच सुटला. निघूया?'

'निघूया,' रागिणी म्हणाली. वाळूत रुतलेला एक शिंपला उचलून तिने फुंकरीने स्वच्छ केला आणि थैलीत ठेवून दिला.

यापुढचं सगळं अपेक्षेप्रमाणे झालं. समुद्र पाठमोरा टाकून दोघी आत निघाल्या. पिवळसर शेंदरी पुळण आणि चिक्कट काळी वाळू यांमधली स्पष्ट सीमारेषा पुढ्यात येताच चपला पायांत सरकवून धीम्या गतीने व चौफेर नजर टाकीत त्या पुढे चालू लागल्या. एकमेकांपाशी बोलण्यासारखं काही नसल्यामुळे तिन्ही काका परस्परांपासून दूर विखुरलेले होते. आपापल्या नादात असलेले एकाच मुशीतल्या चेहऱ्याचे हे तीन म्हातारे दोघींना एकेक करून दिसले. टाळ्या वाजवून आणि शुकशुक करून त्यांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न सुशीला करू लागली. रागिणी तिला म्हणाली, 'अगं वेडे, त्यांना मराठी समजतं.' तिने सर्वांना एकत्र करून एका कातळावर रांगेने बसवलं.

सर्वांत डावीकडच्या म्हाताऱ्याला उद्देशून सुशीला म्हणाली, 'काका, तुमच्या डावीकडे बसलेला काका चकोर आहे का असं जर मी तुम्हाला विचारलं तर तुम्ही 'सकच्छ' असं उत्तर द्याल का?' यावर तो काही बोलला नाही. सुशीलेला आपली चूक उमगली. तिने पितळी डबीतला एक जर्दाळू काढला. इतका जुना जर्दाळू स्वच्छ करून द्यायला हवा होता का आणि स्वच्छ करायचा तर कसा करायचा ह्या विचारात ती असतानाच तिच्या बोटांतून काकाने तो अलगद उचलून घेतला आणि बराच वेळ मन लावून चावून खाल्ला. बी थुंकून देत काका म्हणाला, 'विकच्छ.' रागिणी म्हणाली, 'याचा अर्थ असा की एकतर डावीकडचा काका चकोर आहे, किंवा मधला काका चकोर नाही. म्हणजे मधला चकोर नाही इतकं नक्की. पुढचं मी विचारते.'

दुसरा जर्दाळू रागिणीने मधल्या काकाला दिला आणि विचारलं, 'काका, तुम्ही मोहनदास आहात का असं जर मी तुम्हाला विचारलं तर तुम्ही 'सकच्छ' असं उत्तर द्याल का?' यावर तो म्हणाला, 'विकच्छ.' रागिणी म्हणाली, 'याचा अर्थ मधला काका शकुनी आहे. बालकाच्या निरागस दृष्टीने जर परिस्थितीकडे पाहिलं तर खोट्टारडा असूनही त्याला दोन जर्दाळू मिळणार हे मनाला बरं वाटत नाही. पण तिघांना ओळखण्यासाठीच हा शोडषोपचार चालू आहे आणि यातून त्यांचं भलं होणार आहे ह्या दृष्टीने पाहिलं तर ते समर्थनीय आहे.' तिसरा जर्दाळू शकुनीकाकाला देऊन तिने विचारलं, 'शकुनीकाका, तुमच्या डावीकडे बसलेला काका मोहनदास आहे का जर मी तुम्हाला विचारलं तर तुम्ही 'सकच्छ' असं उत्तर द्याल का?' यावर शकुनीकाका म्हणाला, 'सकच्छ.' 'झालं तर!' सुशीला म्हणाली. 'याचा अर्थ डावीकडचा चकोरकाका, मधला शकुनीकाका आणि उजवीकडचा मोहनदासकाका! बरोबर की नाही?' तिन्ही काका साश्रू नयनांनी पण प्रमुदित चेहऱ्यांनी कातळावरून खाली उतरले. तिळ्यांचे सगळे हावभाव सारखे नसतात. त्यामुळे अश्रू ढाळण्याची व चेहऱ्यावर आनंद व्यक्त करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी होती.

'काका, आता तरी सांगा. 'सकच्छ' चा अर्थ 'हो' असा होतो की 'नाही' असा होतो?' रागिणीने विचारलं. हा प्रश्न कुणालाही विचारलेला चालणार होता. शकुनीकाका म्हणाला, 'आम्ही तिघे इथे राहायला आल्यानंतर जसजशी वर्षं मागे पडत चालली तसतसा माझ्या मनातला गोंधळ वाढत चालला. तेव्हा मग एकदा काय तो निश्चित निर्णय करायचा म्हणून मी 'सकच्छ' म्हणजे 'नाही', आणि 'विकच्छ' म्हणजे 'हो' असा अर्थ मनाशी ठरवून टाकला.

विटाळ असतो का रे स्वच्छ?
प्रश्न मन्मनी ऐसा पुसुन
लटिके मी बोलेन 'विकच्छ'
असत्यवचनी ऐसा शकुनी

अशी एक छोटी कविता मी स्वत:पुरती रचून घेतली. 'लटिके बोलणारा असत्यवचनी' ही द्विरुक्ती त्यात मुद्दाम घातली होती. ही खूप जुनी वेदकालीन युक्ती आहे. तेच ते पुन्हा घोकत राहिलं की काळाच्या ओघात गायब होण्याची शक्यता कमी होते. 'विटाळ' आणि 'विकच्छ' हा अनुप्रासही मुद्दाम टाकला होता. 'ऐसा' हा शब्द दोनदा आला तो मात्र हेतुपुरस्सर नव्हे, तर जास्त चांगलं पद्य सुचलं नाही म्हणून.'

'माझाही हाच गोंधळ झाला आणि मलाही असाच काहीतरी निश्चित निर्णय घ्यावा लागला,' मोहनदासकाका म्हणाला. 'पण मी ठरवलं की 'सकच्छ' म्हणजे 'हो', आणि 'विकच्छ' म्हणजे 'नाही'. माझा निर्णय शकुनीच्या उलट पडला हे मला आत्ता कळतं आहे.'

'अहो, निर्णय-निर्णय म्हणजे असा काय?!' चकोरकाका काहीशा कडवट सुरात उद्गारला. 'दोहोंपैकी कुठलातरी एक शब्द निवडायचा इतका फालतू निर्णय ना? तो फार सोपा आहे. पण मनोमन नाणेफेक किती अवघड असते हे करून बघितल्याखेरीज कळणार नाही.'

त्या रात्री तिन्ही काका अथक मराठी बोलत राहिले. सराव नसल्यामुळे कित्येक शब्द आणि कित्येक वाक्प्रचार त्यांनी चुकीच्या अर्थाने वापरले.

✻ ✻

संदर्भ

(1) George Boolos, 'The hardest logic puzzle ever', The Harvard Review of Philosophy, vol. 6, pp. 62–65, 1996.
(2) Brian Rabern and Landon Rabern, 'A simple solution to the hardest logic puzzle ever', Analysis, vol. 68, no. 2, pp. 105–112, 2008.

✻ ✻ ✻

चित्रश्रेय: मानसी

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

एकदम मस्त.

भास्करांकीत प्रश्नाची गोम वाचतानाच कळाली, बरे वाटले.

पण प्रत्येक काकासाठी सकच्छ आणि विकच्छ वेगळे असू शकते ह्याचा विचार मात्र केलाच नव्हता. शेवटपर्यंत सगळे काका एकाच पेजवर आहेत असे वाटत होते, (अर्थात त्याचा काही फरक पडत नाही.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मेंदूला खाद्य आहे. अजुन तरी थांग लागला नाहीये. आता संध्याकाळी विचार करते.
कोड्याची मांडणी अतिशय रोचक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी सुद्धा आठवडाभर घेतला समजायला,
पण 'डिव्हाईड ॲन्ड कॉन्कर' चा चपखल आणि मनोरऺजक वापर केलाय कोडऺ पोचवायला त्यामुळे मजेमजेत कळली.
मस्त!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्वांत डावीकडच्या म्हाताऱ्याला उद्देशून
तिन्ही म्हातारे रांगेत बसवल्यावर मुली त्यांच्या समोर उभ्या राहून प्रश्न विचारत आहेत असे चित्र डोळ्यासमोर उभे केले तर मनांत पहिला प्रश्न आला की, म्हाताऱ्यांच्या डावीकडे की मुलींच्या डावीकडे ?
त्यामुळे उगीच या गोष्टीच्या कच्छपि लागलो असे वाटून स्वयंपाकघरांत जाऊन एक जर्दाळु खाल्ला!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फारच मस्त!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

मस्तच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

swati